अजूनकाही
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
निवडणूक म्हटलं की, ‘सामान्यजन’ अचानक ‘मतदारराजा’ बनतात. औटघटकेचं त्याचं राज्य. कारण मतदानानंतर त्याला पुढच्या निवडणुकांपर्यंत विसरलं जातं. तरीही मतदानाच्या वेळी त्याला महत्त्व असतंच, हे सर्व पक्षांना मान्यच असतं, किंवा मान्य करावं लागतं म्हणा हवं तर. पण ते असतं. मतदारराजाचा कौल मिळवण्यासाठी भरमसाठ आश्वासनं दिली जातात. नंतर त्यांना एक ‘चतुर खेळी’ असं समजलं जातं. किंवा तो एक जुमला होता, असंही निलाजरेपणानं सांगितलं जातं.
याचा अनुभव आपण २०१४पासून घेत आहोत. हे सारं केलं जातं, मतदारांना खुश करून आपलंसं करण्यासाठी. कधी मतदार फशी पडतात, तर कधी त्यांना जाग येते. २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी आली तशी.
सध्याचे सत्ताधारी तसे हुशारच म्हणायचे. लोकसभेच्या अनपेक्षित निकालानंतर त्यांना जाणवलं की, काहीतरी बिनसतंय. चुकतंय. सर्व काही आपल्यालाच मिळावं, ही त्यांची हाव असल्यानं, हा एक प्रकारचा धोक्याचा इशाराच होता त्यांच्यासाठी. त्यामुळे ते लगेच सावध झाले. कारण काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका थोड्याच काळात होणार होत्या. त्या अल्पावधीत लोकांची मनं वळवणं शक्य नव्हतं. कितीही प्रचार केला, तरी आपण कमी पडणार, याची जाणीव त्यांना झाली होती. तरीही त्यांनी आशा सोडली नव्हती. यावर उपाय हवा होता. तोच शोधण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
काय करता येईल याबाबत जोरदार खलबतं होत होती. अशातच तिथं पडलेल्या मतदारयाद्यांकडं एकाची नजर गेली. एवढ्या थोरल्या याद्या? त्याला आश्चर्यच वाटलं आणि तो बारकाईनं विचार करायला लागला. विचाराची चक्रं फिरू लागली. इथंच काहीतरी करायला हवं, नक्की काहीतरी करता येईल, असं त्याला वाटू लागलं. पण काय हे चटकन सुचत नव्हतं. त्यानं निकरानं विचार सुरू ठेवला.... आणि अचानक त्याला काहीतरी सुचलं. हसून त्यानं टाळी वाजवली.
कुणीतरी विचारलं, ‘अरे, हे काय, इथं सगळे काळजीत आहेत, आणि तू का हसतोयस, टाळ्या वाजवतोयस? (कोविड तर केव्हाच नाहीसा झालाय)’ त्यावर तो म्हणाला- ‘आपल्या या काळजीवर मला जालीम उपाय सापडलाय. तो अमलात आणला तर आपली अशी सरशी होईल की, लोकं आश्चर्यानं बोटं तोंडात घालतील. त्यांची बोलती बंद होईल, बघा. एकदम जालीम उपाय आहे. तो योग्य प्रकारे योजला की, झालं. सारं काही आपलंच!’
.................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................
एकदम सारे जण आश्चर्यानं त्याच्याकडे पाहू लागले. मग त्यानं अत्यंत हळू आवाजात सांगितलं, ‘या मतदारांच्या याद्या पाहूनच मला उपाय सापडलाय. बरं याद्या बनवणारे आपल्यालाच बांधलेले आहेत आणि निवडणूक आयोग तर आपलाच. त्यामुळं सारं काही बिनबोभाट पार पडेल.’ असं म्हणून तो म्हणाला की, ‘मी इथं काही बोलणार नाही. फक्त वरिष्ठांबरोबरच बोलेन, म्हणजे हे सारं गुप्त राहील, कुणाला संशयही येणार नाही.’ त्यावर सर्वांनी माना डोलावल्या. त्यांच्या चेहऱ्यावर आता हास्य दिसत होतं आणि संकट टळल्याचं समाधानही.
त्याला वाटत होतं तसंच झालं. जिथं जवळपास त्यांच्या पक्षाची, धुळधाण उडाली होती, त्याच राज्यांत त्यांना भरघोस यश मिळालं, पण ते जमतेमच साजरं करण्यात आलं. बहुधा त्यांचं मन त्यांना खात असावं. एक अपराधीपणाची जाणीव त्यांना टोचत होती. कुठं कुणाला संशय आला तर, कुणी खोलात जाऊन तपास करायचं ठरवलं तर, हा विचार त्यांना अस्वस्थ करत होता. मात्र तसं सगळे जण दाखवत नसले तरी जोशात होते. आता आपल्याला कुणी हातही लावू शकणार नाही, असं त्यांना वाटत होतं.
...आणि अचानक ज्याची भीती होती तेच घडलं. कर्नाटकातील लोकसभेच्या मतदारसंघातील एका विधानसभा मतदारसंघात चांगलाच घोटाळा झाल्याचं सांगितलं गेलं. मग लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्यानं त्यात लक्ष घातलं. तेव्हा ध्यानात आलं की, अनेक मतदारसंघांत मतदारांची संख्या अचानक खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचा शोध घेताना कळलं की, यामुळंच विधानसभा निवडणुकांचे निकाल लोकसभेच्या निकालांच्या तुलनेत खूपच वेगळे आहेत. अगोदर मतदारसंघांत मतदान केंद्रावर, शेवटच्या तासात उभे असलेल्यांची संख्या अचानक मोठ्या प्रमाणात दाखवली गेली आणि त्यांनी मतदानही केलं, तेही नियमाप्रमाणे वेळ संपल्यानंतर.
पण या हादऱ्यानं सत्तारूढ पक्षाची जराही चलबिचल झाली नाही. ते म्हणत राहिले की, सारं काही नियमाबरहुकूम झालंय. त्यांना वाटत होतं की, एवढ्या खुलाशानं भागेल. पण आता हे बिंग ओळखणाऱ्यांनी आकडेवारीच जाहीर करायला सुरुवात केली. एका तासात मतदानाची संख्या वाढलेली दाखवली, पण प्रत्यक्षात तेवढं मतदान होण्यास तासापेक्षा बराच कालावधी लागतो, हेही त्यांनी दाखवून दिलं.
आणि आता मतदारयाद्यांची बारकाईनं पाहणी सुरू झाली. त्यातून नवाच भस्मासूर निर्माण झाला. कारण त्या याद्यांत बरीच नावं काढून टाकण्यात आली होती आणि अनेक नव्यानं जोडली गेली होती. हे नव्यानं यादीत सामावले गेलेले मतदार कोण, याबाबत पुन्हा तपास केला गेला, तेव्हा त्यातील काही मयतांची नावं असल्याचं आढळलं. मतदारांची नावं आणि छायाचित्रं, नावं आणि पत्ते जुळत नव्हते. जे पत्ते मुळात अस्तित्वातच नाहीत, तिथंही अनेक मतदार असल्याचं यादीमध्ये दिसत होतं. अनेकांचा पत्ताही एकच होता. त्यांनी मतदानही केलं होतं. त्यामुळे याद्यांवरील अविश्वास वाढत होता. आता त्याला चळवळीचं स्वरूप आलं होतं.
विरोधी पक्षाच्या या मोहिमेला जोरदार पाठिंबा मिळत होता. ‘मत चोरी’ हा परवलीचा शब्द बनला होता. आपल्या महाराष्ट्रातदेखील याबाबत आवाज उठत होता. मग सर्व विरोधी पक्षांनी मिळून सत्याचा मोर्चा काढला, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या साऱ्याबाबत निवडणूक आयोग गप्पाच होता. तेही अपेक्षितच म्हणा. निवडणूक आयोगाचे आयुक्त एवढंच म्हणाले, ‘विरोधी पक्षनेत्यानं लेखी प्रतिज्ञापत्र द्यावं.’ म्हणजे स्वतःची जबाबदारी त्यांनी टाळली.
दुसरं असं की, आयोग काही उत्तर देत नसला, तरी त्याचं वकीलपत्र घेतल्याप्रमाणं सत्तारूढ पक्षाचे लोकच जोरदार उत्तरं देतात. तीही अर्थातच त्यांच्या सवयीप्रमाणं मुख्य मुद्दा टाळून. कारण आता विरोधी पक्षानं त्या याद्याच सादर केल्या होत्या. तरीही त्यांना अपयशानं निराशा आली आहे, म्हणून ते असं बोलताहेत असं सत्तारूढ नेते सांगत होते. हे अर्थातच कुणालाही पटण्याजोगं नव्हतं, कारण त्यांच्या युतीतीलच काही जण विरोधकांना दुजोरा देऊ लागले होते. अगदी सत्तारूढ पक्षाचे नेतेही याला अपवाद नव्हते. एकच हलकल्लोळ उडाला होता.
त्यातच बिहारमधील निवडणुका आल्या. तेथील याद्यांतही ठरावीक जाती आणि जमातीच्या लोकांची नावं पद्धतशीरपणे काढून टाकण्यात आली होती. कुणी थेट सांगत होता की, ‘मी मरण पावल्याची नोंद आहे, पण मी तर जिवंत आहे.’ कित्येक मृतांची नावं यादीत दिसत होती. आणि त्यांनीही मतदान केल्याचं दिसत होतं. पण निवडणूक आयोगाचं मौन काही सुटत नव्हतं. सत्तारूढांना मदत करण्याची जबाबदारी आयोग प्रामाणिकपणानं निभावत होता.
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
इथं एक जाणवत होतं की, हे काहीतरी ‘कात्रजचा घाट’ दाखवण्यासारखं आहे. म्हणजे काय तर विरोधक मतदानयंत्राबाबत संशय घेत होते, तरी ते सिद्ध करणं जवळपास अशक्य आहे, असं आयोग म्हणत होता. आम्ही ते करून दाखवतो म्हणणाऱ्यांकडं दुर्लक्ष करत होता. तरीही मनात शंका होती की, खरंच असं काही झालं तर? कदाचित त्या भीतीपोटीच त्यांनी सूचनेबरहुकूम याद्यांमध्येच हेराफिरी करायचं ठरवलं असणार. सारं काही त्यांच्याच हातात, त्यामुळे त्यात काही अडचण येणार नाही, असा त्यांना विश्वास होता.
पण तो अनाठायी ठरला. कारण तेथील याद्यांतील गडबड उघडकीस आणली गेली. नव्यानं समाविष्ट करण्यात आलेलेच मतदान करतात, त्यामुळं सत्तारूढ पक्षाचं काम होतं, हेही आता उघडपणं बोललं जाऊ लागलं. तरीही आयोग गप्पच कारण त्याला ठाऊक होतं की, निवडणुका अगदी जवळ आल्या आहेत. त्यामुळं आता याबाबत काहीच करता येणं शक्य नाही.
इथं बिरबल वा तेनालीराम यांच्या नावानं सांगितली जाणारी एक गोष्ट आठवते. बादशहानं सोन्याचा जुना झालेला हत्ती पॉलिश करण्यासाठी, म्हणजे लखलखीत करण्यासाठी सोनाराकडे सोपवला. पण त्याने सांगितलं की, आमचं काम झाल्यावर तो थोडे दिवस वाळूत पुरून ठेवावा लागेल. राजा म्हणाला, ‘ठीक आहे, पण काम प्रामाणिकपणानं करायला हवं.’ सोनार म्हणाला, ‘महाराज, तुमच्या कामात आम्ही कधीच लबाडी करणार नाही.’ राजा ‘हो’ म्हणाला.
तरीही त्याच्या मनात संशय होताच. सोनार काही ना काही गडबड करणारच असं त्याला वाटत होतं. यथावकाश सोनाराने हत्ती सर्वांच्या साक्षीनं वाळूत पुरला. योग्य वेळी पुन्हा सर्वांच्या देखत त्याने तो बाहेर काढला. तो खरोखरच नव्यासारखा दिसत होता. सोनाराच्या प्रामाणिकपणाबद्दल त्याला विश्वास वाटला. हत्ती देऊन सोनार गेला.
बादशहानं त्यांचा मेहनताना देण्यासाठी खजिनदाराला पाचारण केलं. तेवढ्यात बिरबल म्हणाला, ‘महाराज, थांबा.’ बादशहानं विचारलं- ‘का रे बाबा?’ त्यावर बिरबल उत्तरला, ‘महाराज, तुम्हाला खरंच वाटतं, सोनाराने काही लबाडी केलेली नाही?’ बादशहा म्हणाला, ‘त्याने थोडंही सोनं काढून घेतलेलं नाहीय, यावर माझा विश्वास आहे. कारण माझ्यादेखतच हे झालंय.’ तेव्हा बिरबलानं सांगितलं, ‘महाराज, थोडंही सोनं त्याने लंपास केलं नाहीय हे खरं आहे.’ बादशहा म्हणाला, ‘असं आहे, तर तुझी काय अडचण आहे?’ उत्तरादाखल बिरबल हसून म्हणाला, ‘महाराज, त्याने थोडंही सोनं काढून घेतलेलं नाही, हे बरोबरच आहे. कारण थोडं सोनं नाही, तर त्याने सोन्याचा अख्खा हत्तीच पळवला आहे, आणि नकली हत्ती तुम्हाला आणून दिला आहे, म्हणूनच तो जास्तच चकाकत आहे.’
आता मात्र बादशहा चिडला आणि रागावून म्हणाला, ‘बिरबल, तुझा स्वभावच संशयी आहे. म्हणून तू त्या निरपराध सोनारावर आरोप करत आहेस. आता बघ मी बोलावतो त्यांना आणि विचारतो. मग तर तुझा संशय दूर होईल ना?’ बिरबलानं हलकेच स्मित करून होकार दिला. बादशहाने सोनाराला बोलवून घेतलं. आता मोठाच धनलाभ होणार या अपेक्षेनं तो लगेच आला.
बादशहानं त्याला खडसावून विचारलं, ‘खरंच तू काही गडबडघोटाळा केला नाहीस ना, खरं खरं सांग, नाहीतर माझी शिक्षा काय असते ते तुला माहीत आहे.’ सोनार गडबडला. आपलं पितळ आता उघड पडलं, हे त्याला उमगलं. त्याने खाली मान घालून गुन्हा कबूल केला आणि पुन्हा अशी चूक होणार नाही, असं शपथेवर सांगितलं.
बादशहा म्हणाला, ‘मला माझा सोन्याचा हत्ती आणून दे, मग माफी मिळेल. त्याने ते मान्य केलं आणि हत्ती निमूट आणून दिला. त्याला माफ करून जायला सांगून बादशहा म्हणाला, ‘बिरबल, मी उगाच तुझ्यावर रागावलो, पण तू हे ठामपणं कसं सांगितलंस?’ त्यावर बिरबल म्हणाला, ‘तुमचा सोन्याचा हत्ती त्याने सर्वांदेखत पुरला, पण तो बाहेर काढण्याच्या दिवसाआधीच त्याने गुपचूप तो काढून तिथं हा नकली सोन्याचा चकचकीत हत्ती ठेवला. तोच सर्वांदेखत बाहेर काढला.’
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
म्हणजे मतदानयंत्रात फेरफार केला गेला नाही, हे ठामपणं सांगता यावं म्हणून, मतदारयाद्याही सत्तारूढांना सोयीस्कर होईल अशा प्रकारे बनवल्या गेल्या. बरं, इथं त्यांचंच राज्य असल्यान आपल्याला ते काही विचारणार नाहीत, याबद्दल आयोगाला विश्वास होता, कारण त्याच्यामार्फतच तर हे सारं केलं गेलं होतं. साहजिकपणंच सत्तारूढांचे पाठीराखे आयोगावरील आरोपांच्या विरोधात उठले. प्रचंड कांगावा केला आणि आयोगावर खोटे आरोप केले जात आहेत, वगैरे बाबी सांगू लागले. पण आयोगानं मात्र याबाबत मौनच पाळलं. कारण आपण बचाव करायला गेलो, तर आपल्यावरच बाजू उलटू शकते, हे त्याला कळत होतं. कदाचित सत्तारूढांच्याच मर्जीनं हे केलंय, याची खंतही वाटत असणार. मात्र मतदारयाद्या नव्यानं करण्यात येणार नाहीत, हे मात्र त्याने निक्षून सांगितलं.
बिहारमध्ये त्या मतदारयाद्यांच्या आधारेच मतदान झालं. त्याचा सत्तारूढांना अपेक्षित तसा निकालही लागला. तो लागण्याच्या आधीच निवडणूक आयोगाने मतदार याद्या पडताळणीची मोहीम देशभर राबवण्याचं जाहीरही करून टाकलं आहे. त्याची सुरुवात बंगाल, तामिळनाडू, केरळ अशी विरोधी पक्षांची सरकारं असलेल्या राज्यांतून होणार आहे.
दरम्यान बाकीच्या ठिकाणी याची पायाभरणीही सुरू असेल, जेणेकरून सत्तारूढांना जास्तीत जास्त अनुकूल निकाल लागतील. महाराष्ट्रातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियोजित निवडणुका पुढं ढकलण्यात येणार नाहीत, असंही निवडणूक आयोगाने बजावलंय. म्हणजे, तुम्ही खुशाल आवाज करा, रान उठवा, पुरावे द्या, आम्हाला करायचंय, तेच आम्ही करणार! त्यामुळे विरोधी पक्षाच्या जागरण मोहिमा, सत्याचे मोर्चे कितीही निघोत, त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण २०१४मध्ये ‘खरंखुरं स्वातंत्र्य’ मिळालेल्या भारताचा हा ‘निवडणूक आयोग’ आहे, आणि कोण आम्हाला वठणीवर आणू शकतो, असा त्याचा आव आहे!
.................................................................................................................................................................
लेखक आ. श्री. केतकर ज्येष्ठ पत्रकार आहेत.
aashriketkar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.


Post Comment