भाषेच्या जीवनचक्राविषयीचे कुतूहल हे माणसाच्या काही महत्त्वाच्या कुतूहलांपैकी एक. ‘तळटीप’चा प्रयत्न ह्या कुतूहलाला भाषाआकलन, भाषाभ्यास आणि भाषानिरीक्षण यांच्याद्वारे न्याय देण्याचा आहे
पडघम - साहित्यिक
सलील वाघ
  • ‘तळटीप’च्या पहिल्या अंकाचे मुखपृष्ठ
  • Sun , 28 September 2025
  • पडघम साहित्यिक तळटीप Taltip

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा -  Pay Now

.................................................................................................................................................................

‘तळटीप’ या नव्याकोऱ्या नियतकालिकाचा नुकताच पहिला अंक प्रकाशित झालाय. त्यात संपादकांनी मांडलेली भूमिका...

.................................................................................................................................................................

जगू पाहणाऱ्या माणसाचा आरंभिक आणि अंतिम आधार ‘भाषा’ हा असतो. माणसाचे जे काही चैतन्यमय संचित असते, ते भाषेत साठलेले असते. भाषेचा आणि भाषा आकलनाचा पसारा हाताळणे सोपे नाही, याची नम्र जाणीव ठेवतच ‘तळटीप’चा उपक्रम सुरू केला आहे. भाषेची (विविध भाषांची) जडणघडण, तिचा विकास- विस्तार- लोप- पुनरुद्भव, भाषांचे आणि भाषाघटकांचे दुसऱ्या भाषांशी होणारे आदानप्रदान, त्यांचे प्रभाव आणि परिणाम, भूगोलात बंदिस्त असलेली भाषारूपे आणि भूगोलाबाहेरचे भाषासंकर अशा हजारो गोष्टींनी भरलेले, असे भाषेचे जीवनचक्र असते. भाषेच्या जीवनचक्राविषयीचे कुतूहल हे माणसाच्या काही महत्त्वाच्या कुतूहलांपैकी एक आहे. ‘तळटीप’चा प्रयत्न ह्या कुतूहलाला भाषाआकलन, भाषाभ्यास आणि भाषानिरीक्षण यांच्याद्वारे न्याय देण्याचा आहे.

ह्या प्रयत्नांचे स्वरूप एकमार्गी किंवा एकसाची राहिले तर त्यावर मर्यादा येऊ शकतील, म्हणून तळटीपेतले लेखन हे विद्याक्षेत्रीय मांडणीला अनुसरून ठेवण्याचे धोरण असले, तरी त्याला कडेकोट कोरड्या शिस्तीच्या जाचात ठेवले जाणार नाही. बौद्धिक खुलेपणा हा कोणत्याही वैचारिक संवादाचा आणि समृद्ध भाषिक संस्कृतीचा पाया आहे. त्यामुळे अरविंद भांडारी यांच्या उच्चारजिज्ञासेविषयीच्या लेखापासून सुरू झालेला तळटीपेतल्या लेखांचा प्रवास हा गोमळसिद्ध (टोपणनाव) यांच्या आडोक्तीपर लेखापर्यंत पोहोचतो.

हिंदी भाषा आणि तिच्या अतिक्रमणाने गेल्या काही वर्षांत घातलेल्या धुमाकुळामुळे आपले राजकीयच नव्हे, तर सामाजिक आणि कौटुंबिक जीवनही ढवळून निघाले. त्या सर्व पार्श्वभूमीवर चिन्मय धारूरकर, सुधीर देवरे, प्रकाश निर्मळ आणि विद्यागौरी टिळक यांचे लेख महत्त्वाचे आहेत. आलोक राय यांनी दोन दशकांपूर्वी लिहिलेल्या हिंदी भाषेच्या जीवनसंघर्षाचा प्रवास रेखाटणाऱ्या पुस्तकातल्या प्रतिपादनाचा परामर्श धारूरकर यांच्या लेखात आहे, तर ‘राष्ट्रभाषा हिंदी’ हे कसे ‘फेक नरेटिव्ह’ हिंदीभाषी दबावगटातून उदयाला आले आहे, याचा आढावा निर्मळ आणि देवरे यांच्या लेखात आहे.

.................................................................................................................................................................

|| अनुक्रम ||

लेख - मराठी ‘च, ज, झ’ ह्यांचे उच्चारण भेद - अरविंद भांडारी | राजकारणी संस्कृततज्ज्ञ : आचार्य रघु वीर, निर्मला कुलकर्णी | नाट्यशास्त्रातील काही भाषासंकल्पना  - सुनीला गोंधळेकर | मराठी व बंगाली दशपदी : तौलनिक अभ्यास - जयश्री पाटणकर | शब्दलेखन - कल्याण जोशी, मनोहर राजर्षि | भाषांतरानुभव : अलिकडे आणि पलिकडे; सुनंदा महाजन यांची मुलाखत - शर्मिष्ठा खेर | दोन टिपणे - विजया देव | मराठी : शासन व्यवहाराची आणि जनसामान्यांची - अनुराधा मोहनी | प्राच्य प्रज्ञावंतांच्या भाषिक जाणिवा - सरोजा भाटे | हिन्दी-मराठी वाद नाही, मुद्दा आहे! - सुधीर रा. देवरे | आलोक रायांचं ‘हिन्दी राष्ट्रवाद’ : निवडक मर्मदृष्टी - चिन्मय धारूरकर | वस्तुनिष्ठ जगाचे समर्थन (अॅलन सोकल यांची मुलाखत, पीटर क्रेको), भाषांतर : मिलिंद मालशे | चिनी लिपीत विदेशी विशेषनामे कशी लिहितात? - धनंजय वैद्य | संस्कृत-प्राकृत : एक टिपण - माधव देशपांडे | राष्ट्रभाषा आणि राजभाषा - प्रकाश निर्मळ | पहिलीपासून हिंदीचा अट्टाहास कशासाठी? - विद्यागौरी टिळक

लेखमाला - बौद्ध ग्रंथांचे तिबेटी अनुवाद - लता देवकर

पुस्तकांविषयी - मराठी-बांग्ला शब्दकोष परीक्षण - चैत्राली केळकर | धम्मपदाचा पद्यमय अनुवाद - दीपाली पाटील | अविभक्तं विभक्तेषु - पुस्तक परिचय - गजानन गुर्जरपाध्ये | साहित्यशैली : तत्त्वे आणि चिकित्सा - अशोक जोशी | जपानी- मराठी मूलभूत क्रियापद कोश - हरी दामले | Making of Ajanta : Ravindra Kulkarni - Deepak Kannal

ततळळ - सा.फु.पु.वि.तील येरबामातेचं जागृत स्थान - गोमळसिद्ध

.................................................................................................................................................................

ह्या विस्तारवादाचा पुढचा टप्पा शासकीय पातळीवरून होणाऱ्या हिंदीसक्तीच्या रूपाने आज आढळतो. त्याचा परामर्श विद्यागौरी टिळक यांच्या लेखात आहे. निर्मला कुलकर्णी यांचा लेख रघु वीरांच्या विराट कामाची झलक दाखवतो. रघु वीरा यांचे हिंदीच्या भाषाक्षेत्रीय अभ्यासात असलेले योगदान अनन्यसाधारण आहे. त्यांच्या कामाचा उपयोग मराठी कोशरचनाकारांनाही प्रतिशब्दनिर्मितीत झाल्याचे, पुढे अनुराधा मोहनी यांच्या लेखातून समजते. मराठीत सावरकरांकडून असे भरीव काम होऊ शकले असते का? आणि ते का झाले नसावे? असा एक प्रश्न रघु वीरांवरचा लेख वाचताना मनात तरळून जातो.

सुनंदा महाजन आणि अॅलन सोकल यांच्या मुलाखती अनुक्रमे, शर्मिष्ठा खेर आणि पीटर क्रेको (अनु. मिलिंद मालशे) यांनी घेतलेल्या आहेत. त्याचप्रमाणे नाट्यशास्त्रातल्या भाषासंकल्पनांवर आणि प्राच्य प्रज्ञावंतांच्या भाषिक जाणिवांवर अनुक्रमे सुनिला गोंधळेकर आणि सरोजा भाटे यांचे विस्तृत लेख आहेत. दशपदी हा काव्यप्रकार मराठीप्रमाणे बंगालीतही कसा हाताळला गेला आहे, याची रोचक माहिती जयश्री पाटणकरांच्या लेखातून मिळते.

आपले माध्यम जरी प्रामुख्याने मराठी असले तरी अन्य भाषांविषयीचे चिंतनही अंकात आणण्याचे तळटीपचे धोरण आहे. त्यामुळे धनंजय वैद्य यांचा चिनी लिपीतल्या विदेशी विशेषनामलेखनाविषयीचा लेख आवर्जून छापलेला आहे.

रवींद्र कुलकर्णी यांच्या अजंठा लेण्यांवरच्या पुस्तकाविषयी प्रसिद्ध शिल्पभाष्यकार दीपक कन्नल यांनी लिहिले आहे. शब्दलेखन ह्या मुद्रितशोधन- आज्ञावलीविषयी मनोहर राजर्षि यांचे मनोगत आहे. हरी दामले यांनी मराठी-जपानी मूलभूत क्रियापद कोशाचा परिचय करून दिला आहे. जवळपास दशकभराचा संशोधनकाळ पणाला लावून अपर्णा झा यांनी मराठी-बांग्ला शब्दकोश सिद्ध केला आहे. त्याचे चैत्राली केळकर यांनी केलेले परीक्षण (व इतरही पुस्तक परीक्षणे - दीपाली पाटील, अशोक जोशी, गजानन गुर्जरपाध्ये यांची) ह्या अंकात आहे. लता देवकर यांची, बौद्ध ग्रंथांच्या तिबेटी अनुवादांवरची लेखमाला ह्या अंकापासून सुरू होते आहे. तिचा प्राथमिक आराखडा त्यांनी अंकात दिला आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

हा अंक साकार करण्यासाठी आम्हाला अनेकांचे सहकार्य मिळाले. तळटीपेची कल्पना मांडल्यावर क्षणाचीही उसंत न लावता माधव देशपांडे सरांनी ह्या कल्पनेला अनुमोदन दिले. तसेच विजया देव, अरविंद भांडारी, चंद्रकांत पाटील, अशोक जोशी आणि निर्मला कुलकर्णी यांच्या बहुमोल सहकार्याचाही उल्लेख करायला हवा.

कालपरवापर्यंत (दशकभरापर्यंत) जगभरातल्या विचारीजनांपुढचे प्रश्न वेगळे होते आणि त्यांच्यापुढचे जगही वेगळे होते. जागतिकीकरण, उत्तरआधुनिकतावाद, नवमार्क्सवाद, सत्योत्तरवाद वगैरेंची सारी चर्चा आज फ़िजूल ठरते आहे. संवादवहनाच्या ओल्या दुष्काळामुळे व्यक्तीच्या अंगावर, एकामागोमाग एक, अनेक वांच्छित-अवांच्छित भाषाखंड, दृश्यखंड आणि ध्वनिखंड आदळण्याचा आणि वास्तवाचा अपलाप होण्याचा हा काळ आहे. ह्या अपलापकाळात, एकात्म भाषिक अनुभवाची उभारणी करणे, ही जवळपास जीवावरची जोखीम झाली आहे. भाषेची सलगता तुटण्याची अनुभूती आणि जीवाच्या आकांताने ती सांधण्याचे प्रयत्न, ह्या दोन टोकात माणसाची भाषाजाणीव हिंदोळते आहे. भरीस भर म्हणून हिंदी-संस्कृतच्या विस्तारवादामुळे हे दशक ‘निर्दय भाषासंहारा’चेही दशक ठरते आहे. ह्या सगळ्या समस्यांवरची उत्तरे आणि उपाय आपणच सगळ्यांनी मिळून शोधायचे आहेत.

taltipfootnote@gmail.com

.................................................................................................................................................................

‘तळटीप’ (खंड एक) : संपादक – सलील वाघ | १५ ऑगस्ट २०२५ | पाने – २०८ | मूल्य – ४०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

बिहारमधील एसआयआर : मतदार यादीची पडताळणी की मताधिकाराची पुनर्परीक्षा? महाराष्ट्रात चाललेल्या एसआयआर प्रक्रियेत हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चिला जाणे गरजेचे आहे

प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क प्रत्यक्षात बजावता यावा याची खात्री करणे, हे निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे कार्य आहे. त्यासाठी मतदार यादी हे एक साधन आहे. अंतिम उद्दिष्ट नाही. मृत व्यक्तींची नावे वगळणे आवश्यक आहे. दुबार नोंदी काढणे आवश्यक आहे. मतदार यादी अचूक ठेवणे आवश्यक आहे. या सर्व प्रक्रियांचा अंतिम हेतू मतदाराला मतदानापासून वंचित करणे, हा नसून त्याचा मतदानाचा हक्क सुरक्षित करणे हा असतो.......

प्रिय नरेंद्रभाई, तुम्ही जणू यादवी युद्ध लढत असल्यासारखे देश चालवत आहात! हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही भले कितीही लोकप्रिय असाल, पण तुम्ही संसदेला उत्तरदायी आहात

नेहरूंचे सगळे विरोधकही त्यांचा आदर करायचे. तुमच्या बाबतीतही पहिल्या दिवसापासून विरोधकांमध्ये चर्चा आहे. फक्त एवढाच ‘किरकोळ’ फरक आहे की, मोदी-चर्चेत ‘आदरा’ऐवजी ‘अविश्वास’ आणि ‘अनादर’ भरलेला असतो! नेहरूंवर जनता प्रेम करत होती, पण त्यांच्या पक्षातले राजकारणी त्यांना घाबरत असत. या बाबतीतही तुम्ही त्यांना मागे टाकलं आहे; तुमच्या पक्षातले लोक आणि जनता — दोघंही तुम्हाला घाबरतात!.......