कालिदासाच्या काव्यातील एकेक श्लोक सौंदर्यवंत ऐरावतासारखा झुलत राहतो, आणि त्यावर आशयाचा ऐश्वर्यमान इंद्र आरूढ झालेला असतो!
पडघम - साहित्यिक
श्रीनिवास जोशी
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 12 July 2022
  • पडघम साहित्यिक कालिदास Kalidasa कालिदास दिन Kalidasa Din मेघदूत Meghadūta आषाढस्य प्रथम दिवसे Aashadhasya Prathama Divase

३० जूनपासून आषाढाला सुरुवात झाली… आणि आषाढ म्हटला की, अनेकांना महाकवी कालिदासाच्या ‘मेघदूत’ची आठवण येते. ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या त्यातल्या शब्दांना तर ‘मोस्ट कोटेबल कोट’चा दर्जा मिळालाय! आणि ‘मेघदूत’? त्याची ख्याती काय वर्णावी! गेल्या अनेक वर्षांपासून ‘मेघदूत’ मराठीसह जगभरच्या लेखक, कवी, अनुवादक आणि रसिकवाचकांना मोहिनी घालत आले आहे. त्याची ओळख करून देणारे हे सदर आजपासून रोज...

.................................................................................................................................................................

लेखांक पहिला

कालिदासाचे ‘मेघदूत’ आज इतक्या शतकांनी आपल्याला आवाहन करत उभे आहे, याचे कारण मानवी आयुष्यातील सर्व उन्नत आणि उदात्त भावभावनांना ते अतिशय हळूवार स्पर्श करून जाते. स्त्री-पुरुष प्रेमातील तरलता, रतिक्रिडेमधील बेफाम उत्कटता, विरहातील दारुण विफलता, सृजनाच्या प्रेरणेमधील अस्फुट अनावर हुरहूर, या सगळ्याला ‘मेघदूत’ स्पर्श करते.

स्त्री-पुरुष प्रेमाचे निसर्गसौंदर्याशी एक गूढ नाते असते. कालिदास निसर्ग-सौंदर्याच्या भव्य पटावर प्रेम-भावना फुलवत नेतो. या नैसर्गिक सौंदर्याच्या भव्य पार्श्वभूमीमुळे यक्षाच्या प्रेमाला भव्य उदात्तता बहाल केली जाते.

उदात्त प्रेम ही अशी भावना आहे की, ती मनात अवतरताच तिच्या मागोमाग आपल्या मनात मांगल्याची भावनासुद्धा अवतार घेते. पुढे हा मांगल्याचा सोपान मानवाला अध्यात्माकडे घेऊन जातो. अलकापुरीतील यक्षाचे आणि यक्षाच्या प्रेयसीचे घर शिवाच्या मस्तकीच्या चंद्रकोरीच्या चांदण्याने उजळलेले आहे. अनावर प्रेम, अनावर सौंदर्य आणि उदात्त मांगल्य यांचे प्रकाश-प्रवाह ‘मेघदूत’मधून सतत वाहत राहतात. या सगळ्या कल्लोळामध्ये ‘मेघदूत’चं सनातन आकर्षण लपलेलं आहे.

कालिदासाचे ‘मेघदूत’ आपल्याला एका उदात्त जगात घेऊन जाते. ते वाचून आणि अनुभवून झाल्यावर मानवी जीवनाचे सारे श्रेय आपल्या हाती लागले आहे, असे वाटत राहते. जगायचे कशासाठी, तर कालिदासाने सांगितलेले प्रेम करण्यासाठी. जगायचे कशासाठी, तर कालिदासाने रंगवलेला निसर्ग त्याच्या डोळ्यांनी बघण्यासाठी! जगायचे कशासाठी तर, कालिदासाने दिलेला मांगल्याचा घट हृदयामध्ये जपण्यासाठी! ‘जगायचे कशासाठी?’ या प्रश्नाला कालिदास वरील उत्तरे देतो. ही उत्तरे हेच मानवी जीवनाचे श्रेय! बाकी दुःखे वगैरे आपल्या आयुष्यात घडत राहतात, येत-जात राहतात!

कुसुमाग्रज लिहितात, “...रसिकाच्या मनाला अथपासून इतिपर्यंत मंत्रमुग्ध करण्याचे आणि एक वेगळे भावविश्व त्याच्या सभोवार विणून त्याला उन्मनावस्थेत पोहोचविण्याचे सामर्थ्य मेघदूतात जितके आहे, तितके अन्यत्र आढळणे फार कठीण आहे…”

‘मेघदूत’ आपल्याला मंत्रमुग्ध करून उन्मनी अवस्थेत पोहोचवते यात शंका नाही.

अजून एक गोष्ट म्हणजे संपूर्ण ‘मेघदुता’मध्ये एकही नकारात्मक भावना नाही. हे श्रेय कालिदासाने उभ्या केलेल्या यक्षाच्या व्यक्तिमत्त्वाचे आहे. अतिशय दुःखी अवस्थेतसुद्धा यक्षाचा प्रेमळ, सौम्य, सभ्य आणि दयाळू स्वभाव त्याला सोडून जात नाही! 

होरेस विल्सन त्यांच्या प्रस्तावनेत म्हणतात, “(the Yaksha) is characterized by a benevolent spirit, a gentle temper, and an affectionate disposition…”

यक्षाचे मन दयाळू आहे, त्याचा स्वभाव सभ्य आणि सौम्य आहे, आणि त्याचे व्यक्तिमत्त्व प्रेमळ आणि वत्सल आहे! आणि मुख्य म्हणजे, यक्षाच्या मनात आपल्या प्रेयसीबाबत अत्यंत कोमल भावना आहेत! त्याचे आपल्या प्रेयसीविषयी असलेले प्रेम आणि त्या प्रेमाची सखोलता कुणाही संवेदनशील व्यक्तीच्या हृदयाला स्पर्श करून जाते.

कुसुमाग्रज लिहितात, “(जीवनातील) सर्व निष्ठा कायम राखून, सौंदर्यबुद्धी आणि रसिकता जागी ठेवून, ऐहिक संसाराचा पुरेपूर आस्वाद घेणाऱ्या प्रवृत्तींतून या दीर्घ भावकाव्याचा जन्म झाला आहे.”

त्यामुळे, ज्यांना ज्यांना जीवनातील सर्व निष्ठा कायम राखून आणि आपली सौंदर्यबुद्धी व रसिकता जागी ठेवून ऐहिक संसाराचा पुरेपूर आस्वाद घ्यायचा आहे, त्यांना त्यांना ‘मेघदूत’ कायम आकर्षित करत राहणार, यात शंका नाही!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

विविध रत्नांच्या प्रभांचे इंद्रधनुष्य परिधान करून कालिदासाचा काव्यमेघ साहित्याच्या अंतरिक्षात विहार करत असतो. या काव्याच्या मेघावर आपल्या स्वतःच्या तेजाने कालिदासाच्या काव्यातील एक एक श्लोक सौंदर्यवंत ऐरावतासारखा झुलत राहतो. आणि त्यावर आशयाचा ऐश्वर्यमान इंद्र आरूढ झालेला असतो.

कालिदासाच्या काळाबद्दल वाद आहेत. कुणी म्हणते कालिदास इसपू पहिल्या शतकात होता, कुणी म्हणते तो इसवी सनाच्या चौथ्या किंवा पाचव्या शतकात होता. कालिदासाचा काळ कुठलाही असला तरी त्याचे काव्य कालातीत आहे, या विषयी शंका नाही.

अशा या काव्याला त्याच्या सर्व अंगानी आणि छटांनी समजून घेणे फार अवघड काम आहे. कालिदासाच्या एका एका श्लोकाला भाषांतरात बांधणे, हे खायचे काम नाही!

कालिदासाचे ‘मेघदूत’ गेली २०० वर्षे आधुनिक जगभरातील अनुवादकांना आकर्षित करत आलेले आहे. त्याच्या अनुवादांची मालिका खूप दीर्घ अशी आहे. होरेस विल्सन यांचा इंग्रजी अनुवाद १८१५मधील आहे. मराठीतील पहिला अनुवाद कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी १८६५मध्ये केला. रामचंद्र गणेश बोरवणकर यांचा गद्य अनुवाद १९३५मधील आहे. सी.डी. देशमुख यांचा अनुवाद १९४३ साली प्रसिद्ध झाला. कुसुमाग्रजांचा अनुवाद १९५६चा आहे. शांता शेळके यांचा १९९४मधील आहे. या व्यतिरिक्त विसाच्या वर अनुवाद मराठीमध्ये गेल्या दीड-दोनशे वर्षांमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत.

कालिदासाचे ‘मेघदूत’ समजून घेण्यासाठी मी कुसुमाग्रज, सी.डी. देशमुख, बा.भ. बोरकर आणि शांता शेळके यांचे अनुवाद घेऊन बसलो. इंग्रजी अनुवाद जवळ असावेत म्हणून होरेस विल्सन, एम. आर. काळे आणि चंद्रा राजन यांचे अनुवाद जवळ घेतले. मराठी गद्य अनुवादसुद्धा असावेत म्हणून रामचंद्र बोरवणकर, रा.शं. वाळिंबे आणि वसंत बापट-अरविंद मंगरूळकर-दिगंबर हातवळणे यांचे अनुवाद बरोबर घेतले. एक एक श्लोक हळूहळू वाचत नोट्स काढत राहिलो. त्यामधून माझा स्वतःचा असा एक भावानुवाद तयार झाला. तो आपल्या समोर ठेवत आहे.

गद्य भावानुवाद करताना श्लोकाचा शब्दशः अर्थ देण्याचे टाळले आहे. कारण शब्दार्थाला न्याय देण्याच्या नादात शब्द प्रवाह खंडित होतो. या प्रकारात ज्याला कवितेतील रस समजून घ्यायचा आहे, तो वाचक वाचन सोडून देतो. अनुवाद करताना मी भावार्थाला जास्त प्राधान्य दिले आहे. ज्यांना शब्दार्थ हवा आहे, त्यांच्यासाठी रामचंद्र बोरवणकर, वसंत बापट-अरविंद मंगरूळकर-दिगंबर हातवळणे आणि रा.शं वाळिंबे यांनी केलेली भाषांतरे उपलब्ध आहेत.

शब्दार्थ सावरत सावरत केलेले भाषांतर वाचायला फार विचित्र वाटते. उदाहरण म्हणून ‘मेघदुता’तील १६व्या श्लोकाचा रामचंद्र बोरवणकरांनी केलेला शब्दार्थ बघायला हरकत नाही- ‘शेतीचे फळ तुझ्यावर अवलंबून असते म्हणून (हे जाणून), भ्रुकुटिविलास माहीत नसलेल्या (गांवढळ) स्त्रियांच्या डोळ्यांनी मोठ्या प्रेमाने प्याला गेलेला (पाहिलेला), [असा तू] नुकतीच नांगराने उखळल्यामुळे सुगंधित झालेली शेते असलेल्या माळावर चढून थोडासा पश्चिमेकडे (वळून) पुन्हा द्रुतगती होत्साता उत्तरेच्या बाजूलाच चालू लाग’.

शब्दाशब्दाला ठेच लागत असेल तर त्या भाषांतराचा रसग्रहणासाठी अजिबात उपयोग होत नाही. याऐवजी मी पुढील भाषांतर स्वीकारले- ‘नयनांचे विविध विभ्रम ज्यांना माहीतही नाहीत, अशा ग्रामीण स्त्रिया, तुझे रूप आपल्या प्रेमळ नयनांनी पिऊन घेतील. कारण शेतीची सगळी समृद्धी तुझ्यावरच अवलंबून आहे, हे त्यांना माहिती असते. अशा वेळी, जमीन नांगरून झाल्यामुळे सुगंधित झालेल्या माळावर चढून तू थोडासा पश्चिमेला जा. आणि मग उशीर न करता लगेच द्रुतगतीने उत्तर दिशेला जायला लाग’.

भाषांतरित अवस्थेत एखादा लेखक किंवा कवी समजून घेताना शब्दार्थाशी प्रामाणिक राहून केलेले भाषांतर महत्त्वाचे ठरते, यात शंका नाही. पण हेच भाषांतर रसग्रहणाच्या मात्र आड येते, हेही तेवढेच खरे.

माझा अनुवाद रसग्रहणासाठी आहे. श्लोकाचे शब्दशः अर्थ बघायचे असतील वाचकांनी बोरवणकर, वाळिंबे आणि बापट आदींचे अनुवाद बघावेत. वाचकांसमोर हे लिखाण ठेवताना एकच गोष्ट राहून गेल्याची हुरहूर आहे. कुसुमाग्रज, सी.डी. देशमुख आणि शांता शेळके यांच्या अनुवादांबरोबरच बा.भ. बोरकर यांचा अनुवादही या सगळ्या प्रकारात घेता आला असता, तर फार बहार आली असती! परंतु, एका श्लोकाचे चार चार काव्यानुवाद थोडे बोजड झाले असते. काही हरकत नाही, कालिदासाचे आकर्षण काही इतक्यात संपणारे नाही.

असो, आता कालिदासाच्या रमणीय काव्याकडे आणि त्या काव्याच्या कुसुमाग्रज, सी.डी. देशमुख आणि शांताबाई शेळके यांनी केलेल्या अतिशय सुंदर अशा काव्यात्म अनुवादांकडे जाऊ!

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा