कुठे गौरी लंकेश आणि कुठे डॉ. (!) खोलेबाई!
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार (डावीकडे गौरी लंकेश आणि उजवीकडे मेधा खाेले)
  • Thu , 14 September 2017
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar गौरी लंकेश Gauri Lankesh मेधा खोले Medha Khole भाऊ कदम Bhau Kadam

डॉ. मेधा खोले यांनी केलेली जात लपवण्याच्या गुन्ह्याबद्दलची पोलिस तक्रार मागे घेतली आहे, आणि या प्रकरणावर पडदा पडला आहे, असं माध्यमांनीही जाहीर केलं.

परंतु हा पडदा अपारदर्शी नाही. उलटे खोले यांच्यासारख्या निव्वळ जातीयवादी, अप्रगत, बुरसटलेल्या विचारांचं प्रदर्शन सतत दाखवत राहणारा तो झिरझिरीत पडदा आहे.

गेला पंधरवडाच देश व राज्य पातळीवर विवेकवादी, विचारी, सुबुद्ध नागरिकांना हतबुद्ध करणारा ठरला. साल, दशक, शतक उलटतं म्हणजे फक्त सूर्य व पृथ्वी यांच्यातलं एक यांत्रिक चलनवलनच आहे?

उजाडलं म्हणत असताना दिवस, मग महिना, मग साल, नंतर शतक बदलतं, अशी जी कालगणना आपण करतो तो ‘कालचा’ दिवस\रात्र इतिहासजमा करायला. उद्या उजाडतो तोच मुळी नव्या प्रकाशकिरणांसह नवी, ताजी ऊर्जा घेऊन. मानवाच्या मेंदूनं एका नियमित क्रियेला दिलेलं हे मोठं उत्क्रांती वळण आहे. अन्यथा कल्पना करा दिवसामागून रात्र व रात्रीनंतर दिवस याच क्रमानं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा एवढंच राहिलं असतं तर इतर प्राणी आणि मनुष्यप्राण्यात काय फरक राहिला असता?

हवामान खात्यात सर्वोच्च पदी राहूनही खोलेबाईंना प्रकाशवर्षांचा अर्थ कळला नाही, याचाच अर्थ शैक्षणिक अर्हता, त्यातून मिळणारं पद, पदोन्नती यांचा आणि मानसिकतेचा, विचारांचा, आचारांचा काहीही संबंध नसतो, हे खोलेबाईंनी कृतीतून सिद्ध करून दाखवलं सन २०१७मध्ये.

खोलेबाई काही शतकं मागे जात असताना, तिकडे कर्नाटकात पत्रकार संपादक गौरी लंकेश शतकानुशतकाच्या धर्मांध बेड्या तोडण्यासाठी लढत होती. आजकाल दुर्मीळ झालेला पत्रकारितेतला स्पष्टवक्तेपणा निर्भयपणे दाखवत होती आणि त्यासाठी शेवटी हत्येला बळीही पडली.

महाराष्ट्र आणि कर्नाटक यांची सीमारेषा एक आहे. मराठी-कानडी भगिनीभावही अस्तित्वात आहे आणि सीमाप्रश्नावरून कानडीची जुलमी सक्तीही चालू आहे. मराठीप्रमाणे कन्नड साहित्य-संस्कृती जगतात प्रतिगामी-पुरोगामी असं युद्ध चालू आहे. आता दोन्ही प्रांतात हे वैचारिक युद्ध शारिरीक हत्यांच्या टोकांपर्यंत पोहचलं आहे. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश अशी वाढती आकडेवारी आहे.

या पार्श्वभूमीवर खोलेबाईंचं संस्कृतीचं सोवळेपण आणि गौरी लंकेश त्याच संस्कृतीच्या सोवळेपणाचं करत असलेलं वस्त्रहरण म्हणजे हवामानात जसा एखाद्या जिल्ह्याचा उत्तर भाग पाऊसपाण्यानं समृद्ध तर दक्षिण भाग कायम दुष्काळी, तसाच प्रकार झाला. सावित्रीबाईंच्या पुण्यात २०१७ साली तथाकथित उच्चविद्याविभूषित खोलेबाई निपजावी यातून सावित्रीबाईंवर फेकलेलं शेणं अजून ओलंच आहे, हेच सिद्ध होतं!

मागच्या पंधरवड्यातले घटनाक्रमच चक्रावणारे आहेत. म्हणजे अश्लील शेरेबाजी केली म्हणून माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर गुन्हा दाखल करा यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया वाकोला पोलिस स्टेशन बाहेर दोन दिवस धरणं धरून बसल्या होत्या आणि पोलिस दाद देत नव्हते. याउलट तिरमिरीत आलेल्या खोलेबाईंच्या (निवृत्त) सरकारी पदाचा दबाव मान्य करत पोलिसांनी जो गुन्हा भारतीय दंड संहितेतच नाही, त्याविषयीचं स्पष्ट कलम नाही, तरीही खोलेबाईंची तक्रार लिहून घेतली! पारदर्शकतेचं स्फटिक रूप मा. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रीपदासह राज्याचे गृहमंत्रीही आहेत! बारा कोटी महाराष्ट्राच्या जनतेला तत्परता आणि दिरंगाईचं अजब अद्वैत सरकारनं दाखवलं.

या घटना घडायच्या आधी लोकप्रिय हास्य अभिनेते (खरं तर ते उत्तम अभिनेते आहेत, पण ‘हास्य’ हे बिरुद त्यांनी चिकटवून घेतलंय किंवा त्यांना चिकटवलंय.) भाऊ कदम यांनी आपल्या घरी गणपती बसवला म्हणून नवबौद्धांच्या एका गटानं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांची पायमल्ली केली म्हणून कदमांवर सामाजिक बहिष्कार टाका असा फतवा काढला. त्यानिमित्तानं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जगाला भाऊ कदम यांची ‘जात’ कळली. यातला विरोधाभास असा की, अस्पृश्यता कलंक मानून बौद्ध धर्माची (खरं तर धम्मीची) दीक्षा घेतलेल्या लोकांनीच आपल्या एका जातबंधूला बहिष्काराची शिक्षा दिली! म्हणजे बाबासाहेबांचा धम्म व २२ प्रतिज्ञा ही काय नवी ‘बौद्धस्मृती’ मानायची?

भाऊ कदमनं घरी गणपती कोणत्या कारणानं बसवला, त्यामागचं धार्मिक, मानसिक, सांस्कृतिक कारण स्वत: भाऊनं सांगितलंच नाही. त्यानं माफी मागितली एवढंच कळलं. बौद्ध होऊनही भाऊची किंवा त्याच्या परिवाराची हिंदू मानसिकता बदलली नसेल तर यात भाऊ कदम एकटा नाही. बाबासाहेब, बुद्ध आणि साईबाबा व गणपती भजणारे अनेक आहेत. जारणमारण, कोंबडं, बकरी कापणारे अनेक आहेत. २२ प्रतिज्ञेत मांस व मदिरासेवन निषिद्ध आहे. या एकाच प्रतिज्ञेवर ९० टक्के बौद्ध अपात्र होतील! या सगळ्यांवर कडी करणारे आणखी आहेत जे बुद्धाचा म्हणून ‘पांढरा बुधवार’ पाळतात. प्रेमानंद गज्वींचं अख्खं नाटक यावर आहे. तर अनेक बौद्ध बायांच्या अंगात चक्क बाबासाहेब येतात. जय २२ प्रतिज्ञा! जय संविधान!!

भाऊसारखे अनेक आहेत, जे द्विधार्मिक आहेत. यात विशेषत: आंतरजातीय, आंतरधर्मीय लग्न केलेली मंडळी आहेत. भाऊ ज्या क्षेज्ञात आहेत त्यात शाहरूख खान, सलमान खान (आई हिंदू), हृतिक रोशन (पहिली बायको मुस्लीम), रितेश देशमुख, याशिवाय गेल्या काही वर्षांत भक्ती बर्वे-इनामदारसारख्या शटल सर्व्हिसेस आता उत्तम रूळल्यात. आडनावावरून जात ओळखणारे आपले समाजबांधव आता या संकराला सरावले असले तरीही मराठी मालिकांच्या शूटिंग दरम्यान ‘पोळी की चपाती?’ यावरून भुवया उंचावून आजही मुद्राभिनय केला जातो.

त्यामुळे ‘संविधान की २२ प्रतिज्ञा?’ असा सवाल भाऊ कदमला करून चालणार नाही. चॅनलिय चर्चेत डिक्कीचे (दलित उद्योजकांची संघटना) मिलिंद कांबळे म्हणाले की, ‘कलावंताला जात-धर्म नसतो’. याचा अर्थ कांबळेंना शरद पोंक्षे नावाचा एक ‘जातिवंत’ अभिनेता आहे, हे माहीतच नसावं! हे राम!!

या सगळ्या गदारोळात आणखी एक बातमी येऊन धडकली. ती म्हणजे वैदिक ब्राह्मणांना अल्पसंख्याक दर्जा द्या! केंद्राकडे तसा प्रस्ताव आला आणि केंद्रानं तो राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाकडे विचारार्थ पाठवला! बोंबला आता. म्हणजे इतकी वर्षं आम्ही ज्यांना ‘साडेतीन टक्केवाले’, ‘साडेतीन टक्क्यांची संस्कृती’ संबोधत होतो, त्यांना गणितात शंभरात, साडेतीन म्हणजे अल्पसंख्य हे आता कळावं? या साडेतीन टक्क्यांनीच तर शतकानुशतकं अनभिषिक्तपणे राज्य केलं. आणि ही काही सरकारी आकडेवारी नाही तर सामाजिक इतिहास आहे.

मध्यंतरी मराठा मोर्चे निघाले आरक्षणासाठी, तेव्हा याच साडेतीन टक्क्यांसह इतरही त्यांना विचारत होते की, शिक्षणसंस्था, सहकार क्षेत्र कुणाच्या ताब्यात आहे? मग त्याच सुरात सूर मिसळवून असंही विचारता येईल – सर्व जुन्या शिक्षणसंस्था, साहित्यिक-सांस्कृतिक संघटना कुणाच्या ताब्यात होत्या?

७० वर्षांच्या लोकशाही प्रवासात शिक्षणासह सर्व खुलं झाल्यावर सर्वच क्षेत्रांत सर्वसमावेशकता आली आणि त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शिवाजीमहाराज, सावित्रीबाई पुले, गाडगेमहाराज, तुकडोजी महाराज अशी विद्यांपीठांची ओळख बदलल्यावर वैदिक ब्राह्मणांना अस्तित्वाची काळजी वाटू लागलीय? कारण त्यांना अल्पसंख्याक दर्जा हवाय तो शिक्षणसंस्था काढायला! म्हणजे ज्यांनी शिक्षणाचा अधिकार स्त्रियांसह सगळ्यांनाच नाकारला त्यांना एक व्यक्ती, एक मत, समता, स्वातंत्र्य, बंधुता या विचारावर घडवलेल्या संविधानानुसार चालणाऱ्या राज्यव्यवस्थेसमोर नाक घासत ‘आम्हाला शिक्षणसंस्था काढण्यासाठी विशेष मदत करा’ असं सांगावं लागावं, हा काव्यगत न्यायच म्हणावा लागेल!

एकीकडे ‘अल्पसंख्याक दर्जा द्या’ म्हणणाऱ्या याच समूहातील, परिवारातील हिंदू जन जागृती संस्थेनं पर्यावरणाच्या नावाखाली धार्मिक कार्यात हस्तक्षेप करणाऱ्या विद्यापीठीय विद्यार्थ्यांना तसं करू देऊ नये आणि पर्यावरणापेक्षा धर्मरक्षण करावं असा फतवा राज्य शिक्षण अधिकाऱ्यानं काढला व पुणे विद्यापीठानं तो जारीही केला!

खोलेबाईंचा जैविक भाऊ शोभावा अशा कुणा नारखेडे नावाच्या तेजस्वी पुरुषाचं हे कृत्य आहे. हा खोलेबाईंपेक्षा धीट! कारण पुरुष!! त्यानं सरकारी आदेशाच्या समर्थनार्थ त्या आदेशासोबत हिंदू जनजागरण समितीचं छापील पत्रकच जोडलंय. संविधानिक पदावर बसून असली खऱ्या अर्थानं ‘देशद्रोही’ कृत्यं करणाऱ्या या अधिकाऱ्यास सेवेतून तात्काळ निलंबित करण्याऐवजी शिक्षणमंत्री, त्या नारखेड्याकडून स्पष्टीकरण कसलं मागवतात?

खोलेबाईंसारखीच सडकी मनोवृत्ती असणारा हा इसम शासकीय सेवेत राहायलाच अपात्र आहे. त्याला निलंबित करून गुन्हा दाखल करून तुरुंगात पाठवायला हवा. पण तावडे आता विरोधी पक्षात नाहीत आणि मंत्रिमंडळात आहेत आणि त्यांचा पक्ष हिंदू पण गर्वानं जाणारा आहे.

जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात. त्याप्रमाणेच सनातनीपणा हा काही लोकांच्या सोबतच दहन अथवा दफन होतो. शेकडो वर्षांची ही लढाई कणाकणानं पुढे जात असताना नव्या राजकीय वातावरणात ही भूतं चोरपावलांनी समाजात शिरताहेत. या फटी बुजवण्याचं काम हीच खोलेंना चपराक व गौरीला आदरांजली!

.............................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Dr.salil A

Thu , 26 October 2017

3.5 टक्के वाल्यांच्या हातात सत्ता होती तेव्हा घोटाळे आणि भ्रष्टाचार नव्हता देशात. सोने कि चिडिया म्हटले जायचे आपल्या देशास. व पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावले होते जे नंतर कोणासही जमले नाही. तसेच स्वातंत्र्यचळवळीतही महत्वाचे योगदान होते ३.५ टक्केवाल्यांचे. त्यावेळी इतर काही नेते देशाचा विचार न करता फक्त स्वत:च्या जातिच्या/धर्माच्या फायद्यासाठी ब्रिटीशांची बोलणी करत होते, राखीव मतदारसंघ , आरक्षण वगैरे मिळतो काय ते पाहत होते, असे शाळेत पुस्तकात वाचल्यासारखे वाटते. तर सांगायचा मुद्दा हा की ३.५% वाल्यांच्या हातून सत्ता गेल्यावर देशाची जी अवस्था झालीय ती आपण रोज अनुभवतो ट्रेनमध्ये, रस्तयावर (की खड्डयांमध्ये) . त्यामुळे उगाच जातीद्वेषातून ३.५%वाल्यांवर टिका करून आपल्या सडक्या मनोवृत्तीचे प्रदर्शन करू नका. न्यूनगंड असेल तर डाॅक्टरकडे जाऊन उपचार करून घ्या. दुसर्याला कमी लेखून , दुःस्वास आपण मोठे होत नसतो. By the way, भाऊ कदमच्या प्रसंगातून खरे जातियवादी कोण आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला कळले आहेच, त्यामुळे इच्छा असल्यास reverse casteism च्या फटी बुजवायचा प्रयत्न पण करा.


Ankit Deshmukh

Thu , 14 September 2017

Very thoughtful and effective article. My best wishes are always with aksharnama.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......