रक्तपिपासू झुंड त्या त्या देशाला, देशाच्या प्रगतीला सर्वार्थानं मारक ठरते!
पडघम - देशकारण
हेमंत कर्णिक
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 28 February 2019
  • पडघम देशकारण युद्ध War पाकिस्तान Pakistan भारत India

सर्वांत अगोदर हे सांगायला हवं की, युद्ध चालू नसताना चाळीस पोलीस ठार मारणं, हे अत्यंत घृणास्पद कृत्य आहे आणि त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी त्यांच्या तळावर बॉम्बफेक करण्यात काहीही वावगं नाही. पण म्हणून देशभर जो पाकिस्तानद्वेष उसळताना दिसतो, तो बरोबर वाटत नाही.

काही कळत नाही.

जर्मनीतल्या तुरुंगात काही काळ घालवून आलेल्या वुडहाऊसला जेव्हा विचारलं, ‘Do you hate Germans?’ तेव्हा तो उत्तरला होता, ‘I can't hate in plural’. मी वुडहाऊसशी सहमत आहे. कितीही प्रयत्न केला तरी मला ‘पाकिस्तान’चा द्वेष करता येत नाही. ‘पाकिस्तान’ म्हटल्यावर माझ्या डोळ्यांसमोर काहीच येत नाही. खूप ताण दिल्यावर लोक दिसतात. पंजाब, सिंध, बलुचिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरचा प्रदेश. सिंधमध्ये सिंधी राहतात. तिथलं सगळ्यात मोठं शहर कराची. फाळणीच्या अगोदर ते मुंबई प्रांतात होतं. भुत्तो तिथला. हा पुण्याला शिकायला होता. बलुची भटक्यांचे उल्लेख जुन्या मराठी साहित्यात सापडतात. उत्तरेकडचे ते पठाण. ‘ऐ मेरे प्यारे वतन’ गाणारा ‘काबुलीवाला’ बलराज साहनी. किंवा राज कपूर, दिलीप कुमार यांचा देश. हे दोघे पेशावरचे. पंजाबची खुशवंतसिंगने सांगितलेली एक आठवण अशी - एकदा पाकिस्तानी आणि भारतीय सेनाधिकाऱ्यांची भेट झाली. दोन मिनिटांत दोघांचं एका गोष्टीबद्दल एकमत झालं - आपण पंजाबी लढवय्ये. आपल्या देशाच्या अंतर्भागात राहणारे, भाषणं देणारे, राजकारण करणारे लबाड लोक केवळ आपल्या जिवावर गमजा मारतात. लढणारे आपण. दुर्दैवानं एकमेकांशी लढतो.

तर माझ्या डोक्यात अशा गोष्टी येतात. पाकिस्तान म्हणजे दसऱ्याला उत्तर भारतात जाळतात, तसला एक अक्राळविक्राळ राक्षस आणि त्याला मारणं हे एक पवित्र धर्मकार्य, जे प्रभू रामचंद्रानं केलं, असं मला होत नाही. देश म्हटलं की, माणसं दिसतात. इथं आणि तिथं, दोन्हीकडे. माणसं म्हणजे माणसं. बायका, पुरुष, मुलं. लहान, मोठी, वृद्ध. त्यांना ठार करण्याची कल्पना मग करता येत नाही. कोणाला तरी शत्रू मानणं आणि त्याचा पराकोटीचा द्वेष करणं म्हणजेच राष्ट्रभक्ती असेल, तर मी राष्ट्रभक्तीत कमी पडतो.

अर्थात मला पाकिस्तानी सैन्याबद्दल, धर्माचा बागुलबुवा उभा करून मत मागणाऱ्या इम्रानसारख्या राजकारण्यांबद्दल प्रेम नाही. पाकिस्तानी सैन्य तर शोषक वर्गच आहे. पाकिस्तानातले उद्योगधंदे, तिथल्या जमिनी, जवळपास सगळी संसाधनं तिथल्या सेनाधिकाऱ्यांच्या ताब्यात आहेत. त्यांचा मला तिरस्कार वाटतो. पण अशाच प्रकारच्या कारणांसाठी मला इथल्या अनेकांचा तिरस्कार वाटतो! मग मी शहरी नक्षलवादी आहे का? ही लेबलंही मला समजत नाहीत. लेबलं चुकीची आणि त्याहून खूप जास्त चुकीचे अशी लेबलं लावण्याचे अधिकार बळकावणारे लोक.

१९६५ च्या युद्धाच्या वेळी मी शाळेत होतो. तेव्हा टीव्ही नव्हता. आमच्या मजल्यावर आमच्याचकडे रेडिओ होता. युद्धाच्या बातम्या ऐकायला गर्दी व्हायची. आपल्या बातम्या ऐकून झाल्या की, आम्ही पाकिस्तान रेडिओ लावून तिथल्या बातम्या ऐकायचो. तिथल्या बोलणाऱ्याचा आवाज जास्त भारदस्त होता; पण ते ऐकून आमची करमणूक व्हायची. खरं चाललंय काय, हा बोलतोय काय! खूप खूप उशिरा मला सुचलं की, थेट असंच माझ्यासारखा एखादा पाकिस्तानी मुलगा स्वतःशी म्हणत असेल! मग सुचलं, यात खरं खोटं कसं करायचं? कोण करणार?

वेगळ्या शब्दांत म्हणायचं, तर सत्य मोठं की राष्ट्र?

पेपरात येणाऱ्या, चॅनेलवर ऐकू येणाऱ्या सगळ्या बातम्या सरकारनं, सैन्याच्या प्रसिद्धी विभागानं पाठवलेल्या असतात. जेव्हा एखादी बरखा दत्त कारगिलला जाते आणि तिथं शूटिंग करते, तेव्हा अगोदर वाचलेलं, ऐकलेलं पक्कं होतं. आतासुद्धा किती उलटसुलट चाललंय. कुणी म्हणतंय, बॉम्बहल्ल्यात तीनशे पाकिस्तानी ठार झाले. पाकिस्तानकडून बीबीसीला सांगितलं जातंय, सगळे बॉम्ब निर्जन प्रदेशावर टाकले, कुणीही मेलं नाही, कसलीही हानी झाली नाही. आणि पाकिस्तानी संसदेमध्ये आपल्या इथं होतात तशाच डरकाळ्या चालू आहेत- बदला घ्या!

हा काय खेळ आहे? खरी माणसं मरत आहेत. माणसं मरण्यात कसा कोणाला आनंद मिळतो? तसा आनंद मिळवण्यासाठी मनानं सुसंस्कृततेची, माणुसकीची मर्यादा ओलांडायला हवी. आत, गाभ्याशी असलेला आदिम हिंसक प्राणी जागा होऊन त्यानं मनाचा ताबा घ्यायला हवा. एक खरं की, मोठ्या संख्येनं लोकांच्या मनाचा ताबा असा एका रक्तपिपासू जनावरानं घेतला, की एक अल्प काळ त्या मनांवर, म्हणजेच त्या जनसमूहावर राज्य करणं तुलनेनं सोपं असतं. मग ती जनता भारतीय असो की पाकिस्तानी. आज दोन्हीकडे हे होत आहे.

दोन्हीकडे! दोन्हीकडच्या राज्यकर्त्यांना हे सोयीचं आहे? दोघं एकमेकांची सोय बघत आहेत की, काय? काय भयंकर गोष्ट आहे! दीर्घ काळाचा विचार केला तर अशी रक्तपिपासू झुंड त्या त्या देशाला, देशाच्या प्रगतीला सर्वार्थानं मारक ठरते. विशेषत: तिथली जनता भावनाप्रधान असेल तर. जशी या उपखंडातली आहे.

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

............................................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Fri , 01 March 2019

हेमंत कर्णिक, बरोबर आहे. पाकिस्तानच्या नावाने गळे काढायला तुमच्या पिताश्रींचं काय जातंय म्हणा. म्हणे पाकिस्तान म्हंटल्यावर डोळ्यासमोर काहीच उभं रहात नाही! फाळणीचे घाव सोसलेत त्यांना जाऊन ही अक्कल शिकवा. नेसत्या कपड्यांनिशी काश्मीर सोडून पळालेल्या पंडितांसमोर उडवा तुमची शांतीची कबुतरं. पुलवामा हल्ल्याचा निष्कर्ष आहे की मेलेला प्रत्येक अतिरेकी आपले सुमारे ४० जवान ठार मारू शकंत होता. मग बालाकोटमध्ये ३०० अतिरेकी ठार झाले म्हणजे आपल्या १२,००० जवानांचे प्राण वाचले की नाही? यालाच तर अहिंसा म्हणतात. तिचं कौतुक करायचं सोडून कोणाच्या नावाने उगीच खडे कसले फोडंत बसलात तुम्ही? आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......