अजूनकाही
ठाण्यातील ‘इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ’ अर्थात ‘आयपीएच’चे संस्थापक डॉ. आनंद नाडकर्णी हे एक ख्यातनाम मनोविकास-तज्ज्ञ होते. जवळपास चाळीस वर्षं ते प्रॅक्टिस करत होते. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या मार्गदर्शनासाठी त्यांनी सुरू केलेल्या आणि गेली पस्तीस वर्षं अखंडपणे सुरू असलेल्या ‘वेध’ या व्यासपीठावरील मुलाखती जगभर कौतुकानं पाहिल्या जातात. या मुलाखती ‘आवाहन’ या त्यांच्या यूट्यूबवर चॅनलवर उपलब्ध आहेत. या मुलाखतींमधून शेकडो मान्यवरांच्या जीवन-संघर्षाच्या कथा त्यांनी जगासमोर आणल्या.
शिवाय ‘विचार आणि व्यक्तित्व विकास’, ‘करण्याचे दिवस कळण्याचे दिवस’, ‘सायंकालीन संवादमाला’ या मालिकांद्वारे अध्यात्मापासून आरोग्यापर्यंतचे विविध पैलू लोकांसमोर ठेवून त्यांना जीवनसन्मुख करण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी सातत्याने केला. त्यांनी स्थापन केलेल्या विविध ‘सपोर्ट-ग्रुप’द्वारे व्यसनमुक्ती ते मधुमेहनियंत्रण अशा विविध विषयांवरील त्यांचे समुपदेशन नियमितपणे सुरू असायचे. ‘ग्लोबल वेध’द्वारे त्यांनी जागतिक किर्तीच्या प्रज्ञावंतांचा प्रवासही रसिकांसमोर आणला आहे. हा सर्व ऐवज ‘आवाहन’द्वारे यूट्यूबच्या माध्यमातून जगभर सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे. डॉक्टरांचे लाखो चाहते या मार्गदर्शनाचा वारंवार लाभ घेत असतील, या शंका नाही.
‘करोनाच्या काळात भावनिक स्वास्थ्य कसे जपायचे?’ हे डॉक्टरांचे सुमारे पंधरा मिनिटांचे यूट्यूबवरील एक भाषण एक दिवस अचानक समोर आले आणि मी त्यांच्या कामाकडे आकर्षित झालो. ‘भाषण’ हा शब्द येथे तसा गुळगुळीत वाटतो, कारण त्यांनी आपल्या आंतरिक उमाळ्याने लोकांशी केलेले ते एक प्रेमळ ‘हितगुज’ होते. त्याने प्रभावित होऊन मी त्यांच्या कामाविषयी अधिक माहिती घेत गेलो आणि मग अलिबाबाच्या गुहेत जाऊन कसा अडकलो, ते माझे मलाच कळले नाही. त्या गुहेतून बाहेर पडण्याचा ‘मंत्र’ मी नंतर विसरलो आणि विशेष म्हणजे मला त्याचे अजिबात दुःख नाही. हळूहळू डॉक्टरांशी माझे ‘हाय-हॅलो’पर्यंतचे नाते निर्माण झाले.
.................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................
कोरोनाची महाव्याधी सर्वत्र पसरलेली असताना आणि जग हवालदिल झालेले असताना नेमके काय करायचे ते कुणालाच कळत नव्हते. देशोदेशीचे डॉक्टर्स, सत्ताधारी, राजकीय नेते, नोकरशहा, विचारवंत सारे जणू हतबल झाले होते. अमेरिका-रशियासारख्या महासत्ताही जणू लुळ्यापांगळ्या झाल्या होत्या. या जगड्व्याळ महाव्याधीत माणूस आणि त्याची संस्कृती पृथ्वीवरून नाहिशी होणार की काय, या भीतीनं जगाला ग्रासून टाकलं होतं. एक प्रचंड मानसिक आस्वास्थ्य आणि भयगंडानं माणूस हवालदिल झाला होता. डॉ. नाडकर्णी यांनी ओळखलं की, आता आपण आता अधिक सावधपणे, अधिक एकाग्रचित्त होऊन अधिक ताकदीनं कामाला लागलं पाहिजे. या अभूतपूर्व अडचणीतूनही सेवेची संधी कशी शोधून काढता येईल आणि सैरभैर झालेल्या लोकांना दिलासा कसा देता येईल याचा ते विचार करू लागले.
जगभरात अनेक ठिकाणी अशी संवेदनशील माणसे, डॉक्टर, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, आध्यात्मिक गुरू सकारात्मक जीवनपद्धतीविषयी बोलू लागले. त्यातील अनेकांना आपापल्या व्यापारी हितसंबंधांची काळजी घेत आपापल्या पंथाची भूमिकाही अप्रत्यक्षपणे पुढे रेटायची होती, पण डॉ. नाडकर्णी यांनी असा कोणताही सुप्त हेतू न बाळगता विज्ञाननिष्ठ माहिती सोप्या पद्धतीनं आणि निस्पृहपणे जगासमोर आणण्याचा मार्ग निवडला.
कोरोनाला दूर ठेवण्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकजण म्हणत होता की, ‘हात धुवा’ पण त्या हाताच्या मागे एक मन आहे, त्याचे नेमके काय करायचे ते कुणालाच उमजत नव्हते. ‘सावध रहा, घाबरू नका’ असे प्रत्येक जण म्हणत होता, पण ‘सावध राहणे’ म्हणजे काय, ‘घाबरू नये’ म्हणजे नेमके काय हे कुणालाच माहीत नव्हते. समाज अशा हतबल आणि पराभूत मानसिक अवस्थेत असताना डॉ. नाडकर्णी शांत डोक्याने मैदानात उतरले आणि त्यांनी धीरोदात्तपणे आपले लोकजागरणाचं काम सुरू केलं. त्या अनुषंगानं त्यांनी सातत्यानं मुलाखती घेतल्या, भाषणं दिली लोकांशी उमाळ्यानं हितगुज केलं.
माझ्या जगण्याचं नेमकं काय करायचं? मी म्हणजे कोण, ‘मी’च्या शोधात, ‘मी’चा स्वीकार, मूर्तीरूप ईश्वराकडे कसं पहावं, जन्म आणि पुनर्जन्माचे कोडे, ॲव्हेंजर्स आणि भावनांचे नियोजन, ध्यासाची व्याख्या, जीवनाचं श्रेयस आणि प्रेयस, उत्तमाचा ध्यास, विराम आणि नवे शोध, एक कुलूप अनेक किल्ल्या, ‘कोरोना के साथ भी, कोरोना के बाद भी, कोरोना आणि ॲफ्ल्यूएन्झा, अवघा रंग एक झाला, चिंतेचे झटके आणि झोपी जाणारे लॉजिक, परिस्थिती आणि दृष्टिकोन, धीर आणि त्याची गोमटी फळे, ‘जग बोधे निववावे…’, विचारांचे पूर्वग्रह आणि कसोटीचा काळ, ध्यासाची व्याख्या, बंद श्वास मोकळा श्वास... असे त्यांच्या विषयांचे मथळे पाहिले तरी त्यांच्या कामाची दिशा स्पष्ट होते.
आजूबाजूच्या प्रश्नांना शास्त्रीय दृष्टिकोनातून स्पर्श करत, हिंम्मत न हारता परिस्थितीवर मात करत, सर्वसामान्य माणसाला पुढे कसे नेता येईल, त्याला योग्य दिशा कशी दाखवता येईल याचा विचार डॉक्टरांनी त्या काळात अटीतटीनं केला. एवढेच नाही, तर मानसिक आरोग्याच्या पल्याड जात माणसाची जगण्याची प्रेरणा कायम प्रसन्न, टवटवीत ठेवण्याचे काम नेटानं करत राहणं, त्यांनी आपलं जीवित कर्तव्य मानलं.
त्यांच्या ऑडिओ लेखमाला हा कानांनी साजरा करायचा, तर दृकश्राव्य व्याख्यानांची आणि मुलाखतींची मालिका हा डोळ्यांनी, कानांनी आणि मनानं साजरा करायचा सोहळा असायचा. आपली सगळी कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये उत्तमरीत्या कार्यरत राहावीत, याचं भान या कार्यक्रमांची रचना करताना डॉक्टरांनी नेहमीच ठेवलं. त्यांच्या सार्याच कार्यक्रमांचं पॅकेजिंग अतिशय आकर्षक आणि बंदिस्त असायचं. कमीत कमी शब्दांत, कमीत कमी वेळेत, जास्तीतजास्त माहिती, लोकांना सुबोध पद्धतीनं देण्यावर त्यांचा भर असायचा. वेध (VEDH) किंवा आवाहन (Audio Visual Aids for Health and Nutrition) ही अर्थपूर्ण आद्याक्षरं डॉक्टरांनी लीलया जुळवून आणली, त्यांचे अर्थपूर्ण बोधचिन्हंही तयार केली. चंद्रकोर ते पूर्णचंद्र हे ‘आयपीएच’चं बोधचिन्ह त्याचं एक बोलकं उदाहरण आहे. ते स्वतः एक उत्तम कॉपी-रायटर होते. नाटक-सिनेमासारख्या झळझळीत (की बुळबुळीत) क्षेत्रातही त्यांनी मुशाफिरी केलेली असल्यामुळे एखादे ‘प्रॉडक्ट’ परिपूर्ण स्वरूपात कसं डिझाईन करायचं, याची त्यांना उत्तम समज होती.
‘वेध’मधील मुलाखती वगळता अन्यत्र भेटणारे डॉक्टर साधारणपणे अर्ध्या तासात, प्रसंगी पंधरा ते वीस मिनिटांत कोणताही विषय उत्तम पद्धतीनं मांडत. मांडणी अर्थात सुसंवादाची, विषयाचा पक्का अभ्यास आणि तयार मुद्दे अशी त्यांची तयारी असायची. प्रारंभ, मध्य, शेवट याचं उत्तम भान ठेवून ते बोलत. त्यांच्यातील मिष्किलपणा सतत जागा असायचा आणि त्यामुळे गंभीर विषयसुद्धा अनेकदा हलके-फुलके होत राहत.
‘वेध’मधील मुलाखती बर्याचदा प्रदीर्घ स्वरूपाच्या असत, पण त्या कधी कंटाळवाण्या किंवा एकसुरी झाल्या नाहीत. त्यामागील नियोजनाचं त्यांचं अफलातून रचना कौशल्य पाहून रसिक खूश होऊन जात. वक्ता आणि विषय या निवडीतच त्यांच्या मुलाखतींचे अर्धे यश सामावलेलं असे. कोणतीही मुलाखत निवडावी आणि त्यात रंगून जावे हा अनेकांचा अनुभव आहे. एखादी मैफल रंगवावी तसे ते बोलत आणि समोरच्यालाही बोलतं करत.
मन आणि मनाचं एकूणच शास्त्र यांविषयी डॉक्टरांचा दांडगा अभ्यास होता. मराठी, इंग्रजी आणि संस्कृत भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. ते जगभर सर्वत्र फिरत. विशेष म्हणजे हिमालयातही अगदी अवघड ठिकाणी त्यांनी प्रवास केलेला आहे. जगाच्या, भारताच्या आणि विशेषत महाराष्ट्राच्या जडणघडणीची संस्कृती, इतिहास भूगोल त्यांना उत्तमरीत्या माहीत होता. स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या द्रष्ट्या नेत्यांच्या कर्तृत्वाचा त्यांचा सखोल अभ्यास होता. वेद, उपनिषदे, पुराणातील जुनी सूत्रे, संदर्भ, व्यक्तीं यांचे अचूक संदर्भ देत हाती घेतलेल्या विषयाचं सहजसोपं आणि तितकंच मार्मिक विवेचन ते करत असत. शंकराचार्यांपासून विनोबांपर्यंत, ॲरिस्टॉटल-प्लेटोपासून रिचर्ड डॉकिन्स, हरारी, कामू, सार्त्र यांच्यापर्यंत समकालीन विचारवंतांची, लेखक-कवींची उद्धरणं आणि संदर्भ ते चपखलपणे देत असत. ‘ज्ञानेश्वरी’, ‘दासबोध’ आणि ‘तुकारामाची गाथा’ यांना ते महाराष्ट्राची प्रस्थानत्रयी मानत. मोठ्या व्यासंगाशिवाय अशी मांडणी करणे शक्य नाही हे येथे स्पष्टच आहे, पण ‘ये हृदयीचे ते हृदयी’ घालण्याचा डॉक्टरांचा त्यामागील उमाळा ज्ञानेश्वरांशी नाते सांगणारा होता.
त्यांचे गुरू म्हणता येतील असे डॉ. अल्बर्ट एलिस यांच्या ‘विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती’ (Rational Imotive Behaviour Therapy) या ग्रंथाने त्याना आपल्या कामाची नेमकी दिशा दाखवली आणि ती पकडून पुढे जाताना त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. शरीर-मनाच्या पल्याड जात व्यक्तीकडून समष्टीकडे नेणारा एक समृद्ध प्रवास, असं त्यांच्या कामाचं वर्णन करावं लागेल. ते म्हणायचे- ‘मी पेशंट्सना भेटत नाही, तर ‘माणसां’ना भेटतो...’ जणू त्यांच्या कार्याचं हे मुख्य सूत्रच होतं!
‘माणसाचा, त्याच्या मनाचा शोध’ हा त्यांच्या एकूणच विचारविश्वाचा गाभा होता. विचार, भावना आणि कृती अर्थात ज्ञानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोग असा सुंदर नातेसंबंध प्रस्थापित करत वेदान्तविचार आणि मानसशास्त्र एकच आहे, असं प्रमेय मांडून ते सिद्ध करून दाखवणं, ही गोष्ट दांडग्या व्यासंगाशिवाय अशक्य आहे. त्यांचा व्यासंग दांडगा होताच, पण त्याच्या उद्गानासाठी आवश्यक असणारे त्यांचं प्रातिभबळ हीसुद्धा त्यांची मोठी जमेची बाजू होती.
‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण खूप काही शिकू शकलो, ही शिकण्याची वृत्ती महत्त्वाची’ असं ते म्हणत. ‘नव्या दमानं कामाला लागण्यापूर्वीची कोरोना ही एक छोटीशी विश्रांती होती’, असं आवर्जून सांगत. यातून त्यांनी किती दुःखी माणसांना दिलासा दिला, जगण्याविषयी त्यांच्या मनात उमेद निर्माण केली याविषयी अभ्यास व्हायला पाहिजे. “माणसाला आनंदी रहायचं असेल, तर त्याला अनिश्चीततेचा स्वीकार करता आला पाहिजे, आपल्या नियंत्रणातील आणि नियंत्रणाबाहेरील गोष्टीतला फरक ओळखता आला पाहिजे. शांतपणे जगायचे असेल तर 'आदर्श शांत परिस्थिती' कधीच अस्तित्वात नसतं, हे त्याने लक्षात घेतलं पाहिजे,” अशी छोटी छोटी विचारसूत्रं अतिशय प्रभावीपणे ते आपल्या बोलण्यात पेरत असत.
“अहंकार सुटत नसेल तर त्याला आपण चांगल्या कामासाठी हाती धरले पाहिजे. आपल्या मनात फक्त चांगलेच विचार येतात असे नाही, तर वाईटही येत असतात आणि त्याला कोणीच अपवाद नाही, आपल्याला समस्येचं भयंकरीकरण किंवा सुमारीकरण करण्याची सवय असते, आदिम भावना उदात्त भावनांवर नेहमीच कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतात, भीतीनं घाबरून जाण्याचं कारण नाही, तर तिचं रूपांतर चांगल्या कामात करता आलं पाहिजे, चांगल्या कामात सातत्य ठेवायचं, तर आतून सतत धक्के बसत राहिले पाहिजेत, नम्रता वाढवायची असेल, तर आपल्या अवतीभोवती असणार्या नम्रतेच्या शिखरांकडे पाहिलं पाहिजे…” यासारख्या शेकडो ‘युक्तीच्या गोष्टी’ सांगत डॉक्टर समोरच्या माणसाला आपलेसे करून घेत. “मलाही प्रॉब्लेम्स आहेत, मलाही टेन्शन येते, मीही निराश होतो”, असं जेव्हा ते म्हणत, त्या क्षणी समोरचा माणूस त्यांचा ‘भिडू’ झालेला असे. ‘हा माणूस आपले प्रश्न सोडवील’, असा विश्वास त्या क्षणीच त्याच्या मनात निर्माण झालेला असे.
डॉक्टरांच्या मुलाखती-प्रवचनं ऐकून, त्यांच्या पुस्तकांच्या वाचनामुळे माणसाला जटील प्रश्नांची उत्तरं मिळायला मदत व्हायची. सुखाचा, आनंदाचा, दुःखाचा अर्थ कळायला लागायचा, माणुसकीची, चांगुलपणाची महत्ता लक्षात यायला मदत व्हायची. इतकंच नाही तर त्या चांगुलपणाचा, माणुसकीचा, सहानुकंपेचा झेंडा खांद्यावर घेणारा नवा माणूस त्यांच्या प्रेरणेमुळे तयार व्हायचा! माणसानं विघातक आदिम भावनांकडून आश्वासक अशा अधिक उन्नत भावनांकडे कृतिशील पद्धतीनं जाणं, ही काळाची गरज आहे, या त्यांच्या सततच्या प्रतिपादनाचा दुसरा अर्थ तरी काय?
डॉक्टरांची नाटकं, चित्रपट, कथा, कविता, ललितगद्य हा सारा प्रवास, माणसाला त्याच्या बधिर संवेदनातून बाहेर काढून प्रत्यक्ष सकारात्मक कृतीकडे नेणारा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यांच्या सगळ्याच कृती माणसाला त्याच्या माणूसपणाचं मूल्य समजावून देत जाणीवेच्या नव्या ध्रुवाकडे घेऊन जाणार्या आहेत.
पैसे कमावणे हा या डॉक्टरांचा कधीच हेतू नव्हता. पैसाच काय, आपण मांडत असलेल्या विचारांचे श्रेयसुद्धा ते कधी घेत नसत. प्रत्येक वेळी ते संबंधित माहितीचा, त्या विचारांचा स्रोत ते आवर्जून नमूद करत. त्यांच्या बोलण्याला मनोव्यापार-शास्त्राचा आधार असायचा, पूर्वसुरींचे पाठबळ असायचे आणि विश्वव्यापी स्वरूपाची करूणा त्यामागे झुळझुळत असायची. ज्याच्या मनात ‘विश्वाचे आर्त’ असं ‘प्रकाशित’ झालं आहे, त्याचं बोलणं कानी आलं की, दुसर्या क्षणापासून माणूस त्यात गुंतून पडणार आणि प्रकाशाची कवाडं त्याच्यासमोरही खुली होणार, यात आश्चर्य ते काय! आणि हेच डॉक्टरांच्या लोकप्रियतेचं गमक होते.
डॉ. नाडकर्णी हे नुसती पोपटपंची करणारे निरुपणकार नव्हतं. ते कर्मकांडावर विश्वास ठेवत नसत. प्रसंगी ते धाडसी स्वरूपाची धर्मचिकित्साही करत. त्यासाठी ते ‘भाष्यकाराते वाट पुसतू’ या चतुर मार्गानं पुढे जात. हा चतुरपणा म्हणजे बनचुकेपणा नसून विनयातून आलेलं शहाणपण आहे, हे समजून घेतले पाहिजे. आपल्या सहकार्यांना मार्गदर्शन करतानासुद्धा ते हातचं काही राखून ठेवत नसत. अगदी दिलखुलासपणे बोलत. आपल्या फायद्या तोट्याचा विचार न करता, व्यावसायिक यशाची सारी सूत्रं ते सहकार्यांना उलगडवून दाखवत. सध्याच्या भाषेत सांगायचं तर आपल्याकडील सारे पत्ते ते बिनधास्तपणे सर्वत्र ओपन करत असत. ‘इदं न मम’ वृत्ती हा डॉक्टरांचा एक अतिशय दुर्मीळ असा गुण होता. आपल्या कामाची कुणी नोंद घ्यावी आणि आपला उदो उदो करावा, या भावनेच्या पलीकडे ते केव्हाच गेले होते.
‘ऐसी कळवळ्याची जाती, लाभाविण घडे प्रीती’ असं तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे. ते डॉक्टरांच्या बाबतीत शब्दशः खरं होतं. शेतकरी या अतिशय उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकाच्या आत्मिक आणि भौतिक उन्नतीच्या दृष्टीने त्यांनी निर्माण केलेली ‘कर्ता शेतकरी’ ही दृकश्राव्य मालिका हे याचं एक उत्तम उदाहरण!
‘शेतकरी आत्महत्या’ हा विषय त्याज्य न मानता त्यांनी स्वतः पुढे येऊन त्यातील बारीक-सारीक प्रश्नांची उकल करून, त्यातील समस्यांचा-सामर्थ्याचा शोध घेऊन, मूलभूत स्वरूपाचे चिंतन-मंथन करून शेतकऱ्यांच्या आणि एकूण समाजाच्या सुदृढ वाढीसाठी आवश्यक असणारी ‘कर्ता शेतकरी’ ही अभिनव मालिका जगासमोर आणली. आजच्या ऑनलाइनच्या फुटकळ गदारोळात उठून दिसणारी एक अद्वितीय कलाकृती म्हणून ती मालिका कायम जगासमोर राहील. या मालिकेचे जवळपास सगळेच्या सगळे म्हणजे ४२ भाग मी पाहिले आहेत. शेतकरी हे खरं तर या मालिकेचे एक निमित्त आहे. समाजातील सर्वांनाच या मालिकेचा जगणे समृद्ध करण्यासाठी दीपस्तंभासारखा उपयोग होऊ शकतो.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
डॉक्टरांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार मिळावा आणि पद्मश्रीसाठी त्यांची केंद्र शासनाकडे शिफारस व्हावी, असं पत्र मी शासनाकडे पाठवलं होतं (त्याचं पुढे काय झालं माहीत नाही). त्याची प्रत डॉ. नाडकर्णी यांनाही मी पाठवली होती. त्यावर त्यांनी मला दिलेले उत्तर असे -
“नमस्कार.... तुम्ही तुमचं मनोगत किती मन:पूर्वक व्यक्त केलं आहे.... माझ्याकडे शब्द नाहीत....अशी दाद मिळाली की पुढे जायला आणि काम करण्यासाठी उत्साह मिळतो... तुम्ही मला दोन्ही पुरस्कार दिलेच आहेत... ते स्वीकारून पुढे जाऊया... अधिकृत पद्धतीनं मिळाले काय, न मिळाले काय... तुमच्यासारख्या रसिकांचे मैत्र हाच मोठा पुरस्कार.”
डॉक्टरांच्या कामाचं तपशीलवार मूल्यमापन हा एका मोठ्या संशोधनाचा विषय होईल. त्यांच्या आणि त्यांनी उभ्या केलेल्या संस्थेच्या कामावर एकाहून अधिक विद्यार्थ्यांना पीएच.डी. करता येईल. त्यानिमित्ताने त्यांच्या सगळ्या कामाचे उत्तम डॉक्युमेंटेशनही होऊ शकेल. ‘पीएच.डी. गुरू’ म्हणून काम करणार्या जागरूक प्रोफेसरांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे.
‘देणार्याने देत जावे, घेणार्याने घेत जावे, देता देता एक दिवस घेणार्याचे हात घ्यावे…’ ही विंदांची कविता सार्यांना माहीत आहे. डॉ.नाडकर्णी हे स्वतः देणाऱ्यांपैकी होते, पण समाजाची दातृत्वभावना जागवण्याचं कामही त्यांनी केलं. कोणत्याही चिरस्थायी कामगिरीचे ते प्रमुख कारण असतं. ते नसताना आता एवढंच म्हणावंसं वाटतं- डॉ. नाडकर्णी यांचे बोट धरून आपण सार्यांनी, अंधारातून प्रकाशाकडे नेऊ पाहणार्या त्यांच्या या समाज प्रबोधनाच्या यात्रेत हिरीरीने सहभागी झालं पाहिजे. अंधारातून प्रकाशाकडे निघालेला माणूस आपोआप मृत्यूकडून अमृताकडे जाऊन पोहोचतो, आणखी काय हवं?
.................................................................................................................................................................
लेखक प्रल्हाद जाधव हे राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातून संचालक म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांची नाटके, एकांकिका, कविता आणि अन्य ललितलेखन त्यांच्या pralhadjadhav.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
pralhadjadhav.one@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.


Post Comment