निवृत्तीचे हाकारे अन् राष्ट्रीय आपत्तीचा सोस
पडघम - देशकारण
देवेंद्र शिरुरकर
  • शरद पवार
  • Thu , 15 November 2018
  • पडघम देशकारण शरद पवार Sharad Pawar

मोह आणि काळानुरूप महत्त्वाकांक्षा यांचा मेळ बसवणे हा खरे तर अंगभूत व्यवस्थापन कौशल्याचा भाग मानावा लागेल. असे व्यवस्थापन कौशल्य प्रत्येकाच्या अंगी असेलच असे नाही. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्यांच्या ठायी अशी प्रज्ञा असणे हा दुग्धशर्करा योगच. पण असे योग व स्वप्नातल्या आकांक्षासिद्धीचे क्षण येण्यासाठीचे योगायोगही सत्ताप्राप्तीसाठी अपुरे पडतात. यापेक्षाही अधिक असे काही तिला हवे असते. याच्या शोधात मग अध्यात्माच्या कुंडल्या मांडल्या जातात. या कसरतीतून विणत गेलेले मिथकांचे जाळे एवढे गुंतागुंतीचे बनत जाते की, त्या ओझ्याखाली सत्याचा ऊर धपापून जावा. कारण मोह होण्याला मर्यादा नसतात, मात्र तो किती काळ व्हावा याचीही एक सीमारेषा निश्चित असते. मोह अमर्यादित मानला तरी महत्त्वाकांक्षा सिद्धीस येण्याची स्थिती थोडी संकुचित असते. तसा मोह हासुद्धा कालसापेक्षच असतो; पण मानवाला तो अगदी स्मशानात जाईपर्यंत सुटत नाही त्याला कोण काय करणार?

आपण नेमके काय करू शकतो याचा अंदाज असणारे लोक सार्वजनिक जीवनातील प्रत्येक घडामोडीवर केवळ लक्ष ठेवत बसत नाहीत, या घडामोडींमागे आणखी काही घडामोडी घडत जातील, याची काळजी घेतात अथवा या घडामोडींना आपल्याला अनुकूल असे वळण देण्याचा प्रयत्न करतात. या दोन्हींतून आपले इप्सित साध्य होत नसेल तर किमान या घडामोडींचे प्रेरक आपणच असल्याचा आभास तरी निर्माण करतात.

मोहाला भरपूर स्वातंत्र्य असते, पण राजकारणातल्या महत्त्वाकांक्षेला संख्याबळाच्या मर्यादा असतात. त्यामुळे मनीषा कितीही प्रबळ असली तरी प्रत्यक्षातले गणित हवे तसे साकारले जातेच असे नव्हे. अशा वेळी त्या अंगभूत व्यवस्थापन कौशल्याचा कस लागतो. असलेल्या आणि बहुतांशी नसलेल्याच मिथकांचे जाळे विस्तारण्याचाही कसोशीने प्रयत्न केला जातो. पण तरीही सत्तेची आभा कवेत घेता येत नाही. यामागील कारणांचा शोध घेणे हा खरा अशा कुशल व्यवस्थापकांसाठी आजवर उपेक्षित ठेवलेला आणि आता अपेक्षित असणारा टप्पा असतो.

.............................................................................................................................................

सविस्तर माहितीसाठी क्लिक करा - https://tinyurl.com/y86lc3fq

.............................................................................................................................................

प्रदीर्घ काळ राजकीय व्यासपीठावर वावरताना शाश्वततेला दिलेली बगल ही कदाचित यातली सर्वांत मोठी भळभळती जखम असू शकते. राजकीय प्रक्रियेत सहभागी होताना त्यातले सगळेच भिडू आपापल्या कुवतीनुसार आपापला पट मांडत असतात. असा पट मांडताना आपल्या मूळच्या क्षमतेपेक्षा तो मोठा भासेल याची काळजी घेतली जाते. त्या खेळाचा प्रवाह, त्याची दिशा आणि गतिमानता पाहून आपला डाव, खेळी बिनचूक ठरेल असा प्रयत्न करत असतात; पण त्याच वेळी खेळाचा नूर पाहून तो खेळ आपल्याला हवा तसा रंगावा यासाठीही त्यांची धडपड चाललेली असते.

पण हा सत्तेचा सारिपाट मोठा विलक्षण असतो. अंतिम डावापर्यंत ज्याच्या मनी विजयाची माळ आपल्याच गळ्यात पडावी अशी धारणा असते, असे खेळगडी बाजूला पडतात आणि मानाची गदा स्वप्नातही कल्पिली नव्हती, अशा चर्चेत नसलेल्या गौडांच्या हातात सोपवली जाते. हे असले चमत्कार जनता जनार्दन सहजपणे घडवून आणते खरी पण मग मैदानात घट्टपणे पाय रोवून बसलेल्या मल्लांच्या झोपी उडून जातात त्याचे काय?

सारिपाटाच्या या लहरीपणामुळे कसलेले खेळाडू मग आणखीच व्यथित होतात अन् नव्याने मोह व महत्त्वाकांक्षांना खतपाणी घालायला लागतात. पण ही वाटचाल अख्खा पट अस्थिर करण्याकडेच जात असते. आजवर टाकलेले प्रत्येक पाऊल ज्या अस्थिर परिस्थितीचा अचूक लाभ घेत दमदार झालेले असते. त्यामुळे या खतपाणी घातलेल्या प्रवासाचीही दिशा अशाच अस्थिरतेच्या शोधात प्रवाही झालेली असते आणि हा सारा इतिहास भविष्याच्या आड यायला लागतो.

२०१९ च्या महायुद्धासाठी सज्ज व सिद्ध राजकीय पक्ष आपापल्या आघाड्या मजबूत करण्यात गुंतलेले असताना आयुष्यातील अर्धशतक सक्रिय राजकारणात योगदान देणाऱ्यांना या घडामोडीतील अस्थिरतेचेच आकर्षण असावे यातच सगळे काही आले. सार्वजनिक वाटचालीतल्या तारुण्य व वार्धक्याच्या व्याख्या जरा निराळ्या असतात. भारतात सर्वोच्च सत्ताधीशपदी विराजमान होण्याचे वय जरी ‘अवघे पाऊणशे’ असले तरी मनातल्या सुप्त इच्छा पूर्ण होण्यासाठीच्या प्रयत्नांना काळाची मर्यादा असते. गत सत्ताधारी संभाव्य सत्ताधारी बनण्याप्रत पोहोचू शकणार नसले आणि तसा अचूक अंदाज आलेला असला तरीही हे स्वप्न वाटते तेवढे सुरस नव्हे. विरोधकांच्या ऐक्याचे शिलेदार होण्याचा दावा करणे व सर्व विरोधकांनी एकमताने प्रत्यक्ष सहमती देणे यात मोठी तफावत असते. 

आकाशाला गवसणी घालताना आधारासाठी वापरलेल्या टेकड्यांची रचना बदलली की, कालौघात त्या टेकड्याही कोणाचे वजन पेलायचे? याबाबत विशेष सजग बनतात. अस्थैर्यावर स्वार होत व्यक्तिगत स्थैर्याचा आविष्कार साधणाऱ्यांची आजवरील वाटचालच येत्या काळात अडसर बनू पहात आहे.

मोह, महत्त्वाकांक्षा, क्षमता असूनही विश्वासार्हतेची उणीव कायम असेल तर पुन्हा कात्रजच्या घाटाचीच चर्चा अधिक रंगत जाणार. त्यामुळे अधूनमधून जाणीवपूर्वक केले जाणारे निवृत्तीचे हाकारे अन् राष्ट्रीय आपत्तीचा सोस यातली विसंगती काही काळ केवळ सर्वसामान्यांची करमणूक करेल. पण या मिथकांमुळे व आभासामुळे ना मती गुंगेल ना सत्तेचा बार उडेल!  

.............................................................................................................................................

लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.

shirurkard@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......