अजूनकाही

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
‘सृजन’ या नव्याकोऱ्या त्रैमासिकाचा नुकताच पहिला अंक प्रकाशित झालाय. त्यात संपादकांनी मांडलेली भूमिका...
.................................................................................................................................................................
आजचा काळ गोंधळाचा आहे. अनेक पातळ्यांवर दृश्य-अदृश्य ताण आहेत. संवाद हरवला आहे. कर्कशता वाढली आहे. मतभिन्नतेचा उपहास केला जातो. अशा काळात साहित्य आणि कलांची जबाबदारी कैक पटीने वाढली आहे. कारण कोंडलेल्या मानवी मनांचे नि:श्वास याच मार्गे व्यक्त होऊ शकतात. लेखक, कलाकार, विचारवंत स्थिरतेला, जडतेला हादरा देतात. विवंचनांना, संघर्षांना स्वर देतात. हे सृजन कोंडी फोडू शकतं. माणसाला नवं बळ मिळू शकतं. त्रैमासिकाच्या रूपात आम्ही त्या दिशेनं एक छोटंसं पाऊल टाकत आहोत.
सृजनशीलता ही केवळ सौंदर्यनिर्मिती नसते. तो एक जिवंत हस्तक्षेप असतो. ‘सृजन’द्वारे असा हस्तक्षेप करण्याचा आम्ही प्रयत्न करू. बंद दरवाजा जरा किलकिला करता येईल. खिडक्या जरा उघडता येतील. जाणिवांचा प्रकाश आणि वारा आपल्याला उभारी देईल.
.................................................................................................................................................................
।। अनुक्रम ।।
। विशेष विभाग - दलित आत्मकथन : बलबीर माधोपूरी आणि त्यांचे ‘छांग्या रुख’ (छाटलेला वृक्ष) – अनुवाद - संजय दोबाडे । पंजाबचं सामाजिक वास्तव – अमरनाथ सिंग । बलबीर मधोपूरी मुलाखत । विशेष विभाग - भाषांतर : वाल्टर बेंजामिन यांचा भाषांतर विचार । डॉ. दीपक बोरगावे यांची मुलाखत
। परिचर्चा - मध्यमवर्ग : बदलता मध्यमवर्ग - अनघा लेले । आजचा मध्यमवर्ग - राम जगताप । माझा मध्यमवर्ग - सुनील तांबे । मध्यमजात-वर्ग - दीपक कसाळे । त्रिशंकूंचे राजकारण आणि सरणावरची संस्कृती - सुधीर बेडेकर । मध्यमवर्गाचे सामाजिक स्थान - छाया दातार
कथा : आज्जीच्या हरवल्या दगडाची गोष्ट - साहिल कबीर । अनुवादित कथा : मणिपूर : एक प्रेमकथा - रितामणी वैश्य, अनुवाद - अक्षय शिंपी । दोन वैज्ञानिकांची प्रेमकथा - युनूस खान, अनुवाद - श्रीकांत ढेरंगे । कविता : अजीम नवाज राही । अरुणचंद्र गवळी । अनुवादित कविता : जंसिता केरकट्टा, अनुवाद - भरत यादव । मार्टिन कार्टर, अनुवाद – सावन गिरीधर धर्मपुरीवार
विश्वव्यापी विचारवंत : फ्रान्त्ज फेनन - देवकुमार अहिरे । भाषा संवाद : उर्दू - एक समृद्ध भारतीय भाषा - दत्ता चव्हाण । सिनेचिंतन : शाम बेनेगल - नम्रता फलके । इतिहासाचं पान : वसाहतकाळात बहुजनांच्या शिक्षणासाठी महिला मिशनरींचे योगदान - कामिल पारखे
पुस्तकांच्या जगात : सोवियत साहित्य - देवदत्त राज्याध्यक्ष । नव्या पुस्तकांचे स्वागत
.................................................................................................................................................................
सृजन म्हणजे नवनिर्मिती. फक्त वस्तू वा कलाकृती नव्हे, तर नव्या अर्थांची, दृष्टिकोनांची आणि जाणिवांची निर्मिती. सृजन ही जीवनशक्ती आहे. यातून आपण स्वतःला, इतरांना आणि जगाला समजून घेतो. ऋतूंचा बदल, बीजाचं वृक्षात रूपांतर, हे सर्व सृजनच, पण माणूस केवळ इथंच थांबत नाही. या पलीकडं काही शोधण्याचा तो प्रयत्न करतो. भाषा, संगीत, नृत्य, विज्ञान, कला आणि मूल्यव्यवस्था निर्माण करून स्वतःभोवती एक अर्थपूर्ण सृष्टी उभी करतो. सृजन आणि संस्कृती एकमेकांपासून वेगळे काढता येत नाहीत.
सर्जनशीलतेच्या अनंत शक्यता असलेला माणूस आज एकटा पडतो आहे. स्वतःपासून, समाजापासून आणि निसर्गापासून तुटल्याची भावना त्याला कुंठित करत आहे. मानवी इतिहासातलं हे अभूतपूर्व मानसिक-सांस्कृतिक संकट आहे. बाबुराव बागूल एका कवितेते म्हणतात, “हे प्रतिभावान माणसा, तूच आहेस सर्व काही, तुझ्यामुळेच संजीव सुंदर झाली ही मही.” पण माणूस आज स्वतःचं अस्तित्व आणि महत्व हरवून बसला आहे. सुप्त क्षमतांपासून त्यानं तुटावं, गोलगोल वावटळीत भरकटत राहावं, अशी व्यवस्था रचली जात आहे. त्यामुळे सृजनाची आज अत्यंत गरज आहे. सृजनाच्या अनंत आणि बहुआयामी प्रक्रियाच माणसाला तारतील. समाजाला दिशा देतील.
सृजन म्हणजे अस्तित्वाच्या अफाट शक्यतांना वाट मोकळी करणारा मार्ग. कविता, चित्र, नाट्य, गीत, शिल्प हे सारं माणसाला स्वत:ची ओळख देतं. सृजन हे वैयक्तिक असतं आणि सार्वजनिकदेखील. माणूस स्वतःला शोधतो, त्याच वेळी सगळ्यांसाठी नवा अनुभव, विचार किंवा मूल्य निर्माण करतो. यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, प्रश्न विचारण्याची मोकळीक, विविध दृष्टिकोनांचा स्वीकार, आणि संवेदनशील संवाद हवा. समाजजीवनाच्या प्रत्येक अंगात, केवळ कौशल्य म्हणून नव्हे, तर मूल्य म्हणून सृजनशीलता जोपासली पाहिजे. सृजन ही लेखक-कलाकारांपुरती गोष्ट नाही; प्रत्येकाचं माणूसपण टिकवून ठेवणारी ती मूलभूत मानवी प्रेरणा आहे. सृजन हरवलं, तर माणूसपणही हरवेल.
समाजातील विषमता आणि भेदाभेद सृजनशीलतेच्या आड येतात. व्यक्त होण्याच्या, स्वप्न बघण्याच्या, नवीन काही करण्याच्या मानवी प्रवृत्तींवर आज अनेक मर्यादा आहेत. बहुसंख्य लोक यापासून वंचित आहेत. अनेक क्षमतावान लोक सृजनाच्या प्रक्रियेबाहेर राहिल्याने प्रचंड सृजनात्मक सुप्तशक्ती वाया जाते. यामुळे मानवी समाजाचं प्रचंड नुकसान होतं. याच्या मुळाशी असते राज्यसत्ता आणि बाजारव्यवस्था. मानवी उर्मींना नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्यसत्ता अनेक बंधनं लादते. माणसाला भरकटवण्यासाठी बाजारव्यवस्था सतत चलाखी करते. स्वतंत्र भारतात माणसाच्या मुक्त आणि स्वतंत्र जगण्यावर पहिल्यांदाच अशी बंधने आली आहेत.
विचार न करता आदेश पाळणारी, ठरवलेल्या चौकटीत वागणारी माणसे राज्यसत्तेला हवी आहेत. अशीच माणसे ग्राहक आणि उपभोक्ता म्हणून बाजारव्यवस्थेला हवी आहेत. कल्पनाशक्ती असलेला, वेगळा विचार करणारा, प्रश्न विचारणारा माणूस या दोघांनाही नको आहे. म्हणून तळातून आलेलं, लोकसहभागी सृजन यांना नको आहे. कारण सृजन म्हणजे नव्या शक्यतांचा शोध, नव्या वाटांचा प्रयोग. त्यातून व्यवस्थेपुढे आव्हानं उभी केली जाऊ शकतात. म्हणून सृजनाच्या प्रेरणा या व्यवस्थांना अस्वस्थ करतात. ते रोखण्यासाठी चकवे आणि भोवरे निर्माण केले जातात. अडथळे उभारले जातात.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
माणसाने मात्र थांबू नये. चकव्या-भोवऱ्यात अडकू नये अन अडथळ्यांना घाबरू नये. त्याने स्वतःला व्यक्त करण्याचा, स्वत:ची कहाणी सांगण्याचा आणि जीवनाच्या अर्थाचा शोध घेण्याचा सतत प्रयोग करायला हवा. तो त्याचा संविधानिक हक्क आहे. आणि वैश्विक पातळीवर मान्य केला गेलेला मानवअधिकारदेखील आहे. कोणालाही तो नाकारता येणार नाही. हिरावून घेता येणार नाही. भौतिक परिस्थितीनुसार, उपलब्ध साधनांनुसार माणसानं मुक्तसृजन करावं.
दलित, आदिवासी, स्त्रिया, अल्पसंख्याक, कामगार, शेतकरी, शहरी आणि ग्रामीण वंचितवर्ग स्वतःचे अनुभव, भावना आणि विचार स्वत:च्या भाषेत आणि स्वतःच्या फॉर्ममध्ये मांडू लागतील. तेव्हा सृजन हे केवळ कलात्मक कृती राहणार नाही. ती सामाजिक क्रांतीकारी कृती बनेल. सृजनाला केवळ लेखन किंवा कलाक्षेत्रापुरते मर्यादित ठेवू नये. समाजरचनेचा आणि जीवनशैलीचा तो अविभाज्य भाग बनावा.
सृजनाच्या अनेक वाटा निर्माण व्हाव्यात. एक पायवाट आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. नवे लेखकच नव्हे तर वाचकसुद्धा घडवायचं ध्येय बाळगलं आहे. तुटपुंज्या साधनांत अंकाचं अर्थकारण सांभाळणं हे एक आव्हानच आहे. तुमची या कार्यात साथ मिळेल, या अपेक्षेसह.
srujanprakashan@gmail.com
.................................................................................................................................................................
‘सृजन’ (त्रैमासिक) - संस्थापक-संपादक विजय जाधव, कार्यकारी संपादक अमरनाथ सिंग | ऑगस्ट - सप्टेंबर - ऑक्टोबर २०२५ | पाने - २४८ | मूल्य - ३५० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.

Post Comment