भारतीय राष्ट्रवादाला सुरूंग
पडघम - बाबरी पतन @ २५
डॉ. कुमार सप्तर्षी
  • अयोध्येतील बाबरी मशीद
  • Wed , 06 December 2017
  • पडघम बाबरी पतन @ २५ अयोध्या Ayodhya लालकृष्ण अडवाणी Lal Krishna Advani राममंदिर Ram Mandir राम जन्मभूमी Ram Janmabhoomi बाबरी मशीद Babri Masjid रथयात्रा Ratha Yatra

६ डिसेंबर रोजी अयोध्येमध्ये बाबरी मशीद जमीनदोस्त करण्याची राजकीय कृती ही भारतीय राष्ट्रवादाच्या, भारतीय एकात्मतेच्या दहा हजार वर्षांच्या भक्कम पायाला सुरूंग लावणारी आहे. या घटनेने मुस्लिम समाज व्यथित होणे स्वाभाविक आहे. त्या  समाजाचे नेतृत्व धर्मांध लोकांकडे असून बहुसंख्य समाज अशिक्षित, निरक्षर, बेकारी, दारिद्र्याने गांजलेला आहे. त्याचा भावनात्मक उद्रेक होणे हे समजू शकते; पण खरे दु:ख झाले ते बहुधर्मीय राष्ट्रवाद मानणाऱ्यांच्या मनाला. येथील मुस्लिम समाज परदेशांमधून आलेल्या वेगळ्या वंशांमधून तयार झालेला नाही. काही शतकांपूर्वी हिंदू समाजाचा शोषित भाग म्हणून जीवन कंठणारा हा समाज आहे. तो अस्सल भारतीय वंशाचा आहे.

भारतात राहण्याचा त्याचा जन्मसिद्ध, वंशसिद्ध, इतिहाससिद्ध हक्क आहे. जगातले सर्वांत मोठे मुस्लिम संख्येचे राष्ट्र म्हणून हिंदुस्थानकडे जग पाहते. येथील मुस्लिम भारतीय वळणाचा आहे. इस्लाममध्ये मान्य नसलेला मोहरम तो साजरा करतो. पिराची पूजा करतो. एवढेच नव्हे तर आषाढी एकादशीला उपवासही करतो. भारतात साडेसातशे राजे होते. मुस्लिम राजे अन्य मुस्लिम राजांवर आक्रमण करत. हिंदू राजे हिंदू राजांवरही आक्रमण करत. या इतिहासाकडे डोळेझाक करता येणार नाही. ही राजेमंडळी आंतरधर्मीय लग्नेदेखील करत. भारतीय प्रजा मात्र या राजांकडे पासपोर्ट, व्हिसा न मागता आपल्या यात्रा सर्वत्र चालू ठेवत असे. तिबेटमधील कैलास, मानस सरोवर, नेपाळमधील पशुपतिनाथ, केदारनाथ, बद्रीनारायण, वाराणसी, द्वारका, पुरीचा जगन्नाथ, दक्षिणेचे रामेश्वर मंदीर, तिरूपती देवस्थान या सर्व ठिकाणी भारतीय समाज भाषेची बंधने पार करून, अशिक्षितपणाची, गरिबीची तमा न बाळगता वेळप्रसंगी पायी भ्रमण करून शेकडो वर्षे देश बांधण्याची प्रक्रिया अखंड चालू ठेवत आला आहे.

कोणताही अभिनिवेश न बाळगता आपल्या यात्रेमध्ये बौद्धधर्मीय, जैनधर्मीय, शीखपंथीय व मुस्लिम पवित्र स्थानांना भेट देण्याबाबत त्याने अपवाद केला नाही. भक्तिभावाने त्याने सर्वांना वंदन करण्याची प्रथा निष्ठेने बाळगली. राजांच्या राज्यांना सीमा होत्या. पण भारतीय सामान्य जनतेच्या भक्तिभावाला सीमा नव्हती. भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणींना कोणीतरी सुनावले पाहिजे की, ‘‘बाबा रे, हा सुडोसेक्युलरिझम नाही. यालाच निष्ठावंत सेक्युलरिझम म्हणतात. बहुधर्मीय राष्ट्रवाद म्हणतात. भारतीय जनतेचे धर्माच्या नावावर तुकडे करायचा धंदा लवकर बंद करा. धर्माचे राजकीयीकरण आणि व्यापारीकरण थांबवा.’’

प्रभू रामचंद्रांचे व्यापारीकरण

कधी गंगातीर्थ म्हणून पाण्याच्या बाटल्या विकायच्या, तर कधी विटा विकायच्या, तर कधी रामाच्या पादुका फिरवून पैसे गोळा करायचे. सतत पैसे गोळा करण्याचा कार्यक्रम असतो. भाजपा, विहिंप, बजरंग दल, रा. स्व. संघ आणि तत्सम हिंदुत्ववादी संघटना आज बेहिशेबी पैशाचे प्रचंड कोठार बाळगतात. प्रभु रामचंद्रांच्या रामराज्याचे संपूर्ण बजेटसुद्धा एवढे नसेल, इतका अमाप काळा पैसा या मंडळींनी रामाच्या नावावर गोळा केला. भाजपाने व संघाने (म्हणजे त्यांच्या पितृ-संघटनेने) विहिंप व बजरंग दल हे दोन भस्मासूर सत्तासंपादनासाठी निर्माण केले. हे भस्मासूर आज त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेलेले दिसतात. अशोक सिंघल आणि विनय कटियार यांच्या जिभेला लगाम नाही. कोट्यवधी रुपयांचा (काही शेकडा कोटी) फंड त्यांच्या हाती असल्याने आता हे भस्मासूर कोणाच्याही काबूत नाहीत. भाजपचे नेते, भाजपचे उत्तर प्रदेशचे सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची अवस्था अशोक सिंघल यांच्यापुढे ‘अग अग म्हशी, आता कोठे नेशी?’ अशी झाली आहे. या अतिरेक्यांनी आपल्याविरुद्ध जाऊ नये म्हणून अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, नानाजी देशमुख यांची केविलवाणी कसरत चालू आहे. अडवाणी बाबरी मशीद पाडताना तथाकथित कारसेवकांना अडवण्याचा प्रयत्न करत नव्हते. ते ओरडून सांगत होते की, ‘‘अयोध्या शहराकडे येणारे रस्ते बंद करा. केंद्र सरकारचे सैन्यदल येईल.’’ कारसेवकांनी त्यांचे ऐकलेदेखील. अडवाणींना चिंता होती, ती मशीद पाडण्याचे कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्याची!

भजन-कीर्तनाची कारसेवा हिंसक बनली

भजन, कीर्तनामुळे मनामध्ये सात्त्विक भाव निर्माण होतो. एकत्र भजन केल्याने तर सामूहिक सात्त्विक भाव जागृत होतो. सर्वोच्च न्यायालयाला आणि पर्यायाने ८५ कोटी भारतीय जनतेला भाजपा सरकारचे मुख्यमंत्री कल्याणसिंग यांनी लिखित आश्वासनपत्र दिले होते की, भजन, कीर्तनरूपाने फक्त लाक्षणिक कारसेवा होईल. मशिदीला धक्का लागणार नाही. मशिदीच्या संरक्षणाची कायदेशीर व नैतिक जबाबदारी उत्तर प्रदेशच्या सरकारची होती. केंद्रीय व राखीव दल अयोध्येत येण्यास त्यांचा सख्त व जाहीर विरोध होता. मशिदीचे रक्षण करण्यास उत्तर प्रदेशचे भाजपा सरकार वचनबद्ध व समर्थ आहे, असे वारंवार डंका पिटवून सांगण्यात आले.

या हिंदुत्ववादी मंडळींची नीतिमत्ता सर्वसाधारण जनतेच्या मान्यताप्राप्त नीतिमत्तेपेक्षा सदैव अलग असते. खोटे बोलणे, वचनभंग करणे, गनिमी काव्याने आपले ईप्सित साध्य करणे, फसवणूक करणे या गोष्टी त्यांच्या नीतिमत्तेचे अविभाज्य भाग आहेत. या प्रकारच्या नीतिमत्तेला ते चाणक्यनीती असे नाव देतात. त्यांच्या संघटनांमध्ये या पक्षामध्ये नेत्यांच्या विसंगत विधानांबद्दल कोणी जाब विचारत नाही. पक्षांतर्गत लोकशाहीची भानगडच त्यांनी शिल्लक ठेवलेली नाही. सुप्त हेतू साध्य करण्याकडे वाटचाल एवढी संगती पुरी असते. बाकी विसंगतिपूर्ण भाष्ये हे तर नेतृत्वाच्या कुशल राजनीतीचे वैशिष्ट्य मानले जाते.

सरकारच स्वत: कायदा मोडते, हे पाहून एखाद्याला आश्चर्य वाटेल. पण उ. प्र. राज्य सरकार, केंद्र सरकारबरोबर गनिमी काव्याने लढत होते. म्हणून कावेबाजपणा, ढोंगीपणा, खोटे बोलणे याबद्दल प्रशंसा केली जात आहे. या कृतीनंतर देशभर जातीय दंगलींचा आगडोंब उसळला. हजारो जीव मृत्युमुखी पडले. कोट्यवधी रूपयांच्या मालमत्तेची हानी झाली. जनजीवन विस्कळित झाले. याची जबाबदारी भाजप टाळू शकणार नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये काही काळात १०५ मराठी जीव मारले गेले. पण मशीद पाडण्याच्या कृतीनंतर एकट्या मुंबईत एका दिवसात १५० मराठी जीव ठार झाले. अयोध्येमध्ये भजन- कीर्तन या प्रकाराची क्रूर थट्टा झाली. सामाजिक सलोख्याची, भारतीय घटनेची, सर्वोच्च न्यायालयाची, कायद्याच्या राज्याची, सर्वोच्चपदी बसलेल्या पंतप्रधानांची, देशबांधवांची आणि सर्वांत अधिक प्रभू रामचंद्रांच्या कीर्तीची क्रूर थट्टा करण्यात आली. अयोध्येला रामाचा आत्मा असल्याची श्रद्धा आजवर होती; परंतु प्रभू रामचंद्रांनी, त्यांच्या आत्म्याने झुंडशाहीचा नंगानाच (जय श्रीराम च्या घोषणा देत) चाललेला पाहून आपले वास्तव्य अयोध्येमधून नक्कीच हलवले असणार.

या प्रसंगी पत्रकारांवर कारसेवकांकडून अमानुष हिंसक हल्ला झाला. एका पत्रकार महिलेचे कपडे फाडून, गळा दाबून तिला खड्ड्यात टाकून देण्यात आले. कॅमेरे काढले. पैसे चोरले. पत्रकारांना चाकू, पिस्तुलाचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी देण्यात आली. देशामध्ये पत्रकारांवर असा रानटी प्रसंग यापूर्वी कधी गुदरल्याचे ऐकिवात नाही. महिला पत्रकार सौ. रूचिरा गुप्ता हिचा टेलिव्हिजनवर इंटरव्ह्यू झाला. तिने म्हटले आहे, ‘‘असंख्य हात माझ्या शरीराभोवती आणि गळ्याभोवती फिरत होते. मला आठवतात त्या त्यांच्या नजरा. गर्दीच्या त्या नजरेमध्ये क्रौर्य आणि मनोविकृती दिसत होती.’’ परदेशी पत्रकारांना रक्तबंबाळ करून बेशुद्ध करण्यात आले. हा सर्व प्रकार उत्तर प्रदेश पोलिसांच्या साक्षीने घडत होता. मॉबच्या हिंसक व आक्रमक प्रवृत्तीमधून जीव घेऊन पळालेले पत्रकार पोलिसांकडे आश्रयाला गेलं, तर त्यांनी निर्विकार चेहऱ्याने तोंड फिरवले. काही पत्रकार जवळच चाललेल्या भाजपच्या सभेच्या व्यासपीठावर पोहोचले. अडवाणींना त्यांनी हा प्रकार कथन केला. पण अडवाणीजींनी तोंड फिरवले. त्यांचा हा स्थितप्रज्ञपणा महाभारतातल्या आंधळ्या धृतराष्ट्राला शोभणारा होता.

बाबरी मशीद तुम्ही पाडत होता ना? अगदी स्वेच्छेने? एक शुभकार्य करत असल्याबद्दल तुमची खात्री होती ना? कित्येक वर्षांची तुमची तमन्ना पुरी होत होती ना? आपले पवित्र स्वप्न प्रत्यक्षात उतरत असल्याबद्दल तुमचे मन ग्वाही देत होते ना? मग पत्रकारांना तुमच्या शुभकार्याचे फोटो, फिल्म का काढू दिली नाहीत? भारतीय दूरदर्शनला फिल्म घेऊ दिली असती तर साऱ्या देशबांधवांना तुमचा पराक्रम ‘आँखो देखा हाल’ म्हणून पाहायला मिळाला असता.

पत्रकारांना त्यांचे काम करू देण्यात आले नाही. एकही श्रीराम भक्त त्यांना मारहाण करू नका, असे म्हणत नव्हता. आपण गुन्हेगारी कृत्य करत आहोत, आणि हे जगाला कळू नये, असेच त्यांना वाटत असले पाहिजे. पत्रकार म्हणजे एक आरसा. आपला चेहरा आरशात पाहण्याची तुमची हिम्मत नव्हती. आपला क्रूर विद्रुप चेहरा बघण्यापेक्षा तुम्ही आरसाच फोडून टाकला. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यांच्या पोलिसांनी १९९० सालात कारसेवकांना मशीद पाडण्यापासून रोखले होते. त्या प्रसंगाची व्हिडिओ कॅसेट घरोघर दाखवून तुम्ही मुलायमसिंगांना क्रूरकर्मा ठरवले. त्या वेळी व्हिडिओ फिल्म घेणे रास्त होते, तर आज ते गैर का ठरले?

नेत्यांचे नक्राश्रू

मुख्यमंत्री कल्याणसिंग आपल्या सहकारी मंत्र्यांना घेऊन आरामात बंगल्यात बसले होते. सायंकाळी साडेपाच वाजता मशीद जमीनदोस्त झाल्याची बातमी मिळाल्याबरोबर ते राज्यपालांकडे आपला राजीनामा सादर करण्यास गेले. जगातला सर्वश्रेष्ठ फसवणूक करणारा, हे बिरूद त्यांनी प्राप्त केले. इतिहासात त्यांचे नाव कायम राहील. निदान गिनिज बुकात नोंद व्हायला हरकत नाही. लगोलग भाजप नेत्यांनी मशीद पाडली गेली ही खेदजनक घटना आहे, असे ढोंगी अश्रू ढाळायला सुरुवात केली. ‘‘आम्हांला जनतेला आवरणेच अशक्य झाले’’, ‘‘जनतेच्या असंतोषाचा उद्रेक झाला. ते कारसेवक नव्हतेच. कोणीतरी दुसरेच लोक होते.’’ इत्यादी त्यांची निरर्थक विधाने एकामागोमाग सुरू झाली. अर्थात देशात आतातरी भाजपवर विश्वास ठेवणारा एकही शाबूत डोक्याचा माणूस उरलेला नाही.

राष्ट्राच्या सार्वभौमत्वाशी बेजबाबदार खेळ

आज भारतीय जवान आणि पॅरामिलिटरी दले परकीय आक्रमणापासून देशाचे रक्षण करण्याचे, देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याचे अखंड काम सोडून, देशांतर्गत दंगलखोरांना प्रतिबंध घालण्याचे काम करण्यात गुंतले आहेत. या काळात परकी आक्रमण होत नाही, हे केवळ नशीब समजायचे. आक्रमक हिंदुत्ववादी शक्तींच्या हाती केंद्र सरकार आले तर भारतीय उपखंडातील शेजारची राष्ट्रे बिथरण्याचा धोका आहे. लहान राष्ट्रे घाबरली, की महासत्तांच्या छत्राखाली जातात. या उपखंडात आपली थोरल्या भावाची भूमिका आहे. जगातल्या महासत्तांचा प्रवेश आपल्या शेजारी राष्ट्रांमध्ये झाला तर भारताच्या सार्वभौमत्वाला तो धोका ठरेल. श्रीलंका बौद्ध धर्मीय आणि पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगला देश, मालदीव मुस्लिम धर्मीय आहेत. भूतानसारखा छोटा भूभागही बिथरू शकेल.

भारताच्या महत्त्वाच्या सीमेवर बिगर हिंदू प्रांत आहेत. पंजाबमध्ये शीख, काश्मीरमध्ये मुस्लिम, आसाममध्ये आदिवासी, अरूणाचलम व लडाखमध्ये बौद्धधर्मीय, नागालँड, मिझोराम, मेघालय या प्रांतात ख्रिश्चनधर्मीय जनता आहे. या सीमावर्ती प्रांतातील जनतेमध्ये अंसतोष धुमसत राहिला तर पाकिस्तान, बांगला देश, ब्रह्मदेश, चीन सगळेच हस्तक्षेप करण्याचा धोका आहे. चीन ही महासत्ता आहे. राष्ट्राच्या सार्वभौमत्वाशी आपण धोकादायक खेळ खेळत आहोत. हे आक्रमक हिंदूंच्या गटांनी ओळखले पाहिजे. त्यांनी ही खेळी चालूच ठेवली तर जनतेने हस्तक्षेप करून ही विनाशाच्या दिशेने चाललेली वाटचाल थांबवली पाहिजे.

सैन्य या कामात गुंतून पडले तर पंजाब, काश्मीर, आसाम, बोडो, झारखंड येथील सशस्त्र अतिरेक्यांना बळ मिळण्याचा धोका आहे.

राष्ट्रीय एकात्मतेला सुरूंग

धर्माच्या नावावर हिंदुत्ववादी राष्ट्र उभे करण्यात भाजप यशस्वी झाले तर देशाचे किती तुकडे होतील याची मोजदाद करणे कठीण होईल. हिंदू राष्ट्राला (मनातल्या मनात जरी) आपण मान्यता दिली तर खलिस्तान, काश्मीर, झारखंड, आसाम, बोडोलँड, गोरखालँड, नागालँड, मिझोराम, अरूणाचलम् ही सगळी अलग राष्ट्रे आहेत हे मान्य करावे लागेल. एवढेच नव्हे तर बारा-तेरा कोटी मुस्लिमांना एखादा भूप्रदेश वाटून द्यावा लागेल. नवे पाकिस्तान, दलितस्थान, जैनिस्तान, लिंगायतस्तान, बौद्धस्तान अशा देशाच्या अनेक फाळण्या कराव्या लागतील.

भाजपच्या खासदारांनो, देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये लोकसभेमध्ये, तुम्हाला सर्वधर्मीय मतदारांनी पाठवले आहे. तेथे तुम्ही भारतीय राज्यघटनेला निष्ठा असल्याची आणि देशाचे अखंडत्व राखण्याची शपथ ईश्वराला स्मरून घेतली आहे. मग आता त्या ईश्वरालाही का फसवत आहात! राज्यघटना मानायची नसेल तर आपल्या खासदारकीचे राजीनामे देऊन मोकळे व्हा. प्रभू रामचंद्रांचे नाव घेऊन थोडे तरी प्रामाणिक राहावे, अशी अपेक्षा आहे.

रंग तेरा सबने देखा

६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत भाजपाने आपले अंतरंग, खरे स्वरूप जनतेला, देशबांधवांना दाखवले आहे. भाजपच्या हाती केंद्र सरकार चुकून आलेच तर भविष्यात काय घडेल याची झलक दिसली. सर्वोच्च न्यायालय बरखास्त होईल, न्यायालयाची टिंगल होईल, पत्रकारांवर सेन्सॉरशिप येईल. जो वाकणार नाही, शरण जाणार नाही, त्याला भाजपच्या गुंडांच्या त्रिशुळाच्या हल्ल्याने (रामाच्या नावाच्या आक्रोशाचे बँक ग्राऊंड म्युझिक ऐकत) घायाळ व्हावे लागेल. इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांवरून जनतेला शुद्ध असत्य ऐकावे लागेल. मुद्रित प्रसारमाध्यमांतून फक्त नानाजी देशमुख, अटलबिहारी, बाळासाहेब देवरस यांच्या (थोर देशभक्त म्हणून) मुलाखती वाचाव्या लागतील. पुण्यातील एका भांडवलदारी, अधिक खपाच्या दैनिकात या संघटनांवर बंदी घातल्याच्या दिवशी फक्त हिंदुत्ववाद्यांच्या प्रतिक्रिया प्रसिद्ध करण्यात आल्या. वृत्तपत्राची मालकी काँग्रेसवाल्याची, पण पत्रकार, संपादक हिंदुत्ववादी अशी या वर्तमानपत्राची अवस्था आहे. त्यांच्या धोरणांमधून भविष्याची नांदी दिसून येते. 

गुंडांना धार्मिक नेते आणि राष्ट्रफोड्यांना थोर देशभक्त ही विशेषणे लावून भाजपच्या राज्यात तुफानी प्रचार चालू राहील. समाजात सद्भाव, जातीय सलोखा राखणाऱ्यांच्या छातीवर सक्तीने ‘शरम से कहो हम नपुंसक सेक्युलर है’ असे बिल्ले लावले जातील.

भारतीय राज्यघटनेच्या जागी मनुस्मृतीची विधिवत स्थापना होईल. ‘मी चातुर्वर्ण्य पाळीन’ अशी शपथ सर्व आमदार-खासदारांना ईश्वराला स्मरून घ्यावी लागेल. भाजपचे राज्य कसे असेल हे समजून घेणारांनी हिटलर, स्टालीनचा अभ्यास जरूर करावा. त्रिशूळ हे राष्ट्रीय मानचिन्ह आणि तिरंग्याऐवजी भगवा झेंडा राष्ट्रध्वज म्हणून राष्ट्रपती भवनावर, लोकसभेवर, मंत्रालयावर आणि सार्या सरकारी इमारतींवर फडकू लागेल.

मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार (अर्थात नाममात्र लोकशाही राहिली तर) काढून घेण्यात येईल. सतीप्रथेचे पुनरुज्जीवन करण्यात येईल. सतीप्रथेचे समर्थन करण्यात राजस्तानमध्ये भाजपनेच पुढाकार घेतला होता, याचे स्मरण सर्वांनी ठेवले पाहिजे.

भाजपच्या फॅसिस्ट राज्याला ‘रामराज्य’ हे नाव देण्यात येईल. काश्मीरमध्ये मंदिरे पाडल्यामुळे अटलबिहारी वाजपेयी म्हणजे भाजपाचा सर्वांत मोठा आणि सर्वात जुना लाऊडस्पीकर. ते म्हणाले, “काश्मिरात मंदिरे पाडली तेव्हा तुम्ही गप्प होता. मशीद पाडल्यावरच एवढा आरडाओरडा का करता?’’ काश्मीरमधील मंदिरे सामान्य काश्मिरी जनतेने धर्मांधतेने पाडली नाहीत. पाकिस्तानच्या पाठिंब्याने कार्य करणाऱ्या काश्मीर मुक्ती आघाडीच्या सशस्त्र अतिरेक्यांनी ती पाडली.

हिंदुत्ववाद्यांनी सामान्य जनतेमध्ये सामान्य भारतीय मुस्लिमांविरुद्ध विषारी प्रचार करून द्वेषाचा अग्नी पेटवून मशीद पाडली. हा फरक आहे. भूमिगत सशस्त्र अतिरेकी व परकी देशांच्या हुकुमाचे ताबेदार म्हणून भाजपा या विहिंपने मशीद पाडण्याचे कृत्य केले असते तर काश्मीर आणि अयोध्या एका पारड्यात तोलले गेले असते.

पंतप्रधानांची दिशाहीनता

भाजपने देशबांधवांना फसवले, पण पंतप्रधान कसे फसले? केंद्रीय गुप्तहेर खात्याने त्यांना मशीद पाडण्याची जय्यत तयारी व योजना असल्याची बातमी दिली असणारच. निदान ६ डिसेंबरच्या सकाळी कारसेवक मशिदीच्या वास्तूमध्ये शिरल्याबरोबर कल्याणसिंग सरकार बरखास्त का केले नाही? केंद्रीय राखीव पोलीस दल अयोध्येपासून अवघ्या पाच-सहा किलोमीटरवर तळ ठोकून होते. रॅपिड अॅक्शन फोर्स म्हणजे अतिशीघ्र कृती दलाने तर फैजाबादहून अयोध्येकडे कूच केले होते. पण जिल्हा दंडाधिकाऱ्याने त्यांना परत जाण्याचा हुकूम दिला. कल्याणसिंग सरकार बरखास्त केले असते, तर केंद्र सरकारचे आदेश पोलिसांनी मानले असते. वास्तू वाचली असती. आता ती जागा एवढी सपाट व साफ करण्यात आली आहे की, बुलडोझर व क्रेनचा वापर भाजप सरकारने केला असावा, असे मानण्यास जागा आहे. पंतप्रधान मेंदूला मुंग्या आल्यासारखे निष्क्रिय का बनले, या प्रश्नाचे उत्तर देशाला मिळाले पाहिजे. कल्याणसिंगाने कृतकृत्य होऊन स्वत: होऊन राजीनामा दिला. सायंकाळी राष्ट्रपतींनी आदेश दिल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली. नंतर राष्ट्रपती राजवट जाहीर झाली. आठ तारखेच्या पहाटेनंतर कारसेवक वादग्रस्त वास्तूमध्ये व अयोध्येमध्येच उन्मादाच्या अवस्थेत होते.

अचानक परकीय आक्रमण झाले तर निर्णय घेण्यासाठी पं. नरसिंहराव एवढा विलंब लावणार असतील तर या देशाचे भविष्य अंधकारमय आहे. अयोध्येचा प्रश्न तर बिलकूल अनपेक्षित नव्हता. त्यासाठी इमर्जन्सी प्लॅन आधीच तयार असायला हवा होता. निर्णयक्षमता हा नेतृत्वाला आवश्यक असलेला सर्वप्रथम गुण आहे.

या वेळी अल्पमतातल्या पंतप्रधान चंद्रशेखरजींच्या निर्णयक्षमतेची आणि समस्या हाताळण्याच्या हातोटीची देशाला आठवण झाल्यावाचून राहणार नाही.

भारताच्या जागतिक प्रतिमेला तडा

भारतामध्ये सर्वधर्मीय सद्भाव व सलोख्याने राहतात, ही प्रतिमा जगामध्ये होती. त्या प्रतिमेला आता तडा गेला. इराण, इंग्लंड, पाकिस्तान अशा सर्व ठिकाणी प्रतिक्रिया उमटल्या. मुस्लिम राष्ट्रे आपला तेलपुरवठा बंद करतील अशी शक्यता आहे. जेथे शक्य आहे तेथे मंदिरे पाडण्यात आली. कदाचित जगातले हिंदू निर्वासित होऊन पुन: भारतात येतील. जगात आपल्या कृतीचा काय परिणाम होईल याचा विचार न करणे, हे बेजबाबदारपणाचे लक्षण आहे.

हिंदुत्ववाद्यांना बळ कसे मिळाले?

मुस्लिमांचे नेतृत्व धर्मांध, स्वार्थी नेते करतात. आम मुस्लिम समाजाचा कोणताही लाभ नसताना वंदेमातरमला विरोध, शहाबानो प्रकरण इत्यादी प्रकरणांमधून मुस्लिम नेत्यांनी हिंदू जातीयवादाला शक्ती दिली. ‘कुटुंबनियोजन हे मुस्लिम समाजाचे भले करील’, असा प्रचार या नेत्यांनी कधी मुस्लिम समाजात केला नाही. मुस्लिम जनतेला मुख्य प्रवाहात आणण्याऐवजी उलट अलगतावादी वृत्ती नेत्यांनी पोसली. काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी मंदिरे पाडल्यानंतर त्यांनी जाहीर निषेध करायला हवा होता. या पार्श्वभूमीवर सामान्य हिंदूंना भडकवण्यात धर्मांध हिंदुत्ववाद्यांना बळ मिळाले.

दुसरे एक कारण असे आहे की, काँग्रेस पक्षात भ्रष्टाचार, दुर्व्यवहार, जातीयवाद, गुन्हेगारी एवढी फोफावली की, हतबल सामान्य जनता जमेल तेथे उद्रेकाला बळी पडू लागली. काँग्रेस पक्ष निरुपयोगी व डावे पक्ष दुर्बळ झाल्यामुळे निर्माण झालेल्या पोकळीमध्ये भाजप भावनात्मक आवाहनावर वाढू लागला. बेकारी, दारिद्र्य, महागाई वाढू लागली, तशी तरुण मुले निराश होऊ लागली. निराश झालेले युवक भाजपच्या जातीयवादाच्या जाळ्यात अडकू लागले. खोट्या प्रचाराला बळी पडू लागले.

उपाय : भारतीय संतपरंपरा मोठी आहे. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्यासारख्या सामाजिक ऐक्याच्या भूमिकेवर उपदेश करणारांचा अधिक उपयोग होणार आहे. सुज्ञ लोकांनी त्यांचा सदुपयोग करून घेतला पाहिजे. त्याचबरोबर उदारमतवादी लोकांनी मुस्लिम तरुणांमध्ये संवाद साधून त्यांना त्यांच्या नेत्यांपासून अलग करून मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. हिंदू तरुणांशीसुद्धा संवाद साधला पाहिजे. हिंदुत्ववादी फार विषारी प्रचार करतात. मुस्लिम जमातीबद्दल खोटी प्रतिमा हिंदू तरुणांमध्ये त्यांनी निर्माण केली आहे. त्यांना सत्य पटवून दिले पाहिजे. धर्मांध हिंदूंचा एकांगी प्रचार व राजकारण उघड करणे आवश्यक आहे. बहुधर्मीय राष्ट्रवादाची सनातन परंपरा तरुण पिढीला समजावून सांगितली पाहिजे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4296

.............................................................................................................................................

काँग्रेस पक्षाला देशापुढचे हे आव्हान पेलण्याची शक्ती उरली नाही. म्हणून भाजपाविरुद्ध सर्वांनी एकत्र येऊन राजकीय फेरजुळणी घडली पाहिजे. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला ३३ टक्के (झालेल्या मतदानापैकी) मते पडली होती. ६६ टक्के मतदानात काँग्रेस, जनता दल (अजितसिंह), जनता दल (मुलायमसिंह) आणि व्ही.पी. सिंग अशी फूट होती. काँग्रेस, कम्युनिस्ट, जनता दल, समाजवादी जनता पार्टी आणि अन्य समविचारी राजकीय शक्ती यांनी निवडणूक समझोता केला, तरी संयुक्त आघाडीचे सरकार केंद्रस्थानी प्रस्थापित होईल.

परंतु यासाठी एक पथ्य आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जातीयवादी, गुन्हेगारी स्वरूपाचे व भ्रष्टाचारी नेतृत्व आपापल्या पक्षातून दूर ठेवायला पाहिजे. हर्षद मेहता, हितेन दलाल, ठाकूर, कलानी आणि जातीयवादी नेते यांना राजकीय प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे पाप सर्वांनीच कमी-जास्त प्रमाणात केले आहेच. हिरोशिमावर अणुबॉम्ब पडल्यानंतर जपान खडबडून जागा झाला. त्यांनी आत्मपरीक्षण करून नव्याने जपानची पुनर्बांधणी केली. बाबरी मशीद पाडण्याची कृती ही एक प्रकारे बॉम्ब पडण्याचीच घटना आहे. आपण जागे होऊ या. आपापल्या अपप्रवृत्तींना, आपापल्या भस्मासुरांना गाडून चांगल्या जनताभिमुख राजकारणाची जनतेला ग्वाही देऊ या.

(हा लेख ‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकाचं संपादकीय म्हणून जानेवारी १९९३मध्ये लिहिला होता. त्याचं हे लेखकाच्या पूर्वपरवानगीनं पुनर्प्रकाशन.)

Ram Ke Naam \ In the Name of God

.............................................................................................................................................

लेखक डॉ. कुमार सप्तर्षी सामाजिक कार्यकर्ते असून ‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकाचे संपादक आहेत.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Gamma Pailvan

Wed , 06 December 2017

ओ सप्तर्षी महाराज, जागे व्हा झोपेतून. बाबरी नावाची कुठलीही मशीद कधीही अस्तित्वात नव्हती. अल्ला एक आहे आणि पैगंबर एक आहे तर तीन घुमट कशासाठी पाहिजेत? गैरमुस्लिमांच्या प्रार्थनास्थळी मशीद उभारणं हा इस्लामचा घोर अवमान आहे. वादग्रस्त वास्तू जुनं राममंदिर होतं. हिंदूंची वास्तू हिंदूंनी पाडली. मुस्लिमांचा संबंध येतोच कुठे? हिंदू आणि मुस्लिमांत मुद्दाम तेढ वाढवण्यासाठी तुमच्यासारख्या सेक्युलर मुखंडांनी बाबरी मशिदीचं थोतांड उभं केलं आहे. मुस्लिमसुद्धा त्याला भीक घालायचं टाळतात, हे तुमचं खरं दुखणं आहे. आपला नम्र, -गामा पैलवान


Uddhav B

Wed , 06 December 2017

हा लेख 'बेगडी धर्मनिरपेक्षतेचा' उत्तम नमुना आहे. बाबरी मशिद पाडली तर यांना तो धर्मनिरपेक्षतेला सुरूंग वाटतो. पण १९८४ चे शिख हत्याकांड, १९८९ चे कश्मिरी पंडितांचे हत्याकांड याबद्दल हे 'कुडमुडे विद्वान' काहीच बोलत नाहीत. या दोन घटनांनी भारतीय धर्मनिरपेक्षतेत मानाचा तुरा रोवला गेला का ? या घटना देशावर डाग नाहीत का ? याचे उत्तर हे देत नाहीत. तसेच हे हिंदूद्वेष्टे लोक कसे बिजेपी विरूद्ध कसा खोटा प्रचार करतात हेही येथे समजते. १९९३ साली लेखकाने म्हणले आहे की , बिजेपी भविष्यात सत्तेत आली तर मुस्लिमाचा मताधिकार काढण्यात येईल, राज्यघटना बाजूला ठेवून मनूस्मृतीचे पालन केले जाईल, सतीच्या प्रथेचे पुनरूज्जिवन केले जाईल वगैरे. आत्तापर्यंत बिजेपी १९९८-२००४ व २०१४ ते सध्या सत्तेत आहे. पण याकालावधित ना मुस्लिमांचा मताधिकार काढला गेला ना सतीचे पुनरूज्जिवन झाले. यामुळे या कुडमुड्या निध्रमवादींचा खोटारडेपणाच उघड झाला. लोकांनी अश्या खोटारड्या हिंदूद्वेष्टया लोकांपासून सावध राहावे.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......