शिरोजीने तीन महिने काही लिहिले नव्हते. तो शांत राहून या काळात फक्त निरीक्षण करत होता. त्याने आपल्या रोजनिशीमध्ये लिहिलं आहे – “शेवटी कसोटीचा काळ सुरू झाला. २०१४पासून मोदी सरकार अनेक क्लृप्त्या करून आपण स्वातंत्र्यानंतरचे सगळ्यात यशस्वी सरकार आहोत, असं मिरवत होतं. अल्पसंख्याक लोकांच्या लांगूलचालनामधून भारत बाहेर पडला आहे आणि आपल्या ‘विश्वगुरू’त्वाच्या सिंहासनावर आरूढ झाला आहे, असं एक नॅरेटिव्ह भारतीयांच्या मनावर बिंबवलं गेलं होतं. अमृतकाल काय, विकास काल काय, मोदीकालीन भारताला अनेक विशेषणांनी सजवलं गेलं होतं. एका विश्वगुरूने भारताला ८०० वर्षांच्या गुलामीमधून बाहेर काढलं आहे, असं सांगितलं जात होतं.”
शिरोजी खरं तर या बडबडीला कंटाळला होता. भारतासारख्या विकसनशील देशाचा पंतप्रधान कितीसा समर्थ असणार होता? पण नाही! विश्वगुरू, अवतार, समर्थ राजकारणी, धुरंधर! जितकी विशेषणं भारताला, त्याच्या दुप्पट त्याच्या नेत्याला अशी अवस्था!
हे सगळं नॅरेटिव्ह अत्यंत जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक सेट केलं गेलं होतं. एक छायाचित्र त्या काळी व्हायरल केलं गेलं होतं. मोदीजी एका खुर्चीवर बसले आहेत आणि समोरच्या टेबलावर हात ठेवून आणि पुढे वाकून जगभरातल्या अनेक मोठ्या देशांचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान मोदीजी काय म्हणत आहेत, हे ऐकत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प म्हणू नका, रशियाचे पुतिन म्हणू नका, चीनचे झी म्हणून नका, फ्रान्सचे मॅक्रॉन् म्हणू नका, जर्मनीच्या अँगेला मार्केल म्हणू नका… सगळे मोदीजींच्या भोवती! शिरोजीसारख्या चाणाक्ष इतिहासकाराला हे छायाचित्र मॉर्फ केलेलं आहे, हे बघताक्षणीच कळलं. भक्त मात्र ते पाहून उड्या मारू लागले. पुढे फॅक्ट चेक करणाऱ्या अनेक साइट्सनी हे छायाचित्र मॉर्फ केलेलं आहे, असं सांगितलं. आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ जगभरच्या वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेलं खरं छायाचित्रसुद्धा त्यांनी दिलं. त्यात ट्रम्प मध्यभागी बसलेले आहेत आणि मोदी वगैरे टेबलाभोवती उभे राहून ऐकत आहेत, असं चित्र दिसत होतं.
भक्त यावर चिडले. ट्रम्पतात्या मोदीजींचा जलवा बघून चिडला आणि त्याने छायाचित्र मॉर्फ करून जगभरातल्या वर्तमानपत्रांत छापायला लावलं, असे मेसेजेससुद्धा भक्तांनी व्हायरल केले.
मोदीजी केवळ भारताचेच नव्हे, तर सगळ्या विश्वाचे नेते आहेत, असंही चित्र तयार केलं गेलं होतं. मोदीजी हे जगातले सर्वांत शहाणे, विद्वान आणि लोकप्रिय नेते आहेत, असं ‘युनायटेड नेशन्स’च्या ‘ओपिनियन पोल’मध्ये सिद्ध झालं आहे, असाही एक मेसेज व्हायरल केला गेला. युनायटेड नेशन्सचा सगळा वेळ त्या काळी जगातल्या एकाहून एक अहंकारी नेत्यांना चुचकारून एकत्र आणून त्यांच्यात चर्चा घडवण्यात जात असे. जगात समन्वय साधण्यासाठी तयार झालेली संस्था आपल्या पायावर धोंडा मारून घेणारा, असा आचरट ओपिनियन पोल का म्हणून करेल? पण नाही! भक्त नाचायला लागले. जितका आय क्यू कमी तितका भक्त मोठा! जितकं वाचन कमी तितका भक्त तालेवार!
स्वतःचा खोटा मोठेपणा मिरवण्याची ही सगळी लक्षणं एखाद्या हुकूमशहाला शोभून दिसतील, अशी होती. एखादा लोकशाहीवादी नेता असं कशाला करेल? त्याला बिचाऱ्याला एक दोन टर्म राहायचं असतं. लोकशाहीमध्ये लोकप्रियता अशी किती काळ तुमच्या मागे राहू शकते, हे ओळखून लोकशाहीतील लोकशाहीवादी नेते अंथरूण बघून पाय पसरत असतात. मोदीजींचं सगळंच वेगळं. एकूण भाषा अशी की, येती २०० वर्षं आता भाजपच! पण या पक्षाचा वोट शेअर बघितला, तर असं काही घडेल असं दिसत नव्हतं. भाजप मुख्यतः इतर पक्षांशी आघाड्या करून आणि नको नको ते जुमले करून सत्तेत राहिली होती. शिरोजीनं हे वेळोवेळी व्यवस्थित आकडेवारी देऊन दाखवूनसुद्धा दिलं होतं!!
तसं बघायला गेलं, तर कुठालाही दिखावा किती दिवस टिकू शकणार असतो? कधी हे ‘नॅरेटिव्ह’, तर कधी ते ‘नॅरेटिव्ह’ असं करत करत ११ वर्षं निघून गेली होती. आता पितळ हळूहळू उघडं पडू लागलं होतं. २५ सालच्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या दिल्ली बॉम्बस्फोटानंतर मोदीजींनी पाकिस्तानवर हल्ला वगैरे काही केला नव्हता. पूर्वी झालेल्या प्रत्येक अतिरेकी हल्ल्यानंतर मोदीजींनी असे हल्ले केले होते. आता मात्र मोदीजी गप्प होते. भारतातल्या अनेक पत्रकारांनी मोदीजींच्या या गप्प बसण्याच्या कारणांचं विश्लेषण केलं. त्यांच्या मते मोदीजी गप्प होते, कारण पाकिस्तान आणि चीन भारताच्या विरोधात एकत्र आले होते.
संपूर्ण जगात अशी चर्चा होती की, या युद्धात चीनने तयार केलेली ‘किल-चेन’ भारतीय विमानांविरुद्ध वापरली होती. म्हणजे विमान पाडण्याची यंत्रणा! शत्रूचं विमान आकाशात झेपावल्यापासून सॅटेलाइट्सद्वारा त्याच्यावर लक्ष ठेवणं, आपल्या हवाई राडार यंत्रणेला सावध करणं, आपल्या फायटर जेट्सना हल्ला करणाऱ्या विमानाचा अतापता क्षणोक्षणी सांगत राहणं आणि हल्ला करायला येणाऱ्या विमानाच्या लक्षात येण्याआधी त्याच्यावर क्षेपणास्त्राचा मारा करणं, अशी ही मालिका होती.
फार उशीर होईपर्यंत भारतीय विमानांच्या रडारवर दिसणार नाही अशी क्षेपणास्त्रं चीनने पाकिस्तानला दिली होती आणि त्यांनी भारतीय विमानांचा घात केला, अशी चर्चा ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर जगभर सुरू होती. भारतानं या चर्चेला फारसं उत्तर दिलं नव्हतं. शिरोजीनं आपल्या रोजनिशीमध्ये हे सारं विस्तारानं लिहिलं होतं आणि त्यावर स्वतःचा म्हणून एकच शेरा लिहिला होता - “खरेखोटे देव आणि मोदीजी जाणो”! इथं शिरोजी स्वतःला सेफ ठेवू पाहत होता, असं काही वाचकांना वाटेल, परंतु तसं काही नव्हतं. शिरोजी फक्त इतिहासकार होता. जी काही चर्चा होती, ती तो केवळ नोंदवत होता. इतिहासकारानं इतिहासाच्या दुधात स्वतःच्या मतांचं पाणी कशाला मिसळायचं? असो!
मोदीजी गप्प होते, हे सगळ्या जगाला दिसत होतं. उरी, पठाणकोट, पुलवामा आणि पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यांनंतर लष्करी कारवाया केल्या, तशा दिल्ली हल्ल्यानंतर केल्या नव्हत्या, हे कुणाला नाकारता येत नव्हतं आणि शिरोजी तेवढंच लिहीत होता. चीननं प्रत्यक्ष युद्धात न उतरता भारताची परिस्थिती अवघड करून ठेवली, अशी जगभर चर्चा होती. भक्त लोक मात्र हे मानायला तयार नव्हते. त्यांच्या दृष्टीने मोदीजी पाकिस्तानला व्यवस्थितपणे धडा शिकवत होते. भक्तांच्या दृष्टीनं, पूर्वीच्या अतिरेकी हल्ल्यांनंतर लष्करी हल्ले करणं, हे धडा शिकवणं होतंच, पण दिल्ली हल्ल्यानंतर मोदीजींनी हल्ला न करणं, हेसुद्धा धडा शिकवणंच होतं. भारत कधी हल्ला करेल, याविषयी विचार करत पाकिस्तानी सैन्य चार महिने निवांत झोपू शकलं नव्हतं आणि मोदीजींचा हा ‘मास्टरस्ट्रोक’च होता, असं भक्तांचं म्हणणं होतं.
पाकिस्तानला धडा शिकवला आहे, तर पाकिस्तानमधून पुन्हा पुन्हा अतिरेकी हल्ले का होत आहेत, हा साधा प्रश्न भक्त स्वतःला विचारत नव्हते! भक्तांचा सगळा आव असा की, मोदीजी कुठल्याही क्षणी ‘अखंड भारत’ तयार करतील! म्हणजे पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि ब्रह्मदेश असे देश एकत्र करणं! प्राचीन काळी भारतीय संस्कृती जिथं जिथं होती, ते सगळे भूभाग एकत्र करायचे! इथं, १२ वर्षं झाली पाकिस्तानचे हल्ले थांबवणे शक्य झालं नव्हतं आणि हे म्हणे ७ सार्वभौम देश भारतात विलीन करून ‘अखंड भारत’ तयार करणार! आज २१२६ साली आम्ही ‘शिरोजीच्या बखरी’चे संपादक म्हणून हे लिहू शकत आहोत. खूंखार भक्तांच्या त्या काळात आम्ही हे लिहूच शकलो नसतो.
शिरोजीने रोजनिशीमध्ये लिहिलं आहे - ‘‘अखंड भारत आपण नंतर करूच, परंतु त्याआधी मोदीजींना परत परत होणारे हल्ले थांबवायला सांगायचे का?’’, असं भक्तांना विचारल्यावर भक्त चिडून अंगावर येतात. थोडक्यात, ‘स्ट्राँग लीडर’ ही प्रतिमा भक्तांच्या मनात जिवंत असली, तरी बाहेरच्या जगात आता ती भंगायला लागली होती. तिची जी काही एकसंधता असेल, ती फक्त भक्तांच्याच भाबड्या हृदयात उरली होती!
हा विमानांविषयीचा गोंधळ होतो न होतो, तोच अमेरिकेचे अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प आणि मोदीजी यांचं काहीतरी फिस्कटलं! भारत-पाकिस्तान युद्ध थांबवायला ट्रम्प मध्यस्थ होते. त्याचं क्रेडिट भारत आणि पाकिस्ताननं आपल्याला द्यावं, अशी ट्रम्प यांची इच्छा होती. आपल्याला शांततेचं नोबेल पारितोषिक द्यावं, अशी शिफारसही भारतानं आणि पाकिस्ताननं करावी, अशीही ट्रम्प यांची अपेक्षा होती.
पाकिस्ताननं संपूर्ण जगासमोर ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याचं मान्य केलं आणि ट्रम्प यांना नोबेल द्यावं, अशी शिफारससुद्धा केली. मोदीजी मात्र हे करू शकत नव्हते. ‘घर में घुसकर मारेंगे’ वगैरे भाषा मोदीजींनी केली होती. युद्ध भारतानं जिंकलं आहे, असाही दावा मोदी सरकारनं केला होता. मग मध्यस्थी कसली? तह होऊन युद्धबंदी झाली, असं नॅरेटिव्ह तयार झालेलं मोदीजींना चालणार नव्हतं. ‘मोदीची ताकद हीच तुमची सुरक्षा’ असं नॅरेटिव्ह भारत १२ वर्षं ऐकत होता. आणि आता हा ट्रम्पतात्या वाटेल त्या अपेक्षा करत होता! मोदीजी या अपेक्षा पूर्ण करू शकणार नव्हते. ट्रम्प अपमान करत सुटला! भक्तांना फार राग आला, परंतु करणार काय!! स्वतः मोदीजी यावर गप्प बसले होते!
‘मी अमेरिकेत निर्यात होणाऱ्या भारतीय आणि पाकिस्तानी मालावर टॅरिफ वाढवीन, अशी धमकी देऊन दोन्ही देशांना युद्ध थांबवायला लावले’, असं ट्रम्प महाशय किमान ७० वेळा तरी जगाच्या मीडियासमोर बोलले. पाकिस्तानने त्याला विरोध केला नाही, म्हणून पाकिस्तान ट्रम्प महाशयांचा लाडका झाला. मोदीजी ट्रम्प यांचं नाव न घेता म्हणाले की, भारताचा युद्ध थांबवायचा निर्णय स्वतःचा होता. त्यावर ट्रम्प यांनी मोदीजींचे अजून अपमान केले. भारताला अमेरिकेची अॅपॅची हेलिकॉप्टर पाहिजे होती, म्हणून मोदीजींनी फोन करून - ‘मे आय सी यू सर’, अशा दारुण शब्दात विनंती केली, असं ट्रम्प म्हणाले.
यावरही मोदीजी गप्प बसले. ‘मी असे काहीही म्हणालेलो नाही’, असं मोदीजी म्हणाले नाहीत. पुढे ट्रम्प यांनी भारतीय मालावर ५० टक्के टॅरिफ लावले. भारतातून अमेरिकेला होणारी निर्यात मंदावली. फॉरिन एक्सचेंजची गंगाजळी कमी होऊ लागली. रुपया कोसळू लागला. मग मोदी सरकारनं अमेरिकेशी ‘ट्रेड डील’ केलं. भारत अमेरिकेतून येणाऱ्या उत्पादनांवर ५ ते ३० टक्के टॅरिफ लावत होता. ते खूप कमी करण्यात आले. काही मालावर तर शून्य टक्के करण्याचं भारतानं मान्य केलं. त्या बदल्यात अमेरिकेनं आपले टॅरिफ ५० वरून १८ टक्क्यांवर आणले. भारताचे टॅरिफ पूर्वी अमेरिकेच्या टॅरिफपेक्षा कमी होते. आता उलटी परिस्थिती झाली. म्हणजे मोदीजींचा अजून अपमान.
ट्रम्प ज्या ज्या शिखर परिषदांना हजर राहणार आहेत, त्या मोदीजी टाळू लागले. तिथं ट्रम्पतात्या काहीतरी तोंडावर बोलला तर काय ही भीती! विरोधकांनी सोशल मीडियावर मोदीजींची भयंकर चेष्टा सुरू केली. विरोधकच नाहीत, तर हौशेनवशेगवशे यू-ट्यूबरसुद्धा यात उतरले. अनेक बाबतीत चेष्टा सुरू झाली!
मोदीजींचे परदेशी राष्ट्रप्रमुखांना मिठ्या मारणं, त्यांच्याबरोबर गप्पा मारताना उगीचच गडगडाटी हास्य करणं, मोदीजींचं विचित्र इंग्रजी, भाषण करताना चुकलेले मोदीजींचे उच्चार अशा कितीतरी गोष्टी! मोदीप्रणित भाजपच्या आयटी सेलनं अशाच गोष्टी राहुल गांधी यांच्याबाबतीत केल्या होत्या. राहुल गांधी यांचे व्हिडिओ मॉर्फ करून दाखवायला लागत होते. इथं मोदीजींची वाक्यं जशीच्या तशी दाखवली, तरी मौज निर्माण होत होती. भारतीय जनता हे सगळं बघत होती. विश्वगुरुत्वाचा भारतात रोज बडवला जाणारा ढोल, अशा रीतीनं फुटत चालला होता!
अमेरिका आणि इराण युद्धामुळे भारतात एलपीजीची कमतरता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर मोदीजींच्या गटारात नळी टाकून गॅस काढायच्या थापेवर तर भारतात गदारोळ माजला! भक्त सोडले, तर असा एकही भारतीय नव्हता की, जो या थापेवर हसला नव्हता. कुठलाही गॅस कॉम्प्रेस करून त्याचा सातत्यपूर्ण फ्लो तयार केल्याशिवाय तो गॅस इंधन म्हणून वापरता येत नाही, हे मोदीजींना माहीत नव्हतं. त्यामुळेच त्यांनी एक माणूस गटारात नळी टाकून, त्यातून गॅस घेऊन रस्त्याच्या कडेला चहा बनवत असल्याचं आपण पाहिल्याची थाप मारली होती. तीसुद्धा मुंबई आयआयटीच्या शास्त्रज्ञांसमोर.
मोदीकालीन भारतातले शात्रज्ञ इतके घाबरट होते की, त्यातल्या एकानेही असं करणं शास्त्रीयदृष्ट्या अशक्य असल्याचं त्यांना सुनावलं नव्हतं. या उलट मोदीकालीन भारतातले यू-ट्यूबर मात्र भन्नाट मामला होता. त्यांनी प्रचंड चेष्टा केली. मीम्स काय, शॉर्ट व्हिडिओ काय, लाँग व्हिडिओ काय – विचारू नका!
वर वर दिसायला ही गोष्ट फार नुकसान करणारी आहे, असं भक्तांना वाटत नव्हतं, परंतु त्यांच्या लक्षात एक गोष्ट येत नव्हती. मोदीजींनी गेल्या १२ वर्षांत भारताला एक ‘नेशन ऑफ नॅरेटिव्हज’ बनवलं होतं. फक्त नॅरेटिव्ह निर्माण करून देश भयंकर वेगानं प्रगती करतो आहे, असं चित्र तयार केलं होतं. नॅरेटिव्ह हा अचीव्हमेंटचा आणि बडबड हा विकासाचा पर्याय बनला होता, पण त्या फुग्यातली हवा आता निघून चालली होती.
भारत एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर उभा होता. शिरोजीनं हे सगळं पाहून नवीन बखर लिहायला घेतली -
- श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर
.................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................
पांडेजींवर खरं तर ठेला बंद करायची वेळ आली होती. युद्धामुळं मोदीजींच्या ‘विश्वगुरू’ भारतातला एलपीजीचा पुरवठा खंडित झाला होता. पांडेजींनी घरचा इंडक्शनचा मोठा स्टोव्ह आणून चहा विक्रीची व्यवस्था केली होती. भजी वगैरे पदार्थ बंद करून सँडविचेस, बिस्किटं, क्रीम रोल्स असा मेन्यू केला होता.
भास्कर, समर, राघव आणि राजू बसले होते. चहा सुरू होता. तेवढ्यात नाना आणि अविनाश आले. मागोमाग अच्युत आला. अच्युतने पॅटिस आणले होते. त्याने पॅटिसचा पुडा नोकराच्या हातात दिला. प्लेटमध्ये पॅटिस काढून द्यायला सांगितले.
भास्कर - पांडेजी, पुण्यात गटारं नाहीत, नाहीतर तुम्हाला पाइप टाकून चहा करता आला असता. (राघव आणि समर हसतात)
नाना - गटारांमध्ये खरंच मिथेन वायू तयार होतो. मोदीजी म्हणाले ते बरोबर आहे. कुणा अवलियानं तयार केला असणार तसा गॅस!
राजू - नाना, मिथेन नुसती नळी टाकून टॅप नाही करता येत. त्यासाठी टाकी करायला लागते आणि तिच्यात साठवायला लागतो गॅस. ५० ते ७० टक्के कॉन्स्न्ट्रेशन तयार झाल्याशिवाय मिथेन स्टोव्हमध्ये वापरता येत नाही. शिवाय फ्लो मीटर वगैरे लावायला लागतो, सतत एका प्रमाणात फ्लो मिळावा म्हणून.
समर - अजून एक गंमत म्हणजे गटारात प्युअर मिथेन तयार होत नाही. त्यात हायड्रोजन सल्फाइड असतं. त्याला ओल मिळाली की, हायड्रोसल्फ्युरिक अॅसिड तयार होतं. त्यामुळे स्टोव्ह, नळी आणि बर्नर यांना भोकं पडतात.
अविनाश - मोदीजींना माहीत नाहिये का हे?
भास्कर - नसणार माहीत.
अविनाश - काय बोलतो तू? मोदीजी भाषणात ओझरतं बोलले होते. परवा बौद्धिकात एक आदरणीय विचारवंत सांगत होते की, त्या चहावाल्यानं आपल्या स्टुलाखाली एक छोटंसं बायो-गॅस सयंत्र बसवलं होतं.
राजू - आणि वाजलं धडाम करून ते सयंत्र, तर पुढे १५ दिवस कमोडवर कसं बसायचं, हे विचारून घे त्या आदरणीय विचारवंताला!
(भास्कर, समर, राघव, पांडेजी आणि अच्युत - प्रचंड हशा)
अविनाश - चेष्टा नको आहे इथं! महत्त्वाचा विषय आहे हा!
राजू – अरे, सल्फ्यूरिक अॅसिडमुळे सयंत्र गंजून जाणार. त्यामुळे ब्लास्ट होणार! केमिस्ट्री आहे ही साधी.
अविनाश - मोदीजींना केमिस्ट्री येत नाही, असं म्हणायचं आहे का तुला?
भास्कर - येत असेल.
अविनाश - मग?
समर - पण या बाबतीत ते केमिस्ट्री येत नसल्यासारखे बोलत आहेत, असं लांबून बघणाऱ्या माणसाला दिसतंय ना!
राघव - त्यांनी एयर फोर्सला सल्ला दिला होता की, ढग असताना पाकिस्तानवर हल्ला करायला विमानं पाठवा, कारण ढगांमुळे पाकिस्तानी रडारवर आपली विमानं दिसणार नाहीत.
नाना – हो, म्हणाले होते ते तसं. मग?
राघव - मोदीजींचा हा सल्ला ऐकून अनेक लोकांना वाटून गेलंय की, मोदीजींना केमिस्ट्रीबरोबर फिजिक्ससुद्धा येत नाहिये.
नाना - म्हणजे? काय म्हणायचंय तुम्हाला?
समर - नाना, रडार रेडिओ लहरींवर काम करतं आणि रेडिओ लहरी आरपार जातात ढगांमधून.
राघव - आता यावर मोदीजींना फिजिक्ससुद्धा येत नाही, असं वाटलं कुणाला तर काय करू शकणार आहोत आपण? किती लोकांची तोंडं दाबायची आपण?
समर - (गालातल्या गालात हसत) आणि मोदीजी जेव्हा म्हणाले की, मी ‘नॉन बायोलॉजिकल’ आहे, तेव्हा लांबून बघणाऱ्या कुणाला वाटलं की, या बाबाजीला फिजिक्स आणि केमिस्ट्रीबरोबर बायोलॉजीसुद्धा येत नाही, तर काय करायचं आपण?
राघव – प्राचीन तक्षशीला विद्यापीठ बिहारमध्ये होतं, असं म्हणाले होते मोदीजी!
अविनाश – काय चुकलं त्यात?
राघव – तक्षशीला पाकिस्तानात रावळपिंडीजवळ आहे.
अविनाश - तुम्हा सगळ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे.
भास्कर - मोदीजींनी सायन्स वाचलं नाही. तू घटना वाचली नसणार, म्हणून असं बोलतो आहेस. टीका केली म्हणून तुरुंगात नाही टाकता येत घटनेप्रमाणं!
समर - पण मोदीजींनी निदान ‘एंटायर पोलिटिकल सायन्स’चा तरी अभ्यास केला आहे, हे आपल्याला मान्य करायलाच लागेल. (यावर परत हशा उसळला)
अविनाश - तुम्हाला देशाच्या नेत्याविषयी आदर नाहिये.
(‘एंटायर पोलिटिकल सायन्स’वरून हशा का उसळला, हे कदाचित आजच्या २१२६ सालच्या वाचकांच्या लक्षात येणार नाही. मोदीजींनी गुजरात विश्वविद्यालयातून पोलिटिकल सायन्समध्ये एम.ए. केलं होतं. त्याची डिग्रीसुद्धा त्यांनी सादर केली होती. ही डिग्री बनावट आहे, असे अनेक आरोप केले गेले होते. कारण एकतर मोदीजींनी एंटायर पोलिटिकल सायन्स घेऊन एम.ए. केल्याचं ती डिग्री घोषित करत होती, तो विषयच गुजरात विश्वविद्यालयात कधीही शिकवला गेला नव्हता. शिवाय मोदीजींनी जी डिग्री सादर केली गेली होती, तिचा फॉन्ट मायक्रोसॉफ्ट कंपनीने तयार केलेला होता. ही कंपनी मोदीजींनी जेव्हा १९७७ साली डिग्री घेतली, तेव्हा अस्तित्वातच नव्हती. प्रकरण अर्थातच सर्वोच्च न्यायालयात गेले. त्याने देशाच्या पंतप्रधानाने आफिडेव्हिटवर सादर केलेली डिग्री ही खाजगी बाब असल्यामुळे यात पुढे चौकशी वगैरे करण्याची गरज नाही, असा निर्णय दिला. मोदीकालीन भारतात सत्ताधीश आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यात अतिशय मधूर संबंध होते! - संपादक)
नाना - तुम्हाला हसायचे आहे तेवढे हसा, पण तो मोदी तुम्हाला पुरून उरलाय, हे तुम्ही विसरता कामा नये.
अविनाश - मोदीजी अडाणी असते, तर त्यांना देशाने निवडून दिले असते का? मूर्ख लोक! अर्बन नक्षली!
भास्कर - तुम्हाला चिडायचे असेल तेवढे चिडा, पण सोशल मीडियावर मोदीजींची भयानक चेष्टा सुरू आहे, हे तुम्हीसुद्धा विसरता कामा नये!
पांडेजी - ये बात बाकी एकदम सही हैं. भरमार है यू-ट्यूब पर मोदीबॅशिंग व्हिडियोज की!
नाना - बोला हो बोला तुम्ही! त्या मोदीला काही फरक पडत नाही. आयेगा तो मोदीही.
अविनाश - मॉर्निंग कन्सल्ट म्हणून जागतिक ओपिनियन पोल्स घेणारी संस्था आहे. त्यांच्या पोलमध्ये मोदीजींचं काम आवडणाऱ्या लोकांची संख्या ६८ टक्के आहे. जगातल्या सगळ्या राष्ट्रप्रमुखांमध्ये सगळ्यात पॉप्युलर आहेत मोदीजी!
राजू - या मॉर्निंग कन्सल्टचा मालक कोण आहे माहीत आहे का?
अविनाश - कोण?
राजू - जेम्स मर्डॉक!
अविनाश - म्हणजे बघ परदेशी लोकांना जे दिसतंय ते तुम्हाला दिसू नये?
राजू - या जेम्स मर्डॉकने १५ हजार कोटी गुंतवले आहेत भारतात. उदय शंकर यांच्या स्टार नेटवर्कमध्ये. जेम्स मर्डॉकनं रेटिंग कमी दाखवलं, तर जाणार नाहीत का, त्याचे १५ हजार कोटी?
समर - (हसतो जोरात)
अविनाश - किती रे कावीळ झाली आहे मोदीद्वेषाची तुम्हाला! तो शारदेचा पुत्र देशाची काळजी वाहतो आहे, आपली बुद्धी पणाला लावून आणि तुम्ही दुष्ट लोक त्याच्या द्वेषाची पालखी वाहता आहात!
समर - मला एक सांग, जेव्हा जेव्हा भारतात कसला ना कसला क्रायसिस येतो, तेव्हाच बरा या मॉर्निंग कन्सल्टवाल्यांना शोध लागतो की, मोदीजी हे जगातले सगळ्यात ‘पॉप्युलर’ राष्ट्रप्रमुख आहेत म्हणून! कोविड लॉकडाउन झाला, तेव्हा यांच्या ओपिनियन पोलला शोध लागला की, मोदीजींची लोकप्रियता ८४ टक्के आहे. पुढे कोविड भयानक पसरला, ऑक्सिजनशिवाय लोक मरू लागले, तेव्हा तर या मॉर्निंग कन्सल्टने मोदीजी ७० टक्के लोकांना आवडत आहेत, असा शोध लावला होता. आता एलपीजीसाठी रांगा लागल्या आहेत, तर मोदीजींचे रेटिंग ६८ टक्के काय!
भास्कर - जेवढा क्रायसिस मोठा आणि जेवढी मिसमॅनेजमेंट मोठी तेवढे रेटिंग मोठे! (जोरात हसतो)
पांडेजी - विलक्षण योगायोग!
समर - या मिसमॅनेजमेंटच्या काळात कुणी टीका केली, तर या टीकाकारांच्या तोंडावर फेकायला हे ओपिनियन पोल्स. फर्जी केमिस्ट्री, फर्जी फिजिक्स, फर्जी बायॉलॉजी, फर्जी भूगोल, फर्जी इतिहास, फर्जी पोलियिकल सायन्स आणि फर्जी ओपिनियन पोल्स!
अविनाश - तुम्हाला बोलायचं ते बोला, पण जेव्हा जेव्हा क्रायसिस येतो, तेव्हा तेव्हा लोकांना मोदीजींचा पुरुषार्थ झळाळताना दिसतो!
भास्कर – हो, भारतभर सिलिंडर साठी रांगा लागल्यात तीन-तीन किलोमीटरच्या. त्या रांगांमध्ये उभे राहून लोक मोदीजींच्या पुरुषार्थाचं कौतुकच करतायत.
अविनाश - गप बस! घरात दोन दोन सिलिंडर पडलेले असताना तिसऱ्या सिलिंडरसाठी रांगा लावायच्या आणि मोदींना शिव्या द्यायच्या! नालायक लोक!
भास्कर – अरे, घरात दोन सिलिंडर असताना कोण उभं राहील तीन किलोमीटरच्या रांगेमध्ये?
अविनाश - राहतील आपले हावरट लोक उभे! आणि मग हार्ट फेल होऊन मेले की, झाली सुरू बोंबाबोंब!
(कुठलाही क्रायसिस आला की, मोदीजींचे रेटिंग एक नंबरवर जायचे आणि त्याच वेळी भारतीय लोकांच्या बेजबाबदारपणाविषयीचे मेसेजसुद्धा यायला लागायचे. नागरिकांच्या बेजबाबदार वृत्तीमुळे मोदीजींनी बसवलेली देशाची घडी परत परत कशी विस्कटत आहे, हे सांगितले जायचे. म्हणजे काही चांगले झाले की, मोदीजींमुळे आणि काही गोंधळ झाला की, लोक नालायक! उदा. कोविड पसरला की, मोदीजींनी थाळ्या वाजवायला लावून घालवलेला कोविड लोकांच्या मास्क न लावण्यामुळे परत आला. मोदीजी अर्थव्यवस्था पळवत आहेत, पण लोकांना काम नको असल्यामुळे बेरोजगारी वाढते आहे, असा सगळा प्रकार! - संपादक)
समर - आता लोक चिडत चालले आहेत.
अविनाश - माजले आहेत साले. मोदीजींनी ‘उज्ज्वला स्कीम’ आणली म्हणून यांना गॅस मिळाले. नाहीतर बोंबलत फिरत होते रानात काटक्या आणि गोवऱ्या गोळा करत! आता यांना तिसरा सिलिंडर पाहिजे! हलकट साले!
भास्कर - मोदीजींनी भारतातली गॅस कनेक्शन्स १६ कोटींवरून ३२ कोटींवर नेली. मान्य! पण मग देशात एलपीजीचा इमर्जन्सी साठा नको का करायला? गल्फमध्ये युद्ध सुरू झालं की, तिसऱ्या दिवशी तुमची यंत्रणा डामाडोल होते. इतकं हातावर पोट कशाला ठेवायचं?
राघव - पहिलं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करा आणि मग कनेक्शन वाढवा! तुम्हाला घाई झालेली सगळं क्रेडिट घ्यायची! मग लोक ओरडायला लागले, तर शिव्या का देता त्यांना?
नाना - कमर्शियल गॅसचं रेशनिंग सुरू आहे फक्त!
अविनाश - घरी जेवा १५ दिवस देशासाठी, काही फरक पडत नाही!
राघव - ही भक्ताची टिपिकल आत्ममग्नता! अरे, हॉटेल बंद पडली, तर फक्त मजा म्हणून हॉटेलिंग करणाऱ्यांची गोची नाही होत. प्रवासी असतात, होस्टेलवर राहणारे विद्यार्थी असतात. शिवाय हॉटेल मालक गोत्यात नाही का येत?
समर - सगळ्यात वाईट अवस्था वेटर, प्लेट धुणारे आणि कुक्स! हे लोक तर देशोधडीला लागतात.
अविनाश - शाळेत अभ्यास नाही करायचा, मरा मग!
भास्कर – अरे, सगळ्यांनाच शाळेत जाता येत नाही, गरिबी फार वाईट असते.
(मध्यमवर्गीय मोदीभक्त म्हणजे आत्मकेंद्रित जीवनदृष्टीचं सर्वोच्च शिखर! या जगात जे जे गरीब आहेत, ते त्यांच्या नालायकपणामुळे गरीब आहेत, असा विचार मोदीभक्त करत. - संपादक)
समर - जो जो तुमच्या विरोधात जाईल तो तो नालायक!
भास्कर - पूर्वी हे लोक ट्रम्प निवडून यावा म्हणून यज्ञ करत होते. आता तो नालायक.
राघव - तेव्हा चीनचा जिनपिंग व्हिलन होता. मोदीजींनी ट्रम्पशी मैत्री करून त्याला टाईट केला आहे, असा मेसेज अविनाशनं मला पाठवला होता तेव्हा. आता ट्रम्प मोदीकाकाला धुतो आहे, तर परवा अविनाशनं मेसेज पाठवला की, जिनपिंगशी मैत्री करून मोदीजींनी ट्रम्पला टाइट केले आहे.
अविनाश - आहेच केलं मग!
राघव – अरे, तो जिनपिंगनं पाकिस्तानला शस्त्र दिली आहेत आणि ट्रम्प तुमचा अपमान करतो आहे. तुम्ही काय टाइट करणार त्यांना. भारत एक विकसनशील राष्ट्र आहे. त्यापद्धतीनं आपण वागावं! त्यातच राष्ट्रहित आहे. उगीच याला टाइट केला आणि त्याला टाइट केला.
अविनाश - तू गप बस! एक लक्षात ठेव मोदीजी गप्प आहेत, म्हणून अमेरिका-इराण युद्ध सुरू आहे.
राघव - (हसत) म्हणजे?
अविनाश - मोदीजी बघतायत शांतपणे. त्यांना माहिती आहे की, इराण, अमेरिका आणि इस्त्राईल यांना शेवटी आपल्याच पायापाशी यायला लागणार आहे की, हे युद्ध कसं बंद करायचं, ते आम्हाला सांगा म्हणून!
समर - अमेरिकेचा जीडीपी आहे २९ ट्रिलियन आणि तुमचा आहे ३ ट्रिलियन. त्यांच्याकडं १० हजार अणुबॉम्ब आहेत आणि तुमच्याकडं १८०. त्यांच्या एयर फोर्सकडं १३ हजार विमानं आहेत आणि तुमच्याकडं आहेत २२००. त्यांच्याकडं ११ एयरक्राफ्ट कॅरिअर्स आहेत आणि तुमच्याकडं आहेत दोन. त्यांच्याकडं ३७०० मोठी मिसाइल्स आहेत आणि तुमच्याकडं आहेत १८०. प्रत्येक बाबतीत ते तुमच्यापेक्षा किमान दहापट तरी पुढे आहेत.
राघव - ट्रम्प काही बोलला तर मोदीकाका गप्प का बसतात, कळलं का तुला?
अविनाश - एवढी अमेरिका आवडते आहे, तर जा राहायला तिकडे.
राघव - (लक्ष न देता) आपला आयटी एक्सपोर्ट अमेरिकवर अवलंबून आहे. आपल्याला अमेरिकेतून १३० अब्ज डॉलर येतात आयटी एक्सपोर्टमधून.
भास्कर - म्हणजे १२ लाख कोटी रुपये.
समर - या एक्सपोर्टवर गदा आणली ना ट्रम्पनं, तर फॉरिन एक्सचेंजची अवस्था बिकट होईल.
अविनाश - नाही उरलं तर नाही उरलं.
समर - मग क्रूड काय देऊन खरेदी करणार? शस्त्र काय देऊन खरेदी करणार? रुपया कोसळला, तर सगळे इम्पोर्ट्स महाग होणार. मग महागाई कशी आवरणार?
समर - कळलं का मोदीकाका का गप्प बसतात, ट्रम्पतात्यांनी अपमान केला तरी!
नाना - स्ट्रॅटेजिक सायलन्स असतो मोदीजींचा. वेळ आल्यावर बोलतील अवश्य!
भास्कर - (हसत) बोलतील तेव्हा बघू आपण! तोपर्यंत तोंड दाबून बुक्क्यांचा मार असंच म्हणणार आम्ही.
अविनाश - जिनपिंगला हाताशी धरून टाइट केलाय ट्रम्पतात्याला मोदीजींनी!
राघव - ज्या ज्या बाबतीत अमेरिका आपल्या दहापट आहे, त्या सगळ्या बाबतीत चीन आपल्या सात ते आठपट आहे, हे लक्षात असू द्या.
अविनाश - त्याला बरोबर हाताशी धरलाय मोदीजींनी!
नाना - तुमच्या इंदिरा गांधीनी नाही का रशियाला हाताशी धरून अमेरिकेला शह दिला होता.
राघव - अहो तेव्हा आपण म्युच्युअल डिफेन्सचा करार केला होता. दोघांमधल्या कुणावरही आक्रमण झालं, तरी दोघांवरही आक्रमण झालं, असं समजणार होते दोन्ही देश.
समर - मोदीजींनी केला आहे का असा करार चीनशी?
अविनाश - मोदीजी करार वगैरे करत नाहीत. सिर्फ आँखों के इशारेपर काम चलता हैं उनका!
पांडेजी - इस बात पे एक चाय हो जाए!
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
खरं तर देशप्रेमाची ही अजब रीत होती. आपल्या देशाचे गुणदोष आणि आपल्या देशाची ताकद, या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून व्यक्त होणारा अभिमान! खूपसा भारत मोदीजींनी सेट केलेया नॅरेटिव्हच्या आहारी गेला होता. शिरोजीनं या स्थितीबाबत आपल्या रोजनिशीमध्ये लिहिले आहे - “ही अवस्था काँग्रेस आणि इतर डाव्या पक्षांमुळेच आली होती. यांच्या अनेक दशकांच्या भ्रष्टाचारामुळे देशातील पोलीस, न्याय, राज्य सरकारं या यंत्रणांवर बहुसंख्य नागरिकांचा विश्वास उरला नव्हता. यंत्रणा काम करत नाहीत, देशाचा विकास करत नाहीत, हा सामान्य भारतीयांचा अनुभव झाला होता. त्यामुळे ते आता एका व्यक्तीवर आशा लावून बसले होते.
मी असामान्य आहे, मी अवतार आहे असे सांगणाऱ्या व्यक्तीवर! त्यांना दोष देता येत नव्हता. काँग्रेसच्या भ्रष्टाचारानं परिस्थिती अवघड करून टाकली होती. ही परिस्थिती सुधरवण्यासाठी श्रीविष्णु यांनी अवतार घेण्याची गरज नसली, तरी मी अवतार आहे, असं सांगणाऱ्या तोतया अवताराची तरी गरज होती. मोदीजींसारख्या चाणाक्ष राजकारणी व्यक्तीनं मीच तो अवतार आहे, असं सांगून ती गरज पूर्ण केली होती आणि आपली राजकीय पोळी भाजून घेतली होती. समर, भास्कर, राघव आणि राजू हे लोक अजूनही यंत्रणा काम करू शकतात या विचाराचे होते.
काही वर्षांनंतर तोतया अवतारी पुरुषाचं पितळ उघडं पडणं अपरिहार्यच होतं. असामान्य व्यक्तीसुद्धा अपयशी ठरते, असा अनुभव भारतीय लोकांना येणं आवश्यक होतं. इतिहास तो अनुभव भारतीय लोकांना देत होता. यातूनच पुढे सबळ आणि सक्षम लोकशाही यंत्रणा उभ्या राहणार होत्या.”
२०२६ साली शिरोजीनं लिहिले, तसंच पुढे घडत गेलं. शिरोजीचं हे भविष्यवेधी वाक्य उदधृत करून आम्ही आपली रजा घेत आहोत.
- श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment