इति महाकविश्रीकालिदासविरचिते मेघदूते काव्ये उत्तरमेघः समाप्तः।
पडघम - साहित्यिक
श्रीनिवास जोशी
  • रेखाचित्र चिं. द्वा. देशमुख यांच्या ‘मेघदूत’ या - वरदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या - अनुवादित आवृत्तीमधून
  • Sat , 06 August 2022
  • पडघम साहित्यिक कालिदास Kalidasa कालिदास दिन Kalidasa Din मेघदूत Meghadūta आषाढस्य प्रथम दिवसे Aashadhasya Prathama Divase

लेखांक तेविसावा

उत्तरमेघ

(लेखातला पहिला मूळ संस्कृत श्लोक कालिदासाचा आणि त्याचे अनुवाद अनुक्रमे कुसुमाग्रज, सी.डी. देशमुख आणि शांता शेळके यांचे)

४८.

संक्षिप्येत क्षण इव कथं दीर्घयामा त्रियामा

सर्वावस्थास्वहरपि कथं मन्दमन्दातपं स्यात्।

इत्थं चेतश्चटुलनयने ! दुर्लभप्रार्थनं मे

गाढोष्माभिः कृतमशरणं त्वद्वियोगव्यथामिः॥

 

युगाप्रमाणें गमती रात्री, होतिल त्यांची पळें?

शमेल का दिवसाचा वणवा ज्यांत जीव हा जळे?

मृगजल सेवावयास माझें मानस धावे असें

अगतिक झालों चंचलनयने, तुझ्या वियोगामुळें!

 

कैशी दीर्घप्रहर पळ-सी रात्र शीघ्र क्रमावी

किंवा कैशी तळमळ दिशीं सर्वकाळीं निमावी

इच्छीं वांया, तरल नयने, ठाव कोठें मिळेना

चित्ती पीडा तव विरहिंची तीव्र ही गे खळेना

 

पळासारख्या गमतिल केव्हां या विरहाकुल प्रदीर्घ रात्री?

दिवस कधीं हे सरावयाचे अनलासम जे जळती गात्री?

दुर्लभ त्याची करित प्रतीक्षा मन हें झुरतें, सखि, रात्रंदिन

हरिणलोचनें, विरहाचा मी ताप साहतों होउनि अशरण!

 

हे चपलनेत्री, दुर्लभ इच्छांनी माझे मन भरून गेलेले आहे. दीर्घ प्रहरांची रात्र एखाद्या क्षणासारखी लहान कशी होईल, आणि, दिवस त्याच्या सर्व प्रहरांमध्ये कमीत कमी तापदायक कसा होईल, असे विचार मी करत राहतो. अशा अमर्याद इच्छा करणारे माझे मन, तुझ्या विरहाच्या तीव्र अशा दुःखाने असहाय्य झाले आहे.

विरहामुळे रात्री जाता जात नव्हत्या आणि कुठल्याही प्रहरात दिवस ऐन मध्यान्हीसारखा तीव्र वाटत होता.

कुसुमाग्रजांनी यक्षाची व्यथा फार सुंदर शब्दांत चितारली आहे-

‘युगाप्रमाणें गमती रात्री, होतिल त्यांची पळें?

शमेल का दिवसाचा वणवा ज्यांत जीव हा जळे?

मृगजल सेवावयास माझें मानस धावे असें

अगतिक झालों चंचलनयने, तुझ्या वियोगामुळें!’

अप्राप्य अशा मनोरथांचे मृगजळ पिण्यासाठी माझे मानस धावते आहे!

सीडी लिहितात -

‘इच्छीं वांया, तरल नयने, ठाव कोठें मिळेना

चित्ती पीडा तव विरहिंची तीव्र ही गे खळेना’

हे तरल-नयने, वाया जाणाऱ्या इच्छांच्या गोंधळात मला कुठेही ठाव मिळत नाहिये! माझ्या चित्तामधील तुझ्या विरहाच्या तीव्रतेला अजिबात खळ नाहिये!

४९.

नन्वात्मानं बहु विगणयन्नात्मनैवावलम्बे

तत्कल्याणि! त्वमपि नितरां मा गमः कातरत्वम्।

कस्यात्यन्तं सुखमुपनतं दुःखमेकान्ततो वा

नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण॥

 

धीर मनाला देउनि करतों सहन सखे ही निशा

होउं नको तूं हताश - उगवे अंधारांतुन उषा

कुणास लाभे सौख्य चिरंतन, कुणास वा आपदा

चक्रगतीनें खालींवरतीं सुखदुःखांच्या दशा!

 

संकल्पांत करुनि बहु मी आपुला रक्षि जीव

तेव्हां तूही हृदयिं सखये दे भयातें न ठाव

कोणा लाधे सुखचि अथवा दुःख ज्या पार नाहीं

चाकीं खालीं वरि फिरतसे धाव, तैशी स्थितीही

 

विचार करतों किती स्वतःशीं मलाच मी मग धीरहि देतों

तूहि न व्हावें कातर हृदयीं, तुज, कल्याणी, एक सांगतों

सांग कधीं का कुणा लाभतें आत्यंतिक सुख तसें दुःखही

चक्र जीवनाचें हें, केव्हां खालीं, केव्हां वरती जाई!

 

खूप सारे विचार करून शेवटी मी मला धीर देतो आहे. त्यामुळे हे कल्याणी, तू सुद्धा फार चिंता करू नकोस. शाश्वत सुख कोणाला मिळाले आहे आणि कधीही न संपणारे दुःख तरी कोणाच्या वाट्याला आले आहे? चाकाची धाव खाली जाते, तशी पुन्हा वरसुद्धा येते. तसेच परिस्थितीचेही असते.

बापट-मंगरूळकर-हातवळणे त्यांच्या टिपेमध्ये विल्सन यांची टीप देतात – “प्रो. विल्सन यांनीं म्हटल्याप्रमाणें यक्षाची ही धैर्यशाली वृत्ति अचानक आल्यासारखी वाटली, तरी ती तितकीच साहजिक आहे. संकटांत पडलेल्या सहचरांनीं परस्परांना धीर द्यावा, त्यांतही पतीनें पत्नीला, हें अगदी नैसर्गिक आहे.”

कुसुमाग्रजांनी या श्लोकाच्या शेवटच्या दोन ओळींचा इतका सुंदर अनुवाद केला आहे की, त्या ओळींना सुभाषिताचा दर्जा प्राप्त झाला आहे-

“कुणास लाभे सौख्य चिरंतन, कुणास वा आपदा

चक्रगतीनें खालींवरतीं सुखदुःखांच्या दशा!”

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

५०.

शापान्तो मे भुजगशयनादुत्थिते शार्ङ्गपाणी

शेषान्मासान् गमय चतुरो लोचने मीलयित्वा।

पश्चादावां विरहगुणितं तं तमान्माभिलाषं

निर्वेक्ष्यावः परिणतशरच्चन्द्रिकासु क्षपासु॥

 

जागृत होतां हरि शेषावर शापकाल हा सरे,

कसेतरी हे चार मास कर धीरानें साजरे,

वियोगकालीं मधुर मनोरथ रचले जे मानसीं

प्रफुल्ल शरदांतील चांदण्यामधें करूं ते पुरे!

 

संपे शाप त्याजल हरि जो आपुली शेष शय्या

चौमासांत नयन मिटुनी घालवीं राहिलेल्या

नाना इच्छा विरहिं मनिं ज्या घोळती त्या पुढें गे

भोगूं रात्रीं शरदिं जंव ते चांदणे पूर्ण रंगे

 

सरेल माझा शाप, सागरी जागतील जैं श्रीनारायण

चार मास हे सार कसे तरि तोंवर, सजणी, डोळे झांकुन

नंतर विरहें तीव्र जाहल्या मनोरथांची करूं परिपूर्ती

भोग भोगुं या लख्ख चांदण्यामधिं शरदाच्या सुंदर राती

 

विष्णू आपल्या शेषावरील निद्रेतून उठले म्हणजे माझा शाप संपेल. तेव्हा आता राहिलेले चार महिने तू डोळे मिटून काढ. एकदा शाप संपला की, नंतर विरहामुळे उत्कट झालेली आपली प्रत्येक अभिलाषा शरद ऋतूमधील टिपूर चांदण्यांने फुललेल्या रात्री आपण तृप्त करून घेऊ.

राहिलेले चार महिने तू डोळे मिटून काढ म्हणजे तुझ्या दुःखांकडे न बघता काढ, मन घट्ट करून काढ.

बोरवणकर टीप देतात की, “आषाढ शुद्ध एकादशीला विष्णू निजतात आणि कार्तिक शुद्ध एकादशीला ते आपल्या योगनिद्रेतून जागे होतात. म्हणून आषाढी एकादशीला ‘शयनी’ एकादशी आणि कार्तिकी एकादशीला ‘प्रबोधिनी’ एकादशी म्हणतात.”

५१.

भूयश्चाह त्वमपि शयने कण्ठलग्ना पुरा मे

सान्तर्हासं कथितमसकृत्पृच्छतश्च त्वया मे।

दृष्टः स्वप्ने कितव ! रमयन्कामपि त्वं मयेति

निद्रां गत्वा किमपि रुदती सस्वनं विप्रबुद्धा॥

 

आठवते का, होतिस निजली हात गळां घालुनी

जाग अचानक आली, गळले अश्रू डोळ्यांतुनी

खोदखोदुनी पुसतां तुजला, लाजुनिया सांगसी

स्वप्निं पाहिली कवेंत तव मीं अन्य खला, कामिनी!

 

हेही सांगे : बिलगुनि मला एकदां तूं पलंगीं

होशी झोपेमधुनि सहसा हुंदके देत जागी

त्या वेळीं म्यां बहुत पुसतां सस्मिता बोललीस

तूंतें स्वप्नीं रमवित, शठा, पाहिलें मी दुजीस

 

स्मरते का, तुज निद्रित होतिस हात तुझा मम कंठीं वेढुन

अवचित जागी झालिस, सखये, रडतांना तूं स्फुंदन स्फुंदुन

जरा लाजुनि बोललीस मग पुन्हां पुन्हां मी कारण पुसतां

शठा! पाहिलें, अरे, तुला मी सवतीसंगें कोण्या रमतां

 

तुझा प्रियकर आणखी म्हणाला - पूर्वी एकदा शय्येवर माझ्या गळ्याला मिठी मारून तू झोपली होतीस तेव्हा अचानक रडत रडत तू जागी झालीस. मी पुन्हा पुन्हा कारण विचारले, तेव्हा तू मंद स्मित करून म्हणालीस की, ‘लबाडा, तू दुसऱ्या कुणा स्त्रीला रिझवत होतास, असे मी स्वप्नात पाहिले.’

बापट-मंगरूळकर-हातवळणे या श्लोकाबद्दल लिहितात – “कार्तिकातल्या चांदण्या रात्री आपण भेटू, असा दिलासा दिल्यावर वास्तविक यक्षाचा संदेश संपलाच होता, परंतु मेघ आपल्याला फसवीत तर नाही ना, अशी शंका आपल्या पत्नीच्या मनात येऊ नये म्हणून एकांतात घडलेली एक घटना यक्षाने मेघाला खुणेसाठी सांगितली आहे.”

५२.

एतस्मान्मां कुशलिनमभिज्ञानदानाद्विदित्वा

मा कौलीनाच्चकितनयने! मय्यविश्वासिनी भूः।

स्नेहानाहुः किमपि विरहे ध्वंसिनस्ते त्वभोगा

दिष्टे वस्तुन्युपचितरसाः प्रेमराशीभवन्ति॥

 

कळेल माझें कुशल, खूण ही दोघांतिल जाणतां

प्रवाद कांही असतो, न ठेवीं हृदयीं साशंकता

स्नेहबंधनें विरत वियोगीं म्हणती, पण ना खरें

दुरावण्यानें अधिक वाढते प्रीतीची गाढता!

 

जाणावें गे मम कुशल या ओळखीच्या खुणेनें

शंका माझ्याविषयिं नसुं दे बोलती लोक तेणें

माया लोपे विरहिं म्हणती व्यर्थ ना भोगतांही

प्रीतिस्थानीं रस भरुनियां प्रेमराशी घडे ही

 

ओळखून ही खूण आपुल्या एकान्तांतिल, कुशल जाण मम

प्रवाद जरि कां येतिल कानीं, मुळीं न ठेवी चित्तीं संभ्रम

विरहामध्यें स्नेह उणावे, म्हणती कोणी खरें न परि तें

जरा दुरावा उभयांमध्ये पडतां प्रीती अधिक वाढते!

 

ही खुणेची गोष्ट सांगितल्यावर तरी मी सुखरूप आहे, याची खात्री तुला पटली असेल. लोकप्रवादावरून तू माझ्याबद्दल कसलीही शंका घेऊ नकोस. हे नीलनयने, लोक काय बोलतात या कडे लक्ष देऊन तू माझ्याबद्दल कसलीही शंका घेऊ नकोस. विरह झाला असता स्नेहबंध लयाला जातात, असे म्हटले जाते ते अविचाराचे आहे. खरं तर इच्छित वस्तूचा उपभोग मिळाला नाही, तर त्या वस्तूची मधुरता आणि तिच्याविषयीची उत्कटता मनामध्ये वाढतच जाते. आणि, शेवटी या उत्कटतेची परिणिती प्रेमाची राशी तयार होण्यात होते.

ही भावना सीडींनी फार सुंदर शब्दांत व्यक्त केली आहे -

‘माया लोपे विरहिं म्हणती व्यर्थ ना भोगतांही

प्रीतिस्थानीं रस भरुनियां प्रेमराशी घडे ही’

विरहामुळे प्रीतिस्थानी रस भरला जातो आणि प्रेमाची एक रासच्या रास उभी राहाते!

५३.

आश्वास्यैवं प्रथमविरहोदग्रशोकां सखीं ते

शैलादाशु त्रिनयनवृषोत्खातकूटान्निवृत्तः।

साभिज्ञानप्रहितकुशलैस्तद्वचोभिर्ममापि

प्रातः कुन्दप्रसवशिथिलं जीवितं धारयेथाः॥

 

या शब्दांनीं तिजला मित्रा, करूनि आश्वासित

परत पुन्हा ये हिमालयाहुन, वेगानें वाहत

संकेतासह तिचेंहि कळवीं कुशल मला येउनी

उष:कालच्या कुंदापरि मज मिळेल नव जीवित!

 

आश्वासोनी प्रथम-विरहीं विह्वला भ्रातृजाया

नंदी ज्याचीं उकरि शिखरें शीघ्र सोडी नगा या

तीच्या शब्दीं कळवुनि तिचें क्षेम सांगोनि खूण

प्रातः कुन्दासम मम गळे जीव घे सांवरून

 

विरहें पहिल्या व्याकुळ सखि मम, यास्तव देऊनि तिज् आश्वासन

हिमाचलाच्या शिखरांवरुनी वेगें, सखया, येईं परतुन

कुशलवचन ऐकतां प्रियेचें संकेताच्या खुणा जाणवुन

पहाटवेळी कुंदफुलासम मिळेल मजला नवसंजीवन!

 

हा आमचा पहिलाच विरह असल्याने हे मेघा, तुझ्या सखीला अपार दुःख झालेले असणार. तेव्हा माझा निरोप देऊन तिचे समाधान कर. तिला धीर दे. त्यानंतर भगवान शंकराच्या नंदीने ज्या पर्वताची शिखरे विदीर्ण केली आहेत, अशा त्या कैलास पर्वतावरून त्वरित परत फीर. तिचा निरोप ती तुला खुणेसहीत देईलच. तिच्या कुशलवार्तेचा निरोप तिच्या शब्दांत मला दे आणि पहाटेच्या कुंदफुलांप्रमाणे दुर्बल झालेला माझा जीव सावरून धर.

बोरवणकरांनी येथे कुंदाच्या फुलांविषयी टीप दिलेली आहे- “कुंदाची फुले सायंकाळी फुलतात आणि सकाळी त्यांचे देठ अगदी दुर्बल झालेले असतात.”

बापट-मंगरूळकर-हातवळणे लिहितात – “माझे जीवित प्रभाती सैल होऊन पडणाऱ्या कुंदाच्या फुलांप्रमाणे हळवे झाले आहे.”

सीडींनी ही भावना फार सुंदर व्यक्त केली आहे -

“तीच्या शब्दीं कळवुनि तिचें क्षेम सांगोनि खूण

प्रातः कुन्दासम मम गळे जीव घे सांवरून”

तिच्या शब्दात तिचे क्षेम तू मला सांग. मला गुप्त खूणसुद्धा सांग. आणि प्रातःकालच्या कुंदासारखा माझा जीव गळून चालला आहे त्याला सावरून घे.

५४.

कश्चित्सौम्य! व्यवसितमिदं बन्धुकृत्यं त्वया मे

प्रत्यादेशान्न खलु भवतो धीरतां कल्पयामि।

निःशब्दोऽपि प्रदिशसि जलं याचितश्चातकेभ्यः

प्रत्युक्तं हि प्रणयिषु सतामीप्सितार्थक्रियैव॥

 

करशिल ना हें कार्य व्हावया सुखी तुझा बांधव?

अबोल अससी, न मी मानितों यांत अनिच्छा तव

देसी जीवनदान चातकां ना करितां वल्गना

उत्तर देती सुजन कृतीनें – हें त्यांचे गौरव!

 

का मित्राचें मम ठरविले कार्य नेण्यासि पार

तूझ्या मौनावरून समजें खास मी ना नकार

पाणी देशी न वच वदतां मागत्या चातकांना

इच्छापूर्ति प्रतिवच भला हेच दे याचकांना

 

स्वीकारिसि ना कार्य, सख्या, हें केवळ माझ्या स्नेहाखातर?

मूक जरीं तूं, तरि न दिसे मज तुझी अनिच्छा यांत खरोखर

अबोल राहुनि, घना, सुखविसी जलदानें तू आर्त चातका

कृतिनें प्रियजन तृप्त करावे, ही सुजनांची रीत नसे का?

 

हे सौम्य, तू आपल्या मित्राचे हे काम करायचे ठरवले आहेस ना? माझ्या विनंतीवर तू मौन बाळगून आहेस, याचा अर्थ तू माझ्या कामाला नकार देतो आहेस, असे मी समजत नाही. कारण, चातकांनी विनवणी केली असताना तू गर्जना न करता त्यांना जल देतोस. याचकांची अभिलाषा पूर्ण करणे हेच याचकांच्या विनंतीला थोरांचे उत्तर असते.

बोरवणकर म्हणतात की, मेघ म्हणजे धूर, ज्योती, पाणी आणि वारा यांचा मेळ आहे, असे यक्षाने म्हटले आहे. असे असूनही यक्षाने मेघापुढे एवढा ग्रंथ वाचला आहे. यक्ष ‘कामार्त’ आहे, म्हणून त्याने चेतन काय आणि अचेतन काय याची पर्वा न करता मेघाला कामगिरी सांगितली आहे. अशा पार्श्वभूमीवर आता जर मेघाने यक्षाला उत्तर दिले असते, तर ते फारच अस्वाभाविक वाटले असते. म्हणून कवीने कौशल्याने मेघाकडून ‘मूकसंमती’ मिळवली आणि आपल्या ग्रंथाला विराम दिला आहे.

बोरवणकरांनी या संदर्भात विल्सनसाहेबाचाही उतारा दिला आहे- “We cannot help pausing -- here to remark the ingenuity of the poet in the conduuct of his work. He sets out with excusing the apparent absurdity of the Yaksha's addressing himself to a cloud as to a rational being, by introducing a pleasing and natural sentiment. The cloud has now received his charge, and something is expected by way of reply, expressive either of refusal or assent, to have given the cloud anything like the faculty of speech, would have been straining probability over much; and we see in the above lines with what neatness has extricatad himself from the dilema.”

“येथे कवीच्या चातुर्याचे कौतुक वाटून आपल्याला क्षणभर थांबावेसे वाटते. एक यक्ष एका मेघाशी बोलतो आहे, अशी सुरुवात करून कवीने काव्य सुरू केले आहे. आता मेघाला त्याचा निरोप मिळाला आहे. आता मेघाने काहीतरी बोलणे अपेक्षित आहे. त्याचा होकार किंवा नकार आता अपेक्षित आहे. मेघ जर येथे बोलला असता तर संभाव्यता जरा जास्त ताणली गेली असती. पण या श्लोकाकडे बघितले तर आपल्याला जाणवाते की, कवीने स्वतःला या तिढ्यातून व्यवस्थित सोडवून घेतले आहे.”

५५.

एतत्कृत्वा प्रियमनुचितप्रार्थनावर्तिनो मे

सौहार्दाद्वा विधुर इति वा मय्यनुक्रोशबुद्ध्या।

इष्टान्देशाञ्जलद ! विचर प्रावृषा संभृतश्री

र्मा भूदेवं क्षणमपि च ते विद्युता विप्रयोगः॥

 

मीच जाणतों अनुचित माझी मित्रा, ही प्रार्थना

परी मनाला देत दिलासा स्नेहाची भावना

वर्षावैभव मिळवुनि नंतर चपलेसह हो रत

तुझ्या ललाटीं कधीं नसो ही विरहाची वेदना!

 

हें साधोनी हित मम जरी मागणे नानुरूप

सख्ये किंवा मजसि विरहीं होउनी सानुकंप

वर्षाकाले अधिक विभवा पावुनी, इष्टदेशीं

जाई मेघा, विरह कधिंही ना तुझा हो विजेशीं

 

कळतें मजला अनुचित आहे करणें मी तुज अशी याचना

स्नेहशील तू करुणेनें पण पुरवशील मम खचित कामना

जलभारानें लवलेल्या त्वां इष्ट असा तर मार्ग धरावा

विद्युत्सखिचा विरह, घना रे, माझ्यासम तुज क्षणहि न व्हावा!

 

हे मेघा, खरं तर मी तुला असे कार्य करायला सांगणे उचित नाहिये. परंतु, मैत्रीखातर म्हण किंवा मी माझ्या प्रियेपासून वियुक्त आहे म्हणून म्हण, मी तुला हे कार्य करण्याचा आग्रह करतो आहे. माझे हे कार्य तू कर! आणि, हे मेघा, या वर्षाकालात तुझे सौंदर्य आणि ऐश्वर्य असे दोन्हीही अतिशय वृद्धिंगत झालेले आहे. या सौंदर्यानिशी तू तुझ्या इच्छेला येईल तिकडे संचार कर. माझ्याप्रमाणे तुझी प्रिया विद्युल्लतेशी तुझा एक क्षणभर देखील वियोग न होओ अशी मी प्रार्थना करत आहे!

‘माझ्या प्रियेला माझा निरोप सांग’ अशी याचना करणे यक्षाला अनुचित वाटते आहे. त्याविषयी बापट-मंगरूळकर-हातवळणे यांनी टीप दिली आहे-

“आपले काम व्हावे याची निकड यक्षाला वाटते आहे, पण त्याचबरोबर आपण मेघासारख्या इंद्राच्या अमात्याला, पुष्करावर्तकांच्या घराण्यांत जन्मलेल्या विभूतीला असले संदेश वाहकाचें काम सांगत आहों हें योग्य नव्हे, अशा भावनेनें त्याचें मन अवघडलें आहे. म्हणून अनुनयाच्या स्वरांत तो त्याची विनवणी करीत आहे. आपल्या मैत्रीसाठीं म्हण, किंवा मी विरही आहे, दयेला पात्र आहें या भावनेनें म्हण, मी जरी तुला न शोभेसें काम सांगितलें असले तरी तूं तें कर असें म्हणण्यांत त्याच्या मनाची सारी केविलवाणी अवस्था दिसून येते. माझ्यासाठीं तुला मी आखलेल्या मार्गानें जावें लागत आहे याची मला जाणीव आहे, पण एवढें काम झाल्यावर वर्षा ऋतूनें तुला अर्पिलेल्या शोभेनें देह खुलवून तू तुला हव्या त्या प्रदेशांत फीर; खरोखरी कामसंचारी हो, अशी मोकळीक यक्ष मेघाला देतो. आपल्याला झालें तसें दुःख आणखी कोणाला कधींही सोसावें लागू नये, असलें संकट आपल्या वैऱ्यावरही कधी येऊ नये, -- मग मित्रांची तर गोष्टच नको असें मानण्यांत दाक्षिण्याची, सौजन्याची परमावधि आहे. सद्गदित होऊन यक्ष मेघाला आशीर्वाद देतो आहे की, ‘तुझा विद्युल्लतेशीं क्षणभरही वियोग न होवो, वर्षभराच्या वियोगाची तर गोष्टच सोडा, क्षणभरही वियोग न होवो’.”

सीडी लिहितात -

‘हें साधोनी हित मम जरी मागणे नानुरूप

सख्ये किंवा मजसि विरहीं होउनी सानुकंप

वर्षाकाले अधिक विभवा पावुनी, इष्टदेशीं

जाई मेघा, विरह कधिंही ना तुझा हो विजेशीं’

मित्रभावनेने म्हण किंवा माझ्या विरही अवस्थेशी अनुकंपा वाटल्यामुळे म्हण, माझे मागणे अनुरूप नसले तरी तू माझे हित साधून दे. या वर्षाकालामध्ये अजून वैभव प्राप्त करून तू तुला वाटते आहे त्या प्रदेशात संचार कर. तुझा विजेशी कधीही विरह न होवो!

अशा रीतीने कविकुलगुरू श्री कालिदास यांचे ‘मेघदूत’ हे काव्य समाप्त झाले!

..................................................................................................................................................................

लेखांक पहिला : कालिदासाच्या काव्यातील एकेक श्लोक सौंदर्यवंत ऐरावतासारखा झुलत राहतो, आणि त्यावर आशयाचा ऐश्वर्यमान इंद्र आरूढ झालेला असतो!

लेखांक दुसरा : उत्कंठा उत्पन्न करणाऱ्या त्या मेघासमोर यक्ष आपले अश्रू आवरत कसाबसा उभा राहिला…

लेखांक तिसरा : कालिदास आपल्याला आपल्या जगातून उचलतात आणि प्रेमाच्या व सौंदर्याच्या तीव्र संवेदनांनी भारलेल्या जगात घेऊन जातात…

लेखांक चौथा कालिदासाला जेव्हा जेव्हा प्रकृतीतील अपार सौंदर्य दिसते, तेव्हा तेव्हा त्याला पुरुष-तत्त्वाची आठवण होते…

लेखांक पाचवा : कालिदासाच्या सौंदर्यदृष्टीचा स्पर्श त्याच्या अनुवादकांनासुद्धा होतो…

लेखांक सहावा : येथून आपला कालिदासाच्या ‘मेघदूता’तील श्रृंगाररसाच्या प्रवाहात प्रवेश होतो.…

लेखांक सातवा : आपल्या प्रेमामुळे दुसरी व्यक्ती किती आनंदी होते आहे, यावर आपल्या प्रेमाचे भाग्य अवलंबून असते!

लेखांक आठवा : कालिदास सगळे वातावरणच स्त्री-पुरुषांतील प्रेमामध्ये अध्याहृत असलेल्या अनिवार वेडाने भारावून टाकतो...

लेखांक नववा : प्रेमात पडलेल्या स्त्रीच्या प्रेमाचा अव्हेर करणे, यक्षाला योग्य वाटत नाही. म्हणून तो मेघाला सांगतो आहे…

लेखांक दहावा : कालिदासाची सौंदर्यदृष्टी किती सूक्ष्म निरीक्षणांतून जन्मली आहे, याची अनेक उदाहरणे देता येण्यासारखी आहेत…

लेखांक अकरावा : ‘मेघदुता’तल्या ४७व्या श्लोकातील एका ओळीचा अनुवाद करताना सगळ्याच अनुवादकांची धांदल उडालीय...

लेखांक बारावा : मेघ थोर कुळातील असून जलसंपदा हे त्याचे वैभव. ते कारणी लागावे ही यक्षाची इच्छा आहे…

लेखांक तेरावा : निसर्गातील वस्तुजाताला सुंदर असे व्यक्तिस्वरूप देणे, हा कालिदासाच्या प्रतिभेचा एक अजब धर्म आहे...

लेखांक चौदावा : स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वात आणि सौंदर्यात विद्युल्लता लपलेली असते, हे कालिदासाला जेवढे जाणवले, तेवढे दुसऱ्या कुठल्या कवीला जाणवले असेल, असे वाटत नाही

लेखांक पंधरावा रत्नदीपांवर सुगंधाचा वा गुलालाचा किंवा हिऱ्याच्या कणिकांचा मेघ तरळतो आहे

लेखांक सोळावा : इतर वेळी पिणाऱ्याची दक्षता घालवणारे मद्य इथे मात्र अत्यंत दक्षपणे मदनाचे कार्य करत आहे...

लेखांक सतरावा : अशोकाला जसा ‘तो’ नाजूक लत्ता-प्रहार हवा आहे, तसा ‘तो’ यक्षाला स्वतःलाही हवा आहे…

लेखांक अठरावा : सौंदर्य, काम, प्रेम आणि निष्ठा हे या यक्ष आणि यक्षिणीच्या जीवनातील चार मुख्य आधारस्तंभ आहेत!

लेखांक एकोणविसावा : अभ्रांनी आच्छादलेल्या दिवशी कमलिनी ना नीट फुललेली आहे, ना नीट मिटलेली आहे…

लेखांक विसावा : कालिदास काय किंवा यक्ष काय... स्त्रीविषयी अत्यंत आदर असलेली व्यक्तिमत्त्वं होती!

लेखांक एकविसावा : कळ्यांना ज्या हळूवारपणे तू जागे करतोस, त्याच हळूवारपणे तू तिलाही जागे कर…

लेखांक बाविसावा वाऱ्याने तुला स्पर्श केलेला असतो आणि तुझे अस्तित्व त्याच्या श्वासातून वाहत असते…

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा