६ डिसेंबर हा दिवस कशासाठी लक्षात ठेवायचा?
पडघम - सांस्कृतिक
कलिम अजीम
  • ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत बाबरी मस्जिद पाडली गेली
  • Tue , 06 December 2016
  • पडघम बाबरी मस्जिद Babri Masjid Mosque हिंदू स्वयंसेवक Hindu Kar Sevaks राम मंदिर Ram Mandir मुस्लिम Muslim

बाबरी मस्जिदीचं पतन होऊन तब्बल २३ वर्षं उलटली. मात्र, अजूनही मंदिराच्या नावानं होणारं राजकारण थांबलेलं नाही. त्यामुळे ६ डिसेंबर लक्षात का ठेवावा हा मला पडलेला पहिला प्रश्न आहे. कारण याच दिवशी देशाच्या अखंडतेला व सार्वभौमत्वाला धक्का देणारी घटना घडली होती. आणि दुसरं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं जाणं. या दोन्ही घटना दु:खदच. घटनेतील क्रमवारी जरी सारखी नसली तरी या घटना एकाच दिवशी म्हणजे ६ डिसेंबर रोजीच घडल्या हे त्यांच्यातील साधर्म्य आहे. या दिवशी डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांकडून मुंबईत चैत्यभूमीवर अभिवादन सभा आयोजित केली जाते, तर मुस्लिमांकडून 'बाबरी शहादत' दिन साजरा करत निषेध केला जातो. तसंच सभांमधून काळ्या पट्ट्या लावून ‘इसाले सवाब’ अर्पित केलं जातं.

प्रथेप्रमाणे बहुसंख्याक व अल्पसंख्याक समाजाकडून या दिवशी बाबरी पाडल्याच्या कथा ऐकवल्या व सुनावल्या जातात. माझा जन्म ऐंशीच्या दशकातला. त्यामुळे ‘बाबरी पतन’ आणि त्यानंतर घडलेला घटनाक्रम मला बऱ्यापैकी आठवतो. त्यावेळी मी जरी लहान असलो तरी मला हे सर्व न कळण्यासारखं नव्हतं.  या घटनेनंतर देशासोबत आमच्या मोहल्ल्यातही अस्वस्थतेचं वातावरण होतं. अल्लाह के 'आनेवाली बला’पासून संरक्षण मागण्यासाठी मस्जिदीमध्ये गर्दी सुरू झाली होती. सामूहिक नमाज पठन करून ‘दुआ की गुजारीश’ म्हटलं जात होतं. त्यातच मुंबईत दंगली उसळल्याच्या बातम्या येऊ लागल्या. वृत्तपत्रांची कात्रणं घेऊन शहरात शांतता कमिट्यांच्या बैठका सुरू झाल्या. मस्जिदीत प्रार्थनांचा ओघ वाढू लागला. शहरात दंगलींचं लोण पसरू नये म्हणून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू होते.

मोहल्ल्यातील जाणकार वडिलधारी मंडळी यासाठी झटत होती. त्यामुळे सुदैवाने आमच्या अंबाजोगाई शहराच्या शांततेला कसलंच गालबोट लागलं नाही. (दुसरीकडे शनिवारची शाळा करून गल्लीतील माझे समवयस्क दलित शाळकरी मित्र भाऊबंदकीसोबत चैत्यभूमीला रवाना झाले होते.) हे सगळं भयाण होतं. यानिमित्ताने आजीकडून ‘पोलीस अ‍ॅक्शन’च्या कथा परत ऐकण्याचा योग आला होता. आज या संदर्भात ज्यावेळी मी वाचतो बघतो, ऐकतो, तेव्हा त्यावेळच्या भीतीची भीषणता लक्षात येते. बाबरीनंतर घडलेल्या मुंबई दंगलीत मारल्या गेलेल्यांच्या प्रतिक्रिया म्हणून दंगल पीडितांना वापरून मुंबईत स्फोट घडवण्यात आले. त्या स्फोटांमुळे कसाबसा सावरलेला मध्यमवर्ग आणि रोजंदार वर्ग पुन्हा १० वर्षानं मागे खेचला गेला. स्फोटांच्या आरोपानं अनेक कुटुंब उदध्वस्त झाली. परिणामी अनेक तरुणांच्या आयुष्याची दैना झाली. हे तरुण अजूनही देशद्रोहाचा डाग घेऊन तुरुंगात खितपत पडले आहेत. मात्र, त्यांना वापरणारे आजही मोकाट आहेत.

देशद्रोहाचा डाग अजूनही या कुटुंबांनासुद्धा दंश देतोय. आजही सामाजिक अवहेलना झेलत ती कुटुंबं कशीबशी दिवस ढकलत आहेत. त्यांना आर्थिक व सामाजिक स्थैर्यता अजूनही लाभलेली नाही. त्यामुळे दंगली, विध्वंस, वाईट घटना लक्षात ठेवून साध्य काहीच होत नाही. या आठवणीने केवळ वर्तमानच खराब होत नाही, तर भविष्यकाळावर देखील परिणाम होतो. गेल्या काही काळात भूतकाळातील घटनांची कारणमीमांसा केली जात आहे. त्या दुरुस्त कशा करता येईल यासाठी प्रयत्न केला जातोय. दंगल, विध्वंस आठवणं म्हणजे द्वेष व सूड भावना पोक्त करणं होय. बाबरी पतनानंतर देशभरात अनेक दंगली घडल्या. ओडिशा वगळता प्रत्येक दंगलीत मुस्लिम समाज टार्गेट करून मारला गेला. वारंवार दंगलींमध्ये लक्ष्य झाल्याने मुस्लिमांचं फार मोठं सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान झालं आहे. प्रत्येक दंगल मुस्लिमांना सामाजिक व आर्थिकदृष्ट्या कितीतरी वर्षं मागे घेऊन जाते!

दंगली रोखण्यामागं सुरक्षा यंत्रणा फोल ठरली आहे. दंगल घडताना पोलीस मुस्लिमांना कसलीच संरक्षित मदत पुरवत नाहीत. वारंवार मिळणाऱ्या दुजाभावाच्या वागणुकीमुळे मुस्लिमांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडाला आहे. अलिकडच्या काळात फक्त उच्चशिक्षित मुस्लिम तरुणांनाच नव्हे, तर दलित तरुणांना दहशतवाद व नक्षलवादाच्या खोट्या आरोपाखाली अडकवण्याचं षडयंत्र सुरू आहे. दोन-तीन वर्षं तपासाच्या नावाखाली तुरुंगात ठेवायचं आणि दोषमुक्त करून बाहेर सोडायचं. अशा प्रकारे त्यांचं शैक्षाणिक व सामाजिक आयुष्य संपवलं जात आहे. अशा वेळी मुस्लिम व दलित तरुणांची जबाबदारी वाढली आहे. आर्थिक व शैक्षणिक सक्षमता प्राप्त करण्यासाठी त्यांना नव्या संधींचा विचार करण्याची गरज आहे.  

मागील दोन आठवड्यांपासून ‘आमच्या’ तथाकथित गटांतून ६ डिसेंबर हा दिवस ‘काळा दिन’ (पलिकडच्या गटांतून ‘विजय दिवस’) पाळण्याचे मेसेजेस ‘व्हॉटसअॅप’ आणि ‘सोशल मीडिया’वर सडा पडल्यासारखे फिरत आहेत. ‘प्रोफाईल्स पिक’ काळ्या करण्याची आवाहनं करण्यात येत आहेत. दरवर्षीप्रमाणे बाबरी पुन्हा उभी राहावी यासाठी मुस्लिमांतील उजव्या गटांतून ‘दुआ’ रिलीज केली जाते आहे. प्रत्येक मॅसेजिंग सर्व्हिसवर स्वयंसेवक सक्रियेतेनं मॅसेज पाठवण्याचं काम करत आहेत. म्हणजे परत एकदा सामाजिक व धार्मिक ठेकेदार मंडळींकडून सर्वसामान्य मुस्लिम तरुणांची डोकी भडकवण्याचं काम सुरू आहे. तर पलीकडे बहुसंख्याकांकडून ‘विजय दिवस’ साजरा करण्याच्या कवायती सुरू आहेत. त्यामुळे अल्पसंख्याकांच्या निषेधातही मी सहभागी आहे, त्याचप्रमाणे बहुसंख्याकांच्या ‘विजय दिवसांत’ ही माझा सहभाग असेलच.

आज बहुतांश ‘पोस्ट मॉडर्नायझेशन’नंतरची नव तरुण पिढी १९९२ साली घडलेल्या ‘बाबरी पतना’संदर्भातल्या ‘कॉन्सीपिअरन्सी’वर सोयीचे विचार ऐकून मारणं-मरण्याची भाषा करत आहेत. वेगवेगळ्या गैरसमजांना ते सत्य समजून (या ‘अ’सत्याचं ओझं वाहण्यापलिकडे ते काहीच करू शकलेले नाहीत!) स्वत:चीच फसगत करून घेत आहेत. इतिहासाची नीट जाण नसलेल्या पिढीकडून विषारी कृत्यं घडवण्याचं कारस्थान काही ‘विखारी’ मंडळींकडून केलं जात आहे. तरुणदेखील स्वत:ला वापरण्यासाठी इतरांच्या हवाली करून मोकळे झाले आहेत. अशा तरुणांची मला कीव येते. सध्या सत्ताधारी असलेली मंडळी मागील वीस वर्षांपासून ‘मंदिर वही बनायेंगे’ म्हणत सामान्य मतदारांच्या भावनेशी खेळत राजकारण करत आहे. यालाच समांतर असा एम.आय.एम. हा मुस्लिमांचा कडवा पक्ष महाराष्ट्रात उदयास आला आहे. त्याने ‘बाबरी की एक इंच भी जमीन नही देंगे’ म्हणत राजकारण सुरू केलं आहे. या भुलथापांच्या आहारी जाणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.

बाबरी पतनाला आज २३ वर्षं पूर्ण झाली. त्याच्या बऱ्याच जखमा कोरड्या झाल्या आहेत. त्यानंतर देशात, मुंबईत दंगली घडल्या. त्यात अनेक कुटुंबाचे संसार उदध्वस्त झालेत. अनेक जण बेघर झालेत. ते आजही न्यायाच्या प्रतीक्षेत न्यायालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत. बाबरी पतनाची प्रतिक्रिया म्हणून मुंबईत जे स्फोट झाले, त्या सर्व आरोपींना शिक्षा सुनावण्यात आल्या आहेत. पण दंगल घडवणारे अजूनही सरेआम खुले फिरत आहेत. दंगलग्रस्तांना कसलीच पुर्नवसन व नुकसान भरपाई अजून तरी मिळाली नाही. हा वेगळा न्याय का, असा जाब दंगलग्रस्त भागातील नागरिक सरकारला विचारत आहेत. लेख लिहिल्यानं आणि तो वाचल्यानं क्रांती घडेल अशी कुठलीच शक्यता नसते. पण तरीही या लेखाचं प्रयोजन असं की, विवादित जागेसाठी आम्ही किती दिवस भांडत राहणार? त्यातून निष्पन्न काहीच होणार नाही, याची कल्पना देशातील सर्व नागरिकांना आहे. न्यायालयाने दिलेला निर्णय दोन्ही उभयपक्षांना अमान्य असल्याने प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे.

दोन्ही गटांकडून तेवढाच जोर असल्याने विवादित जागेवर येत्या पन्नास वर्षांत तरी कुठलाही भौगोलिक बदल घडण्याची नाही. यातून केवळ नवा वाद उभा राहणार आहे. त्यामुळे माझ्या मते विवादित जागेवर देशातील प्रत्येक नागरिकास उपयोगी पडेल असं जागतिक दर्जाचं ग्रंथालय उभारलं जावं. त्यात सामाजिक व राज्यशास्त्राचा अभ्यास व संशोधन केलं जावं. अत्यल्प खर्चात जागतिक दर्जाचं शिक्षण मिळेल अशी सोय करण्यात यावी. जेणेकरून देशातील प्रत्येक जाति-धर्माच्या नागरिकांना त्याचा लाभ मिळेल. तसेच मंदिर व मस्जिद उभारणीसाठी शहरात इतर ठिकाणी दोघांना समान अशी जागा वाटप करून आंतरराष्ट्रीय शांतीचं प्रतीक म्हणून अयोध्या नगरीचा विकास केला जावा. विवादित जागेवर तोडगा काढण्यासाठी  ‘आस्थेला’ बाजूला ठेवून निर्णय घ्यावे लागतील. धर्मगुरू, सेवाभावी संस्था, बुद्धिजीवी वर्ग, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सल्ला-मसलत करून योग्य निर्णय घ्यावा. अन्यथा विवादित परिसरात पडलेला ‘फुफाटा’ नव्या दंगली घडवून आणण्यास कारणीभूत ठरेल.

इंद्रजीत भालेराव यांनी त्यांच्या एका कवितेत म्हटलंच आहे की -

रामानंतर बाबरही गेला थडग्यांना आला भाव आता.
मढे उकरून जगती जे-जे पुरले पाहिजे त्यांना आधी.

 

लेखक महाराष्ट्र १मध्ये बुलेटिन प्रोड्युसर आहेत.

kalimazim2@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......