अजूनकाही
मा. श्री. मोहन भागवतजी,
सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रेशीम बाग, नागपूर.
स.न.वि.वि.
भागवतजी, सर्वप्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शंभर वर्षे आणि आपणही वयाची पंचाहत्तरी पूर्ण केलीत, या आपले अभिनंदन. केवढा हा योगायोग! खरं तर हा ‘दुग्धशर्करा योग’च म्हणावा लागेल.
तसा मी आपला वैचारिक विरोधक आहे, पण मी तथागत बुद्ध, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान पुरुषांचा डोळस अनुयायी, त्यांच्या विचारांचा पाईक आहे. या महापुरुषांनी विचाराला विचारानं, हिंसेला अहिंसेनं आणि अन्यायाला संवैधानिक मार्गानं उत्तर देण्याची परंपरा निर्माण केलेली आहे.
जुन्या रद्दी झालेल्या वर्तमानपत्रांतील महत्त्वपूर्ण बातम्यांची कात्रणं काढत असताना आपण वेगवेगळ्या ठिकाणी दिलेल्या भाषणांच्या बऱ्याच बातम्या मिळाल्या. त्या पुन्हा वाचत असताना आपण लोकांना कसं दिग्भ्रमीत करत आहात, याची जाणीव झाली. तशी ती जाणीव आधीपासूनच आहे. सध्या देशाचे सत्ताकेंद्र आपल्या हातात असल्यामुळे प्रत्येकाला आपली दखल घ्यावी लागत आहे. त्यामुळे मलादेखील क्रमप्राप्त आहे.
नागपुरात हेडगेवार स्मृतीभवनजवळच्या रेशीम बाग मैदानात भरलेल्या पुस्तक महोत्सवात गेलो असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीशी बांधीलकी असणाऱ्या एक-दोन प्रकाशकांकडून चारपाच पुस्तकं विकत घेतली. त्यांच्याकडे पैसे सुट्टे नसल्यामुळे त्यांनी मला संघाचं ‘पंचपरिवर्तन’ नावाचं पुस्तक घेण्यास भाग पाडलं. त्या वेळी त्यांनी माझं नाव व आडनावदेखील आवर्जून जाणून घेतलं. माझे आडनाव पुण्यातील उच्चकुलीन ब्राह्मणांसारखे वाटत असल्यामुळे त्यांनी मला सन्मानच दिला आणि पुस्तकांवर बरीच सवलतदेखील दिली. खरेदी केलेली पुस्तकं ठेवण्यासाठी भगव्या रंगाची पिशवीदेखील दिली.
पुस्तक प्रदर्शनातील बऱ्याच प्रकाशनांच्या स्टॉलवर गेलो असताना तिथं महात्मा गांधींचं साहित्य विकणारे प्रकाशकदेखील दिसले. मनात विचार आला की, गांधीदेखील फार जिद्दी आहेत. ते संघभूमीवर यायलादेखील मागेपुढे पाहत नाहीत. गोडसेच्या भूमीत गांधी आले, अशी मनात कल्पना केल्यावर थोडं हसूदेखील आलं. मग गांधीविचारांवर लिहिलेली एक-दोन पुस्तकं घेऊन त्याच भगव्या पिशवीत टाकली. मनात विचार आला की, या भगव्या पिशवीत हेडगेवार गांधींना कसं काय सामावून घेतील? पुस्तकांची पिशवी तशीही कमजोर होती. त्यामुळे भीतीदेखील वाटत होती की, ही पिशवी फाटणार तर नाही ना. या भीतीपोटी ती जरा सांभाळूनच पकडली.
पुढे एका पुस्तकाच्या दुकानातून आउशवित्झ छळछावणी स्मृती संग्रहालयानं प्रकाशित केलेलं एक पुठ्ठा बांधणी केलेलं पुस्तक घेतलं. भागवतजी, हिटलर आणि आउशवित्झ छळछावणी हे शब्द आपल्या परिचयाचे नक्कीच आहेत. त्याबद्दल मी आपणास वेगळं सांगण्याची काहीएक गरज नाही. हिटलर आणि त्याच्या एसएस संघटनेचा आदर्श घेऊनच आपल्या संघाची स्थापना झालेली आहे.
