उत्कंठा उत्पन्न करणाऱ्या त्या मेघासमोर यक्ष आपले अश्रू आवरत कसाबसा उभा राहिला…
पडघम - साहित्यिक
श्रीनिवास जोशी
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 13 July 2022
  • पडघम साहित्यिक कालिदास Kalidasa कालिदास दिन Kalidasa Din मेघदूत Meghadūta आषाढस्य प्रथम दिवसे Aashadhasya Prathama Divase

३० जूनपासून आषाढाला सुरुवात झाली… आणि आषाढ म्हटला की, अनेकांना महाकवी कालिदासाच्या ‘मेघदूत’ची आठवण येते. ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या त्यातल्या शब्दांना तर ‘मोस्ट कोटेबल कोट’चा दर्जा मिळालाय! आणि ‘मेघदूत’? त्याची ख्याती काय वर्णावी! गेल्या अनेक वर्षांपासून ‘मेघदूत’ मराठीसह जगभरच्या लेखक, कवी, अनुवादक आणि रसिकवाचकांना मोहिनी घालत आले आहे. त्याची ओळख करून देणारे हे सदर कालपासून रोज...

.................................................................................................................................................................

लेखांक दुसरा

पूर्वमेघ

(लेखातला पहिला मूळ संस्कृत श्लोक कालिदासाचा आणि त्याचे अनुवाद अनुक्रमे कुसुमाग्रज, सी.डी. देशमुख आणि शांता शेळके यांचे)

१.

कश्चित्कान्ताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत्त

शापेनास्तङ्गमितमहिमा वर्षभोग्येण भर्तुः ।

यक्षश्चक्रे जनकतनयास्नानपुण्योदकेषु

स्निग्धच्छायातरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु ॥

 

सुभग जलाशय यांत नाहली वनवासी मैथिली

घन वृक्षावळ वितरी शीतल तीरावर सावली।

रामगिरीवर यक्ष वसे त्या शापांकित होउनी

वर्षाचा निर्वास ललाटीं – विव्हल विरहानलीं।।

 

एका यक्षाकडुनि घडला आत्मकार्यात दोष

वर्षान्त स्त्री-विरह - जड दे शाप त्याला धनेश।

त्याने लुप्त-प्रभ वसत तो रामगिर्याश्रमात

सीतास्नाने उदक जिथले पूत, झाडी निवान्त।।

 

कुबेरसेवक यक्ष एक कुणि सेवेमाजीं अपुल्या चुकला

प्रियावियोगें अधिकच दुःसह वर्षाचा त्या शाप मिळाला

जनकसुतेच्या स्नानांयोगे पावन झाले जिथें जलाशय

घनच्छाय त्या रामगिरीवर विविध आश्रमी घेई आश्रय

कुणी एक यक्ष होता. त्याच्या हातून कर्तव्य-प्रमाद झाला. त्यामुळे त्याला त्याचा स्वामी कुबेर याने एक वर्षासाठी असह्य असा पत्नी-विरहाचा शाप दिला. त्याचबरोबर त्याचा यक्ष म्हणून असलेला महिमा काढून घेतला. विरहाने व्याकूळ झालेल्या या यक्षाने रामगिरीवरील एका आश्रमात आश्रय घेतला. रामगिरी पर्वतावर अत्यंत स्नेहशील अशी सावली असणारी झाडे होती आणि इथल्या जलाशयातील पाणी जनककन्येने म्हणजे सीतेने स्नान केल्यामुळे पवित्र झाले होते.

यक्षाचा महिमा कमी केला म्हणजे नक्की काय केले, असा प्रश्न मनात उमटतो. एम. आर. काळे म्हणतात की, यक्षाचा महिमा कमी केला म्हणजे त्याच्या अमानवी शक्ती काढून घेतल्या. म्हणजे त्याच्या आकाशगमनाच्या आणि गुप्त वगैरे होण्याच्या शक्ती कुबेराने काढून घेतल्या. नाहीतर तो रामगिरीवरून उडत आपल्या प्रियेकडे गेला असता.

सी.डी. देशमुखांनी अत्यंत असह्य अशा स्त्री विरहाच्या शापाचे वर्णन केले आहे-

‘वर्षान्त स्त्री-विरह - जड दे शाप त्याला धनेश’ (भोगण्यास अत्यंत जड असा स्त्री विरहाचा शाप!) 

तर कुसुमाग्रजांनी ‘वर्षाचा निर्वास ललाटीं – विव्हल विरहानलीं!’ या ओळीत केलेले आहे. एका वर्षाचा विरह आणि त्या विरहाच्या अनलामध्ये म्हणजे अग्निमध्ये विव्हल होण्याचा शाप!

२.

तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्तः स कामी

नीत्वा मासान्कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः।

आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं

वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श॥

 

कृश हातांतुन गळून पडलें सोन्याचें कंकण

कामातुर हो हृदय, कामिनी दूर राहिली पण।

आषाढाच्या प्रथम दिनीं त्या दिसे पर्वतावरी

नयनरम्य घन, करी कड्यांवर गज वा क्रीडांगण।।

 

प्रेमी कान्ता-विरहीं अचली घालवीं मास कांहीं

गेलें खाली सरुनि वलय स्वर्ण हस्तीं न राही।

आषाढाच्या प्रथम दिनिं तो मेघ शैलाग्रिं पाहे

दन्ताघातें तटिं गज कुणी भव्यसा खेळताहे।।

 

गिरीवरी त्या महिने कांही कंठित राही तो विरही जन

सखिविरहें कृश असा जाहला गळे करांतुनि सुवर्णकंकण

आषाढाच्या पहिल्या दिवशीं बघतो शिखरीं मेघ वांकला

टक्कर देण्या तटभिंतीवर क्रीडातुर गज जणूं ठाकला!

कामक्रीडेवर अत्यंत प्रेम असलेल्या आणि आपल्या स्त्रीपासून दुरावलेल्या त्या यक्षाने रामगिरी पर्वतावर काही महिने व्यतीत केले. कृश झाल्यामुळे त्याच्या हातावरून त्याचे सुवर्ण कंकण घसरून पडले होते आणि त्यामुळे त्याचा हात मोकळा मोकळा दिसत होता. अशा त्या यक्षाने आषाढाच्या पहिल्या दिवशी रामगिरीच्या शिखराला बिलगलेला एक कृष्णमेघ पाहिला. तो क्रीडा करताना धडक देण्यासाठी थोड्याशा खाली वाकलेल्या एखाद्या हत्तीप्रमाणे आकर्षक दिसत होता.

प्रेमापासून आणि कामापासून दूर राहिल्यामुळे यक्ष इतका कृश झाला आहे की, त्याच्या हातातले सुवर्ण कंकण घसरून पडले आहे… इतके त्याचे त्याच्या पत्नीवर आणि कामसुखावर प्रेम आहे!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

३.

तस्य स्थित्वा कथमपि पुरः कौतुकाधानहेतो

रन्तर्बाष्पश्चिरमनुचरो राजराजस्य दध्यौ।

मेघालोके भवति सुखिनोऽप्यन्यथावृत्ति चेतः

कण्ठाश्लेषप्रणयिनि जने किं पुनर्दूरसंस्थे॥

 

मीलनकांक्षी यक्ष राहिला अवलोकित त्या घना

रोधुनि नेत्रांमधील पाणी, सावरुनीया मना।

सुखमय चित्तहि मेघ पाहतां हुरहुरतें, कालवे,

दूर जयाची सखि संगातुर, काय तया यातना।।

 

त्याच्या कैसातरी पुढतिं ये, चित्त वेधून जात

दाटे कंठ, द्रविणपतिचा दास होई सचिन्त।

आनंदीही विकल हृदयीं पाहता मेघ, दूर

तो कैसा हो प्रियजन मिठी ज्यास देण्या अधीर।।

 

कुतुककुतूहल मनीं जागवी त्या मेघातें झाला सन्मुख

उरीं आंसवें रोधुन कष्टें यक्ष तयाला बघे एकटक

मीलनसुख सेविती तयांही मेघदर्शनें लागे हुरहुर

कंठीं विळखा घालूं बघत्या विरहिजनांची काय दशा तर!

यक्षांचा स्वामी कुबेर याचा अनुयायी यक्ष, उत्कंठा उत्पन्न करणाऱ्या त्या मेघासमोर आपले अश्रू आवरत कसाबसा उभा राहिला आणि खूप वेळ आपल्या विचारांमध्ये गढून गेला. अतिशय आनंदी मनःस्थितीतील मनुष्यदेखील मेघ पाहिल्यावर अस्वस्थ होतो. त्याच्याही भावना क्षुब्ध होतात. त्याच्याही मनात मीलनाच्या इच्छेने हुरहूर सुरू होते. मग जर एखादा प्रियकर आपल्या प्रियतमेच्या गळ्यात गळा घालून प्रेमात रममाण होण्याची मनीषा ठेवून तिचा विरह भोगत असेल, तर असा मेघ बघून त्याची काय अवस्था होईल, याबाबत काय बोलावे? 

पाऊस सृजनाचे वातावरण निर्माण करतो. त्या सगळ्या वातावरणात आपल्या प्रियेच्या आठवणीने उत्कंठा तयार होणारच. ती मीलनाची उत्कंठा आहे. हत्तीसारखा काळाभोर मेघ बघितल्यावर ज्याची प्रिया जवळ आहे, तोसुद्धा प्रेम-क्षुब्ध होऊन जातो. इथेतर प्रियेच्या गळ्यात गळा घालून तिच्या प्रेमात बुडून जाण्याची मनीषा मनात धरलेला विरही यक्ष आहे. तो विलक्षण मेघ बघून त्याची काय अवस्था होईल याबाबत कुणी काय बोलावे?

कुसुमाग्रजांनी येथे -

‘सुखमय चित्तही मेघ पाहतां हुरहुरतें, कालवे

दूर जयाची सखि संगातुर, काय तया यातना!’

ही ओळ लिहून धमाल उडवून दिली आहे.

सी.डी. म्हणजे एकदम भारी काम. एखाद्या कवीपेक्षाही मोठा शब्द संग्रह असलेला हा माणूस! त्यांनी ‘द्रविणपती’ हा सुंदर शब्द योजला आहे. द्रविण म्हणजे धन किंवा सोने. द्रविणपती म्हणजे धनाचा अधिपती, म्हणजे कुबेर! अशी शब्दसंपदा नसेल तर मंदाक्रांता वृत्त संपूर्ण भाषांतरासाठी वापरण्याची हिंमत होणे अवघड होते.

४.

प्रत्यासन्ने नभसि दयिताजीवितालम्बनार्थी

जीमूतेन स्वकुशलमयीं हारयिष्यन्प्रवृत्तिम्।

स प्रत्यग्रैः कुटजकुसुमैः कल्पितार्घाय तस्मै

प्रीतः प्रीतिप्रमुखवचनं स्वागतं व्याजहार॥

 

गगनपांथ हा नेइल का संदेश वल्लभेप्रत

श्रावणमासीं असो सखीचें कुशल, असें चिंतित।

कुटजफुलांनी अभिनव ज्याला दिधली अर्ध्यांजली

त्या मेघाचें यक्ष पुढें हो करण्याला स्वागत।।

 

व्हावा जीवा पुढतिं सखीच्या आसरा श्रावणांत

मेघाहाती कुशल म्हणुनी पाठवूं ये मनात।

त्यातें ताजीं कुटज-कुसुमें अर्घ्य देण्यासि वेची

संतोषोनी वदत वचनें प्रेमळ स्वागताची।।

 

श्रावण येतां समीप अपुली प्रिया असो सुखरूप म्हणोनी

मेघासंगें कुशल तियेला कळवायाला आतुर होउनि

फुलें कुड्याचीं प्रेमें वाहुन मेघातें त्या प्रथम पूजिलें

प्रसन्नतेनें मधुर वचांनीं यक्षें त्याचें स्वागत केलें

श्रावण महिना नजीक आल्यामुळे आपल्या प्रियेच्या जिवाला आधार मिळावा, असे यक्षाला वाटले. त्यामुळे त्या मेघाद्वारे आपण कुशल असल्याचा संदेश तिला पाठवावा, अशी त्याला इच्छा झाली. त्याबरोबर त्याने कूटज फुलांचे अर्घ्य त्या मेघाला अर्पण केले आणि अत्यंत प्रेमभावाने त्याचे स्वागत केले.

निसर्गात सौंदर्याचा कहर झालेला असतो आणि त्यामुळे श्रावण महिना विरही जनांसाठी अत्यंत कठीण जातो, असे मानले गेले आहे. या अशा सुंदर वातावरणात विरहाचे दुःख आपल्या प्रियेला सहन होणार नाही आणि त्यामुळे विरहाच्या दुःखात आपली प्रिया तिच्या प्राणांस मुकेल, असे यक्षाला वाटते आहे. अशा दुःखी प्रियेचे प्राण वाचावेत म्हणून आपले कुशल त्या यक्षाला तिच्यापर्यंत पोहोचवायचे आहे.

‘कूटज फुले’ याचे भाषांतर शांताबाईंनी ‘कुड्याची फुले’ असे केले आहे. वसंत बापट वगैरे भाषांतरकारांनी कूटज फुलाचे भाषांतर ‘रानजाई’ असे केले आहे. कूटज फुले पांढरीशुभ्र असतात. ती वृक्षावर येतात म्हणून ती रानजाई नक्की नाही. पण ही कुड्याची वा कूटजाची फुले जाईसारखी नाजूक आणि पांढरीशुभ्र असतात, हेसुद्धा नाकारता येत नाही. नेटवर कूटज फुले असा शोध घेतला तर या फुलांचे छायाचित्र बघायला मिळेल.

५.

धूमज्योतिः सलिलमरुतां संनिपातः क्व मेघः

संदेशार्थाः क्व पटुकरणैः प्राणिभिः प्रापणीयाः।

इत्यौत्सुक्यादपरिगणयन्गुह्यकस्तं ययाचे

कामार्ता हि प्रकृतिकृपणाश्चेतनाचेतनेषु॥

 

वाहत जीवन, परंतु मेघा जीवित नाही मुळीं

धूम्रबाष्पमय, नेइल का संदेश नेमक्या स्थळीं?।

अंध असे हा प्रणय त्याजला जीवाजीव न दिसे

विवेक सुटुनी कामार्ताची प्रज्ञा हो पांगळी।।

 

धूम्राग्नीचा पवनसलिलीं मेळ तो मेघ कोठें

वार्ता नेणे समुचित कुठें सेंद्रीय प्राणियांतें।

उत्कण्ठेने नच गणुनि हें गुह्यकें प्रार्थिलें त्या

कामार्तांना जड अजड हें भान नाहींच जात्या।।

 

धूर, वीज अन् पाणी, वारा यांही बनला मेघ कुठें तो?

संदेशातें वाहुन नेइल सजीव मानव आणि कुठें तो?

अवगणुनी हे आतुरतेनें यक्ष घनातें करी याचना

सजीवनिर्जिव विवेक यांतिल कुठुन रहावा प्रणयार्तांना?

धूर, पाणी, विजा आणि आवर्त यांनी बनलेला निर्जीव मेघ कुठे आणि इंद्रियांनी युक्त अशा समर्थ मनवाकडून पोहोचवावा, असा निरोप कुठे! निर्जीव मेघ निरोप कसा पोहोचवणार, याचा कसलाही विचार न करता त्या यक्षाने त्या मेघाची प्रार्थना करण्यास सुरुवात केली आणि आपला निरोप सांगण्यास सुरुवात केली. कामाग्नीने जे लोक व्याकूळ झालेले असतात, ते चेतन आणि अचेतन यांच्यामधला भेददेखील विसरतात.

कालिदासाने धूर, ज्योती, वारा आणि पाणी यांनी मेघ बनला आहे, असे म्हटले आहे. इथे ‘ज्योती’ हा शब्द वापरला गेला आहे. मेघामध्ये ज्योती काय करते आहे? ज्योतीचा संदर्भ विजेशी आहे. एम. आर. काळे म्हणतात की, कालिदासाला मेघ जसा दिसला, तसा त्याने लिहिला आहे. मेघाबरोबर विजा दिसत असल्याने कालिदासाने ‘ज्योती’चा उल्लेख केला आहे. विजेच्या या उल्लेखाने कालिदासाचा मेघ एकदम जिवंत होऊन जातो, उत्फुल्ल होऊन जातो!

शांताबाईसुद्धा आपल्या भाषांतरात विजेचा उल्लेख करतात- ‘धूर, वीज अन् पाणी, वारा यांही बनला मेघ कुठें तो?’

सीडींनी ‘धूम्राग्नीचा पवनसलिलीं मेळ तो मेघ कोठें’ ही अप्रतिम ओळ लिहिली आहे. धूम्र आणि अग्नी यांचा पवन आणि सलील यांच्याशी मेळ घडल्यामुळे बनलेला मेघ!

कालिदासाने धूम्र, ज्योती, पाणी आणि वायू यांचा संनिपात म्हणजे संमिश्रण असलेला मेघ असे म्हटलेले आहे. सीडी मेघाला या सर्वांचा मेळ असे म्हणतात. संमिश्रणापेक्षा ‘मेळ’ ही कितीतरी सुंदर संकल्पना आहे.

कामार्त लोकांना कालिदासाने ‘प्रकृति-कृपण’ असे म्हटलेले आहे. प्रकृति-कृपण याचा अर्थ स्वभावतःच विवेकशून्य!

सीडींनी त्याचे ‘जात्याच भान नसलेला’ असे भन्नाट भाषांतर केलेले आहे.

‘कामार्तांना जड अजड हें भान नाहींच जात्या’

..................................................................................................................................................................

लेखांक पहिलाकालिदासाच्या काव्यातील एकेक श्लोक सौंदर्यवंत ऐरावतासारखा झुलत राहतो, आणि त्यावर आशयाचा ऐश्वर्यमान इंद्र आरूढ झालेला असतो!

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा