‘मैं पल दो पल का शायर हूँ’ : साहिर लुधियानवी या कवी-गीतकाराचं जीवन सादर करणारा एक आगळावेगळा प्रयोग
कला-संस्कृती - नाटकबिटक
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘मैं पल दो पल का शायर हूँ’ या नाटकातील दोन प्रसंग
  • Tue , 27 February 2024
  • कला-संस्कृती नाटकबिटक मैं पल दो पल का शायर हूँ Main Pal Doh Pal Ka Shayar Hu साहिर लुधियानवी Sahir Ludhianvi

साहिर लुधियानवी (१९२१-१९८०)च्या शायरीनं आणि गाण्यांनी केवळ भारतीयांवरच नव्हे, तर दक्षिण आशियातील पाकिस्तान, बांगलादेश वगैरेसारख्या देशांतील रसिकांवर गारूड केलेलं आहे. साहिरने सामाजिक, आर्थिक, राजकीय अन्यायांना वाचा फोडणारी आणि अतिशय तरल, अलवार भावना व्यक्त करणारी गीते लिहिली. त्याच्या लिहिण्यात कमालीची सहजता आणि वाचकांच्या हृदयाला स्पर्श करण्याची क्षमता होती. कदाचित म्हणूनच त्याच्या आविष्काराबद्दल आणि त्याच्या वादळी जीवनाबद्दल आजही रसिकांच्या मनात कुतूहल असतं.

आजवर साहिरच्या जीवनावर बरीच नाटकं मंचित झालेली आहेत. असंच एक नवं नाटक म्हणजे मीर अली हुसेन आणि हिमांशू बाजपेयी लिखित आणि डॅनिश हुसेन यांनी दिग्दर्शित ‘मैं पल दो पल का शायर हूँ’. नुकताच याचा एक खास प्रयोग मुंबईत एनसीपीने आमंत्रित केला होता.

साहिरच्या जीवनाबद्दलच्या बहुतेक कलाकृतींमध्ये अमृता प्रीतमसोबतच्या प्रेमाबद्दल भरभरून लिहिलेलं असतं. ते एका अर्थी योग्य जरी असलं, तरी त्यामुळे त्याच्या जीवनातील इतर महत्त्वाच्या घटना झाकोळून जातात. तसं या नाटकात होत नाही. अर्थात यात अमृता प्रीतम यांचा उल्लेख आहे, पण इतर बाबींनाही योग्य न्याय दिला आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

...............................................................................................................................................................

साहिरचा जन्म ८ मार्च १९२१ रोजी पंजाब प्रांतातील लुधियाना शहरात झाला. त्याच्या वडिलांचं नाव चौधरी फाजल मोहम्मद, तर आईचे सरदार बेगम. त्यांचं अधिकृत लग्न झालेलं नव्हतं. नंतर बेगमसाहिबांनी हे नातं अधिकृत करण्याचा म्हणजेच लग्न करण्याचा आग्रह केला, तेव्हा चौधरीजींनी नकार दिला. रागावलेल्या सरदार बेगम लहानग्या साहिरला घेऊन घराबाहेर पडल्या. परिणामी साहिरचं बालपण आईच्या माहेरी गेलं. त्याचं शालेय शिक्षण लुधियानातील खालसा हायस्कूलमध्ये झालं. महाविद्यालयीन शिक्षण लुधियानातीलच धवन शासकीय महाविद्यालय आणि लाहोरमधील दयालसिंग महाविद्यालयात झालं.

त्या काळी लुधियाना उर्दू शायरीचं महत्त्वाचं केंद्र होतं. त्याचा साहिरच्या मनावर परिणाम झाला. तो दहावी होर्इपर्यंत मुशायरे गाजवायला लागला. त्याने १९३९ साली लुधियानाच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेव्हा देशातील स्वातंत्र्यलढा जोरात होता. साहिर कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाकडे ओढला गेला. त्याच काळात साहिर एका मुलीच्या प्रेमात पडला. ते महाविद्यालयाच्या हिरवळीवर तासनतास गप्पा मारत बसायचे. कर्मठ विचारांच्या प्राचार्यांना हे मान्य नव्हतं. त्यांनी त्याला महाविद्यालयातून काढून टाकलं.

१९४४ साली साहिरचा पहिला कवितासंग्रह ‘तल्खियां’ प्रकाशित झाला आणि रातोरात तो तरुणांच्या गळ्यातला ताईत झाला. नंतर साहिरने १९४३ साली लाहोरमधल्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथं तो डाव्यांच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष झाला. म्हणून त्याला तिथूनही हाकलून देण्यात आलं.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

‘लव्ह अँड लावणी’ : लावणीवरच्या प्रेमाचा आणि प्रेमातल्या लावणीचा एक आगळावेगळा सांगीतिक आविष्कार!

‘रेड’ : खूप वर्षांनी असं नाटक बघायला मिळालं, जे पुन्हा बघण्याची इच्छा आहे…

‘ए स्मॉल फॅमिली बिझनेस’ : आर्थिक भ्रष्टाचाराच्या संदर्भात पूर्णपणे संवेदनाहीन झालेल्या माणसांचं, कुटुंबाचं आणि समाजाचं नाटक

‘टेप’ : मनात रूतून बसलेल्या जुन्या घटना कशा आपल्यावर प्रभाव टाकतात, यावर भेदक प्रकाश टाकणारं नाटक

.................................................................................................................................................................

फाळणीनंतर साहिरने ‘धर्मांध पाकिस्ताना’त राहण्यापेक्षा ‘धर्मनिरपेक्ष भारता’त राहणं पसंत केलं. १९४९ साली साहिरचा एक मित्र ‘आझादी की राह पर’ हा चित्रपट बनवत होता. त्याने साहिरला त्याची गाणी लिहायला सांगितली आणि ‘गीतकार’ साहिरचा जन्म झाला. पुढे मुंबईत साहिरची भेट संगीतकार एस. डी. बर्मन यांच्याशी झाली. त्यांनी साहिरला एक धून ऐकवली आणि त्यावर गाणं लिहायला सांगितलं. साहिरने ‘थंडी हवाएं लहरा के आये…’ लिहून दिलं. ते रसिकांनी डोक्यावर घेतलं आणि साहिर-एसडी ही जोडी जमली. १९५१ साली आलेल्या ‘बाजी’ सिनेमानं साहिरला नाव मिळवून दिलं. १९६४ आणि १९७७ साली त्याला ‘सर्वोत्तम गीतकार’ म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाले, तर १९७१ साली ‘पदमश्री’.

साहिर काही वर्षं दिल्लीत होता. याच काळात साहिर आधी अमृता प्रीतम आणि नंतर सुधा मल्होत्रा यांच्या प्रेमात होता. साहिर अतिशय मनस्वी आणि मानी कवी-गीतकार होता.

ही साहिरची चढउतार असलेल्या जीवनकहाणी. साहिरचे व्यक्तीगत आणि व्यावसायिक जीवन काहीसं खळबळजनक असल्यामुळे त्याच्या जीवनातील अनेक प्रसंगांत जबरदस्त नाट्य भरलेलं आहे. असं वादळी जीवन दोन तासांच्या नाटकात पकडणं कठीण काम. कारण नेमके कोणते प्रसंग निवडायचे आणि प्रेक्षकांसमोर कसे सादर करायचे, याचा निवाडा सोपा राहत नाही. पण या दोन्ही कसोट्यांवर हे नाटक उतरतं. मीर अली हुसेन आणि हिमांशू वाजपेयी या लेखकद्वयांनी साहिरच्या जीवनातले नाट्य असलेले आणि सादरीकरण करता येतील, असे प्रसंग विचारपूर्वक निवडले आहेत. त्यामुळे ते माहीत असले तरी नाटक बघताना कंटाळा येत नाही.

होश्रुबा रेपर्टरी आणि आर्ट फॉर कॉजेस निर्मित या नाटकाच्या कल्पक सादरीकरणाला दाद द्यायला पाहिजे. दिग्दर्शक डॅनिश हुसेन यांनी प्रयोगाची बांधणी अतिशय नेमकेपणाने केली आहे. त्यांनी रंगमंचावर डाव्या बाजूला साहिरलाप्रेक्षकांशी बोलण्याची जागा ठेवली आहे, तर उजव्या बाजूला साहिरचे चाहते आणि गायक बसलेले असतात. नाटकाच्या सुरुवातीला साहिरचे चाहते आणि गायक एकमेकांशी गप्पा मारत असतात, त्याच्या आठवणी काढत असतात. एका टप्प्यानंतर इतका वेळ प्रेक्षकांकडे पाठ करून खुर्चीवर बसलेला साहिर निवेदन स्वत:कडे घेतो आणि स्वत:च स्वत:बद्दल सांगायला लागतो. निवेदनाचा आणि नाटक पुढे नेण्याचा हा प्रकार कौतुकास्पद आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

साहिरची प्रमुख भूमिका डॅनिश हुसेन यांनी सादर केली आहे. त्यांचे उर्दू उच्चार फार छान आहेत. त्यांनी एका कवीचा मनस्वी स्वभाव फार सफाईनं व्यक्त केला आहे. त्यांच्या जबरदस्त अभिनयाला वृंदा वैद्य ‘हयात’, शंतनू हेर्लेकर, श्रीजोनी भट्टाचार्य, सिद्धार्थ पडीयार आणि डोनाल्ड क्रिस्ट यांनी तितकीच दमदार साथ दिली आहे. यातली गाणी तशी प्रातिनिधीक आहेत, पण त्यामुळे काही ज्येष्ठ प्रेक्षकांना त्यांच्या तारुण्याचे दिवस आठवू शकतात.

विशेष म्हणजे या प्रयोगाला तरुण पिढी फार मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. ही पिढी साहिरच्या ‘ये महलों… ये तख्तो…ये ताजो की दुनिया…ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या हैं?’ किंवा ‘इक शहेनशाह ने दौलत का सहारा ले कर हम गरिबों की मोहब्बत का उडाया हैं मजाक’ वगैरे पुरोगामी आशय ठासून भरलेल्या ओळी ऐकून आनंदित होत होती. हे दृश्यं फार आश्वासक होतं.

शंतनू साळवीची प्रकाशयोजना आणि हिमानी मेहता दलवी यांचं नेपथ्य व वेशभूषा अचूक होती. विशेषत: साहिरची अभ्यासिका एका तालेवार कवीच्या व्यक्तिमत्त्वाचीही ओळख करून देते. साहिर लुधियानवी या कवी-गीतकाराचं जीवन सादर करणारा हा आगळावेगळा प्रयोग शेवटपर्यंत गुंतवून, गुंगवून ठेवतो.

.................................................................................................................................................................

लेखक प्रा. अविनाश कोल्हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक आहेत.

nashkohl@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......