भागवतजी, नागपुरात आपल्या हेडगेवार स्मृती भवनाच्या काही अंतरावर मी आणि माझा मित्र फिरत असताना रस्त्यावर मला पाचशे रुपयाची नोट सापडली. नोटेवर हसऱ्या चेहऱ्याचे गांधी होते. त्या नोटेने मी नथुराम गोडसेचं एक इंग्रजी चरित्र खरेदी केलं. मी पुस्तकवाल्याला हसऱ्या चेहऱ्याचा गांधी देऊन त्याच्याकडून गोडसे खरेदी केला. गोडसेला खरेदी करण्यासाठीदेखील गांधीच द्यावा लागेल, हे गोडसेला कळलं असतं, तर कदाचित त्याने जिवंत होऊन आत्महत्याच केली असती.
.................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................
भागवतजी, हे वाचून कदाचित आपल्याला मी फुशारक्या मारत आहे, असं वाटत असेल. ते तसं वाटणं हेदेखील आपल्या स्वभावाला अनुसरूनच आहे. पण मी शपथेवर सांगतो, हे अगदी खरं आहे. तुम्ही त्याची सत्यता पडताळण्याकरता माझ्या घरी येऊन शकता. आपणच म्हणता ना की, दुरून आपल्याला बऱ्याच गोष्टी समजत नाहीत, एकदा संघात येऊन बघा, मगच संघ काय आहे ते कळेल. म्हणूनच म्हणतो की, या कधीतरी भेटायला. मोड आलेली मटकीची उसळ आणि काहीतरी गोडधोडदेखील देईन आपणास. ते तुम्हाला आणि तुमच्या स्वयंसेवकांना फार आवडतं, असं ऐकलं असल्यामुळे त्याचाच पाहुणचार करावा लागेल.
आमच्याकडे गाईचं मांस मोठ्या आवडीनं खाल्लं जातं, पण ते आपणास आवडत नसल्यामुळे ते आपणास खावयास देणं म्हणणे स्वतःच्या हातानं महापाप करून घेऊन स्वतःच्या अंगावर संकट ओढवून घेण्यासारखं होईल. सध्या घरातील भांड्यात कोंबडीचं किंवा बकऱ्याचं मटण ठेवलं, तरी गाईचं मटण बनवून खाल्ल्याच्या संशयावरून सामूहिक हल्ले होतात, याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे मी आपल्याला कदापीही धर्मसंकटात टाकणार नाही.
आपण नेहमी ‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणून या पृथ्वीवरील प्राणी आणि जीवसृष्टीला आपलं कुटुंब मानत असल्याचा फक्त दावा करता. खरं तर कुटुंबात काही मंडळी सावत्रदेखील असू शकतात. हे तुम्ही आणि तुमच्या संघटनेतील अनेकांनी वारंवार आपल्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे. या सृष्टीत राहणाऱ्या ख्रिश्चन, मुसलमान लोकांना आपण सावत्र असल्यासारखी वागणूक देता. ‘वसुधैव कुटुंबकम’ यासोबतच जर आपण ‘तस्य कुटुम्बस्य सर्वे सदस्याः मम भ्रातरः सन्ति।’ अर्थात ‘त्या कुटुंबातील सर्व सदस्य हे माझे बांधव आहेत’ असं म्हटलं असतं, तर कदाचित तुमच्या म्हणण्यास अर्थ उरला असता. वक्तृत्वास कृतीची जोड असणं आवश्यक असतं, नाही का?
नथुराम गोडसे नावाच्या सांगली संघ शाखेच्या बौद्धिक प्रमुखानं महात्मा गांधींची हत्या केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं या कृतीची निंदा केली की नाही हे मला माहिती नाही, परंतु गांधींची हत्या झाल्यानंतर संघस्वयंसेवकांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला, ही माहिती जगजाहीर आहे. आपल्या संघानं महात्मा गांधींच्या हत्येतून स्वतःला निर्दोष ठरवण्याचा मोठ्या शिताफीनं प्रयत्न केला. त्यात तुम्ही यशस्वीदेखील झाला, पण तुमच्या संघटनेच्या कपाळावर गांधीहत्येचा जो टिळा लागलेला आहे, आजही त्या टिळ्याच्या खाणाखुणा दिसून येत आहेत.
गांधीहत्येनंतर नथुराम गोडसेचा आमच्याशी कोणताही, कसलाही संबंध नाही, असं सांगत आपण हात वर केले, परंतु नथुराम गोडसेचे बंधू गोपाळ गोडसे हे आपल्या खुनी भावाच्या मदतीला धावून आले. आपण हात वर केलेले असताना गोपाळ गोडसे यांनी आपणास घट्ट मिठी मारून आपले अख्खे गोडसे कुटुंब आणि विशेषतः नथुराम गोडसेदेखील आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संघाचा स्वयंसेवक असल्याचे ओरडून सांगू लागले. त्यांची मिठी मात्र आपण सोडवू शकला नाहीत.
सध्या आपल्याला आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘वंदे मातरम्’बद्दल जो कळवळा निर्माण झालेला आहे, हे बघून तर मला आश्चर्यच वाटतं. ब्रिटिश सत्तेच्या विरोधाचं प्रतीक म्हणून ‘वंदे मातरम्’ हे गीत गायलं जायचं. तशा घोषणा दिल्या जायच्या. देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं, त्याच्या स्वयंसेवकांनी ‘वंदे मातरम्’ म्हणाल्याचं किंवा तशा घोषणा दिल्याचे संदर्भ मला अजून तरी सापडलेले नाहीत. संघानं ब्रिटिश सत्तेचा गौरव केल्याचे, स्वातंत्र्य आंदोलनावर प्रतिकूल टीका केल्याचे आणि आपल्या स्वयंसेवकांना स्वातंत्र्य आंदोलनात जाण्यापासून रोखणारे बरेच संदर्भ मात्र सापडले आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बरेचसं साहित्य मी वाचलेलं आहे. सावरकरांनी एकदा आपल्यावर टीका केल्याचंदेखील मी वाचलं आहे. त्यांच्या मते, ‘स्वयंसेवक जन्माला यावा, त्याने संघात काम करावे आणि काहीही न करता मरण पावावे.’ त्यांच्या समग्र साहित्यापैकी केवळ वीस ते तीस टक्के भागाचा स्विकार करून आपण त्यांना प्रेरणास्थान मानण्याचा केविलवाणा प्रयत्न का करत आहात? मी आपली अडचण समजू शकतो. आपल्याकडे राष्ट्रीय पातळीवर सांगावा असा कोणताही महापुरुष नाही. त्यामुळे सावरकरांच्या नावाचं चांगभलं म्हणण्याची दुर्दैवी वेळ आपल्यावर आलेली आहे.
भागवतजी, आपण ज्या सावरकरांना आपले प्रेरणास्थान मानता त्याच सावरकरांनी अनेक अंधश्रद्धा निर्मूलक कथा लिहिलेल्या आहेत. त्यांचे चुकीच्या रूढीवर सुधारकीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार मांडणारे विविध लेख ‘क्ष किरणे’ या नावाने उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे आपण ज्या ‘मनुस्मृती’ला मानता ना, त्यातील चुकीच्या आणि कालबाह्य विचारांचा खरपूस समाचार घेणारे बरेच लेख त्यांनी ‘किर्लोस्कर’ या मासिकात लिहिले. ते वाचून तर अक्षरशः माझी भंबेरीच उडाली.
सावरकरांचे हे विज्ञानवादी विचार आपणास माहिती नाहीत का? माहिती आहेत, पण ते इतरांना सांगायचे नाहीत, असाच आपण चंग बांधला आहे. या विचारामुळे सावरकर आपल्या तावडीतून सुटतील आणि आपली गोची होईल, या भीतीपोटी कदाचित आपण त्यावर बोलण्याचे, संवाद करण्याचे टाळत आहात. मी आपली व्यथा समजू शकतो. तुम्ही सावरकरांच्या सोयीच्या विचारांना स्वीकारून बाकीच्या विचारांना मूठमाती देण्यास मागेपुढे पाहणार नाही, पण झाकलेलं कोंबडं आरवायचं राहत नाही.
विरोधक सावरकरांची वारंवार बदनामी करत आहेत, अशी आवई आपण आणि भाजपनेते वारंवार उठवत असतात. तुम्ही सावरकरांची बदनामी वाचवू शकता, त्यांचे विज्ञानवादी विचार समोर आणून. पण हे करण्यास आपलं संघमन धजावत नाही. कारण जर सावरकरांचे वैज्ञानिक विचार लोकांपर्यंत पोहोचले, तर तुम्ही सावरकरांच्या ‘हिंदुत्व’ या ग्रंथाचा आधार घेऊन जो डंका पिटत आहात आणि त्याची जी इमारत उभी करू पाहत आहात, तिचा पाया ढासळल्याशिवाय राहणार नाही.
सावरकरांना ‘भारतरत्न’ द्यावा अशी आपली मनोमन इच्छा आहे. तसं आपण बोलूनदेखील दाखवलंत. पण सावरकरांचं समग्र साहित्य केंद्र सरकारने प्रकाशित करावं, अशी सूचना केली नाहीत. असं का? गेली बारा वर्षं केंद्रात तुमचंच सरकार असताना तुम्हाला आता अचानक सावरकर का आठवले? हेडगेवार किंवा गोळवलकर का नाही?
भागवतजी, सावरकर गाईला उपयुक्त पशु मानत होते. त्यांनी गाईचं मांस खाण्यास कसलाही मज्जाव केला नाही किंवा गाईचे मांस खाणाऱ्यास विरोधदेखील केला नाही. आपण गाईच्या अंगावर ३६ कोटी देव असल्याचे सांगत असता, मात्र या ३६ कोटी देवांची तुलना सावरकरांनी गाईच्या अंगावर असलेल्या गोचिडांशी केलेली आहे.
मला माहीत आहे की, तुमच्या संघाला सावरकरांचे वैज्ञानिक विचार मान्य नाहीत. सावरकरांच्या वैज्ञानिक विचारांवर लेखन करणारे सावरकरवादी लेखक शेषराव मोरे यांचं एकदा नागपूरच्या विदर्भ साहित्य संघात एक व्याख्यान होतं. त्यात त्यांनी सावरकरांचे वैज्ञानिक विचार सांगितले. त्या कार्यक्रमात संघाचे पहिले प्रवक्ते मा. गो. वैद्यदेखील उपस्थित होते. सावरकरांचे वैज्ञानिक विचार ऐकताच वैद्य एकदम अस्वस्थ झाले. ते मंचावरून उठले आणि बाहेर चालले गेले. या घटनेची शहानिशा मी मोरे यांच्याशी बोलून करून घेतली आहे.
देशानं नुकतीच स्वातंत्र्याची पंचाहत्तर वर्षं पूर्ण केली, भारतीय संविधानाची, गणराज्याचीदेखील पंचाहत्तर वर्षं पूर्ण झाली आहेत. या पाठोपाठ राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेदेखील शंभरी पूर्ण केली. आपण स्वतःला सच्चे देशभक्त, राष्ट्रप्रेमी म्हणवत असता. मग आपण आणि आपल्या संघटनेनं देशभर देशाच्या स्वातंत्र्याची, भारतीय संविधानाची, भारतीय गणराज्याची पंचाहत्तरी मोठ्या उत्साहात, हर्षोल्हासात साजरी केली का? मला तरी दिसलेलं नाही.
हो, मात्र आपण आपल्या संघटनेची शंभरी देशभरात सकल हिंदू समाजप्रणित विराट हिंदू संमेलनांचं आयोजन करून साजरी करत आहात. नागपुरातल्या एका संमेलनात मीदेखील उपस्थित होतो. तिथं विदर्भ प्रांत डॉ. हेडगेवार परिसर महाल कार्यालयाद्वारे प्रकाशित ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : संघटना आणि सेवेची १०० वर्षे’ या शीर्षकाचं एक माहितीपत्रक वाटण्यात आलं. त्यात आपण संघाचा थोडक्यात इतिहास, कार्य व भविष्यातील योजना आणि स्वयंसेवकांनी पंचपरिवर्तन करण्यासाठी तत्पर असलं पाहिजे. ती ‘पंचपरिवर्तने’ कोणती, याबद्दलदेखील थोडक्यात माहिती दिली आहे.
त्या पत्रकातील एक मुद्दा वाचून मला अक्षरशः धक्का बसला. त्यात तुम्ही सामाजिक समरसता निर्माण करण्याचं जे ध्येय ठेवलं आहे, त्यात तुम्ही ‘दुर्दैवानं, आपल्या समाजातील काही घटकांना अस्पृश्य मानून त्यांना शिक्षण, सुविधा आणि सन्मानापासून वंचित ठेवलं गेलं. हे पूर्णपणे अन्याय्य आणि अमानवी आहे.’ असं लिहिलं आहे. त्या समाजघटकांना कुणी अस्पृश्य मानलं, हे आपणास माहीत नाही का?
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
मला एक कळलं नाही. तुम्ही २०१८च्या सप्टेंबर महिन्यात नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात आपले द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकरलिखित ‘बंच ऑफ थॉट’ या पुस्तकातील अनेक विचार कालबाह्य झाले, असं सांगत त्या पुस्तकापासून फारकत घेत असल्याची घोषणा केली होती. सध्या हे पुस्तक बाजारातदेखील उपलब्ध नाही. पण माझ्या व्यक्तिगत पुस्तक संग्रहालयात या पुस्तकाच्या इंग्रजी आणि हिंदी भाषेतील दोन दोन प्रति उपलब्ध आहेत. हे पुस्तक इंटरनेटवरदेखील उपलब्ध आहे.
आपण फारकत घेतलेली असतानादेखील आपल्या स्वयंसेवकांनी मात्र फारकत घेत असल्याचं दिसत नाही. आपण फक्त सांगण्यासाठी सांगता आणि कृती मात्र दुसरी करता, असं तर नाही ना? आपलेदेखील दाखवण्याचे आणि खाण्याचे दात वेगवेगळे आहेत की काय? विराट हिंदू संमेलनातील अनेक वक्ते, आपल्याच संघटनेच्या वेगवेगळ्या उपसंघटनेतील मंडळी आजही या मंचावरून ख्रिश्चन व मुस्लीमविरोधी गरळ ओकताना दिसतात. हे जरा विचित्र वाटतं. मला वाटतं की, आपण गोळवलकरलिखित पुस्तकापासून फारकत घेतली असली, तरी त्यातील विचारांना तिलांजली मात्र दिलेली नाही.
आणखी एक महत्त्वपूर्ण बाब आपणास प्रकर्षानं सांगावीशी वाटते. विराट हिंदू संमेलनाच्या आमंत्रणपत्रिकेवर छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, संत कबीर, तथागत बुद्ध, महर्षी वाल्मिकी, शंकराचार्य, गुरू गोविंदसिंग, मीराबाई, वर्धमान महावीर, संत रविदास, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा, स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद, सावरकर, हेडगेवार, गोळवलकर आदींची छायाचित्रं आहेत.
मला एक प्रश्न पडला आहे. ही छायाचित्रं कशासाठी छापलेली आहेत? त्यांचे विचार आपण मानणार आहात का? या महापुरुषांचे विचार स्वीकारण्यासाठी तुम्हाला हेडगेवार व गोळवलकरांच्या विचारांना तिलांजली द्यावी लागेल. पण ते तर तुम्हाला शक्य नाही. मग हा देखावा कशासाठी? हां, तुम्ही या आमंत्रणपत्रिकेवर म. गांधींचं छायाचित्र मात्र दिलेलं नाही. त्याला काही विशेष कारण आहे का हो? संघशतकपूर्ती निमित्त नागपुरातल्या एका कार्यक्रमात आपण व्हेरायटी चौकातील म. गांधींच्या पुतळ्याला प्रणाम केलात, त्यांच्या पायाशी बसलात. या दोन्हींचा अर्थ कसा लावायचा?
माझे एक शिक्षक, ज्येष्ठ कवी, पत्रकार पुरुषोत्तम भिसीकर यांनी संघावर एक कविता लिहिलेली आहे. त्याते ते म्हणतात -
‘टोपी काळी, हृदय काळे,
कीर्ती यांची काळी गे माय ।
शब्द भगवे, परंतु फसवे,
कृती यांची काळी गे माय ।।’
भागवतजी, पत्र जरा खूप मोठं झालं आहे. आपल्याकडे तसाही फारसा वेळ नसेल. आपणास संपूर्ण देशभर संघशताब्दी साजरी करावयाची आहे. त्यासाठी तुम्ही देशभर पायपीट करत फिरत आहात. त्यामुळे थांबतो.
कळावे.
आपला चिंतक,
अमित इंदुरकर
.................................................................................................................................................................
लेखक अमित इंदुरकर पत्रकार आहेत.
mr.amitindurkar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.


Post Comment