जॉर्ज ऑर्वेलची ‘1984’ ही कादंबरी खरं तर ‘सर्वंकषवादा’च्या विरोधात आहे. आणि सध्या जगात अनेक ठिकाणी ‘सर्वंकषवादा’ची चलती आहे...
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
आ. श्री. केतकर
  • ऑर्वेलच्या ‘1984’चे एक मुखपृष्ठ
  • Fri , 20 March 2026
  • पडघम राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय जॉर्ज ऑर्वेल George Orwell 1984 १९८४

पुस्तकं वाचणं हा एक अनुभव असतो. तो कधी समाधान देतो, तर कधी विचार करायला भाग पाडतो. असा विचार करायला लागलं की, कधी काही वेगळंच वाटतं. त्यानं कधी अस्वस्थ व्हायला होतं. कधी कधी तर हे आपण अनुभवलंय असंही वाटतं. त्याचं कारण मात्र कळत नाही. काही वर्षांपूर्वी जॉर्ज ऑर्वेलची ‘1984’ ही कादंबरी पहिल्यांदा वाचली होती. त्या वेळी लेखकाच्या कल्पनाशक्तीचं कौतुक वाटलं होतं. हे याला कसं सुचू शकतं? असं कधी होत असेल का? ही केवळ काल्पनिक कथा आहे की, विज्ञानकथा आहे? मनात यायचं, कदाचित याला वास्तवाचा आधारही असेल का? अनेकदा असंही वाचलं होतं की, लेखक जे लिहितो त्याला त्याच्या जीवनाचा, त्यातील प्रसंगांचा किंवा जे काही कानावर येत असतं त्याचा आधार असतो. 

मग कळलं की, ऑर्वेलनं ही कादंबरी लिहिली, तेव्हां त्याच्या डोळ्यापुढे तेव्हाचा कम्युनिस्ट सोविएत रशिया होता. या कादंबरीतील काही घटनांचं तेथील वास्तव घटनांशी नातं होतं. पण आता बऱ्याच वर्षांनी ती पुन्हा वाचायला घेतली, तेव्हा सोविएत रशियाचं विभाजन होऊन बरीच वर्षं झाली होती. कम्युनिस्टांचं अस्तित्व खूपच कमी झालं होतं. अगदी आपल्या देशातही. पण तरीही या कादंबरीची भूल काही कमी होत नव्हती. उलट त्यातील अनेक वर्णनांनी पूर्वीपेक्षाही जास्त अस्वस्थ व्हायला होत होतं. त्यामुळेच असेल, जे कुणी म्हणतं की, ही कादंबरी साम्यवाद्यांच्या नाही, तर ‘सर्वंकषवादा’च्या विरोधात आहे, हे त्यांचं सांगणं खरं वाटायला लागलं. कारण सध्या जगात अनेक ठिकाणी ‘सर्वंकषवादा’ची चलती आहे. आपला देशही त्याला अपवाद नाही.

ही कादंबरी पुन्हा वाचताना आपल्याला असा अस्वस्थपणा का जाणवत असेल, हा विचार मनात घोटाळत होता. त्याचं उत्तर मिळालं. पण आता हे कुठवर चालणार या विचारानं अस्वस्थपणा तर कायम होता... आणि अचानक साक्षात्कार झाल्यासारखं जाणवलं की, हे अस्वस्थ होणं उगाचंच अनाठायी नव्हतं. त्याला तसंच कारणही होतं. ते म्हणजे त्या कादंबरीत जी वर्णनं आहेत, त्यापैकी बरीच आपण गेल्या काही वर्षांपासून अनुभवत आहोत. नकोसं वाटलं तरी सत्य कधी बदलत नाही, हे आपल्याला माहीत आहे. मग सावकाश त्या कादंबरीतील प्रसंग आणि आपल्याकडील वास्तव यांचा मेळ बसायला लागला. देशात घटनाच तशा घडत होत्या आणि त्या आणखी काही काळ तरी तशाच घडत राहतील, हे पटवून घ्यावं लागतं होतं.

माणूस एकदा मोठा झाला, त्याच्या हातात अधिकार आला की, तो त्याच्याही नकळत बदलतो. आपण सर्वांत मोठे असं त्याला वाटायला लागतं आणि मग आपलं हे स्थान टिकवण्यासाठी तो अधिकाधिक अधिकार स्वतःकडं घेतो. (हे ऑर्वेलनं आधीच्या ‘अ‍ॅनिमल फार्म’ या कादंबरीत सांगितलंच होतं.) त्यामुळे तो मोठा माणून आपली आज्ञाधारक निष्ठावंतांची फौज तयार करायला लागतो. त्याला वश होणारे अनेक जण असतात, हे त्याला माहीत असतं. तो केवळ संधीची वाट बघत राहिलेला असतो आणि ती मिळताच तो आपल्या चाली करायला लागतो.

त्या निष्ठावंत आक्षधारकांच्या  मनावर एकदा ताबा बसवला की, मग ते त्या आज्ञाधारक निष्ठावंतांच्या फौजांतील लोक आपण जे काही सांगू ते करायला तयार असतात, हे त्याला उमगतं. या फौजेकडं युद्धातील शस्त्रं नसतात, पण त्या आज्ञाधारकांचा वापर शस्त्रांसारखाच कसा करून घ्यायचा, हे कसब त्याच्याकडे असतं. त्यांच्या दृष्टीनं ते त्यांचं कर्तव्य पार पाडत असतात. क्वचित त्यांना शाबासकी मिळते, तर कधी त्यांचा गौरव केला जातो. (आणि काहीही झालं तरी तो नामानिराळा राहू शकतो. आपला याच्याशी संबंध नाही म्हणून हात झटकून मोकळा होतो). म्हणून जे राज्यपाल विरोधी पक्षाच्या सरकारांना जास्तीत जास्त अडचणीत आणतात, त्यांना मोठे किताब बहाल केले जातात. अगदी न्यायाधीशांनाही राज्यसभेत वा अन्य काही मोठ्या महत्त्वाच्या पदांवर नेमलं  जातं.

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

.................................................................................................................................................................

‘1984’ या कादंबरीत ‘बिग ब्रदर’ हा सर्वसत्ताधीश आहे. आपल्याकडची आजकालची परिस्थिती जवळपास तशीच आहे. ‘बिग ब्रदर’ची  सर्वांवर नजर आहे, असं सतत सांगण्यात येत असतं. ठिकठिकाणी मोठमोठी पोस्टरही लावलेली असतात. त्यावर ‘बिग ब्रदर इज वॉचिंग यू’ अशी ठळक अक्षरं असतात आणि मागे त्या ‘बिग ब्रदर’चा बघणाऱ्यांकडे रोखून पाहणारा मोठा चेहरा असतो आणि तो जणू तेच सर्वांना सांगत असतो की, माझी तुमच्यावर सदासर्वकाळ नजर आहे. म्हणजे हे साधं बोलणं नाही, तर ही सरळ सरळ धमकीच आहे, हे सर्वांना समजत असते. अगदी स्वतःच्या घरातही कुणी त्याच्या नजरेपासून वाचू शकत नाही. कारण तेथे सतत चालू असलेली प्रकाशवाणी असते म्हणजे सुधारित दूरचित्रवाणीची सुधारित आवृत्तीच. कारण त्या प्रकाशवाणीला बंद करणं तुमच्या हातात नसतं. पडद्यावर जे काही असतं ते तुम्हाला दिसतं, ऐकूही येतं, पण विशेष म्हणजे तिकडे त्याला तुम्ही घरात काय बोलताय काय करताय, हे दिसत असतं, ऐकू येत असतं. म्हणजे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी ईश्वर आहे असं सांगितलं जातं, तसा ‘बिग ब्रदर’ आहे. तो सतत तुम्हाला पाहात आहे आणि तुम्हाला कुठंही एकटं सोडत नाही. आणि त्या प्रकाशवाणीचा आवाजही बंद करता येत नाही. तो फार तर थोडा कमी करता येतो इतकंच. आता असा ठरावीक चेहरा आपल्याकडंही सर्वत्र आणि जाहिरातींमधूनही आढळतो आहे.

आपल्याकडील काही बातम्याही याच प्रकारच्या. दडपून टाकण्यात अपयश आलेल्या. दडपायचा प्रयत्न यासाठी की, सत्य कुणाला कळू नये, पण सत्यालाही कधी ना कधी वाचा फुटते. देशात नाही तर देशाबाहेरही. कारण जग आता लहान झालं आहे. त्याप्रमाणं आपल्याकडे अनेकांवर पोलिसांची नजर असते. त्यांचे फोन टॅप केले जातात आणि हे कळावं म्हणूनही असेल कदाचित या बातम्या वर्तमानपत्रांत येत होत्या. याबाबत म्हणजे फोन टॅपिंगबद्दल अनेकांनी तक्रारी केल्या, तर त्यांना आणि जे आपल्या विरोधात आहेत असा संशय आला असेल, त्यांना थेट देशद्रोही ठरवून तुरुंगात, गुन्हा दाखल न करता, खटलाही न भरता वर्षानुवर्षं डांबून ठेवलं गेलंय. त्यांच्या आजारावर उपचार केले जात नाहीत, तशी परवानगीच दिली जात नाही. ते बिचारे तिथंच खितपत पडतात. नाइलाजानं कधी न्यायालयात समजा खटला चाललाच तर त्यांना निरापराध ठरवून मुक्त करण्यात येतं. दरम्यान त्यांच्या आयुष्यातील अनेक वर्षं वाया गेलेली असतात. पण याचं काहीच सत्तारूढांना वाटत नाही. गुन्ह्याची भावना तर त्यांना कधी शिवतही नाही.

‘1984’ या कादंबरीत प्रकाशवाणीवरील कार्यक्रमांत ‘गोल्डस्टीन’ नावाचं एक पात्र आहे. तो देशद्रोही गणला गेलेला असतो. कारण पक्षाची शुद्धता गढूळ करणारा तो एक अधम होता. तो पळून गेल्यानंतर घडलेले गुन्हे, दगाबाजी, विध्वंसक कृत्यं, पक्षधोरणापेक्षा वेगळे निघालेले पंथ व प्रवाह, सर्वमान्य मतांपेक्षा उद्भवलेली वेगळी मते हे सारे काही त्याच्याच शिकवणुकीतून निर्माण झालं आहे, असं समजण्यात येत होतं, असं दाखवण्यात येतं. आपल्याकडे दूरचित्रवाणीवर नसेल कदाचित, (कारण त्याची गरजच नाहीय. तेथील सारे जण मिंधे आहेत, जरा मर्यादा ओलांडली की आपली खैर नाही, हे त्यांना मनोमन ठाऊक आहे.)

बऱ्याच चित्रपटांतून असंच पाहायला मिळतं. त्यात कायमच मुस्लीम किती वाईट आहेत, देशद्रोही आहेत, हे दाखवण्यात येत असतं. हे चित्रपटही अर्थात आज्ञाधारकांचेच असतात हे वेगळं सांगायला नकोच. आणि दिवसेंदिवस या प्रकारच्या प्रचारकी चित्रपटांची संख्या वाढतच चालली आहे. कुणी धाडस करून काही सत्यदर्शन घडवणारा चित्रपट केला, तर तो प्रदर्शित होऊ नये म्हणून नानाविध उपाय केले जातात आणि समजा प्रदर्शित झालाच तर तो (वितरक, चित्रपटगृहांचे मालक यांच्यावर दबाव आणून) लवकरात लवकर चित्रपटगृहांतून काढला जाईल, हे पाहिलं जातं.

‘1984’ या कादंबरीत सत्तारूढ पक्षाची तीन महत्त्वाची वचनं घोषवाक्य शहरातील सर्वांत उंच इमारतीवर लावलेली असतात -

१) युद्ध म्हणजेच शांतता.

२) स्वातंत्र्यात गुलामगिरी आहे

३) अज्ञानात ताकद सामावलेली आहे.

आपल्याकडेही ही विधानं सहज अनुभवता येतात. म्हणजे असं की, गलवानमध्ये भारतीय आणि चिनी लष्करात चकमक झालीच नाही, तिथं चिनी लष्कर कधी आलंच नाही, असं थेट संसदेतच पंतप्रधानांकडून सांगितलं गेलं. पण मग आपल्या सैनिकांची हत्या कुणी केली या प्रश्नावर मौनच. चीनचं नावच काढलं जात नाही. डोनाल्ड ट्रम्पनं कितीही वेळा सांगितलं की, मीच युद्ध थांबवलं तरी त्याबाबत खरं काय घडलं, याबाबत चकार शब्दही काढला जात नाही. आणि जे याबाबत शंका घेतात ते अर्थातच ‘देशद्रोही’ ठरवले जातात. आपल्या विरोधातील सर्वच देशद्रोही ठरवण्याचं तंत्र ‘बिग ब्रदर’ अवलंबतो, त्याचंच अनुकरण केलं जातय, हे जाणवतं.

दुसरं घोषवाक्य म्हणजे ‘स्वातंत्र्यात गुलामगिरी आहे’. आपल्याकडे आज्ञाधारकांकडून आता असं म्हटलं जातं की, २०१४नंतरच देशाला खरं स्वातंत्र्य मिळालंय. ते मोठमोठ्यांदा पुन्हापुन्हा हेच सांगत असतात. म्हणजे त्यांची इच्छा सगळ्या देशवासियांनी गुलामगिरी पत्करायला हवी अशीच असते. अनेक जण ते मान्यही करतात, पण काही जण त्याविरोधात बोलतात, तेव्हा त्यांचा आवाज बंद करण्याचे प्रयत्न केले जातात. त्यांना तुरुंगात अडकवून ठेवलं जातं. कोणत्याही गुन्ह्याशिवायच. विरोधी आवाज उठवणं हाच त्यांचा गुन्हा समजला जातो... कारण आता देशाला खरं स्वातंत्र्य मिळालंय ना!

‘अज्ञानात ताकद सामावलेली आहे’, हे ‘बिग ब्रदर’चं तिसरं घोषवाक्य. तेही आपण अनुभवतोय. फरक एवढाच की, ही ताकद सत्तारूढ पक्षाला मिळाली आहे. कारण विचार करायला पक्षातील सदस्यांना कादंबरीत बंदी असते, तशीच बंदी आपल्याकडेही असावी. पण अज्ञानी असणाऱ्यांना वास्तवाची जाण नसते, कारण त्यांना विचार करू दिला जात नाही. त्यामुळे आपण तर हुकुमाचे ताबेदार ही शिकवण त्यांना दिलेली असते. जे सांगितलं जाईल ते ऐकायचं, जो पुढं जात असेल त्याच्यामागं मेंढरांप्रमाणं जायचं एवढंच त्यांना कळतं.

‘न्यूस्पीक’ ही ‘1984’ या कादंबरीत ‘बिग ब्रदर’नं तयार करायला सांगितलेली आणि वापरात येत असलेली नवी भाषा आहे. जुन्या भाषा हळूहळू नाहीशा करायच्या किंवा त्यांतील शब्द कमी कमी करत जायचे, असं हे धोरण. ‘न्यूस्पीक’च्या नवनव्या आवृत्त्या येत असतात आणि अखेर अगदी मोजके शब्द असलेली आवृत्ती तयार होईल, तेव्हा सर्व जुन्या भाषा, त्यांतील शब्द नाहीसे झालेले असतील, असं ठरलेलं असतं.

या कादंबरीचं कथानक लंडनमध्ये घडत असल्यामुळं इंग्रजी ‘बिग ब्रदर’ जिला ‘ओल्डस्पीक’ म्हणतो, ती भाषाच नष्ट करण्यासाठी हा मार्ग शोधण्यात आलेला असतो. आता आपल्याकडं ‘एक देश एक भाषा’ असं आडून आडून वारंवार सांगितलं जातंय, त्यामागचा हेतूदेखील हाच असावा. म्हणजे भाषिक अस्मिताच नाहीशा करून टाकायच्या. पण हे काम अवघड आहे. कारण आपल्या देशात नानाविध भाषा आहेत, तरीही देश एक आहे. मग उपाय काय, तर सतत सांगायचं ‘एक देश एक भाषा’. तीही हिन्दी. महाराष्ट्रातही नवं शैक्षणिक धोरण म्हणून अगदी पहिलीपासूनच हिन्दी शिकवण्याचा घाट घातला गेला होता, पण कडक विरोधामुळं तूर्त तरी हे धोरण अमलात आलेलं नाही. मात्र म्हणून ते विसरलं गेलंय, असं समजण्याची चूक कुणीही सत्ताधाऱ्यांची वागणूक जाणणारा करणार नाही.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

‘1984’ : २०१७ साली वाचलंच पाहिजे असं पुस्तक! - मिचिको काकुतानी, मराठी अनुवाद-  सविता दामले

ब्रिग ब्रदर इज वॉचिंग यू! - जॉर्ज ऑर्वेल, मराठी अनुवाद - अशोक पाध्ये

दुःस्वप्नासारखी कादंबरी आणि दुःस्वप्नासारखाच वर्तमान - हेमंत गोळे

.................................................................................................................................................................

‘1984’ या कादंबरीत लहान मुलांनाही आज्ञाधारकपणाची सवय लावण्यात आलेली असते.ती कुणालाही ‘तू गुन्हेगार आहेस, देशद्रोही आहेस म्हणून आम्ही तुला मरून टाकू’ असं धमकावतात. आपल्याकडेही शाळांतील आलेल्या बातम्यांवरून असंच घडतंय असं दिसतं. ‘तू आमच्यातला नाहीस, निघून जा’, असं सर्रासपणं मुलं सांगू लागली आहेत. त्यांच्यापुढं बहुधा एखाद्या मंत्र्याचा आदर्श असावा, त्याचंच अनुकरण ती मुलं करतात.

या कादंबरीतील प्रमुख पात्राच्या लक्षात येतं की, भूतकाळ केवळ नष्ट केला गेला नव्हता, तर प्रत्यक्षात त्याचा नाश केला जात होता. कोणतीही मोठी घटना मनात उभी करता येत नव्हती, कारण सर्व पुरावे नष्ट करण्यात आले होते. जुनं ते सारं पुसून टाकायचं हेच धोरण होतं. आता आपल्याकडं काय चाललंय? तर इतिहासाचं पुनर्लेखन. म्हणजे घडला तो इतिहास खरा नाही. आम्ही सांगू तोच खरा इतिहास आहे. सर्व आधुनिक ज्ञान आपल्याकडचंच, ते पुरातन काळापासून चालत आलं आहे… अगदी विमानविज्ञान काय किंवा प्लॅस्टिक सर्जरी काय, कृत्रिम गर्भधारणा काय किंवा अणुबॉम्ब काय ही सारी आपलीच करामत आहे, असं बजावलं जातंय. त्यासाठी अनेकांना कामाला लावलं जातंय आणि अशा खुशमस्कऱ्यांची उणीव नाहीय. असं असलं तरी विश्वगुरूंना हे उमगत नाहीय की, आपण म्हणतोय किंवा पुन्हा लिहितोय म्हणून प्रत्यक्ष घडलेला इतिहास काही पुसला जात नाही! ज्या गोष्टींना आधारच नाही, त्या तुम्ही कितीही आटापिटा केलात तरी पटणं शक्य नाही. आणि समजा तुमच्या निष्ठावंतांना ते पटलं, त्यांनी ते मान्य केलं, तरी सर्वांनाच ते मान्य होण्यासारखं नसतं.

कोणी काय आणि कुठं खायचं, कोणी कुठं राहायचं अशा गोष्टी ‘1984’ या कादंबरीत निश्चित केलेल्या असतात. हाच अनुभव अलीकडे यायला लागलाय. सक्तीनं तुम्ही काय खायला हवं ते सांगितलं जातंय. मुसलमान दुकानदारांना त्यांच्या नावाच्या पाट्या लावायची सक्ती केली जातील. त्यांची ओळख पटावी म्हणून आणि त्यांच्याकडून काहीही घेऊ नका असं बजावण्यात येतंय. आमच्या सोसायटीत मांसाहार करणाऱ्यांना जागा मिळणार नाही, अशा पाट्या लागत आहेत. यावरून आपल्याकडंही कुणी ‘बिग ब्रदर’ आहे, असं वाटायला लागलंय. कादंबरीत पक्षाचे लोक म्हणतात की, आम्ही लोकांची सेवा करत आहोत, हे ध्यानात ठेवा. आपल्याकडंही सर्वोच्च स्थानावर असलेले म्हणत असतात की, मी तर केवळ सेवक आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

कादंबरीतील प्रमुख पात्राला जखडून ठेवलेलं असतं. त्याचे हाल केले जात असतात. ... “शेवटी विन्स्टन मलुलपणे म्हणाला- आमच्या भल्यासाठी तुम्ही आमच्यावर राज्य करता. तुम्हाला असं वाटतं की, माणसांना स्वतःच्या समाजाचं आपणहून नियंत्रण करणं नीट जमत नाही. आणि म्हणून ...”

शेवटचे वाक्य पुरं करायच्या आत विन्स्टन कळवळून ओरडला. वेदनेची एक लहर त्याच्या शरीरात घुसली. ओब्रयनने (वेदना देणाऱ्या यंत्राचा) दांडा खेचून तबकडीवरचा काटा ३५वर नेला होता. ओब्रयन म्हणाला- “बावळटासारखं बोलत आहेस विन्स्टन, अगदी बावळटासारखं! हे असलं बोलण्याआधी नीट माहिती करून घ्यावी.”

त्यानं दांडा मागं खेचला आणि तो पुढं बोलू लागला – “आता मीच तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. ते असं आहे. पक्षाला सत्ता हवी आहे, ती केवळ स्वतःसाठीच हवी आहे. आमहाला दुसऱ्याचं भलं करण्यात कसलाही रस नाही. आम्हाला फक्त सत्तेमध्येच रस आहे. सुख, संपत्ती, चैन, दीर्घायुष्य वगैरे गोष्टींतसुद्धा आम्हाला रस नाही. आम्हाला फक्त सत्ता, शुद्ध सत्ता यांचीच आवड आहे. शुद्ध सत्ता म्हणजे काय, हे तुला सध्या आमच्या हातात असलेल्या सत्तेवरून समजून येईल. आम्ही जे काही करत असतो, त्याची आम्हाला पूर्ण जाणीव असते. पूर्ण भान असतं. या बाबतीत भूतकाळातील महाजनसत्तांपेक्षा आम्ही वेगळे ठरतो. पूर्वीच्या महासत्ता आणि ज्यांचे आमच्याशी थोडंफार साम्य होतं. अशा साऱ्या सत्तासुद्धा भित्र्या आणि ढोंगी होत्या. जर्मन नाझी, रशियन कम्युनिस्ट यांच्या राज्यपद्धती जवळपास आमच्या जवळ पोहोचल्या होत्या. पण स्वतःचे हेतू आणि मूळ प्रेरणा ओळखण्याचं धैर्य त्यांच्यात नव्हतं. ते तसे ढोंग करत होते किंवा त्यांचा असा विश्वासही होता की, त्यांनी नाइलाजानं व थोड्या काळापुरतीच ही सत्ता ताब्यात घेतली असून जिथं सर्व माणसं स्वतंत्र आणि समान असतील, असं नंदनवन त्यांना कोपऱ्यापाशीच भेटणार होतं. आम्हाला असा कुठलाही भ्रम झालेला नाही. आम्हाला पक्कं ठाऊक आहे की, जो कोणी सत्ता हातात घेतो, तो तिचा त्याग करण्यासाठी ती मिळवत नाही.सत्ता हे काही साधन नाही. ते साध्य आहे ...”  इ.इ.

यावरून आपल्या देशात सध्या अगदी लहानसहान निवडणुकाही जन्म-मरणाचा प्रश्न असल्यासारख्या का लढवल्या जात आहेत, हे समजतं. सर्वत्र आमचीच सत्ता हवी, या अट्टाहासापायी हे केलं जातंय आणि त्यासाठी काय वाटेल ते केलं जातंय, केलं जात राहणार आहे. कारण सहा-सात राज्यांतील निवडणुका आता लवकरच होणार आहेत. आणि साथीला इडी, आयबी, सीआयडी आणि निवडणूक आयोग अशी प्रभावी हत्यारंही सत्ताधाऱ्यांकडं आहेत. तरीही आपण म्हणायचं की, काहीही झालं तरी ही लोकशाही आहे.

कादंबरीतील एकच वाक्य आठवतं की, ‘मजूर कधी बंड करत नाहीत’, तसं आता आपल्याकडंही सामान्य माणूस कधी उठत नाही. विरोध करत नाही. त्यांची ती इच्छाही बहुधा मरून गेली असावी! त्यामुळे काही करणं आता आपल्या हातात नाहीय. म्हणून संत तुकारामांचं ‘तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पहावे’ हे वचन आठवायचं...  आणि गप्प राहायचं!

.................................................................................................................................................................

लेखक आ. श्री. केतकर ज्येष्ठ पत्रकार आहेत.

aashriketkar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

मोहन भागवतजी, तुम्ही सावरकरांच्या सोयीच्या विचारांना स्वीकारून बाकीच्या विचारांना मूठमाती देण्यास मागेपुढे पाहणार नाही, पण झाकलेलं कोंबडं आरवायचं राहत नाही…

भागवतजी, तसा मी आपला वैचारिक विरोधक आहे, पण मी तथागत बुद्ध, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान पुरुषांचा डोळस अनुयायी, त्यांच्या विचारांचा पाईक आहे. या महापुरुषांनी विचाराला विचारानं, हिंसेला अहिंसेनं आणि अन्यायाला संवैधानिक मार्गानं उत्तर देण्याची परंपरा निर्माण केलेली आहे. सध्या देशाचे सत्ताकेंद्र आपल्या हातात असल्यामुळे प्रत्येकाला आपली दखल घ्यावी लागत आहे, मलादेखील .......

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......