आज २९ मे २१२६ रोजी शिरोजीच्या २९व्या बखरीचे संपादकीय लिहिताना भारताच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या वळणावर आपण समक्ष उभे आहोत आणि सारं नाट्य समजून घेत आहोत, असे विचार आमच्या मनात तरळत आहेत.
मे २०२६पर्यंत भारत आर्थिक अरिष्टाच्या उंबरठ्यावर येऊन उभा राहिला होता. भारताचा रुपया आणि शेअर बाजार कोसळू लागला होता. या बखरीची सुरुवात शिरोजीने विनोदानं केली आहे, परंतु शेवटी शेवटी शिरोजी येऊ घातलेल्या आर्थिक संकटाचं अत्यंत विदारक चित्र अत्यंत संयमानं उभं करतो. पडणारा रुपया आणि शेअर बाजार हे सगळे अत्यंत तत्परतेनं नाकारायच्या मनःस्थितीत भक्त मंडळी गेली. मोदीजी आहेत तोपर्यंत चिंता करण्याचं कारण नाही, असं सांगू लागली. पडत्या रुपयाकडे दुर्लक्ष करून भारत संपूर्ण जगामध्ये सगळ्यात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था कशी आहे, हे घसा ताणून ताणून सांगू लागली. परंतु गंमत अशी झाली की, भक्तांच्या या सगळ्या उत्साहावर स्वतः मोदी यांनीच पाणी ओतले. रुपया पडू नये म्हणून आपल्याला चार संयम बाळगायला पाहिजेत असं त्यांनी सांगितलं. पेट्रोल आणि डीझेल कमी वापरणं, किमान एक वर्षंतरी सोने खरेदी टाळणं, खाण्यात तेल कमी वापरण आणि परदेश-प्रवास कमी करणं; असे हे चार संयम होते.
मोदीजींच्या या भाषणामुळे विचार करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांच्या मनात प्रश्न उभा राहिला की, ‘खाण्यात तेल कमी वापरा’ असं जर भारताच्या पंतप्रधानांना सांगावे लागत असेल, तर हे कसले ‘अच्छे दिन’? भक्तांच्या मनात अर्थातच असे प्रश्न उभे राहण्याचा प्रश्न नव्हता. मनामध्ये कुठलाही प्रश्न उभा राहत असेल, तर तो ‘भक्त’ कसला? अध्यात्मामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘गुण’ असतो आणि राजकारणामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘दुर्गुण’ असतो.
हे सगळं घडत असतानाच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवून भाजप जिंकला. भक्त भयंकर खुश झाले. चला, भाजप निवडून येते आहे, म्हणजे सगळे आलबेल आहे! परंतु, भक्तांच्या अशा खुश होण्यामुळे रुपया पडण्याचा थांबणार नव्हता. फेब्रुवारी २०२६ते मे २०२६ या काळात भारताचा रुपया अमेरिकी डॉलरसमोर ९१वरून ९७पर्यंत कोसळत गेला.
फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेनं इराणवर आक्रमण केलं. त्यामुळे आखाती देशातून येणाऱ्या क्रूड तेलाची प्रवाह खंडित झाला होता. जगभर तेलाचे भाव वाढले होते. त्यामुळे आधीच प्रचंड वाढलेली भारताची आयात अजूनच वाढत गेली. या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताची निर्यात मात्र गेली आठ वर्षं पाहिजे त्या वेगानं वाढत नव्हती. या सगळ्याचा परिणाम म्हणून रुपया दणादण पडायला लागला होता.
रुपया का चढतो, का पडतो आणि त्याचे परिणाम काय होतात, हे मोदीकालीन भारतातील सामान्य लोकांना माहीत नव्हतं. खरं तर, अगदी आजच्या २१२६मधल्या सामान्य भारतीयालाही माहीत नाहिये म्हणा! खरं तर त्यात अवघड असं काहीच नसतं. आंतरराष्ट्रीय व्यापार अमेरिकेच्या डॉलरमध्ये होत असतो, कारण अमेरिकेच्या डॉलरच्या स्थिरतेवर सर्व देशांचा विश्वाच आहे. याचा अर्थ असा की, आपण डॉलर साठवून ठेवला की, त्याचा रेट भयंकर पडून आपलं नुकसान होईल असं जगातील बहुतेक देशांना वाटत नाही. भारतीय महिला ज्या कारणानं सोनं साठवतात साधारणपणे त्याच कारणासाठी सर्व देश डॉलरमध्ये व्यापार करून डॉलर साठवत असतात.
असो. तर सांगायची गोष्ट अशी की, डॉलर आणि रुपयाचा रेट कसा ठरतो, ही गोष्ट समजायला फार अवघड नाही. भारताच्या निर्यातदारांनी मालाची निर्यात केली की, बाहेरच्या देशातून डॉलर देशात येतात. हे डॉलर भारतात आले की, सरकार हे डॉलर आपल्याकडे ठेवून घेते आणि निर्यातदारांना डॉलरचा जो रेट असेल त्याप्रमाणे रुपये देते.
या उलट, आयात होते तेव्हा भारतीय आयातदार भारतीय बँकांमध्ये रुपये भरतात आणि जो रेट असेल त्याप्रमाणे ते रुपये डॉलरमध्ये बदलून परदेशात पाठवले जातात. थोडक्यात, रुपयाचा रेट प्रत्येक डॉलर मागे ९० रुपये असेल, तर एक डॉलरची निर्यात केल्यावर भारतीय निर्यातदाराला ९० रुपये मिळतात. आणि एक डॉलरची आयात केल्यावर भारतीय आयातदाराने ९० रुपये भरले की, १ डॉलर परदेशी पाठवला जातो. आता जेव्हा निर्यात वाढते, तेव्हा डॉलरची मागणी वाढते आणि रुपयाची मागणी कमी होते आणि अशी मागणी कमी झाली की, रुपया पडतो. जेव्हा निर्यात जास्त होते, तेव्हा रुपयाची मागणी वाढते, म्हणजे डॉलर कोसळू लागतो. थोडक्यात भारताची आयात वाढल्यामुळे आणि निर्यात न वाढल्यामुळे रुपया कोसळू लागला होता.
२०२६ सालच्या मे महिन्यापर्यंत मोदी सरकारला १२ वर्षे पूर्ण झाली होती. इतक्या वर्षांत भारताची निर्यात आयातीपेक्षा जास्त कशी वाढेल याकडे मोदीजींनी लक्ष देणं अर्थातच अपेक्षित होते. म्हणजे मग रुपया डॉलरपेक्षा ताकदवान झाला असता.
मोदी पंतप्रधान झाले तर अमेरिकेचे लोक रांगा लावून डॉलर विकतील आणि रुपया खरेदी करतील, असा प्रचार केला गेला होता. म्हणजे भारत आर्थिक अधिसत्ता होईल असा त्याचा अर्थ होत होता. भक्तांना तर भारत युरोप-अमेरिकेपेक्षा चकाचक झाला आहे, अशी स्वप्नं पडू लागली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मोदी जाहीरपणे सांगत होते की, पेट्रोल कमी वापरा, सोने खरेदी करू नका, तेल कमी खा आणि परदेशी कमी जा कारण आपल्याला देश वाचवायचा आहे.
पेट्रोल, डीझेल, सोने, खाद्यतेले या सर्व गोष्टी भारताला आयात करायला लागत होत्या. म्हणजे या आयातीमुळे डॉलर बाहेर जात होते. परदेशी प्रवास म्हणजेसुद्धा परदेशी जाऊन डॉलरमध्ये खर्च करणं. या सगळ्यामुळे रुपयावर प्रेशर येत होतं.
रुपया पडला तर पेट्रोल आणि डीझेल महाग होतात, पेट्रोल आणि डीझेल महागले की, मालाची वाहतूक महागते, याचा परिणाम म्हणून देशात महागाई वाढते, महागाईचा परिणाम म्हणून देशातील लोक माल कमी खरेदी करू लागतात, याचा परिणाम म्हणून भारतातील कंपन्यांच्या मालाची मागणीसुद्धा कमी होते, याचा परिणाम म्हणून कंपन्या कामगार कमी करतात, याचा परिणाम म्हणून बेरोजगारी वाढते, याचा परिणाम म्हणून जनतेकडचा पैसा कमी झाल्यामुळे लोक अजून कमी अजून कमी माल खरेदी करतात.
एक भयानक चक्र! या चक्रामध्ये जनता सापडली की, सरकारबद्दल असंतोष तयार होतो. थोडक्यात मोदीजी जेव्हा लोकांना संयम राखून देश वाचवायला सांगत होते, तेव्हा त्याचा खरा अर्थ, तुम्ही संयम राखा आणि माझी खुर्ची वाचवा असाच होता. देश काय बिचारा कुठल्याही अवघड परिस्थितीमधून तरून जातच असतो, गोत्यात येत असतात सत्तेवरचे लोक!
मोदीकालीन भारतातील हा कालखंड बघितला तर सगळे चांगलं चाललं आहे, असं फक्त अर्थमंत्री निर्मला सीतारामन, गोदी मीडिया आणि भक्त म्हणत होते. बाकी अर्थशास्त्री आणि डोळे उघडे ठेवून जगणारे लोक चिंतेत पडले होते.
आता काळ असा आला होता की, भारतीय अर्थव्यवस्थेबाबत चांगलं बोलणारा अर्थतज्ज्ञ शोधूनही सापडत नव्हता. सुरजीत भल्ला आणि गौतम चिकरमाने हे मोदी समर्थक अर्थतज्ज्ञ होते. अगदी पंचवीस सालापर्यंत हे लोक सगळे भारी चालले आहे असं सांगत होते. आता हेच दोघं फिरले आणि भारताची अर्थव्यवस्था संकटात आहे असं सांगू लागले. पंतप्रधान मोदी यांचे आर्थिक सल्लागार म्हणून काम केलेले अरविंद पनगारिया आणि अरविंद सुब्रमण्यम हेदेखील प्रॉब्लेम आहे असे सांगू लागले. मोदी सरकारचे फायनान्स सेक्रटरी म्हणून काम केलेले सुभाष गर्ग, तर ‘इंडियन इकॉनॉमी इज फॉलिंग अपार्ट’ असे म्हणू लागले.
गीता गोपीनाथ, अजित रानडे, स्वामिनाथन अय्यर, प्रांजुल भंडारी आणि डी. के. श्रीवास्तव हे सगळे राजकीयदृष्ट्या तटस्थ अर्थतज्ज्ञ! या लोकांनीही चिंता व्यक्त करायला सुरुवात केली. इंगो पिटर्ल आणि शंतनू मुखर्जी हे अमेरिकेच्या अर्थविभागातले अर्थतज्ज्ञ. त्यांना भारताच्या राजकारणाशी काही घेणं-देणं असणार? ते ही म्हणू लागले की, भारताची अवस्था अवघड झाली आहे. डाव्या बाजूचे अर्थतज्ज्ञ अरुण कुमार, विजय सारदाना आणि संतोष मेहरोत्रा गेली कित्येक वर्षं म्हणत होते की, भारतात आर्थिक वादळ येणार आहे. रघुराम राजन २०१६पासून सांगत होते की, भारतात पाहिजे तशी गुंतवणूक होत नाहिये. परकीय गुंतवणुकीची तर गोष्टच सोडा, भारतीय उद्योगपतीसुद्धा भारतात गुंतवणूक करत नाहियेत. २०२६चा एप्रिल-मे येतायेता सर्व प्रकारचे आणि सर्व रंगांचे अर्थतज्ज्ञ म्हणायला लागले की, भारताची आर्थिक गोची झाली आहे.
