कालिदास काय किंवा यक्ष काय... स्त्रीविषयी अत्यंत आदर असलेली व्यक्तिमत्त्वं होती!
पडघम - साहित्यिक
श्रीनिवास जोशी
  • कृष्णधवल चित्र शांताराम आत्माराम सबनीस यांच्या ‘महाराष्ट्र मेघदूत’ (१९३८) या पुस्तकातून साभार
  • Wed , 03 August 2022
  • पडघम साहित्यिक कालिदास Kalidasa कालिदास दिन Kalidasa Din मेघदूत Meghadūta आषाढस्य प्रथम दिवसे Aashadhasya Prathama Divase

लेखांक विसावा

उत्तरमेघ

(लेखातला पहिला मूळ संस्कृत श्लोक कालिदासाचा आणि त्याचे अनुवाद अनुक्रमे कुसुमाग्रज, सी.डी. देशमुख आणि शांता शेळके यांचे)

३१.

आद्ये बद्धा विरहदिवसे या शिखा दाम हित्वा

शापस्यान्ते विगलितशुचा तां मयोद्वेष्टनीयाम्।

स्पर्शद्विष्टामयमितनखेनासकृत्सारयन्तीं

गण्डाभोगात्कटिनविषमामेकवेणीं करेण॥

 

फुलांविना कचभार बांधला वियोग आरंभतां

मुक्त व्हायचा मम हातानें विरहदशा संपतां;

भुरभुरणाऱ्या रुक्ष बटा त्या येतां गालांवरी

नखाल बोटें त्रासुन जातिल पुन्हा पुन्हा सारतां!

 

मालात्यागें विरह-दिवशीं बांधिले केश त्यांची

शापान्तीं जी असुख सरुनी मीच सोडावयाची

दुःखस्पर्शा विषम बहुधा सारिते एक वेणी

जी ये गालावर तिज नखें वाढलेल्या करांनी

 

वियोग होतां सुरू बांधले केश सखीचे फुलमाळेविण

विरहकाल संपतां व्हायचे मुक्त पुन्हां ते माझ्या हातुन

तेलावांचुन रख्ख बटा त्या गालीं झुकती फिरुनी फिरुनी

नखे वाढल्या अंगुलि फिरवुन निवारितां सखि जाय त्रासुनी!

 

विरहाच्या पहिल्या दिवशी तिने फुलांचा त्याग करून आपले केस वेणीमध्ये बांधले. ते केस आता हाताला कठोर, उंच-सखोल आणि रुक्ष लागत आहेत. शाप संपला की, तिचे हे केस मी दुःखमुक्त होऊन अतिशय आनंदानं सोडणार आहे. ज्या हातांची नखंसुद्धा काढलेली नाहीत, अशा श्रृंगारहीन हातांनी ती आपले केस मागे सारत असेल.

३२.

सा संन्यस्ताभरणमबला पेशलं धारयन्ती

शय्योत्सङ्गे निहितमसकृद्दुःखदुःखेन गात्रम्।

त्वामप्यस्रं नवजलमयं मोचयिष्यत्यवश्यं

प्रायः सर्वो भवति करुणावृत्तिरार्द्रान्तरात्मा॥

 

ती कृश दुर्बळ भूषणरहिता, व्यथा मना जाळते

पुन्हा पुन्हा शय्येवर वळते, पाहुनिया दृश्य तें

नव्या जलाचीं तुझ्याहि नेत्रीं ओघळतिल आंसवें

आर्द्रपणासह दया अंतरामधें सदा नांदते!

 

झाली दुःखे कृश, उतरलीं भूषणें मद्वियोगीं

अंगा शय्येवर घडिघडी टाकिते कोमलांगी

दृश्यें अश्रुपरि नवजला ढाळशील स्वयेंची

प्रायः सारे सकरुण जयां आर्द्रता अंतरींची

 

भूषणविरहित प्रिया कृशांगी कशीतरि तनु करिते धारण

कढ दुःखाचे येतां देते शय्येवरती स्वतःस लोटून

बघतां तिजला नव्या सरींचीं तूंहि आंसवें सजशिल ढाळू

ओलावा हृदयांत जयांच्या, जात्या असती ते कनवाळू!

 

आपले सगळे अलंकार तिने काढून टाकले असतील. आपले मृदुल शरीर ती अत्यंत दुःखानं पुन्हा पुन्हा शय्येवर टाकत असेल. त्या कृशांगीची ही अवस्था तुलाही तुझ्या नवजलाचे अश्रू ढाळायला लावेल. ज्याच्या अंतःकरणामध्ये ओलावा आहे, असा प्रत्येक जण दयाळू असतो.

बोरवणकर लिहितात – “ज्याचें अंतःकरण दयार्द्र असतें, त्याला दुसऱ्याचें दुःख पाहून वाईट वाटते. मेघ हा तर खरोखर ‘आर्द्रान्तरात्मा’ असतो, मग दुःखी यक्षपत्नीला पाहून त्याच्या हृदयाला कां बरें पाझर फुटणार नाहीं?”

‘आर्द्रान्तरात्मा’ म्हणजे ज्याच्या अंतरात्म्यात ओलावा असतो तो!

चंद्रा राजन लिहितात -

‘Casting aside all adornments,

keeping alive her fragile body in

measureless sorrow,

desolate, my love would try in vain

time and again to throw herself

on her bed;

the sight I am sure will make

you shed some freshwater tears;

for tender hearts ever

melt in compassion.’

शेवटच्या दोन ओळी तर फार सुंदर जमल्या आहेत -

‘for tender hearts ever

melt in compassion.’

करुणेमध्ये मृदू हृदयं विरघळून जातात!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

३३.

जाने सख्यास्तव मयि मनः संभृतस्नेहमस्मा-

दित्थंभूतां प्रथमविरहे तामहं तर्कयामि।

वाचालं मां न खलु सुभगंमन्यभावः करोति

प्रत्यक्षं ते निखिलमचिराद्भ्रातरुक्तं मया यत्॥

 

जाणतसें मी हृदयामधली गाढ तिच्या भावना

दुःख तिचें पहिल्या विरहांतिल कळतें माझ्या मना;

भाग्य असे हें खरें, परी तें बोलविना अन्यथा

म्हणशिल नयनांनीं निज बघतां - यांत नसे वंचना!

 

जाणे माझ्यावरति सखिचें प्रेम तुझ्या नितान्त

तीतें तेव्हां प्रथम विरहीं कल्पितों या दशेत

नाहीं मातें करवित गड्या वल्गना भाग्यगर्व

जें जें बोलें बघशिल झणीं तें स्वयें तूंचि सर्व

 

ठावें मज कीं तव वहिनीची अनन्य प्रीती माझ्या ठायीं

वियोग पहिला त्यांतुन म्हणुनी दशा सखीची कळे मलाही

बडबडतों मी फुका न धरुनी निजभाग्याची मनीं अहंता

प्रत्यक्षांतच पाहशील तूं मम वचनांमधिं किती सत्यता!

 

तुझ्या सखीचे माझ्याविषयी उत्कट प्रेमानं परिपूर्ण असलेले हृदय मला माहीत आहे. त्यामुळेच या आमच्या पहिल्याच विरहात तिची अवस्था अशी झाली असेल, असं मला वाटतं. स्वतःच्या भाग्याची खोटी कल्पना करून मी हा सर्व वाचाळपणा करतो आहे, असं नाही. मी जे बोलत आहे, ते सगळे लवकरच तुला अनुभवायला मिळेल.

‘सुभगमन्यभाव’ म्हणजे स्वतःला भाग्यवान् समजण्याची खोड, असा अर्थ बापट, मंगरूळकर - हातवळणे यांनी दिलेला आहे. ते पुढे म्हणतात – “आपल्यासाठीं एखादी स्त्री इतकी झुरत आहे, असें मानणे यांतही एक प्रकारचा अहंगंड आहे. आपण फार आकर्षक आहों, भाग्यवान् आहों, उत्कट प्रीतीला पात्र आहों, अशी वृत्ति त्यांत प्रकट होते. अशा आत्मगौरवाच्या बुद्धीनें आपण बोलत नाहीं, हें मेघाला पटविण्यासाठी यक्ष कळवळून सांगत आहे की, तुझ्या सखीचे मन मजविषयींच्या प्रेमानें किती ओथंबलेले आहे, हें मला पूर्ण ठाऊक आहे त्यांतून आमच्यांत हें प्रथमच अंतर पडलें आहे. अशा ताटातुटीची तिला सवय नाहीं, म्हणून तर तिची दशा अशी केविलवाणी झाली असेल, असे मला वाटते आहे. स्वतःविषयीं फुशारकी मारण्याच्या बुद्धीनें मी हे सारे बोललो, असें समजू नकोस. माझ्या बन्धुराया, मी जें जें म्हणतों आहें तें तें सारें तुला लवकरच - बघावयाला - अनुभवायला मिळणार आहे.”

सीडींनी फारच सुंदर अनुवाद केला आहे-

‘जाणे माझ्यावरति सखिचें प्रेम तुझ्या नितान्त

तीतें तेव्हां प्रथम विरहीं कल्पितों या दशेत

नाहीं मातें करवित गड्या वल्गना भाग्यगर्व

जें जें बोलें बघशिल झणीं तें स्वयें तूंचि सर्व’

तुझ्या सखीचे माझ्यावर नितांत प्रेम आहे, हे मी जाणतो आहे. त्यामुळेच या प्रथम विरहामध्ये ती कोणत्या दशेत असेल, हे मी कल्पितो आहे. मला माझ्या भाग्यगर्वाच्या वल्गना कधीही करवत नाहीत. जे जे मी बोलतो आहे, ते ते सगळे तू आता लवकरच स्वतःच्या डोळ्यांनी बघशील!

३४.

रुद्वापाङ्गप्रसरमलकैरञ्जनस्नेहशून्यं

प्रत्यादेशादपि च मधुनो विस्मृतभ्रूविलासम्।

त्वय्यासन्ने नयनमुपरिस्पन्दि शङ्के मृगाक्ष्या

मीनक्षोभाच्चलकुवलयश्रीतुलामेष्यतीति॥

 

केश रोधिती नजर, काजळावाचुन मृगलोचन

मदिराभावें विसरुन गेले भुवयांचें नर्तन,

तवागमाचें भावुनिया शुभ थरथरतिल पापण्या

मत्स्य धावतां जणुं कमलांचें सुरम्य आंदोलन!

 

कुंठे ज्याचें भ्रमण अलकीं, पारखा काजळाला

भ्रूलीला मुळिं विसरला वर्जितां वारुणीला

येसी तेव्हां नयन लवुनी तुल्यशोभा दिसेल

एणाक्षीचा चलित- कमळे मीन होतां विलोल

 

नयन काजळाविना, तयाची दृष्टि रोधिली रुक्ष बटांनी

मधुपानाचा अभाव म्हणुनी भ्रूभंगहि जो गेला विसरुनी

तूं येतां परि जवळ सखीचा डावा डोळा लवेल किंचित

सळसळतां मासळी जळामधिं नीलकमल जणुं व्हावें विचलित!

 

तिचे रुक्ष केस चेहऱ्यावर येऊन तिच्या कटाक्षांना अडथळा करत असतील. काजळाच्या स्निग्धपणाचा तिच्या नयनांमध्ये लवलेशसुद्धा नसेल. मदिरेचा त्याग केलेला असल्याने तिचे नयन त्यांचे रम्य असे भ्रुकुटीविलाससुद्धा विसरून गेले असतील. असे ते तिचे नयन हे मेघा, तू तिच्या समीप जाताच स्फुरण पावू लागतील. त्या मृगाक्षीच्या पापण्या शुभसंकेतांमुळे लवू लागतील. त्या वेळी तिच्या त्या पापण्यांना मत्स्यांच्या हालचालींमुळे कंपित झालेल्या कमलांचे ऐश्वर्य प्राप्त झालेले असेल. 

बहुतेक अनुवादकांनी मेघाच्या आगमनामुळे तिला शुभसंकेत मिळेल आणि तिचा डावा डोळा फडफडू लागेल किंवा लवू लागेल असा, अर्थ लावला आहे.

कुसुमाग्रज मात्र थोडा वेगळा अर्थ लावतात. आणि हा अर्थ जास्त सुंदर आहे. ते म्हणतात -

‘तवागमाचें भावुनिया शुभ थरथरतिल पापण्या

मत्स्य धावतां जणुं कमलांचें सुरम्य आंदोलन!’

मेघ आल्यामुळे यक्ष-पत्नीला शुभसंकेत मिळाला आहे आणि त्यामुळे ती भावाकुल झाल्यानं तिच्या पापण्या थरथरू लागल्या आहेत.

पूर्वमेघामध्ये ज्यांचे प्रियकर प्रवासाला गेले आहेत, अशा स्त्रिया मेघाच्या पहिल्या दर्शनानं अत्यंत उत्साहित झाल्या, असं वर्णन आपण पाहिलं आहे. मेघ आला म्हणजे प्रेमाचा ऋतू आला. वातावरण मेघमय झाले की, आपले प्रियकर आपल्यापासून दूर राहूच शकणार नाही, अशा विचारांनी त्या स्त्रिया उत्साहित झाल्या होत्या. त्यांच्याबरोबरच बलाकांच्या मनातसुद्धा गर्भाधानक्षणांच्या म्हणजे मीलनाच्या स्मृती जाग्या झाल्या होत्या. तो सगळा संदर्भ इथं मेघ बघून यक्ष-पत्नीचे नयन विस्फारले जाण्याला आहे. आणि इथं तर या मेघाला त्या यक्षिणीच्या प्रियकराने खास तिच्यासाठी पाठवलं आहे.

