सत्य, अहिंसा आणि प्रेम ही एक त्रिसूत्री आहे, आणि त्याच्या उलट असत्य, हिंसा आणि द्वेष अशीही एक त्रिसूत्री आहे, हे म.गांधी अधोरेखित करतात!
पडघम - सांस्कृतिक
श्रीनिवास जोशी
  • महात्मा गांधी
  • Tue , 09 December 2025
  • पडघम सांस्कृतिक महात्मा गांधी Mahatma Gandhi

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

सत्य आणि अहिंसेचा शोध हे गांधीजींचे जीवितकार्य होते. या पन्नास वर्षांच्या प्रवासात त्यांना एक महत्त्वाचा शोध लागला. ते लिहितात – “I have found that the law of love has answered as the law of destruction has never done.” (मला उमजले आहे की, प्रेमाचा कायदा या जगाने निर्माण केलेल्या प्रश्नांना जशी बिनतोड उत्तरे देतो तशी उत्तरे हिंसेच्या कायद्याला देता येत नाही.) गांधीजींना प्राप्त झालेली ही उमज आपल्याला कशी प्राप्त होईल, हे समजून घेणे आजच्या काळामधील प्रत्येक शांततावाद्यासाठी आवश्यक आहे.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

म.गांधीजींच्या अनेक संकल्पना लोक समजून घेऊ शकतात, परंतु ‘अहिंसा’ या तत्त्वामुळे गांधीजींबद्दल अनेक गैरसमज पसरले असल्याचे आपण पाहतो. असे गैरसमज पसरण्याचे कारण गांधीजींनीच आपल्या ११ ऑगस्ट १९२०च्या ‘यंग इंडिया’मधील ‘द डॉक्ट्रीन ऑफ द सोर्ड’ या लेखात दिले आहे. ते लिहितात – “In this age of the rule of the brute force, it is almost impossible for anyone to believe that anyone else could possibly reject the law of the final supremacy of brute force.” (पाशवी शक्तीच्या या युगामध्ये ‘बळी तो कान पिळी’ हा या जगातील अंतिम कायदा आहे, ही संकल्पना प्रत्येकाच्या मनात दृढ झालेली असते. त्यामुळे हा कायदा कुणा अहिंसक माणसाला नाकारता येईल, यावर कुणाचा विश्वास बसत नाही.)

त्या काळी असहकराची चळवळ सुरू होती. या चळवळीमध्ये हिंसाचार झाला, तर मी ही चळवळ थांबवेन, असा इशारा गांधीजींनी दिला होता. यावर थोडाफार हिंसाचार झाला, तरीही ही चळवळ आपण थांबवू नये अशी पत्रे मला येत आहेत, असे या लेखात गांधीजी सांगतात. हिंसा होणे ही गोष्ट अत्यंत  नैसर्गिक आहे, असे अनेक लोकांना वाटत असते. हिंसेशिवाय या जगात काहीही मिळत नाही, असेही अनेक लोकांना वाटत असते.

गांधीजीसाठी अहिंसा सर्वोच्च तत्त्व होते. त्यावरही कुणाचा विश्वास नव्हता. अहिंसा ही केवळ एक राजकीय नीती आहे, असेही अनेकांना त्या वेळी वाटत होते. राजकारण करताना आदर्शवादी असे काहीतरी बोलायलाच लागते, त्यातलाच हा एक प्रकार आहे, असे लोकांना वाटत होते.

गांधीजी याच लेखात पुढे लिहितात – “Others come to me and assuming that secretly I must be plotting violence, inquire when the happy moment for declaring open violence will arrive.” (मी गुप्तपणे हिंसाचाराची तयारी करत असणार असेही लोकांनी गृहित धरलेले असते. तुम्ही सशस्त्र क्रांतीचा ऐलान कधी करणार, असेही हे लोक मला विचारत असतात.)

गांधीजी म्हणतात की, अहिंसा हे तत्त्व आचरण्याचा प्रामाणिक प्रयत्न कुणी करत असेल, हे कुणाला पटतच नाही. हिंसाचाराशिवाय इंग्रज भारत सोडून जातील, हेसुद्धा कुणाला पटत नाही. याच्याही पुढे जाऊन लोक आपल्यावर काय संशय घेत आहेत, हेसुद्धा गांधीजी या लेखात आपल्याला सांगतात. ते लिहितात – “(Some people) believe that I am the most rascally person living in India because I never give out my real intention and that they have not a shadow of doubt that I believe in violence just as much as most people do.” (काही लोकांचे म्हणणे आहे की, या देशात राहणारा मी एक अत्यंत बदमाश असा माणूस आहे. त्यांना वाटते आहे की, हा माणूस कुठल्याही परिस्थितीत कबूल करत नाही, पण याचाही आतून का होईना हिंसेवर विश्वास असणारच असणार!)

लोकांना वाटत होते की, हिंसाचाराशिवाय या जगात माणूस असो किंवा देश असो, कुणाचेच काही चालत नाही, हे या लबाड माणसाला नक्कीच माहीत असणार. या बदमाश माणसाने अहिंसेचे हे नाटक आपल्या राजकीय स्वार्थासाठी रचलेले आहे.

हीच सगळी मते गांधीजींबद्दल आजही प्रचारात आहेत, असे आपल्याला दिसून येते. याला कारण आपला हिंसेवरचा विश्वास हेच आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आपला हिंसेवर पराकोटीचा विश्वास असतो. त्यामुळे अहिंसा या जगात प्रभाव टाकू शकेल, असे आपल्याला वाटत नाही. परिणामी गांधीजी एकतर अति-आदर्शवादी होते किंवा अत्यंत दांभिक होते, असे आपल्याला वाटत राहते.

आपली मते थोडा वेळ बाजूला ठेवून आपण गांधीजींचे अहिंसेबद्दलचे विचार समजून घेऊ लागलो की, अहिंसा या सनातन तत्त्वावर प्रकाश पडू लागतो. गांधीजींच्या ऐन प्रभावाच्या काळातही अहिंसा या तत्त्वावर अनेक मोठ्या लोकांनी अहिंसेवर आपली मते मांडली होती. या मतांमध्ये कमालीची विविधताही होती.

श्री अरविंद हे फार मोठे योगी होते, परंतु अध्यात्माकडे जाण्यापूर्वी त्यांनी स्वातंत्र्ययुद्धातही भाग घेतला होता. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साहाय्याने ‘अलीपुर बॉम्ब हल्ला’ घडवून आणला होता. श्री अरविंद यांनी म्हटले होते की, अहिंसा हा मानवी जीवनातला सर्वोच्च कायदा आहे यात शंका नाही, परंतु फार मोठी आध्यात्मिक प्रगती केलेल्या योग्यांशिवाय या कायद्याचे पालन कुणाला करता येत नाही. भारतासारख्या गुलामीत अवनत झालेल्या देशासाठी अहिंसा योग्य नाही. दुष्टतेला विरोध करण्यासाठी हिंसा कधी कधी आवश्यक ठरते.

सुभाषचंद्र बोस हे तर गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाच्या पूर्णपणे विरोधात होते. अहिंसा हा योग्यांचा मार्ग आहे, राष्ट्राचा नाही असे त्यांचेही मत होते. पंडित नेहरूंसाठी अहिंसा ही एक राजकीय नीती होती. अहिंसा काही परिस्थितीमध्ये काम करते, परंतु अहिंसा हे शाश्वत तत्त्व नाही. आंतरराष्ट्रीय राजनीतीमध्ये तर हे तत्त्व अजिबात काम करेनासे होते, असे त्यांचे मत होते.

वल्लभभाई पटेल यांच्या दृष्टीनेही अहिंसा ही एक राजकीय नीती होती. परंतु श्री अरविंद आणि सुभाषबाबू यांच्याप्रमाणे राष्ट्राच्या संदर्भात अहिंसा संपूर्णपणे नाकाम ठरते, असे नेहरू आणि वल्लभभाई यांचे मत नव्हते. राष्ट्राच्या जीवनात अहिंसेला मोठे स्थान असू शकते, असा अनुभव त्यांना गांधीजींच्या चळवळीत काम करताना आला होता. श्री अरविंद आणि सुभाषबाबू यांच्याप्रमाणे अहिंसा हे फक्त योगिक पातळीवरचे तत्त्व आहे, असे त्यांचे मत नव्हते. अगदी राजकारणातसुद्धा अहिंसा काम करते, हे त्यांनी अनुभवले होते. वल्लभभाईंचे एक वाक्य प्रसिद्ध आहे- “Bapu showed us the strength that lies in non-violence.” (बापूंनी आपल्याला अहिंसा या तत्त्वाची ताकद दाखवून दिली.)

गांधीजींचे अहिंसा तत्त्व स्वातंत्र्य संग्रामात यशस्वी झाले, हे नेहरू आणि पटेल या दोघांनाही मान्य होते. ब्रिटिश सरकारमध्ये थोडीतरी नैतिकता आणि मानवी संवेदना होती, म्हणून अहिंसा यशस्वी झाली, असे त्यांचे मत होते. हिटलरसारख्या कसलीही नैतिकता आणि संवेदना नसलेल्या हुकूमशहांविरुद्ध अहिंसा काम करणार नाही, असे पटेल आणि नेहरू यांचे मत होते.

अहिंसा या तत्त्वाच्या संदर्भात मतांचा असा सगळा कोलाहल आहे. यातील अनेक मुद्दे आपल्याही मनात अनेक वेळा उपस्थित होत असतात. या सगळ्या कोलाहलाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन गांधीजींच्या अहिंसा तत्त्वाकडे जायला हवे. मतमतांतरांच्या या अनेक पैलूंच्या लोलकामधून पाहत पाहत गांधीजींचे अहिंसेचे तत्त्व समजून घ्यायला हवे.

अहिंसा हा मानवी जीवनातील सर्वोच्च कायदा आहे, असे गांधीजी सांगतात. याचे कारण देताना गांधीजी सांगतात की, अहिंसा ही या जगातील अंतिम सत्याशी अत्यंत अपरिहार्यपणे जोडलेली गोष्ट आहे. जिथे सत्य आहे तिथे अहिंसा असतेच!

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

.................................................................................................................................................................

या लेखमालेच्या पहिल्या लेखात अंतिम सत्य म्हणजे काय या विषयीची गांधीजींची संकल्पना समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला. ईश्वर हे जगातील अंतिम सत्य आहे असे गांधीजी सांगतात, परंतु त्याच वेळी ईश्वर हा मानवी आयुष्यात मानवतेच्या रूपात व्यक्त होत असतो असे गांधीजी सांगतात. ईश्वर आहे यावर ज्यांचा विश्वास नाही त्यांचा मानवतेवर विश्वास असतोच आणि माणसामध्ये देवत्व असू शकतात, यावरसुद्धा विश्वास असतो. गांधीजी, ईश्वर, देवत्व आणि मानवता एकत्र आणतात आणि निरीश्वरवाद्यांना आणि अज्ञेयवाद्यांना आपल्या ईश्वराच्या संकल्पनेमध्ये सामावून घेतात.

थोडक्यात, ईश्वर, देवत्व आणि मानवता ही सर्व या विश्वामधील अंतिम सत्य तत्त्वे आहेत, असे गांधीजी आपल्याला सांगतात. या पार्श्वभूमीवर अहिंसा हे तत्त्व ईश्वर, देवत्व आणि मानवता यांच्याशी कसे जोडले गेलेले आहे हे आपण लक्षात घेतले की, अहिंसेच्या तत्त्वाचा गाभा आपल्या हाती लागतो. याबातीत बोलताना, अहिंसा माणसातल्या मानवतेशी निगडित आहे आणि हिंसा ही माणसातल्या पशुत्वाशी निगडित आहे, अशी मांडणी गांधीजी करतात. परंतु, अशी मानवतेची मांडणी करत असताना गांधीजी माणसामधले पशुत्वसुद्धा नाकारत नाहीत.

१५ सप्टेंबर १९४६च्या ‘हरिजन’च्या अंकात त्यांचे हे विचार अगदी सुस्पष्टपणे मांडले गेलेले आहेत. त्यांनी  लिहिले आहे - “Man is a complex being. He is a mixture of God and animal. His business is to strengthen the God in him and suppress the animal.” (माणूस हा गुंतागुंतीचा प्राणी आहे. तो एक अतिशय मोठी गुंतागुंत असलेले अस्तित्व आहे. काही भाग प्राण्याचा आणि काही भाग दैवी.)

म्हणजे, एका बाजूला देवत्व आणि दुसऱ्या बाजूला पशुत्व असे हे मानवी जीवनाचे दोन पैलू आहेत, असे गांधीजी सांगतात. इथे आपल्या मनात विचार येतो की, ईश्वर, देवत्व, मानवता आणि आता अहिंसा यांना सत्य का मानायचे? माणसामधले पशुत्व आपल्या अनुभवाला अगदी रोज येत असताना त्याला असत्य का मानायचे? बहुतांश जग पशुसारखे वागत असेल, तर आपण अहिंसा अहिंसा असे का म्हणत बसायचे? ईश्वर, देवत्व आणि मानवता यांना गांधीजी सत्य का मानतात, हे आपण या आधीच्या लेखात बघितले आहे. तो विचार येथे थोडक्यात का होईना परत एकदा लक्षात घ्यायला हवा.

सत्य म्हणजे काय याचा विचार वेदान्ताने केला आहे. गांधीजींनी तोच विचार स्वीकारलेला आहे. जे सतत असते ते सत्य. “अक्षरं ब्रह्म!” ज्याचा कधीही क्षय होत नाही, ते या जगाचे मूळ तत्त्व. ते या जगातील अंतिम सत्य!

ब्रह्म म्हणा, ईश्वर म्हणा, देव म्हणा ते अंतिम तत्त्व कधीही बदलत नाही. ते अचल आहे, अविचल आहे म्हणून ते सत्य आहे. त्याच वेळी देवत्व आणि मानवता हे ईश्वराचे भाग असल्यामुळे तेही सत्याचा भाग आहेत. म्हणजेच तेसुद्धा सत्य आहेत. या उलट पशुत्वाचा भाग माणसामध्ये तो प्राणी असल्यामुळे आलेला आहे. माणूस सतत बदलणारा असतो. माणूस मृत्यू पावतो, माणसामधील पशुत्व संपून तो मानवतेकडे उत्क्रांत होत जातो. मानव प्राणी म्हणून उत्क्रांत होत जाणारा आहे. त्यामुळे त्याच्यामधील पशुत्व हे असत्य आहे.

येथे ‘असत्य’ म्हणजे ‘बदलणारे’ असा अर्थ लक्षात घेतला, तर जे अनुभवाला येते, त्याला असत्य कसे म्हणायचे, हा घोळ होणार नाही. असत्य म्हणजे खोटे नव्हे. जे बदलते ते असत्य. आपण आजकाल असत्य म्हणजे खोटे असा अर्थ घेतो. त्यामुळे खूप घोळ तयार होतो. तर, जे लोक ईश्वर मानत नाहीत त्यांच्यासाठी देवत्व आणि मानवता हे ईश्वरासारखेच कसे अविचल आहेत, असे गांधीजी सांगतात. तो भाग या लेखात पुढे येईलच.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

जो माणूस ‘सबकॉन्शसली’ माणसामधील पशुत्वाला महत्त्व देतो, त्याची भीती बाळगतो त्याचाच हिंसेवर विश्वास असतो. अहिंसा हा या विश्वाचा मूळ कायदा कसा आहे, हे अशा माणसाच्या लक्षात येत नाही. याउलट, जो माणूस ‘सबकॉन्शसली’ माणसामधील मानवते विश्वास ठेवून असतो, माणसाच्या प्रेमाच्या क्षमतेवर विश्वास ठेवून असतो, तो अहिंसा समजून घेऊ शकतो. आपल्यामधील देवत्वाला म्हणा किंवा मानवतेला म्हणा, माणूस महत्त्व देऊ लागला की, अहिंसा अपरिहार्य बनत जाते. या मार्गावर माणूस पुढे चालत गेला की, हळूहळू त्याला आपल्या जिवापेक्षा मानवता मोठी आहे, हे पटू लागते. म्हणून मग तो आपल्या जिवापेक्षा अहिंसा मोठी मानू लागतो.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

आपल्या या सगळ्या तत्त्वज्ञानाची तार्किक मांडणी गांधीजींनी केली नाही. अत्यंत सोप्या भाषेबद्दल गांधीजींचा कटाक्ष होता, कारण गांधीजींना सामान्य माणसापर्यंत पोहोचायचे होते. गांधीजींचे लिखाण वाचताना या अंतर्गत तर्कसंगती आपल्याला निश्चितपणे जाणवत राहतात.

गांधीजींच्या लिखाणामधील या तात्त्विक प्रेरणा आपण हळूहळू समजून घेत गेलो, तर त्यांची अहिंसा आपल्याला समजून घेत जाता येते. ही मांडणी करून झाल्यावर गांधीजी पुढे ईश्वर, देवत्व आणि मानवता हे या पृथ्वीवरील प्रत्येकमध्ये अंशरूपाने असते असे सांगतात. सर्व भूतमात्रांमध्ये ईश्वर अंशरूपाने असतो, हे वेदान्ताचे प्रतिपादन आपणा सर्वांना माहीतच आहे. यातूनच वेदान्ताचे अहिंसेबद्दलचे प्रतिपादन पुढे येते. गांधीजींचे प्रतिपादनसुद्धा याच धर्तीवर पुढे जाते.

‘ईशावास्योपनिषदा’च्या सहाव्या मंत्रामध्ये सांगितले गेले आहे - “He who sees all beings in the Self and the Self in all beings does not hate anyone”. (जो सर्व भूतमात्रांमध्ये स्वतःला बघतो आणि सर्व भूतमात्रांना स्वतःमध्ये बघतो तो कुणाचाही द्वेष करत नाही.)

हिंसेचा उगम द्वेषामध्ये आहे, हे आपण सगळेच जाणतो. जो माणूस साधा द्वेषही करत नाही, तो हिंसा कशी करेल? सर्व भूतमात्रांमध्ये ईश्वर अंशरूपाने असल्यामुळे दुसऱ्या कुणाला त्रास देणे हे स्वतःला आणि ईश्वराला त्रास देण्यासारखेच आहे असे वेदांताचे प्रतिपादन आहे. गांधीजींनी हेच प्रतिपादन वेदान्ताकडून घेतले आहे. त्याचबरोबर मानवता हे तत्त्व सर्व माणसांमध्ये असल्यामुळे अहिंसा ही सर्वोच्च तत्त्वाची आणि मानवतेचीही पूजा आहे, असे गांधीजी सांगतात. ईश्वर नाकारणारे मानवता नाकारू शकत नाहीत. गांधीजींनी ईश्वर आणि मानवता यांचे एकत्व सांगितल्यामुळे ईश्वर न मानणाऱ्या लोकांसाठीही अहिंसा हे तत्त्व सर्वोच्च ठरले. प्रत्येकात असलेला देवाचा अंश म्हणा, देवत्व म्हणा किंवा मानवता म्हणा हा अहिंसेचा पाया आहे, असे गांधीजींचे सांगणे आहे.

असे सगळे विचार मांडून गांधीजी म्हणतात, मानवता हे मानव जातीचे मुख्य लक्षण आहे आणि पशुत्व हे मानवजातीचे दुय्यम लक्षण आहे. याचमुळे जो कायदा मानवतेशी सुसंगत आहे तो खरा कायदा आणि जो कायदा माणसामधल्या पशुत्वाशी निगडित आहे तो दुय्यम कायदा!

२३ फेब्रुवारी १९२२च्या ‘यंग इंडिया’च्या अंकात आणि इतरही अनेक ठिकाणी गांधीजींनी लिहिलेले आहे - “The law of nonviolence, which is the law of the human race, is also the law of the universe.” (अहिंसा हा मानवतेचा आणि या संपूर्ण विश्वाचाही कायदा आहे.) गांधीजी पुढे म्हणतात की, मानव आणि पशू यांच्यातला मूळ फरक म्हणजे अहिंसा. २१ मे १९२५च्या ‘यंग इंडिया’च्या अंकात ते लिहितात - “Non-violence is the law of our species as violence is the law of the brute.” (अहिंसा हा आपल्या प्रजातीचा कायदा आहे. हिंसा हा प्राणीजातीचा कायदा आहे.)

ही सगळी चर्चा झाल्यावर आपण आपल्यापुरते काही निष्कर्ष काढू शकतो. जो माणूस ‘सबकॉन्शसली’ माणसामधील पशुत्वाला महत्त्व देतो, त्याची भीती बाळगतो त्याचाच हिंसेवर विश्वास असतो. अहिंसा हा या विश्वाचा मूळ कायदा कसा आहे, हे अशा माणसाच्या लक्षात येत नाही. याउलट, जो माणूस ‘सबकॉन्शसली’ माणसामधील मानवते विश्वास ठेवून असतो, माणसाच्या प्रेमाच्या क्षमतेवर विश्वास ठेवून असतो, तो अहिंसा समजून घेऊ शकतो.

आपल्यामधील देवत्वाला म्हणा किंवा मानवतेला म्हणा, माणूस महत्त्व देऊ लागला की, अहिंसा अपरिहार्य बनत जाते. या मार्गावर माणूस पुढे चालत गेला की, हळूहळू त्याला आपल्या जिवापेक्षा मानवता मोठी आहे, हे पटू लागते. म्हणून मग तो आपल्या जिवापेक्षा अहिंसा मोठी मानू लागतो. त्यासाठी आयुष्यात दुःख आले, तरी तो अहिंसेपासून दूर हटत नाही. मानवतेसाठी तो आपले सर्वस्व पणाला लावतो. अहिंसा ही मानवतेची पूजा आहे, हे त्याच्या लक्षात येते. अहिंसा म्हणजे मानवतेसाठी स्वतःला पणाला लावणे असते, हेसुद्धा त्याच्या लक्षात येते. मानवतेबद्दलची ही तीव्र संवेदना आपल्यामध्ये हळूहळू रुजवत न्यायला लागते असे गांधीजी सांगतात. ही संवेदना अंश रूपाने आपल्यात असली, तरी तिला योग्य विचारांचे आणि प्रेमाच्या भावनेचे खतपाणी घालावे लागते.

एवढे सगळे बघितले की, अहिंसेच्या मार्गात अर्थ आहे, असे आपल्याला हळूहळू जाणवू लागते, परंतु तरीही अनेक शंका आपल्या मनात तरळून जात राहतात. सामान्यपणे, ‘कुणी आपल्या गालावर थप्पड मारली की, आपण आपला दुसरा गाल पुढे करायचा’, एवढेच एक वाक्य अनेकांना अहिंसेबद्दल माहीत असते. हे वाक्य ख्रिश्चन धर्मातून आयात केले आहे, हे त्यांना सांगितले गेलेले असते. आपल्या विफल आदर्शवादापोटी आपल्यावर गांधीजींनी आपल्यावर अहिंसा थोपलेली आहे, असेही अनेकांना वाटत असते. आपल्यावर हिंसा करणाऱ्याला आपण काय म्हणून माफ करायचे? आपण काय दुर्बल आहोत काय? असे प्रश्न अनेकांच्या मनात उठत असतात. त्यामुळेच, अहिंसा म्हणजे दुर्बलांचे तत्त्वज्ञान असे अनेकांना वाटत असते.

११ ऑगस्ट १९२०च्या ‘यंग इंडिया’मध्ये गांधीजी लिहितात – “(Ahimsa) does not mean meek submission to the will of the evil doer, but it means the putting of one's whole soul against the will of the tyrant.” (अहिंसा म्हणजे दुष्टतेला शांततेने शरण जाणे नव्हे. अहिंसा म्हणजे आपल्या संपूर्ण अस्तित्वानिशी दुष्टतेच्या विरुद्ध उभे राहाणे असते.)

अहिंसा हे जीवनाच्या बाजूने उभे राहणे असते. मग त्यात स्वतःचे अस्तित्व जरी धोक्यात आले, तरी ते मान्य करायचे असते. अहिंसा ही ईश्वराची, देवत्वाची आणि मानवतेची पूजा आहे तशीच ती जीवनाचीही पूजा आहे. कारण गांधीजींना ईश्वर, देवत्व आणि मानवता यांच्या एवढेच जीवनही पवित्र वाटत आले होते. अगदी मृत्यूच्या तांडवानंतरही जीवन कायम राहते. आपण मोठ्या मोठ्यां युद्धांचा इतिहास वाचत आहोत म्हणजे युद्धानंतरही जीवन जिंकलेले आहे असाच त्याचा अर्थ असतो. म्हणूनच, गांधीजी लिहितात,  हिंसा हा अंतिम कायदा आहे असे जरी वरवर पाहता वाटत असले, तरी त्यावरतीही एक मोठा कायदा असणार!

२१ जुलै १९२५च्या ‘यंग इंडिया’मध्ये गांधीजी लिहितात – “I have found that life persists in the midst of destruction and, therefore, there must be a higher law than that of destruction. Only under that law would a well-preserved society be intelligible and life worth living.” (नाशाच्या तांडवानंतरही जीवन कायम राहिलेले दिसते. त्यामुळेच असे वाटत राहते की, हिंसेच्या पलीकडे कुठला तरी सर्वोच्च कायदा असणार. त्या कायद्याला सगळ्या मानवजातीने शरण जायला हवे. त्याशिवाय, सुरक्षित समाज तयार होणार नाही आणि भरभरून जगावे असे जीवन मानवाच्या वाट्याला येणार नाही.)

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

तुमचा जीव गेला तरी तुम्ही नमला नाहीत, घाबरला नाहीत, तर हिटलरसारख्यांची हिंसा तुमचा आत्मसन्मान हिरावून घेऊ शकत नाही, असे गांधीजी येथे सांगत आहेत. यावरून आपल्या लक्षात येते की, अहिंसा ही संवेदनशील आणि निर्भिड माणसासाठीची गोष्ट आहे. ज्याच्या हृदयाला मानवतेची बूज आहे, ज्याच्या हृदयात आत्मसन्मानाची पणती तेवत आहे आणि ज्याला आपल्या क्षुद्र जिवासाठी मानवता सोडायची नाही, अशा माणसासाठी अहिंसा अपरिहार्य बनते.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

गांधीजींचा सत्याचा शोध आणि अहिंसेचा शोध हे दोन्हीही कायमस्वरूपी शांततेच्या आणि सुंदर जीवनाच्या शोधातून आलेले आहेत, असे त्यांचे लिखाण वाचत असताना पुन्हा पुन्हा जाणवत राहते. माणूस जेव्हा स्वतःच्या देहाच्या आणि ऐहिक जीवनाच्या प्रेमात असतो, तेव्हा त्याला हिंसा अपरिहार्य वाटते. माणूस जेव्हा देवत्वाच्या, मानवतेच्या, आणि एकूण मानवी जीवनाच्या प्रेमात पडतो, तेव्हा अहिंसा अपरिहार्य ठरते.

हे सगळे खरे तर योगी अरविंद आणि सुभाषबाबूसुद्धा मान्य करतील. अहिंसा हा सर्वोच्च धर्म आहे असे हे दोघे म्हणत असतात, तेव्हा त्यांना हेच सारे म्हणायचे असते. फक्त त्यांना म्हणायचे होते, हा योग्यांचा मार्ग आहे. योगी आपले आयुष्य पणाला लावून अंतिम ज्ञान शोधत असतो. इथे गांधीजी आपले सर्व अस्तित्व पणाला लावून मानवतेची सेवा करत आहेत, मानवजातीवर एक संस्कार करत आहेत, याबद्दलही योगी अरविंद आणि सुभाषबाबूंचे एकमत आहे. त्यांचा प्रश्न, हे सर्व समाजाच्या आणि राजकारणाच्या पातळीवर आणता येते का असा आहे. गांधीजीनाही अहिंसेला राजकारणात आणणे अवघड आहे, हे माहीत होते. (याची विस्ताराने चर्चा करायची तर एक स्वतंत्र लेखच लिहावा लागेल.)

याच धर्तीवर हिटलरसारखा असंवेदनाशील हुकूमशाहा समोर असेल तर तुमची अहिंसा टिकेल का, असाही एक प्रश्न गांधीजींना अनेक वेळा विचारला जात होता. त्यावर १० ऑक्टोबर १९३८च्या ‘हरिजन’च्या अंकात गांधीजी लिहितात – “If Hitler is unaffected by my suffering, it does not matter. For I shall have lost nothing worth. My honour is the only thing worth preserving. That is independent of Hitler's pity.” (माझ्या दुःखाबद्दल हिटलर असंवेदनशील असला तरीही काही बिघडत नाही. त्याने माझे फारसे काही नुकसान होणार नाही. माझा आत्मसन्मान ही एकच गोष्ट या जगात जतन करण्याजोगी आहे. आणि ती हिटलरच्या दयेवर अवलंबून नाही.)

तुमचा जीव गेला तरी तुम्ही नमला नाहीत, घाबरला नाहीत, तर हिटलरसारख्यांची हिंसा तुमचा आत्मसन्मान हिरावून घेऊ शकत नाही, असे गांधीजी येथे सांगत आहेत. यावरून आपल्या लक्षात येते की, अहिंसा ही संवेदनशील आणि निर्भिड माणसासाठीची गोष्ट आहे. ज्याच्या हृदयाला मानवतेची बूज आहे, ज्याच्या हृदयात आत्मसन्मानाची पणती तेवत आहे आणि ज्याला आपल्या क्षुद्र जिवासाठी मानवता सोडायची नाही, अशा माणसासाठी अहिंसा अपरिहार्य बनते.

आपल्या जिवाची आणि आपल्या ऐहिक कल्याणाची चिंता सोडून लक्षावधी भारतीय लोक स्वातंत्र्यसंग्रामात उतरले. गांधीजींच्या सांगण्यावरून उतरले. एवढे लोक हिंसाचारासाठी रस्त्यावर उतरू शकले नसते, हे कुणीही मान्य करेल. हिंसा करायची म्हणजे सामान्य माणूस अस्वस्थ होतो. कारण हिंसा करणे मानवाच्या हृदयाला अगदी मुळापासून आवडत नाही. या अर्थाने हिंसा मानवाच्या हृदयाला आवडणाऱ्या प्रेमाच्या कायद्याच्या विरोधात आहे, असे म्हणता येते. प्रेम हा मानवी हृदयाचा कायदा आहे, असे यामुळेच म्हटले जाते. ब्रिटिशांना विरोध करायचा आहे, पण त्यांचा द्वेष करायचा नाही, हा विचार स्वातंत्र्यसंग्रामामधील सामान्य लोकांच्या हृदयाच्या कायद्याला सुखावणारा ठरला असणार. त्यामुळेच इतके लोक अगदी निश्चिंतपणे रस्त्यावर उतरले.

द्वेषाने मन झपाटलेले असल्याशिवाय हिंसा शक्य वाटत नाही. एवढा द्वेष लक्षावधी सामान्य माणसामध्ये कुठून आणायचा? लक्षावधी सामान्य लोक हिंसेसाठी रस्त्यावर कधी उतरत नाहीत. हिंसा काही शेकडयात मोजता येणाऱ्या लोकांच्या झुंडीच करत असतात. मोठी हिंसा करण्यासाठी सैन्य तयार करावे लागते. सामान्य माणसांना हिंसेचे ट्रेनिंग देऊन त्यांना सैनिक बनवावे लागते. गांधीजींच्या अहिंसक आंदोलनामुळे लक्षावधी लोक मोठे मोठे त्याग करून रस्त्यावर उतरले.

वल्लभभाई पटेल आणि जवाहरलाल नेहरू याच अर्थाने म्हणतात की, अहिंसेचे तत्त्व राष्ट्राच्या जीवनातही प्रभावी ठरू शकते, हे गांधीजींनी दाखवून दिले.

आत्तापर्यंतच्या लेखात असे वाटण्याची शक्यता आहे की, गांधीजींनी माणसामधील पशुत्वाचा उल्लेख केला, परंतु त्याची पाहिजे तेवढी दखल घेतली नाही. गांधीजींची तत्त्वज्ञानात्मक प्रतिभा एकांगी नव्हती. गांधीजींनी अहिंसेच्या संदर्भात अनेक अपवाद केलेले आहेत. हे अगळे अपवाद लक्षात घेतले तर माणसामधील पशुत्वाची दखल गांधीजींनी किती विविध प्रकारे घेतली होती, हे आपल्या लक्षात येते.

या लेखाच्या शेवटच्या भागात या अपवादांची यादी आपण बघू.

१९०८ साली गांधीजींवर दक्षिण आफ्रिकेत प्राणघातक हल्ला झाला. त्या संदर्भात गांधीजींच्या मुलाने प्रश्न विचाराला की, मी जर तिथे असतो तर मी काय करायला पाहिजे होते? हिंसक प्रतिकार करायला हवा होता की अहिंसापालनासाठी पळून जायला हवे होते? गांधीजी म्हणाले, ‘हिंसक प्रतिकार’!

११ ऑगस्ट १९२०च्या अंकात गांधीजी लिहितात – “I do believe that where there is only a choice between cowardice and violence I would advise violence.” (ज्या परिस्थितीत भीतीने शरण जाणे आणि हिंसा असे दोनच पर्याय असतील, त्या परिस्थितीत मी हिंसेच्या बाजूने उभा राहीन.)

