आमच्या दृष्टीने हा अतिशय दु:खद व नाइलाजाने घेतलेला निर्णय असेल
पडघम - सांस्कृतिक
भानू काळे
  • भानू काळे आणि ‘अंतर्नाद’ मासिकाची काही मुखपृष्ठे
  • Wed , 04 October 2017
  • पडघम सांस्कृतिक अंतर्नाद मासिक Antarnad Magzine भानू काळे Bhanu Kale

‘अंतर्नाद’ हे ‘सांस्कृतिक समृद्धीसाठी’ चालवले जाणारे आणि गेली २०-२२ वर्षं नियमित प्रकाशित होणारे वाङ्मयीन मासिक बंद पडण्याच्या किंवा फक्त दिवाळी अंकापुरते उरण्याच्या मार्गावर आहे. मालकी हस्तांतरणाचाही पर्याय या मासिकाचे संपादक, प्रकाशक आणि मालक भानू काळे यांनी समोर ठेवला आहे. यांविषयीची चर्चा करणारे हे ‘अंतर्नाद’च्या ऑक्टोबरच्या २०१७च्या अंकातील संपादकीय...

.............................................................................................................................................

‘अंतर्नाद’च्या सर्व वर्गण्या २०१७ दिवाळी अंकाबरोबरच (नोव्हेंबर-डिसेंबर जोडअंक) संपतील. ‘पुढील वर्गणी कधी पाठवू?’ अशी विचारणा अनेक वर्गणीदार करीत आहेत; परंतु वर्षअखेरीनंतर काय करायचे हे अजून नक्की झालेले नाही. त्याबाबत विचारविनिमय चालू आहे. किंबहुना, हे ऑक्टोबर २०१७ चे संपादकीय म्हणजे त्या विचारमंथनाचाच एक भाग आहे. पहिल्या वर्षापासून ‘अंतर्नाद’चे वर्गणीदार असलेले अनेक जण आजही ‘अंतर्नाद’चे वर्गणीदार आहेत. ते, तसेच नंतरही झालेले अनेक वर्गणीदार, आता अंतर्नाद परिवाराचाच एक भाग बनले आहेत. त्यांना विश्वासात घेऊन आपल्यापुढील पर्याय त्यांच्यापुढे ठेवणे, त्यांची मते विचारात घेणे अशा निर्णयाच्या क्षणी उपयुक्त ठरावे, म्हणूनच हे निवेदन.

मागच्या साधारण शंभर वर्षांचा कालखंड विचारात घेतला तर ‘मनोरंजन’, ‘करमणूक’, ‘विविधज्ञानविस्तार’, ‘चित्रमयजगत’, ‘ज्योत्स्ना’ यांपासून ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’, ‘अभिरूची’, ‘सत्यकथा’, ‘राजस’, ‘हंस’ व इतरही अनेकांपर्यंत वेगवेगळ्या नामांकित मराठी मासिकांनी साहित्यसृष्टीला दिलेले योगदान वादातीत आहे; पण त्याचबरोबर हेही खरे की, या नियतकालिकांना व एकूणच साहित्यनिर्मितीला, एकावेळी बऱ्यापैकी पूरक असलेले सांस्कृतिक व सामाजिक पर्यावरण १९८० नंतरच्या कालखंडात झपाट्याने बदलत गेले. भोवतालच्या परिस्थितीचा लाभ मिळणे तर सोडाच, त्या परिस्थितीत मासिक चालवणे म्हणजेच उघडउघड प्रवाहाविरुद्ध पोहणे बनले. त्यात दमछाक होऊन अनेक मासिकांनी मान टाकली - काहींचे अस्तित्व केवळ दिवाळी अंकापुरते उरले. तसे पाहिले तर ऑगस्ट १९९५ मध्ये ‘अंतर्नाद’चा पहिला अंक प्रसिद्ध झाला. त्यावेळेसही मराठी मासिकांची मोठ्या प्रमाणावर पडझड होऊन गेली होती; तशा परिस्थितीत असे मासिक सुरू करणे हे अवाजवी धाडस ठरेल, असे अनेक मित्रांनी त्यावेळेलाही सांगितले होते.

‘अंतर्नादची दशकपूर्ती : थोडे प्रकट चिंतन’ या शीर्षकाचे संपादकीय ऑगस्ट २००५ च्या अंकात प्रसिद्ध झाले होते. त्यावेळी व नंतरही दोन-तीनदा, चालू असलेल्या वर्गण्या संपल्यावर, ‘अंतर्नाद’ बंद करायचा विचार झाला होता. पण त्या-त्या वेळी काही हितचिंतकांनी मासिक चालू ठेवायचा सल्ला दिला, आम्हाला मदतही केली व त्यामुळेच तो निरोपाचा क्षण प्रत्येक वेळी दोन-तीन वर्षे लांबणीवर पडत गेला. त्यांच्याबद्दलची कृतज्ञता इथे आवर्जून व्यक्त करायला हवी.

नुकतेच ते जुने संपादकीय पुन्हा एकदा काढून वाचले आणि जाणवले की, आता इतकी वर्षे उलटून गेल्यावरही त्यावेळच्या अडचणी आजही कायमच आहेत; किंबहुना अधिकच बिकट झाल्या आहेत.

दै. लोकसत्तामध्ये काल प्रकाशित झालेली ‘अंतर्नाद’विषयीची बातमी

‘सर्वे गुणा: कांचनमाश्रयन्ते’ हे एका व्यापक अर्थाने नेहमीच लागू पडणारे असले, तरी ‘अंतर्नाद’पुढच्या किंवा एकूणच मराठी मासिकांपुढच्या, आजच्या अडचणी या केवळ आर्थिक नाहीत हे इथे मुद्दाम नमूद करायला हवे. ज्ञान व माहिती मिळवण्यासाठी आणि मनोरंजनासाठी आज संभाव्य वाचकापुढे अनेक आकर्षक पर्याय सहजगत्या उपलब्ध आहेत. त्याला खिळवून ठेवायचे असेल, तर त्याच्या अधिक खोलवरच्या आंतरिक गरजा भागवणारे साहित्य त्याला उपलब्ध करून द्यावे लागेल. ते कुठून मिळवायचे हा आजचा अगदी कळीचा असा प्रश्न आहे. उत्तम लिहावे आणि साहित्यक्षेत्रात नाव कमवावे अशी आस असणारे वेगवेगळ्या जीवनक्षेत्रातले अनेक प्रतिभावान तरुण पूर्वी आढळायचे. आज ते तसे फारसे दिसत नाहीत. लिहिणारे खूप आहेत, पण त्यात प्रतिभावान फारसे आढळत नाहीत. लेखकाचे व एकूणच साहित्याचे समाजातील एकेकाळचे अग्रस्थान आज उरलेले नाही. परिणामत: मासिकांचा प्राणवायू मानता येईल अशा दर्जेदार साहित्याची निर्मिती खूपच मंदावली आहे.

इतरही अनेक कारणे अर्थातच आहेत. नुसती रिमोटची कळ दाबताच घरबसल्या उपलब्ध होणाऱ्या शेकडो रंगीबेरंगी वाहिन्या, जवळजवळ प्रत्येकाच्या हातात पोचलेल्या मोबाइलचा सोशल मीडिया म्हणून होणारा अखंड वापर, वृत्तपत्रांच्या अल्प किमतीत घरपोच येणाऱ्या भरगच्च पुरवण्या, मराठी भाषेची व एकूणच साऱ्या भारतीय भाषांची सातत्याने होत गेलेली हेळसांड, इंग्रजी भाषेच्या वाढत्या प्रभावापुढे ज्ञानभाषा म्हणून टिकून राहण्यात त्यांना येत असलेले अपयश, अभिजनवर्गाची - यात लाखाच्यावर पगार घेणारे प्राध्यापकही आले - मासिकांची वर्गणी भरण्याबद्दलची कमालीची अनास्था, मराठी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची केवळ मोठ्या शहरांतून नव्हे तर अगदी छोट्या गावातूनही झपाट्याने कमी होत गेलेली संख्या, गंभीर स्वरूपाच्या वाचनाकडे वाचकांनी फिरवलेली पाठ, त्यांच्यातील एकाग्रतेचा व चिकाटीने बैठक मारून एखादे पुस्तक सलग वाचायच्या सवयीचा झालेला ऱ्हास, लेखनपूर्व चिंतनासाठी व प्रत्यक्ष लेखनासाठी पुरेसा वेळ देण्यातला लेखकांचा अनुत्साह, उत्तम अक्षरजुळणीकार-मुद्रितशोधक वगैरे व्यावसायिक सेवांचा व एकूणच कुशल मनुष्यबळाचा साहित्यक्षेत्रातील तुटवडा, व्यक्तिगत व सामाजिक जीवनातील वाढते तणाव, विविध तांत्रिक उपकरणे व सोयी हाताशी असूनही निवांत वेळेचा आश्चर्यकारकरित्या जाणवणारा अभाव वगैरे कारणेही विश्लेषण करायला लागले तर पुढे येतात. त्या सर्वांचा उहापोह इथे करणे अप्रस्तुत ठरेल. ‘अंतर्नाद’ मासिक सुरू झाले तेव्हाचा, म्हणजे ऑगस्ट १९९५ मधला समाज आणि आजचा समाज यांत खूप फरक पडला आहे, हे नक्कीच.

उपरोक्त अडचणी गंभीर आहेतच; शिवाय काळाच्या ओघात त्यात व्यक्तिगत पातळीवरही भर पडलेली आहे. पूर्वीइतकी आता प्रकृतीची साथ राहिलेली नाही, नवे-नवे प्रयोग करायचा, वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले लेखक शोधायचा, त्यांच्या संपर्कात राहून ते टिकवायचा उत्साहही वयपरत्वे उरलेला नाही. हे सारे सांभाळताना स्वत:च्या वाचन-लेखनाकडे दुर्लक्ष होत आहे, याचीही जाणीव आहेच. गेली बावीस-तेवीस वर्षे आमच्या अल्पस्वल्प शक्तिमानानुसार ते काम केल्यावर आम्ही आता काहीसे शिणून गेलो आहोत हेही वास्तव आहे. अशा अनेक कारणांमुळे भविष्यात ‘अंतर्नाद’ मासिक आहे, या स्वरूपात चालू ठेवणे आम्हाला शक्य वाटत नाही.

त्याचबरोबर मासिकाचे व्यासपीठ सकस साहित्यनिर्मितीसाठी आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आजही अत्यंत उपयुक्त आहे; किंबहुना ही उपयुक्तता पूर्वीपेक्षा आजच्या बिकट काळात अधिकच आहे, यात शंकाच नाही.

क्लिक करा - http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

मग पुढे काय करावे? त्यादृष्टीने विचार केल्यावर व काही मित्रांशी चर्चा केल्यावर सध्या तीन शक्यता समोर येतात :

१) पहिली म्हणजे मासिक स्वरूपात अंक न काढता ‘अंतर्नाद’चा फक्त दिवाळी अंक काढणे. सुदैवाने मराठीतील दिवाळी अंकांना आजही मागणी असते, तीन-चार महिने तरी ते सहज वाचनात राहतात. अंकांची किंमत जास्त असल्याने व त्यामुळे मिळणाऱ्या कमिशनची रक्कम बऱ्यापैकी होत असल्याने विक्रेते दिवाळी अंक विकायला तुलनेने अधिक तयार असतात. थोड्याफार जाहिरातीही मिळू शकतात, हाताशी पुरेसा वेळ असल्याने अंकातील साहित्याची अधिक चांगली निवड करणे अथवा अंकासाठी एखादे आशयसूत्र निश्चित करून मुद्दाम लेखन मागवून घेणे शक्य असते. ‘वसुधा’, ‘दीपावली’, ‘दीपलक्ष्मी’, ‘मोहिनी’, ‘नवल’, ‘कथाश्री’ व इतरही एकेकाळी मासिक स्वरूपात प्रकाशित होणाऱ्या अनेक नियतकालिकांनी हा पर्याय ‘अंतर्नाद’च्या खूप पूर्वीच स्वीकारलेला आहे.

३) दुसरी शक्यता म्हणजे ‘अंतर्नाद’ मासिकाची मालकी अन्य कोणा उचित माणसाकडे हस्तांतरित करणे. ही व्यक्ती उमेदीच्या वयातील, म्हणजे साधारण चाळीशीतली असावी; मासिकाला आवश्यक ते आस्थापना खर्च (ओव्हरहेड्स) परवडावेत म्हणून पुस्तक प्रकाशन, ग्रंथविक्री, सांस्कृतिक कार्यक्रम वा अन्य काही उपक्रमांची मासिकाला जोड द्यायची कल्पकता आणि कष्ट करायची तयारी तिच्यात असावी. सुरुवातीला उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असेल हे लक्षात घेऊन मासिकासाठी पुरेशी आणि दीर्घकालीन आर्थिक गुंतवणूक करायची तिची तयारी असावी आणि मुख्य म्हणजे साहित्यातील चांगले काय व सुमार काय याचे तिला भान असावे. अशी व्यक्ती भेटणे, विशेषत: आजच्या काळात खूपच अवघड आहे, याची अर्थातच आम्हाला कल्पना आहे, पण ते अशक्य मात्र नाही.

‘अंतर्नाद’ने गेल्या बावीस-तेवीस वर्षांत जे काही थोडेफार नाव मिळवले असेल, त्याचा नव्या व्यवस्थापनाला उपयोग होईलच; पण त्याशिवाय आमच्या हातून ज्या काही चुका झाल्या त्यापासून ही व्यक्ती ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ या न्यायाने, नक्कीच काही बोधही घेऊ शकेल. खरे तर सकस ललित आणि वैचारिक वाचनाची ज्यांना भूक आहे, असा मोठा वाचकवर्ग आजही आपल्या समाजात आहे; गरज आहे ती अभिनव उपक्रम कष्टपूर्वक राबवून त्यांच्यापर्यंत पोचायची. नव्या तरुण व्यवस्थापनाखाली ‘अंतर्नाद’चा दर्जा अधिक उंचावू शकेल आणि त्याचवेळी खपही खूप वाढू शकेल. इंटरनेटचा वापर करून जगभर विखुरलेल्या मराठी तरुणाईशी नाळ जोडता येईल. असे मासिक म्हणजे एक मोठी सांस्कृतिक शक्ती बनू शकेल. योग्य प्रकारे संपर्क साधला तर अनेक मदतीचे हात पुढे येतील. त्यांच्या सहाय्याने एक उत्तम बिझनेस मॉडेल तयार करता येईल. जे आम्हाला जमले नाही, ते दुसऱ्या कोणाला जमू शकले तर त्यात आम्हाला आनंदच असेल. अशा प्रयत्नामागे इतर अनेकांप्रमाणेच आम्हीही अर्थातच यथाशक्ती उभे असू व सर्वांच्याच सहकार्याने एक उत्तम सांस्कृतिक व्यासपीठ मराठी जगतात उभे राहू शकेल.

३) वरील दोन्ही शक्यता प्रत्यक्षात येऊ शकल्या नाहीत तर तिसरी शक्यता म्हणजे ‘अंतर्नाद’ मासिकाचे प्रकाशन पूर्णत: थांबवणे. अर्थातच आमच्या दृष्टीने हा अतिशय दु:खद असा व केवळ नाइलाजाने घेतला गेलेला निर्णय असेल.

हा अंक वाचकांच्या हाती सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पडेल. यंदा दिवाळी ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यातच असल्याने नंतरचा दिवाळी अंकही लगेचच छपाईला द्यावा लागेल. त्यामुळे अल्पावधीतच उपरोक्त तीन पर्यायांपैकी कुठलातरी एक निश्चित करावा लागेल. वाचकांनी आपली प्रतिक्रिया अवश्य कळवावी ही विनंती. आमच्या दृष्टीने वाचकप्रतिसाद हा नेहमीच महत्त्वाचा असतो व यावेळी तो नक्कीच अधिक महत्त्वाचा असेल.

(संपादकीय, ‘अंतर्नाद’, ऑक्टोबर २०१७)

लेखक भानू काळे ‘अंतर्नाद’ मासिकाचे संपादक आहेत.

antarnaad1@gmail.com

संपर्क : ०२० - ६५२२७२३३

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......