एक अजस्त्र यंत्र सतत गरगरतंय... निवडणूक जवळ आली की, त्याचा वेग वाढतो... निवडणूक पार पडली की, यंत्र पुन्हा मूळ वेगानं फिरत राहतं...
पडघम - देशकारण
सुहास कुलकर्णी
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 25 September 2023
  • पडघम देशकारण भाजप BJP नरेंद्र मोदी Narendra Modi काँग्रेस Congress

गेली नऊ वर्षं एक अजस्र यंत्र सतत गरगरतंय. त्यात साऱ्या देशाला बसवलं गेलंय. निवडणूक जवळ आली की, या यंत्राच्या फिरण्याचा वेग वाढत जातो. त्या यंत्रात फिरणाऱ्या माणसांवर त्याचा परिणाम होतो. निवडणुका पार पडल्या की, यंत्र पुन्हा मूळ वेगानं फिरत राहतं. पण ते थांबत नाही. एक दिवस, एक क्षणही थांबत नाही. त्यामुळे माणसं गरगरत राहतात.

भारतीयांना एवढ्या वेगाची सवय नाही. भारतीय लोकांची मूळची घडण संथगती आहे. आपले सण-उत्सव, आपलं संगीत, आपली जीवनशैली मंदगतीची आहे. पाच दिवसीय क्रिकेट हा इंग्रजांचा खेळ. पण तो आपण आपलासा केला, कारण त्याची मंदगती. आपलं राजकारणही संथपणे उलगडणारं. मुळात काँग्रेस पक्ष हा आळशी. त्यामुळे इतकी वर्षं आळोखेपिळोखे देत आपलं राजकारण घडत होतं. पण भाजपच्या नेतृत्वस्थानी नरेंद्र मोदींचा उदय झाला आणि हे सगळं पालटलं.

मोदींनी पंतप्रधान बनल्यानंतर सगळ्या देशाला सर्व वेळ ‘ऑन द टोज’ ठेवलं. ‘मन की बात’मधून ते दर महिन्याला एकदा लोकांशी बोलत राहिले. नव्या योजना, नवे कार्यक्रम, नवे उपक्रम यांचा धडाका त्यांनी लावला. जुन्या योजना-कार्यक्रमांना नवी नावं दिली. ‘स्वच्छ भारत’, ‘बेटी पढाओ’पासून अलीकडच्या ‘अपनी माटी अपना देश’सारख्या एक ना अनेक उपक्रमांची सुरुवात त्यांनी केली. सेल्फी काढून पाठवा, योजनांची नावं सुचवा, लोगो स्पर्धेत सहभागी व्हा, ‘मन की बात’साठी विषय आणि माणसं सुचवा, असं सांगून लोकांना स्वत:शी जोडून घेतलं.

भाषणं देण्याबाबत तर त्यांचा हात कुणी धरूच शकत नाही. अमुक करणार म्हणून भाषण, अमुक करताना भाषण, तमुक केले म्हणून भाषण... गेली नऊ वर्षं देश मोदींचं बोलणं ऐकतोच आहे. बोलण्याबाबत त्यांची छाती ५६ नव्हे, तर १५६ इंचाची आहे, हे त्यांनी केव्हाच सिद्ध करून टाकलं आहे. मोदींचं वक्तृत्व आणि गारुड असं की, देशही त्यांचं वर्षांमागून वर्षं ऐकतोच आहे. मनमोहन सिंग आणि सोनिया गांधींच्या ‘मूक’ नेतृत्वाच्या पार्श्वभूमीवर मोदी पुढे आल्यानं ऐकण्याची हौस लोकांनी पुरती भागवून घेतलेली दिसतेय.

भारतातील लोक समारंभी वृत्तीचे आहेत, हे ओळखून प्रत्येक घटनेचं ‘इव्हेंट’मध्ये रूपांतर करण्याचं कौशल्य गेल्या नऊ वर्षांत सत्तापक्षाने दाखवलं आहे. २०१४मध्ये पहिल्यांदा शपथ घेताना शेजारी देशांच्या प्रमुखांना बोलावण्यापासून त्याची सुरुवात झाली. तिथपासून ते नव्या संसदभवनात ‘सेंगोल’प्रस्थापनेपर्यंत नि परवाच्या समारंभी प्रवेशापर्यंत शेकडो-हजारो ‘इव्हेंट’ घडवले गेले आहेत. नोंदवायला लागलो तर पुस्तक लिहिलं जाईल नि आठवायला लागलो, तर भोवळ येईल एवढे समारंभ पार पाडण्यात आले आहेत.

काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या उद्घाटनाचा किंवा अयोध्येतील राममंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आठवून पाहा... त्याच्या प्रसिद्धीचा, जाहिरातींचा, लाइव्ह प्रक्षेपणाचा आणि त्यांच्या बातम्यांचा पसारा आठवा, म्हणजे गेल्या नऊ वर्षांतील अशा घटनांचा आपल्यावर काय ‘इम्पॅक्ट’ झालाय, हे कळू शकेल.

सर्जिकल स्ट्राइक, ३७० कलम रद्द करणं, नोटबंदी, अचानक लॉकडाऊन अशी अनेक पावलं उचलली गेली आणि ती जनतेच्या गळीही उतरवली गेली... अशा निर्णयांची यादीही मोठी आहे.

मोदींचे सततचे परदेशदौरे, आंतरराष्ट्रीय संमेलनांतील सहभाग, आपल्या देशात आयोजित केलेली संमेलनं, आपल्याकडे आलेले परदेशी प्रमुख, परदेशात जाऊन मूळ भारतीयांसमोर केलेली ‘स्टेडियमी’ भाषणं, परदेशात मिळवलेले पुरस्कार अशा कित्येक गोष्टींचा प्रचार-प्रसार असा काही केला गेला आहे की, भारतीयांचे डोळे दिपून जावेत.

मेट्रो लाइन्सची उद्घाटनं, एक्स्प्रेस-वे, रेल्वेमार्ग, टनेल्स, पूल, राष्ट्रीय महामार्ग वगैरेंची उद्घाटनं, देशातील भव्य मूर्ती आणि पुतळ्यांच्या अनावरणाचे समारंभ वगैरेंचाही सपाटा चालू आहे. मंगळयान उडलं, चांद्रयान स्थिरावलं, आदित्ययान उडणार, समुद्रयान जाणार वगैरे सगळ्या वैज्ञानिक योगदानाच्या बातम्या ‘राजकीय’ बनवल्या गेल्या आहेत. या सगळ्याचा ओघ एवढा आहे की, माणसं या बातम्यांमध्ये धुंवाधार धुतली जात आहेत.

मोदी आणि त्यांचं सरकार जसं ‘ॲक्टिव्ह’ आहे, तसाच भाजप हा पक्षही. एक महिना, एक आठवडा, एक दिवस ते भाकड जाऊ देत नाहीत. माध्यमांमध्ये त्यांचा, त्यांच्या नेत्याचा, त्यांच्या विचारांचा प्रभाव टिकून राहील, यासाठी हा पक्ष आणि त्यांची यंत्रणा अहोरात्र काम करताना दिसते. जनसंपर्क यात्रा, नेत्यांचे मेळावे, निवडणूक तयाऱ्या, विरोधकांवर आरोप, वाद निर्माण करणे, बातम्या सोडून देणे, सरकारने घेतलेल्या निर्णयांचे आक्रमक समर्थन करणे, अडचणींच्या विषयावर विषय सोडून विरोधकांवर हल्ले करणे वगैरे अनेक मार्गांचा अवलंब करून माध्यमांतली आणि त्यामुळे मनामनांतली ‘स्पेस’ व्यापून टाकण्याचं जबरदस्त तंत्र या पक्षानं आत्मसात केलेलं आहे आणि अवलंबलं आहे.

इतके ‘ॲक्टिव्ह’ पंतप्रधान आणि पक्ष यापूर्वी भारताने पाहिला नव्हता. स्वातंत्र्यानंतरच्या देशउभारणीच्या प्रक्रियेत जवाहरलाल नेहरू केंद्रस्थानी होते, तेव्हा सारा देश त्यांच्याभोवती फिरत होता, म्हणतात. त्यानंतर कमी-अधिक फरकाने इंदिरा गांधींभोवती फिरला. पण गेल्या वीस-पंचवीस वर्षांत भारत बराच बदलला, देशात पैसा आला, माध्यमं वाढली, सरकारचा पसारा वाढला. त्यामुळे नेहरू-इंदिरा यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणाऱ्या मोदींनी स्वत:भोवती देश उभा करण्याचा अचाट नि अफाट उपक्रम यशस्वीपणे चालवला आहे. त्यासाठी सत्तेचं केंद्रीकरण अभूतपूर्व रितीनं घडवून आणलं आहे. निवडणुका अलीकडे ओढल्या गेल्या नाहीत, तर पुढील सहा महिने हा महाउपक्रम आणि त्यांनी चालवलेलं महायंत्र आणखी वेगाने गरगरताना दिसणार आहे.

फार मागचं सोडा; फक्त गेल्या तीन महिन्यांकडे मागे वळून पाहा. आपण किती वेगाने फिरणाऱ्या यंत्रात बसलो आहोत आणि गरगरतो आहोत, हे लक्षात येईल.

चार महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या महिला पहिलवानांनी लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवून निदर्शनं सुरू केली आणि तिकडे मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली गेली. त्यानंतर दोन्हीकडची परिस्थिती हाताबाहेर गेली. सरकार टीकेचे धनी होऊ लागलं. पण दोन्ही बाबतीत सरकार बधलं नाही. दोन्ही ठिकाणची परिस्थिती चिघळली; पण ना सरकारने, ना सत्तापक्षाने, ना पंतप्रधानांनी आपला हट्ट सोडला! राजकीय नुकसान होत असूनही मंडळी अडून राहिली. अखेरीस बेरोजगारी, महागाई, विषमता हे मुद्दे मागे पडावेत, यासाठी हे वादविषय मिटवले जात नाहीयेत, असं काही मंडळी म्हणू लागली.

ते काहीही असो; पण तेव्हापासून सरकारने इव्हेंट-उपक्रम-घोषणा-निर्णय यांचा असा काही धडाका लावलाय की, बाकीचे सगळे मुद्दे हवेत उडून गेले आहेत. अशा अनेक गोष्टी घडवल्या जात आहेत ज्यामुळे समाजमन सुखावूनही जात आहे. विविध समाजघटकांच्या अस्मितांचे प्रतीक असलेल्या महामानवांच्या पुतळ्यांचं अनावरण हे त्यातलं एक. महात्मा बसवेश्वरांपासून आदि शंकराचार्यांपर्यंतच्या अनेक पुतळ्यांची अनेक उदाहरणं त्याची साक्ष आहेत. (ही अनावरणं त्या त्या राज्यांच्या निवडणुकीच्या तोंडावर होतात हाही योगायोगच म्हणायचा का!)

महिला आरक्षण विधेयक, राष्ट्रद्रोह कायद्यात दुरुस्ती, दिल्ली सरकारच्या निर्णय अधिकारांबाबतचं विधेयक अशी काही विधेयकं सरकारने संसदेत आणली आहेत. त्यांबाबत वाद होणार, हे माहीत असूनही ती आणली गेली. किंबहुना त्यावर वाद व्हावेत आणि विरोधकांना खिंडीत गाठावं, यासाठीच ही विधेयकं आणली गेली असावीत.

दोन दिवसांचं ‘जी ट्वेंटी’ संमेलन! पण ते वर्षभर साजरं केलं गेलं. त्यासाठी शहरं सजवली गेली. रोषणाई झाली. खरं तर क्रमाक्रमानं एकेका देशात हे संमेलन भरवलं जातं. पण हवा अशी तयार केली गेली की, काहीतरी भव्यदिव्य घडतंय. या संमेलनात भारताच्या पदरात काय पडलं हे अलाहिदा. पण हा ‘इव्हेंट’ आटोपल्याच्या दुसऱ्या दिवशी पुढच्या ‘इव्हेंट’ची तयारी सुरू झालेली होती.

गेल्या तीन महिन्यांत मोदींनी अमेरिका, इजिप्त, दक्षिण आफ्रिका, ग्रीस, इंडोनेशिया, फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिरात यांचे दौरे केलेले आहेत. शिवाय जपान, सौदी अरेबिया, पापुआ न्यूगिनी, बांगला देश वगैरेंचेही त्याच्या आसपासच. मोदी गेले, चर्चा केली, परत आले, असं कधीच घडलेलं नाही. जाणार-जाणार, गेले-गेले, आले-आले असं कवित्व आठ-दहा दिवस तरी चालतं. तेही इतकं प्रभावीपणे की, आपण फक्त पाहतच राहतो.

लोकांना चर्चेसाठी विषय द्यायचे, ही खास मोदीनीती. खरंतर लोकशाही देशात राष्ट्रीय हिताचे विषय चर्चेसाठी जनतेला खुले करणं, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. पण मोदी आणि भाजपची शैली वेगळी आहे. चर्चा होईल, तज्ज्ञ मतं मांडतील, माध्यमांमध्ये मतंमतांतरं पुढे येतील, जनभावना कळेल आणि मग सरकार भूमिका ठरवेल, ही त्यांची पद्धत नाही. निर्णय झाल्यावरच विषय चर्चेसाठी सोडले जातात. समान नागरी कायदा, एक देश-एक निवडणूक, देशाचं नाव ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’, सनातन धर्म वगैरे विषयांवर भाजपचं निश्चित मत आहे.

लोक-तज्ज्ञ-माध्यमं काहीही म्हणाली तरी ते मत बदलणारं नाही. त्यामुळेच देशासमोरच्या गंभीर प्रश्नांची चर्चा मागे पडावी, म्हणून असे वादविषय चर्चेसाठी सोडले जातात, असं विरोधक म्हणू लागले आहेत. हे खरं असेल तर सत्तापक्ष खरोखरच हुशार म्हणायचा!

वादविषय बनवण्याचा हा कारखाना सत्तापक्ष यशस्वीपणे चालवताना दिसतो आहे. विरोधी पक्षांनी आपल्या आघाडीचं नाव ‘इंडिया’ असं ठेवलं, त्यावरून भाजपच्या नेत्या-प्रवक्त्यांनी किती राळ उडवावी! विरोधकांनी स्वत:ला काय संबोधावं, हा त्यांचा प्रश्‍न होता, पण भाजपजन त्यात उतरले आणि हे विरोधक कसे ‘भारतविरोधी’ आहेत, असं सांगू लागले. कशाचा कशाशी संबंध नव्हता, पण आठ-पंधरा दिवस या वादात लोक ओढले गेले.

राहुल गांधींचा संसदेतील भाषणानंतरचा कथित फ्लाईंग किस असो, नाहीतर सोनिया-राहुल यांची चिनी कम्युनिस्ट नेत्यांशी झालेली कथित भेट असो... भाजपचे नेते त्यावर गदारोळ उठवतात. अडानी, जाती जनगणना, महागाई-बेरोजगारी वगैरे विषयांना माध्यमांमध्ये आणि जनमानसामध्ये जागाच मिळू नये, यासाठी हे केलं जातं असं सांगितलं जातं. अमित मालवीय, हेमंत बिस्वसर्मा, राजवर्धन राठोड, स्मृति इराणी, अनुराग ठाकूर, गिरीराज सिंह, निशिकांत दुबे यांच्यासारखी फौज हे काम फत्ते करण्यासाठी सदैव तयारच असते, असं दिसतं.

याशिवाय तोंडी लावायला नेहरू, सुभाषबाबू, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर यांच्या अनुषंगाने काँग्रेसला धारेवर धरणं, इडी-सीबीआय-इन्कमटॅक्सच्या धाडी आणि चौकशीवरून विरोधकांना कोंडीत पकडणं, राहुल गांधी आणि इतर अनेक संसदसदस्यांना बडतर्फीपासून सदस्यत्व गमावण्यात हातभार लावणं, विरोधकांची सरकारं असलेल्या राज्यांत राज्यपालांच्या आक्षेपार्ह वर्तणुकीकडे कानाडोळा करणं, विरोधकांची सरकारं पडतील अशी व्यवस्था करणं आणि नंतर चर्चेच्या कुस्तीत धोबीपछाड देणं, बंगाल-कर्नाटक वगैरे सरकारं लवकरच पडणार, नितीशकुमार पुन्हा रालोआत येणार वगैरे बातम्या पेरणं असे एक ना अनेक उपक्रम अथकपणे चालू असतात.

निव्वळ गेल्या तीन महिन्यांवर नजर फिरवली तर किमान एवढ्या ठळक घटना-घडामोडी-उपक्रम सत्तापक्ष, सरकार आणि त्यांच्या सर्वोच्च नेत्यांमार्फत राबवले गेलेले दिसतात. हा वेग कुणालाही गरगरून टाकणारा आहे, पण त्याचे घडते\घडवते दमायला तयार नाहीत. ते या खेळात मोठेच तरबेज आहेत. त्यामुळे हा खेळ चालूच राहणार आहे असं दिसत आहे.

ज्याअर्थी हा खेळ नऊ वर्षं चालू आहे, त्याअर्थी त्याला लोकपाठिंबा आहे, असं मानायचं का? दुसरी शक्यता अशीही आहे की, हा खेळ बघून बघून नि त्यात सहभागी होऊन होऊन लोकांना ‘फटिग’ही आलेला असू शकतो.

यातलं काय खरं, हे गरगरायला लावणाऱ्या यंत्रात बसल्यामुळे कळेनासं झालं आहे.

ता. क. : २०१९च्या निवडणुकीआधी आमच्या ‘युनिक स्कूल ऑफ जर्नालिझम’च्या विद्यार्थ्यांनी मोदीप्रणित घोषणा, इव्हेंटस आणि चर्चेसाठी सोडलेल्या वादविषयांची एक यादी बनवली होती. चांगल्या दीड-दोनशे बाबी त्यात नोंदवल्या होत्या. आज अशी यादी बनवणं अशक्य आहे. कारण तेव्हा छोट्या असलेल्या यंत्राने आता अजस्त्र रूप धारण केलं आहे.

.................................................................................................................................................................

लेखक सुहास कुलकर्णी ‘अनुभव’ मासिकाचे आणि ‘समकालीन प्रकाशना’चे मुख्य संपादक आहेत.

samakaleensuhas@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......