हलिमाचा प्रेरणादायी लढा
पडघम - माध्यमनामा
अन्वर राजन
  • हलिमा लाइव्ह रिर्पोटिंग करताना...
  • Fri , 04 November 2016
  • हलिमा कुरेशी अन्वर राजन आयबीएन-लोकमत Halima Kureshi Rajan Anvar

हलिमा कुरेशीला परवा दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामनाथ गोएंका पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्याबद्दल तिचं कौतुकच करायला हवं. हा राष्ट्रीय पातळीवरचा पत्रकारांसाठी असलेला प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. तो तिला ‘पॉलिटिक्स अँड गव्हर्नन्स’ या विभागात मिळालाय. भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर गोवंश हत्या बंदी कायदा लागू केला गेला. त्यानंतर त्याचे परिणाम विविध पातळीवर दिसू लागले होते. हा विषय आयबीएन-लोकमतसाठी कव्हर करताना हलिमाने खूप कष्ट घेतले. तिने या विषयाचा वेगवेगळ्या पातळ्यांवर पाठपुरावा केला. अगदी बीफ विकणाऱ्यांपासून विविध क्षेत्रांतील लोकांच्या प्रतिक्रिया तिने घेतल्या. त्यातून ज्या गोष्टी पुढे आल्या त्यांचं चांगल्या प्रकारे विश्लेषणही केलं. तिच्या या बातमीदारीसाठी तिला हा पुरस्कार देण्यात आला आहे.

पुणे जिह्यातील केडगाव चौफुला या छोट्याशा गावात एका ट्रक ड्रायव्हरच्या घरात हलिमाचा जन्म झाला. पाच बहिणी व दोन भाऊ असा परिवार सांभाळणाऱ्या हलिमाचे वडील जरी फारसे शिकलेले नसले तरी मागास विचाराचे नव्हते. मुला-मुलींना शिक्षण देण्यात त्यांनी हयगय केली नाही. हलिमाच्या मोठ्या दोन बहिणी दहावी झालेल्या आहेत. त्यांची लग्नंही झाली आहेत. लहान बहिणींपैकी एकीनं एम.कॉम. केलं असून ती पोलिस खात्यात नोकरीला आहे, तर तिच्यापेक्षा लहान बहीणही पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. तसा कुरेशी जमातीचा पारंपरिक व्यवसाय मटण विकण्याचा, पण हलिमाच्या वडिलांना तो करण्याची इच्छा नव्हती. म्हणून त्यांनी ट्रक ड्रायव्हर म्हणून काम पत्करलं.

हलिमा शाळेत असताना अभ्यासात नेहमी आघाडीवर असायचीच, पण त्याचबरोबर ती इतर विषयांमध्येही उत्साहाने सहभागी असायची. वक्तृत्व स्पर्धा तिचा आवडता प्रांत होता. गावातल्या सार्वजनिक गणेशोत्सवात तिने आपलं वर्क्तृत्व गाजवलं. नंतर तिने वर्क्तृत्वाबाबत मागं वळून बघितलं नाही. बारावीनंतर तिने बारामतीमधील कृषी महाविद्यालयामधून बीएस.सी.ची पदवी मिळवली. मग पुणे विद्यापीठामध्ये एम.एससी. केलं,  पण तिचा पिंड वेगळा होता. तिला चाकोरीबद्ध नोकरी करण्यात फारसं स्वारस्य नव्हतं. त्यामुळे तिने नंतर पत्रकारितेची पदविका व रानडे इन्स्टिट्यूटमधून पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर तिला आयबीएन-लोकमत या वृत्तवाहिनीमध्ये काम करायची संधी मिळाली. पत्रकारितेच्या क्षेत्रात तिने अल्पावधीतच आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेमध्ये पंढरपूरच्या वारीला महत्त्वाचं स्थान आहे. हलिमाने ही वारी पायी चालून दोनदा पूर्ण केली. आयबीएन-लोकमतसाठी वारीचं खूप चांगल्या प्रकारे वार्तांकनही केलं. महाविद्यालयात होणाऱ्या रॅगिंगचं प्रकरण बाहेर काढलं. अशा अनेक वैशिषट्यपूर्ण बातम्या करून तिने आपल्या अभ्यासूपणाचा आणि चिकाटीचा प्रत्यय आणून दिला. गोमांस बंदीविषयीचं वार्तांकन तिला गोएंका पुरस्कारापर्यंत घेऊन गेलं.

पुण्यात पुरोगामी विचाराच्या अनेक संस्था / संघटना कार्यरत आहेत. हलिमा या सर्व चळवळींच्या कार्यक्रमात सहभागी होत असते. स्त्री-पुरुष समता व मुस्लीम स्त्रियांच्या समस्या तिला महत्त्वाच्या वाटतात, पण त्याच बरोबर मुस्लीम समाजात असलेली बेरोजगारी, शिक्षणाचा अभाव, हिंदू-मुस्लीम दंगे हे सर्व विषय तिला अस्वस्थ करतात. समाजामध्ये परिवर्तन व्हावं, सुधारणा व्हायला हव्यात असं तिला वाटतं. त्यासाठी ती प्रयत्नशील आहे. एकतर्फी तोंडी तलाक, बहुपत्नीत्व, यामध्येही बदल व्हायला हवा असं तिचं मत  आहे.

मराठी साहित्य व पत्रकारितेच्या क्षेत्रात मुस्लीम तरुण-तरुण खूपच कमी प्रमाणात दिसतात. त्यातही मुली तर दुर्मीळ म्हणाव्या इतक्या नगण्य प्रमाणात आहेत. त्यातही मुली राजकीय विषयांवरील वार्तांकन करताना अभावानेच दिसतात. हलिमाचं हेही वेगळेपण नोंदवण्यासारखं आहे. इब्राहिम अफगाण, मुस्तफा अत्तार, कलीम अझीमसारखे काही मोजके मुस्लीम तरुण या क्षेत्रात कार्यरत आहेत, तर हिना खान व हलिमासारख्या बोटांवर मोजण्या इतक्या मुस्लीम तरुणी मराठी पत्रकारितेत दिसतात. म्हणूनच ग्रामीण भागातून आणि सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या हलिमाची कामगिरी विशेष कौतुकास्पद ठरते.

पुण्यासारख्या शहरात वास्तव्य करताना हलिमाला जीवघेणा संघर्ष करावा लागला आहे. वडिलांची किडनी खराब झाल्यानंतर त्यांचं डायलिसिस करावं लागायचं. त्यासाठीची धावपळ आणि खर्च सर्व तिलाच पाहावा लागला. तिने दोन-तीन लाख रुपये कर्जरूपाने उभे केले आणि कुटुंबप्रमुख म्हणून आपली जबाबदारी सक्षमपणे पार पडली. वडिलांचा मृत्यू तिने धीरानं पचवला. स्वतःला आवडलेल्या मुलाशी लग्न करतानाही तिला प्रचंड संघर्ष तिला करावा लागला. मुलगा मुस्लीम आहे. या लग्नाला मुलाच्या घरातूनच विरोध होता. त्यांनी त्याला जवळ जवळ डांबून ठेवलं होतं. तिथून पळून तो पुण्यात आला. मशिदीमध्ये त्यांचं लग्न लावताना तीन ठिकाणी मौलानांनी नकार दिला. कारण काय तर मुलाच्या पालकाची संमती नाही. शेवटी एका मशीदीमध्ये लग्न लावण्यात आम्हाला यश आलं. हलिमाची आई, बहीण व भाऊ या लग्नाला हजार होते. काही काळानंतर हलिमाच्या सासऱ्यांना बरं नव्हतं. त्यांना आयसीयूमध्ये ठेवल्याचं कळालं. तेव्हा हलिमा व तिचा नवरा घरी गेले. त्यांनी त्यांची आपल्यापरीने काळजी घेतली. तरीही सासरे काही बधत नव्हते. तेव्हा हलिमाने सासूबाईंशी दोस्ती केली.

थोडक्यात, एकाच वेळी अनेक पातळ्यांवर लढण्याची हलिमाची क्षमता मुस्लीम व इतर तरुणींना प्रेरणा देणारी आहे. आणि म्हणूनच तिच्या पुरस्काराचं विशेष अप्रूपही आहे.

 

लेखक सामाजिक कार्यकर्ते आहेत.

rajanaaa@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

बिहारमधील एसआयआर : मतदार यादीची पडताळणी की मताधिकाराची पुनर्परीक्षा? महाराष्ट्रात चाललेल्या एसआयआर प्रक्रियेत हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चिला जाणे गरजेचे आहे

प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क प्रत्यक्षात बजावता यावा याची खात्री करणे, हे निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे कार्य आहे. त्यासाठी मतदार यादी हे एक साधन आहे. अंतिम उद्दिष्ट नाही. मृत व्यक्तींची नावे वगळणे आवश्यक आहे. दुबार नोंदी काढणे आवश्यक आहे. मतदार यादी अचूक ठेवणे आवश्यक आहे. या सर्व प्रक्रियांचा अंतिम हेतू मतदाराला मतदानापासून वंचित करणे, हा नसून त्याचा मतदानाचा हक्क सुरक्षित करणे हा असतो.......

प्रिय नरेंद्रभाई, तुम्ही जणू यादवी युद्ध लढत असल्यासारखे देश चालवत आहात! हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही भले कितीही लोकप्रिय असाल, पण तुम्ही संसदेला उत्तरदायी आहात

नेहरूंचे सगळे विरोधकही त्यांचा आदर करायचे. तुमच्या बाबतीतही पहिल्या दिवसापासून विरोधकांमध्ये चर्चा आहे. फक्त एवढाच ‘किरकोळ’ फरक आहे की, मोदी-चर्चेत ‘आदरा’ऐवजी ‘अविश्वास’ आणि ‘अनादर’ भरलेला असतो! नेहरूंवर जनता प्रेम करत होती, पण त्यांच्या पक्षातले राजकारणी त्यांना घाबरत असत. या बाबतीतही तुम्ही त्यांना मागे टाकलं आहे; तुमच्या पक्षातले लोक आणि जनता — दोघंही तुम्हाला घाबरतात!.......