अजून एक म्हणजे, आपल्या जिवाला आत्यंतिक धोका असेल तेव्हा हिंसा करणे आवश्यक ठरते, असे गांधीजी म्हणाल्याचे संदर्भ त्यांचे स्वीय साहाय्यक महादेवभाई देसाई यांनी दिले आहेत – “Though violence is not lawful, when it is offered in self-defence or for the defence of the defenceless, it is an act of bravery far better than cowardly submission. The latter befits neither man nor woman.” (हरिजन, २७ ऑक्टोबर १९४६)

(हिंसाचाराला मान्यता देता येत नसली तरी जेव्हा तो आत्मरक्षणासाठी किंवा अबलांच्या रक्षणासाठी केलेला असतो, तेव्हा शरण जाण्यापेक्षा तो शूरत्वाचे कर्म ठरतो. अशा परिस्थितीमध्ये शरण जाण्यामुळे ना शरण जाणाऱ्याचा फायदा होतो ना ज्यांचे रक्षण करणे आवश्यक असते त्यांचा फायदा होतो.)

हिटलरच्या हिंसेचा प्रतिकार करताना आत्मसमर्पण करायला सांगणारे गांधीजी इथे असे का सांगत आहेत, असे आपल्याला वाटू शकते. ती समर्पणाची भूमिका ही अहिंसा अंगी पुरेपूर बाणवलेल्या साधकासाठीची आहे, ज्या साधकाने भीतीवर विजय मिळवलेला आहे त्यांच्यासाठी आहे. ज्यांनी भीतीवर विजय मिळवलेला आहे, त्यांनी हिटलरसारख्यांसमोर आपले तत्त्व पाळत मान न तुकवता मरून जायचे आहे. परंतु ज्यांना भीती वाटते आहे त्यांनी भीतीच्या पोटी अहिंसा तत्त्वाचे पालन करायचे नाही. त्यांनी आत्मरक्षणासाठी आणि अबलांच्या संरक्षणासाठी हिंसक प्रतिकार केला तरी ते चालणार आहे. इथे गांधीजी हिंसेला नुसतेच स्वीकारत नाहीत, तर तिला नाही सन्मान्यही ठरवतात.

‘हरिजन’च्या ५ मे १९४६च्या अंकात गांधीजी लिहितात – “Meat-eating is a sin for me. Yet, for another person, who has always lived on meat and never seen anything wrong in it, to give it up simply in order to copy me will be a sin.” (मांसाहार हे माझ्या दृष्टीने पाप आहे, परंतु जो माणूस मांसाहारावरच वाढला आहे आणि ज्याला त्यात कधीही काहीही चुकीचे वाटलेले नाही, त्याने केवळ मी म्हणतो म्हणून मांसाहार सोडणे, हे मी पाप समजतो.)

याच अंकात ते पुढे लिहितात – “To allow crops to be eaten up by animals in the name of ahimsa while there is a famine in the land is certainly a sin.” (दुष्काळ पडलेला असताना अहिंसेच्या नावाखाली गुरांना पिके खाऊ देणे हे मी पाप समजतो.)

असे हे सर्व अपवाद आहेत. गांधीजी अनेक वर्षे, अनेक अंगांनी अहिंसेबद्दल लिहित राहिले. त्या सगळ्याचा परामर्श एका लेखात घेता येणार नाही.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

इतिहास ही प्रेमाच्या शांत प्रवाहामध्ये आलेल्या व्यत्ययांची नोंद असते आणि शांततेच्या नैसर्गिक स्थितीत आलेल्या व्यत्ययांची नोंद असते. प्रेमशक्ती नैसर्गिक असल्यामुळे तिची नोंद इतिहास करत नाही. गांधीजींच्या तत्त्वज्ञानात्मक प्रतिभेने आपल्याला दिलेली ही असामान्य ‘इन्साइट’ आहे, सूक्ष्मदृष्टी आहे. याचा प्रत्यय आपल्याला इतिहास वाचताना आणि आपले जीवन जगताना पदोपदी येतो. ज्या ज्या कालखंडात प्रेमाची जागा भीतीने घेतलेली असते त्या त्या कालखंडात हिंसा भडकलेली आपल्याला दिसते. इतिहास आपल्याला दाखवून देतो की, प्रत्येक युद्धाआधी हिंसेच्या पुजाऱ्यांना भीती पसरवावी लागते, मग त्या भीतीमधून द्वेष पसरतो. त्यानंतर तो द्वेष त्यांना खूप काळ फुलवत ठेवावा लागतो, तेव्हा कुठे हिंसा भडकते.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

या लेखात शेवटी, प्रेम आणि भीती या दोन भावनांच्या द्वंद्वाच्या दृष्टिकोनातून गांधीजी अहिंसा कशी व्यक्त करतात, हे बघणे योग्य ठरेल. कारण कुठल्याही तत्त्वज्ञानाला मानवी भावनांच्या प्रवाहाची कशी साथ मिळते, हेसुद्धा महत्त्वाचे असते. भावनांनी तत्त्वज्ञानाला साथ दिली नाही, तर ते तत्त्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचत नाही. गांधीजींनी या गोष्टीचाही विचार केला होता. त्यामुळेच त्यांनी अहिंसेला प्रेमाचे अधिष्ठान मिळवून दिले होते. गांधीजी, अहिंसेचे प्रेमाशी असलेले नाते अधोरेखित करतात आणि हिंसेचे भीतीशी.

२१ जुलै १९२५च्या ‘यंग इंडिया’मधील लेखात गांधीजी लिहितात – “Fear and love are contradictory terms. Love wrestles with the world as with the self and ultimately gains mastery over all other feelings.” (प्रेम आणि भीती या एकमेकांच्या विरोधी भावना आहेत. प्रेम सगळ्या जगाशी आणि अगदी स्वतःशीही झगडत राहाते. आणि शेवटी इतर सर्व भावनांवर विजय मिळवते.)

आपल्या ‘हिंद स्वराज’ या पुस्तकात गांधीजी लिहितात – “The force of love is the same as the force of the soul or truth. We have evidence of its working at every step. The universe would disappear without the existence of that force.” (प्रेमाची शक्ती हीच सत्याची शक्ती असते! प्रेमशक्तीच्या अशा प्रचंड प्रभावाचा पुरावा आपल्याला आपल्या आयुष्यात पदोपदी मिळतो.) (हिंद स्वराज, प्रकरण ८८, पान ७७).

प्रेमामुळेच या जगात शांतता टिकून राहिलेली असते. अगदी कुटुंबातली भांडणेसुद्धा कुटुंबात प्रेम असेल तर संपून जातात. अनेक देश माणसाच्या मानवतेवरील प्रेमामुळेच वर्षानुवर्षे शांततेत राहतात. गांधीजी तक्रार करतात, इतिहास या प्रेमाच्या ताकदीची दखल घेताना दिसत नाही.

‘हिंद स्वराज’मध्ये ते पुढे लिहितात – “History is really a record of every interruption of the even working of the force of love or the soul.” (प्रेमशक्तीचा प्रभाव ज्या काळात खंडित होतो त्याच काळाची नोंद इतिहास करतो.)

थोडक्यात, इतिहास हा फक्त युद्धांचा आणि अस्वस्थ काळाचाच लिहिला जातो. सतत वाहत असणाऱ्या मानवी समाजाच्या शांत अशा प्रेममय प्रवाहाचा इतिहास लिहिला जात नाही. (History, then, is a record of an interruption of the course of nature. Soul force, being natural, is not recorded in history.)

अशा रीतीने, इतिहास ही प्रेमाच्या शांत प्रवाहामध्ये आलेल्या व्यत्ययांची नोंद असते आणि शांततेच्या नैसर्गिक स्थितीत आलेल्या व्यत्ययांची नोंद असते. प्रेमशक्ती नैसर्गिक असल्यामुळे तिची नोंद इतिहास करत नाही.

गांधीजींच्या तत्त्वज्ञानात्मक प्रतिभेने आपल्याला दिलेली ही असामान्य ‘इन्साइट’ आहे, सूक्ष्मदृष्टी आहे. याचा प्रत्यय आपल्याला इतिहास वाचताना आणि आपले जीवन जगताना पदोपदी येतो. ज्या ज्या कालखंडात प्रेमाची जागा भीतीने घेतलेली असते त्या त्या कालखंडात हिंसा भडकलेली आपल्याला दिसते. इतिहास आपल्याला दाखवून देतो की, प्रत्येक युद्धाआधी हिंसेच्या पुजाऱ्यांना भीती पसरवावी लागते, मग त्या भीतीमधून द्वेष पसरतो. त्यानंतर तो द्वेष त्यांना खूप काळ फुलवत ठेवावा लागतो, तेव्हा कुठे हिंसा भडकते.

सत्य, अहिंसा आणि प्रेम ही एक त्रिसूत्री आहे, असे गांधीजी अधोरेखित करतात आणि त्याच्या उलट असत्य, हिंसा आणि द्वेष अशीही त्रिसूत्री आहे, हे आपल्या लक्षात आणून देतात.

यावरून ज्या काळात खोट्याचा कल्लोळ होतो, तेव्हा माणसाने ओळखावे की, द्वेष आणि हिंसा तिथेच कुठेतरी लपून बसलेली आहे. म्हणूनच, जेव्हा जेव्हा ज्या फॅसिस्ट शक्तींना सत्ता प्राप्त करायची असते, तेव्हा तेव्हा त्या शक्ती इतिहासाचे विद्रुपीकरण करून भीती आणि त्यामागोमाग द्वेष पसरवताना दिसतात. गांधीजींनी हे बरोबर ओळखलेले होते. सत्य, देवत्व, मानवता, प्रेम आणि अहिंसा अशी ही मालिका आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

हा लेख गांधीजींच्या अहिंसेची केवळ तोंडओळख करून घ्यायचा एक प्रयत्न आहे. त्यामुळे गांधीजींनी दाखवून दिलेल्या अहिंसेच्या अनेक पैलूंचा परामर्श या लेखात घेता आलेला नाही. या शिवाय, अहिंसा आणि राष्ट्राचे जीवन असाही एक मोठा विषय आहे. अहिंसा आणि समाजाच्या विविध स्तरांमधली नाती हासुद्धा मोठा विषय आहे. धर्म आणि अहिंसा असा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. अहिंसा आणि सत्याग्रह तसेच अहिंसा आणि सत्याकडे जाण्याचा प्रवास, असाही एक जाणून घेण्याजोगा महत्त्वाचा पैलू आहे. गांधीजी उपनिषदांप्रमाणेच गीतेचेही उपासक होते. ‘गीते’ची अहिंसेबद्दलची भूमिका आणि गीतेमधील हिंसेबद्दलची भूमिका, यांचा समन्वय गांधीजी कसा साधतात, हाही अतिशय मोठा विषय आहे. या पुढच्या लेखांमध्ये या विषयांचा अंदाज घेण्याचा मानस आहे.

सत्य आणि अहिंसेचा शोध हे गांधीजींचे जीवितकार्य होते. या पन्नास वर्षांच्या प्रवासात त्यांना एक महत्त्वाचा शोध लागला. ते लिहितात – “I have found that the law of love has answered as the law of destruction has never done.” (मला उमजले आहे की, प्रेमाचा कायदा या जगाने निर्माण केलेल्या प्रश्नांना जशी बिनतोड उत्तरे देतो तशी उत्तरे हिंसेच्या कायद्याला देता येत नाही.)

गांधीजींना प्राप्त झालेली ही उमज आपल्याला कशी प्राप्त होईल, हे समजून घेणे आजच्या काळामधील प्रत्येक शांततावाद्यासाठी आवश्यक आहे.

(या लेखात वापरलेली गांधीजींची सगळी वचने आणि त्यांचे संदर्भ सेवाग्राम आश्रमाच्या Gandhi Resources Encyclopaedia वरून घेतलेले आहेत.)

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......