स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वात आणि सौंदर्यात विद्युल्लता लपलेली असते, हे कालिदासाला जेवढे जाणवले, तेवढे दुसऱ्या कुठल्या कवीला जाणवले असेल, असे वाटत नाही
पडघम - साहित्यिक
श्रीनिवास जोशी
  • चित्र शांताराम आत्माराम सबनीस यांच्या ‘महाराष्ट्र मेघदूत’ (१९३८) या पुस्तकातून साभार
  • Wed , 27 July 2022
  • पडघम साहित्यिक कालिदास Kalidasa कालिदास दिन Kalidasa Din मेघदूत Meghadūta आषाढस्य प्रथम दिवसे Aashadhasya Prathama Divase

३० जूनपासून आषाढाला सुरुवात झाली… आणि आषाढ म्हटला की, अनेकांना महाकवी कालिदासाच्या ‘मेघदूत’ची आठवण येते. ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या त्यातल्या शब्दांना तर ‘मोस्ट कोटेबल कोट’चा दर्जा मिळालाय! आणि ‘मेघदूत’? त्याची ख्याती काय वर्णावी! गेल्या अनेक वर्षांपासून ‘मेघदूत’ मराठीसह जगभरच्या लेखक, कवी, अनुवादक आणि रसिकवाचकांना मोहिनी घालत आले आहे. त्याची ओळख करून देणारे हे सदर १२ जुलैपासून रोज...

.................................................................................................................................................................

लेखांक चौदावा

उत्तरमेघ

(लेखातला पहिला मूळ संस्कृत श्लोक कालिदासाचा आणि त्याचे अनुवाद अनुक्रमे कुसुमाग्रज, सी.डी. देशमुख आणि शांता शेळके यांचे)

१.

विद्युत्वन्तं ललितवनिताः सेन्द्रचापं सचित्राः

संगीताय प्रहतमुरजाः स्निग्धगम्भीरघोषम्।

अन्तस्तोयं मणिमयभुवस्तुङ्गमभ्रंलिहाग्राः

प्रासादास्त्वां तुलयितुमलं यत्र तैस्तैर्विशेषैः॥

 

अलका नगरी- -महाल तेथिल गगनाला स्पर्शती,

त्यांत सुचित्रें इंद्रधनूसम, मृदंगरव नादती,

जलकणिकांपरि भूवर रत्ने, विजाच त्या भामिनी,

यथार्थतेनें साम्य दावितिल तव रूपासंगती!

 

जेथे सद्में त्वदुपम पहा होत नाना प्रकारीं

चित्रें इन्द्रायुधसम, विजेसारिख्या रम्य नारी

संगीताचा घुमत तुजसा मन्दनादें मृदंग

तूं नीरात्मा, मणितल तयां, तूं नि ते अभ्रतुंग

 

तिथें विजेसम चमकति ललना चित्रे तिथली इंद्रधनूपरि

मृदंग झडती नाद तयांचा घोष तुझा कीं गभीर अंतरि

भूमीवर जडवियली रत्ने जलकण जैसे तुझे चमकती

अलकेमधलीं भवनें तुजशीं त्या त्या परिचें साम्य दाविती

 

या अलकानगरीमध्ये गगनचुंबी प्रासाद आहेत. त्यांमध्ये सौंदर्यशालिनी ललना राहतात. हे प्रासाद विविध चित्रांनी सजवलेले आहेत. त्यात संगीतार्थ सतत मृदुंग वाजत असतात. या प्रासादांच्या जमिनी रत्नजडित आहेत. हे मेघा, तूसुद्धा विद्युल्लतेने आणि इंद्रधनुष्यांनी युक्त आहेस. तुझ्याकडेही मधुरगंभीर गडगडाट आहे. तुझे अंतरंग पाण्याने भरलेले आहे. प्रासादही तुझ्याप्रमाणेच अनेक विशेषांनी युक्त असल्याने ते तुझ्याशी बरोबरी करण्यासाठी समर्थ आहेत.

या श्लोकावर बापट-मंगरूळकर-हातावळणे यांनी एक टीप दिलेली आहे – “प्रासाद आणि मेघ दोघेही उत्तुंग आहेत, गगनगामी आहेत. एकाकडे विद्युल्लता आहे, तर एकाकडे विद्युल्लतेसारख्या ललना आहेत! एका जवळ इंद्रधनुष्य तर दुसऱ्याकडे चित्र! याचा शब्द घनगंभीर, तर त्याच्याकडे संगीतासाठी मृदुंग! एकाकडे स्फटिकासारखे पाणी तर एकाकडे रत्नजडित जमीन!”

कालिदास देवांगनांची तुलना विद्युल्लतेशी करतो आहे. स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वात आणि सौंदर्यात विद्युल्लता लपलेली असते, हे कालिदासाला जेवढे जाणवले होते, तेवढे दुसऱ्या कुठल्या कवीला जाणवले असेल असे वाटत नाही.

मेघ आणि प्रासादांचे हे सौंदर्याच्या संदर्भातील एकत्व होरेस विल्सनसाहेबाने अतिशय सुंदर ओळींच्या मुशींमध्ये ढाळले आहे-

‘Whose beauteous inmates bright as lightning glare,

And tabors mock the thunders of the air;

The rainbow flickering gleams along the walls,

And glittering rain in sparkling diamonds falls.’

‘या प्रासादांमध्ये राहणाऱ्या स्त्रिया विद्युल्लतेच्या प्रकाशासारख्या तेजस्वी आहेत,

येथील मृदुंग मेघाच्या गडगडाटाशी स्पर्धा करत आहेत,

इंद्रधनुष्ये येथे या प्रासादांमधील भिंतींवरून चमकत आहेत,

आणि झळाळता पाऊस तेजाने सळसळणाऱ्या हिऱ्यांच्या धारांमधून पडत आहे.’

होरेस विल्सन अनुवाद करताना नको एवढे स्वातंत्र्य घेतो, हे खरे आहे, पण असे काही श्लोक आहेत की, जिथे तो त्या श्लोकाच्या आशयाचा आत्मा नेमकेपणाने पकडतो. 

२.

हस्ते लीलाकमलमलके बालकुन्दानुविद्धं

नीता लोध्रप्रसवरजसा पाण्डुतामानने श्रीः।

चूडापाशे नवकुरबकं चारु कर्णे शिरीषं

सीमन्ते च त्वदुपगमजं यत्र नीपं वधूनाम्॥

 

विलासिनींच्या करांत शोभे तेथें कमलावली

कुंदफुलें मिरविती काजळी केशकलापांतलीं

भांगामध्यें कदंब, कानीं शिरसाची मंजिरी

लोध्र परागांसवें मुखश्री पांडुरता पावली.

 

हातीं नाचे कमल, अलकीं खोविलीं बालकुन्दे

लोध्राचें तें सुम-रज मुख- श्रीप्रति श्वेतता दे

कानीं साजे शिरस, फुलली केशपाशीं अबोली

जेथें नारी अनुचर तुझें नीप सीमंतिं घाली

 

तिथें कामिनी कुंद माळुनी कमळफुलांशी सहज खेळती

लोध्रफुलांचे पराग माखुन गौर गौरतर वदनें करिती

कचपाशीं कोरांटी रचिती, शिरीष खोविति कानांवरुनी

तवागमीं जो कदम्ब फुलतो, भांग सजविती अपुले त्यांनी

 

अलकानगरीमध्ये स्त्रियांच्या हातांमध्ये विलासाकरता कमलपुष्पे असतात. ताज्या कुंदांची फुले त्यांनी केसांमध्ये गुंफलेली असतात. लोध्रफुलांच्या परागांमुळे येथील स्त्रियांच्या मुखावर एक सुंदर शोभा विलसत असते. त्यांच्या केशपाशांमध्ये कोरांटीची पुष्पे माळलेली असतात. त्यांच्या कानांमध्ये शिरिशाची कोमल पुष्पे असतात. आणि त्यांच्या भांगांमध्ये तुझ्या आगमनाने फुलणारी कदंब-पुष्पे असतात.

लोध्र फुलांचे पराग फिकटसर सोनेरी रंगाचे आहेत आणि ते पराग या अलकापुरीतील ललनांनी आपल्या गालावर पसरवलेले आहेत.

या सगळ्या श्रृंगाराचे वर्णन होरेस विल्सनसाहेबाने फार सुंदर केलेले आहे -

‘There lovely triflers wanton through the day,

Dress all their care, and all their labour play;

One while, the fluttering Lotus fans the fair,

Or Kunda top-knots crown the jetty hair.

Now, o'er the cheek the Lodh's pale pollen shines,

Now midst their curls the Amaranth entwines

These graces varying with the varying year,

Sirisha-blossoms deck the tender ear;

Or new Kadambas, with thy coming born,

The parted locks and polished front adorn.’

विल्सनसाहेबाप्रमाणेच कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी केलेला अनुवाद वाचायला मजा येते. रा. शं. वाळिंबे यांनी हा अनुवाद दिलेला आहे-

‘विलासिनींच्या हस्तीं तेथे कमलें, कुंदकळ्याही

शिरीं शोभती, मुखिं पांडुरता येई लोधरजांहीं.

कर्णी विलसे शिरीष सुंदर, केशीं कुरबक साजे,

नीपपुष्पही दिसते भांगी, सुचवी घनागमा जे.'

पण सी डीं नी खरी कमाल केलेली आहे -

हातीं नाचे कमल, अलकीं खोविलीं बालकुन्दे

लोध्राचें तें सुम-रज मुख- श्रीप्रति श्वेतता दे

कानीं साजे शिरस, फुलली केशपाशीं अबोली

जेथें नारी अनुचर तुझें नीप सीमंतिं घाली’

‘त्यांच्या हातात कमले नाचत आहेत, अलकी म्हणजे माथ्यावरील केसात कुंदाची नुकतीच उमलायला लागलेली फुले खोवली आहेत, लोध्र फुलांचे सुम-रज, त्यांच्या मुखश्री गोरेपणा बहाल करत आहेत. कानी शिरीष विलसत आहे, केशपाशामध्ये अबोली फुलली आहे आणि जी तुझी अनुचर आहेत, म्हणजे जी तुझ्या पाठोपाठ येतात, ती नीपाची म्हणजे कदंबाची फुले, त्यांनी त्यांच्या भांगांमध्ये घातली आहेत.’

एवढ्या कमी शब्दांत आशयाचा आणि शब्द-संगीताचा एवढा मोठा विलास!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

३.

यत्रोन्मत्तभ्रमरमुखराः पादपा नित्यपुष्पा

हंसश्रेणीरचितरशना नित्यपद्मा नलिन्यः।

केकोत्कण्ठा भवनशिखिनो नित्यभास्वत्कलापा

नित्यज्योत्स्नाः प्रतिहततमोवृत्तिरम्याः प्रदोषाः।।

 

कुसमाग्रजांनी त्यांच्या अनुवादात या श्लोकाचा अंतर्भाव केलेला नाही.

 

जेथे पुष्पं तरुवरि सदा गुंगती मत्त भृंग

पद्में युक्ता सतत नलिनी भोंवतीं हंस संघ

टाहो देती कधिं न मुकतां पिच्छ-शोभेस मोर

रात्रीं रात्रीं तिमिर नुरतां चांदण्याची बहार

 

वृक्ष तेथले सदाच फुलले भ्रमर जयांवर नित्य गुंजती

हंसमालिका जणू मेखला नित्य विकसल्या कमलिनिभवतीं

सदनिं पाळले मोर केकती झळझळता पसरून पिसारा

चांदण्यांत नित रजनी न्हाती पूर्णशशीच्या स्रवता धारा

 

अलकानगरीमध्ये वृक्ष नेहमी फुलांनी डवरलेले असतात. त्यामुळे ते नेहमीच भुंग्यांच्या गुंजारवाने निनादत असतात. येथील दीर्घिका कमलपुष्पांनी नेहमी गच्च भरलेल्या असतात आणि या दीर्घिका राजहंसांच्या मेखलांनी नित्य वेढलेल्या असतात. घराघरांत असलेल्या मोरांचे पिसारे येथे तेजाने नित्य झळाळत असतात, आणि हे मोर माना उंचावत नेहमी केकारव करताना दिसतात. येथील रात्री नेहमीच चांदण्याने युक्त असतात. अंधाराचे आवरण नसल्याने येथील रात्री नेहमीच रमणीय असतात.

बापट-मंगरूळकर-हातवळणे म्हणतात – “येथील वृक्षांना ऋतुनियम माहीत नव्हता, कमलांना हिमाचे भय नव्हते, मयूरांना मेघदर्शनाची आवश्यकता नव्हती आणि चंद्राला क्षय नव्हता.”

४.

आनन्दोत्थं नयनसलिलं यत्र नान्यैर्निमित्तै -

र्नान्यस्तापः कुसुमशरजादिष्टसंयोगसाध्यात्।

नाप्यन्यस्मात्प्रणयकलहाद्विप्रयोगोपपत्ति -

र्वित्तेशानां न च खलु वयो यौवनादन्यदस्ति॥

 

तिथें आसवें आनंदाचीं केवळ नेत्रांतुन

दाह तिथें मदनाचा केवळ होय न जों मीलन

वियोग तेथें घडतो केवळ प्रणयी कलहामुळे

वय तेथें ना अन्य कुणाला तारुण्यावांचुन!

 

आनंदाश्रू, जल न दुसऱ्या कारणें, नेत्रिं जेथ

तापा, ज्यातें निववि दयित-प्राप्ति, त्या काम देत

नाहीं तैसा प्रणयकलहावीण विश्लेष सह्य

यक्षांचें ना वयच दुसरें यौवनाच्या शिवाय

 

आनंदाश्रू नयनीं केवळ अन्य तयांना निमित्त नाहीं

मीलनसुख अंतरतां त्यांना मदनशरांविण नसे व्यथाही

प्रणयकलह झाल्यास घडे तो - तोच तेवढा वियोग त्यांतें

विचित्र सारे - वयहि न दुसरें तारुण्याविण यक्षजनातें!

 

येथे यक्षांच्या नेत्रात फक्त आनंदाचेच काय ते अश्रू उभे राहतात. इतर कुठल्याही कारणांनी नाहीत. विरहाच्या मदनतापाशिवाय इथे दुसरा कुठलाही ताप नाही. आणि, हा मदनाचा तापसुद्धा प्रिय व्यक्तीचे मीलन होताच शमून जातो. प्रणयकलहाशिवाय दुसऱ्या कुठल्याही कारणाने इथे विरहप्राप्ती होत नाही. आणि, तारुण्याशिवाय इथे दुसरे कुठलेही वय नाही.

५.

यस्यां यक्षाः सितमणिमयान्येत्य हर्म्यस्थलानि

ज्योतिश्छायाकुसुमरचितान्युत्तमस्त्रीसहायाः।

आसेवन्ते मधु रतिफलं कल्पवृक्षप्रसूतं

त्वद्गम्भीरध्वनिषु शनकैः पुष्करेष्वाहतेषु॥

 

स्फटिक मण्यांनीं खचलेले तल सौध असे तेथले

नक्षत्रांच्या प्रतिबिंबांचीं त्यावर रात्रीं फुलें

मृदंग घुमतां प्राशन करिती यक्ष कामिनींसह

कल्पलतांची सुरा, जिच्यांतुन रतिमद ओथंबले!

 

ताराबिंब उमटुनि सुमालंकृती, यक्ष जेथ

जाती स्वच्छस्फटिक सदनीं सुंदरी -संगतींत

पीती कल्पद्रुम मधु चढे ज्यामुळे प्रेमरंग

जों गंभीर ध्वनिसम तुझ्या मंद वाजे मृदंग

 

मणिमय सदनीं तिथे विहरती यक्ष आपल्या सख्यांसंगतीं

स्फटिकभूवरी बिंबुनि तारा पुष्पविरचना जेथें करिती

‘रतिफल’ नामें कल्पतरूची मदिरा रुचिनें करिती प्राशन

मृदंग नादति साथ द्यावया, तुझेंच जणुं कीं तें घनगर्जन!

 

या अलकानगरीमध्ये यक्ष आपल्या प्रासादांच्या गच्च्यांवर आपल्या सौंदर्यशालिनी स्त्रियांना घेऊन जातात. येथल्या जमिनीवर स्फटिक आणि रत्ने जडवलेली असतात. या स्फटिकांमध्ये आणि रत्नांमध्ये आकाशातील तारकांची प्रतिबिंबे पडतात, तेव्हा त्या रत्नांमध्ये जणू तेजाची फुले फुललेली आहेत, असे वाटते. तेथे हे मेघा, तुझ्या गंभीर ध्वनीप्रमाणे आवाज असलेली ‘पुष्कर’ वाद्ये हलक्या आवाजात वाजवली जात असतात. अशा वातावरणात ते यक्ष कल्पवृक्षापासून तयार झालेले ‘रतिफल’ नावाचे मद्य मोठ्या आवडीने आपल्या उत्तम अशा स्त्रियांबरोबर प्राशन करत असतात.

‘रतिफल मद्य’ म्हणजे ‘रति’ हेच ज्याचे फल आहे असे मद्य. उत्फुल्ल प्रेमाचे आणि उर्जित कामभावनेचे फल देणारे मद्य!

अतिशय अभिजात असे हे वातावरण कालिदासाने निर्माण केलेले आहे.

बापट-मंगरूळकर-हातवळणे यांनी ‘पुष्कर वाद्य’ याचा अर्थ ‘एक प्रकारचा नगारा’ असा दिलेला आहे.

सीडींनी हा सगळा अर्थ आपल्या अनुवादात उतरवलेला आहे.

‘ताराबिंब उमटुनि सुमालंकृती, यक्ष जेथ

जाती स्वच्छस्फटिक सदनीं सुंदरी -संगतींत

पीती कल्पद्रुम मधु चढे ज्यामुळे प्रेमरंग

जों गंभीर ध्वनिसम तुझ्या मंद वाजे मृदंग’

ताराबिंब उमटल्यामुळे सुमनांचे अलंकरण केले गेले आहे, असे वाटते आहे. सुंदर स्वच्छस्फटिक सदनांवर सुंदरी-संगतीत यक्ष जात आहेत. कल्पद्रुमाचे मधुमद्य ते पीत आहेत. त्यामुळे प्रेमरंग ‘चढत’ चालला आहे. आणि, त्या वेळी हे मेघा तुझ्या ध्वनीसारखा मृदुंग मंद आवाजात वाजतो आहे.

..................................................................................................................................................................

लेखांक पहिला : कालिदासाच्या काव्यातील एकेक श्लोक सौंदर्यवंत ऐरावतासारखा झुलत राहतो, आणि त्यावर आशयाचा ऐश्वर्यमान इंद्र आरूढ झालेला असतो!

लेखांक दुसरा : उत्कंठा उत्पन्न करणाऱ्या त्या मेघासमोर यक्ष आपले अश्रू आवरत कसाबसा उभा राहिला…

लेखांक तिसरा : कालिदास आपल्याला आपल्या जगातून उचलतात आणि प्रेमाच्या व सौंदर्याच्या तीव्र संवेदनांनी भारलेल्या जगात घेऊन जातात…

लेखांक चौथा कालिदासाला जेव्हा जेव्हा प्रकृतीतील अपार सौंदर्य दिसते, तेव्हा तेव्हा त्याला पुरुष-तत्त्वाची आठवण होते…

लेखांक पाचवा : कालिदासाच्या सौंदर्यदृष्टीचा स्पर्श त्याच्या अनुवादकांनासुद्धा होतो…

लेखांक सहावा : येथून आपला कालिदासाच्या ‘मेघदूता’तील श्रृंगाररसाच्या प्रवाहात प्रवेश होतो.…

लेखांक सातवा : आपल्या प्रेमामुळे दुसरी व्यक्ती किती आनंदी होते आहे, यावर आपल्या प्रेमाचे भाग्य अवलंबून असते!

लेखांक आठवा : कालिदास सगळे वातावरणच स्त्री-पुरुषांतील प्रेमामध्ये अध्याहृत असलेल्या अनिवार वेडाने भारावून टाकतो...

लेखांक नववा : प्रेमात पडलेल्या स्त्रीच्या प्रेमाचा अव्हेर करणे, यक्षाला योग्य वाटत नाही. म्हणून तो मेघाला सांगतो आहे…

लेखांक दहावा : कालिदासाची सौंदर्यदृष्टी किती सूक्ष्म निरीक्षणांतून जन्मली आहे, याची अनेक उदाहरणे देता येण्यासारखी आहेत…

लेखांक अकरावा : ‘मेघदुता’तल्या ४७व्या श्लोकातील एका ओळीचा अनुवाद करताना सगळ्याच अनुवादकांची धांदल उडालीय...

लेखांक बारावा : मेघ थोर कुळातील असून जलसंपदा हे त्याचे वैभव. ते कारणी लागावे ही यक्षाची इच्छा आहे…

लेखांक तेरावानिसर्गातील वस्तुजाताला सुंदर असे व्यक्तिस्वरूप देणे, हा कालिदासाच्या प्रतिभेचा एक अजब धर्म आहे...

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा