दत्ता मेघे... राजकारणातला सहृदयी माणूस!
संकीर्ण - श्रद्धांजली
प्रवीण बर्दापूरकर
  • दत्ता मेघे
  • Sat , 04 April 2026
  • संकीर्ण श्रद्धांजली दत्ता मेघे Datta Meghe

महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ राजकारणी दत्ता मेघे गेल्या आठवड्यात एका सायंकाळी शांतपणे मृत्यूच्या स्वाधीन झाले. वय झालं होतं आणि (राज्यपालपद वगळता) आयुष्यात जे काही करायचं होतं-नव्हतं ते सगळं करून झालेलं होतं. ते कोणत्या पक्षाचे होते, याला काही अर्थ नाही. कारण माणूस म्हणून ते सहृदयी होते. राजकारणात राहूनही त्यांनी सहृदयीपणा निगुतीनं शेवटचा श्वास घेईपर्यंत जपला, हेच महत्त्वाचं  आहे. राजकारणात अशा पद्धतीनं जगणारी माणसं फार थोडी असतात, म्हणूनच ती कायम स्मरणात राहतात.

दत्ता मेघे यांची ओळख मुंबईत १९७९ साली झाली, ते राज्यमंत्री असताना. राजकारणात आणि त्यातही सत्तेच्या दालनात मेघे तेव्हा नवखे होते; माझ्याही पत्रकारितेची ती जेमतेम सुरुवात होती.  राजकारणात असूनही हा माणूस पुरेसा बेरकी आणि बनेल नाही, हे पहिल्याच भेटीत लक्षात आलं. तेव्हा मी चिपळूणला ‘सागर’ या दैनिकात होतो आणि नजीकच्या भविष्यकाळात नागपूरला ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकात रुजू होणार होतो, हे मी सांगितलं, तेव्हा ते म्हणाले, ‘नागपूरला आलात की, फोन करा. काही गरज लागली, तर नक्की मदत करेन.’ 

तेव्हा झालेली ही ओळख पुढे चांगल्या मैत्रीत रूपांतरित झाली. सगळं जग त्यांना ‘दत्ताभाऊ’ म्हणून ओळखायचं, मीही मग त्यांना तसंच म्हणून ओळखू लागलो. त्यांना आमदार, खासदार, मंत्री असताना आणि नसतानाही पाहिलं; नुसतं पाहिलं नाही तर जवळून अनुभवलंही. ते कोणत्या पदावर आहेत किंवा नाहीत. त्यामुळे कोणताही फरक पडलेला नसायचा. दत्ताभाऊ जसे होते तसेच वागायचे. खामल्यातील त्यांच्या घरच्या दरबारातील गर्दीला कधी ओहोटी लागल्याचं स्मरत नाही.

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

.................................................................................................................................................................

राष्ट्रीय पातळीवरच्या सर्वपक्षीय नेत्यांपासून ते नागपूरच्या गल्लीतल्या पंटर पुढाऱ्यापर्यंत कुणीही त्यांच्याकडे भेटणं शक्य असायचं. पुढे त्या घराचा खूप मोठा विस्तार झाला, घर अवाढव्य झालं. पण म्हणून दत्ताभाऊ आणि त्यांच्या घरातले अन्य सदस्य बदलले नाहीत. त्यांच्याही आगत-स्वागतात व्यापक बदल होत गेलं. पूर्वीच्या घरी पहिल्या मजल्यावर एका खोलीत आमच्या मंतरलेल्या सोनेरी पाण्यासोबतच्या बैठका होत असत. पुढे त्या त्यांच्या विस्तारित घरात एका छोट्या टॅंकच्या शेजारी सुरू झाल्या, एवढाच काय तो बदल.

दत्ताभाऊंचा स्वभाव दिवसाचे २४ तास राजकारण करावं, असा मुळीच नव्हता. दिवसभर राजकारण झालं की, संध्याकाळी शुचिर्भूत होऊन चार मित्र जमवावे आणि जगण्याचा रसिकपणे आस्वाद घ्यावा असा त्यांचा रिवाज होता. तो त्यांनी एखादा वसा पाळावा तसा पाळला. त्यात अनेकांना सहभागी करून घेतलं.

दत्ताभाऊ राजकारणात राहूनही बेरके आणि बनेल नव्हते, हे खरं असलं तरी, धोरणी मात्र नक्की होते. ते आधी काँग्रेसमध्ये होते, तेव्हा त्यांची निष्ठा शरद पवार यांच्यावर होती. पुढे ते राष्ट्रवादीत गेले, तरी त्यांची निष्ठा पवार यांच्यावरच कायम राहिली. नंतर पवारांनी त्यांना दूर सारल्यावरही (त्याचीही एक हकीकत आहे!) ही निष्ठा मुळीच पातळ कशी झाली नाही, हे चांगलं ठाऊक असणाऱ्या मोजक्या लोकांपैकी मी एक आहे.

नागपूर, मुंबई, अकोला, दिल्ली, जबलपूर, भोपाळ अशा अनेक ठिकाणी दत्ताभाऊंसोबत मी प्रवास केला. हा प्रवास काही अर्थातच मुक्यानं होत नव्हता, तर साहजिकच भरपूर गप्पा होत. लहानपणची गरिबी जशी ते आवर्जून सांगत, तशी त्यांची पवारांवरील निष्ठाही सांगत. ‘एक वेळेस साहेब मला सोडतील, पण मी त्यांना सोडणार नाही’, असं त्यांनी अनेकदा म्हटल्याचं स्मरतं. घडलं तसंच. पवारांनी त्यांना दूर सारलं, पण दत्ताभाऊंच्या मनात पवारांविषयी भक्तीभाव ओतप्रोत भरलेला होता. २०२१४नंतर ते भाजपमध्ये गेले, मात्र मनानं ते पवारांचेच भक्त राहिले. नंतर त्यांच्या मनात नितीन गडकरी, अटलबहादूर सिंग आणि गिरीश गांधी यांना अपरंपार जागा होती. पुढे त्यांचा विश्वास गडकरींवर जास्त जडला. अर्थात याचा अर्थ त्यांच्या मनात अटलबहादूर सिंग आणि गिरीश गांधी यांचं महत्त्व कमी झालं, असं मुळीच नाही.

दत्ताभाऊंनी विदर्भात आणि त्यातही नागपूर तसंच वर्धा जिल्ह्यात शिक्षण संस्थांचं जाळं विणलं. शिक्षण संस्था कसल्या, तो शिक्षणाचा केलेला अतिशय दर्जेदार व्यवसाय होता. त्यांच्या कामाचा हा विस्तार केवळ शिक्षण संस्थांपुरता मर्यादित नव्हता, तर सहकारी बँक, सूतगिरणी अन्य उद्योग या क्षेत्रांतही तो पसरलेला होता. इतक्या मोठ्या साम्राज्याचे धनी असूनही त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची घमेंड नव्हती.  मुंबई असो का दिल्ली, नागपूर, वर्धा... आलेल्या प्रत्येकाशी चार शब्द बोलणं  आणि त्याची जी काही समस्या असेल, तर ती सोडवणं, हा दत्ताभाऊंचा ‘डीएनए’ होता.

आपल्याला फार उच्चशिक्षण घेता आलं नाही, पण उच्चशिक्षणाची संधी समाजातल्या प्रत्येकाला मिळावी, अशी सदिच्छा दत्ताभाऊंच्या मनात कायम दरवळत असे. त्यांनी किती लोकांना मदत केली आणि त्याची वाच्यता कशी केली नाही, याचा एक साक्षीदार मीही आहे. ‘अमुक एक माणूस गरजू आहे. त्याला तुमच्याकडे पाठवतो आहे’ असं दत्ताभाऊंना सांगितलं की, मग ते प्रवेशाचं काम असो की, आर्थिक सहाय्य त्यांनी कोणाही गरजू माणसाला रिकाम्या हातानं परत पाठवलं नाही.

एक प्रसंग सांगायला हवा ‘लोकसत्ता’ची नागपुरातून प्रकाशित होणारी विदर्भ आवृत्ती सुरू झाली, तेव्हा बारावीच्या परीक्षेचे निकाल देताना गुणवंत विद्यार्थ्यांची भाराभर छायाचित्रं छापण्याची प्रथा होती. तसं न करता काही गरजू मुलांच्या मुलाखती प्रकाशित कराव्या आणि केवळ पहिल्या पाच गुणवंतांची मनोगतं प्रकाशित करावी, असं मी ठरवलं. पहिल्या वर्षी त्यातील काही मुलांनी मनोगत व्यक्त करताना भावी शिक्षणात येणाऱ्या संभाव्य आर्थिक अडचणींविषयी सूतोवाच केलेलं होतं. ते वाचल्यावर दत्ताभाऊंनी मला फोन केला आणि ‘यापैकी पाच खरेखुरे गरजू विद्यार्थी निवडा आणि त्यांना माझ्याकडे पाठवा. त्यांना हव्या त्या अभ्यासक्रमासाठी मोफत प्रवेश देतो’ अशी ऑफर दिली. एवढंच नाही तर ती पाळलीही.

पुढे तीन-चार वर्षानंतर ते काम करायचा मला कंटाळा आला आणि ती योजना बंद पडली. या गरजू मुलांना वैद्यक, फार्मसी, अभियांत्रिकी अशा विविध शाखांत दत्ताभाऊंनी एक पैसा न घेता प्रवेश दिले आणि त्यांचे शिक्षण पूर्ण होईल हे बघितलं. त्याआधीही अशी गरजू मुलं-मुली दत्ताभाऊंकडे मी पाठवत होतोच. धनाअभावी शिक्षण न घेऊ शकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी जी कळकळ त्यांनी सातत्यानं दाखवली, त्यासाठी प्रशंसनीय हा शब्द थिटा आहे.

बरं, अशी मदत दत्ताभाऊ काही एकदोघांसाठी करत होते अशातला भाग नाही. दारी आलेल्या प्रत्येकासाठी मग तो ओळखीचा असो अथवा नसो, त्यानं कुणाचा संदर्भ आणलेला असो अथवा नसो, त्यांनी त्यांचा हात कधी आखडता घेतला नाही. दात्याचा तो हात गरजूंना कायम देत राहिला, तरी त्यांनी मात्र या केलेल्या मदतीचा कधीच कुणाकडेही उच्चार केला नाही.

संस्था उभारताना दत्ताभाऊंनी कोणती कंजुषी दाखवल्याचं किंवा जात, धर्म आड आणल्याचं कधी घडलं नाही. त्यांच्या शिक्षणसंस्थांत सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नोकरी करत राहिले. विद्यार्थ्यांबाबतही त्यांचा दृष्टीकोन असाच होता. संस्थेच्या उभारणीमध्ये ‘जे जे उत्तम असेल ते ते’ आपल्या संस्थेत असलं पाहिजे, असा त्यांचा कायमच कटाक्ष राहिला. त्यासाठी खर्च किती होतो आहे आणि तो आवश्यकतेपेक्षा जास्त आहे का, याचा विचार कधी त्यांनी केल्याचं कधीच दिसलं नाही. त्यामुळे अगदी अलीकडच्या दहा-पंधरा वर्षांच्या आधीपर्यंत दत्ताभाऊ सर्वार्थानं ‘सधन’ या वर्गात नव्हते. जे काही धन संस्थेतून मिळत होतं, त्या व्यतिरिक्त कर्ज काढून त्यांनी उत्तम दर्जाच्या संस्थांची उभारणी केली. त्यामुळे त्यांची संस्था म्हणजे उच्च दर्जा हे समीकरण आपोआपच तयार झालं.

या संदर्भात एक अनुभव आवर्जून सांगावा असा आहे. शिक्षणसंस्था उभारण्याच्या काळात दत्ताभाऊ राजकारणात सक्रिय होते. ही घटना घडली, तेव्हा ते राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते आणि मी ‘लोकसत्ता’च्या औरंगाबाद ब्युरोला होतो.  बँक कर्मचाऱ्यांचा नेता असलेला देवीदास तुळजापूरकर हा माझा जुना मित्र. त्यानं एक दिवस महाराष्ट्रातल्या कोणत्या राजकारण्याकडे राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्जाची किती थकबाकी आहे, याची यादी मला दिली. त्यात विदर्भातील दत्ता मेघे आणि श्रीकांत जिचकार अशी दोन नावं माझ्या ओळखीची होती. बातमी अर्थातच खळबळजनक होती. ती दिल्यावर जी काय चर्चा व्हायची ती झाली. दोनेक दिवसांनी दत्ताभाऊंचा फोन आला. त्यांनी सांगितलं की, ‘तुम्ही म्हणता ती थकबाकी आता माझ्यावर नाही. गेल्याच आठवड्यात ती सर्व थकबाकी मी भरून टाकली. त्यासाठी मी वेगळं कर्ज काढलं, पण हा काही तुम्हाला सांगायचा मुद्दा नाही.’ सांगायचं तात्पर्य असं की, सरकारमध्ये राहून सरकारचे पैसे बुडवावे असा दृष्टीकोन दत्ताभाऊंमध्ये कधीच आढळला नाही. अर्थात सवलतीच्या दरात शैक्षणिक संस्थांसाठी त्यांनी सरकारकडून जमिनी धोरणीपणानं मिळवल्या हेही तेवढंच खरं.

पावणे सहा फूट उंची, शिडशिडीत शरीरयष्टी, गर्द सावळा रंग, तरतरीत नाक आणि हिवाळा वगळता पांढरे स्वच्छ कपडे, असं दत्ताभाऊंचं व्यक्तिमत्त्व होतं. त्यांचा स्वभाव तसा मृदू होता. फार काही कुणावर चिडावं कुणाला अद्वातद्वा बोलावं किंवा कुणाचा अपमान करावा, अशी त्यांची वृत्ती नव्हती. फारच चिडले तर समोरच्याला ‘तू आता इथून जा बाबा’ असं ते सौम्य स्वरात सांगत.

त्यांचा एक स्वीय सहाय्यक होता. त्याचं नाव सोडून द्या, पण तो बरीच वर्ष दत्ताभाऊंसोबत होता. दत्ताभाऊ त्याच्यावर प्रचंड विसंबून असत. त्यांच्या त्या विसंबून राहण्याचा त्यानं बऱ्यापैकी गैरफायदा घेतला, हे लक्षात येऊनही ते कधी कठोर झाले नाहीत. त्याच्या गैरफायद्याबद्दलच्या दोन-तीन कथा त्यांनी शेअर केल्या होत्या. पुढे मात्र तो सहाय्यक हाताबाहेर सुटला; त्याला आमदार होण्याची स्वप्नं पडू लागली. दत्ताभाऊंनी जेव्हा त्यांचा थोरला मुलगा सागरला विधानपरिषदेवर पाठवायचं ठरवलं, तेव्हा तो सहाय्यक फारच चिडला. त्याला त्या जागी जायचं होतं. त्यावरून त्याने दत्ताभाऊंशी बराच वादही घातला, अखेर त्यांनी त्याला अलगद बाजूला काढलं आणि प्रकरण संपवलं.

एक फारच वैयक्तिक अनुभव सांगितल्याशिवाय राहवत नाही. आमच्या कन्येला दत्ताभाऊंशी संबंधित शिक्षण संस्थेत एमबीएसाठी प्रवेश हवा होता. त्यासाठी आम्ही शैक्षणिक कर्ज काढलं आणि फी भरली. दोनेक दिवसांनी सागर मेघेचा फोन आला. त्यानं विचारलं, ‘काका, सायली तुमचीच मुलगी ना?’

मी ‘हो’ म्हणून सांगितल्यावर तो म्हणाला, ‘तिची फी तुम्ही मुळीच भरायला नको होती. मी ते पैसे परत पाठवतो. उद्या हे जर बाबांना कळलं, तर ते मला खूप रागावतील.’ 

सागरला मी म्हणालो, ‘माझ्या शब्दाखातर इतर अनेकांना दत्ताभाऊंनी भरपूर मदत केली आहे, अजूनही करतात. मला माझ्या कन्येची फी भरण्यासाठी कर्ज काढावं लागलं, तरी ते फेडण्याची क्षमता माझ्यात आहे. बाबा तुला रागवणार नाहीत याची खात्री मी देतो आणि त्यासाठी लगेच येऊन त्यांच्याशी बोलतो.’

त्याप्रमाणे मी गेलो आणि भाऊंना काय घडलं ते सांगितलं. मी शुल्क भरणं भाऊंना काही आवडलं नाही. त्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, पण त्याचबरोबर माझ्या भूमिकेचंही स्वागत केलं.

२०१२मध्ये मी नागपूर सोडलं आणि दिल्लीला गेलो, तेव्हा दत्ताभाऊ लोकसभेचे सदस्य होते. दिल्लीतही आमच्या भरपूर भेटी होत असत. संध्याकाळच्या मैफली रंगत असत. त्या आठवणी खूप आहेत. २०१५मध्ये परत आल्यावर मी नागपूरही सोडायचं सोडून, तेव्हाच्या औरंगाबादला (आता छत्रपती संभाजीनगर) स्थायिक व्हायचं ठरवलं. हे सांगायला दत्ताभाऊंकडे गेलो. माझी नागपूर सोडण्याची कल्पना त्यांना मुळीच रुचली नाही. तेव्हा मी त्यांना सांगितलं की, औरंगाबादला माझं घर आहे. त्यावर ते म्हणाले, ‘ ते घर विका. नागपूरला या. इथे मी तुम्हाला एक घर घेऊन देतो. पाच-दहा एकर शेतीही घेऊन देतो. ती करा आणि आमचे सल्लागार म्हणून इथेच रहा. या शहराला आणि मलाही तुमची गरज आहे.’

दत्ताभाऊंची माणसं जोडून ठेवण्याची शैली ही अशी होती. त्यांनी अशी अनेक माणसं वेगवेगळ्या निमित्तानं त्यांच्या संस्थेसोबत जोडून ठेवलेली होती. ती यादी बरीच मोठी मोठी आहे. त्यांच्या कामाची शैली ‘सॉफ्ट’ म्हणता येईल अशा पद्धतीची आणि सकारात्मक होती. कुणाचंही काम करायचं ठरवल्यावर ज्या माणसाकडे त्याला पाठवायचं, त्याला आधी फोन करायचा आणि कोण माणूस पाठवतो आहे, तसंच त्याचं काम काय आहे, याची कल्पना देण्याची त्यांची पद्धत होती.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

औरंगाबादला स्थायिक झाल्यावर माझ्या एका नातेवाईकाला त्यांच्या संस्थेत नोकरी हवी होती. त्यासाठी मी दत्ताभाऊंना फोन केला. त्यांनी सांगितलं, ‘आता संस्थेच्या कामातून मी जवळजवळ निवृत्त झालो आहे. सागर सगळं बघतो. तुम्ही दहा मिनिटांनी सागरला फोन करा, तोपर्यंत मी त्याला तुमचा फोन येणार आहे आणि काय काम आहे ते सांगून ठेवतो.’ सागरला फोन केला, तोपर्यंत दत्ताभाऊंचा फोन सागरला गेलेला होता. लवकरच जागा निघणार आहेत आणि त्याची जाहिरात येणार आहे, याची माहिती सागरनं लगेच दिली आणि अर्ज पाठवल्यावर आपण बोलू असं आश्वस्त केलं. माझ्या त्या आप्ताला पुढे दिल्लीत नोकरी मिळाल्यामुळे दत्ताभाऊंच्या शिक्षण संस्थेत जाण्याची वेळच आली नाही, हा भाग वेगळा, पण त्यांची कामाची शैली ही अशी होती.

१९७९ साली आमची ओळख झाली, मग घसट वाढली आणि २०१५ हळूहळू आमच्यातला संपर्क कमी कमी होत गेला. पत्रकारितेच्या साडेचार दशकांच्या काळात दत्ताभाऊंसारखा सहृदयी राजकारणी अपवादानंच पाहण्यात आला. आणखी एक म्हणजे, पाय जमिनीवर ठेवून लोकांशी वागणं, हाही त्यांचा दुर्मीळ गुण होता. अशी माणसं राजकारणात फार अपवादानं पाहायला मिळतात. दत्ताभाऊ त्यापैकी एक होते.

माणसं काळाच्या पडद्याआड  जातात... उरतात त्या त्यांच्या आठवणी. दत्ताभाऊ गेले, पण त्यांच्या असंख्य आठवणी माझ्या मनात आहेत. त्यांच्याविषयी खूप लिहिता येईल, पण ते त्यांच्यातला सहृदयी माणूस कसा वैपुल्यानं व्यापक होता, हे सांगण्यासाठी अपुरं आहे.

दत्ता मेघे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २८ - कधी हे ‘नॅरेटिव्ह’, तर कधी ते ‘नॅरेटिव्ह’ असं करत करत ११ वर्षं निघून गेली होती. आता पितळ हळूहळू उघडं पडू लागलं होतं…

भारतासारख्या विकसनशील देशाचा पंतप्रधान कितीसा समर्थ असणार होता? पण नाही! विश्वगुरू, अवतार, समर्थ राजकारणी, धुरंधर! जितकी विशेषणं भारताला, त्याच्या दुप्पट त्याच्या नेत्याला अशी अवस्था! हे सगळं नॅरेटिव्ह अत्यंत जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक सेट केलं गेलं होतं. एक छायाचित्र त्या काळी व्हायरल केलं गेलं होतं. मोदीजी एका खुर्चीवर बसले आहेत आणि समोरच्या टेबलावर हात ठेवून जगभरातल्या अनेक मोठ्या देशांचे प्रमुख ऐकत आहेत. .......

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......