ॲक्शन, ड्रामा, इमोशन असलेल्या आणि ‘लाईक’ हेच ‘टार्गेट’ असलेल्या दोन जाणीवपूर्वक रचलेल्या ‘असत्य’ हेरकथा
पडघम - देशकारण
रवि आमले
  • ‘चिकन नेक’ अर्थात सिलिगुडी कॉरिडॉर आणि टेरेन्स आर्व्हिल जॅक्सन
  • Sat , 01 November 2025
  • पडघम देशकारण चिकन नेक Chicken's Neck सिलिगुडी कॉरिडॉर Siliguri Corridor टेरेन्स आर्व्हिल जॅक्सन Terrence Arvelle Jackson

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

ही अशी कल्पनावृत्ते काही संपादकाची चूष म्हणून प्रसिद्ध केली जात नसतात. विविध हेतू असतात त्यामागे. एक हेतू हा अर्थातच ‘पीव्ही वृद्धी’चा. या अशा चमचमीत, सनसनाटी मथळ्यांच्या फोकनाड बातम्या द्यायच्या. लोक त्या वाचतात. संकेतस्थळाचे ‘पेजव्ह्यू’ वाढतात. त्यायोगे अर्थप्राप्ती होते. दुसरा महत्त्वाचा हेतू – ‘प्रोपगंडा’. मोदीजींची प्रत्यक्षाहून उत्कट अजैविक प्रतिमा तयार करणे हे त्याचे कार्य. पण त्यापलीकडे या प्रोपगंडाचे, या अशा फेकन्यूजचे प्रचंड सामाजिक आणि राजकीय दुष्परिणाम होत आहेत.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

हेरकथा युद्धकथांप्रमाणेच रंजक आणि रम्य असतात. त्यामुळेच त्या मोठ्या प्रमाणावर लिहिल्याही जातात. जॉन ल करे, ग्रॅहम ग्रीन, फ्रेडरिक फोर्सिथ, रॉबर्ट लडलम, इयान फ्लेमिंग, टॉम क्लॅन्सी हे या साहित्यप्रकारातील लोकप्रिय लेखक. आपल्याकडे - तुलना नाही पण - अमर भूषण, सय्यद हुसेन झैदी अशी काही नावे घेता येतील. गुप्तहेरकथा लिहिणे हे तसे अवघड काम. आंतरराष्ट्रीय राजकारण, समाजकारण, मानसशास्त्र, जागतिक इतिहास इथपासून गुप्तचर यंत्रणांची कार्यपद्धती आणि एकंदर स्पायक्राफ्टविषयीचे ज्ञान ही त्या लेखनाची पूर्वअट आहे.

ही अट आणि शर्त अर्थातच, खासकरून हिंदी चित्रपटांना लागू नाही. तेथे काहीही म्हणजे काहीही हेरपट म्हणून खपू शकते. पण आता आपल्याकडील लेखनक्षेत्रातही ही अट शिथिल झाल्याचे दिसत आहे. परिणामी अनेक पत्रकारूनारू या क्षेत्रात घुसले आहेत आणि त्यांनी एकाहून एक हेरकथा रचण्यास सुरुवात केलेली आहे. या कथा अर्थातच बातमी स्वरूपात येतात. त्यामुळे वाचकांचा गोंधळ होतो. त्यांस वाटते की, पत्रकारू बातमी म्हणून जी हेरकथा सांगतात, ती खरीच आहे. गेल्या आठ-दहा दिवसांत अशा दोन बातमी-कथा आपल्या प्रसारमाध्यमांनी प्रसवल्या आहेत.

या दोन्ही हेरकथा आहेत बांगला देशाशी संबंधित. त्यातील एक यूट्यूबवरून ‘गाजते’ आहे. ती आहे भारताच्या ‘चिकन नेक’विषयीची. तिचा सारांश असा की, भारताने ‘चिकन नेक’ म्हणजे ईशान्येकडील सिलिगुडी कॉरिडॉरची रुंदी २२ किलोमीटरवरून ६० किलोमीटर वाढवली. कशी, तर अर्थातच बांगला देश सीमेवरील भूमी आपण ताब्यात घेतली.

पाच दिवसांत ही गुप्त मोहीम राबवण्यात आली. त्यात सहभागी होती भारताची विशेष सेना आणि एक युवा गुप्तचर. ही मोहीम फार गुप्ततेने आणि चलाखीने आखली होती. त्यासाठी काय केले की, आपल्या साहसी सरकारने जगाचे लक्ष दुसरीकडे वळवले. तिकडे पाकिस्तान आणि अफगाणी तालिबानांत तणाव निर्माण झाला होता. आपण काय केले, तर तो तणाव किती भीषण आहे वगैरे अफवा पसरवली. त्यामुळे चीन आणि अमेरिकेचे लक्ष वळले तिकडे. आपण त्याचा फायदा घेतला.

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

.................................................................................................................................................................

ही आपली कूटनीती. पण चीनच्या उपग्रहांचे काय? ते तर पाहणार आपली गुप्त मोहीम. तेव्हा आपल्या एका युवा हॅकरने चीनचा उपग्रहच हॅक केला. त्यांना दिसेनासे झाले आणि तेवढ्यात आपण ही मोहीम उरकून घेतली. चिकन नेकची रुंदी वाढवली. हे ऑपरेशन संपलेले नाही. अजूनही ७० किमीवर चिकननेक नेणार आहेत. तर ही झाली भारताच्या गुप्त ऑपरेशनची ही कहाणी.

भारताने कसे चीनला, अमेरिकेला गंडवले. आपल्या सरकारने कशी कूटनीती वापरली. त्या कोणा ‘युवा जासूस’ने कसा चीनचा उपग्रह हॅक केला आणि सरते शेवटी आपण भारताचे ७५ वर्षांपासूनची डोकेदुखी कशी कमी केली, याची ही कहाणी ऐकल्यानंतर कोणाच्याही ‘राष्ट्रवादी देहा’वर सरसरून काटा आल्याशिवाय राहणार नाही. तसा तो आला असेल… आणि दोस्तों, भारतमाता के वीर जवानों के काम पर आपको गर्व है तो व्हिडिओ को लाईक करें. चॅनेल को सबस्क्राईब करें और घंटी के बटन को दबाना ना भूलें.

आता यात हे कोणीही विचारायचे नाही की, या यूट्यूबर चॅनेलवाल्या पत्रकारूला ही माहिती थेट राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभल यांनी दिली की, ‘रॉ’चे प्रमुख पराग जैन यांनी? ही मोहीम तर या पुढेही सुरू असणार आहे. मग तरीही तिची माहिती याने कोणत्या माहिती अधिकारात फोडली? अशी ताजी ताजी ‘ऑपरेशन्स’ अशा पावशेर पत्रकारूंपर्यंत येत असतील, तर हे येथील गुप्तचर यंत्रणांचे अपयश मानायचे की, या पत्रकारांना पुलित्झर द्यायचे?

पण ज्यास ‘बातमी’ म्हणतात तेथे हे सवाल विचारायचे असतात. ही तर हेरकथा आहे. व्हिडिओचे ‘लाईक’ आणि ‘घंटी’चे बटन हेच तिचे ‘टार्गेट’ आहे. अशीच एक दुसरी कथा. ती सांगण्यात येत आहे ‘ऑर्गनायझर’, ‘इंडिया डॉट कॉम’, केरळातील ‘मातृभूमी’ अशा प्रतिष्ठित वगैरे गणल्या जाणाऱ्या नियतकालिकांच्या संकेतस्थळांवरून. साधी कहाणी नाही ती. तिच्यात ॲक्शन आहे, ड्रामा आहे, इमोशन आहे. शिवाय मोदीजीही आहेत.

या हेरकथेला प्रारंभ होतो एका हत्याप्रकरणातून. तारीख ३१ ऑगस्ट. ढाक्यातील ‘द वेस्टिन हॉटेल’. सकाळची साफसफाई सुरू होती. ‘हाऊस किपिंग’ कर्मचारी एकेका खोलीत जाऊन साफसफाई करत होते. नेहमीच्या सराईतपणे एक कर्मचारी रुम नं. ८०८मध्ये गेला आणि आतील दृश्य पाहून त्याला घामच फुटला. आत बेडवर एका ५० वर्षीय कृष्णवर्णीय अमेरिकी व्यक्तीचा मृतदेह पडला होता. पूर्ण नग्नावस्थेत. तो कोणी साधासुधा नागरिक नव्हता. तो होता अमेरिकी लष्कराच्या ‘फर्स्ट स्पेशल फोर्सेस कमांड (एअरबोर्न)’चा कमांड इन्स्पेक्टर जनरल. त्याचे नाव टेरेन्स आर्व्हिल जॅक्सन. हॉटेल व्यवस्थापनाने ही बाब पोलिसांना कळवली. साडेबाराच्या सुमारास तेथे अमेरिकी दूतावासातले अधिकारी त्यांचे सुरक्षारक्षक आणि डॉक्टर यांच्यासह आले. सायंकाळी साडेसहाला त्यांनी जॅक्सनचा मृतदेह तेथून हलवला. 

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

भारत आणि रशियाच्या गुप्तचर संस्थांनी एकत्रितरीत्या कारवाई केली ती काय उगाच? पण ही कारवाई भारत-रशियाच्या गुप्तचरांनी केली हे कशावरून? मोदींच्या हत्येचा कट होता हे कशावरून? मोदी आणि पुतीन यांची कार-चर्चा या विषयावर झाली, हे कशावरून? तर याला काही आधार नाही. लेखकास वाटले; बस्स, हाच त्याचा आधार. या अशा कहाण्यांत, ‘सूत्रांच्या सांगण्यावरून’, ‘तज्ज्ञांच्या मते’ असे शब्द पेरले की, त्यास झक्क बातमीचा आकार येतो. त्या आपल्यासमोर परोसल्या जातात. आतापर्यंत ‘कळते-समजते’ स्वरूपाच्या बातम्या असत. आता हा नवा आविष्कार समोर आला आहे. त्यास ‘कल्पनावृत्त’ म्हणतात.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

यानंतर अशा प्रसंगांनंतर जे होते, तेच सुरू झाले. लपवाछपवी, उडवाउडवी. सांगण्यात येऊ लागले की, तो बांगलादेशात काही ‘बिझनेस’साठी आला होता. मग ‘फर्स्ट स्पेशल फोर्सेस कमांड’ने खुलासा केला, की, हा तो नव्हेच. म्हणजे हा जॅक्सन कोणी भलताच आहे. तो स्पेशल फोर्सेसचा अधिकारी नाही. पण संशयाला जागा होती.

सुरुवातीला सांगण्यात आले, की तो ‘बिझनेस’साठी बांगला देशात आला होता. नंतर उघड झाले की, तो ‘सरकारी कामा’साठी आला होता. हे काम कोणते, तर बांगला देशाच्या लष्करास प्रशिक्षण देण्याचे. लपवाछपवी करण्यात आली ती त्यामुळेच. अमेरिकेचे लोक बांगला देशातील एखाद्या सैन्यतुकडीला कमांडो प्रशिक्षण देतात, ही काही गाजावाजा करण्याची बाब नव्हे. पण तसेही बांगला सरकार, त्यांचे ते सत्तेवर येणे, त्यांचे अमेरिकेशी असलेले लागेबांधे हे लपून राहिलेले नाहीत. त्याची चर्चा होतच होती.

तर ही चर्चा, या बातम्या येत होत्या सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत. चंदिगढच्या ‘न्यूज एरिना इंडिया’ या संकेतस्थळावर त्याच्या दोन गंभीर ‘बातम्या’ देण्यात आल्या. पहिली २ सप्टेंबरला, दुसरी ७ सप्टेंबरला. त्याच वेळी अन्य काही दैनिकांनीही ही बातमी प्रसिद्ध केली होती.

मग तो पूर्ण महिना गेला. ऑक्टोबर संपत आला. आणि अचानक कोणा कथाकारू-पत्रकारूला यात सनसनाटी, थरारक हेरकहाणी दिसली. तो प्रतिभावंत कोण हे समजणे अवघड. पण ‘ऑर्गनायझर’ या संघपरिवाराच्या प्रियतम नियतकालिकाने २४ ऑक्टोबरला ती कथा प्रसिद्ध केली. अशा कथांची विशिष्ट शैली असते. भाषा निसरडी वापरायची. कुठे गुंतायचे नाही. संशयाची पेरणी करत जायचे. भिन्न भिन्न घटनांचे बादरायण संबंध जोडायचे. आणि वाचकासमोर आपल्याला हवे ते चित्र उभे करायचे. या चित्राचा आशय असा की, तो अधिकारी सीआयएसाठी काम करत होता. मोदींची हत्या करण्याचा त्यांचा कट होता, पण भारत आणि रशियाच्या गुप्तचर यंत्रणांनी त्यालाच ‘न्यूट्रलाइज’ केले.

आपणास वाटते की, मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्यांत वा निवडणूक वार्तापत्रांतच पत्रकार पतंगबाजी करत असतात, परंतु तसे नाही. पतंगबाजीस आता अवघे आकाश मोकळे आहे. हेरकथा हे त्यातील नवे आभाळ आहे. या हेरकथेच्या हेराफेरीतील कल्पनेच्या भराऱ्या पाहण्यासारख्या आहेत. मेला तो स्पेशल फोर्सेसचा अधिकारी होता. तो ढाक्यात लष्करास प्रशिक्षण देण्यासाठी आला होता. या मूळ घटनेवरचे नक्षीकाम लक्षणीय आहे.

या कथाकाराने कल्पना केली की, भारताच्या सीमेपासून ढाका काही फार दूर नाही. अशा ठिकाणी हा अधिकारी असतो म्हणजे यात निश्चितच झांगडगुत्ता आहे. मग त्यांनी ठरवले की, तो नक्कीच सीआयएचा अधिकारी असणार. तो मोदींची हत्या करण्यासाठी आला असणार. पण मग तो मेला कसा? तर भारत आणि रशियाच्या गुप्तचरांनी त्याला मारले. पण ते कसे? येथे कल्पनेचा पतंग छान भरारी घेतो. कहाणीकार सांगतो की, तो ३१ तारखेला मेला, त्याच दिवशी आपले पंतप्रधान होते चीनमध्ये. तेथे शांघाय सहकार्य संस्थेच्या शिखर परिषदेसाठी ते गेले होते. रशियाचे अध्यक्ष पुतीन हे मोदींचे दोस्त. त्यांनी चर्चेस जाताना मुद्दाम मोदींना आपल्या कारमध्ये घेतले. ४५ मिनिटे त्यांनी कारमध्ये चर्चा केली. त्या चर्चेत काय झाले कोणास ठावे? पण यातून कहाणी अशी ‘ऑर्गनाइझ’ केली आहे की, या चर्चेच्या दिवशीच तिकडे ढाक्यात त्या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला, म्हणजे त्यात काही तरी रहस्य असणार. असणार काय? आहेच.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

भारत आणि रशियाच्या गुप्तचर संस्थांनी एकत्रितरीत्या कारवाई केली ती काय उगाच? पण ही कारवाई भारत-रशियाच्या गुप्तचरांनी केली हे कशावरून? मोदींच्या हत्येचा कट होता हे कशावरून? मोदी आणि पुतीन यांची कार-चर्चा या विषयावर झाली, हे कशावरून? तर याला काही आधार नाही. लेखकास वाटले; बस्स, हाच त्याचा आधार. या अशा कहाण्यांत, ‘सूत्रांच्या सांगण्यावरून’, ‘तज्ज्ञांच्या मते’ असे शब्द पेरले की, त्यास झक्क बातमीचा आकार येतो. त्या आपल्यासमोर परोसल्या जातात. आतापर्यंत ‘कळते-समजते’ स्वरूपाच्या बातम्या असत. आता हा नवा आविष्कार समोर आला आहे. त्यास ‘कल्पनावृत्त’ म्हणतात.

ही अशी कल्पनावृत्ते काही संपादकाची चूष म्हणून प्रसिद्ध केली जात नसतात. विविध हेतू असतात त्यामागे. एक हेतू हा अर्थातच ‘पीव्ही वृद्धी’चा. या अशा चमचमीत, सनसनाटी मथळ्यांच्या फोकनाड बातम्या द्यायच्या. लोक त्या वाचतात. संकेतस्थळाचे ‘पेजव्ह्यू’ वाढतात. त्यायोगे अर्थप्राप्ती होते. दुसरा महत्त्वाचा हेतू – ‘प्रोपगंडा’. मोदीजींची प्रत्यक्षाहून उत्कट अजैविक प्रतिमा तयार करणे हे त्याचे कार्य.

पण त्यापलीकडे या प्रोपगंडाचे, या अशा फेकन्यूजचे प्रचंड सामाजिक आणि राजकीय दुष्परिणाम होत आहेत. शिवाय त्याने वाचकांची, प्रेक्षकांची वैयक्तिक हानीही होत आहे. कारण यातून खरे आणि खोटे यातील सीमारेषाच पुसली जात आहे. यातून मेंदूस बधीरत्व आणले जात आहे. वास्तवाशी असलेला मेंदूचा संबंध तोडला जात आहे. देशाविरोधातील खरा कट आहे तो हा!

.................................................................................................................................................................

लेखक रवि आमले ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांची ‘परकीय हात’ आणि ‘प्रोपगंडा’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.

ravi.amale@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

बिहारमधील एसआयआर : मतदार यादीची पडताळणी की मताधिकाराची पुनर्परीक्षा? महाराष्ट्रात चाललेल्या एसआयआर प्रक्रियेत हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चिला जाणे गरजेचे आहे

प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क प्रत्यक्षात बजावता यावा याची खात्री करणे, हे निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे कार्य आहे. त्यासाठी मतदार यादी हे एक साधन आहे. अंतिम उद्दिष्ट नाही. मृत व्यक्तींची नावे वगळणे आवश्यक आहे. दुबार नोंदी काढणे आवश्यक आहे. मतदार यादी अचूक ठेवणे आवश्यक आहे. या सर्व प्रक्रियांचा अंतिम हेतू मतदाराला मतदानापासून वंचित करणे, हा नसून त्याचा मतदानाचा हक्क सुरक्षित करणे हा असतो.......

प्रिय नरेंद्रभाई, तुम्ही जणू यादवी युद्ध लढत असल्यासारखे देश चालवत आहात! हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही भले कितीही लोकप्रिय असाल, पण तुम्ही संसदेला उत्तरदायी आहात

नेहरूंचे सगळे विरोधकही त्यांचा आदर करायचे. तुमच्या बाबतीतही पहिल्या दिवसापासून विरोधकांमध्ये चर्चा आहे. फक्त एवढाच ‘किरकोळ’ फरक आहे की, मोदी-चर्चेत ‘आदरा’ऐवजी ‘अविश्वास’ आणि ‘अनादर’ भरलेला असतो! नेहरूंवर जनता प्रेम करत होती, पण त्यांच्या पक्षातले राजकारणी त्यांना घाबरत असत. या बाबतीतही तुम्ही त्यांना मागे टाकलं आहे; तुमच्या पक्षातले लोक आणि जनता — दोघंही तुम्हाला घाबरतात!.......