अजूनकाही
मॅकिआव्हेली हा विचारवंत इटलीमध्ये पंधराव्या शतकात होऊन गेला. तो स्वतः वयाच्या बाविसाव्या वर्षापासून सलग चौदा वर्षं राजकारणात ‘मुत्सद्दी’ (डिप्लोमॅट) म्हणून सक्रीय होता. नंतर राज्यबदल झाल्यावर तो राजकारणाबाहेर फेकला गेला. तो अतिशय प्रामाणिक होता. राज्यबदल झाल्यावर त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. नंतर सगळे हिशोब तपासून झाल्यावर लक्षात आले की, मॅकिआव्हेलीने कसलाही भ्रष्टाचार केलेला नाही, उलट सरकारच त्याला काही देणे लागते.
मॅकिआव्हेली अत्यंत बुद्धिमान, इतिहासाचा निष्ठावंत अभ्यासक आणि राजकारणाचा चतुर उपासक होता. त्याच्या मनाला तत्त्वज्ञानाचे आधिष्ठान होते. इतकी वर्षं अत्यंत जवळून राजकारण बघितल्यावर त्याला राज्यशास्त्राच्या आदर्शवादी ‘थिअरीज’ उथळ वाटू लागल्या. राजाला देवाने पाठवलेले असते, राजा लोकांची ‘एकत्रित इच्छाशक्ती’ (कलेक्टिव्ह विल) असतो, नेत्यामध्ये देशाचा आत्मा राहत असतो, लोकांनी निवडून दिलेले नेते लोकांचे खरेखुरे प्रतिनिधित्व करत असतात, असे सगळे सिद्धान्त सत्यापासून फार दूर आहेत, असे त्याला वाटू लागले.
राजकारणी लोक अत्यंत आत्ममग्न असतात, त्यांना स्वतःच्या राजकीय फायद्याशिवाय बाकी कशाशीही घेणे-देणे नसते, हे त्याच्या लक्षात आले होते. रोमन आणि ग्रीक साम्राज्यांच्या इतिहासाचा त्याने सखोल अभ्यास केला होता. अंधारयुगातील पोपशाहीचा अभ्यास केला होता. इटलीमधील शेकडो राजेराजवाडे आणि शेकडो कट आणि कारस्थाने त्याने अभ्यासली होती. त्यातली काही बघितलीसुद्धा होती.
असा हा मॅकिआव्हेली वयाच्या चाळीसाव्या वर्षी राजकारणाच्या बाहेर फेकला गेला. त्यानंतरच्या काळात आपल्या अनुभवाच्या, अभ्यासाच्या आणि तत्त्वज्ञानाच्या आधारावर त्याने दोन पुस्तके लिहिली. या पुस्तकांमध्ये त्याने राजकारण नेमके कसे असते, हे नमूद केले आहे.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
चांगले विचारवंत, अभ्यासू आणि नैतिक लोक राजकारणात यशस्वी का होत नाहीत, हा मॅकिआव्हेलीच्या चिंतनाचा विषय होता. चांगले लोक राजकारणात मागे पडतात, त्यांच्या हत्या होतात, त्यांना बदनाम केले जाते, ते देशोधडीला लागतात आणि शेवटी बाहेर फेकले जातात, हे मॅकिआव्हेलीने बघितले होते. या उलट राजकारणामध्ये नको ते लोक यशस्वी होताना दिसतात, हेसुद्धा त्याने बघितले होते.
त्याने लिहिलेय की, राजकारणात यशस्वी व्हायचे असेल, तर तुमच्याकडे दोन गोष्टी असायला लागतात. एक - राजकारणाला आवश्यक असलेले गुण तुमच्याकडे असायला लागतात आणि दोन - नशीब तुमच्या बाजूने असायला लागते! या दोन गोष्टींना मॅकिआव्हेली ‘व्हर्टू’ आणि ‘फॉर्च्युना’ अशी नावे देतो.
राजकारणाला आवश्यक असलेल्या गुणांमध्ये मॅकिआव्हेली राजकीय कौशल्य, कपट, संधिसाधुपणा, राजकीय ताकद, निश्चयी स्वभाव आणि निर्णय घेऊन कृती करण्याची क्षमता यांचा समावेश करतो. ‘फॉर्च्युना’मध्ये तो समोर आलेल्या संधीचा अंदाज घेण्याच्या क्षमतेचा समावेश करतो. समोर येत असलेल्या संधीचा इतरांच्या खूप आधी तुम्हाला वास लागला पाहिजे.
राजकारणाच्या कौशल्यामध्ये मॅकिआव्हेली फसवणूक करण्याच्या क्षमतेचा समावेश करतो. त्याच बरोबर विरोधकांच्या मनात भीती उत्पन्न करण्याची क्षमता तुमच्याकडे असायला लागते. वाटेल त्या लोकांबरोबर आणि पक्षांबरोबर संधिसाधू आघाड्या तयार करण्याची क्षमता तुमच्याकडे असायला लागते. फसवणूक करणे, भीती दाखवणे आणि संधिसाधूपणा करणे, यांना गुण म्हणता येत असेल, तर हे सगळे गुण म्हणजे राजकीय कौशल्य. सत्तेच्या लढाईमध्ये कुठल्याही नैतिक तत्त्वापेक्षा या गोष्टी जास्त महत्त्वाच्या ठरतात, असे मॅकिआव्हेली सांगतो. त्यामुळे अर्थातच अशा कपटी नेत्यांच्या समोर विचारशील आणि नैतिक लोक टिकाव धरू शकत नाहीत.
मॅकिआव्हेली सांगतो, लोकांशी तुम्हाला खोटे बोलता आले पाहिजे! त्यांना फसवता आले पाहिजे. तुम्ही खोटे बोला, त्याने काही फरक पडत नाही. तुम्हाला चटकदार घोषणा देता आल्या पाहिजेत. अगदी पुरातन काळापासून राजकारणी लोक चटकदार घोषणा देऊन लोकांना फसवत आलेले आहेत.
विसाव्या शतकाचा विचार केला, तर अगदी आधुनिक काळामधले कपटी नेते, लोकांना आवडतील अशा सोप्या परंतु आकर्षक घोषणा देताना दिसतात. उदा. ट्रम्प यांची ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन!’ हिटलरची घोषणा होती – ‘एक वंश, एक राष्ट्र, एक नेता!’ मुसोलिनीची घोषणा होती – ‘नेता नेहमी बरोबरच असतो.’ माओची घोषणा होती – ‘चीन आता जागृत झाला आहे!’
अशा घोषणांचे सत्याशी काही नाते नसते, परंतु त्या लोकांना आवडतात. अशा घोषणांमुळे नेत्यांची प्रतिमा उजळून निघते. या उलट, चांगले विचारवंत राजकारणी लोक प्रजेला सत्य किती ‘गुंतागुंती’चे आहे, हे सांगायचा प्रयत्न करतात. नेमके याच कारणामुळे ते मागे पडतात. प्रजेमधील बहुसंख्य लोक अत्यंत उथळ बुद्धिमत्तेचे असतात. योग्य विचार करून दोन्ही बाजू सांगणाऱ्या नेत्याकडे निर्णयक्षमता नाही, असे त्यांना वाटते. लोकांना समाजात आणि आपल्या जीवनात बदल हवा असतो. सोप्या आणि उथळ घोषणा देणारे नेते बदल घडवून आणू शकतील, असे उथळ प्रजेला वाटते आणि अशा कपटी लोकांच्या मागे प्रजा जाते, असे मॅकिआव्हेली सांगतो.
हे कपटी नेते सतत काहीतरी घडवत राहतात. समाज सतत ढवळत राहिला जाईल, याकडे हे लोक लक्ष देतात. अगदी अर्थहीन गोष्टींमध्ये हे लोक आपल्या प्रजेला सतत गुंतवून ठेवतात. उदा. माओने सगळ्या चीनला चिमण्या मारायला लावले. कारण काय तर चिमण्या शेतामधील अन्न खातात. एकंदर चीनमधल्या सगळ्या चिमण्या मारून धान्य उत्पादन वाढवण्याचा विचार होता. चीनमधल्या सगळ्या चिमण्या मारल्या गेल्या, पण धान्य उत्पादन वाढलेच नाही. सगळ्या चिमण्या मेल्यामुळे टोळ खायला चिमण्याच उरल्या नाहीत. असंख्य टोळधाडी येऊन सगळी शेते फस्त झाली. त्यामुळे पडलेल्या दुष्काळात सुमारे तीन कोटी लोक भुकेमुळे मरण पावले.
एवढा प्रचंड गोंधळ झाला, तरी माओला कुणी जबाबदार धरले नाही. कारण त्याने तोपर्यंत घराघरांत लोखंडाच्या भट्ट्या लावायचा जुमला तयार केला. घराघरांत लोखंड तयार करून औद्योगिक क्रांती करण्याचा हा विचार होता. हा जुमला आणल्यावर आपण अन्नधान्यामध्ये जगाचे गुरू होणार होतो, त्याचे काय झाले, हे कुणी माओला विचारले नाही.
चीनच्या अंगणाअंगणामध्ये लोखंडाच्या भट्ट्या लागल्या. त्यातून तयार झालेले लोखंड अत्यंत कमी प्रतीचे तयार झाले. पाच-सहा वर्षं या तमाशामध्ये प्रजा अडकून राहिली. कमी प्रतीचे लोखंड ‘इंडस्ट्रीयल ग्रेड’चे नव्हते. ते भंगार म्हणूनच वापरावे लागले, पण यासाठीसुद्धा माओला कुणी जबाबदार धरले नाही. कारण त्याने १९६६ साली ‘सांस्कृतिक क्रांती’मध्ये प्रजेला अडकवून टाकले.
सगळे ‘फेल’ गेल्यावर ‘सांस्कृतिक क्रांती’ची घोषणा झाली. आता चीन चार जुन्या गोष्टी मोडण्यात रममाण झाला होता. जुने रिवाज, जुनी संस्कृती, जुन्या सवयी आणि जुने विचार, असे सर्व मोडून चीन सर्वश्रेष्ठ बनायला निघाला. हा ‘सांस्कृतिक क्रांती’चा प्रकार माओच्या निधनापर्यंत म्हणजे १९७६पर्यंत चालला.
चिमण्या मारण्याचा जुमला, लोखंडाचा जुमला आणि ‘सांस्कृतिक क्रांती’चा जुमला, अशी अठरा वर्षे या ना त्या धुंदीत निघाली. पण विश्वगुरू बनायला निघालेल्या प्रजेच्या हाती काही लागले नाही.
मॅकिआव्हेली सांगतो, प्रजेची विचारक्षमता अत्यंत मर्यादित असते. एकदा नेत्याचे आकर्षण वाटले की, तो नेता कार्यक्षमसुद्धा आहे, असे प्रजेला वाटू लागते. प्रजेला सतत जुमले समोर येत राहणे आवडते. काही तरी हालचाल आहे म्हणजे देश पुढे चालला आहे, असे वाटत राहते. एवढी सारी प्रगती होते आहे, तर आपल्याला पूर्वीपेक्षा जास्त पैसे मिळायला लागले आहेत का, एवढी साधी गोष्टसुद्धा प्रजा करत नाही. यासाठी फार काही मोठे करायचे नसते. फक्त आपल्या खिशात हात घालून पाहायचा असतो.
सोप्या घोषणा आणि जुमले हवेत सोडल्यावर हे कपटी राजकारणी देशभर भीतीचे वातावरण तयार करतात. याचे उदारहरण म्हणजे, जुने विचार बदलण्याच्या नावाखाली चीनमध्ये अनेक विचारवंत मारले गेले.
संपूर्ण देशात भीती पसरवण्यासाठी हे लोक आपापल्या समर्थकांच्या टोळ्या तयार करतात. हिटलरने ‘स्टॉर्म ट्रूपर्स’ तयार केले होते, मुसोलिनीने ‘ब्राऊन शर्ट्स्’ नावाची आपल्या समर्थकांची सेना तयार केली, माओने विद्यार्थ्यांची ‘रेड गार्ड्स’ ही संघटना तयार केली होती. अत्यंत कमी विचारक्षमता असलेल्या लोकांना अशा संघटनांचे आकर्षण वाटते. त्याचबरोबर अत्यंत संधीसाधू लोकसुद्धा या संघटनांमध्ये घुसतात. त्या द्वारा समाजामध्ये भीती पसरवली जाते.
आजकाल हे काम ‘ट्रोल आर्मी’ करतात, हे आपण जगभर बघत आहोत. सोशल मीडिया वापरून भीती पसरवली जाते. ट्रम्प समर्थक किती गचाळ भाषेत द्वेष आणि भीती पसरवत असतात, हे बघण्यासारखे असते.
.................................................................................................................................................................
हा लेख तुम्ही या व्हिडिओ लिंकवर पाहू-ऐकू शकता
.................................................................................................................................................................
हिटलर, मुसोलिनी आणि माओ ही तीन उदाहरणे मॅकिआव्हेलीच्या या चित्रात अगदी चपखल बसतात. तिघेही तसे बघायला गेले तर ‘अर्धशिक्षित’ होते. अगदी लहान वयात त्यांनी शिक्षण सोडले होते, परंतु आपण मोठे तत्त्वचिंतक आहोत, असा त्यांचा दावा होता. शिक्षण सोडणे आणि राजकारणात येणे, याच्या मधल्या काळात आपण चिंतन केले आहे, असे ते सांगत.
हे लोक खरं तर ‘अर्धशिक्षित’ आहेत, हे शेवटपर्यंत लोकांच्या लक्षात आले नाही. ते सत्तेवरून पायउतार होईपर्यंत लोकांना काही कळले नाही. नंतरच्या पिढ्यांनी मात्र आपल्या आई-बापांना ‘तुम्हीसुद्धा तुमच्या नेत्यासारखेच मूर्ख होतात’ हे सांगितले, परंतु तोपर्यंत या साऱ्या नेत्यांची अनेक वर्षं सत्ता उपभोगून झाली होती.
मॅकिआव्हेली पुढे सांगतो- असे गोंधळ होतात, कारण आपला नेता कसा आहे, हे प्रजा आपल्या डोळ्यांनी ठरवते. प्रजेला आपला नेता फक्त दुरूनच दिसत असतो. तो जवळ आला, तर प्रजेला तो कसा आहे, हे कळण्याची शक्यता असते. त्यामुळे नेते प्रजेपासून लांब राहत, आपली ‘प्रतिमा’ सांभाळत राहतात. जनता, नेत्याच्या अनुभवापेक्षा त्याच्या ‘प्रतिमे’वरून आपले मत बनवते.
हिटलर, मुसोलिनी आणि माओ तिघेही राजकीय सभा घेण्यात माहीर होते. तिघेही अत्यंत प्रभावी वक्ते होते. पण गंमत म्हणजे ते स्वतः पत्रकार परिषद कधीही घेत नसत. तिथे कुठले प्रश्न विचारले जातील, याचा नेम नसतो. उत्तरे देताना भंबेरी उडू शकते. आपण सर्वज्ञानी आहोत, या ‘प्रतिमे’ला तडा जाईल, अशी या ‘अर्धशिक्षित’ लोकांना भीती वाटते.
मॅकिआव्हेली लिहितो की, ज्याला राज्य करायचे आहे, त्याने अत्यंत ढोंगी असायला पाहिजे. आपल्या ‘द प्रिन्स’ या पुस्तकाच्या २८व्या प्रकरणात तो म्हणतो की, “प्रजा अत्यंत साधीभोळी असते. ज्याला लोकांना फसवायचे असते, त्याला फसणारे समर्थक प्रजेमध्ये अगदी मुबलक संख्येने सतत भेटत राहतात”.
केवळ ढोंगाच्या बळावर अनेक वर्षे राज्य करता येते, असे मॅकिआव्हेलीचे प्रतिपादन आहे. आपण खूप महान आहोत, आपण खूप करारी आहोत, आपण खूप धार्मिक आहोत, असे ढोंग सतत करत राहायचे. तसे आपण असायलाच लागतो, असे काही नसते. त्याशिवाय आपण अत्यंत कार्यक्षम आहोत, अशा वावड्या उडवत राहायचे. असा हा सगळा फॉर्म्युला असतो. तो राबवताना एक पथ्य मात्र पाळायला लागते. ते म्हणजे प्रजेमध्ये सतत भीती आणि राग या दोन अत्यंत भडक भावनांच्या लाटा उठवत राहायचे. लोकांना सतत कुणाची तरी भीती वाटत राहिली पाहिजे आणि लोक सतत कुणाच्या तरी रागामध्ये राहिले पाहिजेत.
मॅकिआव्हेली ‘डिसकोर्सेस’ या पुस्तकाच्या ५३व्या प्रकरणात लिहितो, कुठलेही संकट आले की, हे कपटी नेते त्या संकटाचा ‘पर्वणी’ म्हणून वापर करतात. संकटाच्या काळात भीती आणि रागाच्या लाटा उठवणे सोपे जाते. या लाटा उठल्या की, आपला नेता हाच आपला एकमेव तारणहार आहे, असे साध्याभोळ्या प्रजेला वाटत राहते. माझ्याशिवाय हा देश चालवण्यासाठी एकही माणूस लायक नाही, असा प्रचार हस्ते-परहस्ते करत राहायचा असतो.
सांस्कृतिक, धार्मिक आणि राष्ट्रीय सोहळे मोठ्या प्रमाणावर करावेत, असे मॅकिआव्हेली सांगतो. लोकांचे डोळे विस्मयाने सतत विस्फारलेले राहिले पाहिजेत. विस्मय, दरारा, वचक असे सगळेच या निमित्ताने तयार होते. मोठे मोठे सोहळे करत राहायचे आणि त्यात पुढे पुढे राहायचे! आपला नेता महान आहे, हे लोकांच्या डोळ्यांवर बिंबवत राहिले की, ते आपोआप त्यांच्या मनावरही बिंबवले जाते. जे लांबून दिसते आहे ते खरे आहे, असे समजण्याएवढी प्रजा दुधखुळी असते, असे मॅकिआव्हेलीचे प्रतिपादन आहे.
आपण किती लोकप्रिय आहोत, हे लोकांच्या मनावर बिंबवत राहायचे, परंतु खरं तर त्यांना आपली सतत भीती वाटत राहिली पाहिजे, असे मॅकिआव्हेली सांगतो. आपल्या प्रजेला आपल्या नेत्याविषयी प्रेम आणि भीती असे दोन्ही वाटले पाहिजे. परंतु हे दोन्ही एकाच वेळी शक्य नसल्याने त्यातल्या त्यात भीती वाटणे श्रेयस्कर असते, असे मॅकिआव्हेली सांगतो. आपल्या समर्थकांच्या झुंडी तयार केल्यामुळे हे दोन्ही प्रश्न सुटतात. झुंडीच्या झुंडी मागे असल्यामुळे नेता लोकप्रिय आहे, अशी भावना तयार होते आणि झुंडशाहीमुळे भीतीचे वातावरणसुद्धा प्रजेच्या मनामध्ये तयार होते.
या पलीकडे जाऊन नेत्याने समाजातील अत्यंत महत्त्वाच्या ग्रूपची निष्ठा मिळवायची असते. पूर्वी सरदार, दरकदार, व्यापारी वर्ग, शेती करणारे जमीनदार यांच्या निष्ठा महत्त्वाच्या होत्या. आताच्या जमान्यात उद्योगपती समाजाचे हितसंबंध सांभाळणे सत्ता टिकवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. ट्रम्प आणि इलॉन मस्क यांचे प्रेमसंबंध आपण बघितलेलेच आहेत. ट्रम्प आणि फेसबुक यांचे मधूर संबंध नुकतेच बाहेर आलेले आहेत. या शिवाय ‘कॉर्पोरेट टॅक्स’ कमी करून ट्रम्पसाहेबांनी एकूणच भांडवलदार वर्गाला खुश करून टाकलेले आहेच. अशा जोड्या आपल्याला प्रत्येक देशात दिसतात.
नेत्याने समाजामधले भेद वाढत ठेवले पाहिजेत, हे मॅकिआव्हेलीने परत परत सांगितले आहे. तो सांगतो की, नेत्याने समाजामधील भेदांचा फायदा उठवला पाहिजे. समाजाच्या एका भागाला टार्गेट करून द्वेष पेटवणाऱ्या नेत्याला सतत राजकीय फायदा होत राहतो. ‘आपण विरुद्ध ते’ असे ‘नॅरेटिव्ह’ सतत पसरवले पाहिजे.
हिटलरने ज्यू वंशाविरुद्ध पराकोटीचा द्वेष पसरवला. मुसोलिनीने ‘सोशालिस्ट’, ‘रोमा’ नावाचे जिप्सी आणि ‘होमोसेक्सच्यूल’ अशा लोकांविरुद्ध वातावरण पेटवले. माओने भांडवलदार लोकांना लक्ष्य बनवले.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
समाजामध्ये बदल घडणे, ही अनेक दशकांनी साध्य होणारी गोष्ट असते. आम्ही हे सगळे पटकन करून टाकू, असे सांगून सत्तेवर आलेल्या नेत्यांना प्रजेचे लक्ष महत्त्वाच्या गोष्टींवरून वळवणे आवश्यक असते. प्रजा, भीती आणि रागामध्ये राहिली की, तिचे लक्ष या गोष्टींकडे जात नाही.
थोडक्यात, राजकारण हा सगळा लबाडांचा कारभार आहे. बहुतेक नेते असेच असतात, कारण प्रजेमधील बहुतेक लोक उथळ असतात. असे सर्व असताना काही मूळचे चांगले आणि विचारवंत लोक क्वचित कधीतरी यशस्वी होताना दिसतात, हे मॅकिआव्हेलीने नाकारत नाही. हे नेते क्षमाशील, श्रद्धावान, माणुसकी असलेले, प्रामाणिक आणि धार्मिक असतात, पण त्याच वेळी त्यांना राजकारण खरे काय आहे, ते पूर्णपणे कळत असते, परंतु असे नेते अत्यंत विरळ असतात.
राजकारणात तत्त्वज्ञानांच्या झुली पांघरलेले सत्तापिपासूच दिसून येतात. यात राजे असतात, नाझी असतात, फॅसिस्ट असतात, कम्युनिस्ट असतात, लोकशाहीवादी असतात आणि लोकशाहीच्या आडून सत्ता हडपणारे हुकूमशहासुद्धा असतात. कुठल्याही विचारसरणीचा नेता याला अपवाद नसतो.
लोक खुळे असतात म्हणून बदमाश लोकांचे फावते. आता प्रश्न असा येतो की, लोक खुळे का असतात. या प्रश्नाचा शोध घ्यायचा प्रयत्न विसाव्या आणि एकविसाव्या शतकातल्या अनेक विचारवंतांनी केला आहे. याचा विचार आपण पुढच्या लेखात करू.
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.


Post Comment