आपण जर गांधीजींच्या तत्त्वज्ञानाचे अर्थ समजून घेत राहिलो, तर ते आपला ‘आतला आवाज’ बनतील आणि आजच्या या विद्वेषाने ओतप्रोत भरलेल्या काळातसुद्धा आपल्याला मार्गदर्शन करत राहतील
पडघम - सांस्कृतिक
श्रीनिवास जोशी
  • महात्मा गांधी
  • Sun , 23 November 2025
  • पडघम सांस्कृतिक महात्मा गांधी Mahatma Gandhi

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

ईश्वर आणि मानवी मूल्ये या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे गांधीजी आपल्याला सांगत आहेत. येथे ते ‘ईश्वर’ ही संकल्पना खूप विशाल करत आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. देव, देवत्व आणि मानवता या तिन्ही गोष्टी एकच आहेत, म्हणजे मानवामध्ये  देव आणि देवत्व सुप्त रूपाने अस्तित्वात आहे, असे गांधीजी म्हणतात. सत्य, प्रेम, नीती, नैतिकता, निर्भयता, विवेक, विचार आणि श्रद्धा हे सर्व आपल्यामध्ये असलेल्या देवत्वाचे भाग आहेत. याच्या पुढे जाऊन गांधीजी म्हणतात की, आपल्यातील पशु-प्रेरणा पार करणे आणि दैवी किंवा मानवी मूल्यांची बूज राखणे म्हणजेच देवत्वाची पूजा करणे. मानवतेची बूज राखत जगणे म्हणजेच देवाच्या कायद्याप्रमाणे जगणे.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

सध्या भारत दोन ध्रुवांमध्ये वाटला गेला आहे. एक बाजू स्वतःला ‘राष्ट्रवादी’ आणि दुसरी स्वतःला ‘मानवतावादी’ म्हणवते. स्वतःला ‘राष्ट्रवादी’ म्हणवून घेणारे लोक त्याच दमात स्वतःला ‘हिंदुत्ववादी’सुद्धा म्हणवून घेतात; आणि स्वतःला ‘मानवतावादी’ म्हणवून घेणारे लोक त्याच दमात ‘लोकशाहीवादी’ आणि ‘गांधीवादी’.

देशात पराकोटीचा विद्वेष तयार झाला आहे, त्याच्या विरोधात अनेक लोक उतरले आहेत; परंतु विरोधाभास असा की, हे लोक विद्वेषाला विद्वेषानेच उत्तर देत आहेत. समाजातील शांततावादी लोकच जर विद्वेषाच्या आहारी जात असतील आणि भाषिक का होईना हिंसाचारात भाग घेणार असतील तर कसे व्हायचे, असे कित्येकदा वाटून जाते. त्यामुळे खऱ्या ‘गांधीवादा’चा विसर हा आजच्या भारताच्या लोकशाहीवादी चळवळीचा खरा ‘क्रायसिस’ आहे की काय, असे वाटते. या पार्श्वभूमीवर गांधीवादाची उजळणी स्वतःपुरती का होईना करावी आणि गांधीवादाच्या मूलतत्त्वांचे अर्थ पुन्हा एकदा लक्षात घ्यावेत, असे वाटून गेले.

गांधीजींनी आपले विचार अनेक लेख आणि अनेक भाषणांमधून व्यक्त केले आहेत. हे ‘कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी’ या संकलनात एकत्रित केले आहेत. त्याचे एकूण शंभर खंड आहेत. पन्नास हजार पानांचे शंभर खंड! देशव्यापी चळवळ चालवताना लिहिलेली ही पन्नास हजार पाने!

या लेखासाठी मी ‘कलेक्टेड वर्क्स’मध्ये प्रकाशित झालेल्या ‘यंग इंडिया’ आणि ‘हरिजन’ या गांधीजींच्या साप्ताहिकांमधील मजकुराचा आधार घेतला आहे. १९१९ ते १९३३पर्यंत गांधीजींनी ‘यंग इंडिया’ हे साप्ताहिक आणि पुढे १९३३पासून १९४८पर्यंत ‘हरिजन’ हे साप्ताहिक चालवले. त्यामधून गांधीजी आपले तत्त्वज्ञानात्मक, सामाजिक आणि राजकीय विचार मांडत राहिले. ‘यंग इंडिया’ आणि ‘हरिजन’ वाचताना गांधीजी आपल्याला उलगडत जातात.

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

.................................................................................................................................................................

गांधीजींच्या विचारांची सुरुवात मानव कसा तयार झाला आणि मानवाची एकूण प्रकृती कशी आहे, या विचारातून होते. १५ सप्टेंबर १९४६च्या ‘हरिजन’च्या अंकात त्यांनी हे अगदी सुस्पष्टपणे मांडले आहे. त्यांनी  लिहिले आहे - “Man is a complex being. He is a mixture of God and Animal. His business is to strengthen the God in him and suppress the Animal.” (माणूस हा गुंतागुंतीचा प्राणी आहे. तो एक मोठी गुंतागुंत असलेले अस्तित्व आहे. काही भाग प्राण्याचा आणि काही भाग दैवी. आपल्यामधील प्राण्यावर मात करून दैवी बनत जाणे, हे मानवाचे मुख्य कर्तव्य आहे.)

मानवाच्या प्राणी असण्यातून या जगात कलह तयार होतो, अशी गांधीजींची भूमिका आहे. ती जगातील बहुतेक विचारवंतांना मान्य आहे. ‘अ‍ॅनिमल इन्स्टिंक्ट’ म्हणजे मानवामधली पशुप्रेरणा त्याला स्वार्थी बनवते. त्यातून ‘आक्रमक मानसिकता’ तयार होते. यातून एक-दुसऱ्याची जमीन, पाणी, खनिजे आणि एकूण मालमत्ता लुटण्याची हाव तयार होते. यातूनच युद्धे व यादवी युद्धे होतात आणि गृहकलह म्हणजे घरातली भांडणेसुद्धा होत असतात.

याउलट, या जगात जी काही शांतता आहे, ती मानवामधल्या मानवी संवेदनांमुळे आहे, असे गांधीजी म्हणतात. यावरही जगातल्या बहुतेक विचारवंतांनी सहमती व्यक्त केलेली आहे. होता होईल तेवढा दुसऱ्याचा विचार करणे, सहसंवेदनेची क्षमता असणे, दयाभाव असणे, या सुंदर गोष्टी मानवामध्ये असलेल्या सहसंवेदनेच्या क्षमतेमुळे तयार होतात. इतकेच काय पण, मानवाच्या आयुष्यातील सगळ्याच सुंदर गोष्टींचा उगम त्याच्यातल्या सहसंवेदनेच्या क्षमतेमधूनच होताना दिसतो.

‘माणूस हा एक प्राणी आहे’, असे म्हटले की, त्याच्यात पशु-प्रेरणा असणे स्वाभाविक आहे, हे आपल्याला लगेचच उमजून येते. परंतु माणसात मानवतेचा उगम कुठून होतो, असा प्रश्न गांधीजी विचारतात. ही मानवता परमेश्वराकडून आली आहे, असे ते मानतात. ईश्वर आणि मानवता यांच्या नात्याबद्दल किंवा त्यांच्या एकत्वाबद्दल गांधीजी सतत लिहीत राहिलेले दिसते.

‘यंग इंडिया’चा १ ऑक्टोबर १९३१ चा अंक असो किंवा ‘हरिजन’चा १५ मार्च ३६ चा अंक असो किंवा ‘यंग इंडिया’चा ५ मार्च १९२५चा अंक असो; गांधीजी त्यांची ईश्वराची संकल्पना सातत्याने समजावून सांगताना दिसतात. त्यांची ही संकल्पना अगदी अस्सल निरीश्वरवादालाही आपल्या कवेत घेताना आपल्याला दिसते. गांधीजींच्या तत्त्वज्ञानात्मक प्रतिभेचा हा विलक्षण आविष्कार आपल्याला विस्मयचकित करणारा आहे.

गांधीजी लिहितात - “For me, God is Truth and Love; God is ethics and morality; God is fearlessness. God is the source of light and life and yet He is above and beyond all these. God is conscience. He is even the atheism of the atheist. He transcends speech and reason. He is personal and impersonal, and both beyond. He is the law-giver, the law and the executor of His laws.” (माझ्या दृष्टीने सत्य म्हणजे देव, प्रेम म्हणजे देव. तसेच देव म्हणजे नीती, देव म्हणजे नैतिकता; देव म्हणजे निर्भयता. देव प्रकाशाचा स्रोत, जीवनाचा स्रोत आहे. देव विवेक आहे. तो निरीश्वरवाद्याचा निरीश्वरवादही आहे. तो शब्दाच्या, बुद्धीच्या आणि कार्यकारणाच्या पलीकडचा आहे. तो वैयक्तिक आहे आणि वैयक्तिकाच्या पलीकडचाही आहे. तो या जगातील सनातन कायद्यांचा निर्माता आहे आणि त्यांची अंमलबजावणी करणाराही तोच आहे.)

म्हणजे, ईश्वर आणि मानवी मूल्ये या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे गांधीजी आपल्याला सांगत आहेत. येथे ते ‘ईश्वर’ ही संकल्पना खूप विशाल करत आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. देव, देवत्व आणि मानवता या तिन्ही गोष्टी एकच आहेत, म्हणजे मानवामध्ये  देव आणि देवत्व सुप्त रूपाने अस्तित्वात आहे, असे गांधीजी म्हणतात.

‘हरिजन’च्या २५ ऑगस्ट १९४६च्या अंकात गांधीजी लिहितात - The divine element within man is the source of all true values. (मानवात कायम राहात असलेल्या दैवी तत्त्वामधूनच सर्व मानवतेचा आणि मानवी मूल्यांचा उगम झालेला आहे.)

थोडक्यात, सत्य, प्रेम, नीती, नैतिकता, निर्भयता, विवेक, विचार आणि श्रद्धा हे सर्व आपल्यामध्ये असलेल्या देवत्वाचे भाग आहेत. याच्या पुढे जाऊन गांधीजी म्हणतात की, आपल्यातील पशु-प्रेरणा पार करणे आणि दैवी किंवा मानवी मूल्यांची बूज राखणे म्हणजेच देवत्वाची पूजा करणे. मानवतेची बूज राखत जगणे म्हणजेच देवाच्या कायद्याप्रमाणे जगणे.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

माणूस आपल्यातील पशु-प्रेरणा विसरून विचार करतो आहे, पशु-प्रेरणेच्या पलीकडे जायचा प्रयत्न करतो आहे, म्हणजेच तो देवत्वाच्या जवळ चालला आहे, अशी भूमिका गांधीजी घेतात. माणूस पशुत्व मागे सोडून विचार करतो आहे, म्हणजे तो देवत्वाकडे चालला आहे. मग भले त्या प्रयत्नात तो ‘या जगात देव नाही’, या निष्कर्षाला का पोहोचेलला असेना! गांधीजी एकाच वेळी देव मानणारे ‘ईश्वरवादी’, देव न मानणारे ‘निरीश्वरवादी’ आणि या दोन्हींमधील कुठलीही एक बाजू स्वीकारायची गरज नसलेले ‘अज्ञेयवादी’, अशा सगळ्यांना आपल्या मूल्यव्यवस्थेत, तत्त्वज्ञानात सामावून घेतात. गांधीजींच्या तत्त्वज्ञानाची ही अंतर्गत सुसंगती आपण जसजशी लक्षात घेऊ लागतो, तसतसे ‘गांधीवादा’चे अंतरंग उलगडत जाते. त्यांच्या या अत्यंत सुसंगत अशा विचार मालिकेकडे जाण्याआधी मानवाच्या मनातील कुठल्या ताणामधून ही विचारमालिका सुरू झाली, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

येथे अजून एक गोष्ट आवर्जून लक्षात घेतली पाहिजे. निरीश्वरवाद्याचा निरीश्वरवाद हासुद्धा देवत्वाचा एक भाग आहे, असे गांधीजी म्हणतात. त्यांनी देवाची आणि देवत्वाची संकल्पना आपल्याला कल्पनाही करता येणार नाही, इतकी विशाल केली आहे. माणूस आपल्यातील पशु-प्रेरणा विसरून विचार करतो आहे, पशु-प्रेरणेच्या पलीकडे जायचा प्रयत्न करतो आहे, म्हणजेच तो देवत्वाच्या जवळ चालला आहे, अशी भूमिका गांधीजी घेतात. माणूस पशुत्व मागे सोडून विचार करतो आहे, म्हणजे तो देवत्वाकडे चालला आहे. मग भले त्या प्रयत्नात तो ‘या जगात देव नाही’, या निष्कर्षाला का पोहोचलेला असेना!

गांधीजी एकाच वेळी देव मानणारे ‘ईश्वरवादी’, देव न मानणारे ‘निरीश्वरवादी’ आणि या दोन्हींमधील कुठलीही एक बाजू स्वीकारायची गरज नसलेले ‘अज्ञेयवादी’, अशा सगळ्यांना आपल्या मूल्यव्यवस्थेत, तत्त्वज्ञानात सामावून घेतात.

गांधीजींच्या तत्त्वज्ञानाची ही अंतर्गत सुसंगती आपण जसजशी लक्षात घेऊ लागतो, तसतसे ‘गांधीवादा’चे अंतरंग उलगडत जाते. त्यांच्या या अत्यंत सुसंगत अशा विचार मालिकेकडे जाण्याआधी मानवाच्या मनातील कुठल्या ताणामधून ही विचारमालिका सुरू झाली, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

माणसामधली पशु-प्रेरणा आणि मानवी संवेदना या दोन गोष्टी नुसत्याच अस्तित्वात नसतात. त्यांची सतत ओढाताण सुरू असते. सामान्य माणूस जेव्हा घाबरलेला नसतो, तेव्हा तो मानवी संवेदनांना सर्वोच्च मानतो; परंतु जेव्हा आपले शांत जगणे धोक्यात आले आहे असे त्याला वाटते, तेव्हा तो आपल्यामधील पशूच्या अंतःप्रेरणेकडे ओढला जातो. माणूस मानवी संवेदनेकडून आपल्यातील पशुप्रेरणेकडे झुकला की, वेगवेगळ्या प्रकारचे कलह सुरू होतात आणि हिंसा सुरू होते.

अशा रीतीने माणूस जेव्हा पशु-प्रेरणेप्रमाणे वागतो, तेव्हा हे जग हिंसक स्थितीमध्ये आणि जेव्हा मानवी प्रेरणेप्रमाणे वागतो, तेव्हा हे जग शांततामय स्थितीमध्ये आंदोळत राहते. त्यामुळे या जगात कायमची शांतता शक्य होत नाही. म्हणून या जगात कायमची शांतता कशी तयार होईल, याचा विचार ‘गांधीवाद’ करतो. हे समजले की, आपल्या लक्षात येते- या जगात कायमची शांतता कशी तयार होईल, या प्रश्नाच्या शोधातून खरा ‘गांधीवाद’ आकार घेऊ लागतो. गांधीजी म्हणतात, या जगात कायमची शांतता नांदायची असेल, तर माणसाला त्याच्यामधील ईश्वरी संवेदनांकडे जायला लागते. तिथे जाण्याचा एक प्रयत्न म्हणजे ‘गांधीवाद’.

या अर्थाने हा या जगातील सर्व धर्माच्या मूलतत्त्वांसारखाच आहे. येथे एक क्षणभर थांबून आपण धर्म आणि धर्माची मूलतत्त्वे यांच्यामधील फरक लक्षात घ्यायला पाहिजे. या जगातील कुठल्याही धर्मामध्ये त्याची मूलतत्त्वे, कर्मकांडे आणि ज्या समाजात तो धर्म काम करतो, त्याच्या एकूण सामाजिक-राजकीय व्यवस्थेसाठी लागणारे कायदेकानू यांचा समावेश असतो.

या उलट कुठल्याही धर्माची मूलतत्त्वे स्वतःला फक्त माणूस आणि ईश्वर यांच्या नात्यापर्यंतच सीमित ठेवतात. याचे हिंदू धर्मामधले उदाहरण द्यायचे तर - हे विश्व तयार करणारे परमतत्त्व सर्व मानवांमध्ये आत्मा म्हणून उपस्थित असते, हे हिंदू धर्मामधील अगदी पहिले तत्त्व आहे. याचा दुसरा अर्थ असा की, सर्व मानव समान आहेत. हे झाले हिंदू धर्मामधील मूलतत्त्व! बाकी मग हिंदू शास्त्रांमध्ये सांगितलेले वर्ण किंवा जात याबद्दलचे जे विचार आहेत, तो झाला केवळ बाह्य धर्माचा भाग. 

आता येथे पुढचा प्रश्न येतो- जर असे असेल तर ‘गांधीवादा’ची प्राथमिक तत्त्वे दोनच - सत्य आणि अहिंसा! सत्य कशाला म्हणायचे आणि सत्याचा आदर करून जगायचे असेल तर अहिंसा कशी अपरिहार्य ठरते, हे गांधीजी कसे समजावून सांगतात, हे लक्षात घेतले की, त्यांच्या विचारांचा गाभा आपल्या हाती येतो.

गांधीजींच्या या विचारमालिकेची सुरुवात ‘God is Truth’ या विचाराने होते. २५ सप्टेंबर १९२४च्या ‘यंग इंडिया’च्या अंकात गांधीजी लिहितात - “I believe in the absolute oneness of God and, therefore, of humanity. What though we have many bodies? We have but one soul. The rays of the sun are many through refraction. But they have the same source.” (देवाच्या एकत्वाबद्दल माझ्या मनात श्रद्धा आहे. त्यामुळेच सर्व मानव जात एकच आहे. आपली शरीरे अनेक असतील, परंतु आपला आत्मा एकच आहे. सूर्याचे किरण अनेक असतात, पण त्यांचा उगम एकच असतो.)

आत्मा हा ईश्वराचा अंश असल्यामुळे तो मानवतेच्या मूल्यांनी रसरसलेला असतो, असे गांधीजींनी आधीच सांगितलेले आपण पाहिले आहे. त्यामुळे सगळी मानवजात ईश्वरी अस्तित्वाने जोडली गेलेली आहे. असे गांधीजी जेव्हा सांगत असतात, तेव्हा त्याचा अर्थ सगळी मानवजात प्रेम आणि सहानुभूतीसारख्या मानवतेच्या धाग्यांनी जोडली गेली आहे, असा होतो. यातूनच गांधीजींच्या तत्त्वज्ञानाचा पुढचा धागा उलगडतो.

याचा दुसरा अर्थ असा की, ईश्वराच्या आणि मानवी मूल्यांच्या दृष्टीने बघायला गेलो, तर या जगातील सर्व मानव समान आहेत, हे मान्य करावे लागते. लिंगभेद, जातिभेद, वंशभेद, धर्मभेद आणि राष्ट्रभेद अशा अनेक भेदांपलीकडे जाऊन ईश्वराच्या आणि मानवतेच्या दृष्टीमधून आपण पाहू शकलो, तर सर्व मानवजात एक आहे, असे आपल्याला दिसेल, असे गांधीजींचे सांगणे आहे.

सर्व मानवांमध्ये आत्म्याच्या किंवा मानवतेच्या रूपाने राहणाऱ्या या देवाला कुणी ‘परमेश्वर’, कुणी ‘गॉड’, कुणी ‘अल्ला’, तर कुणी ‘मानवता’ म्हणते, अशी गांधीजींची श्रद्धा होती. हे विश्व जर एक आहे, तर त्याचा निर्माता एकच असणार. मग भले त्याची नावे वेगवेगळी असोत. या विश्वाचा निर्माता एकच असेल आणि जर तो अंतिम असेल, तर ज्या मानवतेमधून तो व्यक्त होतो, ती मानवतासुद्धा या जगातील एक अंतिम तत्त्व असणार, असा गांधीजींच्या विचारातील एक अत्यंत महत्त्वाचा धागा आहे.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

गांधीजी जन्मभर मानवाच्या आयुष्यातील प्रेम, नीती, नैतिकता, निर्भयता, विवेक, विचार अशा सुंदर गोष्टीसुद्धा परमेश्वराएवढ्याच सत्य आहेत, हे सांगत राहिले,. याच अर्थाने ‘God Is Truth’ या विचाराकडून ते ‘Truth Is God’ या विचाराकडे येतात. या मार्गानेही निरीश्वरवाद्यांना आणि अज्ञेयवाद्यांना गांधीजी आपल्यामध्ये सामावून घेताना दिसतात. तुम्ही ईश्वरवादी असा, निरीश्वरवादी असा किंवा अज्ञेयवादी असा, तुमच्या विचारांचा पाया एकच आहे, असे ते सांगतात. आपल्या विचारातले हे तर्काचे दुवे गांधीजी तार्किक पद्धतीने मांडताना फारसे दिसत नाहीत, कारण ते सर्वसामान्य लोकांसाठी लिहीत होते.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

आत्तापर्यंत गांधीजींनी पुढील तत्त्वे आपल्याला सांगितली आहेत. पहिले, माणसात पशुत्व आणि देवत्व या दोन्ही गोष्टी आहेत. दुसरे, देव, देवत्व आणि मानवता यांच्यात एकत्व आहे. तिसरे, पशुत्वावर मात करून देवत्व अंगी बाणवणे किंवा मानवता अंगी बाणवणे आणि देवत्वाच्या दिशेने प्रगती करत राहणे हे मानवाच्या आयुष्याचे ईप्सित आहे. चौथे, सर्व मानवांमध्ये देव आणि देवत्व एक अनिवार्य भाग म्हणून असल्यामुळे सर्व मानव समान आहेत. पाचवे, या विश्वाचा निर्माता एकच आहे. सहावे, परमेश्वर हेच सत्य आहे आणि सत्य हाच परमेश्वर आहे. सातवे, प्रेम आणि देव हे एकच आहेत. आठवे, देव हाच अंतिम कायदा आहे. आणि नववे, देव हाच या जगातला अंतिम न्यायदाता म्हणजे न्यायाधीशही आहे.

या नऊ विचारांमधून गांधीजी आपल्या दहाव्या मूलतत्त्वाकडे जातात. तो म्हणजे, ‘सत्य आणि अहिंसा या गोष्टी वेगळ्या करता येत नाहीत’. याबद्दलचे स्पष्टीकरण आपण पुढच्या लेखामध्ये पाहणार आहोत. आत्तापुरते बोलायचे, तर ही दहा तत्त्वे लक्षात घेतली की, ‘गांधीवादा’चा पाया आपल्या लक्षात येतो.

थोडक्यात, देव मानणाऱ्या लोकांना गांधीजी सांगतात- देव माणसाच्या आयुष्यात प्रेम, नीती, नैतिकता, निर्भयता, विवेक, विचार अशा सुंदर गोष्टींमधून व्यक्त होतो आणि देव न मानणाऱ्या लोकांना गांधीजी सांगतात- देवत्व माणसाच्या आयुष्यात प्रेम, नीती, नैतिकता, निर्भयता, विवेक, विचार अशा सुंदर गोष्टींमधून व्यक्त होते.

ही मांडणी करून झाल्यावर गांधीजी एक प्रमेय मांडतात- ‘God is truth’. (परमेश्वर सत्य आहे.) सत्य हा शब्द सत् या संस्कृत धातू वरून आलेला आहे. सत् म्हणजे सत्य, शाश्वत किंवा शुद्ध! जो सत्य आहे तो देव, जो शुद्ध आहे तो देव आणि जो शाश्वत आहे तो देव. देव सत्य आहे, देव सतत असणारा आहे आणि देव शुद्ध आहे. या उलट, मानव सत्य नाही, शाश्वत नाही आणि त्याच्यात पशुत्व आहे म्हणून शुद्धही नाही. हा विचार गांधीजींनी वेदांत तत्त्वज्ञानातून घेतला आहे, असे म्हणता येते.

ईश्वराच्या सत्यत्वाच्या, शुद्धत्वाच्या आणि शाश्वततेच्या विचारातून गांधीजी मानवतेच्या सत्यत्वाकडे, शुद्धत्वाकडे आणि शाश्वततेकडे जातात. परमेश्वर जर सत्य असेल, शुद्ध असेल आणि शाश्वत असेल, तर असा परमेश्वर आपल्याला ज्या गोष्टींमधून प्रतीत होतो, त्यासुद्धा सत्य, शुद्ध आणि शाश्वतच असणार.

त्यामुळेच गांधीजी जन्मभर मानवाच्या आयुष्यातील प्रेम, नीती, नैतिकता, निर्भयता, विवेक, विचार अशा सुंदर गोष्टीसुद्धा परमेश्वराएवढ्याच सत्य आहेत, हे सांगत राहिले,. याच अर्थाने ‘God Is Truth’ या विचाराकडून ते ‘Truth Is God’ या विचाराकडे येतात.

या मार्गानेही निरीश्वरवाद्यांना आणि अज्ञेयवाद्यांना गांधीजी आपल्यामध्ये सामावून घेताना दिसतात. तुम्ही ईश्वरवादी असा, निरीश्वरवादी असा किंवा अज्ञेयवादी असा, तुमच्या विचारांचा पाया एकच आहे, असे ते सांगतात.

आपल्या विचारातले हे तर्काचे दुवे गांधीजी तार्किक पद्धतीने मांडताना फारसे दिसत नाहीत, कारण ते सर्वसामान्य लोकांसाठी लिहीत होते. त्यांना लोकांना तर्काच्या जंजाळात गुंतवायचे नव्हते, त्यांना हृदयाच्या भाषेत बोलायचे होते. तर्काची भाषा थोड्या लोकांसाठी असते, हृदयाची भाषा सगळ्यांना कळणारी असते.

ईश्वर किंवा मानवी जीवनातले सत्य आपल्याला विचारांच्या आणि तर्काच्या माध्यमातून नाही, तर आपल्या हृदयातून प्रतीत होत असते, असे गांधीजी लोकांच्या मनावर जन्मभर बिंबवत राहिले. ईश्वर किंवा मानवता आपल्या ‘आतल्या आवाजा’तून जाणवत राहते, असे कायम सांगत राहिले.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

पन्नास वर्षांच्या आपल्या चिंतनातून गांधीजी सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा विचार करत राहिले. मानवी जीवनात संपूर्णतेचा आणि साफल्याचा अनुभव कसा घेता येईल, याचा विचार करत राहिले. या चिंतनातून त्यांना आपल्यामधील ईश्वराचा आवाज सापडला, आपल्यामधील मानवतेचा आवाज सापडला. हा आवाज त्यांना मार्गदर्शन करत राहिला. आपण जर गांधीजींच्या तत्त्वज्ञानाचे अर्थ समजून घेत राहिलो, तर ते आपला ‘आतला आवाज’ बनतील आणि आजच्या या विद्वेषाने ओतप्रोत भरलेल्या काळातसुद्धा आपल्याला मार्गदर्शन करतील, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

‘यंग इंडिया’च्या ११ ऑक्टोबर १९२८च्या अंकात गांधीजी लिहितात - “He is no God who merely satisfies the intellect, if He ever does. God to be God must rule the heart and transform it. He must express Himself in every smallest act of His votary.” (फक्त बुद्धीचे समाधान करून शांत राहणारा देव देवच नाही. जो देव माणसाच्या हृदयावर सत्ता गाजवतो तोच खरा देव. आपले देवत्व सिद्ध करायचे असेल, तर त्याला हृदयातले पशुत्व संपवून त्याचे देवत्वामध्ये परिवर्तन करून दाखवायला लागते. देवाला माणसाच्या प्रत्येक छोट्या कृतीमधूनही व्यक्त होत राहावे लागते.)

नुसती बौद्धिक बडबड काय कामाची? उदाहरणार्थ, वैश्विक प्रेमाच्या मूलतत्त्वाबद्दल नुसती चर्चा करून काय उपयोग? तुम्हाला संपूर्ण जगाविषयी प्रेम वाटावे असे वाटत असेल, तर ते तुमच्या हृदयातूनच उमलून यावे लागते. गांधीजी सांगतात की, वैश्विक प्रेम हृदयात उमलून येणे ही सहजसाध्य गोष्ट नाही. देवाने किंवा देवत्वाने तुमच्या हृदयाचा ताबा घेतला असेल, तरच हे वैश्विक प्रेम तुमच्या हृदयातून व्यक्त होत राहते. साध्या भाषेत सांगायचे तर, भावनांच्या जिवंतपणामधून देव किंवा देवत्व व्यक्त होते. माणसाने आपल्या भावनांकडे लक्ष द्यावे. भीती, द्वेष, असूया, मत्सर, लोभ, मोह, मद, या भावना हृदयातून काढून टाकाव्यात. कारण या भावना आपल्या पशुत्वामधून निर्माण झालेल्या असतात. भावनांमधून व्यक्त होणारे पशुत्व संपल्याशिवाय हृदयातून व्यक्त होणारे देवत्व दिसू शकत नाही.

या अर्थाने ‘हरिजन’च्या ८ मे १९३७च्या अंकात अंकात गांधीजी लिहितात – “By spiritual training I mean education of the heart.” (आध्यात्मिक शिक्षण हे मुख्यत्वेकरून हृदयाचे शिक्षण असते. परमेश्वराचे अस्तित्व समजण्यासाठी आपल्याला मनापेक्षा हृदयावर संस्कार करावे लागतात.)

हृदयावर संस्कार करायचे म्हणजे प्रेमासारख्या दैवी भावना अंगी बाणवायच्या! दैवी भावना आपल्याला आणि आपल्या आजुबाजूच्या लोकांना किती सुखी करतात हे लक्षात घ्यायचे. यातूनच या दैवी भावनांमध्येच जगाचे कल्याण लपलेले आहे, हे लक्षात येते. हे सर्व ज्या क्षणी लक्षात येते, त्या क्षणापासून आपण आपल्या पशुत्वामधून आलेल्या भावनांना दूर सारायला लागतो. या क्षणापासून आपल्या हृदयाची शुद्धता सुरू होते. गांधीजी सांगतात की, हृदय शुद्ध होत गेले की, आपला ‘आतला आवाज’ आपल्याला ऐकू यायला लागतो.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

‘हरिजन’च्या ८ डिसेंबर १९३३च्या अंकात गांधीजी लिहितात - “I have made a ceaseless effort to attain self-purification, I have developed some little capacity to hear correctly and clearly the ‘still small Voice within’.” (मी आत्मशुद्धीसाठी सतत प्रयत्न करत राहिलो आहे. आतला शांत आणि निश्चल आवाज ऐकण्याची थोडीबहुत क्षमता मी माझ्यात निर्माण केली आहे.)

हृदय शुद्ध असेल तरच देवाचा आणि देवत्वाचा आवाज आपल्याला ऐकू येतो, असे गांधीजी केवळ या अंकातच नाही, तर जन्मभर सांगत राहिले. त्यांचा हा विचार समजून घेतला की, त्यांच्या मार्गावर कसे चालायचे, याची गुरूकिल्ली आपल्या हाती लागते.

माणसाला जन्मभर अनेक पर्याय निवडत पुढे जावे लागते. ही निवडी प्रक्रिया बुद्धीवर अवलंबून असली, तरी प्रत्येक वेळी भावनांची पार्श्वभूमी उपस्थित असते. अशा वेळी नीट लक्ष दिले, तर आपल्याला जाणवते - आपले विचार आणि भावना या एकमेकांमध्ये गुंतलेल्या गोष्टी आहेत. दरवेळी, आपल्या बुद्धीला आपल्यातील दैवी भावना एक मार्ग सुचवत असतात आणि आणि आपल्या पशुत्वामधून जन्मलेल्या भावना दुसरा मार्ग सुचवत असतात. दैवी भावनांनी आपल्याला दिलेल्या सल्ल्याला गांधीजी ‘देवाचा आवाज’ किंवा ‘आतला आवाज’ म्हणत आहेत, असे निश्चितपणे म्हणता येते. या आतल्या आवाजाचे सल्ले ऐकत राहिलो की, देवाने आखून दिलेल्या दैवी कायद्याचा आदर करत आपण चालतो आहोत, असे म्हणता येते. 

पन्नास वर्षांच्या आपल्या चिंतनातून गांधीजी सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा विचार करत राहिले. मानवी जीवनात संपूर्णतेचा आणि साफल्याचा अनुभव कसा घेता येईल, याचा विचार करत राहिले. या चिंतनातून त्यांना आपल्यामधील ईश्वराचा आवाज सापडला, आपल्यामधील मानवतेचा आवाज सापडला. हा आवाज त्यांना मार्गदर्शन करत राहिला.

आपण जर गांधीजींच्या तत्त्वज्ञानाचे अर्थ समजून घेत राहिलो, तर ते आपला ‘आतला आवाज’ बनतील आणि आजच्या या विद्वेषाने ओतप्रोत भरलेल्या काळातसुद्धा आपल्याला मार्गदर्शन करतील, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

गांधीजींचा भर माणसातल्या देवत्वावर असला तरी माणसामधील पशुत्वाची ताकद विसरत नाहीत. या दृष्टीने हिंसेविषयीचे विचारसुद्धा ते आयुष्यभर मांडत राहिले. माणसामधील पशुत्वाच्या कसोटीच्या दगडावर आपले वैश्विक प्रेमाचे आणि अहिंसेचे तत्त्व परत परत घासून बघत राहिले.

आपल्या देवाच्या किंवा सत्याच्या कल्पनांपेक्षा गांधीजींच्या संकल्पना अतिशय विशाल आहेत आणि व्यामिश्रसुद्धा आहेत. गांधीजी समजून घेण्याच्या प्रयत्नाची ही केवळ सुरुवात आहे. परंतु इथे हा लेख थांबवायला हवा. पुढच्या लेखांमध्ये गांधीजी अहिंसेच्या तत्त्वाकडे कसे जातात आणि सत्याच्या शोधाकडे कसे जातात, हे पाहूया.

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......