३५.

वामश्चास्याः कररुहपदैर्मुच्यमानो मदीयै -

र्मुक्तजालं चिरपरिचितं त्याजितो दैवगत्या।

संभोगान्ते मम समुचितो हस्तसंवाहनानां

यास्यत्यूरुः सरसकदलीस्तम्भगौरश्चलत्वम्॥

 

अंक सखीचे – नखक्षतांविन विरही ते बापुडे

मर्दन ज्यांचें या हातानें सुरतानंतर घडे,

नव कदलीचे रसरसलेले कांड गौर गोमटे,

वरी न रशना मोत्यांची, ते स्फुरतिल डावीकडे!

 

चिन्हें आतां मुळि न दिसती जेथ माझ्या नखांचीं

मोत्यांची ती नुरवित विधी नित्य जाळी सुखाची

संभोगान्तीं उचित चुरण्या मत्करांनींच, डावी

मांडी तीची कनक कदली-तुल्य गौर स्फुरावी

 

वाम अंक तो, मुकलासे जो आतां माझ्या नखक्षतांना

गति दैवाची विपरित म्हणुनी रुळे न ज्यावर मौक्तिकरशना,

संभोगाचा शीण हराया निजहस्तें मी चुरित जयाला

कंपित होई, रसाळ गाभा केळीचा जणुं गोरा पिवळा!

 

माझ्या नखांच्या खुणा तिच्या मांडीवर आता उरलेल्या नाहियेत. तिच्या कमरेभोवती नेहमी रुळणाऱ्या मोत्यांच्या जाळीशी आता तिचा वियोग झालेला आहे. रतिक्रीडेनंतर माझा हात तिच्या मांड्यांवरून फिरत राहत असे. रसरसलेल्या केळीच्या गाभ्याप्रमाणे गोरीपान असलेली तिची डावी मांडी, हे मेघा, तू समीप दिसताच थरथरू लागेल.

संभोगानंतर यक्ष तिच्या मांड्यांचं ‘संवाहन’ करत असे. हे संवाहन तो का करत होता, याविषयी अनुवादकांमध्ये एकमत नाही.

बापट-मंगरूळकर-हातवळणे आणि शांताबाई यांचं म्हणणं असं की, रतिक्रीडेनंतर तिच्या श्रमांचं हरण करण्यासाठी यक्ष तिच्या मांड्या चेपून देत असे.

चंद्रा राजन यांचं मत थोडं वेगळं आहे -

‘And her left thigh—bare of my nail marks,

unadorned by the network of

pearls of the long-worn zone

she cast aside struck by the turn of fate,

so used to the gentle stroking of my hands

after love’s enjoyment—’

इथं यक्ष तिच्या मांड्या रतिक्रीडेनंतर हलक्या हातानं कुरवाळतो आहे.

चंद्रा राजन यांचा यक्ष रतिक्रीडेनंतर तिला सांगतो आहे की, अजूनही माझ्या मनात तुझ्या शरीराविषयीचं आकर्षण कायम आहे.

शांताबाईंचा यक्ष रतिक्रीडेनंतर तिची काळजी घेतो आहे.

बोवणकरांचा यक्ष थोडा रुक्ष आहे. रतिक्रीडेनंतर तो आपल्या प्रेयसीची मांडी ‘चेपली जाण्यास’  योग्य असल्यामुळे चेपतो आहे.

काहीही असलं तरी रतिक्रीडेनंतर यक्ष तिच्याकडे पाठ फिरवून झोपत नव्हता, हे मान्य करायला हवं. कालिदास काय किंवा यक्ष काय, स्त्रीविषयी अत्यंत आदर असलेली व्यक्तिमत्त्वं होती!

मांड्यांवर रुळणाऱ्या मोत्यांच्या जाळीविषयी बोरवणकर लिहितात – “नखांच्या चिन्हांनी आग होते म्हणून तिचे शमन करण्यासाठी मोत्यांचे अलंकार त्या चिन्हांवर घालायची प्रथा होती. आता यक्ष नसल्यामुळे नखचिन्हं नाहीत. अर्थात आग नाही म्हणून मोत्यांची जाळी नाही.”

मेघ समीप येताच यक्षीची डावी मांडी स्फुरण पावेल, असं यक्षाला वाटतं आहे, याचीही दोन कारणं दिली जातात. एक म्हणजे, डावी मांडी प्रसरण पावणं, हा शुभशकून मानला गेला आहे. दुसरं म्हणजे, मेघ आल्यामुळे आता यक्षाचं आगमन फार दूर नाही, या विचारांनी तिला ‘सुखांची’ आठवण होईल आणि त्यामुळे तिची डावी मांडी स्फुरण पावू लागेल.

..................................................................................................................................................................

लेखांक पहिला : कालिदासाच्या काव्यातील एकेक श्लोक सौंदर्यवंत ऐरावतासारखा झुलत राहतो, आणि त्यावर आशयाचा ऐश्वर्यमान इंद्र आरूढ झालेला असतो!

लेखांक दुसरा : उत्कंठा उत्पन्न करणाऱ्या त्या मेघासमोर यक्ष आपले अश्रू आवरत कसाबसा उभा राहिला…

लेखांक तिसरा : कालिदास आपल्याला आपल्या जगातून उचलतात आणि प्रेमाच्या व सौंदर्याच्या तीव्र संवेदनांनी भारलेल्या जगात घेऊन जातात…

लेखांक चौथा कालिदासाला जेव्हा जेव्हा प्रकृतीतील अपार सौंदर्य दिसते, तेव्हा तेव्हा त्याला पुरुष-तत्त्वाची आठवण होते…

लेखांक पाचवा : कालिदासाच्या सौंदर्यदृष्टीचा स्पर्श त्याच्या अनुवादकांनासुद्धा होतो…

लेखांक सहावा : येथून आपला कालिदासाच्या ‘मेघदूता’तील श्रृंगाररसाच्या प्रवाहात प्रवेश होतो.…

लेखांक सातवा : आपल्या प्रेमामुळे दुसरी व्यक्ती किती आनंदी होते आहे, यावर आपल्या प्रेमाचे भाग्य अवलंबून असते!

लेखांक आठवा : कालिदास सगळे वातावरणच स्त्री-पुरुषांतील प्रेमामध्ये अध्याहृत असलेल्या अनिवार वेडाने भारावून टाकतो...

लेखांक नववा : प्रेमात पडलेल्या स्त्रीच्या प्रेमाचा अव्हेर करणे, यक्षाला योग्य वाटत नाही. म्हणून तो मेघाला सांगतो आहे…

लेखांक दहावा : कालिदासाची सौंदर्यदृष्टी किती सूक्ष्म निरीक्षणांतून जन्मली आहे, याची अनेक उदाहरणे देता येण्यासारखी आहेत…

लेखांक अकरावा : ‘मेघदुता’तल्या ४७व्या श्लोकातील एका ओळीचा अनुवाद करताना सगळ्याच अनुवादकांची धांदल उडालीय...

लेखांक बारावा : मेघ थोर कुळातील असून जलसंपदा हे त्याचे वैभव. ते कारणी लागावे ही यक्षाची इच्छा आहे…

लेखांक तेरावा : निसर्गातील वस्तुजाताला सुंदर असे व्यक्तिस्वरूप देणे, हा कालिदासाच्या प्रतिभेचा एक अजब धर्म आहे...

लेखांक चौदावा : स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वात आणि सौंदर्यात विद्युल्लता लपलेली असते, हे कालिदासाला जेवढे जाणवले, तेवढे दुसऱ्या कुठल्या कवीला जाणवले असेल, असे वाटत नाही

लेखांक पंधरावा रत्नदीपांवर सुगंधाचा वा गुलालाचा किंवा हिऱ्याच्या कणिकांचा मेघ तरळतो आहे

लेखांक सोळावा : इतर वेळी पिणाऱ्याची दक्षता घालवणारे मद्य इथे मात्र अत्यंत दक्षपणे मदनाचे कार्य करत आहे...

लेखांक सतरावा : अशोकाला जसा ‘तो’ नाजूक लत्ता-प्रहार हवा आहे, तसा ‘तो’ यक्षाला स्वतःलाही हवा आहे…

लेखांक अठरावा : सौंदर्य, काम, प्रेम आणि निष्ठा हे या यक्ष आणि यक्षिणीच्या जीवनातील चार मुख्य आधारस्तंभ आहेत!

लेखांक एकोणविसावाअभ्रांनी आच्छादलेल्या दिवशी कमलिनी ना नीट फुललेली आहे, ना नीट मिटलेली आहे…

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा