लोकशाहीचे हनन करण्याची इच्छा असलेले हे सरकार गेलेच पाहिजे!
पडघम - देशकारण
राज कुलकर्णी आणि इतर
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Thu , 19 April 2018
  • पडघम देशकारण लोकशाहीविरोधी सरकार Anti-Democracy government कथुआ kathua उन्नाव Unnao

नमस्कार,

संविधानावर विश्वास असणारा प्रत्येक भारतीय आज अस्वस्थ आहे. लोकशाही ज्या संस्थांच्या पायावर उभी असते, त्यांचे अवमूल्यन, सरकार-पुरस्कृत धर्मांधता आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा अभूतपूर्व संकोच, यांमुळे भारतीय नागरिक आज व्यथित आहेत. अशा वेळी ही परिस्थिती बदलण्याची जबाबदारी नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांवरच येते आणि त्या भूमिकेतूनच, त्या जबाबदारीच्या भानातूनच आम्ही हे निवेदन प्रसिद्ध करत आहोत.

१२ जानेवारी २०१८ या दिवशी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली. पक्षपाती भूमिकेतून न्यायालयाचे सुरू असणारे काम याबद्दल त्यांनी सरन्यायाधीशांना लिहिलेले पत्र जाहीर केले. याच पत्रकार परिषदेत ‘या देशात हुकूमशाही आणली जात आहे की काय?’ अशी विचारणा त्यांनी केली. ही घटना अभूतपूर्व अशीच होती.

मागील चार वर्षांत अशा धक्कादायक घटना वारंवार घडत आहेत. २०१५ या वर्षी उत्तर प्रदेशमधल्या दादरी इथे अखलाक नावाच्या एका मुस्लिमाचा खून घरात बीफ आहे, अशा केवळ संशयावरून झाला. गोरक्षक म्हणवणाऱ्या टोळ्यांनी उत्तर भारतात धुडगूस घातला. हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्या केडरला मोकळे सोडले. आणि देशात व्यक्ति-स्वातंत्र्याची गळचेपी सुरू झाली. उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुकीत जेव्हा देशाचे पंतप्रधानच ‘कब्रस्तान चाहिए या स्मशान?’ किंवा ‘मंदिर चाहिए या मस्जिद?’ असा उल्लेख करून प्रच्छन्नपणे धार्मिक आधारावर मते मागू लागले, तेव्हा आता सत्ताधाऱ्यांनी आपला सगळा रोख हा विकास, रोजगार, पायाभूत सुविधा यांच्याकडून हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाकडे वळवला आहे, हे सुज्ञ नागरिकांना कळून चुकले.

नुकतीच उत्तर प्रदेशातील उन्नाव आणि जम्मू काश्मीरमधील कथुआमध्ये घडलेल्या घटना तर देशासाठी कलंक म्हणाव्या अशा आहेत. उत्तर प्रदेशमधील भाजप आमदाराने मुलीवर बलात्कार केला म्हणून तक्रार दाखल करायला गेलेल्या पीडित मुलाच्या बापावरच पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि पोलिस स्टेशनमध्ये झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला! ही खूप उद्विग्न करणारी घटना आहे. युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांवर खून, अपहरण या प्रकारचे अनेक गुन्हे असूनही योगींचे सरकार स्वत:च स्वत:ला क्लीन चिट देण्याच्या प्रयत्नात असून स्वामी चिन्मयानंद या पूर्व-मंत्र्यावरील बलात्काराचे आरोप रद्द करण्याचे शासकीय धोरण ठरवले जात आहे.

गुन्हेगारांना न्यायालयासमोर सुनावणी करून शिक्षा देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी क्लिन चीट देण्याचा हा प्रकार युपीपुरता मर्यादित नसून तो गुजरात, बिहार, राजस्थान व महाराष्ट्र आणिआता जम्मू-काश्मीर असा देशव्यापी होत आहे. देशातील न्यायव्यवस्थेची ही भयानक थट्टाच म्हणावी लागेल. ‘अच्छे दिन’ म्हणून गौरवलेल्या दिवसांत गुन्हेगार, दंगेखोर, वर्णवर्चस्ववादी, दलितविरोधी, अल्पसंख्याक व महिलाविरोधी लोक बिनदिक्कत आपली कृत्ये राजाश्रयाने करत आहेत. देशभर महिला, दलित, शेतकरी, शेतमजूर, अल्पसंख्यांक, कामगार वर्ग प्रचंड भरडला जात आहे.

याच काळात भारतीय अर्थव्यवस्थेने अक्षरशः बसकण मारलेली दिसत आहे. नोटबंदीने देशाचे तब्बल तीन लाख कोटी रुपयांचे थेट नुकसान केले आहे. संघटित क्षेत्रातच जवळपास ४० लाख नोक-या गेल्या असा प्राथमिक अंदाज आहे. असंघटित क्षेत्रात नेमकी किती हानी झाली आहे, याचा अंदाज अजूनही यायचा आहे. या निर्णयामागे नेमके काय कारण होते किंवा विचार होता याबद्दलची स्पष्ट माहिती केंद्र सरकार अजूनही देत नाहीये. नोटाबंदी पाठोपाठच पुरेशी तयारी नसताना जीएसटी लागू करण्यातली घातक घाई अनेक छोट्या व्यापाऱ्यांना आयुष्यातून उठवण्यास कारणीभूत ठरली. नोटाबंदीचा निर्णय आणि अंमलबजावणी हे दोन्हीही रिझर्व्ह बँकेपेक्षा सरकारच्या तंत्राने चालताना दिसत होते. हे लोकशाहीचे अपहरण आहे असे आम्ही मानतो.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406

.............................................................................................................................................

गेल्या वर्षी गुजरातमध्ये झालेल्या निवडणुकांत तर भाजपने कहर केला. आपले सरकार चालवण्यातले अपयश झाकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आरोप त्यांच्या पूर्वसुरींवर केले, ते पाहता आता यापुढे सभ्यतेची कुठलीही पातळी सांभाळली जाणार नाही हेच स्पष्ट झाले.

या सगळ्या पार्श्वभूमीवर, भारतीय लोकशाही टिकून राहावी असे ज्यांना मनोमन वाटते; स्वातंत्र्य लढ्याकडून वारसा म्हणून मिळालेल्या धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता, सर्व-समावेशकता, सामाजिक न्याय या मूल्यांवर आधारित भारत टिकून राहावा असे ज्यांना वाटते. भारतीय संविधान आणि त्यातील मूल्यांना कोणताही धक्का लागू नये असे ज्यांना-ज्यांना म्हणून वाटत आहे, त्या साऱ्यांना आम्ही या पत्रकाद्वारा हाक देत आहोत! आपण देशातील विविध क्षेत्रात कार्यरत लोकशाही-निष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन हे लोकशाही-विरोधी सरकार गेलेच पाहिजे, अशी ठाम भूमिका आता घ्यायला हवी.

सरकार विरोधातील चर्चा समाजातील सर्वच स्तरांतून आज ऐकू येऊ लागली आहे. प्रत्युत्तर म्हणून 'हे नकोत तर मग कोण?' असे प्रश्न विचारले जाऊ लागलेले आहेत. पण या देशाच्या लोकशाहीवर आमचा पूर्ण विश्वास आहे. इथल्या सामान्य मतदारांच्या निर्णयक्षमतेबद्दल आमच्या मनात तिळमात्र शंका नाही. आणि म्हणून पर्याय निवडण्याचे काम तेच करतील हेही आम्हांला ठाऊक आहे. पण त्याआधी लोकशाहीचे हनन करण्याची इच्छा असलेले हे सरकार गेलेच पाहिजे, अशी स्पष्ट आणि ठाम भूमिका घेणे गरजेचे आहे, असे सामान्य नागरिक म्हणून आमचे मत झाले आहे.

अलीकडेच जेव्हा अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प निवडून आले, त्यानंतर बराक ओबामा हे जर्मनीच्या दौऱ्यावर होते. तिथे बर्लिनमध्ये ओबामा यांना जर्मन पत्रकारांनी ट्रम्प यांच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर ‘अमेरिकन लोकशाहीचे भवितव्य कसे वाटते?’ असा प्रश्न विचारला.त्यावर उत्तर देताना ओबामा म्हणाले, “लोकशाही ही दर चार वर्षांनी मतदान करण्यापुरती प्रक्रिया नाही! नागरिकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, लोकशाही ही दैनंदिन आयुष्यात जगण्याची प्रक्रिया आहे. ती जगावी आणि जोपासावी लागते.”

भारतीय लोकशाहीला जगवण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी आमची कटिबद्धता अधोरेखित करण्यासाठी आम्ही हे निवेदन देत आहोत.

आपले,

प्रज्ञा दया पवार, तुषार गांधी, विजय दिवाण, किशोर बेडकीहाळ, डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. राम पुनियानी, राजन अन्वर, सुरेश भुसारी, राज कुलकर्णी, डॉ. विवेक कोरडे, भारती शर्मा, लोकेश शेवडे, सुनील वालावलकर, डॉ. दिलीप खताळे, डॉ. मंदार काळे, आशुतोष शिर्के.

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

vishal pawar

Thu , 26 April 2018


Mahesh Phanse

Thu , 19 April 2018

हे नकोत तर मग कोण? या प्रश्नाला उत्तर देणे अवघड आहे हे या विचारवंतांना माहीत आहे त्यामुळे अनेक विचारवंत जे नेहमी करतात तेच वरील मंडळींनी केले आहे. प्रश्न विचारायचा आणि उत्तर देता येत नसले की चर्चा भलतीकडेच न्यायची. ए. राजा यांची आरोपातून सुटका झाली की न्यायालयावर विश्वास आहे म्हणायचे आणि न्या. लोया यांच्या बाबतीत न्यायालयाने आपल्याला हवी अससेली भूमिका घेतली की लगेच लोकशाही धोक्यात आली असे म्हणायचे हा दुटप्पीपणा झाला. वर्तमान सरकारचे सगळे बरोबर आहे असे म्हणावयाचे नाही. परंतु सरकार काही बाबतीत चुकत आहे याचा अर्थ विरोधी पक्ष उत्तम प्रकारे त्यांचे काम करत आहेत असे अजिबात घडत नाही हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. जे योग्य ते योग्य आणि जे अयोग्य ते अयोग्य असे धोरण असलेले विचारवंत भारतात बहुधा उरलेच नाहीत की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे.


Gamma Pailvan

Thu , 19 April 2018

लोकशाही हवी, पण लोकनियुक्त सरकार नको? हा काय चावटपणा लावलाय? असो. न्या. चल्लमेश्वर मोठ्या तोऱ्यात विचारतात की हुकुमशाही आहे का म्हणून. आणि स्वत: कॉलेजियम पद्धतीचा पुरस्कार करतात. कॉलेजियम पद्धत ही कंपूशाही नाही तर दुसरं काय आहे? घटनेच्या कोणत्या कलमात न्यायमूर्तींचे कॉलेजियम असावं असं लिहिलंय? घटनाबाह्य पद्धतीचा पुरस्कार करतांना बरी लोकशाही धोक्यात येत नाही? असो. बाकी, निवेदन प्रसृत करणाऱ्या तथाकथित विचारवंतांची काश्मिरात हिंदू निर्वासित झाले तेव्हा दातखीळ बसली होती का? आज भले ऊर बडवून असिफाची बाजू घेताहेत. हिंदूंवर असे अत्याचार होत असतांना वेळीच चाप लावला असता तर आज ही परिस्थिती टळली असती. कधी कोण्या विचारवंताने आत्मपरीक्षण केलंय? हे निवेदन म्हणजे थोतांडखोरांचं ढोंग आहे. -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......