तथाकथित श्वानप्रेमींना न्यायालयाने दिलासा दिला खरा, पण समस्येचं काय? त्याबाबत आपण कधी विचार करणार की नाही?
पडघम - देशकारण
आ. श्री. केतकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 13 September 2025
  • पडघम देशकारण कुत्रा Dog भटकी कुत्री Pariah Dogs

‘भटक्या, मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याने अनेक जण जखमी’

‘एका लहान मुलाचा भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे मृत्यू’

‘पिसाळलेल्या कुत्र्याने अनेक जणांचा चावा घेतला’ 

अशा प्रकारच्या बातम्या वर्तमानपत्रांत दर एक-दोन दिवसांनी वाचायला मिळतात.

कुत्रा हा माणसाचा सर्वांत जुना मित्र-प्राणी आहे, असं म्हणतात. माणसानं त्याला ‘माणसाळवलं’ आहे, हे खरं आहे. अनेकांना कुत्र्यांचं प्रेम असतं. ते त्यांना पाळतात आणि व्यवस्थित संगोपनही करतात. वेळोवेळी त्यांचं लसीकरण करून घेतात. त्यामुळे त्यांचा कुत्रा चुकून कधी कुणाला चावला, तर ‘रेबीज’ या जीवघेण्या भयानक रोगाची लागण होत नाही. हे लोक रस्त्यावरही आपल्या कुत्र्यांना गळ्यात पट्टा बांधून फिरायला नेतात. अशी कुत्री मालकांच्या आज्ञेत असतात. त्यांच्या वाटेला कोणी गेलं, तरच ती चावतात.

कुत्रा पूर्णपणे ‘माणसाळलेला’ले प्राणी झाला असला, तरी त्याला आपलं म्हणजे माणसांचं खाणं देणं योग्य नाही, हे श्वानप्रेमींना माहीत असतं. ते कुत्र्यांसाठी खास बनवलेलं किंवा तयार मिळणारं अन्नच देतात. मात्र हे ध्यानात न घेता तथाकथित श्वानप्रेमींना ‘पाव, बिस्किटे वगैरे पदार्थ हे कुत्र्यांचं नैसर्गिक खाणं नाही. या पदार्थांमुळे त्यांना त्रास होतो, पोटाचा आजार होतो, असं कितीही सांगितलं तरीही त्याकडे दुर्लक्ष करून ते कुत्र्यांना माणसांचंच अन्न देतात.

असं केल्यानं आपल्याला पुण्य मिळणार अशी त्यांची (धार्मिक संस्कारांनी घडवलेली) मनोधारणा असते. त्यांचं हे श्वानप्रेम त्यांच्या घरापर्यंत मात्र कधी येत नाही. बाहेर काहीही केलं तरी चालतं, अशी त्यांची समजूत असावी. कदाचित घरच्यांनाही ते आवडत असावं. मात्र कुत्रा पाळला, तर त्याची करावी लागणारी उस्तवार त्यांना नकोशी वाटत असते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

उलट या कुत्र्यांच्या वेळी-अवेळी जोरजोरात भुंकण्याने वा रडण्याओरडण्याने, (त्यांचं रडणं तर अगदी भेसूर भीती निर्माण करणारं असतं) ज्यांच्यावर निद्रानाश होण्याची वेळ आली आहे, शांत झोप लागलेली असताना या भयानक मोठ्या आवाजानं ज्यांची झोपमोड झाली आहे, कुत्र्यांच्या चावे घेण्यामुळे ‘रेबीज’च्या भीतीपोटी ज्यांना महागडी इंजेक्शनं घ्यावी लागली आहेत, (आणि ती इंजेक्शन न मिळाल्यानं काहींना मृत्यूही आला आहे), त्यांच्याकडे मात्र हे श्वानप्रेमी सहृदयतेनं पाहत नाहीत.

आणि जे कुणी कुत्र्यांना हाकलण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावरच डाफरतात. प्रसंगी मारहाणही करतात. अनेकांना हा अनुभव आला असेल. म्हणजे यांना श्वानप्रेम असतं, पण माणसांचं मात्र काहीही होवो, त्याची त्यांना फिकीर अजिबात नसते.

अखेर या श्वानपीडितांना न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागला. त्याची दखल घेत भटक्या कुत्र्यांना एका ठिकाणी बंदिस्त करावं, असा न्यायालयानं काही दिवसांपूर्वी आदेश दिला. पण त्यानंतर काही अभ्यासकांनी अनेक कुत्र्यांना एकत्र ठेवल्यामुळे त्यांना रोगांची लागण होऊ शकते. असं केलं तर काही काळात त्या बंदिखान्याच्या आसपास फिरकणंही अवघड होईल, असं शास्त्रीय आधारानं सांगितलं. म्हणजे ‘रोगापेक्षा औषध भयानक’ अशी स्थिती व्हायची.

त्यानंतर लगेचच न्यायालयानं सुधारित आदेश काढून सांगितलं की, अशा प्राण्यांचं लसीकरण करण्यात यावं आणि त्यांचं निर्बिजीकरण करण्यात येऊन, त्यांना पुन्हा त्यांच्या नेहमीच्या भागात सोडण्यात यावं. या तोडग्यामुळे कथित श्वानप्रेमी संतुष्ट झाले असणार. आपला विजय झाला, असं त्यांना वाटलं असावं.

पण न्यायालयाच्या सुधारित आदेशाचा विचार करून ते आपलं आचरण ठेवतील का, हा खरा प्रश्न आहे. कारण न्यायालयाने भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर खायला घालू नये, त्यासाठी ‘एक ठिकाण निश्चित करण्यात यावं आणि तिथंच खाणं देण्यात यावं’ असं म्हटलं आहे. श्वानप्रेमींनी हा आदेश प्रमाण मानून त्याप्रमाणे वागायचं ठरवलं, तर त्याचा काही प्रमाणात तरी उपयोग होण्यासारखा आहे. कारण रस्त्यांवर झुंडीनं हिंडणारी कुत्री बराच काही काळापुरती तरी दिसणार नाहीत, त्यामुळे तेवढा काळ लोक तेथून न भिता जाऊ शकतील.

मात्र न्यायालयाच्या आदेशामुळे मूळ प्रश्न बाजूलाच राहतो. तक्रार होती ती भटक्या कुत्र्यांनी मुला-माणसांना चावण्याची आणि पाठलाग करून दुचाकीस्वारांना चावण्याची वा त्यांच्या अंगावर येण्याची, ज्यामुळे अपघात होतात आणि रेबीजची लागण होण्याच्या भीतीनं इंजेक्शनं घ्यावी लागण्याची. कुत्र्यांच्या वेळी-अवेळी मोठमोठ्यानं रडण्या-ओरडण्याची, त्यामुळे झोपमोड होण्याची, निद्रानाशाचा विकार जडण्याची. या बाबींकडे न्यायालयानं लक्ष दिलेलं दिसत नाही.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

श्वानप्रेमींना कुत्र्यांचं ओरडणं कदाचित गोड, मधुर वाटतही असेल; पण सामान्य लोक, लहान मुलं, वयोवृद्ध आणि दुखणेकरी यांच्यासाठी ते बऱ्याचदा खूप त्रासदायक ठरतं. आवाज बंद होईतोवर ते बेचैन असतात. त्यांना स्वस्थ झोप येत नाही.

भटक्या कुत्र्यांचं निर्बिजीकरण करणं, त्यांना अँटि-रेबीजचं इंजेक्शन देणं आणि पुन्हा आधीच्या जागीच सोडून देणं, याचा थोडाफार उपयोग होईल. पण मूळ प्रश्न सुटेल का? कुत्र्यांचा मूळचा स्वभाव चावे घेण्याचा आहे, मग ती पिसाळलेली असोत वा त्यांचे निर्बिजीकरण झालेली. ती योग्य सावज हेरून कुणाला ना कुणाला चावणारच.

अगदी लहान मुलं प्रतिकार करू शकत नाहीत, एवढं कुत्र्यांना माहीत झालेलं असतं. त्यामुळेच ते लहान मुलांवर हल्ले चढवतात. त्यांना काही न्यायालयाचा आदेश वाचता येत नाही. रस्त्यावरून वेगानं जाणाऱ्या वाहनांचा, खास करून दुचाकीस्वारांचा सुगावा लागला रे लागला की, कुत्र्यांचा तांडा वेगानं, जोरजोरात भुंकत जाऊन त्याचा पाठलाग करणारी कुत्री आपण अनेकदा पाहतो. अशी भटकी कुत्री मागे लागली की, दुचाकीस्वार घाबरून वेग वाढवतात आणि अपघाताला निमंत्रण देतात. अशा अपघातांची उदाहरणंही आपल्यापैकी अनेकांना माहीत असतीलच.

त्याबाबत आपण कधी विचार करणार की नाही?

.................................................................................................................................................................

लेखक आ. श्री. केतकर ज्येष्ठ पत्रकार आहेत.

aashriketkar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

बिहारमधील एसआयआर : मतदार यादीची पडताळणी की मताधिकाराची पुनर्परीक्षा? महाराष्ट्रात चाललेल्या एसआयआर प्रक्रियेत हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चिला जाणे गरजेचे आहे

प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क प्रत्यक्षात बजावता यावा याची खात्री करणे, हे निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे कार्य आहे. त्यासाठी मतदार यादी हे एक साधन आहे. अंतिम उद्दिष्ट नाही. मृत व्यक्तींची नावे वगळणे आवश्यक आहे. दुबार नोंदी काढणे आवश्यक आहे. मतदार यादी अचूक ठेवणे आवश्यक आहे. या सर्व प्रक्रियांचा अंतिम हेतू मतदाराला मतदानापासून वंचित करणे, हा नसून त्याचा मतदानाचा हक्क सुरक्षित करणे हा असतो.......

प्रिय नरेंद्रभाई, तुम्ही जणू यादवी युद्ध लढत असल्यासारखे देश चालवत आहात! हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही भले कितीही लोकप्रिय असाल, पण तुम्ही संसदेला उत्तरदायी आहात

नेहरूंचे सगळे विरोधकही त्यांचा आदर करायचे. तुमच्या बाबतीतही पहिल्या दिवसापासून विरोधकांमध्ये चर्चा आहे. फक्त एवढाच ‘किरकोळ’ फरक आहे की, मोदी-चर्चेत ‘आदरा’ऐवजी ‘अविश्वास’ आणि ‘अनादर’ भरलेला असतो! नेहरूंवर जनता प्रेम करत होती, पण त्यांच्या पक्षातले राजकारणी त्यांना घाबरत असत. या बाबतीतही तुम्ही त्यांना मागे टाकलं आहे; तुमच्या पक्षातले लोक आणि जनता — दोघंही तुम्हाला घाबरतात!.......

दादा, विद्यापीठांनी काय केले हा प्रश्न योग्य आहे; पण विद्यापीठांना काम करण्यासाठी आवश्यक असलेले वातावरण निर्माण करण्यात सरकार कितपत यशस्वी झाले, याचाही हिशेब कधीतरी मांडावा लागेल

इतिहास विद्यापीठांना त्यांच्या संशोधनासाठी लक्षात ठेवेल; पण सरकारांना त्यांच्या प्राधान्यक्रमांसाठी. विद्यापीठांच्या कामगिरीचे मूल्यमापन होईलच; परंतु त्या कामगिरीसाठी आवश्यक असलेली जमीन तयार करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांच्याही भूमिकेचे मूल्यमापन तितक्याच कठोरपणे होईल. आत्मपरीक्षणाची सुरुवात तिथून झाली, तर कदाचित महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाच्या नव्या पर्वाचीही सुरुवात तिथूनच होईल.......