मोदींनी स्वतःच आवाहन केलं म्हणजे सगळं आलबेल आहे असं कसं म्हणायचं, हा प्रश्न त्यांच्या समर्थक अर्थतज्ज्ञांना पडला. तरीही मोदींना त्यातल्या त्यात सपोर्ट करायचा म्हणून अरविंद पनगारिया आणि गौतम चिकरमाने म्हणू लागले की, इतपत प्रॉब्लेम सगळ्याच देशांना येत असतात, पण भारताची ‘लाँग टर्म स्टोरी इन्टॅक्ट’ आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वतःचे अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्धी पावलेले एस गुरुमूर्ती म्हणून एक गृहस्थ होते. हे मूळचे चार्टर्ड अकाउन्टंट. अकाउंटिंग येतं म्हणून यांना अर्थशास्त्रसुद्धा समजतं, असा समज मोदीकालीन भारतात पसरला होता. त्यामुळे मोदीजींनी त्यांना भारताच्या रिझर्व्ह बँकेवर ‘इंडिपेंडन्ट डायरेक्टर’ म्हणून नेमलं होतं. हे गृहस्थसुद्धा ‘आज प्रॉब्लेम आहे’ असं म्हणू लागले होते. अर्थात हा प्रॉब्लेम तात्पुरता आहे असं त्यांचं म्हणणं होतं, पण अजिबात प्रॉब्लेम नाहिये आणि ‘सब चंगासी’ असं तेसुद्धा म्हणत नव्हते. सगळे स्वदेशी करा, सगळ्या गोष्टींमध्ये भारताला आत्मनिर्भर करा म्हणजे हा प्रॉब्लेम सुटेल, असं त्यांचं म्हणणं होतं.
थोडक्यात, भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये ‘परफेक्ट स्टॉर्म’ घोंगावू लागलं होतं. मागणी कमी होत होती, निर्यात वाढत नव्हती, परदेशातून आणि देशातून होणारी गुंतवणूक वाढत नव्हती, आयात कमी होत नव्हते, महागाई वाढत होती, बेरोजगारी वाढत होती आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून रुपया पडत होता.
या सगळ्या पार्श्वभूमीवर शिरोजीने आपली २९वी बखर लिहिली. आज २१व्या शतकातील आमच्या वाचकांना प्रश्न पडला असेल की, आम्ही केवळ संपादक असून आम्हाला मोदीकालीन भारतातील आर्थिक परिस्थितीविषयी इतकी सूक्ष्म माहिती कशी? आम्हाला मोदीकालीन भारतातील बहुतेक महत्त्वाचे अर्थतज्ज्ञ आणि त्यांच्या मतांबद्दल इतकी सूक्ष्म माहिती कशी? उत्तर अगदी सोपं आहे. आम्ही ही माहिती साक्षात शिरोजीच्या रोजनिशीमधून संकलित केलेली आहे. शिरोजी आपली रोजनिशी अगदी कसून लिहीत असे. त्याची रोजनिशी स्वतःविषयी नसे. भारतातल्या घटना आणि त्याबद्दलची त्याची मतं असा हा सगळा इंटलेक्च्युअल ऐवज आहे. शिरोजीच्या बखरीला आज इतिहास म्हणून मान्यता मिळाली आहेच, आता त्याच्या रोजनिशीला मोदीकालीन भारतातील इतिहासाचं एक मुख्य साधन म्हणून प्रतिष्ठा मिळायला हवी आहे. असो. लेखनसीमा!
आम्ही अत्यंत नम्रपणे ही बखर वाचकांना अर्पण करत आहोत!
- श्रीमान जोशी, संपादक, ‘शिरोजीची बखर’
.................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................
पांडेजींना आज तीन महिन्यांमध्ये स्वतःच्या कार्डावरचा हक्काचा असा दुसरा कमर्शिअल सिलिंडर मिळाला होता. तब्बल हजार रुपये किंमत वाढली होती त्याची. दोन हजाराचा सिलिंडर तीन हजारांजवळ गेला होता. एलपीजीच्या शॉर्टेजमुळे काळ्या बाजारामध्ये हाच सिलिंडर आठ हजारांना मिळत होता. ज्यांना परवडत असेल त्यांनी करावा धंदा! स्वतःचा हक्काचा सिलिंडर आला म्हणून पांडेजींनाही राहवलं नाही. त्यांनी भज्यांचा बेत केला आणि सगळ्यांना फोन केले. थोड्याच वेळात सगळे आले. अविनाश, नाना आणि अच्युत बरोबर तारामती गोखले नावाची एक भक्तही आली. (शिरोजीने निर्माण केलेलं हे पहिले स्त्री पात्र - संपादक)
अविनाश - (प्रत्येकाला दोन दोन पेढे वाटत) एक पेढा मोदीजींच्या पश्चिम बंगालमधील घनघोर विजयाचा आणि दुसरा ममता दीदी पडल्याचा!
राघव - (पेढे घेत) तुला झालेला आनंद समजू शकतो मी अविनाश, पण पेढे किती महाग झाले आहेत. नऊशे रुपये किलो!
तारा - मी एक बोलू का? म्हणजे तुमची हरकत नसेल तर!
राघव - बोला की.
तारा - हा मोदीजींचा भारत आहे. इथे पहिले पैसे लोकांकडे येतात आणि मग महागाई होते.
अविनाश - क्या बात हैं तारा! (नानाही गालातल्या गालात हसतात)
(शब्दांची काहीतरी चमकदार मांडणी करणं म्हणजेच ग्रेट विचार, असा भ्रम मोदीकालीन भक्तांमध्ये विद्यमान होता. मग त्या चमकदार मांडणीच्या मागे काही अर्थ नसला तरी कुणाला त्याचं काही वाटायचं नाही. चमक पाहिजे मग विचार नसला तरी चालेल असा सगळा मामला होता. - संपादक)
अविनाश - महागाई होओ, काहीही होओ, आयेगा तो मोदीही!
भास्कर - एक मिनिट, तारा मॅडम काय बोलल्या ते कळलं का रे अविनाश तुला?
अविनाश - होऽ! मोदीजींच्या भारतात आधी पैसे तयार होतात आणि मग महागाई होते.
भास्कर - म्हणजे काय?
राघव - आधी पैसे तयार होतात आणि मग महागाई होते म्हणजे नक्की काय होते?
तारा - आधी पगार वाढतात आणि मग महागाई वाढते!
राघव - महागाई वाढली नसेल, तर पगार कशाला वाढतील?
समर - पगार पुरेनासे झाले तरच पगार वाढणार ना?
अविनाश - ए तू गप रे! तारा चार्टर्ड अकाऊंटंट आहे. त्यामुळे तिला अर्थशास्त्र कळतं!
राघव - चार्टर्ड अकाऊंटंटला अर्थशास्त्र कळते, हा भ्रम भारत देशातून कधी जाणार आहे देव जाणे!
भास्कर – अरे, चार्टर्ड अकाऊंटंटला अकाऊंटस कळतील, अर्थशास्त्र कसं कळेल?
तारा - अकाऊंटिंग आणि अर्थशास्त्र एकच असतं मोस्टली!
राघव - मग चार्टर्ड अकाऊंटंटला ‘अर्थतज्ज्ञ’च का नाही म्हणत?
अविनाश - तारा आज पहिल्यांदा आली आहे. नीट बोल तिच्याशी!
राघव - मला एवढंच म्हणायचंय की, अकाऊंटिंग आणि अथशास्त्र एक कसं असेल?
तारा - तुम्ही चार्टर्ड अकाऊंटंट व्हा, मग कळेल तुम्हाला.
अविनाश - व्हॉट अ शॉट तारा! (तारा गालातल्या गालात हसते.)
(काहीतरी आचरट अर्ग्युमेंट करायचे आणि आर्ग्युमेंट जिंकले असं म्हणायचं, अशी पद्धत भक्त लोकांमध्ये होती. खरं तर, अकाऊंटिंग आणि अर्थशास्त्र यांचं नातं काय हे ताराला सांगता येत नव्हतं. कसे येणार? त्या दोन गोष्टी मुळातच वेगळ्या होत्या. काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं! - संपादक)
नाना – अहो, आपले रिझर्व्ह बँकेचे डायरेक्टर आहेत एस. गुरूमूर्ती म्हणून. ते चार्टर्ड अकाऊंटंटच आहेत. त्यांना अर्थतज्ज्ञ म्हणून नाही का नेमलं मोदीजींनी?
भास्कर - असले लोक भरलेत सगळीकडं म्हणूनच रुपया पडतो आहे रोज. (या शॉट वर समर, राघव आणि पांडेजी असे सगळे हसतात)
अविनाश - यू शट अप!
राघव - हा आरोप मात्र खूप लोक करतायत. मोदीजी चांगल्या लोकांना टिकू नाही देत. माणूस जरा स्मार्ट दिसला की, कापलाच म्हणून समजायचा!
भास्कर – अरे, भाजपमधले कित्येक चांगले लोक घरी बसवले आहेत.
समर - रविशंकर प्रसाद आहेत, अरुण शौरी आहेत, मुरली मनोहर जोशी आहेत, हर्षवर्धन आहेत, वसुंधरा राजे सिंदिया आहेत.
अविनाश - तू जिंक निवडणूक आणि मग घे त्यांना तुझ्या कॅबिनेटमध्ये. (हु हु हु) (अजून एक आचरट अर्ग्युमेंट! - संपादक)
भास्कर - ही काय चर्चा करायची पद्धत आहे?
अविनाश - मग तुमच्याशी कसं बोलायचं? मोदीजी ग्रेट आहेत, ही साधी गोष्ट कळलेली नाही तुम्हाला इतक्या वर्षांत. तुमची लायकी काय आहे?
समर - मोदीजी ग्रेट आहेत तर महागाई का वाढत आहे? पेढे ९०० रुपयांवर का गेले आहेत?
अविनाश - सांगितलं की, तारानं तुम्हाला, आधी पैसा तयार झाला आणि नंतर महागाई झाली म्हणून. इट डज नॉट हर्ट! महागाई वर खुश आहेत लोक!
राघव - हे बघ महागाई दोन प्रकारे वाढते. एक म्हणजे लोकांकडे जास्त पैसा आल्यामुळे मागणी वाढली तर आणि आता बसला आहे तसा ऑईल वगैरे गोष्टींचा शॉक बसला तर!
तारा - मग लोकांकडे जास्त पैसे आले आहेत असे समजा आणि गप्प बसा!
राघव - लोकांकडे पैसे आले आहेत तर मागणी वाढून भारतात गुंतवणूक का येत नाहिये?
समर - भारतात मागणी कमी आणि महागाई मात्र जास्त, अशी परिस्थिती आली आहे. स्टॅग्नेशन आणि इन्फ्लेशन एकत्र!
तारा - सगळं व्यवस्थित आहे.
राघव - मग रुपया का पडतो आहे आयात-निर्यात यांमध्ये असमतोल झाल्यामुळे?
अविनाश - सगळं व्यवस्थित आहे.
नाना - सगळं व्यवस्थित नसतं तर मोदीजी इतक्या निवडणुका कसे जिंकले असते?
भास्कर - ते पूर्वी अनेक वेळा सांगितलंय तुम्हाला. तुम्ही एसआयआरमध्ये विरोधकांची मतं कापता, डुप्लिकेट व्होटर प्लांट करता मार्जिनल मतदारसंघात आणि गरीब स्त्रियांची मतं मिळवता त्यांच्यावर लाखो-हाजरो कोटी उडवून.
राघव - असले रडीचे डाव खेळून निवडणुका जिंकता येतात, पण अर्थव्यवस्था नाही सुधारत त्यामुळे. म्हणून बोंब उडाली आहे सगळी!
तारा - अरे अविनाश, पाकिस्तानच आहे की, इथं सगळं!
राघव - आम्हाला पाकिस्तान वगैरे काय म्हणायचे ते म्हणा, पण रुपया सुधारून दाखवा म्हणावे तुमच्या मोदीजींना!
नाना - खाली गेलेली गोष्ट वर येतेच की कधीतरी!
समर - या आधी एकदा पडलेला रुपया परत पहिल्या लेव्हलला आल्याची पाच उदाहरणे द्या इतिहासातली!
भास्कर - ते जाऊ दे! फार टेक्निकल होईल ते. फक्त एकच सांगा, मोदीजी इतके भारी पंतप्रधान आहेत तर रुपया पडलाच कसा? (राघव आणि समर जोरात हसतात)
तारा - तुम्हाला आनंद होतोय रुपया पडला म्हणून.
राघव - आम्हाला मोदीजींनी इतक्या थापा मारल्या तरी रुपया गंडला कसा नाही आणि सतत पडत कसा गेला याचं आश्चर्य वाटतंय.
तारा – अरे, युद्व सुरू आहे. येत नाहिये तेल. काय करणार?
राघव - मोदीजी कुठलंही युद्ध थांबवू शकतात ना? थांबवा म्हणावे हे युद्ध! आणा तेलानं भरलेली जहाजं.
समर - वॉर रुकवा दी पॉ पॉ!
(हा संदर्भ भाजपने २०२४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये केलेल्या जाहिरातीचा आहे. रशिया-यूक्रेन युद्धाच्या वेळी यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना भारत सरकारनं भारतात आणलं होतं. त्या वेळी हे सगळे विद्यार्थी भारतात आल्यावर - मोदीजींनी आपला वट वापरून केवळ एक शब्द टाकून युद्ध थांबवले - अशा बातम्या पेरल्या गेल्या होत्या. नंतर तशा जाहिरातीही केल्या गेल्या होत्या. त्यात परत आलेली मुलगी आपल्या वडिलांच्या गळ्यात पडून ‘मोदीजींनी वॉर रुकवा दी पापा’, असे म्हणताना दाखवली गेली होती. ही बातमी खरी नाही, मोदीजींनी युद्ध थांबवले नव्हते, असे स्पष्टीकरण भारताच्या परदेश मंत्रालयानेही दिले होते. परंतु भक्त मात्र मोदीजींच्या शब्दाखातर जगातले कुठलेही युद्ध थांबवलं जातं, असं सांगत नाचत राहिले होते. आता नव्या युद्धात त्याची चेष्टा सुरू झाली होती. - संपादक)
अविनाश – अरे, थांबवतीलच मोदीजी युद्ध वेळ आल्यावर!
राघव - आता काही कारणांनी युद्ध थांबलं आणि तेलाचे टँकर येऊ लागले, तर मोदीजींनी युद्ध थांबवलं अशा अफवा उठवाल तुम्ही. (समर आणि भास्कर हसतात)
तारा - हे बघा, मोदीजी थांबवतीलच युद्ध वेळ आल्यावर.
राघव - आता थांबवा की म्हणावे. तीन महीने झाले. वाट लागली आहे रुपयाची!
भास्कर - आता तेल कमी झालं नाही तर १५०ला जाईल रुपया!
तारा - काही जाणार नाही. आणि गेला तर गेला. रुपया पडल्यावर निर्यात वाढेल भारताचा आणि त्याचा परिणाम म्हणून रुपया सुधारायला लागेल तेव्हा कळेल तुम्हाला?
राघव - म्हणजे रुपया पडल्यामुळे निर्यात करणाऱ्या लोकांना फायदा होतो हे मान्य आहे तुम्हाला?
तारा - अर्थात! चीन आणि जपानने आपल्या चलन पाडून निर्यात नाही का वाढवली?
राघव - मग, मनमोहन पंतप्रधान होते, तेव्हा “जिस देश का रुपया गिरता हैं उस देश का प्रधानमंत्री गिरा हुआ होता हैं” असे मोदीजी म्हणाले होते. त्याचं काय?
तारा - तेव्हा आपला निर्यात आयातीपेक्षा कमी होते म्हणून पडणाऱ्या रुपयाचा आपल्याला त्रासच जास्त होत होता.
राघव - मग आता काय पडणाऱ्या रुपयाने भारताच्या अर्थव्यवस्थेला गुदगुल्या होतायत का? (भास्कर आणि समर हसतात)
समर - मनमोहनसिंगांच्या काळात रुपया ६०ला गेला होता, आता ९७ला गेलाय!
नाना - लोक नालायक आहेत आपले. थोडासुद्धा त्याग करायला नको. (पांडेजी एवढ्यात भजी आणून ठेवतात)
नाना - (गरम गरम भजे तोंडात टाकत-) लोकांनी पेट्रोल कमी वापरायला पाहिजे सोनं कमी खरेदी करायला पाहिजे, खाण्यात तेल कमी वापरायला पाहिजे.
समर - मग तुम्ही खायला नको आहेत भजी आत्ता.
नाना - (अजून एक भजे उचलत) तेच म्हणतोय मी, पांडेजींनी भजी करायलाच नको होती.
अविनाश - थोडी राष्ट्रभक्ती दाखवायला हवी होती.
नाना - (अजून एक भजे तोंडात टाकत) पांडेजी पुढच्या वेळी चिकन सँडविच आणि आईस्क्रीम असा बेत ठेवा. पार्टीसुद्धा झाली पाहिजे आणि राष्ट्रसेवासुद्धा झाली पाहिजे.
अविनाश - आता रुपया पस्तीसला जाईपर्यंत भजी आणि बटाटावडा खायचा नाही.
भास्कर – अरे, सगळा जन्म जाईल आपला पण भजी आणि वडे खाता येणार नाहीत आपल्याला!
अविनाश - तू मोदीजींना लाईटली घेऊ नकोस! नाना तुमची ती कविता ऐकवा हिंदीमधली! (नाना खिशातून कागद काढतात आणि वाचतात)
‘मोदी को हिला सके ऐसा कोई वादल नही हैं
मोदी को भिगो सके ऐसा कोई बादल नही हैं’
पांडेजी - वादल म्हणजे?
भास्कर - (हसत) वादल म्हणजे स्टॉर्म!
पांडेजी – ओह, तूफान!
समर - येस!
अविनाश - क्या बात हैं नाना!
नाना - ‘मोदी को गुदमरा सके ऐसा कोई धुंआ नही हहैं
मोदी को डुबो सके ऐसा कोई कुआ नही हैं’
अविनाश - क्या बात हैं नाना!
पांडेजी - ये ‘गुदमरा’ क्या होता हैं?
राघव – ‘गुदमरा’ ऐसा शब्द नही हैं मराठी में.
पांडेजी - हिंदी में भी नहीं हैं.
राघव - गुदमरणे ऐसा शब्द हैं. गुदमरणे म्हणजे घुटन महसूस होणे! नानांनी वादल आणि गुदमरा असे दोन शब्द भेट म्हणून दिले आहेत हिंदीला!
समर - या साठीच माझा त्रिभाषिक फॉर्म्युल्याला विरोध आहे. मुलाला शाळेत तीन भाषा शिकवल्या की, त्यातून अपरिहार्यपणे चवथी भाषा तयार होते. (राघव, भास्कर आणि पांडेजी जोरात हसतात)
समर - त्रिभाषिक फॉर्म्युला हा बेसिकली चतुर्भाषिक फॉर्म्युला असतो. (राघव, भास्कर आणि पांडेजी परत हसतात)
अविनाश - नानांच्या कवितेत हिंदी आणि मराठी अत्यंत प्रेमानं एकमेकींच्या गळ्यात गळे घालून चालल्या आहेत.
समर - का एकमेकींच्या पायात पाय घालत चालल्या आहेत? (राघव, भास्कर आणि पांडेजी परत हसतात)
तारा - अविनाश तुझ्या या मित्रांना अर्थव्यवस्था आणि भाषा दोन्ही कळत नाहिये.
अविनाश - आणि आपण अपेक्षा धरून चाललो आहोत की, यांना मोदीजी कळतील!
तारा - तुम्हाला आदर्श दिसतच नाहीत का? दिसत नाहिये भारत किती प्रगती करतो आहे?
राघव - किती प्रगती करतो आहे?
तारा – अरे, एवढी मोठी अर्थव्यवस्था सात सात टक्के ग्रोथरेटने पळवायची म्हणजे काय गंमत आहे का?
राघव - एकतर भारताची अर्थव्यवस्था सात टक्क्यांनी खरंच वाढत असती, तर रुपया असा पडला नसता.
समर - आणि परदेशी लोकांच्या गुंतवणुकींनी भारतातून काढता पाय घेतला नसता!
राघव - परवा सुभाष गर्ग म्हणत होते की, भारत जरी ७ टक्क्यांनी वाढतो आहे हे मान्य केले, तरी डॉलर समोर रुपया १५ टक्क्यांनी पडला आहे म्हणजे डॉलर टर्ममध्ये भारताची ग्रोथ निगेटिव्ह आहे.
अविनाश - कोण आहे हा सुभाष गर्ग?
राघव - भारताचे फायनान्स सेक्रेटरी होते २०१९ साली.
अविनाश - त्याला काही येत नाहिये.
समर - त्याला काही येत नाही हे आपण मान्य करू. पण त्याला मोदीजींनीच नेमला होता, हे आपल्याला नाकारता येत नाही.
राघव - आणि डॉलर टर्ममध्ये नेट ग्रोथ असल्याशिवाय परदेशातली गुंतवणूक येत नाही, हेसुद्धा आपल्याला नाकारता येत नाही.
समर - आणि परदेशातली गुंतवणूक भारतात येत नाहिये हेसुद्धा आपल्याला नाकारता येत नाहिये.
अविनाश - येते आहे. जबरदस्त येते आहे. खूप येते आहे. प्रचंड येते आहे.
राघव - मग रुपया का पडतो आहे?
अविनाश - तो इराणमुळे.
राघव - मोदीजी आले तेव्हा रुपया ५८ होता. आता ९७ आहे. इतकी वर्षं इराण युद्ध सुरू आहे का?
अविनाश - तुला काही येत नाही तरी तू का बोलत असतोस रे?
समर – अरे, आमचं जाऊ दे, पण मोदीजींना इतकी वर्षं सपोर्ट करणारे अर्थतज्ज्ञसुद्धा उलटले आहेत आता.
नाना - पुस्तकी लोक ते. त्यांना काय कळणार जग?
(ज्ञान आणि ज्ञानवंत यांच्याविषयी अनादर हे मोदीभक्तांचे मुख्य लक्षण होते. स्वतः मोदीजीसुद्धा याला अपवाद नव्हते. ‘हार्वर्डपेक्षा हार्डवर्क महत्त्वाचे’ असे ते म्हणत असत. - संपादक)
राघव - मोदीजींनी ज्ञानी लोकांचं ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती!
अविनाश - हा तेलाचा प्रॉब्लेम सुटला की, हे सगळे टुच्चे आरत्या सुरू करतील मोदीजींच्या.
राघव - तेलाचा प्रॉब्लेम सुटेल कधीतरी, पण भारत गोत्यात आला आहे त्याचं काय करायचं?
अविनाश - वाटेल ते बोलू नकोस. मूर्ख कुठला!
राघव - मोदीजी आले तेव्हा भारत एनर्जीसाठी परदेशांवर ७० टक्के अवलंबून होता. आता ८८ टक्के आहे.
तारा - मग अर्थव्यवस्था वाढली तर तेल आणि गॅसची गरज नाही का वाढणार?
राघव - वाढणार की!
तारा - मग?
राघव - मग काय? अगं देशात आपले एनर्जी स्त्रोत नको का निर्माण करायला? सोलर एनर्जी वाढली का? विंड एनर्जी वाढली का? इलेक्ट्रिकवर चालणारी वाहने वाढली का?
समर - आज भारतात केवळ दोन टक्के वाहनं इलेक्ट्रिकवर चालणारी आहेत. बाहेर कित्येक देशात ८० टक्के वाहने इलेक्ट्रिकवर चालतात. काय केलं मोदीजींनी १२ वर्षं?
तारा - खूप काम केलं आहे मोदीजींनी. १४ साली सोलर आणि विंड एनर्जी ३२ गीगा वॉट होती, ती आता २२८ गीगा वॉट झाली आहे. सात पट वाढ!
अविनाश - बोल आता ताराशी? ती तुला बोलण्यात तर हरवेलच पण मारामारीतसुद्धा हरवेल.
राघव - (हसत) अरे, सात पट वाढली क्लीन एनर्जी म्हणजे गरजेएवढी झाली का आपल्या? तेलाची गरज कमी नाही झाली. त्यांचं काय?
भास्कर - पोरगं वाढलं म्हणून त्याला आठ चपात्या लागायला लागल्या आणि तुम्ही तुमची चपात्या करण्याची कपॅसिटी एक चपाती वरून चार चपात्यांवर आणली, तर त्या पोरानं उपाशी पोटी नाचायचं का प्रगती झाली म्हणून? (समर आणि राघव हसतात)
समर - ऑइल्सवर का अवलंबून आहोत आपण अजूनही? रुपया का पडतो आहे?
राघव - एक लक्षात घे अविनाश आणि तू पण तारा. रुपया हा थर्मॉमीटर आहे. तुम्ही कितीही खरे-खोटे आकडे द्या, तो खोटं नाही बोलत.
समर - आणि अजून एक लक्षात घ्या, डॉलर टर्ममधली ग्रोथ ही खरी ग्रोथ. ती असेल तरच परकीय गुंतवणूक येणार आणि ती आली तरच रुपया खाली येणार!
अविनाश - भारत जगताली सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. विषय संपला.
तारा - दर वर्षी जीडीपी वाढतोय ६ आणि ७ टक्क्यांनी काय चेष्टा आहे का?
राघव - हे आकडे आपणच तयार करून जगाला सांगतो. जग तोंडदेखलं हो हो म्हणतं इतकंच!
समर - पण त्यांच व्यवस्थित लक्ष असतं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं भारताच्या इकॉनॉमिक डाटाला ‘सी’ ग्रेड दिली आहे, माहिती आहे ना?
भास्कर - त्यांना पैसे गुंतवायचे असतात, ते बरा विश्वास ठेवतील मोदीजी म्हणतील त्यावर. खोटं बोलण्यासाठी सगळ्या जगभर प्रसिद्ध माणूस तो.
अविनाश - ते नेते आहेत देशाचे तुला लाज वाटली पाहिजे त्यांच्याविषयी बोलायला.
राघव - खरंतर, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जेव्हा ‘सी’ ग्रेड देतं मोदीजींच्या डाटाला, तेव्हा लाज खरी वाटायला पाहिजे तुम्हा भक्तांना!
समर - कुठं आणून ठेवलाय भारत माझा?
तारा - तो राहुल गांधी असता तर रुपया १५०ला गेला असता.
राघव - राहुल असता तर त्याने नोटबंदी नक्की केली नसती.
समर - नोटबंदीमुळे जे डिसरप्शन झालं अर्थव्यवस्थेमध्ये त्याची किंमत पडली दोन लाख कोटी. जीएसटी लावताना जे घोळ घातले गेले, त्याची किंमत पडली दोन लाख कोटी. कोविड आला तेव्हा भारतात केवळ ५०० रुग्ण असताना देशभर लॉकडाउन लावला त्याची किंमत आहे पाच लाख कोटी.
तारा - कोट्यवधी लोक मरून पडले असते रस्त्यावर लॉकडाउन लावला तेव्हा.
भास्कर - मग, पुढे दुसरी लाट आली तेव्हा लोक मरत असताना लॉकडाउन लावता आला नाही. अर्थव्यवस्था अजून गोत्यात येईल म्हणून. तेव्हा नाही कोट्यवधी लोक मेले? पहिल्या लाटेमध्ये मेले असते का? (जोरात हसतो)
अविनाश - मोदीजी नसते तर आज रुपया तीनशेला गेला असता आणि कोविडमध्ये दोन-पाच कोटी लोक मेले असते. विषय संपला!
(ही मोदी सरकारच्या नॅरेटिव्ह कंट्रोलची किमया! खरं तर नोटबंदी, जीएसटी आणि लॉकडाउन या तीनही घोडचुका होत्या. या तीन चुकांची मिळून किमान १० लाख कोटी इतकी किंमत मोजली भारतीय अर्थव्यवस्थेनं. काही एस्टिमेट्स १५ लाख कोटींची आहेत. यातल्या प्रत्येक वेळी अर्थव्यवस्थेच्या चालत्या चाकाला खीळ बसली. दुसऱ्या कुठल्याही देशात यातल्या प्रत्येक चुकीसाठी पंतप्रधानाला राजीनामा द्यायला लागला असता. पण मोदीकालीन भारताची गोष्टच वेगळी होती - संपादक)
समर - एक लक्षात घ्या, या प्रत्येक वेळी भारताची ग्रामीण अर्थव्यवस्था आणि छोट्या उद्योगांनी मार खाल्ला आहे. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे.
भास्कर - बेरोजगारी गेल्या ४५ वर्षांत नव्हती एवढी वाढली आहे.
अविनाश - थापा मारू नकोस.
भास्कर - तू नेटवर जाऊन सरकारी आकडे बघ.
राघव - सरकार म्हणतं आहे की, बेरोजगारी ६.१ आहे. वर्स्ट इन फॉर्टी फाइव्ह इयर्स!
समर - त्यात आता इराण वॉर!
भास्कर - त्यात म्हणे त्या एल नीनो करंटमुळे या वर्षी मॉन्सून गोत्यात आला आहे.
राघव - त्यात लाडक्या बहिणींना लाखो कोटी वाटायचे आहेत.
समर - त्यात आता इराण वॉरमुळे खतांचे भाव वाढले आहेत.
अविनाश - त्याचा काय संबंध?
राघव - युरिया वगैरे खतं गल्फमधून येतात.
भास्कर - खतांची सबसिडी तीन लाख कोटी येणार आहे म्हणे या वर्षी.
समर - म्हणून तर मोदीजी म्हणाले की, खतं दर वर्षी वापरता त्याच्या पन्नास टक्केच वापरा म्हणून!
नाना - तुम्ही सगळे खुळे लोक आहात. तो मोदी आहे एवढं लक्षात ठेवा.
राघव - मोदी आहे म्हणूनच रुपया पडतो आहे आणि डॉलर टर्ममधली ग्रोथ निगेटिव्ह झाली आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा.
भास्कर - आज गरिबाला चहा प्यायचा तर १० रुपयांऐवजी २० रुपये द्यायला लागतायत, थाळी खायची तर ५० ऐवजी ९० रुपये द्यायला लागतायत. म्हणजे त्याच्यासाठी इन्फ्लेशन रेट ५० टक्के तरी आहे किमान!
समर - इतक्या इन्फ्लेशन रेटला कोणी निवडून येत नाही.
भास्कर - अजीम प्रेमजी विद्यापीठाचा सर्व्हे तर सांगतोय की, १५ ते २५ वयोगटातले ४० टक्के तरुण बेरोजगार आहेत आणि २५ ते २९ मधले २० टक्के!
समर - त्यात एआय अजून नोकऱ्या घालवणार आहे येत्या दोन वर्षांत.
नाना - मोदी नसेल तर हिंदूला कोण वाचवणार?
राघव - (गालात हसत) त्यावरच यायला लागणार आहे शेवटी!
भास्कर - पण आता उपयोग होणार नाही काही!
नाना - (गालात हसत) बंगालमध्ये काय झालं?
राघव - त्या सगळ्या कॉपी करून पास झालेल्या परीक्षा आहेत.
नाना - मोदीजी कॉपी करण्यात आणि अभ्यास करण्यात दोन्हीत हुशार आहेत. तो नाही ऐकत तुम्हाला!
राघव - कॉपी करण्यात हुशार आहेत हे मान्य करायलाच पाहिजे. पण अभ्यासाबाबत असं नाही म्हणता येणार. पडणारा रुपया, वाढणारी महागाई आणि वाढती बेरोजगारी काहीतरी वेगळं सांगतायत.
नाना - महागाई चार हजार टक्के झाली, बेरोजगारी दोनशे टक्के झाली आणि रुपया पाचशे पार गेला तरी आयेगा तो मोदीही!
अविनाश - व्हॉट अ शॉट नाना!
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
शिरोजीनं ताराला आणून धमाल उडवून दिली या प्रकरणात. तारा मोदीभक्त असली तरी नाना आणि अविनाश यांच्यापेक्षा हुशार आहे. तिला खूप विषय माहीत आहेत. तरीही ती भक्त आहे हे विशेष. दुसरं म्हणजे शिरोजीने भारतीय अर्थव्यवस्थेचं चित्र संयमानंच रंगवलं आहे, असं नंतर घडलेल्या घटना पहिल्या की, आपल्या लक्षात येतं.
मोदीजी खरं तर २०२४ सालीच पराभूत व्हायचे, परंतु नीतीश कुमार यांच्यामुळे तो सोहळा राहून गेला. त्यानंतरचे त्यांचे राजकीय विजय कॉपी करून मिळवलेल्या मार्कांसारखं होतं, परंतु आता सगळे गंभीर होत चाललं होतं. भारतीय अर्थव्यवस्थेवर आलेलं संकट इराण युद्धामुळे आहे असं भक्तांना वाटत होतं, पण खरं तर अर्थव्यवस्था आतून कमकुवत\दुबळी झाली होती. भक्त लोकांच्या ते लवकरच लक्षात येणार होततं.
भक्तांच्या लक्षात येऊन त्यांच्यात फार फरक पडणार नव्हता. त्यांची लाईफ स्टाईल खाली येणार होती थोडी पण त्यांच्या पोटाला चिमटा बसणार नव्हता. खरे हाल गरिबांचे आणि बेरोजगार तरुणाईचे होणार होते. आणि हे लोक लवकरच भारताच्या राजकारणाला एक नवीन दिशा देणार होते.
- श्रीमान जोशी, संपादक, ‘शिरोजीची बखर’
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment