अजूनकाही
बाबांचे आयुष्य म्हणूनच समग्र परिवर्तनाचे एक ध्यासपर्व होते. बाबा आयुष्यभर लढतच आले. वयाच्या नव्वदीत झालेला कर्करोग घेऊनही, बाबा तडफेने लोकशाहीच्या आणि संविधानाच्या रक्षणासाठी उभे राहून गेली पाच वर्षे झुंजत होते. ऐन तारुण्यात परकीय सत्तेच्या विरुद्ध आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर पुढचे सर्व आयुष्य स्वकीय सत्तेच्या विरुद्ध; त्यांची खरी लढाई होती ती गुलामगिरी, अन्याय आणि शोषणाविरुद्ध. मग ते राजकीय, सामाजिक, धार्मिक वा आर्थिक असेल.
आपला देश परकीयांच्या जोखडातून स्वातंत्र्य झाला, पण धार्मिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक गुलामगिरीतून पूर्ण मुक्त झालाच नाही. अन्याय आणि शोषण संपले नाही. बाबांचा खरा लढा याविरुद्ध होता. महात्मा फुल्यांच्या स्त्री शूद्रातिशूद्रांसाठी होता. त्यांचा लढा स्त्रीशूद्रातिशूद्रांच्या जीवनात समग्र परिवर्तन घडवण्यासाठी होता. हेच बाबांचे समाजवादी समाजरचनेचे स्वप्न होते. त्या अर्थाने ते समाजवादी होते आणि ते सत्यशोधकही होते. लोकशाही समाजवादाला अभिप्रेत असणारा संघर्ष ते आयुष्यभर करत राहिले. हा संघर्ष करीत असताना कुटुंबाची जबाबदारी शीलाकाकींच्या समर्थ खांद्यांवर सोपवून तुरुंगाच्या वाऱ्या करत राहिले.
समाजवादी नेत्यांच्या परंपरेनुसार कुटुंबाचा आणि बाबांचा सारा भार शीलाकाकींनीच आयुष्यभर पेलला. चळवळी, लढे या बरोबर, बाबा फावडे उचलून रचनात्मक कामाचा डोंगर उभा करत राहिले. सुरुवातीला त्यांनी समाजवादी पक्षाचा झेंडा खांद्यावर घेवून मतपेटीद्वारे राजकीय परिवर्तनाचा प्रयोगही केला. नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर भाईंच्या बरोबर कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या झोपडपट्टीवासीयांच्या अनेक प्रश्नांवर पुणे महानगरपालिका हालवून सोडली. ‘हिरवा पट्टा’सारखी भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर काढून सत्ताधाऱ्यांना घाम फोडला.
भाई-बाबा ही पुण्याच्या राजकारणातील एक अद्वितीय जोडी होती. पुढे दोघांचे मार्ग वेगळे झाले, पण जोडी अभेद्य राहिली. भाईंच्या ‘शिक्षण हक्का’च्या लढ्यात बाबा उतरत गेले आणि बाबांच्या कष्टकऱ्यांच्या लढ्यात भाई साथ देत राहिले. हमालनगरचे स्वप्न बाबांनी पाहिले आणि ते साकार करण्यासाठी महाराष्ट्राचे मंत्री म्हणून मार्केटयार्ड येथील जमीन भाईंनी दिली. ही मैत्री रक्ताच्या नात्यापलीकडील होती. वैद्य आणि आढाव ही कुटुंबेही एकरूप झाली. दोघांचे मार्ग वेगळे झाले, तरी दोघांचे साध्य एकच होते, ‘समाजवादी समाजरचना’.
.................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................
राजकीय कारकिर्दीचा अल्पकाळ वगळता, तुरुंग आणि फावडे हीच बाबांची अंतिम साध्यापर्यंत जाण्याची खरी साधने राहिली. या साध्यापर्यंत जाण्याचे त्यांचे तत्त्वज्ञान समाजवादावर उभे होते. त्यांचा समाजवाद डॉ. राममनोहर लोहिया आणि एस. एम. जोशींनी घडवला. राष्ट्र सेवा दलाने त्यांच्या तत्त्वज्ञानाला अनेक पैलू पाडले. समाजवादी तत्त्वज्ञानाची बैठक लाभली असली, तरी बाबांचा मार्ग मात्र महात्मा फुल्यांच्या सत्यशोधकी धर्मातून जाणारा होता.
समाजवादाबरोबर बाबांना महात्मा फुल्यांच्या तत्त्वज्ञानाने तरुपणीच झपाटून टाकले होते. पारंपरिक धर्मांना, सर्व रूढी- परंपरांना, कर्मकांडांना, स्वर्ग-नरक, पाप-पुण्य, मोक्ष आणि पुनर्जन्म या कल्पनांना नाकारून बाबा अस्सल सत्यशोधक बनले. त्यांनी ईश्वर तर नाकारलाच, पण पुढे जाऊन निर्मिकही नाकारला. हे सर्व धुडकावून ते ‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले’, या युक्तीनुसार रंजल्या गांजल्यांसाठी लढत राहिले.
हमाल, रिक्षा चालक, कागद काच पत्रा वेचणारे, सफाई कामगार, शेतमजूर, अस्पृश्य, देवदासी, धरणग्रस्त या साऱ्यांसाठी बाबा लढत आले. हे करून मिळणार काहीच नव्हते, काही मिळवायचेही नव्हते. जे मिळू शकत होते त्याकडे त्यांनी केव्हाच पाठ फिरवली होती. राजकारण सोडून सत्ताही नाकारली होती. त्यांना फक्त परिवर्तन घडवायचे होते, समाजव्यवस्था बदलायची होती.
लढायचे तर ताकद हवी, ताकद हवी असेल तर संघटना हवी. मग त्यांनी संघटनांचे जाळेच उभे करण्याची सुरुवात केली. हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, कागद-काच-पत्रा पंचायत अशा अनेक संघटना उभ्या राहिल्या. फक्त लढून सर्व घडणार नाही म्हणून ते ज्यांच्यासाठी लढत होते, त्यांच्या आयुष्याला आकार देण्यासाठीही खूप काही उभे करत राहिले.
गरिबांना परवडणाऱ्या आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून त्यांनी आपला उदंड चालणारा वैद्यकीय व्यवसाय बंद करून आपल्या समाजवादी सहकाऱ्यांबरोबर हडपसरला ‘साने गुरुजी रुग्णालय’ उभे केले, कष्टकऱ्याला परवडणारे दोन घास मिळावेत म्हणून ‘कष्टाची भाकरी’ ही साखळी उभी केली, हमालांच्या सांस्कृतिक घडणीसाठी ‘हमाल भवन’ उभे राहिले, हमालांना हक्काचे छप्पर देण्यासाठी ‘हमाल नगर’ उभे राहिले. हमालांना आर्थिक प्रतिष्ठा मिळावी म्हणून पतपेढी उभी राहिली. हमालांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण घेता यावे म्हणून ‘महात्मा फुले विद्यालय’ ही शाळा उभी केली.
बाबांच्या वैचारिक वाटचालीत तरुण वयातच त्यांना फुल्यांबरोबर छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर भेटले होतेच. महात्मा फुल्यांचे साहित्य लोकांपुढे आणण्याचे कामतर बाबांनी केलेच, पण महात्मा फुले वाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर व्हावे म्हणून बाबा यशस्वीपणे लढले. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा नामांतरलढा बाबांनी उभा केला.
महात्मा गांधींचे अस्पृश्यांना मंदिरे खुली करण्यासाठीचे उपोषण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा चवदार तळ्याच्या सत्याग्रह, साने गुरुजींचे पंढरपूर मंदिर प्रवेशाचे उपोषण आणि बाबांची ‘एक गाव एक पाणवठा’ मोहीम हे अस्पृश्यतेच्या लढाईतील चार ऐतिहासिक टप्पे आहेत.
प्रबोधनाच्या लढाईसाठी बाबांनी ‘महात्मा फुले समता प्रतिष्ठान’ उभे केले, ‘पुरोगामी सत्यशोधक’ हे त्रैमासिक सुरू केले, महात्मा फुले वाड्यावर दहा दिवसांची ‘फुले व्याख्यानमाला’ ५२ वर्षांपूर्वी सुरू केली. या व्याख्यानमालेत मी आजवर अनेकदा वक्ता म्हणून बोललो आहे, पण ५२व्याख्यानमालेचे पहिले पुष्प यावर्षी मला गुंफण्याचा सन्मान मिळाला. हे व्याख्यान २६ नोव्हेंबर या महात्मा फुल्यांच्या स्मृतिदिनी बाबांच्या अध्यक्षतेखाली होणार होते, मात्र २४ नोव्हेंबर रोजी मला त्यांना रुग्णालयात ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला. अंगात भरलेल्या तापाची पर्वा न करता २३ नोव्हेंबरला ते महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या वार्षिक सभेला व्हीलचेअरवर उपस्थित राहिले. दुसऱ्या दिवशी ताप वाढला. २४ तारखेला त्यांनी मी रुग्णालयात भरती केले.
व्याख्यानाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी राऊंड घेण्यासाठी मी रुग्णालयात गेलो तर बाबा म्हणाले, ‘जिंदाबाद!’ कालचे तुझे व्याख्यान चांगले झाल्याचे कळले. आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याची बाबांची ही पद्धत मी आयुष्यभर अनुभवली आहे. प्रबोधनाबरोबर देश जोडण्यासाठी त्यांनी ‘राष्ट्रीय एकात्मता परिषद’ स्थापन केली. परिवर्तनाची लढाई एकाकी लढून चालत नसते. ही लढाई लढताना इतर परिवर्तनवादी साथींना बळ दिले तर ताकद अधिक वाढते याची पुरेपूर जाणीव बाबांना होती.
बाबा अनेक परिवर्तनवादी संघटनांच्या मागे भक्कमपणे उभे राहत गेले. आपल्यापरीने त्यांना आर्थिक बळ देत राहिले. ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’ची स्थापना हमीद दलवाई यांनी भाई वैद्यांच्या गुरुवार पेठेतील मेंदीवाल्यांच्या वाड्यातील निवासस्थानी केली आणि मंडळाच्या नावाला ‘सत्यशोधक’ शब्द हा बाबांच्या आग्रहामुळे जोडला गेला. बाबा हमीद दलवाईंच्या आणि त्यांच्या या संघटनेमागे भाईंसारखेच भक्कमपणे आयुष्यभर उभे राहिले.
मेधा पाटकरांची एनएपीएम, आमची आरोग्य सेना, भाई वैद्य फाउंडेशन अशा अनेक संघटनांच्या मागे ते उभे राहिले. पुरोगामी कार्यकर्त्याला सन्मानाने जगता यावे, यासाठी त्याला मानधन दिले पाहिजे या कल्पनेने बाबा झपाटून गेले आणि ‘सामाजिक कृतज्ञता निधी’ उभा राहिला.
बाबा शेवटच्या श्वासापर्यंत लढत लढतच गेले. आता ही लढाई त्यांनी आपल्या सर्वांवर सोपवली आहे, हे विसरून चालणार नाही. बाबांबद्दल व्यक्तिगत आठवणी हा तर एक अमूल्य खजिनाच आहे. मला आजही आठवते की, भाई गेल्यावर बाबा तातडीने रुग्णालयात धावत आले. त्यांना हुंदका आवरत नव्हता. सात-साडेसात दशकांच्या एका अपूर्व मैत्रीच्या पर्वाचा भाईंच्या मृत्यूने अंत झाला होता. त्यांनी माझा हात घट्ट हातात धरला. त्या हाताच्या मायेच्या आश्वासकस्पर्शाने माझे अश्रू थांबले. मैत्री आणि स्नेह जपावा तो बाबांनीच. त्यांच्या स्नेहाच्या उबेत आणि चाफ्याच्या फुलांच्या सुगंधात अनेक कार्यकर्ते न्हाऊन निघत आले.
त्यांच्या आयुष्याला शीलाकाकींची तेवढीच समर्पित लाभली. माझी आई, नलिनीताई ही शीलाकाकींची सख्खी मैत्रीण. दोघीही आपल्या समाजवादी पतींच्या संसाराचे गाडे ओढणाऱ्या. त्यांच्या मैत्रीतील हा मोठा सामायिक धागा. दोघींची सुख दुःखे, व्यथा समान, भाईंचे वडील अण्णासाहेब, आई पार्वतीबाई, भाईंची सर्व भावंडे, माझ्या आईच्या माहेरकडची मंडळी या सर्वांशी या दोघांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध. बाबांच्या सर्व घराण्याशी भाईंचे तितकेच जिव्हाळ्याचे संबंध. बाबांच्या आई, बाई, माझ्या आईला दुसरी सूनच मानत. भाई गृहराज्य मंत्री झाल्यावर त्या मलबार हिलवरील ‘तोरणा’ या निवासस्थानी महिनाभर राहिल्या. बाईंची विनोदबुद्धी अत्यंत तल्लख होती. त्या हजरजबाबी होत्या. बंगल्यावरील स्वयंपाकी तर त्यांच्या विनोदाने हसून हसून बेजार होत असे. त्यांच्याकडे शेकडो म्हणींचा खजिना असे. सूक्ष्म तरल विनोदबुद्धी आणि हजरजबाबीपणा हे बाबांचे गुण बाईंकडून आले असावेत.
वास्तविक मी प्रथम बाईंचा डॉक्टर झालो, नंतर बाबा आणि काकींचा डॉक्टर झालो. मलबार हिलवरील या बंगल्यावर बाबा अनेकदा येत राहत. बाबा आले की, संध्याकाळी ते मला जवळच असणाऱ्या हँगिग गार्डनला फिरायला घेऊन जात. मी या वेळी एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला होतो. आम्ही दोघे गप्पा मारत चालत जात असू. याच काळात माझे बाबांशी एक भावनिक आणि वैचारिक नाते जुळत गेले, जे गेल्या पाच दशकांत इतके दृढ झाले की, बाबा माझा उल्लेख मोठा मुलगा म्हणून करत. त्यांची मुले, असीम आणि अंबरशी माझे नाते भावांसारखे राहिले. असीमची पत्नी उमा आणि अंबरची पत्नी अजिता यांचा मी भावोजी. दोनही मुले आणि त्यांच्या पत्नी प्रखर पुरोगामी असीमच्या मुली अस्मानी, अंतरा, अंबरचा मुलगा अमन या सर्वांची घडण पुरोगामी. माझी पत्नी डॉ. गीतांजली, दोनही मुले सोहिल आणि डॉ. सलीना हेही प्रखर पुरोगामी. त्यामुळे आमचे वैचारिक नातेही तितकेच घट्ट राहिले आहे.
मी ‘हृदयरोग परिषदे’च्या निमित्ताने अमेरिकेला जेव्हा जेव्हा गेलो, तेव्हा आवर्जून बॉस्टनला असीम-उमाकडे गेलो. पुढे माझा मुलगा सोहिल, अमेरिकेतील लॉस इंजेलिस येथे चित्रपट दिग्दर्शनाच्या पदवित्त्युर शिक्षणासाठी गेला. त्याची फिल्म इन्स्टिट्यूट बघण्याची भाईंना खूप इच्छा असल्याने मी ८६ वर्षांच्या भाईंना घेऊन लॉस इंजेलिसला गेलो. तिथून त्यांना असीम-उमाकडे बॉस्टनला नेले आणि नायगरा दाखवण्याच्या निमित्ताने कॅनडातील टोरेंटो येथे राहणाऱ्या अंबर-अजिताच्या घरी नेले. आपल्या दोनही मुलांच्या घरी भाई जाऊन आल्याचा केवढा आनंद बाबांना झाला.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
बाबांचे वैशिष्ट्य असे की, गेली कित्येक वर्षे दर आठवड्याला सकाळी ‘झिंदाबाद, बोला वैद्यराज’ असे म्हणून त्यांचा फोन न चुकता येई. बाबांच्या हसण्यात आणि आवाजात एक नादमाधुर्य होते. बाबांनी गायलेल्या महात्मा फुल्यांच्या ‘सत्य सर्वांचे आदीघर’ या अखंडाचे स्वर आयुष्यभर कानात गुंजत रहातील. बाबा प्रत्येक कार्यक्रमात हा अखंड गाऊन उपस्थितांना एक प्रकारे सत्याशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञाच देत असत. अनेक विषयांवर आमच्या गप्पा आणि चर्चा होत. यांत घरगुती, राजकीय, सामाजिक आणि संघटनात्मक असे सर्व विषय असत. या गप्पांत बाबांचे मोठेपण कधी आड आले नाही.
माझी पत्नी गीतांजली, मुले सोहिल आणि डॉ. सलीना, माझी बहीण डॉ. प्राची यांची त्यांनी चौकशी केली नाही, असे कधीही घडले नाही. सोहिलच्या पहिल्या वाढदिवसाला बाबा आणि काकी त्याचा वाढदिवस आहे, हे कळल्यावर त्याच्यासाठी खेळणी घेऊन रात्री हजर होते. भाईंच्या प्रत्येक वाढदिवसाला सकाळी सर्वप्रथम बाबा आणि शीलाकाकी शुभेच्छा देण्यासाठी येत. काकी त्यांच्या हातचा शिरा करून आणत. माझ्याही प्रत्येक वाढदिवसाला काकी स्वतःच्या हाताने केलेला शिरा आणि अनेक पदार्थ पाठवत आलेल्या आहेत. गेली अनेक वर्षे बाबा स्वतः माझ्या संजीवनी क्लिनिकला येऊन शुभेच्छा देत आले आहेत. बाबांचे हे मोठेपण कधीही विसरता येणार नाही.
बाबांनी एखादा उपक्रम वा कार्यक्रम सुचवावा आणि आरोग्य सेना वा भाई वैद्य फाउंडेशनने तो तातडीने राबवावा हा अलिखित नियमच होता. कष्टकऱ्यांच्या आहाराची दोन सर्वेक्षणे बाबांच्या सूचनेनुसार आरोग्य सेनेने हाती घेतली. यातूनच ऐतिहासिक असा ‘अर्धपोटी कष्टकऱ्यांचा आवाज’ हा अहवाल प्रसिद्ध झाला. त्यांच्या कल्पनेतूनच रिक्षा चालकांसाठी आरोग्य योजना राबवण्यात आली. रेशनिंग व्यवस्थेबद्दल आरोग्य सेनेने सर्वेक्षण केले आणि बाबांच्या सूचनेनुसार खुली अदालत भरवली.
लोकनेते भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कारासाठी नयनतारा सहगल आणि डॉ. तारा भवाळकर यांची नावे बाबांनीच सुचवली. या पुरस्कारासाठी नावे निवडताना ‘परीघ ओलांडून विचार कर’ हा त्यांनी दिलेला सल्ला कायमच मार्गदर्शक ठरेल. आरोग्य सेना वा भाई वैद्य फाउंडेशनचा प्रत्येक कार्यक्रम हा बाबांशिवाय कधी पार पडला नाही. बाबांच्या इच्छेनुसार त्यांच्या हमालनगर येथील वास्तूत आरोग्य सेनेने बारा वर्षांपूर्वी स्वस्त दर्जेदार जेनेरिक औषधे देणारे जनलोक मेडिकल्स आणि दहा वर्षांपूर्वी स्वस्त दरात अत्याधुनिक वैद्यकीय चाचण्या करणारे जनलोक डायग्नोस्टिक सेंटर सुरू केले. याच वास्तूत आरोग्य सेनेचे राष्ट्रीय मुख्यालय आणि लोकनेते भाई वैद्य अकादमीही आहे. बाबांशी असणारा माझा ऋणानुबंध हा असा अनेक पातळ्यांवरचा होता.
गेले वर्षभर बाबा देशातील लोकशाहीच्या भवितव्याबद्दल चिंतेत होते. संविधान धोक्यात आहे, याबद्दल अस्वस्थ होते. संविधानाच्या जागी मनुस्मृती येण्याच्या धोक्याची जाणीव त्यांना होती. यासाठी पहिले पाऊल म्हणून गावागावांत ‘संविधान घर’ उभारण्याचा त्यांचा प्रयत्न होता. हुकूमशाहीविरुद्ध देशव्यापी जेल भरो आंदोलन उभारण्याचा त्यांचा मानस होता. ९६व्या वर्षीही हा योद्धा देश वाचवण्यासाठी सज्ज होता.
बाबांचे जाणे हे आमच्या शेवटच्या पितामहाचे जाणे आहे, पण त्यापेक्षा एका महामानवाचे महापरिनिर्वाण आहे.
.................................................................................................................................................................
लेखक डॉ. अभिजित वैद्य ‘पुरोगामी जनगर्जना’ या मासिकाचे संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.
puja.monthly@gmail.com
.................................................................................................................................................................
‘पुरोगामी जनगर्जना’ या मासिकाच्या डिसेंबर २०२५च्या अंकातून साभार
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.


Post Comment