‘मिखाइल बुल्गाकव’ या रशियन लेखकाच्या ‘मास्तिर इ मर्गरीता (मास्टर अँड मार्गारीता)’ या कादंबरीचा ‘कुत्र्याचं काळीज’ या नावाने इर्शाद वडगांवकर यांनी केलेला मराठी अनुवाद नुकताच डायमंड पब्लिकेशनतर्फे प्रकाशित झाला आहे. त्याला अनुवादकांनी लिहिलेलं हे मनोगत...
.................................................................................................................................................................
‘मिखाइल बुल्गाकव’ या रशियन लेखकाचं नाव मी पहिल्यांदा ऐकलं, २०१४ साली. सावंतवाडीत कुठल्याशा कार्यक्रमात सतीश काळसेकर यांनी बुल्गाकवच्या ‘मास्तिर इ मर्गरीता (मास्टर अँड मार्गारीता)’ या कादंबरीचा उल्लेख करून तिचं विश्लेषण केल्याचं आठवतंय. ‘कादंबरी काहीतरी भन्नाट असणार’ एवढं त्यावरून समजलं होतं. ही त्या लेखकाशी झालेली माझी तोंडओळख होती. अगदी अलीकडे बुल्गाकवचा उल्लेख वाचला, तो लास्लो क्रास्नहोरकाई या पोलीश लेखकाला २०२५ सालचा साहित्यातला नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यासंदर्भात! ‘क्रास्नहोरकाई यांच्या साहित्याची तुलना बुल्गाकवच्या साहित्याशी केली जाते’ असं निखिलेश चित्रे यांनी क्रास्नहोरकाईवरच्या ‘लोकसत्ता’तल्या लेखात म्हटलं होतं.
मधल्या १०-११ वर्षांमध्ये रशियन भाषा आणि साहित्य यांच्या अभ्यासाच्या अनुषंगाने बुल्गाकव आणि त्याच्या पुस्तकांशी बऱ्यापैकी मैत्री होऊन गेली होती. चेखवच्या काही रशियन कथांचा मराठी अनुवाद मी केला होता. त्या अनुवादित कथासंग्रहाच्या, ‘रादुगा’च्या प्रकाशन सोहळ्याच्या वेळी माया पंडित मॅडम मला म्हटल्या होत्या, ‘‘पुढच्या अनुवादासाठी बुल्गाकवची ‘मास्टर अँड मार्गारीता’ डोक्यात ठेव.’’ परंतु तोपर्यंत माझ्या डोक्यात बुल्गाकवचीच दुसरी एक लघुकादंबरी घर करून बसलेली होती - ‘सबाच्ये सेर्त्से (हार्ट ऑफ अ डॉग / कुत्र्याचं काळीज).’ खरं तर त्यावर मी थोडं कामही सुरू केलं होतं. ‘आपला पुढचा अनुवाद बुल्गाकवची ही लघुकादंबरीच असेल’ असं कुठेतरी नकळत ठरवलं गेलं होतं. आज दोन वर्षांनी त्या अनुवादाचं काम पूर्ण होऊन तो वाचकांसमोर येतोय, याचा मला मनस्वी आनंद आहे.
‘मिखाइल बुल्गाकव’... सोवियत काळातल्या या लेखकाचं नाव रशियन जनमानसांत रुजलंय, ते त्याच्या ‘मास्तिर इ मर्गरीता (मास्टर अँड मार्गारीता)’ या ‘कल्ट’ झालेल्या कादंबरीमुळे! बऱ्यापैकी वाचणाऱ्या कुठल्याही सामान्य रशियन माणसाला ‘आवडत्या रशियन कादंबऱ्या’ विचारल्या, तर उत्तरात ‘मास्टर अँड मार्गारीता’ हे एक नाव आवर्जून येतंच. इतकंच नाही, तर त्या कादंबरीतली काही वाक्यंही रशियन वाचकांना तोंडपाठ असतात.
१९३०च्या दशकात लिहिल्या गेलेल्या, पण त्यातल्या विषय-आशयापायी सोवियत युनियनमध्ये कित्येक वर्षं प्रकाशित न होऊ शकलेल्या, तरीही साहित्यातल्या जादूई वास्तववादाची पूर्वसुरी ठरलेल्या या एका कादंबरीपुरतीच बुल्गाकवची साहित्यिक ओळख मर्यादित आहे का? अर्थातच नाही! त्याने लिहिलं भरपूर, पण प्रकाशित झालं थोडंसंच. त्याच्या कथा, कादंबऱ्या आणि नाटकं यांमधून एका गडद आणि उपरोधाने भरलेल्या जगाचं जे दर्शन घडतं, ते एकाच वेळी वास्तववादीही असतं आणि अद्भुताने भारलेलंही असतं.
बुल्गाकवने ‘बेलया ग्वार्दिया’ (व्हाईट गार्ड्स), ‘सबाच्ये सेर्त्से’ (हार्ट ऑफ अ डॉग), ‘तीआत्रलनिय रमान’ (ब्लॅक स्नो) यांसारख्या कादंबर्या लिहिल्या, ‘रकोविये याइत्सा’ (फेटल एग्ज)सारख्या कथा लिहिल्या; पण त्याच्या हयातीत सोवियत समाजात अल्प काळासाठी तो सर्वश्रुत झाला, तो एक ख्यातनाम नाटककार म्हणून! त्याच्या काही नाटकांचे प्रयोग जगप्रसिद्ध ‘मॉस्को आर्ट थिएटर’मध्ये झाले आणि तेही प्रख्यात दिग्दर्शक स्तानिस्लावस्कीने बसवले होते. तरीही तो जिवंत असताना दोनेक पुस्तकं सोडली, तर त्याची एकही महत्त्वाची साहित्यकृती प्रसिद्ध होऊ शकली नाही.
उपहासाने आणि छुप्या, पण झोंबऱ्या टीकेने भरलेलं त्याचं लेखन सोवियत सेन्सॉर मंडळाच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या पचनी पडणं महाकठीण होतं. त्याच्या नाटकांबाबतही तेच... ‘द्नी तूर्बीनिख’ (डेज ऑफ टर्बिन्स), ‘जोयकिना क्वार्तिरा’ (अपार्टमेंट ऑफ जोया), ‘मोलियर’ (मलयेर) अशी तुरळक नाटकं सोडली, तर त्याची निम्म्यापेक्षा अधिक नाटकं कधी रंगमंचावर येऊ दिली गेली नाहीत; जी आली, ती सेन्सॉरची कात्री लागून आली आणि नंतर सत्ताधाऱ्यांच्या मनाला येईल तेव्हा रंगमंचावरून काढलीही गेली. व्यवस्थेशी जुळवून घेतलं नाही, तिचे पाय धरले नाहीत, तर ती लेखकाला कशी नाडते, याचं बुल्गाकव एक उत्तम उदाहरण! आयुष्यातला शेवटचा काळ त्याला उपेक्षित अवस्थेत कंठावा लागला. वयाची पन्नाशी गाठण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
.................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................
पाश्चिमात्य जगतात मात्र १९६०पासून त्याच्या कथा-कादंबऱ्यांची भाषांतरं प्रसिद्ध होऊ लागली आणि तिथे ‘सोवियत काळातला रशियन लेखक’ अशी त्याची प्रतिमा तयार झाली. इथे ‘रशियन’ हे विशेषण अधोरेखित! कारण सोवियत काळात राहूनही ‘निकलाय गोगल’, ‘चेखव’, ‘पूश्किन’ यांच्यासारख्या अस्सल रशियन लेखकांशी, एकोणिसाव्या शतकातल्या रशियन साहित्याच्या परंपरेशी त्याच्या साहित्याची नाळ जुळत होती. यूएसएसआरमध्ये राहूनही सोशालिस्टिक रियलीजमशी जुळवून घेण्याचा कधी प्रयत्नही त्याने केला नाही. आपली वेगळी वाट धुंडाळत, समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘सबाच्ये सेर्त्से’ किंवा ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!
रशियन साहित्याबद्दल, विशेषत: एकोणिसाव्या शतकातल्या रशियन साहित्याबद्दल म्हटलं जातं की, ‘रशियात साहित्य हे रशियन राजकारणाचं रूपक आहे.’ जे राजकारणातून वा राजकीय पटलावरून बोलणं शक्य नव्हतं, ते साहित्याच्या पानांमधून बोललं जात होतं; समाजकारणसुद्धा ललित साहित्यातून व्यक्त होत होतं. रशियाला राजेशाहीचा दीर्घ इतिहास... झार म्हणजे देवच जणू! झारशाही निरंकुश होती; अघोषित एकाधिकारशाही होती. लोकप्रतिनिधित्वावर आधारित संसद, स्वतंत्र न्यायव्यवस्था, मुक्त वर्तमानपत्रं, सिव्हिल सोसायटी आदी लोकशाहीतल्या यंत्रणांचा तिथे मागमूसही नव्हता! आधीच अत्यल्प असलेला राजकीय अवकाश गुप्त पोलीस आणि अतिशय कडक सेन्सॉरशिप यांच्यामुळे आणखी आक्रसला जायचा.
अशा परिस्थितीत रशियन लेखक, कवी आणि समीक्षक साहित्यातून हा अवकाश भरून काढायचे, तो बरीचशी रूपकं वापरून! त्यांचं साहित्य तत्कालीन सामाजिक-सांस्कृतिक संदर्भांनी युक्त असायचं. ते केवळ मनोरंजनासाठी किंवा रसग्रहणासाठी नव्हतं, तर जनतेचं ओपिनियन मेकिंगही त्यातून व्हायचं. समाजात विचारमंथन घडवून आणण्याची अंगभूत ताकद या साहित्यात होती. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीकोनातून लेखकाचं वा कवीचं उपद्रवमूल्य अधिक असायचं. साहजिकच, त्यांच्या लेखनावर पहाराही तेवढाच कडक असायचा पण रशियन लेखक हुशार! सेन्सॉरला चकवा देण्याची कला त्यांना अवगत होती. त्यांच्या लिखाणात मूर्त कॉन्टेक्स्ट तर असायचाच, पण त्यासोबत ‘सबटेक्स्ट’ चपखल पकडून ते साहित्यनिर्मिती करायचे. पुस्तकात जे थेट बोललं जात होतं, त्यापेक्षा जे थेट बोललं जात नव्हतं, त्याला या सबटेक्स्टमुळे महत्त्व प्राप्त व्हायचं.
सबटेक्स्टचा धागा पकडून साहित्यनिर्मिती करणाऱ्या आणि त्यातून व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या एकोणिसाव्या शतकातल्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘सबाच्ये सेर्त्से’ किंवा ‘कुत्र्याचं काळीज’ या लघुकादंबरीत तो नेमकं हेच करतो. ‘मास्तिर इ मर्गरीता (मास्टर अँड मार्गारीता)’नंतर रशियन वाचकांच्या सर्वाधिक पसंतीस उतरलेली बुल्गाकवची ही साहित्यकृती. १९२५ साली लिहिलेली ही लघुकादंबरी सोवियत वाचकांना वाचायला मिळाली, ती थेट १९८७मध्ये... तब्बल ६० वर्षांनंतर!
बुल्गाकवने ‘कुत्र्याचं काळीज’ लिहिली, तेव्हा रशिया एका संक्रमणाच्या टप्प्यात होता. विसाव्या शतकाला नवीन वळण देणारी १९१७ सालची रशियन क्रांती होऊन झारशाही संपुष्टात आली होती. पाच वर्षं क्रांतिविरोधकांशी चाललेलं गृहयुद्ध संपून १९२२मध्ये सोवियत युनियनची सत्ताही स्थापन झाली होती. कामगार-शेतकरी वर्गाचं जगातलं पहिलं राज्य रशियात अस्तित्वात आलं होतं. जुनं कोलमडून पडलं होतं, पण नवं घट्ट पाय रोवून उभं राहू शकलं नव्हतं. मधल्या काळात १९२१-२२चा भयंकर दुष्काळ, आर्थिक कुचंबणा आणि त्यावर मात करण्यासाठी तात्पुरत्या काळासाठी अवलंबलेली अर्धभांडवली अर्थव्यवस्था, लेनिनचा मृत्यू आणि त्यानंतर नेतृत्वाकरता सुरू झाली चढाओढ या सगळ्या घडामोडी झाल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर उभी राहणारी नवीन सोवियत व्यवस्था गर्भावस्थेतच होती. स्टॅलिनची पोलादी पकड तोवर व्यवस्थेवर बसलेली नव्हती. ‘ही नवीन सत्ता टिकेल की नाही? टिकली, तर किती वर्षं टिकेल? तिची पुढची दिशा कोणती असेल?’ याबाबत सर्वांना संभ्रम असूनही बुल्गाकवने या व्यवस्थेची पुढची दिशा ओळखली होती. त्याला ही दिशा नेमकी पकडून साहित्यातून समाजाला दाखवायची होती.
क्रांतिपश्चात नवीन रशियात, १९२०च्या दशकात, साहित्यात आणि कलेत तुलनेने थोडीफार मोकळीक शिल्लक होती. त्यामुळे बुल्गाकव ‘कुत्र्याचं काळीज’ निदान लिहू शकला होता. इतकंच नाही, तर मॉस्कोत एका साहित्यिक वर्तुळाच्या बैठकीत त्याने ती टप्प्याटप्प्याने वाचूनही दाखवली होती. अर्थात, त्या बैठकीला हजर असलेल्या गुप्त पोलिसांनी कादंबरीचा सूर सोवियत व्यवस्थेविरोधातला असल्याचा अहवाल वरती पाठवल्यामुळे प्रकाशनावर तर बंदी आलीच होती, शिवाय हस्तलिखितही जप्त करण्यात आलं होतं. पुढे दोन वर्षांनंतर गोर्कीच्या मध्यस्थीमुळे ते बुल्गाकवला परत करण्यात आलं, परंतु त्यावरची सोवियत रशियातली बंदी त्याच्या हयातीत उठली नाही. त्याच्या मृत्युपश्चातही पुढची जवळपास ६० वर्षं बंदी कायम होती.
पाश्चिमात्य जगालाही ४० वर्षं या साहित्यिकृतीच्या अस्तित्वाचा पत्ताच नव्हता. जॉर्ज ऑरवेलची रशियन क्रांतीवरची रूपककथा ‘अॅनिमल फार्म’ १९४५ साली साहित्यविश्वात आली, तर बुल्गाकवच्या लघुकादंबरीचं ‘हार्ट ऑफ अ डॉग’ हे इंग्रजी भाषांतर १९६८मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झालं. दोन्हींमधलं आशयसूत्र एकच. त्यामुळे दोन्ही साहित्यकृतींची तुलना झाली आणि अद्यापही होते आहे.
यांमधल्या एका लेखकाने क्रांत्योत्तर नव्या रशियावरची रूपककथा बाहेरून लिहिली होती, तर दुसऱ्याने आत राहून! तुलना करायचीच झाली, तर आतल्या कथेचं पारडं किंचित जड असल्याचं माझं मत आहे. आशय बऱ्यापैकी सारखा असला, तरी शैलीत काही मूलभूत फरक आहेत. बुल्गाकव मुळात नाटककार असल्याने त्याच्या कथनशैलीत नाट्य ठासून भरलेलं आहे. ऑरवेलचा पिंड पत्रकाराचा असल्याने त्याची कथनशैली भिन्न आहे. त्यात ऑरवेलची ‘अॅनिमल फार्म’ प्रकाशित झाली, त्याच्या सुमारे वीसेक वर्षं आधी बुल्गाकवने या आशयाची कथा हाताळली होती, हा मुद्दाही लक्षात घेतला पाहिजे.
१९८५ साली मिखाइल गोर्बाचेव्ह यांच्याकडे सोवियत युनियनची सूत्रं आल्यावर त्यांनी ‘पिरिस्त्रोयिका’ (अर्थव्यवस्थेची पुनर्बांधणी) करतानाच ‘ग्लासनस्त’चं (सेन्सॉरशिपचं शिथिलीकरण) धोरणही अवलंबलं. त्यामुळे साहित्य, कला, पत्रकारिता यांवरची सेन्सॉरची बंधनं शिथिल करण्यात आली. पूर्वी बंदी असलेल्या साहित्याला प्रकाशनाची परवानगी देण्यात आली. त्यात ‘कुत्र्याचं काळीज’चाही नंबर लागला. ‘हस्तलिखितं जळत नाहीत’ हे बुल्गाकवचं म्हणणं पन्नास वर्षांनी खरं ठरलं; परंतु बहुसंख्य सोवियत जनतेला ही लघुकादंबरी पहिल्यांदा भेटली, ती पुस्तकांच्या पानांमधून नव्हे, तर सिनेमाच्या पडद्यावरून!
व्लदिमीर बोर्तको या तरुण दिग्दर्शकाने ‘कुत्र्याचं काळीज’चं अत्यंत सुंदर आणि चपखल माध्यमांतर केलं. तो सिनेमाही सोवियत चित्रपटसृष्टीत ‘कल्ट’ होऊन गेला. सिनेमा पाहून लोक बुल्गाकवच्या मूळ लघुकादंबरीकडे वळले... पुस्तकाची मागणी तुफान वाढली... सिनेमा आणि ‘कुत्र्याचं काळीज’मधल्या कथा, व्यक्तिरेखा, प्रसंग, घटना हे सगळं ६० वर्षांपूर्वीचं असूनही सोवियत जनतेला ते प्रासंगिक वाटलं; कालबाह्य वाटलं नाही. बुल्गाकवने चितारलेल्या १९२०च्या दशकातल्या संक्रमण काळाच्या छटा त्यांना त्या काळातही (१९८०च्या दशकातल्या सोवियत युनियनच्या शेवटच्या काही वर्षांत) दिसल्या. विशेषत: दोन्ही कालखंडांमध्ये मॉस्कोतली ‘आर्थिक कुचंबणा’ सारखीच होती. ‘सबाच्ये सेर्त्से’ला उदंड प्रतिसाद देऊन सोवियत प्रेक्षकांनी आणि वाचकांनी सहा दशकांपूर्वी बुल्गाकवने नवव्यवस्थेला तपासून केलेल्या निदानावर शिक्कामोर्तब केलं. अखेर बुल्गाकव पेशानेही डॉक्टरच होता!
रूढार्थाने ‘कुत्र्याचं काळीज’ ही एक साधी सरळ विज्ञानकथा आहे. तिला फॅन्टसी, उपहास, विडंबन नि तत्त्वज्ञानाचा तडका आहे, इतकंच. एका बुद्धिजीवी, वयोवृद्ध डॉक्टराची ही गोष्ट आहे. वैद्यशास्त्रातला मानद प्राध्यापक असलेला हा प्रतिष्ठित डॉक्टर एक निष्णात सर्जनही आहे. हा परिश्रमी, प्रयोगशील डॉक्टर एके दिवशी त्याच्या मदतानीसहीत एक विलक्षण वैज्ञानिक प्रयोग करतो. पेशींच पुनर्जीवन करून सजीवाला, मानवाला चिरतरुण बनवता येईल काय? ही शक्यता तपासण्यासाठी हा महत्त्वाकांशी डॉक्टर एका भटक्या कुत्र्यावर त्याच्या ऑपरेशन थिएटरमध्ये प्रयोग करतो.
या प्रयोगात कुत्र्यावर शस्त्रक्रिया करावी लागते. प्रयोगाचं उद्दिष्ट असतं एक , पण होऊन बसतं भलतंच काही. माणूस करायला एक जातो आणि त्याच्या हाती लागतं दुसरंच काहीतरी! प्रयोग एका अर्थी फसतो. पण सतत नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या या विद्वान डॉक्टराच्या हातून नकळत एक निराळीच निर्मिती होऊन बसते. अपघाताने झालेली ही नवनिर्मिती डॉक्टरलाच नाही, तर त्याच्या अख्या घराला उपद्रवी ठरू लागते. घराचं वातावरण गढूळ होतं. या निर्मितीचा जेव्हा डॉक्टर बारकाईने अभ्यास करू लागतो, तेव्हा त्याच्या हाती लागतं एक भयंकर सत्य. परंतु आता उशीर झालेला असतो. अवाजवी महत्त्वाकांक्षेपायी हातून घडलेली चूक निस्तरता निस्तरता डॉक्टरला त्याच्या जगण्यातलं खरं मर्म सापडतं.
‘सबाच्ये सेर्त्से’मध्ये बुल्गाकवने हाताळलेली ‘निर्मिती निर्मिकाच्याच मुळावर उठण्याची’ थीम साहित्यपरंपरेत नवीन नाही. मेरी शेलीची ‘फ्रँकेनस्टाईन’ किंवा एच. जी. वेल्सची ‘द आयलंड ऑफ डॉक्टर मोरो’ या कादंबऱ्या त्याची दोन ठळक उदाहरणं आहेत... दोन्हीही विज्ञानकथा... दोन्ही कथांमध्ये निर्मिक डॉक्टरची निर्मिती त्याच्यावरच उलटते. वरकरणी विज्ञानकथा वाटणाऱ्या या कादंबऱ्यांमधून लेखकांनी सबटेक्स्ट स्तरावर रूपकात्मकता वापरून निसर्गनियमाच्या विरोधात जाणाऱ्या मानवाच्या अतिमहत्त्वाकांशी वैज्ञानिक-वैद्यकीय प्रकल्पांपायी उद्भवू शकणाऱ्या धोक्यांची पूर्वसूचना मानवजातीला करून दिली होती.
बुल्गाकव ‘कुत्र्याचं काळीज’मध्ये नेमकं हेच करतो. एच. जी. वेल्स त्याचा आवडता लेखक होता. बुल्गाकवचं ‘काळीज’ थोडं खोदलं, तर त्यातली रूपकात्मकता आणि त्याच्या आवडत्या लेखकाचा त्याच्यावरचा प्रभाव प्रकर्षाने जाणवू लागतो. ही रूपकात्मकता मुख्यतः रशियन राज्यक्रांतीच्या संदर्भात आहे!
१९१७ची रशियन क्रांती हा विसाव्या शतकाला वळण देणारा मानवी इतिहासातला कदाचित सर्वांत मोठा सामाजिक प्रयोग! बोल्शेविकांच्या क्रांतीचं उद्दिष्ट केवळ जुनी, अन्याय्य राज्यव्यवस्था नष्ट करून साम्यवादी, समतावादी, न्याय्य समाजव्यवस्था स्थापन करणं इतकंच नव्हतं, तर त्यांना मुळापासून एक ‘आदर्श सोवियत मानव’ तयार करायचा होता. त्यासाठी समाजाची, पर्यायाने त्या समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची मनोधारणा मूलभूतरित्या बदलणं गरजेचं होतं.
१९२२ सालच्या सोवियत युनियनच्या निर्मितीनंतर रशिया एक महाकाय प्रयोगशाळा बनली. जुन्या, 'बुर्जवा' मानवाला नष्ट करून 'होमो Homo Sovieticus नावाचा नवीन, आदर्श, समर्पित आणि समतावादी माणूस निर्माण करण्यासाठी या प्रयोगात शस्त्रक्रिया करणं अत्यावश्यकच ठरलं. इतक्या वर्षांत शरीरात तयार झालेल्या जुन्या, बुर्ज्वापण्याचा गाठी काढूनच टाकाव्या लागणार होत्या. क्रांतीचे भोई आणि सोवियत सत्तेचे निर्माणकर्ते डॉक्टर आणि सर्जन बनले, तर रशियन जनता प्रयोगातला ‘सब्जेक्ट’ अर्थात प्रयोगवस्तू झाली.
‘विचारसरणी’ हा त्या सर्जन्सच्या हातातला शस्त्रक्रियेचा चाकू झाला. शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचा त्यांच्या चाकूच्या क्षमतेवर गाढ, अढळ विश्वास.त्यांच्या लेखी हा चाकू सर्वशक्तिमान होता. सोवियत लेखक ‘वसिली ग्रोसमन’ म्हणतो तसं ‘हा चाकूच विसाव्या शतकातला सर्वांत मोठा खेळाडू, सर्वांत महान सैद्धान्तिक गुरू ठरला!’ मात्र विचारसरणीच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया ज्याच्यावर पार पाडली आहे, त्याच्या शरीराला ते विचार पचलेच नाहीत तर? ‘कुत्र्याचं काळीज’मध्ये बुल्गाकव नेमकी या अपचनाचीच गोष्ट सांगतो. एका विज्ञानकथेतून सबटेक्स्ट पातळीवर तो या महाकाय रशियन प्रयोगाची आणि त्याच्या संभाव्य परिणामांची कहाणी आपल्याला सांगू पाहतो.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
बुल्गाकव क्रांतिकारक नव्हता; रूढार्थाने क्रांतीचा समर्थकही नव्हता. बोल्शेविक सत्तेकडे साशंकतेने पाहत असला, तरी या बोल्शेविकांनीच गृहयुद्ध थांबवून रशियात तात्पुरतं का असेना, स्थैर्य आणल्याची त्याला जाणीव होती. विचाराने तो जुन्या, युरोपीय परंपरेतल्या उदारमतवादी, बुद्धिजीवी वर्गाचा प्रतिनिधी होता. पुढचा संघर्ष रशियातल्या नव्या व्यवस्थेच्या वाहकांचा (आणि मुख्यत्वे तिच्या लाभार्थींचा) आणि देशात शिल्लक राहिलेल्या बुद्धिजीवी वर्गाचा असणार असल्याचं पक्कं हेरून हा संघर्षच त्याने ‘कुत्र्याचं काळीज’मध्ये चितारला. त्यामुळे अनेकांना या कथेच्या प्रमुख व्यक्तिरेखेत मानसशास्त्रात मूलभूत भर घालणारे जगप्रसिद्ध रशियन फिजिओलॉजिस्ट ‘इवान पावलव’ यांची प्रतिमा दिसून आली. पावलव यांचा क्रांतीनंतरच्या नवव्यवस्थेशी असाच संघर्ष उद्भवला होता. तसंच त्यांचा मानसशास्त्रातला ‘क्लासिकल कंडिशनिंग’ दाखवणारा प्रयोगसुद्धा कुत्र्यांवरच केला गेला होता.
वैद्यकशास्त्र आणि विज्ञानाला सर्वशक्तिमान समजण्याबद्दल बुल्गाकव पहिल्यापासूनच साशंक होता. तो विज्ञान-तंत्रज्ञानाच्या विरोधात नव्हता; रूढार्थाने धार्मिक तर नव्हताच. मात्र स्वतः डॉक्टर असल्यामुळे विज्ञान-तंत्रज्ञानाच्या मानवी कल्याणाबद्दलच्या मर्यादा तो जाणून होता. तो निसर्गत्वाचा पुरस्कर्ता होता. मात्र म्हणून निसर्गाला, निसर्गव्यवस्थेला तो दैवी वा पवित्र मानत नव्हता; पण झटपट कृत्रिम ‘प्रयोगा’पेक्षा नैसर्गिक ‘संवर्धनावरन’, ‘संगोपनावर’ त्याचा विश्वास होता. मानवी मेंदूवर कृत्रिमपणे होत असलेली कलमं त्याला बिलकूल पसंत नव्हती. या कथेच्या माध्यमातून त्याने विज्ञानाच्या उपयोगातल्या नैतिक जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उभं केलं.
बुल्गाकवच्या या ‘काळजा’ने यंदा शंभरी पार केली आहे. ज्या व्यवस्थेबद्दल त्याने लिहिलं होतं, ती सोवियत युनियन कोसळून आता ३५ वर्षं उलटली आहेत; परंतु ज्या प्रयोगाची कथा ‘कुत्र्याचं काळीज’ सांगते, ते प्रयोग आपल्या अवतीभवतीही कुठल्या ना कुठल्या रूपात आजही दिसतातच. अलीकडच्या काही वर्षांमध्ये तर त्यांचं प्रमाण वाढलंच आहे.
‘कुत्र्याचं काळीज’ हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियन यांच्यावरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने त्याचा लावलेला अन्वयार्थ आणि त्यातून घेतलेला संभाव्य भविष्याचा वेध म्हणजे ‘सबाच्ये सेर्त्से’ अर्थात ‘कुत्र्याचं काळीज.’ तिच्या अनुवादाच्या निमित्ताने या गोष्टींबद्दल विचारमंथन सुरू झालं, तर उत्तमच! १९२५मध्ये सोवियत रशियाच्या सुरुवातीच्या काळासंदर्भात लिहिली गेलेली ही लघुकादंबरी १९८०च्या दशकात तर कालबाह्य झालेली नव्हतीच, पण २०२५मध्येही तिची वैचारिक खोली आणि सार्वत्रिकता वाचकांच्या जाणिवांचा परीघ आणखी विस्तारेल, हे नक्की!
बुल्गाकवसारख्या प्रतिभावान आणि धाडसी रशियन लेखकाची एकही साहित्यकृती यापूर्वी मराठीत आलेली नाही. बहुधा हा पहिलाच प्रयत्न! थेट रशियन भाषेतून मराठीत केलेला हा अनुवाद वाचकांना आवडेल, रुचेल ही आशा बाळगतो.
.................................................................................................................................................................
इर्शाद वडगांवकर
irshadruss@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment