या ‘अद्भुतिका’ नाहीत; प्रेमकथा किंवा प्रेमविरोधी कथाही नाहीत, तर पाटकरांना वेळोवेळी सुचलेल्या ‘दृश्यगोष्टी’ आहेत!
ग्रंथनामा - झलक
पंकज भोसले
  • ‘ऐसपैस’ या कथासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Tue , 01 August 2023
  • ग्रंथनामा झलक ऐसपैस Yespais रमेशचंद्र पाटकर Rameshchandra Patkar

ज्येष्ठ कलासमीक्षक आणि लेखक रमेशचंद्र पाटकर यांचा ‘ऐसपैस’ हा कथासंग्रह नुकताच लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित झाला आहे. या संग्रहाला तरुण कथाकार पंकज भोसले यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...

.................................................................................................................................................................

तीन-चार वर्षांपूर्वी म्हणजे करोनासाथीच्या आगे-मागे कधीतरी ‘लोकसत्ता’तल्या ‘बुकमार्क’मध्ये लिहिलेल्या लेखाला प्रतिक्रिया देणारा रमेशचंद्र पाटकर नावाच्या एका बुजुर्ग आवाजातला फोन आला. खरखरीत आणि थकलेला. तरीही लेखात वापरलेल्या भाषेला, ‘कॉइन’ केलेल्या शब्दांना आवर्जून दाद देण्यासाठी. आपले वय ऐंशी वगैरे सांगणारा हा आवाज नंतर पुढील काही मिनिटे सलग बोलत राहिला. ‘तुमचे इतके लेख वाचले. आज प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहवले नाही, म्हणून माझ्या जुन्या विद्यार्थ्याकडून तुमचा फोन नंबर मिळवला.’ माझ्या वयाची आणि वाचनाची आस्थापूर्वक चौकशी करून हा बुजुर्ग आवाजातील फोन नंतर प्रत्येक लिखाणाची आणि पुढे लिहिल्या गेलेल्या कथांतील तपशिलांवर चर्चा करण्यासाठी ‘बुकमार्की’ सकाळी येत राहिला.

मग पुढे मी मला परिचित असलेल्या पाटकरांच्या विद्यार्थ्यांकडे त्यांच्याबाबत चौकशी केली, तर विल्सन कॉलेजमध्ये मराठीच्या पुस्तकापलीकडची प्राध्यापकी करणाऱ्या या माणसाने कलेच्या क्षेत्रात लक्षणीय काम केले असल्याचे, सामाजिक क्षेत्रात आणि सांस्कृतिक क्षेत्रातही बरीच मजल मारली असल्याचे उमजले. कलेचा भारतीय आणि पाश्चात्त्य दृष्टीकोनातून साकारणारा मराठी ग्रंथ त्यांनी लिहिला असल्याची माहिती कुणीतरी पुरवली, तर आणखी एकाने त्यांच्या कथा साठोत्तरीतल्या ‘सत्यकथे’त छापून आल्याचे सांगितले.

दीडएक दशकापासून ‘मुक्त शब्द’ मासिकामध्ये अनुवादित किंवा स्वतंत्र कथांच्या दालनात मग हे नाव वाचल्याचे लक्षात आले. ‘सत्यकथे’चे बरेचसे खंड माझ्या संग्रहात असल्याने त्यात १९६८ ते ७२ या वर्षांत त्यांच्या कथा असल्याचे लगेचच सापडले. त्यातील जानेवारी १९६८च्या ‘सत्यकथे’च्या अंकात सुरू होणारी ‘आजी, चाफा आणि मांजर’ ही कथा वाचली आणि माझ्या लेखांतील भाषेचे कौतुक करणाऱ्या या ८० वर्षीय बुजुर्ग आवाजाविषयी मला एकाच वेळी आदर आणि दरारा वाटू लागला. पुढील काळात लेखातील पटलेले किंवा न पटलेले मुद्दे मांडण्यासाठी त्यांचा फोन येणे कधी चुकले नाही. तसेच फोनवर बोलताना त्यांना थकवा येईस्तोवर ‘ऐसपैस’ चर्चा करण्याचे सत्रही थांबले नाही.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

पुढील काळात त्यांनी मला त्यांच्या सावंतवाडीतील बालपण, गोवामुक्ती स्वातंत्र्यलढ्यात केलेली कामगिरी आणि कविता-कथांचा लागलेला चस्का यांविषयी सांगितले. आपल्या प्राध्यापकांपासून ते ‘सत्यकथा’, ‘अभिरुचि’, ‘साधना’त कुण्या एकेकाळी लिहिलेल्या ललितलेखनाच्या आठवणी जागवल्या. माझे ‘विश्वामित्र सिण्ड्रोम’ पुस्तक तातडीने वाचून त्यांनी त्यातील योजलेल्या आणि जाणीवपूर्वक वापरलेल्या भाषिक प्रयोगांना भरभरून दाद दिली. त्यांची काही पुस्तके त्यांनी मला भेट दिली आणि त्यातून त्यांच्या मार्क्सवादी विचारसरणीचा पाया लक्षात आला.

नंतरच्या भेटीत त्यांनी त्यांच्या ‘सत्यकथा’ आणि इतर ठिकाणी आलेल्या कथांचे झेरॉक्स बाड माझ्याकडे सुपूर्द केले. त्यात ‘सत्यकथे’खेरीज ‘अभिरुचि’, ‘साधना’ आणि गेल्या दशकामध्ये आलेल्या ‘मुक्त शब्द’मधील स्वतंत्र कथा होत्या. हा कथालेखनाचा क्रम विचित्र असा आहे. पहिला टप्पा ‘सत्यकथे’त राम पटवर्धन या नाणावलेल्या संपादकाकडून कथा ‘रिपेअर’ वगैरे होऊन साठोत्तरीतील भकास जगण्याकडे अतिसूक्ष्मावलोकनी नजरेतून लिहिणाऱ्या लेखकांचा सुकाळ असतानाचा.

त्या वेळीही पाटकरांच्या कॅमरातून चित्रबद्ध शैलीत उमटणाऱ्या या कथा या ‘बहुवांछिल’ मासिकातील समकालीन लिहिणाऱ्या कथालेखकांपेक्षा भलत्याच वाटेने प्रवास करताना दिसतात. एक कथा कोकणात घडते, तर दुसरी कथा रेल्वे लोकलमधला फेरफटका सुरू करून भलत्याच ठिकाणी नेते. बालक आणि त्याच्या आजोबाच्या तळ्याकाठच्या उद्यानात चालणाऱ्या चर्चाही पुढे साध्या वळणांवर राहत नाहीत किंवा साठ-सत्तर वर्षांपूर्वीचे विवाहबाह्य संबंध दाखवणारे एका कथेचे प्रकरणही तत्कालीन रूढिबाज कथानकासारखे संपत नाही.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा : 

मणिपूरला ईशान्य भारतातलं ‘काश्मीर’ होण्यापासून रोखायला हवं...

मणिपूरमधील घडणाऱ्या अमानवी घटनांकडे पाहण्याची ‘आपपरभावी वृत्ती’ त्या घटनांइतकीच हादरवून टाकणारी आहे...

मणिपूरमधील अराजक आणि ‘संविधान सभे’च्या शेवटच्या भाषणात डॉ. आंबेडकरांनी दिलेला इशारा

मणिपूरमध्ये तातडीनं शांतता प्रस्थापित करणं, ही राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारांची जबाबदारी आहे

.................................................................................................................................................................

लघुकथा लिहिण्याचे ओ-हेन्रीएटिक धक्कातंत्र किंवा मराठी लेखकांना प्रिय असा आरंभ-शेवटाचा चमत्कृतिपूर्ण प्रयोग करण्याचा या कथांना सोस नाही. अत्तरवाल्याच्या फॅण्टसीपूर्ण गोष्टीत नायिका गटवण्याची तोशीश न करता कपडे विकणारा वरचढ ठरतो आणि एखादा ॲनिमेशनपट पाहिल्यासारखे आपण त्यातील गमतीदार गोष्टीचे साक्षीदार होतो. तरीही या अद्भुतिका नाहीत; प्रेमकथा किंवा प्रेमविरोधी कथाही नाहीत, तर पाटकरांना वेळोवेळी सुचलेल्या दृश्यगोष्टी आहेत.

पाटकरांच्या कथालेखनाचा दुसरा टप्पा दोन हजारोत्तरी वर्षांतला. पण तरी या काळातील वेगवान बनलेल्या जगण्याच्या घटकांना फटकावून भलतीच वाट शोधणारा. करोनाकाळात मध्येच कधीतरी कथा सुचण्याच्या काळात त्यांचा फोन येई आणि ‘माझ्या डोक्यात एकाच वेळी तीन-चार कथा सुरू आहेत. त्यातली एक या आठवड्यात पूर्ण होईलच’, या ऐंशीउत्तर वयातील त्यांचा दांडगा उत्साह मला हेवा करण्याजोगा वाटतो.

यातली एक कथा ‘सुपर ॲब्स्ट्रॅक’ आहे. आरंभापासून शेवटापर्यंत; पण त्यातली दृश्यशक्ती जबरदस्त आहे. शहरातील मर्यादित निसर्गश्रवण करणाऱ्या मुलाची गावात स्थलांतर झाल्यानंतर ऐकू येणाऱ्या घटकांवर बेतलेली एक कथा आहे, तर दुसऱ्या कथेत गावातून स्थलांतरित होऊन अफरातफर होत असलेल्या बँकेत नुकत्याच लागलेल्या बँक कर्मचाऱ्याची राजकीय पक्षांवर चालणारी चिंतनचर्चा आहे.

आरंभबिंदूपासून अंतिम बिंदूपर्यंत नेणाऱ्या पारंपरिक कथा पाटकरांनी लिहिलेल्या नाहीत. पाटकरी ढंगांनी आणि कल्पना-भराऱ्यांनी त्या सजल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे विशिष्ट नजरेतून पाहणेच इष्ट. पाटकरांचा कलाविषयक अभ्यास आणि त्या जाणकारीतून तयार झालेली कथादृष्टी हा या कथांचा विशेष आहे.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्ट २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

............................................................................................................................................................

पुरुषोत्तम अप्पा परब, अविनाश सी. शिवदे, शरद भुंजवाडकर, शशीकांत येरनाळकर, कमलाकर शंकर गणपुले, विनोद कुलकर्णी, चंद्रहास सत्यव्रत जोशी, ल. म. आफळे, प्र. द. गाडगीळ, प्रभाकर धोटे, शरद विनायक काळे, श्रीधर हरी तावडे, रंगराव बापू पाटील, गोपाळ रेडगावकर, शैलजा डोंगरे, कौमुदी पंडित, रघुनाथ लोणकर.... ही नावे साहित्यपटलावर कितपत यशस्वी झाली, हे आज कुणीच सांगू शकणार नाही. पण ही यादी वाढवता येईल इतकी साठोत्तरीतील ‘सत्यकथा’च्या कथाविभागात सन्मानाने झळकलेली लेखकांची अज्ञात फळी आहे.

यातील काहींची पुस्तके आलीही असतील; पण ती पूर्णपणे विस्मृतीत गेलेली नावे आहेत. राम पटवर्धनांच्या काटेकोर संपादनातून ‘सत्यकथे’त कविता आणि कथा छापून येई. तिथे छापून येणे आज बुजुर्ग मान्यवर म्हणून ओळखत असलेल्या त्या काळातील अनेक तरुणांना जमले नाही, तेथे रमेशचंद्र पाटकरांच्या चार वर्षांच्या काळात विसेक कविता आणि तब्बल चार कथा झळकल्या आहेत. सप्टेंबर १९६७, जानेवारी १९६८, सप्टेंबर १९७२ आणि डिसेंबर १९७२ या अंकांतल्या कथा या संग्रहात वाचायला मिळतील.

पाटकरांनी आपल्याच कैफात आणि ढंगात लिहिलेल्या या कथा ‘सत्यकथे’ने आवर्जून छापून त्यांच्या काळापुढल्या लेखनाला प्रशस्तिपत्रकच दिले आहे. ‘अभिरुची’मध्ये दोन कथा आणि ‘साधना’मध्ये एक कथा लिहून त्यांचे अचानक उगवलेले ललितलेखन १९७२ नंतर थांबलेले दिसते. कारण काय, तर त्यांचे सामाजिक चळवळींत शिरणे आणि कलात्मक पुस्तकांचे वाचन आणि अभ्यास.

मराठीत कलाविषयक विचार उत्तमरीत्या मांडणारे पुस्तकच नाही. हे दुर्भिक्ष्य दिसल्यानंतर आपणच तो प्रकल्प का पूर्ण करू नये, हे मनात आल्यावर त्यांनी त्याचा पाठपुरावा केला आणि त्यांचा ग्रंथ तयार झाला. एकीकडे ‘ ‘सत्यकथामध्ये लिहिणारा लेखक’ हा भवतालातून असूयायुक्त सन्मान होत असताना प्राध्यापकांच्या न्यायासाठी लढणाऱ्या संघटनेच्या कामांत पाटकर सक्रिय झाले. डाव्या विचारांच्या लेखक-कवी आणि विचारवंतांत त्यांचा वावर सुरू झाला आणि ललितसाहित्यापासून दूर गेले.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................

या संग्रहातील ‘माझी एक सायंकाळ’ ही ‘सत्यकथे’त झळकलेली एक विलक्षण कथा आहे. साठोत्तरीतील मध्यमवर्गीय जाणिवांचा हा परिपाक आहे. ती रेल्वेच्या डब्यातल्या गर्दीच्या धक्क्यांचा अनुभव देते, तिथून मग वेगळे वळण घेऊन ऑफिसमधल्या एका गरुड नावाच्या व्यक्तिरेखेचा तपशील देऊन कथानकात मोठी गरुडझेप घेते. या कथेचा आरंभ आणि मधला विशेष परिच्छेद मुद्दाम मला द्यावासा वाटतोय-

“एकदा उकडायला सुरुवात झाली की, उकाड्याची पातळी सहज सहज एव्हरेस्ट गाठते आणि आभाळ तट्ट फुगून येतं. वाटतं, महारोग्याप्रमाणे आपलं अंग सडत चाललंय. वाटतं, आपण चितेवर जळतोय. जिवंतपणी अस्सल मरणाचा अनुभव, पण आपली राख होत नाही. फक्त घामाचे झरे पाझरतात. अशा वेळी खिशात रुमाल हवा असतो. त्याचा उपयोग कॉलर खराब होऊ नये, म्हणून मानेला नागासारखा गुंडाळण्यापलीकडे नसतो; पण तो हवा असतो. आपली बायको आपल्याला हवी, तसा. आजही अफलातून उकडतंय.”

या काळात ‘सत्यकथा’ आणि इतर वैचारिक-साहित्यिक मासिकांतील कथा नैराश्यवादाने आणि जागतिक ॲब्स्ट्रॅक जाणिवांनी गुंतागुंतीच्या बनलेल्या दिसतील. नवकथा लिहिणाऱ्या लेखकांचा बहर ओसरला होता आणि जी. ए. कुलकर्णी यांची नकारात्मक सृष्टीचे ज्ञान देणारी आणि दुःखांचे चिंतन करणारी कथा साहित्यपटलावर राज्य करण्यास सज्ज झाली होती. पाटकरांच्या कथेतील आयुष्याची निरर्थकता या प्रवाहाविरोधात लेखनाची गंमत शोधताना दिसते. हे सांगणारे उदाहरण ‘माझीही एक सायंकाळ’ कथेतच सापडते.

“गाडी थोडी बरी चालते. फास्ट वाटत नसली तरी त्यातच जमा केल्यासारखी वाटते. वाटतं, घरी लवकर जाऊ. हेही मनाला बी-कॉम्प्लेक्सच्या गोळीसारखं. घरी लवकर जायचं... उपयोग?... असंख्य प्रश्नचिन्हं उभी... घरी जायचं. घामाने भिजलेले कपडे काढायचे. बाजेवर उघड्या शरीरावरून हात फिरवत बरगड्या मोजायच्या व शेजारील खिडकीच्या गजाशी तोलत राहायच्या. डोळे निद्रेला उसने देईपर्यंत. तोंडातून धूर काढत त्याच्या निघणाऱ्या रेषांतून न जमणारी चित्रं काढायची किंवा बाजूला नळावर चाललेलं भांडण चवीने मटण खावं तसं पाहायचं. किंवा.... किंवा... काहीही करायचं. बायकोचे गाल कुस्करायचे... जमणारं, न जमणारं सारं करायचं.”

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा : 

द्वेष, तिरस्कार आणि सूडबुद्धीनं पेटलेली इथली माणसं आतून पूर्णतः किडली आहेत, असंच आता वाटू लागलंय...

मणिपूर धुमसतेय, मात्र खरा प्रश्न असा आहे की, आताचे दंगे ‘मैतेई विरुद्ध कुकी’ असेच का आहेत?

मणिपूर जळत आहे... पण कुणाला काय त्याचे! जळो, जळत राहो... आम्हा काय त्याचे!

.................................................................................................................................................................

साठोत्तरीतील मध्यमवर्गातील दैनंदिन जीवनाचे दृश्यात्मक चित्र पाटकर या वर्णनातून वाचकांसमोर सहज उभे करतात. ‘ब्लू नाईल’ कथेत विवाहबाह्य संबंधांच्या सरकत जाणाऱ्या घडामोडी आहेत. ‘सगळं काही सांगायला हवं’ ही कथा छोटीशी पण गोळीबंद आशय असलेली. ‘ही गोष्ट त्याची किंवा माझी’ आकलनचकवा देणारी, पण वैशिष्ट्यपूर्ण भाषाश्रीमंतीने नटलेली.

‘सत्यकथा’, ‘अभिरुची’, ‘साधना’ या परमोच्च साहित्यव्यवहार करणाऱ्या मासिकांत कथा छापून येण्याचे अप्रूप वा अभिमान न बाळगता आपल्याला हव्या तेवढ्या गतीने आणि चवीने पाटकरांनी कथा लिहिल्या आणि प्राध्यापकी समाजकार्यात गुंतून गेल्यानंतर भिन्न पातळीवर लेखन सुरू ठेवले. १९६८पासून ७२ सालापर्यंत आणि गेल्या दशकापासून गेल्या वर्षापर्यंत माझ्या या ८३ वर्षांच्या मित्राने लिहिलेल्या १२ कथांचा हा पहिला कथासंग्रह येणे ही आनंददायी बाब आहे. या लेखनातील विलक्षण चित्रमयजगत वेगळे काही वाचू पाहणाऱ्याला आवडू शकेल.

‘ऐसपैस’ - रमेशचंद्र पाटकर | लोकवाङ्मय गृह, मुंबई | पाने - ९२ | मूल्य - २०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......