‘मेघदुता’तल्या ४७व्या श्लोकातील एका ओळीचा अनुवाद करताना सगळ्याच अनुवादकांची धांदल उडालीय...
पडघम - साहित्यिक
श्रीनिवास जोशी
  • चंबळा नदीचा मार्ग आणि तिचं एक छायाचित्र
  • Sat , 23 July 2022
  • पडघम साहित्यिक कालिदासKalidasa कालिदास दिन Kalidasa Din मेघदूत Meghadūta आषाढस्य प्रथम दिवसे Aashadhasya Prathama Divase

३० जूनपासून आषाढाला सुरुवात झाली… आणि आषाढ म्हटला की, अनेकांना महाकवी कालिदासाच्या ‘मेघदूत’ची आठवण येते. ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या त्यातल्या शब्दांना तर ‘मोस्ट कोटेबल कोट’चा दर्जा मिळालाय! आणि ‘मेघदूत’? त्याची ख्याती काय वर्णावी! गेल्या अनेक वर्षांपासून ‘मेघदूत’ मराठीसह जगभरच्या लेखक, कवी, अनुवादक आणि रसिकवाचकांना मोहिनी घालत आले आहे. त्याची ओळख करून देणारे हे सदर १२ जुलैपासून रोज...

.................................................................................................................................................................

लेखांक अकरावा

पूर्वमेघ

(लेखातला पहिला मूळ संस्कृत श्लोक कालिदासाचा आणि त्याचे अनुवाद अनुक्रमे कुसुमाग्रज, सी.डी. देशमुख आणि शांता शेळके यांचे)

४६.

त्वय्यादातु जलमवनते शार्ङ्गिणो वर्णचौरे

तस्याः सिन्धोः पृथुमपि तनुं दूरभावात्प्रवाहम्।

प्रेक्षिष्यन्ते गगनगतयो नूनमावर्ज्य दृष्टी

रेकं मुक्तागुणमिव भूवः स्थूलमध्येन्द्रनीलम्॥

 

नीलवर्ण तूं जल सेवाया लवतां सरितेवरी

विशाल तरि ती निरुंद त्यांना, पथ ज्यांचा अंबरीं

सुरादि म्हणतिल क्षमाकटीवर मौक्तिकमाला दिसे

इंद्रनील रत्नांची झळके मध्यावर मंजरी!

 

पाणी घेण्या जंव उतरशी कृष्णवर्णापहारी

तीच्या पात्रीं पृथुल परि जें भासतें सान दुरीं

तेव्हां दृश्या गगनजन त्या पाहूनी मानतील

मोत्यांचा हा सर अवनिचा ज्यामधें स्थूलनील

 

श्रीकृष्णासम श्यामकान्त तूं जलपानास्तव झुकतां तीवरि

माना वळवुनि बघतिल तिज गंधर्व सिद्धही गगनविहारी

दुरून कृश ती गमेल सरिता जळभारानें पुष्ट तरीही

इंद्रनील मधिं सर मोत्यांचा एकेरी जणुं वसुधाहृदयीं

 

कृष्णाचा श्यामल वर्ण चोरणारा तू पाणी पिण्यासाठी खाली उतरशील, तेव्हा आकाशमार्गाने जाणारे सिद्ध खाली वाकून पाहात असतील. चंबळा नदीचे पात्र विस्तीर्ण असले तरी दूर आकाशातून बघताना अगदी अरुंद दिसत असेल. त्या अरुंद पात्रावर तू उतरलास की, वरून बघणाऱ्या सिद्धांना मध्यभागी टपोरा इंद्रनील मणी असलेला हा मोत्याचा सर पृथ्वीने परिधान केलेला आहे, असे वाटत राहील. आकाशातील सिद्ध ही शोभा आपली दृष्टी रोखून बघत राहतील.

नदीवर उतरलेला कृष्णमेघ हा इंद्रनील मणी आणि त्याच्या उजव्या डाव्या बाजूंनी वाहणारा नदीचा शुभ्र प्रवाह म्हणजे मोत्यांचा शुभ्र सर, अशी ही शोभा आहे.

४७.

तामुत्तीर्य व्रज परिचितभ्रूलताविभ्रमाणां

पक्ष्मोत्क्षेपादुपरि विलसत्कृष्णशारप्रभाणाम्।

कुन्दक्षेपानुगमधुकरश्रीमुषामात्मबिम्बं

पात्रीकुर्वन् दशपुरवधूनेत्रकौतूहलानाम्॥

 

पुढें पथावर दशपुरनगरी, रम्य तिथें भामिनी

जरा विसावुन पहा तयांच्या नजरेची मोहिनी

वरी पापण्या करून बघतां, रंगशलाका किती

कुंदफुलांसह हेलकावती काय अली लोभुनी!

 

ती लंघोनि  स्वतनु नवलें मन्दसारस्त्रियांस

पाहो द्यावी, सहजच जयां भ्रूलतांचे विलास

कुन्दासंगें भ्रमर उडतो त्यापरी नेत्त्रिं ज्यांचे

पातें हाले तंव वरिवरी नीलिमा शुभ्रिं नाचे

 

ओलांडुन तिज जाईं पुढतीं दशपुरनगरी गाठ, घना, तूं

ललना सुंदर तिथल्या त्यांच्या नयनकौतुका होईं हेतू

उचलुनियां पापणी पाहतां असे झळकतिल कटाक्ष त्यांचे

कुंदफुलांवर धवल गुंजती पुंज काय ते कृष्ण अलींचे

 

चर्मण्वती नदी ओलांडून गेल्यावर दशपूर नगरातल्या तरुणी तुझ्यावर अत्यंत कौतुकाने आपले नेत्र रोखतील. अभिलाषांनी भरलेल्या त्यांच्या नेत्रांच्या टप्प्यांच्यामध्ये तू स्वतःला सादर कर. भ्रूलतांचे म्हणजे नाजुक भिवयांच्या वेलींचे विलास या तरुणींच्या चांगल्याच परिचयाचे आहेत. त्यांनी आपल्या पापण्या वर उचलल्या की, चित्रविचित्र रंगांच्या प्रभा विलसू लागतील. कुंदपुष्पांची फुले वाऱ्यावर हेलकावत असतात, तेव्हा भ्रमरसुद्धा त्यांच्याभोवती हेलकावे घेत असतात. या तरुणी जेव्हा आपले नेत्र उघडतात, तेव्हा त्या कुंदपुष्पांची आणि त्यांच्या बरोबर हेलकावे घेणाऱ्या भ्रमरांची शोभासुद्धा  हिरावून घेतली जाते. अशा या दशपुरातील ललनांच्या नयनांमध्ये तरंगणाऱ्या अभिलाषेचा तू विषय हो आणि पुढे जा!

‘तामुत्तीर्य वज परिचितभ्रूलताविभ्रमाणां पक्ष्मोत्क्षेपादुपरिविलसत्कृष्णशारप्रभाणाम्।’ या ओळीचा अनुवाद करताना सगळ्याच अनुवादकांची बरीच धांदल उडाली आहे.

कुसुमाग्रज लिहितात तरुणींनी पापण्या वर करून बघितले की, रंगगशलाका उसळून आलेल्या दिसतात.

बोरवणकर म्हणतात की, तरुणींनी पापण्या उचलल्या की, चित्रविचित्र रंगाच्या प्रभा विलसत असलेल्या दिसतात.

वसंत बापट आणि इतर अनुवादक म्हणतात की, तरुणींनी पापण्या उचलतल्या की, काळ्याशार प्रभा उठून दिसतात.

रा. शं. वाळिंबे म्हणतात की, पापण्या वर होताच त्यांची निळसर कांती खुलून दिसते आहे.

एम. आर. काळे म्हणतात की, तरुणींनी पापण्या उचलल्यावर ‘dark and variegated lustres flash up’ - म्हणजे गडद आणि विविधरंगी चमकदार शलाका उसळून उठतात.

बोरवणकर त्यांच्या टिपेमध्ये म्हणतात की, पापण्या वर केल्यामुळे चित्रविचित्र रंगांच्या प्रभा कशा काय विलसत आहेत, हे समजणे कठीण आहे.

पापण्या उचलल्या की, बुबुळांचा काळा रंग उसळून उठेल, इतर रंग कसे उसळून उठतील, असा प्रश्न अनुवादकांना पडलेला आहे.

विचार करताना मनात विचार येतो की, त्या तरुणींच्या डोळ्यात उमटणाऱ्या अभिलाषा, उत्कंठा अशा सुंदर आणि विविध भावनांचे हे विविध रंग आहेत का?

इथे अजून एक रम्य कल्पना कालिदासाने आपल्या डोळ्यांसमोर उभी केली आहे.

युवतींच्या नयनांच्या शुभ्र रंगावरती त्यांच्या नयनांतील काळ्या बाहुल्या कुंदाच्या शुभ्र फुलावरील काळ्या भ्रमराप्रमाणे दिसत आहेत. या कल्पनेतली मजा इथे संपत नाही. त्या तरुणींचे डोळे चंचल आहेत. त्यामुळे त्यांच्या नयनांची शोभा वाऱ्यावर हलणाऱ्या कुंदफुलाबरोबर नर्तन करणाऱ्या भ्रमराप्रमाणे दिसत आहे.

फुलाभोवती रुंजी घालत असताना ते फूल जर वाऱ्यावर हलू लागले, तर भ्रमरालाही त्या फुलाप्रमाणे हलत हलत मध प्यावा लागतो. फुलाच्या आणि भ्रमराच्या हलण्यात एक सुंदरच नव्हे, तर काव्यात्म समन्वय असतो. ज्यांनी ही मौज पाहिली असेल, त्यांना कालिदासाची कल्पना किती सुंदर आहे, हे पूर्णपणे कळेल.

तर सांगायचा भाग असा की, दशपूर नगरात अशा सुंदर आणि चंचल नयनांच्या युवती असल्यामुळे यक्ष मेघाला सांगतो आहे की, या युवती आपल्या सुंदर नयनांनी अत्यंत कौतुकाने तुझ्याकडे बघत राहतील असे रूप तू धारण कर!

बोरवणकर लिहितात की, कालिदासकालीन दशपूर म्हणजे आताचे मंदसर हे शहर.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

४८.

ब्रह्मावर्तं जनपदमथ च्छायया गाहमानः

क्षेत्रं क्षत्रप्रधनपिशुनं कौरवं तद्भजेथाः।

राजन्यानां शितशरशतैर्यत्र गाण्डीवधन्वा

धारापातैस्त्वमिव कमलान्यभ्यवर्षन्मुखानि॥

 

ब्रह्मावर्तामधून जातां कुरुक्षेत्र तें पुढें

ज्या भूमीवर अशेष भारत पराक्रमानें लढे

अमित टाकले पार्थानें शर भूपालांच्या शिरीं

जसे घालसी तूं कमलांवर जलधारांचे सडे!

 

ब्रम्हावर्तीं शिरुनि मग तू बिंबमात्रेंच, साक्षी

क्षत्रांच्या जें तुमुल समरा तें कुरुक्षेत्र लक्षीं

तेथें शीर्षें खरशरशतें वर्षिली अर्जुनाने

राजांची, त्वां जणु सरसिजें वारिधारासराने

 

ब्रह्मावर्ता ओलांडुनियां कुरुक्षेत्रिं तूं पुढतीं जाईं जिथें

धुरंधर क्षत्रिय लढले करूनियां दारुण रणघाई जिथें

धनंजय आवेशानें पाऊस पाडी तीक्ष्ण शरांचा -

क्षत्रशिरांवर, कमळांवरती जसा तुझ्या वर्षाव सरींचा!

 

नंतर छायारूपाने तू ब्रह्मावर्त नावाच्या देशात तरंगत प्रवेश कर आणि क्षत्रियांच्या घनघोर युद्धाची आठवण करून देणाऱ्या त्या सुप्रसिद्ध कुरुक्षेत्रास जा. ज्याप्रमाणे तू तुझ्या जलधरांची कमलांवर वृष्टी करतोस, त्याप्रमाणे गांडीव धनुष्य धारण करणाऱ्या अर्जुनाने येथे असंख्य तीक्ष्ण बाणांच्या साहाय्याने राजांच्या मुखांवर वृष्टी केली होती.

 

ब्रह्मावर्त म्हणजे सरस्वती आणि दृषद्वती या दोन नद्यांच्या मधला प्रदेश आहे आणि हा कुरुक्षेत्राच्या लगत आहे, अशी टीप बोरवणकरांनी दिलेली आहे.

४९.

हित्वा हालामभिमतरसां रेवतीलोचनाङ्कां

बन्धुप्रीत्या समरविमुखो लाङ्गली याः सिषेवे।

कृत्वा तासामभिगममपां सौम्य ! सारस्वतीना -

मन्तःशुद्धस्त्वमपि भविता वर्णमात्रेण कृष्णः॥

 

मदिरा – मिसळे जींत सखीच्या कटाक्ष नेत्रांतिल -

सोडुनिया बलराम प्यायला सरस्वतीचे जल

प्राशन करुनी पुण्य तीर्थ तें तूंही हो पावन

अमल शुद्धता येइल हृदया, अंग असो श्यामल!

 

तें सोडोनि प्रिय मधु जयीं रेवती-नेत्र चिन्हें

बंधुप्रेमें समरविमुखें सेविलें जें हलीने

तूंही सारस्वत सलिल तें सेविं बा, अंतरंगीं

लाधो शुद्धी तुजसिही जरी कृष्णता मात्र रंगी

 

जींत रेवतीनयन बिंबले मादक मदिरा अशी डावलुन

बंधुप्रीतिनें समर सोडुनी बलरामें जें केलें प्राशन -

सरस्वतीचें तीर्थ, सख्या, ते पावन व्हाया पिउनी घेईं

अंतरंग तव वरिल शुभ्रता असो श्यामता असली देहीं!

 

आपल्या बांधवांवरील प्रेमामुळे (कौरव-पांडव) युद्धातून मन काढून घेतल्यावर बलरामाने मधुर असा स्वाद असलेली आणि जिच्यात रेवती हिच्या नेत्रांचे प्रतिबिंब पडलेले होते, अशा मदिरेचा त्याग केला आणि त्याने सरस्वतीच्या जलाचा आश्रय केला. त्याच सरस्वती नदीच्या जलाचे तू सेवन केल्यावर तुझा अंतरात्मा निर्मळ होईल. फक्त रंगानेच काय तो तू कृष्ण-वर्णाचा राहशील.

 

बलराम हा मद्यप्रेमी होता. त्याची पत्नी रेवती ही मद्य भरून देत असे आणि त्या वेळी तिच्या नेत्रांचे प्रतिबिंब त्या मद्यात पडत असे. असे हे ‘मादक’ मद्य बलराम पीत असे. एम. आर. काळे त्यांच्या टिपेमध्ये ‘हलिप्रिया’ या शब्दाचा उल्लेख करतात. हिलिप्रिया म्हणजे मदिरा! हली म्हणजे हल धारण करणारा. हलधर हे बलरामाचे नाव आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे. बलरामाला जी प्रिय आहे, ती हलिप्रिया!

अशा या रेवतीच्या नेत्रांचे प्रतिबिंब पडल्यामुळे जी मदिरा अजूनच मादक झाली आहे, तिचा त्याग करून बलराम तीर्थयात्रेला म्हणून सरस्वतीच्या तीरावर आलेला होता.

बलरामाच्या यात्रेची अजून दोन कारणे एम. आर. काळे आणि बोरवणकरांनी दिलेली आहेत.

श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून बलरामाने एका सारथ्याचा वध केला होता आणि त्याचे प्रायश्चित्त म्हणून तो सरस्वतीच्या तीरी आला होता, अशी एक आख्यायिका आहे.

अजून एक आख्यायिका म्हणजे बलराम नैमिषारण्यात गेला होता, तेव्हा सूत ऋषीशिवाय सगळे ऋषी उठून उभे राहिले. त्यामुळे बलरामाला राग येऊन त्याने सूताचा हतातल्या दर्भाने शिरच्छेद केला. ब्रह्महत्येचे पातक लागल्यामुळे त्याला भारतभर तीर्थयात्रा करायला सांगितले गेले. त्या दरम्यान त्याला मदिरेचा त्याग करायला लागला असावा.

काहीही असले तरी, अत्यंत सौंदर्यवती अशा रेवतीच्या अत्यंत सुंदर नेत्रांचे प्रतिबिंब मदिरेमध्ये पडलेले आहे. त्यामुळे मुळातच अत्यंत मधूर आणि मादक असलेली ती मदिरा अजूनच मधूर आणि मादक झालेली आहे; ही कल्पनाच अत्यंत रम्य आहे. 

बोरवणकर टिपेत म्हणतात, कृष्ण जरी पांडवांच्या बाजूचा होता, तरी बलरामाला कौरव आणि पांडव एकसारखेच वाटत होते. त्यामुळे तो युद्धात कुणाच्याही बाजूने उतरला नाही. युद्धाचा त्याग करून तो यात्रेला निघून गेला. याच काळात तो सरस्वती नदीच्या तीरावर आला होता.

५०.

तस्माद्गच्छेरनुकनखलं शैलराजावतीर्णां

जह्वोः कन्यां सगरतनयस्वर्गसोपानपङ्क्तिम्।

गौरीवक्त्रभ्रुकटिरचनां या विहस्येव फैनैः

शंभो: केशग्रहणमकरोदिन्दुलग्नोर्मिहस्ता||

 

विहारुनी शिवजटांत धरिला लाटांनीं हिमकर

फेंस न, उमले हास्य, उमेचा पाहुनिया मत्सर

सरितांतिल ती श्रेष्ठ जान्हवी – सगरसुतांना जिनें

होउनिया सोपान दाविलें स्वर्गाचें मंदिर!

 

जा तेथोनी हिमवतिं हरिद्वारिं तूं जान्हवीतें

गेले स्वर्गा सगरज जिच्या पायरीच्या प्रपातें

फेनव्याजें भृकुटिरचने जी उमेच्या हंसोनी

इन्दुस्पर्शी धरी हरजटा वीचिरूपी करांनी

 

कनखलतीर्था गांठुनिया मग जह्नुसुतेच्या सन्निध जाई

निजतनुचा सोपान करुनियां सगरसुता जी स्वर्गी नेई

जटा शिवाच्या खेंचुन घेई चंद्रकलेप्रत ऊर्मी भिडवुन

फेनमिषे जी हंसे खदखदां भ्रुकुटिभंग गौरीचे देखुन!

 

तेथून म्हणजे कुरुक्षेत्रावरून तू कनखल नावाच्या हरिद्वाराजवळच्या तीर्थक्षेत्राकडे जा. इथे जान्हवी म्हणजे गंगा, हिमालयावरून खाली उतरलेली आहे. ही जान्हवी सगरपुत्रांना स्वर्गात जाण्यासाठी जिन्याप्रमाणे उपयोगी पडली होती. जान्हवीचे तरंग रूपी हात शिवाच्या मस्तकावरील चंद्राला बिलगलेले आहेत. आपल्या फेनरूपी हास्याने जान्हवी पार्वतीच्या कपाळावरील आठ्ठ्यांना हसते आहे.

 

आपल्या फेसरूपी हास्याने गंगा पार्वतीला हसते आहे, कारण तिला माहिती आहे की, आपण भगवान शंकराच्या इतक्या जवळ असल्याने पार्वतीच्या कपाळावर आठ्ठ्या पडल्या आहेत. पार्वतीची भिवई वक्र झाली आहे.

इथे सगरपुत्रांची आख्यायिका बघायला पाहिजे. सगर हा सूर्यवंशातील एक राजा होता. त्याचा शंभरावा अश्वमेध यज्ञ सुरू असताना इंद्राने त्याचा अश्वमेधाचा घोडा पळवून नेला आणि पाताळामध्ये कपिल मुनींच्या आश्रमापाशी बांधून ठेवला. तेव्हा सगराच्या साठ हजार पुत्रांनी घोड्याचा शोध घेण्यासाठी पृथ्वी खणली. जेव्हा कपिल मुनींच्या आश्रमाजवळ त्यांना तो घोडा बांधलेला आढळला, तेव्हा कपिल मुनींनीच आपला घोडा चोरला, असे समजून त्यांनी कपिल मुनींचा अपमान केला. त्यामुळे रागावलेल्या कपिल मुनींनी त्या सगर पुत्रांचे भस्म केले. पुढे त्यांच्या वंशात जन्मलेल्या भगीरथाने मोठ्या प्रयत्नांनी गंगा नदीला स्वर्गातून खाली पृथ्वीवर आणून तिच्या पवित्र जलाने सगर पुत्रांचा उद्धार करून त्यांचा स्वर्गाचा मार्ग मोकळा केला.

सीडी अतिशय रम्य अशा ओळी लिहिल्या आहेत -

‘जा तेथोनी हिमवतिं हरिद्वारिं तूं जान्हवीतें

गेले स्वर्गा सगरज जिच्या पायरीच्या प्रपातें’

जान्हवीतील प्रपातांच्या धबधब्यांच्या पायऱ्या करून सगरपुत्र स्वर्गाला गेले.

कुसुमाग्रजांनीसुद्धा अतिशय बहारदार ओळी लिहिल्या आहेत.

‘विहारुनी शिवजटांत धरिला लाटांनीं हिमकर

फेंस न, उमले हास्य, उमेचा पाहुनिया मत्सर’

हिमकर म्हणजे थंड किंवा शांत करणारा. म्हणजे चंद्र!

शिवाच्या जटांमध्ये विहार करताना जान्हवीने आपल्या लाटांच्या हातांनी चंद्राला आलिंगन दिलेले आहे. तिच्या जलामधला फेस म्हणजे जणू तिचे हास्य आहे. उमेच्या मनात जागा झालेला मत्सर बघून हे हास्य जान्हवीच्या मुखावर उमललेले आहे.

कृष्णशास्त्री चिळूणकरांनी या श्लोकाचा अनुवाद करताना दोन ओळी जास्त वापरून सगळा अर्थ नेमकेपणाने सांगितला आहे. -

तेथुनि पुढती कनखलनामक तीर्थावरुनी जातां,

देखशील मग जह्रुकन्यका हिमगिरिखालीं येतां,

कपिलशापहत सगरसुतांची जी मनिं उपजुनि माया

सोपानांची पंक्तिच झाली स्वर्गी त्या चढवाया.

बसुनि शंभुच्या शिरी नटांशी खेळे लहरिकरांनी

गिरिजा भ्रुकुटी मोडी परि ते जी किमपि ही न मानी.

..................................................................................................................................................................

लेखांक पहिला : कालिदासाच्या काव्यातील एकेक श्लोक सौंदर्यवंत ऐरावतासारखा झुलत राहतो, आणि त्यावर आशयाचा ऐश्वर्यमान इंद्र आरूढ झालेला असतो!

लेखांक दुसरा : उत्कंठा उत्पन्न करणाऱ्या त्या मेघासमोर यक्ष आपले अश्रू आवरत कसाबसा उभा राहिला…

लेखांक तिसरा : कालिदास आपल्याला आपल्या जगातून उचलतात आणि प्रेमाच्या व सौंदर्याच्या तीव्र संवेदनांनी भारलेल्या जगात घेऊन जातात…

लेखांक चौथा कालिदासाला जेव्हा जेव्हा प्रकृतीतील अपार सौंदर्य दिसते, तेव्हा तेव्हा त्याला पुरुष-तत्त्वाची आठवण होते…

लेखांक पाचवा : कालिदासाच्या सौंदर्यदृष्टीचा स्पर्श त्याच्या अनुवादकांनासुद्धा होतो…

लेखांक सहावा : येथून आपला कालिदासाच्या ‘मेघदूता’तील श्रृंगाररसाच्या प्रवाहात प्रवेश होतो.…

लेखांक सातवा : आपल्या प्रेमामुळे दुसरी व्यक्ती किती आनंदी होते आहे, यावर आपल्या प्रेमाचे भाग्य अवलंबून असते!

लेखांक आठवा : कालिदास सगळे वातावरणच स्त्री-पुरुषांतील प्रेमामध्ये अध्याहृत असलेल्या अनिवार वेडाने भारावून टाकतो...

लेखांक नववा : प्रेमात पडलेल्या स्त्रीच्या प्रेमाचा अव्हेर करणे, यक्षाला योग्य वाटत नाही. म्हणून तो मेघाला सांगतो आहे…

लेखांक दहावाकालिदासाची सौंदर्यदृष्टी किती सूक्ष्म निरीक्षणांतून जन्मली आहे, याची अनेक उदाहरणे देता येण्यासारखी आहेत…

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा