नाना जोशी हे मुंबई महानगरपालिकेचे सेवानिवृत्त उपप्रकल्प अभियंते, ‘नवी क्षितिजे’ या त्रैमासिकाचे एक संपादक आणि व्यासंगी वाचक. त्यांचे हे मनोगत पहिल्यांदा दै. ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या ‘ग्रंथांच्या सहवासात’ या सदरात २७ मार्च १९९४ रोजी ‘न सुटणारं, जन्मभराचं व्यसन!’ या शीर्षकाखाली प्रकाशित झाले होते. जोशींना वाचनाचे व्यसन खूप लहानवयात लागले. तेव्हापासून ते ग्रंथसंग्रहही करत गेले. हा लेख लिहिला तेव्हा त्यांच्या संग्रहात १६ हजारांहून अधिक ग्रंथ होते. नंतर जोशींनी आपला सगळा ग्रंथसंग्रह सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयाला दिला. त्या ग्रंथसंग्रहावर पुढे या महाविद्यालयाच्या ग्रंथालयाचे ग्रंथपाल वाय. एस. रास्ते यांनी एम. फिल केली... तर अशा या व्यासंगी ग्रंथप्रेमीचे हे मनोगत आजच्या ‘वाचन प्रेरणा दिवसा’च्या निमित्ताने…
..................................................................................................................................................................
माझा जन्म एका मध्यमवर्गीय कोकणस्थ कुटुंबात झाला असल्याने अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचन करण्यासाठी घरातून प्रोत्साहन कधीच मिळाले नाही. आजूबाजूच्या घरांतूनही हाच नियम होता. म्हणून त्याबद्दल तितके वाईट वाटत नसे. अवांतर वाचन केल्याने वेळ फुकट जातो, तो आपल्या अपत्याने शाळेचा अभ्यास करून सत्कारणी लावावा, असे इतर अनेक पालकांप्रमाणे माझ्याही पालकांना वाटे. शिवाय आपल्या मुलाने वाचावयास घेतलेल्या पुस्तकात काय असेल, याबद्दल पालकांच्या मनात भीती व शंकाही असतेच.
पाश्चिमात्य देशांतील कॅथरिन कुकसन, रॉबर्ट बर्चफिल्ड, जीनेट विंटरसन यांसारख्या अनेक प्रख्यात लेखक-लेखिकांना आपले पुस्तकवेड, वाचनवेड पुरवण्यासाठी विविध खटपटी, लटपटी कराव्या लागल्याचे वाचनात आले. पण सुदैवाने मला यासाठी युक्त्या-प्रयुक्त्या कराव्या लागल्या नाहीत. माझे वडील सदैव कामात असत. आपल्या मुलाचे शाळेत कसे काय चालले आहे, त्याला परीक्षेत किती गुण मिळतात यावर त्यांचे अगदी बारीक लक्ष असे. एरवी आपला मुलगा काय करतो आहे, याची ते चिंता करीत नसत. माझ्या वडिलांनी व आप्तेष्टांनीही ‘खाऊ’साठी म्हणून दिलेले पैसे (ती रक्कम बऱ्यापैकी असे) माझ्याजवळ असत. त्यामुळे घराशेजारच्या वाचनालयाचे सभासद होणे मला सहजशक्य होते. अभ्यासाच्या पुस्तकात ‘चटोर’ समजली जाणारी पुस्तके लपवून वाचणेही जमत असे. कारण माझ्या आईला चिंरजीव पुस्तक वाचताहेत याचा अर्थ अभ्यासच करताहेत असे ठामपणे वाटे. (पुस्तके विकत घेण्याचा भागच नव्हता. भारतीय संस्कृतीत ते - तेव्हा आणि अजूनही – बसत नाही.)
..................................................................................................................................................................
या १००० रुपये किमतीच्या पुस्तकाची आजच पूर्वनोंदणी करा आणि ७५० रुपयांमध्ये मिळवा. त्यासाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5243/Gandhi---Parabhut-Rajkarani-Vijayi-Mahatma
..................................................................................................................................................................
मार्गदर्शन नसल्याने…
मराठी पहिल्या यत्तेपासून वाचनास सुरुवात झाली हे खरे! पण कोठचे मी वाचावे, कोठचे मी त्या वयात वाचले तर समजणार नाही, याबद्दल मार्गदर्शन होणेच शक्य नव्हते. मात्र तेव्हापासूनच वाचनाची आत्यंतिक ओढ मला जी लागली, ती आजतागायत! हे व्यसन फार बालपणीच लागले आणि उत्तरोत्तर कमी होण्याऐवजी वाढतच गेले. इतके की त्यातून सुटका होण्याची आता तर सुतराम शक्यताच नाही. कुणाचेही मार्गदर्शन आरंभकाळात नसल्याने हातात पडेल ते पुस्तक मी वाचून पाही. ‘अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी’ हे मी वाचलेले पहिले चांगले व भलेमोठे पुस्तक! त्याच्या जोडीला ठकसेन, हातीमताई, गुलबकावली, तोता-मैना, बिरबलच्या चातुर्यकथा, सिंहासनबत्तीशी, हरिविजय, पांडव-प्रताप इत्यादी अनेक प्रकारची पुस्तके इंग्रजी तिसरीपर्यंत वाचल्याचे स्मरते. पुढे त्यात अनेकांची भर पडली.
‘सुखाचा मूलमंत्र’ हे ना. ह. आपटे लिखित पुस्तक माझे त्या काळातले आवडते! चार आणे माला ही डिटेक्टिव्ह कादंबऱ्यांची माला त्या वेळी प्रसिद्ध होत असे. त्यातील प्रत्येक पुस्तक अगदी प्रयत्नपूर्वक मिळवून वाचल्याचे स्मरते. शाळेच्या वाचनालयात उपलब्ध असणाऱ्या David Copperfirld, Treasure Island, Gulliver’s Travels, Robinhood and his merrymen यांसारख्या पुस्तकांच्या शालेय आवृत्त्यांचे वाचन एवढेच माझे इंग्रजी वाचन मॅट्रिकपर्यंत होते. सामान्यपणे सध्या ज्याला बालवाङ्मय समजले जाते, त्यातली पुस्तके फारशी माझ्या हाती आली नाहीत. अपवाद साने गुरुजी, ना. धों. ताम्हणकर यांची पुस्तके व ‘शालापत्रक’, ‘आनंद’ व ‘खेळगडी’ ही मासिके!
थोड्या दिवसांनी समजेल…
या वाचनाच्या वेळी अनेक शब्द अडत, अर्थ समजत नसे. कुणाला विचारला तर सांगत – “तुला थोड्या दिवसांनी समजेल!” मीही त्यावर विश्वास ठेवी. शाळेत आमचे एक अंडरग्राउंड हस्तलिखित होते. त्यातही ‘जय देवी जय देवी जय पार्वतीकाकू | तुमचा नवरा ओढतो गांजातंबाखू |’ या प्रकारच्या ओळी लिहिण्यापलीकडे माझी मजल गेली नव्हती.
कॉलेजमध्ये प्रवेश करण्याच्या सुमारास माझ्या वाचनास वेगळे वळण लागले. याची दोन कारणे होती. १९४२च्या चळवळीपासून मी राजकारणात भाग घेऊ लागलो हे एक आणि प्रख्यात प्रशासक ए. डी. गोरवाला यांची ओळखही त्याच सुमारास झाली, हे दुसरे! ए.डी. गोरवालांचा परिचय झाल्याने इंग्रजी पुस्तके वाचताना मला पदोपदी येणारी एक अडचण दूर झाली. इंग्रजी पुस्तके वाचताना आरंभी शब्द अडत, सामाजिक संदर्भ माहीत नसल्याने वाचलेल्या मजकुराचा अर्थही ध्यानात येत नसे. मराठीतील पुस्तके वाचतानाही असे होई, पण कमी प्रमाणात. गोरवालांच्या ओळखीमुळे इंग्रजी पुस्तकाबाबत येणाऱ्या या दोन्ही अडचणी दूर झाल्या होत्या. त्यांचा स्वत:चा खाजगी ग्रंथसंग्रह चांगलाच मोठा होता. त्यात वेगवेगळ्या विषयांवरची अनेक पुस्तके होती. नामवंत लेखकांच्या अनेक कादंबऱ्या होत्या. त्यातले कोठचेही पुस्तक वाचण्यास घरी नेण्यास मला परवानगी होती. मी वाचलेल्या पुस्तकाबद्दल ते वेळप्रसंगी चर्चाही करीत. कठीण शब्दांचे अर्थ समजावून सांगत. सामाजिक चालीरीती व सामाजिक संदर्भ यासंबंधी माहिती देत. त्यांना उर्दू व पर्शियन या दोन्ही भाषा चांगल्या अवगत होत्या. रिचर्ड बर्टनचे १६ खंडातले ‘अरेबियन नाईट्स’ वाचताना त्यांच्या या ज्ञानाचा चांगलाच उपयोग झाला. बर्टन यांच्या तळटीपांवरून ‘अरेबियन नाईट्स’मधल्या अनेक कथा, त्या कथा सांगण्याचा ढंग हे मुळातून भारतातून गेलेले आहे, हेदेखील समजले; तसेच त्या कथांनी अनेक देशांतील अनेक भाषांमध्ये मानाचे स्थान मिळविल्याचेही कळले.
गोरवालांच्या ग्रंथसंग्रहात डिकन्स, स्टीव्हनसन यांसारख्या जुन्या लेखकांची पुस्तके होतीच. अनेक अलीकडच्या लेखकांची – एच. ई. बेट्स क्रोनीन, कॉननडायल, मॉम, ग्रीन, एच्.जी. वेल्स, वुडहाऊस, बेंचले, ख्रिस्टोफर इशरवुड, हक्सले, आणि अगदी अलीकडील स्नो, मेरी मॅकार्थी यांच्याही कादंबऱ्या होत्या. ‘Advise and consent’ ही अॅलन डुअरी यांची गाजलेली कादंबरी वाचावयास मिळाली ती गोरवालांमुळे आणि त्या कादंबरीला अमेरिकन राजकारण व राज्यपद्धती यांची जी पार्श्वभूमी आहे, त्यातील बारकावे गोरवालांनीच समजावून सांगितल्याचे स्मरते.
मी राजकारणात भाग घेतला तो समाजवादी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून! माझे तोवरचे वाचन हे मला हवे म्हणून, केवळ माझ्या स्वत:च्या आनंदाकरता केलेले वाचन होते. त्यामागे अन्य हेतू नव्हता. राजकारणात सहभागी झाल्यानंतरचे हे वाचन हा माझ्या राजकीय शिक्षणाचा भाग होता. भारतीय राजकारणी नेते, विचारवंत यांचे बरेचसे लिखाण, त्याच्या जोडीला इंग्रजीतील समाजवाद, कम्युनिझम, युरोपातील राष्ट्रवाद व इतर सामाजिक चळवळी यासंबंधीचे वाचन हा माझ्या राजकारणातील सहभागाचा परिणाम होता. सध्या रशियात घडत असलेल्या घटनांच्या संदर्भात, काही लेखकांची – आता विस्मृतीत गेलेल्या – आठवण येते. NAOM JASNY हे त्यापैकी एक. सोव्हिएट रशियाचा गॉसप्लॅन प्रसिद्ध झाला की, त्या गॉसप्लॅनमधील आकड्यांच्या आधारेच त्या योजनेत किती प्रकारची लबाडी दडलेली आहे, हे जॅस्नी स्पष्ट करून दाखवीत. Susanne’s Labine या लेखिकेने लिहिलेल्या ‘Stalin’s Russia’ या पुस्तकात तर सोव्हिएत रशियाच्या वृत्तपत्रातले उतारे देऊन सोविएत युनियनमधील परिस्थिती किती गंभीर होती, हे दाखवून दिले होते.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
या सर्व वाचनामुळे व्यापक राजकीय भान येण्यास खूपच मदत झाली. राजकीय पुस्तके वाचण्याचा आणखी एक परिणाम असा झाला की, एरवी कदाचित ज्या लेखकांची पुस्तके मी वाचली नसती, त्यांची पुस्तके वाचनात आली. बर्ट्राम वुल्फ, हार्वे स्वाडोस, पॉल गुडमन, लिओनर्ड एबल ख्रिस्तोफर कॉडवेल इ. लेखकांनी फक्त राजकारणासंबंधी लिहिलेले नाही. साहित्य आणि समाज यांच्या संबंधाबद्दलही या सर्वांनी विपुल लिखाण केलेले आहे. आर्थर कोस्लर, जार्ज ऑरवेल, आंद्रे मार्वो, काम्यू, सात्रर्, स्पेंडर, ऑडेन इ. लेखक राजकारणात काही काळ वावरले. या लेखकांच्या पुस्तकांच्या वाचनाने निराळाच आनंद मिळालेला आहे.
राजकीय पुस्तकांबरोबर डिक्टेटिव्ह स्टोरीज, मिस्टरी स्टोरीजचेही भरपूर वाचन केले. या वाचनानेसुद्धा या लेखकांची कल्पनेची झेप, इंग्रजी भाषेतील सूक्ष्म छटा पकडण्याचे त्यांचे कौशल्य, डिटेक्टिव्ह कथांमध्ये शैलीदार इंग्रजी वापरण्यावर असणारा त्यांचा कटाक्ष या गोष्टी जाणवून अवर्णनीय आनंद मिळत असे.
परिसराचे आकलन
गणित आणि विज्ञान या दोन्हीही विषयांत मला रस होता आणि गतीही होती. आईनस्टाईन आणि एक पोलिश लेखक (माझ्या स्मरणाप्रमाणे त्याचे नाव – Leopald Enfield असावे) या दोघांनी लिहिलेला ‘Evolution of Physics’ हा ग्रंथ कॉलेजमध्ये प्रवेश केल्यानंतर वाचला. विज्ञान या विषयात अवांतर वाचन म्हणून वाचलेले हे पहिले पुस्तक! विज्ञान, समाज, भविष्यकाळातील विज्ञानाची वाटचाल, त्याला कारणीभूत होणारे वेगवेगळे घटक याबद्दल एक नवी दृष्टी तो ग्रंथ वाचल्यानंतर आली व त्यासंबंधी कुतूहल जागृत होऊन त्या प्रकारच्या अनेक ग्रंथांचे वाचन भविष्यकाळात झाले. या वाचनामुळे कॉलेजमध्ये करीत असलेला अभ्यास परीक्षार्थी दृष्टिकोनापुरता मर्यादित राहिला नाही. परिसराबद्दलचे माझे आकलन अधिक सूक्ष्म झाले. या विद्वानांच्या विचारांनी विचार करावयास लावले. अभ्यासाच्या विविध शाखांचा परस्परसंबंध, विविध कलांमधील आंतरसंबंध यांचे भान मला त्यामुळे आले आणि अनेकांगी विचार करण्याची सवय लागली. या लेखकांनी (सर्वांची नावे उदधृत करणे अशक्य आहे) विज्ञान व गणित यांचा समाजाशी, मानवी जीवनाशी असणारा संबंध दाखवून, त्यातून उपस्थित केलेले प्रश्न आजही विचारांना चालना देणारे आहेत, असे लक्षात येते.
विज्ञानाच्या जोडीने गणित या विषयावरीलही अनेक पुस्तके वाचनात आली. या विषयात मी अजूनही वाचन करतो. मॉरिस क्लीन, न्यूमन, बेम यांसारख्या अनेकांचे ग्रंथ वाचनात आले. हा विषय जितका चक्रावून टाकणारा तितकाच अपरिमित बौद्धिक आनंद देणारा आहे. यासंबंधीची अनेक उदाहरणे देण्याचा मोह आवरून एक-दोनच उदाहरणे देतो. Oliver Heavyside हे फारच मोठे गणिती. ते जे काही लिहीत होते, सांगत होते ते त्या क्षेत्रातील विद्वानांना समजेना, म्हणून त्यांना वेड लागले. (आपण भारतीय तसे फार चाणाक्ष आपल्याकडे असे विद्यमान काळात तरी होणार नाही. मुख्यमंत्री पवारांनी खिरापत वाटल्यावर ती खिरापत घेणे चुकीचे आहे असे म्हणून खिरापत तोंडात टाकणारेच आपल्याकडे फार. आपला विचार समजत नाही, यासाठी वेड लागणारी व्यक्ती भारतात सापडणे कठीणच!) हेव्हिसाईड यांच्या नावाने अवकाशातील एक थर ओळखला जातो. यावरून त्यांची योग्यता समजावी!
दुसरे उदाहरण भारतीय गणिती रामानुजन यांचे! त्यांनी केलेल्या सर्वच संशोधनाचा अर्थ त्यांच्या समकालीनांना लागलेला नव्हता. पण आज ते संशोधन संगणकासाठी उपयुक्त आहे, असे त्या क्षेत्रातले जाणकार सांगतात.
या साऱ्या विद्वानांच्या अदभुत वाटाव्यात अशा गोष्टी, अतर्क्य वाटावेत असे विचार जाणून घ्यायला या ग्रंथांनी मला मदत तर केलीच; पण अपार आनंद दिला. या लेखकांची विविध वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या ग्रंथांतून अनेक उदबोधक उदाहरणे व निरीक्षणे उदधृत करण्यासारखी आहेत. जे. बी. एस. हाल्डेनसारखा लेखक आपल्या ‘सायन्स इन एव्हरीडे लाईफ’सारख्या ग्रंथातून हरघडीच्या आयुष्यातील एखादी गोष्ट घेऊन त्याचा विज्ञानातील अशा सूत्रांशी कसा संबंध पोचतो, हे ज्या सुबोध पद्धतीने सांगतो, ते पाहून मन धक्क होते.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : मार्सेल दुशां - “माझा कलेवर विश्वास नाही, पण कलावंतांवर आहे.”
..................................................................................................................................................................
‘लोकशिक्षण’चे अंक
कॉलेजमध्ये प्रवेश केल्यानंतर इंग्रजी वाचन वाढले, त्या प्रमाणात मराठीतील वाचन कमी झाले. नियतकालिकांत सुरुवातीला ‘चित्रमय जगत’, ‘सह्याद्री’ ही मासिके मी पाहत असे. ‘सह्याद्री’ने ‘समाजवादा’वर विशेषांक काढल्याचे स्मरते. मोट्यांच्या ‘प्रतिभे’चे जुने अंकही जुन्या बाजारातून आणून वाचले. परंतु त्या काळात आवडलेले नियतकालिक ‘लोकशिक्षण’. मी कॉलेजात प्रवेश केला त्या सुमारास ‘लोकशिक्षण’ नुकतेच बंद पडले होते. माझा पुण्याचा मित्र सावळाराम इनामदार याने ‘लोकशिक्षण’चे सर्व अंक मी सांगितल्यावरून पैदा केले. त्या अंकांबरोबर ‘बोनस’ म्हणून ‘लोकशिक्षण लघुग्रंथमाले’तीलही काही पुस्तके खरेदी केली. त्यात आचार्य जावडेकरांचे ‘आधुनिक राज्यमीमांसा’ होते. त्यांच्या लेखनाचा मी फार चाहता होतो. त्या काळात इतरही अनेक मासिके – नियतकालिके वाचीत असे; त्यांचा उद्देश, अव्वल इंग्रजीच्या काळातील समाजकारण, राजकारण समजावे हाच होता.
गोरवालांकडे काही नियतकालिके वाचावयास मिळत. त्यावरून एक गोष्ट लक्षात आली होती की, भारतात ज्या पाश्चिमात्य लेखकांबद्दल लिहिले व बोलले जाते ते तसे दुसऱ्या-तिसऱ्या दर्जाचे लेखक असतात किंवा पाश्चिमात्य देशांत ते एकतर मागे पडलेले, संपलेले असतात. त्यामुळे इंग्रजीतूनच, मूळ वाचायचे असे ठरवले. पाश्चिमात्य जगातील साहित्य, कला, समाज, राजकारण… इत्यादी क्षेत्रांत काय काय घडते आहे, ते त्यामुळेच कळते. पुस्तक खरेदी करताना निवड करण्यासाठी या वाचनाचा फायदा होतो. एकंदरीत सध्या तरी इंग्रजी, अमेरिकन नियतकालिके वाचण्याकडेच ओढा जास्त आहे. एक तर त्यात विविधता असते. नवे विचार, नव्या संकल्पना यांचा परिचयही त्यातून होतो. आपल्या अवतीभवती चाललेल्या घडामोडींची माहिती व्हावी म्हणून मी कधी मराठी नियतकालिकेही वाचतो. पण आजवर अनेकदा असे झाले आहे की, इंग्रजी ग्रंथांवरून व नियतकालिकांवरूनच आपल्या देशात काय चालले आहे, याचे खरे ज्ञान होते.
साहित्यसमीक्षा, तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र या विषयांतली पुस्तके वाचली, पण त्या विषयांबद्दल व्हावी तशी आवड निर्माण झाली नाही. कारण ती वाचताना गणित व विज्ञान या विषयांमध्ये झालेले ज्ञान एकसारखे डोकावत असे व आपण जे वाचीत आहोत त्यात तसा काही अर्थ नाही, असे वाटे. ललितकला व साहित्य यांच्या आस्वादाने होणारा आनंद कोणत्याही मोजमापात बसविता येत नाही किंवा गणिती सूत्रात बसविता येत नाही. तो ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग असतो.
साहित्यसमीक्षेवरची पुस्तके मी अजून वाचतो, पण असे विचार मनात येतच राहतात. ललितकलांना ज्या कारणाकरिता विज्ञानाची शिस्त लावता येत नाही, तीच कारणे ‘मानसशास्त्र’ या विषयासही लागू आहेत. या विषयातल्या बुजुर्ग लेखकांची पुस्तके वाचताना त्यांचा कल्पनाविलास मोठा मनोहर व भुरळ पाडणारा आहे. परंतु आपण जे वाटतो आहोत, त्याचा विज्ञानाशी काहीही संबंध नाही, असा विचार मनात नेहमीच येतो. विज्ञानाचा विद्यार्थी असल्याने माझे पूर्वग्रह या आस्वादनाच्या आड येत असावेत, असे वाटे. पण कालांतराने सर पीटर मेडावर यांचे लिखाण वाचल्यावर आपली मते त्या पंडिताच्या मताशी मिळतीजुळती आहेत, हे वाचून आश्चर्य वाटले व आनंदही झाला.
गेल्या दोन वर्षांत जी पुस्तके वाचली, त्या सर्वांविषयी सांगणे शक्य नाही. पण काहींचा उल्लेख केल्यावाचून राहवत नाही. ललित साहित्यातील कॅथरिन हेपबर्नचे ‘मी’ हे आत्मचरित्र, गुंथर ग्रास या जर्मन लेखकाचे ‘रॅट’, माल्कम गॅरी या लेखकाची ‘अंडर दी व्होल्कॅनो’ ही कादंबरी यांसारखी अनेक पुस्तके वाचली. ‘बोनस्’ (Bones) सारख्या वेगळ्या विषयावरील मिस्टरी नॉव्हेलने तर मला फार आकर्षित केले. सिमॉन शामा यांच्या ‘सिटीझन्स’ या फ्रेंच राज्यक्रांतीसंबंधीच्या पुस्तकाला मला या सर्व पुस्तकांमध्ये पहिला क्रमांक द्यावासा वाटतो. प्रिन्स्टन विद्यापीठातील रॉबर्ट टकर यांचे ‘Stalin-revolution from above’ आणि वुनस यांचे ‘Hitler’ व ‘Stalin’ ही पुस्तके आपल्या चरित्रनायकाबद्दल एका नव्या दृष्टिकोनातून किती तरी अधिक माहिती देतात. तसेच एन. विल्सन यांचे ‘Jesus Christ!’, रास्वनेवस्की यांचे चंगीझखानचे चरित्र, डेसमॉर्ड एवार्ड यांचा हिटलर व नेपोलियन हा ग्रंथ, ही पुस्तके त्या माणसांबद्दलचे अनेक समज दूर करतात.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : दिवाळी अंक आणि ‘प्रतिभे’ला बेजार करून सोडण्याचे दिवस!
..................................................................................................................................................................
‘मास्क ऑफ कमांड’ या किगन यांच्या वाचनीय ग्रंथाचाही आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. अलेक्झांडर, ड्यूक ऑफ वेलिंग्टन, जनरल ग्रँट, हिटलर या चार युद्धनेत्यांचा हा तौलनिक अभ्यास मला फार आवडला. याशिवाय विज्ञानविषयक पुस्तकात निकोलस हम्फे यांचे ‘हिस्टरी ऑफ दी माईंड’, हेन्री यांची ‘पेन्सिल’ आणि ‘युसफूल थिंग्ज’ ही दोन पुस्तके, एडवर्ड विल्सन यांचे ‘दी डायव्हर्सिटी ऑफ लाईफ’ या पुस्तकांचा उल्लेख करावासा वाटतो. याबरोबरच गणितविषयक पुस्तकांत ‘जर्नी थ्रू जिनियस’, ‘दी ग्रेट थिअरम्स ऑफ मॅथॅमॅटिक्स’ हा विल्यम डनहॅम यांचा ग्रंथ, मॉरिस क्लीन यांचे तीन खंडांतील ‘मॅथॅमॅटिक थॉटस्’ यांसारख्या पुस्तकांनी मला गेल्या दोन वर्षांत नवनवीन विचार दिले.
समाज व साहित्य यासंबंधातील प्रा. आलव्हिन केरनान यांचे ‘Death of Literature’, ‘Imaginary Library’ यांसारखी पुस्तके, मायकेल वॉल्झर यांचे ‘दी कंपनी ऑफ क्रिटिक्स’, हॅराल्ड रोझेनबर्ग यांचे ‘आर्ट अँड अदर सिरियस मॅटर्स’, जॉन रॉद्देन यांचे ‘दी पॉलिटिक्स ऑफ लिटररी रेप्युटेशन’, ‘दी मेकिंग अँड क्लेमिंग सेन्ट जॉर्ज ऑरवेल’ यांसारख्या पुस्तकांनी मला असंख्य आनंदमय क्षण दिले.
माझ्याकडे १६ हजारांहून जास्त ग्रंथ असतील. वाचनाचा नाद लागल्यापासून ते ग्रंथ घेत गेलो. मित्रही असे भेटले की, तेही ग्रंथातच गुंतलेले. एखादा नवा, वेगळा ग्रंथ दिसला की, ते मला आणून देतात आणि माझी परदेशवारी म्हणजे एक प्रकारे ग्रंथयात्राच असते. परदेशी जाण्याचा योग अनेकदा आला व परतताना माझं सर्वांत मोठं बॅगेज म्हणजे पुस्तकांनी गच्च भरलेल्या ट्रंका असतात! परदेशांतील माझे अनेक स्नेहीही ग्रंथालयात काम करणारे वा ग्रंथांशी संबंधित व्यवसायात आहेत. त्यामुळे तेही सतत ग्रंथ पाठवत असतात. ग्रंथाने ग्रंथ वाढतात व माझ्या या ऐश्वर्यात भरच पडत जाते.
ग्रंथ हे आपले ‘गुरू’ असलेच तर ते फार थोडा वेळ! ते सदासर्वकाळचे आपले स्नेही असतात. म्हणूनच ग्रंथव्यसनी माणसाला ग्रंथांचा कंटाळा कधीही येत नाही. आपण अज्ञानी आहोत, हे आपणास व्यवहारात पदोपदी येणाऱ्या अनुभवावरून चांगलेच पटलेले असते. त्यासाठी ग्रंथवाचन कोणी करू म्हणेल, तर त्याच्या पदरी निराशा येणारच.
.................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
सुखकारक विचार
एखादा हेतू मनात ठेवून केलेल्या वाचनातून निर्भेळ आनंद मिळत नाही, असा माझा तरी अनुभव आहे. ग्रंथ वाचून ज्ञान होते हे खरे, पण तो एक आनुषंगिक असा फायदा आहे. मनाला उभारी येते, हे तशाच प्रकारचे फायद्याचे कलम! गणितासारख्या ज्ञानशाखेत आज अनेक सिद्धान्त व प्रमेयेही आपण तासा-दोन तासात आत्मसात करतो. परंतु हे सिद्धान्त बनविण्यासाठी अनेक कुशाग्र बुद्धीच्या नामवंतांचे श्रम व बुद्धी खर्ची पडली आहे. हे करीत असताना त्यांनी आज हास्यास्पद वाटाव्यात अशाही चुका केलेल्या आहेत. म्हणूनच आपणास एखादी गोष्ट आली नाही, आपल्या हातून वैचारिक गफलत झाली तर या नामवंतांच्या उदाहरणामुळे आपण नाउमेद होणार नाही. विज्ञानाचा इतिहास हा त्यातील विजयी संशोधकांच्या कर्तृत्वाचा आलेख आहे, हे बरोबर! पण विज्ञानाचा इतिहास वाचणाऱ्याला त्या इतिहासाची नागमोडी वाट चांगलीच परिचित असते. अनेकांचे अयशस्वी प्रयत्न अनेक प्रकारचे अपयश व कालौघात मागे पडलेले सिद्धान्त व विचार या सर्वांचा कोणी आवर्जून उल्लेख करीत नाही. परंतु ज्या वैज्ञानिकांना अपयश आले, त्या अपयशामुळे अनेक नव्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळाले, असे आपण वाचले म्हणजे मग आपले अपयश, दुसऱ्या कोणाच्या तरी प्रयत्नांना चालना का देणार नाही, असाही विचार मनात येऊन जातो. हा विचार सुखकारक आहे. ते काहीही असो. मला वाचनाचे, पुस्तके घेण्याचे, त्यात बुडून जाण्याचे व्यसन आहे आणि ते जन्मभराची सोबत करणारे आहे. एवढाच मुद्दा माझ्या बाबतीत तरी आहे.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Mon , 19 October 2020
नमस्कार नाना जोशी.
तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी व गणिताचे चोखंदळ रसिक आहात हे वाचून आनंद झाला. तुमच्यासारखे लोकं लिहिते व्हायला पाहिजेत. मराठीस आधुनिक काळासाठी समर्थ बनवायला तुमचा निश्चितंच हातभार लागेल.
तुमच्या वैज्ञानिक व गणिती वाचन, चिंतन व सोबत झालेल्या वैचारिक प्रवासाविषयी अधिक वाचायला आवडेल.
आपला नम्र,
-गामा पैलवान