चला, मोदीमुक्त भाजप करू या!
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार
  • Tue , 30 May 2017
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप ‌BJP आरएसएस RSS अटल बिहारी वाजपेयी Atal Bihari Vajpayee

शीर्षक बरोबरच आहे. अजिबात गफलत झालेली नाही. गोंधळ नाही. उपहास, उपरोध किंवा खास भाजप स्टाईल नावीन्यपूर्ण शब्दप्रयोगही नाही. आहे, ते विधान आहे. ठाम विधान आहे. सदिच्छा म्हणा हवं तर. सद्यकालीन दोन तृतीयांश बहुमतासह सत्तेवर असलेल्या, २५ वर्षांहून अधिक वय असलेल्या (भाजप म्हणून, जनसंघ मिळवला तर प्रौढत्वाकडे जाईल) राष्ट्रीय पक्षाच्या पक्षांतर्गत निर्णयात ढवळाढवळ करण्याचीही आमची इच्छा (आणि देशद्रोही धमक) नाही. तरीही आम्ही असं का म्हणतोय? जेव्हा की संपूर्ण देश ‘मोदी मोदी’चा पुकारा करत असताना आम्ही ‘मोदीमुक्त भाजप होईल का’, असा सवाल कुणासाठी करतोय? म्हणजे ‘काँग्रेसमुक्त भारत’च्या चालीवर एक वेळ ‘मोदीमुक्त भारत’ ही घोषणा जैसे की तैसा ठरली असती. मग ‘मोदीमुक्त भाजप’ करून काय साधलं जाईल? यात कुणाचं भलं होईल?

कुणाचं भलं होईल, हा प्रश्न अधिक सयुक्तिक आहे. अनेकांना वाटेल मोदीमुक्त भाजप झाल्याने काँग्रेस किंवा त्यांच्यासह पिवळी पानं जोडून केलेल्या पत्रावळीसारखे जोडलेले १७-१८ पक्ष यांचं भलं होईल. त्यांचा विजय झाला नाही तरी दारुण पराभव तरी नाही होणार. जर हे विरोधी पक्ष विजयी होणार नाहीत, पण पराभूत होणार तर भाजप मोदीमुक्त कशासाठी करायचा? आज जो काही भाजप आहे तो जर मोदींमुळेच असेल तर मग भाजप त्यांच्यापासून मुक्ती मिळावी अशी अवदसायुक्त कृती का करेल? मोदी सरकारला तीन वर्षं पूर्ण होऊन २०१९च्या निवडणुकाही मोदींच्याच नेतृत्वाखाली लढण्याचा मित्रपक्षांसह झालेल्या डिनर डिप्लोमसीत ठरलेलं असताना थाली में छेद करने की हिंमत है किसमें? वो भी जब अमितभय्याही पक्षाध्यक्ष है तब?

मोदींमुळे भाजपमध्ये घुसमट होतेय हा आमचा जावईशोध असून प्रखर मोदी द्वेषाचा इरसाल नमुना आहे, असं १२५ कोटी भारतीयही म्हणतील. हो १२५ कोटी. कारण मोदींच्या समर्थनार्थ एक-दोन, पाच-पन्नास, लाखो-करोडो नव्हे तर थेट १२५ कोटी भारतीय उभे राहतात. ना एक कमी, ना एक जास्त. आता या १२५ कोटींत आम्हीपण येतो. कारण मोदींची गिनती करायची पद्धत! म्हणजे आम्ही प्रश्न विचारण्यासाठी हात वर केला तर लगेच त्याचा फोटो काढून तो समर्थनार्थ वर केलाय असं त्वरित व्हायरल केलं जातं! त्यामुळे भाजप पक्षातंर्गत कुणी असा हात वर करत असेल तर तो समर्थनार्थ असं मोजून दुर्लक्ष केलं जात असावं. याचं दुसरं कारण भाजपची पितृसंघटना किंवा मातृसंघटना- राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रश्न विचारता येत नाहीत. तशी पद्धत नाही असं प्रत्यक्ष संघात स्वयंसेवक राहून नंतर बाहेर पडलेल्यांनीच विविध ठिकाणी लिहून ठेवलंय.

पण संघ काही राजकीय पक्ष नाही. संघ सामाजिक, सांस्कृतिक संघटन आहे. पुन्हा ती एकचालकानुवर्ति. तिथं अशी प्रश्न न विचारण्याची शिस्त योग्यच आहे. विशेषत: सतत एकमेकांनाच प्रश्न विचारत राहून सर्वच आघाड्यांवर आज निरुत्तर, निरुपयोगी ठरलेल्या डाव्या, समाजवाद्यांच्या सद्यस्थितीकडे पाहता ते अधिकच पटतं. पण भाजप म्हणजे संघ नव्हे. भाजप हा एक राजकीय पक्ष आहे. तोही सत्तेचं राजकारण करणारा राष्ट्रीय पक्ष आहे. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तो केडर बेस व पक्षांतर्गत लोकशाही मानणारा, पाळणारा पक्ष आहे. तो सहमतीने चालतो. तो काँग्रेससारखा पोथीनिष्ठ नाही. (प्रत्यक्षात हिंदू राष्ट्रवादी असला तरी) तो दक्षिणेतल्या सिने-राजकारणासारखा भाबडा, वेडा पक्ष नाही की, नितीशकुमार, मुलायमसिंग यादव, लालूप्रसाद यादव, मायावती यांच्यासारखा एकमेकांच्या पायात पाय घालणारा पक्ष नाही. तो शिवसेनेसारखा कुणा सचिवावर चालणारा पक्ष नाही की, मनसेसारखा दिवाणखान्यात एकच सिंहासन ठेवून गर्जना करणारा पक्ष नाही. हा शतप्रतिशत कार्यकर्त्यांच्या कष्टातून, घामातून उभा राहिलेला एकमेव लोकशाहीवादी पक्ष आहे.

आता वरील वास्तव खरं असलं तरी आम्हाला मात्र वाटतं की, सध्या मोदीमुक्त भाजपची नितांत गरज आहे. आता तुम्हाला अगदी आतलीच गोष्ट सांगायची तर खुद्द भाजपलाच मोदीमुक्त होण्याची गरज भासू लागलीय. तीन वर्षं खूप कळ काढलीय. पण आता जरा कुठे फट दिसली तर शुद्ध हवा, थोडं निरभ्र आकाश बघता येईल, अशी गरज निर्माण झालीय. मोदींनी न भूतो न भविष्यती सत्ता आणली हे खरंय, पण सत्ता बेडी बनू लागली की घुसमट वाढते.

पक्षाचं चिन्ह कमळ हेही समर्पक आहे. कमळ चिखलात उगवतं आणि त्याच्या पाकळ्या म्हणजे दलं ही निष्कलंक असतात. त्याचे देठ लांब, हिरवेगार आणि विद्येची देवता गणपतीला ती वाहिली जातात. चिखल ते आवरण हा प्रवास प्रतीकात्मक केला की, जो निर्माण होतो तो भाजप कार्यकर्ता. अशा कार्यकर्त्यांची घुसमट होते? शक्य नाही असंच सगळे म्हणतील. ज्या नंदनवनात डासच नाहीत तिथं डेंग्यू होईलच कसा?

या प्रश्नांची उत्तरं आमच्यासारख्या नतद्रष्ट माणसाला विचारण्यापेक्षा राम जेठमलानी, अरुण शौरी, लालकृष्ण अडवानी, गोविंदाचार्य, कीर्ती आझाद, नवज्योत सिंग सिद्धू, शत्रुघ्न सिन्हा, यशवंत सिन्हा, एकनाथ खडसे अशा आजी-माजी भाजपेयींनाच विचारा. आता या सर्व मंडळींचा मोदीयुक्त भाजपात नेमका निर्देशांक काय याचा तपास ‘रॉ’ पण करू शकणार नाही. कारण ‘रॉ’ पंतप्रधानांच्या कक्षेत येते. पंतप्रधान मोदी आहेत आणि मोदींच्या ‘मन की बात’ काही वेळा अमित शहांनाही माहीत नसते म्हणे! राजकारणात राहून मनाचा थांगपत्ता लागू न देण्याचा कॉपीराईट निर्विवादपणे शरद पवारांकडे असताना मोदी तेच तंत्र भाजपमध्ये वापरणार असतील तर घुसमट होणारच! भाजपने पवारांना सत्तेतून बाहेर घालवलं असेल तर त्यांनाच गुरू मानून त्यांचंच तंत्र वापरणारे मोदी भाजपने का बरं चालवून घ्यावे?

स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर नेहरू-गांधी घराण्यानं काँग्रेस पक्ष जसा हायजॅक केला, तसा मोदींनी संघनिर्मिती असलेला भाजप हायजॅक केला. आता या अपहरण नाट्यात भाजपमधील वयोवृद्ध मुखंडांना बाजूला सारून आक्रमक राष्ट्रवादाचा पुरस्कर्ता म्हणून मदत करण्यात संघाचा वाटा किती, हे रेशीमबागेतलं तलम प्रकरण आहे. जे कदाचित एका कुपीत बंद असेल. आधी पक्ष, मग पंतप्रधानपद निवडणुकीआधीच हायजॅक करून मोदींनी जनसंघापासूनची नीती बाजूला ठेवत प्रमोद महाजनांनी संस्थापित केलेली पंचतारांकित कॉर्पोरेट संस्कृती हीच मुख्य धारा बनवली. साध्या पेहरावाऐवजी ब्रँडेड व डिझायनर कपडे, रस्ते, रेल प्रवासाऐवजी खाजगी चॉपर आणि भाजप सरकारऐवजी मोदी सरकार असा थेट सरंजामी संकर लोकशाही माध्यमातूनच केला. वाजपेयींनी अमोघ वक्तृत्वानं कैक सभा जिंकल्या, पण चिअर्स लीडर्ससारखा ‘अटल’ किंवा ‘वाजपेयी’ असा गजर होत नसे. मोदींनी आपल्या नामाचा गरज करवून घेत नवा पायंडा पाडला.

या नव्या शैलीचा आणि आधीच्या सरकारच्या निष्क्रियतेचा फायदा मोदींनी इतका उठवला की, दोन तृतीयांश बहुमतासह केंद्रात भाजपची एकपक्षीय राजवट आणण्याचा इतिहास रचला. काँग्रेस व्यतिरिक्त देशातल्या कुठल्याच पक्षाला आजवर हे जमलं नव्हतं. ज्यांनी जनसंघ पाहिला त्यांनी ८४ सालचे दोन खासदार पाहिले, ज्यांनी २५-२७ पक्षांचं अटलजींचं एनडीए सरकार पाहिलं होतं, त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल असा चमत्कार मोदींनी करून दाखवला. मोदी हिरो झाले आणि भाजप पक्ष म्हणून झिरो होण्याचा प्रवास सुरू झाला. यशासारखं दुसरं काही नसतं. त्यामुळे भाजपमधले शीर्षस्थस्थानापासून शेवटच्या पायरीपर्यंतचे सर्वच नेते मोदींकडे कौतुकमिश्रित आदराने पाहू लागले. मोदी एक प्रस्थ झाले.

एकहाती गुजरात हाकण्याचा एका तपाहून अधिक वर्षांचा अनुभव असलेल्या मोदींनी, लोकशाही व्यवस्थेला हुकूमशहाच्या चौकटीत बसवायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात त्यांनी परदेश दौऱ्याचा सपाटा लावला आणि परदेशस्थ भारतीयांकडून ‘मोदी मोदी’ गजर करवून घेत, तो गजर जणू काही त्या त्या देशाचे नागरिक करताहेत असं भासवलं! याच जोडीनं मोदींनी मंत्री, मंत्रिमंडळ, मंत्री निर्णय या सर्व व्यवस्था मोडीत काढत प्रत्येक खात्याचा प्रत्येक निर्णय प्रधानमंत्री कार्यालयातून घेतला जाऊ लागला. पहिल्या वर्षा-दीड वर्षांत मोदींनी केलेल्या पंचवीसहून अधिक देशांच्या दौऱ्यांपैकी एकालाही परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना सोबत घेतलं नाही की, आजवरच्या परंपरेनुसार राष्ट्रीय माध्यमांना! मात्र अदानी, अंबानीसारखे उद्योगपती आणि तातडीने कर्जप्रक्रिया करण्यासाठी स्टेट बँकेच्या अध्यक्षांना मात्र आवर्जून नेलं. पंतप्रधानपद इतक्या व्यक्तिगत पातळीवर गेल्या ६० वर्षांत प्रथमच आणलं गेलं.

पंडित नेहरूंसह मनमोहनसिंगांपर्यंत (देवेगौडांचा अपवाद वगळता) सर्वच पंतप्रधानांनी १८ ते २० तास काम केलं. पण मोदींनी आपल्या कामाच्या तासांची अशी प्रसिद्धी केली की, यापूर्वीचे पंतप्रधान जणू दुपारी १ ते ४ झोपत किंवा सरकारीबाबूसारखे साडेचारला डबा बॅगेत सरकवत पाचच्या ठोक्याला घरचा रस्ता धरत!

मोदींची निवडणूक प्रचारातील प्रचाराची, प्रतिमासंवर्धनाची नशा आज तीन वर्षांनंतरही तसूभरही कमी झालेली नाही. रोजच नवी योजना, नवं भूमीपुजन, लोकार्पण याच्या पानपानभर जाहिराती, त्यात स्वत:ची छबी छापूनही मोदींची प्रेमाची भूक इतकी वाढली की, त्यांनी खादी ग्रामोद्योग मंडळाच्या डायरीवर गांधींच्या पोजमध्ये स्वत: झळकवलं. अंबानींच्या ‘जीओ’च्या जाहिरातीतही झळकून त्यांनी पंतप्रधानांना एक सेवा पुरवठादाराच्या उद्योगासाठी कामाला लावलं! ६० वर्षांत पहिल्यांदाच या मोदींच्या सततच्या घोषणाबाजीत स्वप्रतिमा प्रेमाची उदाहरणंही नोंदवायला हवीत!

लोकसभेच्या पायऱ्यांवर डोकं ठेवणाऱ्या मोदींनी लोकसभेत क्वचितच हजेरी लावली, पण खासदारांची मात्र गैरहजेरीबद्दल शाळा घेतली, अजूनही घेतात. हे म्हणजे मास्तरानं हजेरीवरून पोरांना छडी मारायची, पण स्वत: कुठलाच तास न घेण्यासारखं झालं. पण बोलणार कोण? नियोजन आयोग, मनरेगा, जीएसटी, जमीन सुधारणा कायदा, नोटाबंदी, गोवंश बंदी अशा अनेक गोष्टींबद्दलच्या टोकाच्या विरुद्ध भूमिका घेऊनही वर आपणच याचे कर्तेधर्ते हे सांगताना यत्किचिंतही पश्चात्तापाची भावना नाही, उलट ‘साठ साल में पहली बार…’ हे पालुपद कायम!

मोदी संसदेला महत्त्व देत नाहीत, मोदींनी तांत्रिक फायदा घेत लोकशाहीत अधिकृत विरोधी पक्ष स्थापण्याच्या संकेताला धुडकारलं. मोदींनी नोटाबंदी करताना ना मंत्रिमंडळाला कल्पना दिली, ना अर्थमंत्र्यांना की, रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांना. भ्रष्टाचार म्हणजे फक्त कोट्यवधीचा पैशांचा घोटाळा असं सरळसोट सूत्र माध्यमांनी करून करून घेतलंय. १२५ कोटी लोकसंख्येच्या ‘चेतना’बाबत, हेकेखोरपणे एककल्ली निर्णय घेणं आणि त्याविषयी खेद वा खंत व्यक्त न करता धाडसी निर्णय म्हणून डिमडिम बडवणं हासुद्धा एक प्रकारचा भ्रष्टाचारच आहे. हलगर्जीपणाचा आरोप होऊन डॉक्टर, इंजिनिअर, सरकारी अधिकारी लोकक्षोभाने मारले जातात, सरकारी यंत्रणा त्यांना निलंबित करते. नोटाबंदीत तर जवळपास १०० जणांचे जीव गेले. त्याला जबाबदार कोण? रिकाम्या एटीएमची जबाबदारी कुणाची? मोदींनी ५० दिवसांची मुदत मागून घेतली आणि सहा महिने झाले तरी ताळेबंद का देत नाहीत? आज बाजारात १० रुपयाचं नाणं चलनात असताना छोटे व्यापारी, रिक्षावाले, दुकानदार ते स्वीकारत नाहीत. हे कार्यक्षम सरकारचे ढोल पिटणाऱ्यांना दिसत नाही?

मोदींच्या भाषणात आता नावीन्य नाही. त्यांच्या योजनांना आरंभ आहे, पण कार्यवाही? मोदी म्हणतात मी १२०० कायदे बदलले? कुठले बाराशे कायदे? कधी बदलले? त्यांचे अध्यादेश? माहिती? परदेशी गुंतवणुकीचे आकडे सांगितले जाताना जनरल मोटर्स गाशा गुंडाळते, आयटी क्षेत्र हवालदिल, टाटा मोटर्स व्यवस्थापकीय कपात करते, हे सरकार शेतकऱ्यांच्या तर जीवावर उठलंय. आता तर सॅनिटरी नॅपकिनपासून ग्राहकोपयोगी वस्तू १८ ते २८ टक्क्यांच्या करात बसणार. राष्ट्रीय महामार्गावरील दारू दुकानांच्या, हॉटेलांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीचा उतारा पेट्रोल-डिझेलवर कर लावून वसूल केला जातोय. आता समृद्धी मार्गे जाणाऱ्या गावांना अतिरिक्त कर द्यावा लागणार. मुंबई, पुणे टोलवाढ, हा अधिभार, हा सेवा कर, हे सरकार जनतेच्या खिशात हात घालत चालवलं जातंय, मग ते सरकार केंद्राचं असो वा राज्याचं. तरीही चेहरा सर्वत्र मोदींचा! कशासाठी? तीन वर्षांचा प्रामाणिक हिशेब द्याल? जाहीर सभा आणि रेडिओवर भाषणबाजी, सल्ले नि धडे देणारे मोदी संसदेतील चर्चेला का भितात? राष्ट्रीय माध्यमांना पत्रकार परिषद नाकारून सोयीच्या पत्रकारांना रचलेली मुलाखत का देतात? आपल्या उद्योगपती मित्रांकडून माध्यमांवर ताबा मिळवूनही मोदी माध्यम व पत्रकारांना भीक घालत नाहीत की, अडचणींच्या प्रश्नांना घाबरतात?

जो नेता पक्ष बटिक बनवतो, मंत्रिमंडळाचं अस्तित्व नगण्य करतो, सहकारी मंत्र्यांना देशाचा मंत्री न मानता आपल्या हाताखालचा कर्मचारी समजतो, जो संसदेला सामोरा जात नाही की, असा नेता काही निवडणुका जिंकून देतो म्हणून त्याच्या मागे एक अख्खा राजकीय पक्ष फरफटत जातो? आज भाजप मंत्री, खासदार, आमदार अगदी नगरसेवकांची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी आहे. एका पक्षाऐवजी केवळ दोन नेतेच पक्षाच्या नावावर देश चालवत असतील आणि प्रसंगी पक्षाला, संसदीय प्रणालीलाही जुमानत नसतील, विरोधी पक्ष शत्रू असल्यासारखा तो संपवण्याची रणनीती बनवत असतील, मित्रपक्षांनाही ताटाखालचं मांजर बनवून ठेवत असतील तर हा लोकशाहीसाठी मोठा धोका आहे.

इंदिरा गांधींच्या रूपात या देशानं तो अनुभवला आहे. जनसंघ म्हणून भाजपही तेव्हा तुरुंगात जाऊन आलाय. दमनशाहीचा अनुभव घेतलाय. त्यापेक्षाही अधिक दमनकारी रणनीती लोकशाहीच्या मुखवट्याआडून आखली जातेय. तीन वर्षांतले जाहिरातींचे रंगीत गॅसचे फुगे आज ना उद्या खाली येतील. शेतकरी रस्त्यावर उतरतील, भीम आर्मी देशभर पसरेल, बेरोजगार चोऱ्यामाऱ्या करतील. मोठ्या प्रकल्पांच्या कोनशिला याच उद्या स्वप्नील सरकारची थडगी बनतील. अजूनही वेळ गेलेली नाही. मोदी व्यक्तीकडून वृत्ती बनण्याआधी भाजप मोदीमुक्त करणं ही आपल्या लोकशाहीइतकीच भाजपचीही गरज आहे.

तोंड उघडून आम्ही अपशकून केला असेल तर ६० वर्षांत पहिल्यांदाच एक चांगला ‘शकून’ समजा नि कामाला लागा!

……………………………………………………………………………………………

लेखक प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Govind Gandhi

Tue , 30 May 2017

बालिश हातखंडे ! या राजकारणी खेळ्या आता जुन्या झाल्या, स्वतःच्या खर्चाने लोकोपयोगी कामे करा तरच तुमचा निभाव लागेल !


Pramod Joshi

Tue , 30 May 2017

लेखातील आपल्या मताशी सहमत. मी संघ स्वयंसेवक आहे पण आंधळा मोदीभक्त नाही. निवडणूकीत यश मिळवून देणारा परिस आता भाजपला गवसला आहे त्यामुळे कोणतेही गणंग पक्षात आःणून वाल्याचे वाल्मिकी करण्याची उन्मत्त भाषा नितीन गडकरी करतात तेव्हा निष्ठावंत स्वयंसेवक डोक्याला हात मारुन घेतो.


Dhurandhar Bhatawadekar

Tue , 30 May 2017

मुंगेरीलाल के हसीन सपने. बघा स्वप्न बघा. आणि काय पर्याय आहे मोदींना ? राहुल गांधी - काँग्रेस ? ममता ? केजरीखोर ?


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......