युक्रेनने २०१४ साली मोदींच्या हत्येचा प्रयत्न केला होता, ही तद्दन ‘फेक न्यूज’ आहे!
पडघम - माध्यमनामा
रवि आमले
  • मलेशियाचे एमएच १७ हे विमान आणि त्याबाबतची फेक न्यूज
  • Mon , 07 March 2022
  • पडघम माध्यमनामा रशिया Russia सोव्हिएत रशिया Soviet Union युक्रेन Ukraine नाटो NATO अमेरिका America संयुक्त राष्ट्रसंघ United Nation

आपल्याकडील अनेक उजव्यांना रशियाचे एकाधिकारशहा व्लादिमीर पुतीन यांचा प्रचंड पुळका आहे. कारण तो त्यांच्या हुकूमशहाच्या प्रतिमेत तंतोतंत बसतो. त्यांनाही अशाच हुकूमशहाची प्रतीक्षा आहे. सध्या त्यांनी पुन्हा एकदा पुतीन यांच्या पाठराखणीची भूमिका घेतलेली आहे. आणि त्यातून उगवला आहे एक षड्‌यंत्र सिद्धान्त. सध्या तो फेसबुक आणि व्हॉट्सॲपवरून फिरत आहे. ती नेमकी काय भानगड आहे, हे नीट समजून घेतले पाहिजे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशिया-युक्रेन युद्धात तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. याचे कारण एकच - भारताचा नाईलाज. पण त्यावरून टीका होत आहे. ती नैतिक भूमिकेतून. पुतीन हे आक्रमक आहेत. त्यांचा निषेध करायलाच हवा, अशी ही भूमिका. मोदी तसे करत नाहीत. आता याचे काही तरी वेगळे स्पष्टीकरण द्यायला तर हवे. त्यातून मग सांगण्यात आले की, युक्रेन हा संयुक्त राष्ट्रांत कशी भारतविरोधी भूमिका घ्यायचा वगैरे. पण हे काही फारसे जोरदार होत नव्हते. प्रोपगंडामध्ये ‘बिग लाय’ नावाचे तंत्र असते. इतके अविश्वसनीय खोटे सांगा की, लोकांना वाटावे ते खरेच असणार. तर यातूनच पुढे आला एक षड्‌यंत्र सिद्धान्त - युक्रेनने मोदींच्या हत्येचा म्हणे प्रयत्न केला.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

१७ जुलै २०१४ रोजी मोदींचे विमान युक्रेनच्या हवाई सीमेतून येत असताना ते पाडण्याचा म्हणे प्रयत्न झाला होता. तशीच योजना होती. पण झाले असे की, काही तरी तांत्रिक बिघाडाने म्हणे ते विमान उशिरा निघाले. आणि त्याऐवजी पाडण्यात आले मलेशियाचे प्रवासी विमान.

पण खरेच तसे घडले होते का?

१) त्या दिवशी म्हणजे १७ जुलै २०१४ रोजी भारतीय वेळेनुसार सायं. ६.५०च्या सुमारास वाजता मलेशियाचे एमएच १७ हे विमान युक्रेन-रशिया सीमेवर पाडण्यात आले. तो भाग होता रशियावादी बंडखोरांच्या ताब्यातला. ते जमिनीवरून हवेत मारा करण्यात येणारे बक क्षेपणास्त्र डागून पाडण्यात आले. हे क्षेपणास्त्र रशियन बनावटीचे आहे. ते रशियातून आणण्यात आले होते.

२) ज्या भागात ते विमान पाडण्यात आले, त्यावर युक्रेन सरकारचे नियंत्रण नव्हते.

३) या भागात अशी क्षेपणास्त्रे तैनात आहेत. बंडखोरांकडे ती आहेत. अशा बातम्या त्या आधी काही महिन्यांपासून विविध आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांत प्रसिद्ध होत होत्या. 

४) ही घटना घडली, तेव्हा त्या एअरस्पेसमध्ये त्या वेळी मलेशियाच्या विमानाशिवाय अन्य तीन विमाने होती. एक होते एअर इंडियाचे बोईंग ७८७ फ्लाईट ११३. ते दिल्लीहून बर्मिंगहमला चालले होते. दुसरे होते तैवानी ईव्हीए एअरचे बोईंग ७७७ फ्लाईट ८८. ते पॅरिसहून तैपेईला चालले होते. आणि मलेशियाचे विमान जेथे पाडण्यात आले, त्या स्थळापासून अगदी जवळ होते सिंगापूर एअरलाईन्सचे बोईंग ७७७ फ्लाईट ३५१. हे ‘अगदी जवळ’ म्हणजे किती जवळ? तर तब्बल ३३ किमी दूर अंतरावर!

आता मुद्दा मोदीजींच्या विमानाचा.

१) विविध विमानसेवांच्या विमानांना प्रवासाच्या वेळी विशिष्ट एअर-वे निर्धारित करून दिलेला असतो. त्यांनी त्याच फ्लाईट प्लॅननुसार, त्याच मार्गावरून प्रवास करायचा असतो.

२) त्या दिवशी त्या भागात आपली दोन विमाने होती. एक होते एअर इंडियाचे फ्लाईट ११३ हे प्रवासी बोईंग ७८७ विमान. त्याचा मार्ग मलेशियन विमानाच्या मार्गापासून किती जवळ होता? तर तब्बल ७५ किमी अंतरावर. 

३) दुसरे विमान जाणार होते मोदीजींचे - एअरइंडिया वन. त्याचा एअर-वे त्या दुर्घटनाग्रस्त विमानापासून किती अंतरावर होता - तर तब्बल २०० किमी.

४) याचा अर्थ मोदीजींच्या विमानाला कोणताही धोका नव्हता. किंबहुना ते टार्गेटवर नव्हतेच. मोदीजींच्या विमानाला कोणताही धोका नव्हता, हे मोदी मंत्रीमंडळातील नागरी विमानोड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांनीच जाहीर केले होते.

५) दुसरी गोष्ट - मोदीजींचे विमान फ्रँकफर्टहून उडाले ११.२२ जीएमटीला. म्हणजे भारतीय वेळेनुसार साधारणतः सायंकाळी पाचच्या सुमारास. ते ज्या भागात ती दुर्घटना घडली, त्या डोनेस्क नजीक होते, क्षेपणास्त्र हल्याच्या एक तास उशीरानंतर.

थोडक्यात काय, तर त्या दिवशी त्या भागातून मोदीजींचे विमान गेले हे खरे. पण ते पाडण्याचा डाव होता असे नाही. तसा कट असता, तर ते दहशतवादी क्षेपणास्त्र घेऊन मोदींच्या विमानाच्या मार्गापासून २०० किमी अंतरावर बसले नसते. आणि एक तास आधीच त्यांनी दुसरे विमान पाडले नसते. मोदींच्या विमानाला उशीर झाला म्हणून चुकून दुसरेच विमान पाडले, असे करायला ते दहशतवादी म्हणजे महामार्गावर दरोडे घालणारे भुरटे वाटमारे वाटले की काय?

पण तसे भासवले जातेय. याचे कारण स्पष्ट आहे. मोदींना मारण्याचे प्रयत्न कसे सतत सुरू असतात, हे दाखवून ‘व्हिक्टिम कार्ड’ खेळायचे आणि त्याचबरोबर युक्रेनविषयी भारतीयांच्या मनात - खरे तर येथील भक्तांच्या मनात - विखार निर्माण करायचा. त्यातून मोदींच्या तटस्थ भूमिकेला समर्थन निर्माण करायचे. यासाठीच हा कॉन्स्पिरसी थिअरीचा खेळ सुरू आहे. त्यामुळे त्या विमान दुर्घटनेमागील एक दहशतवादी इगोर गिर्कीन याला त्यांनी चक्क युक्रेनवादी नागरिक करून टाकले. त्याला म्हणे भारताच्या दबावामुळे अटक करण्यात आली. त्यांना हे माहीतच नाही की, त्याला अटक झालेलीच नाही. मुळात हा गिर्कीन होता रशियन. तेथील गुप्तचरसंस्था एफएसबीचा तो माजी अधिकारी होता. आणि युक्रेनविरोधात तेथे लढत होता. बंडखोरांचा सेनापती होता. नंतर २०१६मध्ये त्याने रशियन नॅशनल मुव्हमेन्ट नावाचा अतिराष्ट्रवादी विचारांचा पक्षही स्थापन केला. म्हणजे या षड्‌यंत्र सिद्धांतानुसार मोदींच्या हत्येचा प्रयत्न कोणी केला असेल, तर तो रशियावादी आणि युक्रेनविरोधी बंडखोर नेत्याने. 

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

या सगळ्यात एक सातत्य मात्र दिसते. मोदी अडचणीत आले, निवडणुका असल्या की, तातडीने मोदींच्या हत्येच्या कटाविषयीच्या बातम्या झळकू लागतात. त्यातलीच ही एक - जरा वेगळ्या प्रकारची कथा.

या कथेचा एक पैलू मात्र हे षड्यंत्रसिद्धान्तकार विसरले. तो म्हणजे - जर युक्रेनने मोदींविरोधात कट केला, यात थोडाही सत्यांश असेल, तर मग आपण युक्रेनविरोधात रान पेटवायला हवे होते. तेव्हा योग्य पुराव्यांअभावी नसेल ते करता आले. पण आता तर चांगली संधी होती. अजिबात भेकडपणा न करता युक्रेनविरोधात थेटच भूमिका घ्यायला हवी होती. तेथे मानवतावादी भूमिकेतून मदत वगैरे पाठवायला नको होती. मोदी सरकार तसे करत नाही, यातून त्यांची प्रतिमा घाबरट अशी होते, हे या प्रोपगंडाकारांच्या लक्षातच आलेले नाही, असे दिसते.

संदर्भ -

१. https://www.thehindu.com/news/national//article60341162.ece

२. https://timesofindia.indiatimes.com/india/modi-flew-out-minutes-before-mh17-crash/articleshow/38648592.cms

३. Crash Of Malaysia Airlines flight MH17, Hrabove, Ukraine, 17 July 2014 : The Hague, Oct 2015.

(मलेशिया विमान अपघाताचा तपास करणाऱ्या डच सेफ्टी बोर्डचा अहवाल.)

४. https://www.bbc.com/news/av/world-europe-37499811

..................................................................................................................................................................

हेही पहा\वाचा

‘महाभारता’तल्या कर्णाचे कवच कुंडले गमावल्याने जे झाले, तशी अवस्था आज युक्रेनच्या वाट्याला आली आहे!

व्लादिमीर पुतिन युक्रेनसोबतचे युद्ध आधीच हरले आहेत...

असं वाटतं की, व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर बायडेन व पुतिनला टॅग करता येतं का, ते बघावं! म्हणजे उद्यापर्यंत तेच जाहीर करतील- ‘युद्ध थांबवतो, पण फॉरवर्ड मेसेजेस नको!!...’

ही लढाई डेव्हिड आणि गोलियथची आहे. रशिया नावाच्या महाकाय गोलियथपुढे युक्रेन नावाचा डेव्हिड हार मानायला तयार नाही!

आज युक्रेनची गत ‘रामायणा’तल्या विभीषणासारखी झालीय. रशिया आणि नाटो देश त्याला ‘बिभीषण’सारखा घरभेदी मानायला लागले आहेत

रशिया-युक्रेन संघर्ष : अमेरिका, युरोपियन राष्ट्र, नाटो, चीन आणि भारत

................................................................................................................................................................

लेखक रवि आमले ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांचे ‘प्रोपगंडा’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

ravi.amale@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......