लेखक वाचकाला जीवनाकडे नव्या नि वेगळ्या दृष्टीनं पहायला शिकवतो, हे मला अभिजात पुस्तकांच्या वाचनातून उमगलं...
ग्रंथनामा - झलक
आनंद जोशी
  • ‘अक्षर पाविजे निर्धारे’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Wed , 02 August 2023
  • ग्रंथनामा झलक अक्षर पाविजे निर्धारे Akshar Pavije Nirdhare आनंद जोशी Aanand Joshi वाचन Reading पुस्तक Books

प्रसिद्ध लेखक व शल्यचिकित्सक डॉ. आनंद जोशी यांचं ‘अक्षर पाविजे निर्धारे’ हे वाचनाचा शास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करणारं पुस्तकं नुकतंच अक्षर प्रकाशनातर्फे प्रकाशित झालंय. या पुस्तकाच्या एका प्रकरणाचा हा संपादित अंश...

..................................................................................................................................................................

प्रास्ताविक

‘प्लेझर्स ऑफ रीडिंग’ हा जोसफ एप्स्टेनचा ‘हडसन रिव्ह्यू’मधील लेख वाचला. वाचनाबद्दलचे माझे विचार हा लेखक मला सोप्या, सुंदर भाषेत सांगत आहे, असं वाटलं. असं मला वाटणं हाच त्याच्या प्रतिभेचा प्रकाश! जी प्रतिभा माझ्याजवळ नाही, ती या लेखात मला गवसली, म्हणून आनंदित झालो. वाचनाचं तत्त्वज्ञान असा गंभीर आव लेखकानं इथं कुठंही आणलेला नाही. तरीसुद्धा लेख अर्थगर्भ आहे, त्याला नर्म विनोदाची झालर आहे. वाऱ्याच्या झुळुकीबरोबर मंद सुवास तरंगत यावा आणि रंध्रारंध्रांत झिरपावा, तसे लेखकाचे विचार अलगदपणे माझ्या मनावर विसावले; आणि मी या लेखाचा अनुवाद करायचं ठरवलं.

या लेखाचा अनुवाद करताना लेखकाप्रमाणे मी प्रथमपुरुषी एकवचनाचा वापर केला आहे. त्याचं कारण मी सुरुवातीलाच नमूद केलं आहे. या लेखात इतर पाश्चात्य लेखकांची नावं व त्यांचे वेचे येतात. मला ती नावं महत्त्वाची वाटत नाहीत; पण त्या लेखकांनी काय म्हटलं आहे, हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. टी.एस. इलियट, विला कॅथर, हेन्री जेम्स, मायकेल प्रुस्त यांच्याबद्दलची माहिती महाकोशात मिळू शकेल. पण लेखकाने मांडलेले त्यांचे सूक्ष्म विचार सहजासहजी सापडणार नाहीत. त्यामुळे मराठी वाचकानं या नावांकडे दुर्लक्ष करून मजकुराकडे लक्ष देणं आनंददायी ठरेल.

मी का वाचतो, हे माझ्या मनात कुठेतरी दडून बसलं होतं, ते जोसफ एप्स्टेनच्या लेखानं माझ्यापुढं लख्ख केलं. - अनुवादक.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

काय गंमत आहे बघा! वाचन ही माझ्यासाठी पवित्र नसली, तरी चांगली गंभीर बाब आहे. त्यात इंद्रियजन्य सुखही आहे. पुस्तकाचा गंध, रूप, रंग याची मी दखल घेतो. पुस्तकाचं वजन मला कधी सुखावतं; कधी दुखावतं. वाचनात गतीला महत्त्व. पण यात सोय अशी की, आपण आपल्या गतीनं वाचू शकतो. कधी पानापानांवरून उड्या मारत; तर कधी वाचलेली वाक्यं पुन्हा वाचत. वाचताना मी कधी कधी मानही डोलावतो; तर कधी आपोआपच दाद दिली जाते. पाठोपाठ ‘धप्प’ आवाज होतो. पुस्तक हातातून गळून पडतं.

साधारणतः मी सावकाश वाचतो. झटपट वाचन ही कल्पनाच मला अस्वस्थ करते. पुस्तक जितकं चांगलं, तितकं ते अधिक सावकाश वाचण्याकडे माझा कल असतो. वाढत्या वयाबरोबर माझं वाचन आणखीच सावकाश होत आहे. वयोमानानं माझ्या मेंदूची क्षमता कोलमडू लागल्यामुळे नव्हे (अर्थात ती तशी कोलमडू लागली आहे, याबद्दल माझी खात्री आहे); पण त्याहीपेक्षा हातातलं हे चांगलं पुस्तक वाचायला परत सुयोग येईल, असा विश्वास आता मला वाटत नाही. झटपट वाचन ही जर आजची फॅशन होणार असेल, तर सुग्रास अन्न भराभर पोटात कोंबण्याचे दिवस फार दूर राहिलेले नाहीत! इतर क्रियाकृतींबद्दल तर न बोललेलंच बरं!

हातात पुस्तक असल्याशिवाय मी बाहेर पडत नाही आणि पेन्सिलीन खुणा केल्याशिवाय वाचत नाही. वाचताना मी स्वतः जवळ एक नोंदवही ठेवतो. आवडलेला परिच्छेद नोंदवहीत उतरवतो. वाचत असलेल्या पुस्तकाच्या संदर्भात माझं स्थान काय, हे मला निश्चित उमगल्यानंतर, त्या पुस्तकाशी माझं नातं काय, हे मला समजल्यानंतरच मी त्या पुस्तकाचा निरोप घेतो.

लेखक-वाचक

लेखक म्हणून मी धीम्या गतीचा वाचक. वाचताना पुढील मुद्दे तपासून पाहणं मला नेहमीच योग्य वाटतं; हे वाक्य बरोबर आहे का? ते रसपूर्ण आहे. का? ते सुंदर आहे का? (हा मात्र आनंददायी बोनस!) वाचक जर लेखक असेल, तर आणखी तीन प्रश्न उभे राहतात. हे वाक्य कसं तयार झालं? ते आणखी चांगलं करता येईल का? माझ्या लेखनासाठी मी यातून काय चोरू शकेन? मला असा एकही चांगला लेखक भेटलेला नाही की, जो लेखक होण्यापूर्वी खोलात जाऊन वाचणारा मर्मज्ञ वाचक नव्हता. प्रत्येक चांगला लेखक मर्मज्ञ वाचक असतो. आपल्या सदसद्विवेक बुद्धीच्या श्रेणीप्रमाणे आणि तरलतेच्या गतीप्रमाणे प्रत्येक चांगला लेखक वाक्यचोरही असतो.

एक गोष्ट ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. मी आता साठीला आलो आहे, तरी अजून मला इंग्लिश भाषेतील पुष्कळसे शब्द ठाऊक नाहीत. एखादा शब्द मला अडला, तर मी खूप अस्वस्थ होतो. मला विश्वाचा अर्थ समजला नाही, तरी चालेल, ईश्वरानं धरतीवर पाप, वेदना का पाठवल्या, हे एकवेळ नाही. समजलं तरी चालेल; पण एखाद्या शब्दाचा अर्थ न कळणं, हे मात्र माझ्या सहनशक्ती पलीकडचं असतं.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा : 

मणिपूरला ईशान्य भारतातलं ‘काश्मीर’ होण्यापासून रोखायला हवं...

मणिपूरमधील घडणाऱ्या अमानवी घटनांकडे पाहण्याची ‘आपपरभावी वृत्ती’ त्या घटनांइतकीच हादरवून टाकणारी आहे...

मणिपूरमधील अराजक आणि ‘संविधान सभे’च्या शेवटच्या भाषणात डॉ. आंबेडकरांनी दिलेला इशारा

मणिपूरमध्ये तातडीनं शांतता प्रस्थापित करणं, ही राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारांची जबाबदारी आहे

.................................................................................................................................................................

परवाच मी एक पुस्तक वाचत होतो. त्यात एक शब्द आला - ‘ऱ्हॅडामन्थाइन’. मला या शब्दाचा अर्थ पूर्णपणे अज्ञात होता. मी अस्वस्थ, मग काढला त्याला हुडकून. ‘ऱ्हॅडामन्थाइन’ म्हणजे स्ट्रिक्ट! ग्रीक पुराणात हॅडामन्थाइन हा एक स्ट्रिक्ट न्यायाधीश होता. त्यावरून हा शब्द आलेला. शब्द हुडकण्याची मला लागलेली सवय आहे म्हणा; खोड आहे म्हणा; पण आहे खरी. आणि ती अखेर माझ्याच बरोबर जाणार!

मला आणखी एक सवय आहे. एखादं पुस्तक वाचायला घेतलं की, ते अथपासून इतिपर्यंत वाचायचं. त्यातील शब्द न् शब्द वाचायचा. पण आता ही सवय सुटत चालली आहे. त्याचं असं झालं, मी न्यायमूर्ती होम्सचा पत्रव्यवहार वाचत होतो. हा होम्स माझ्यासारखा मर्मग्राही वाचक. वयाच्या पंचाहत्तरीपर्यंत त्याची संपूर्ण पुस्तक एकमार्गी वाचायची सवय टिकून होती. होम्सला अशी काळजी पडलेली असायची की, स्वर्गाच्या दारात सेंट पिटरनं त्याला वाचनाबद्दल प्रश्न विचारला, तर ‘हे पुस्तक मी वाचलेलं आहे; पण संपूर्ण वाचलेलं नाही’, असं उत्तर द्यायची वेळ त्याच्यावर यायला नको.

साठ वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर मी जीवनातल्या पुस्तक चाळण्याच्या टप्प्यावर येऊन पोचलो आहे. अर्थात हे वरवरचं वाचणं मी अगदी स्वच्छ आणि सदसद्विवेक बुद्धीने करतो, असं नाही. पण मी आता स्वतःला सांगतो, ‘कादंबरीतील कंटाळवाणी वर्णनं कथानकाचा न संपणारा संक्षिप्त वृत्तांत, कुठल्यातरी हीन दर्जाच्या आधार - साहित्यातून घेतलेली वचनं, वेचे हे वाचण्याचा त्रास आता तू कशाला घेतोस?’ मी एक दिवशी मरणार आहे, म्हणून मी स्वत:शी म्हणतो, ‘जगाला रामराम ठोकण्याआधी यापेक्षा काहीतरी चांगलं वाचलं तर?’

मी केव्हातरी मरणार, हा समज दिवसेंदिवस मला जास्तच वास्तव वाटू लागला आहे. त्यामुळे काय वाचायचं, याबाबत मी आता जास्त जागरूक झालो आहे. मला जर कोणी आठशे पानी चरित्र वाचायला दिलं, तर आज मला विचार करणं भाग पडतं. हे पुस्तक माझ्या वाचन वेळातले दोन आठवडे खाणार आहे. वेळेची ही गुंतवणूक करण्याची माझी तयारी आहे का? माझ्या जीवनात अलीकडे अचानकपणे हा एक गंभीर प्रश्न बनला आहे.

अगणिततेची जाणीव

‘ज्या वेळी मला जाणीव झाली की, आता जगातील पुस्तकं मी कधीच बाचू शकणार नाही, तो माझ्या आयुष्यातील अत्युच्च आनंदाचा क्षण होता,’ असं गर्टरूड स्टाइन (एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध नि विसाव्या शतकातली पहिली चार दशकं गाजवलेली अमेरिकी कादंबरीकार, कवयित्री आणि नाटककार) एकदा म्हणाली होती. या जाणिवेनं तिच्यावरचं दडपण निघून गेलं. हाच त्या अत्युच्च आनंदाचा भाग होता, असं मला वाटतं. मीसुद्धा आता समजून चुकलो आहे की, जगातील सगळी पुस्तकं सोडा, पण सगळी चांगली पुस्तकसुद्धा मी आता वाचून संपवू शकणार नाही. पण या जाणिवेनं माझ्यासारखा संशयशील माणूस आनंदी होण्याऐवजी उदासच होतो. माणूस जेव्हा मर्यादित शक्यतेच्या विश्वात जगू लागतो, तेव्हा कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत, आणि कोणती पुस्तकं वगळावी, हा प्रश्न मोठं रूप धारण करतो.

‘हार्वर्ड’ विद्यापीठातील अर्थशास्त्राचे इतिहासतज्ज्ञ, ख्रिस्तवासी अलेक्झँडर गर्शेनक्रॉन यांनी, माणूस त्याच्या आयुष्यभरात किती वाचू शकेल, याचा अंदाज बांधला होता. अर्थात, ही आकडेवारी उत्साहभंग करणारी आहे. गर्शेनक्रॉन त्या वेळी सत्तर वर्षांचे होते. त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षी गंभीर वाचनाला सुरुवात केली. व्यवसायाव्यतिरिक्त त्यांनी साधारणपणे आठवड्याला दोन पुस्तकं वाचली. म्हणजे, त्यांच्या अंदाजाप्रमाणे पन्नास वर्षांत माणसानं पाच हजार पुस्तकं वाचायला हवीत. एकट्या अमेरिकेत दरवर्षी साधारणत: पंचावन्न हजार पुस्तकं प्रकाशित होतात. तेव्हा पाच हजार ही संख्या अगदी चिल्लर वाटते.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्ट २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

............................................................................................................................................................

त्या टोचणाऱ्या तर्कशास्त्रीय प्रश्नावर गर्शेनक्रॉननं ‘दि अमेरिकन स्कॉलर’ या मासिकात एक निबंध लिहिला होता. आयुष्यात इतकी चुकीची किंवा निकृष्ट दर्जाची पुस्तकं वाचणं, हे लज्जास्पद आहे, असं गर्शेनक्रॉननं त्या निबंधात म्हटलं होतं. उत्तम पुस्तकांच्या निवडीचे निकष त्यानं या निबंधात सांगितले होते. ते तीन निकष असे : पुस्तक अंगभूतपणे रसपूर्ण असलं पाहिजे; ते पुनर्वाचनीय असलं पाहिजे व संस्मरणीय असलं पाहिजे. हे निकष किती विचारगर्भ आणि निर्दोष वाटतात. पण आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की, ते किती फसवे व निरुपयोगी आहेत. पुस्तक खोलवर वाचल्याशिवाय ते रसपूर्ण आहे किंवा नाही, हे कसं कळणार? एकदा वाचल्याशिवाय ते पुन्हा वाचण्यासारखं आहे किंवा नाही आणि पुस्तक संस्मरणीय आहे किंवा नाही, हेसुद्धा एकदा वाचल्याशिवाय ठरवता येणं कठीण.

निवडीची यादी

वाचनाबद्दलचा सल्ला देण्याची पद्धत काही शतकं जुनी आहे. १७७१ साली थॉमस जेफर्सननं १४८ वाचनीय पुस्तकांची यादी तयार केली होती. तेव्हापासून अशा यादीचा प्रवाह अखंडित चालू आहे. हार्वर्ड विद्यापीठाची पाच फूट शेल्फमध्ये मावणारी अभिजात पुस्तकं, ‘ब्रिटानिका’ विश्वकोशाची ‘ग्रेट बुक्स ऑफ दि वेस्टर्न वर्ल्ड’ अशी अनेक उदाहरणं देता येतील. पण अशा पुस्तकांची यादी म्हणजे, कालप्रवाहावर काढलेली अक्षरं. ही यादी काळाप्रमाणे सतत बदलत असते.

कोणती पुस्तकं वाचनीय व कोणती अवाचनीय याबद्दलचा उपयुक्त सल्ला कोणी देऊ शकेल, असं मला वाटत नाही. मी एकदा लिहिलं होतं. “अठरा वर्षांनंतर थॉमस वूल्फ वाचू नये; तिशीनंतर एफ. स्कॉट फिट्झेराल्ड वाचायला नको; तिशीच्या आत चेकोव्हला हात लावू नये; पन्नाशीच्या आत प्रुस्त नको; पन्नाशीनंतर जेम्स जॉइस वाचण्याच्या भानगडीत पडू नये.”

एखाद्याला जेव्हा विशिष्ट पुस्तकाची निकड असेल, त्या वेळेला त्या विषयावरचं पुस्तक अचानकपणे त्याच्या हातात पडतं, हे एक गूढच आहे. पण असं घडतं खरं. माझ्या आयुष्यात तरी असं घडलं आहे. ‘योग्य वेळी योग्य पुस्तक हातात पडतं,’ असं जॉर्ज ऑर्वेलही म्हणाला होता.

‘ऑन रीडिंग’ हा प्रुस्तचा एक सुप्रसिद्ध निबंध आहे. त्यात प्रुस्तनं असं नमूद केलं आहे- “ग्रंथ हे संगत सोबत म्हणून मित्रापेक्षाही चांगले. त्यांच्याशी मुद्दाम गप्पा माराव्या लागत नाहीत. भेटल्यानंतर नमस्कार-चमत्कार नाहीत; कृतज्ञतेचा रामराम नाही; आणि उशीरा आल्याबद्दलची माफी मागावी लागत नाही. पुस्तकांशी मित्रांप्रमाणे उपकारबंधनाची भावना नसते. आपण ग्रंथ आपल्या जवळ बाळगतो; कारण आपल्याला त्यांच्या संगतीत राहण्याची इच्छा असते. पुस्तकातील विनोदासाठी खोटंनाटं हसावं लागत नाही. मोलिए जर आपल्याला विनोदी वाटला, तर आपण हसणार. त्याचा आपल्याला कंटाळा आला, तर कंटाळा आला आहे, हे दाखवण्याची आपल्याला भीती वाटत नाही. आणि आपल्याला वाटलं, बस झाला मोलिए; तर त्याची कीर्ती, त्याची प्रतिभा यांचा मुलाहिजा न ठेवता, आपण त्याला त्याच्या जागी कपाटात निर्भीडपणे ठेवून देतो!”

पुस्तकातला किडा

मी शाळेत असताना पुस्तकात व त्यायोगे वाचनानंदात अडकणार याची चिन्हं दिसत होती. उन्हाळ्याचे दिवस. बाहेर स्वच्छ सूर्यप्रकाश, चौदा वर्षांचा मी घरात बसून बेसबॉलवरची कादंबरी वाचत होतो! बाहेर जाऊन बेसबॉल खेळण्याऐवजी मी कादंबरी वाचणं पसंत केलं. पुस्तकातला किडा हळूहळू आकार घेत होता.

मी कधीच उत्तम विद्यार्थी नव्हतो. पण महत्त्वाची पुस्तकं कोणती, हे मला शिकागो विद्यापीठानं शिकवलं. तिथंच मी महान पुस्तकांबरोबर माझ्या आवडीची कितीतरी चांगली पुस्तकं वाचली. माझी वाचण्याची पद्धत अगदी अव्यवस्थित होती. या माझ्या पद्धतीत दोन-तीन कळीचे उद्देश होते. जीवन हे असतं तरी कसं आणि ते जगायचं कसं, हे शोधून काढण्यासाठी मी वाचत असे. हेन्री जेम्सचं एक वाक्य माझ्या डोक्यात पक्कं बसलं होतं.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा : 

द्वेष, तिरस्कार आणि सूडबुद्धीनं पेटलेली इथली माणसं आतून पूर्णतः किडली आहेत, असंच आता वाटू लागलंय...

मणिपूर धुमसतेय, मात्र खरा प्रश्न असा आहे की, आताचे दंगे ‘मैतेई विरुद्ध कुकी’ असेच का आहेत?

मणिपूर जळत आहे... पण कुणाला काय त्याचे! जळो, जळत राहो... आम्हा काय त्याचे!

.................................................................................................................................................................

हेनी म्हणतो - “प्रचंड अनुभव पुस्तकातून झटकन मिळवण्याची, जणू काही चोरण्याची कला म्हणजे जिनियस!” मी पुस्तकातून भरभरून अनुभव लुटू शकेन, अशी मला आशा होती. आणि माझ्या आयुष्यात मी तसं केलं आहे, असं मला वाटतं. कोणत्याही महान लेखकाची कलाकृती वाचताना त्या वाचनात एक प्रश्न दडलेला असतो याची मला जाणीव होत होती : या लेखक- लेखिकेला माझ्याबद्दल काय वाटलं असेल? हा प्रश्न सुलभ करून मांडायचा तर असं म्हणता येईल.

गंभीर पुस्तक वाचताना लेखकाच्या दृष्टीकोनातून वाचकाला वाचकाच्या जीवनाचा पुनर्विचार करण्याची संधी मिळते. लेखक वाचकाला जीवनाकडे नव्या नि वेगळ्या दृष्टीनं पहायला शिकवतो, हे मला अभिजात पुस्तकांच्या वाचनातून उमगत होतं.

वाचन- श्वसन

मी कधी घड्याळ लावून पाहिलं नाही; पण असा एकही दिवस जात नाही की, ज्या दिवशी मी तीन ते पाच तास वाचन केलेलं नाही. सकाळची कॉफी झाली की, माझ्या दिवसाची सुरुवात वाचनाने होते; व शेवटसुद्धा वाचनानं होतो. एकदा मी वाचायचं नाही, असा निश्चय करून पाहिला. पण मी अगदी बेचैन झालो. “हं, एवढा परिच्छेद पुरा करून आलोच” हे वाक्य ऐकतच माझी मुलं लहानाची मोठी झाली आहेत. देश-परदेशच्या प्रवासात असताना एक दिवस मला अशी हुक्की येते की, त्या दिवशी इतर काहीही न करता हॉटेलच्या खोलीत बसून फक्त वाचत राहावं!

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................

‘टेनिस, प्रवास आणि वाचन’ असं काही व्यक्ती म्हणताना आपण वर्तमानपत्रातील ‘व्यक्तिविशेष’ या सदरात वाचतो. वाचन हेच ज्याचं जीवन आहे त्याला ‘वाचन हा छंद’ ही कल्पना हास्यास्पद वाटते. मी प्रसिद्धीच्या झोतात असणारा माणूस नाही. पण उद्या समजा, कोणी माझी मुलाखत घेतली, तर ‘टेनिस, प्रवास व श्वसन’ अशी मी माझ्या छंदांची यादी देईन!

माझं वाचन म्हणजे, शहाणपणाचा शोध, एक प्रकारचा मानसोपचार, एक नियुक्त कार्य वगैरे, वगैरे असा गैरसमज करून घेऊ नका. माझ्या वाचनाचे उद्देश संमिश्र स्वरूपाचे आहेत. निखळ आनंद हा त्यांच्यातला एक महत्त्वाचा उद्देश. मी सौंदर्य-संवेदनासाठी, अ‍ॅस्थेटिक अर्थात कलात्मक आनंदासाठी वाचतो. वाढत्या वयाबरोबर मी अ‍ॅस्थेटिक शिष्ट झालो आहे. एखाद्या हीन दर्जाच्या पुस्तकावरून मी दृष्टीसुद्धा फिरवत नाही. शैलीच्या प्रेमाखातर मी वाचतो. त्याबरोबर आणखी एक आशा असते : आपल्याला दिलखुलास हसायला मिळेल. आणि मी धीर करून असंही म्हणेन की, थोडं शहाणपण मिळेल. वाचनानं या जगाबाबत आपण हुशार होऊ, अशाही एका आशेनं मी वाचत राहतो.

‘अक्षर पाविजे निर्धारे’ - डॉ. आनंद जोशी

अक्षर प्रकाशन, मुंबई | पाने - १२८ | मूल्य - १५० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......