अजूनकाही
बदमाश आणि अशिक्षित नेते जनतेला फसवून अनेक वर्षे कसे राज्य करू शकतात, हे आपण लेखांच्या या लेखमालिकेमध्ये पाहत आहोत. गेल्या दोन लेखांमध्ये आपण बदमाश आणि अशिक्षित लोक राजकारणात यशस्वी का होतात, याचा विचार केला. पहिल्यात आपण इटालियन चाणक्य मॅकिआव्हेलीचे या विषयावरचे विचार बघितले. दुसऱ्यात राजकारणी भीती आणि आदर्शवाद वापरून जनतेला कसे फसवतात हे पाहिले. जनता का फसते, या मागची मानसिक आणि शरीरशास्त्रीय कारणेसुद्धा आपण दुसऱ्या भागात बघितली. आता या तिसऱ्यात हे बदमाश नेते आपल्या समर्थकांच्या झुंडी कसे तयार करतात आणि ते भक्तांच्या अशा झुंडी का तयार करू शकतात, हे पाहूया.
मॅकिआव्हेलीच्या म्हणण्यानुसार आपल्या नेत्याविषयी मत बनवताना लोक आपल्या डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवतात. तो वागतो कसा हे प्रजा बघत नाही. ‘दिसते तसे नसते’ ही साधी म्हण प्रजा विसरून जाते. आधुनिक मानसशास्त्रात याला ‘हेलो इफेक्ट’ म्हणतात. एडवर्ड थॉर्नडाइक या शास्त्रज्ञाने ‘हेलो इफेक्ट’ हा शब्द तयार केला आहे. ‘हेलो’ म्हणजे ‘संत’ किंवा ‘देवांच्या मस्तकाभोवती दिसणारे चक्र’.
‘हेलो इफेक्ट ’मध्ये एखादा नेता आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी आपल्याला आवडला, तर तो बाकी सगळ्या गोष्टींमध्येसुद्धा भारी असणार असे आपण गृहित धरतो. हिटलर अत्यंत प्रभावी वक्ता होता. त्यामुळे तो प्रज्ञावंत, कार्यक्षम, तत्त्वज्ञानी आणि देशभक्त असणार अशी गृहितके जर्मन-भक्तांनी आपल्या मनात भरून घेतली. हिटलर हा एक अत्यंत सत्तापिपासू माणूस आहे आणि त्याला कुठल्याही परिस्थितीत आपले नाव इतिहासामध्ये कोरून ठेवायचे आहे, या दोन गोष्टी हिटलरच्या जर्मन-भक्तांच्या लक्षातच आल्या नाहीत.
तीच गोष्ट मुसोलिनीची, तीच गोष्ट माओची आणि तीच गोष्ट आपल्याला आज जगामध्ये दिसणाऱ्या अनेक नेत्यांची. इतिहासामध्ये आपली कीर्ती व्हावी म्हणून हे लोक आपल्या देशाला आणि प्रजेला नको नको त्या धोक्यात टाकत राहतात.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
प्रजेला आपल्या नेत्याविषयी सतत विस्मय वाटत राहिला पाहिजे, असे मॅकिआव्हेली सांगतो. एडवर्ड थॉर्नडाइकच्या ‘हेलो इफेक्ट’मुळे जनतेला असा विस्मय सतत वाटत राहतो. त्यासाठी नेत्याला फारसे काही करायचे नसते. त्याला फक्त सतत जनतेसमोर राहायचे असते. जिथे तिथे आपल्या नेत्याचे अस्तित्व जनतेला दिसत राहिले पाहिजे. त्यामुळे हे बदमाश नेते सतत देशभर स्वतःची छायाचित्रे कशी दिसत राहतील हे बघत असतात.
आपली छान छान छायाचित्रे जनतेसमोर कसे येत राहतील, एवढेच हिटलर बघत असे! हाइनरिश हॉफमन हा हिटलरचा वैयक्तिक छायाचित्रकार होता. १९२१पासून हिटलरच्या मृत्यूपर्यंत तो या पदावर होता. सतत छायाचित्रे काढत राहणे आणि ती जर्मनीभर प्रसारित करत राहणे, हे त्याचे काम होते. पोस्टांचे स्टॅम्प्स, पोस्टकार्ड, पुस्तके, देशभरामधील पोस्टर्स अशा सगळ्या ठिकाणी हिटलरची छायाचित्रे या काळात वापरली गेली. देशातल्या प्रत्येक चौकात हिटलर आणि मुसोलिनी यांची छायाचित्रे लावलेली असत. थोडक्यात, असा नेता आपल्या देशाच्या इतिहासात कधीच झाला नाही आणि पुन्हा होणे नाही अशी हवा तयार केली गेली.
हिटलरची एक ताकदवान, प्रज्ञावान, तत्त्वचिंतक, देशभक्त, शिस्तबद्ध असलेला, सामान्य माणसाविषयी कणव असलेला, प्राण्यांवर प्रेम करणारा नेता अशी प्रतिमा तयार केली गेली. गंमत म्हणजे हिटलर यातले काहीच नव्हता. या नेत्यापुढे या जगामधील सगळे तुच्छ, हा नेता कधीच चुकू शकत नाही, अशी हवा तयार केली गेली. लेनी रिफेनश्थाल नावाचा सिनेछायाचित्रकारसुद्धा हिटलरच्या तैनातीत होता. तो हिटलरवर फिल्म्स बनवत असे!
जवळ जवळ सगळे हुकूमशाही वृत्तीचे नेते सैन्याच्या गणवेशामध्ये स्वतःला सादर करताना दिसतात. आपण सैन्याचे मुख्य आहोत, म्हणजेच आपण अत्यंत शूर आणि ताकदवान आहोत, हे या बदमाश नेत्यांना जनतेच्या मनावर बिंबवायचे असते. सैन्याविषयी लोकांना आदर असतो. त्या आदरावर या लोकांना डल्ला मारायचा असतो. या शिवाय गणवेशाबद्दल सामान्य लोकांना भीती वाटते. याचा फायदा घेऊन आपल्याविषयी देशात भीती पसरवायचा या नेत्यांचा उद्देश असतो. हिटलर, मुसोलिनी, स्टॅलिन, पिनोशे, गद्दाफी, ईदी अमीन असे अनेक हुकूमशहा सैन्याचा गणवेश घालत. आजही अनेक नेते संधी मिळेल तेव्हा असे गणवेश घालून स्वतःची छायाचित्रे देशभर लावताना दिसतात.
‘हेलो इफेक्ट’ या प्रकाराचा बदमाश नेते पूर्ण फायदा उठवतात. आपल्या व्यक्तिमत्त्वाभोवतीचे तेजाचे चक्र कसे वाढत राहील, एवढेच हे नेते सतत बघत राहतात. ‘नियती मला मार्गदर्शन करते आहे’, ‘सर्वशक्तिमान परमात्म्याची इच्छाशक्ती माझ्यामधून कार्य करते आहे’, अशी अनेक वाक्ये हिटलर बोलत असे. ‘मला देवाचे संरक्षण आहे’, ‘मला देवाचे मार्गदर्शन लाभलेले आहे. त्यामुळे मी कधीच चुकत नाही’, अशी बडबड मुसोलिनी करत असे. आजसुद्धा अनेक नेते अशा अचाट गोष्टी आपल्या प्रजेला सांगताना आपल्याला दिसतील. ‘हेलो इफेक्ट’ वाढवत राहणे एवढीच बदमाशी या मागे असते. भोळ्याभाबड्या भक्तांना मात्र हिटलर आणि मुसोलिनी यांना खरंच देवाचे आशीर्वाद प्राप्त झालेले नेते आहेत, असे वाटत राहिले.
अगदी डोनाल्ड ट्रम्पसुद्धा ‘I am the chosen one’ असं सांगताना दिसतात. आपल्या ख्रिश्चन भक्तांना ट्रम्प सांगतात की, अमेरिकेला पुन्हा एकदा ग्रेट बनवण्यासाठी देवाने माझी निवड केली आहे. यात गंमत अशी असते की, हा श्रद्धेचा भाग असल्यामुळे हे नेते किंवा या नेत्यांमुळे सगळा देश गोत्यात आल्याशिवाय ‘हे दैवी नाहीत’ हा विचार या नेत्यांच्या भक्तांच्या मनाला शिवत नाही.
हिटलर आणि मुसोलिनी दुसऱ्या महायुद्धात पराभूत झाले, दोघांचेही मृतदेह रस्त्यावर पडलेले लोकांनी पाहिले. त्या नंतरच त्यांच्या भक्तांचे डोळे उघडले. या घटनांनंतर मात्र ‘या दोघांवर देवाची मर्जी आहे’ असे त्यांच्या भक्तांना बोलता येणे अशक्य झाले. या दोघांनी आपल्याभोवती तयार केलेला ‘हेलो इफेक्ट’ भंग पावायला दुसरे महायुद्ध व्हावे लागले आणि या जगामधील पाच कोटी लोकांचे बळी जावे लागले!
गंमत अशी की, हिटलर आणि मुसोलिनी यांच्यामुळे काय झाले हे माहीत असूनही, आज काही नेते त्यांच्याच ‘नीती’ वापरून जनतेला फसवण्याच्या मागे असलेले आपण बघत आहोत, अगदी जगभर बघत आहोत.
‘हेलो इफेक्ट’ आणि ‘प्रचारतंत्र’ यांच्या मिश्रणामधून जर्मनी आणि इटलीमध्ये भक्तांच्या झुंडी तयार केल्या गेल्या. झुंडींचे एक मानसशास्त्र असते. काहीही झाले तरी आपण सदस्य असलेल्या झुंडीशी भक्तलोक एकनिष्ठ राहतात. मग आपल्या झुंडीशी प्रामाणिक राहताना बुद्धी, न्याय, नीतिमत्ता आणि मानवता या सगळ्याला सोडचिठ्ठी द्यावी लागली तरी त्यांना चालते.
म्हणूनच मॅकिआव्हेली म्हणतो की, हे बदमाश नेते समाजात विविध गट तयार करतात आणि ते आपल्याशी एकनिष्ठ कसे राहतील, हे बघतात. या गटांतले लोकसुद्धा आपण एकटे पडू या भीतीने काहीही झाले तरी गट सोडत नाहीत. आपल्या मनाला गटामध्ये चाललेल्या गोष्टी कितीही आवडल्या नाहीत तरी तो सोडत नाहीत. आजकाल सोशल मीडियामुळे झुंडी तयार करणे आणि लोकांना झुंडींच्या भीतीच्या प्रभावाखाली आणणे सोपे झाले आहे.
भक्तांच्या झुंडी तयार व्हायचे अजून एक मानसशास्त्रीय कारण आहे. त्याला ‘भावनिक संसर्ग’ (‘इमोशनल कंटॅजिअन’) हे नाव आहे. आपल्या नेत्याच्या भावना त्याच्या भाषणांमधून, फिल्म्समधून आणि छायाचित्रांमधून लोकांपर्यंत पोहोचत असतात. या भावनांचे ‘प्रतिबिंब’ समाजात पडत असते, असे एलेन हॅटफील्ड या संशोधिकेने १९९३ साली आपल्या संशोधनातून दाखवून दिले. नेता आपल्या भावना व्यक्त करत राहतो आणि त्याच्या या नाटकी भावनांना प्रचार तंत्रांची जोड देऊन पाहिजे त्या भावनांची ‘साथ’ देशात पसरवली जाते. अशा नेत्यांचे बोलणे, हावभाव, शब्दसंपदा सगळे नाटकी असते. आक्रस्ताळेपणा आणि नाटकीपणा त्यांच्या भाषणात ओतप्रोत भरलेला असतो.
या व्यतिरिक्त, माणसाच्या मेंदूत ‘मिरर’ न्यूरॉन्स असतात. एखादी भावना दुसऱ्या माणसाकडून व्यक्त झालेली बघितली की, हे न्यूरॉन्स तीच भावना बघणाऱ्याच्या मनामध्ये तयार करतात. भावनांची साथ देशभर फैलावण्यासाठी हे ‘मिरर न्यूरॉन्स’ कसे कारणीभूत ठरतात, असे संशोधन जिआकोमो रिझोलाटी आणि लैला क्रेगहीरो यांनी २००४ साली केले आहे.
सिगाल बारसाड या संशोधिकेने दाखवून दिले आहे की, एखादा बदमाश नेता आपल्याला पाहिजे तशी उत्साहाची किंवा क्रोधाची लाट देशामध्ये उठवू शकतो. यासाठी तो विद्वान असायला लागतो असे काही नसते. त्यांनी याला ‘रिपल इफेक्ट’ असे नाव दिले. एखाद्या तळ्यामध्ये दगड टाकल्यावर जशा लाटा उठतात आणि पसरत जातात, त्याप्रमाणे एका माणसाच्या भावनांच्या लाटा त्या त्या गटामध्ये उठतात आणि पसरत जातात. डॅनियल कान्हेमनने दाखवून दिले आहे की, देश तणावाखाली असताना अशा साथीच्या लाटा प्रचंड प्रमाणात उठत असतात.
म्हणूनच देशात सतत खरा-खोटा तणाव कसा तयार होत राहील हे बदमाश नेते बघत असतात, असे मॅकिआव्हेली म्हणतो. असे नेते सत्तेवर असले की, देशावर एकामागून एक खऱ्याखोट्या संकटांच्या लाटा येत राहतात. त्याचबरोबरच भीती आणि क्रोधाची वादळे घोंघावतात. त्यातून या ‘ताकदवान’ नेत्याच्या अपरिहार्यतेची गरज जनतेच्या मनावर बिंबवली जाते. भक्तांच्या झुंडी यात मोठी भूमिका निभावतात.
हेन्री टाजफेल आणि जॉन टर्नर यांनी दाखवून दिले आहे की, लोकांना एका बाजूला झुकवायचे असेल तर फार काही करावे लागत नाही. त्यांना फक्त एखाद्या गटाचा भाग बनवायचे. लवकरच त्या गटाचे जे मत असते, त्याविषयी त्या लोकांच्या मनात सहानुभूती तयार होते. ‘बायस’ तयार होतो. हळूहळू ग्रूपचे जे मत असेल ते मत नवीन सदस्य आपली बुद्धी बाजूला ठेवून स्वीकारतात. कुठल्याही गटामध्ये आक्रमक आणि अतिरेकी स्वभावाचे लोक असतातच. त्यांच्यामुळे त्या गटातले इतर लोक या मतांच्या आहारी जातात. आपण गटामध्ये एकटे पडू या भीतीने हळूहळू सगळा गट या आक्रमक मूर्खांच्या मागे जातो. मूर्ख लोक गट नियंत्रित करून ‘सेल्फ-एस्टीम’चा म्हणजे ‘आत्माभिमाना’चा आनंद मिळवतात.
सामान्य लोक आपल्या गटाच्या दबावाखाली अनेक गोष्टी - अगदी चुकीच्या गोष्टीसुद्धा - स्वीकारतात, हे सॉलोमन अॅशने १९५० साली दाखवून दिले. याला ‘सॉलोमन अॅश कन्फॉर्मिटी एक्सपेरिमेंट’ म्हणतात. ‘गटाचे मत ते आपले मत’ असा सगळा खाक्या असतो. याचा फायदा घेऊन आधुनिक काळात अनेक राजकीय पक्ष ‘इन्फर्मेशन अँड टेक्नॉलॉजी सेल्स’ बनवताना दिसतात. बोली भाषेत आपण यांना ‘आयटी सेल्स’ म्हणतो. त्यानंतर फेसबुक आणि व्हॉट्सअॅप्चे लाखो ग्रुप्स तयार करून आयटी सेलने तयार केलेले हजारो खरेखोटे मेसेजेस राजकीय पक्ष पसरवत राहतात.
कुठल्याही गटामध्ये विचार न करता मत बनवणारे उथळ लोक संख्येने जास्त असतात. त्यांना जे ‘भरवले’ केले जाईल, तशी त्यांची ‘मते’ तयार होतात. हे लोक अधिक्याने असल्याने गट बहकतो. अनेक ‘न्यूट्रल मेंबर्स’ गटाचे जे मत असेल, तेच आपले मत असे ठरवून टाकतात.
गटाच्या दबाबाखाली माणूस ज्याप्रमाणे अत्यंत चुकीच्या गोष्टी स्वीकारतो, त्याचप्रमाणे आपल्या प्रभावी नेत्याच्या प्रभावाखालीसुद्धा. स्टॅन्ली मिलिग्रॅमच्या प्रयोगाचे नाव होते ‘ओबिडियन्स एक्पेरिमेंट’ (‘आज्ञाधारकतेचा प्रयोग’). यात भाग घेणाऱ्या व्यक्तीने स्वतंत्रपणे विचार केला की, तिला एक छोटा शॉक बसत असे. हळूहळू या प्रयोगातले लोक, आपला स्वतःचा विचार करणे बंद करून त्यांच्या कळत-नकळत आज्ञाधारक बनत गेले.
याच धर्तीवर हुकूमशाही प्रवृत्तीच्या नेत्यावर टीका केली की, टीकाकारावरच हल्ले केले जातात. स्टॅन्ली मिलिग्रॅमने शॉक देऊन अप्रिय अनुभव तयार केला आणि प्रयोगात भाग घेणाऱ्या लोकांच्या मनावर आज्ञाधारकता बिंबवली. याचा परिणाम म्हणून समाजातील खूप सारे लोक ‘प्रभावी’ नेत्यावर टीका न करता ‘आज्ञाधारक’ बनत जातात.
अजून एक म्हणजे गटाला सारासार विचार नको असतो, त्यामुळे विरोध करणाऱ्या सदस्याला वाळीत टाकले जाते. याला मानसशास्त्रज्ञ ‘ग्रूपथिंक’ असे नाव देतात. साध्या भाषेत याला ‘वैचारिक हुल्लडबाजी’ म्हणतात. बहुतेक सारे गटसदस्य आपला नेता मूर्खपणा करत असला, तरी त्यालाच पाठिंबा देताना दिसतात.
फिलिप टेटलॉकने दाखवून दिले की, गटाले अनेक लोक वैचारिकदृष्ट्या ‘पॅसिव्ह’ म्हणजे फारसा विचार न करणारे आणि फारसे व्यक्त न होणारे असतात. त्यामुळे हुल्लडबाज सदस्यांची मते मान्य केली जातात. आजकालचे अनेक हुकूमशाही प्रेरणा असलेले नेते समाजात हुल्लडबाजी करणाऱ्या ब्लॉगर्सना, फेसबुकींना आणि ट्विटरकांना ‘फॉलो’ करतात. असे लोक अत्यंत घाणेरडी, असभ्य आणि अश्लील भाषा वापरत असले, तरी हे नेते एक ‘स्ट्रॅटेजी’ म्हणून त्यांना ‘फॉलो’ करतात. त्यामुळे या हुल्लडबाजांच्या आक्रमक आणि आक्रस्ताळ्या मतांना समाजात प्रतिष्ठा मिळते. परिणामी समाजात भीती आणि क्रोधाच्या लाटा उठत राहतात, वैचारिक आदान-प्रदानाचा स्तर ढासळत जातो. परंतु या बदमाश नेत्यांना त्याचे काही घेणे-देणे नसते!
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
थोडक्यात, सत्तापिपासू नेते भीती, करिश्मा आणि दिखावा, यांचा वापर करून सारासार विचार करून निर्णय घेण्याच्या प्रवृत्तीचा गळा घोटतात. मॅकिआव्हेलीचे म्हणणे अनेक आधुनिक मानसशास्त्रज्ञांनी प्रयोगांद्वारे सिद्ध करून दाखवून दिले आहे. आपण आपले डोळे उघडे ठेवले, तर आजच्या जगात हे सारे घडताना दिसते.
सत्य नेहमी गुंतागुंतीचे असते. कुठल्याही प्रश्नाला अनेक बाजू असतात. सामान्य जनतेला त्याचा विचार करायचा नसतो. सगळ्या बाजू विचारात घ्यायच्या, मग त्याबद्दल सारासार विचार करून निर्णय घ्यायचा, एवढा सगळा ‘त्रास’ कोण करणार? त्यापेक्षा लोकांना छोट्या छोट्या ‘चटकदार घोषणा’ आवडतात. या घोषणा अत्यंत वेगाने सामाजामध्ये पसरतात. विचार त्या मानाने अत्यंत कमी वेगाने पसरतात. हीथ आणि हीथ या जोडगोळीने २००७ साली केलेल्या संशोधनात उथळ घोषणा विचारांपेक्षा जास्त वेगाने कशा पसरतात, हे दाखवून दिले आहे. शहाणे नेते आपल्या समाजात भीतीच्या आणि क्रोधाच्या लाटा कशा उठणार नाहीत, हे बघत असतात. ते भीतीऐवजी प्रेमाचे संदेश देतात.
एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे. जर्मनी, इटली आणि रशियामध्ये १९२० ते १९४५ या काळात हिटलर, मुसोलिनी आणि स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली भीतीने आणि क्रोधाने तांडव मांडले होते, परंतु याच काळात महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता सर्व जगाला शांतता, अहिंसा आणि प्रेमाचा संदेश देत होती. गांधींमुळे आज प्रेमाचा संदेश देणारी जनता उद्या हिटलरसारखा बदमाश नेता मिळाला, तर द्वेषाचीही वाट चालू शकते. म्हणजे नेता नेईल त्या रस्त्यावर जनता जाते.
प्रत्येक गटामध्ये अतिरेकी राजकीय मते असलेले सदस्य असतात. त्यांचा हिंसेवर विश्वास असतो. त्यांना कुठलाही प्रश्न विचारा, त्यावर हिंसा हाच मार्ग आहे, असे त्यांचे मत असते. लिऑर झ्मिग्रॉड या केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या संशोधिकेने आशा लोकांचा मेंदू कसे काम करतो, यावर संशोधन केले आहे. अतिरेकी विचार करणाऱ्या लोकांच्या ‘प्री-फ्रॉन्टल कॉर्टेक्स’मध्ये गोंधळ असतो, असे त्यांनी दाखवून दिले आहे.
‘प्री-फ्रॉन्टल कॉर्टेक्स’ म्हणजे मेंदूचा पुढचा भाग. कपाळाला लागून असलेला भाग. ‘प्री-फ्रॉन्टल कॉर्टेक्स’मध्ये गडबड असलेल्या लोकांच्या विचारात लवचीकता नसते. या लोकांना ‘नाण्याची दुसरी बाजू’ किंवा एखाद्या प्रश्नाचे विविध पैलू दिसत नाहीत. एक म्हणजे एकच विचार!
पुढच्या लेखात आपण अतिरेकी राजकीय विचारसरणी असलेल्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये आणि व्यक्तिमत्त्वामध्ये नक्की काय गोंधळ असतो, ते पाहूया.
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.


Post Comment