नदीन लबाकी : खऱ्याखुऱ्या आयुष्यातल्या खऱ्याखुऱ्या समस्यांविषयी सिनेमाच्या माध्यमातून बोलणारी सिनेदिग्दर्शक
दिवाळी २०२० - लेख
मीना कर्णिक
  • नदीन लबाकी
  • Tue , 17 November 2020
  • दिवाळी २०२० लेख चलत्-चित्र नदीन लबाकी Nadine Labaki Capharnaüm

१.

२ सप्टेंबर २०१५ या दिवशी जगभरात एका छायाचित्राने वादळ उठवलं. आयलान कुर्दी (किंवा आलन कुर्दी) या तीन वर्षांच्या सिरियन मुलाचा मृतदेह संवेदनशील जगाला हादरवून टाकणारा होता. सिरियातल्या अशांत आणि हिंसक वातावरणापासून दूर जायचं म्हणून त्याचे आई-वडील आपल्या मुलांना घेऊन बोटीतून ग्रीसला निघाले होते. एका सुखी भविष्याच्या शोधात. पण प्रवाशांनी खचाखच भरलेली त्यांची रबर बोट मेडिटरेनियन समुद्रात उलटली आणि आयलानचा मृतदेह वहात वहात तुर्कस्तानच्या किनाऱ्याला लागला. तुर्की पत्रकार नीलोफर डेमिर यांनी त्याचं छायाचित्र काढलं, ते प्रसिद्ध झालं आणि सिरियाच्या नागरी युद्धामुळे निर्माण झालेल्या विस्थापितांच्या समस्येकडे जगाचं लक्ष नव्याने वेधलं गेलं. अनेक पातळ्यांवर या छायाचित्राचा परिणाम झाला.

तिथे, लेबनॉनमध्ये राहणारी नदीन लबाकीही याला अपवाद नव्हती. ते छायाचित्र पाहून तीही प्रचंड अस्वस्थ झाली होती. आपण काहीतरी करायला हवं या जाणीवेने तिची घालमेल सुरू झाली. त्यांच्या देशाची एक सीमा सिरियाला जोडलेली आहे. लेबनॉनमध्ये सिरियन नागरिक मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत. त्यामुळे तिच्यासाठी तर हा प्रश्न अतिशय जिव्हाळ्याचा होता. ती अर्थातच तिच्या माध्यमातून या प्रश्नाकडे पाहणार होती, व्यक्त होणार होती.

आणि त्यातूनच तयार झाला एक नितांत सुंदर सिनेमा. ‘कॅपरनॉम.’ २०१८मध्ये प्रदर्शित झालेला नदीन लबाकीचा दिग्दर्शक म्हणून हा तिसरा सिनेमा सध्या नेटफ्लिक्सवर आपल्याला बघायला मिळतो.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.facebook.com/aksharnama/photos

..................................................................................................................................................................

‘कॅपरनॉम’ ही एका बारा वर्षाच्या मुलाची, झेनची गोष्ट आहे. लेबनॉनमधल्या एका शहरातल्या अत्यंत बकाल वस्तीत राहणाऱ्या झेनची आणि त्याच्यासारख्या अनेक मुलांची. ही मुलं शाळेत जात नाहीत, दिवसभर रस्त्यावर हुंदडत राहतात, घराला हातभार लावण्यासाठी छोटीमोठी कामं करत राहतात, खोट्या खोट्या बंदुकांनी एकमेकांना घायाळ करतात. कारण आजूबाजूला त्यांनी बघितलीये फक्त हिंसा आणि शोषण. तोच त्यांचा संस्कार आणि तीच त्यांची शाळा. ‘कॅपरनॉम’चा अर्थच मुळी गोंधळ किंवा केऑस असा आहे. इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात पॅलेस्टाईनमध्ये कॅपरनॉम नावाचं एक गाव होतं. पंधराशे लोकसंख्या असलेलं हे मासेमारीवर जगणारं गाव अकराव्या शतकापर्यंत अस्तित्त्वात होतं. क्फार नाहुम हे या गावाचं मूळ हिब्रू नाव. फ्रेंचमध्ये त्यावरून कॅफरनॉम हा शब्द तयार झाला. अव्यवस्थितपणे कोंबलेल्या वस्तू या अर्थी हा शब्द वापरला जाऊ लागला, मग गोंधळाची परिस्थिती, केऑस म्हणून आणि कालांतराने नरक म्हणून तो रुढ झाला.

सिनेमाच्या सुरुवातीलाच आपल्याला कळतं की, एका पुरुषावर चाकूने हल्ला केला म्हणून झेनची रवानगी ज्युवेनाईल जेलमध्ये झालेली आहे. तेवढंच नाही, तर दुसऱ्या बाजूला झेन त्याच्या आई-वडिलांच्या विरोधात न्यायालयात गेलाय. न्यायाधीश त्याला त्यामागचं कारण विचारतात तेव्हा तो म्हणतो, ‘मला जन्माला घातलं म्हणून!’ मुलांची देखभाल करता येत नाही, त्यांना नीट पोषण देता येत नाही तर आपले आई-वडील मुलं का जन्माला घालतात हा त्याचा प्रश्न आहे. आई-वडीलही इथं व्हिलन नाहीत. ते निव्वळ परिस्थितीचे बळी आहेत. कुणाच्या तरी उपकारावर फुकटात एका पडक्या बिल्डिंगच्या एका खोलीत आपल्या पाच मुलांबरोबर राहताहेत, त्यातच संभोग करताहेत, हेच आपलं नशीब आहे असं समजून आल्या दिवसाला सामोरं जाताहेत. आपल्या अकरा वर्षांच्या धाकट्या बहिणीचं, सहारचं लग्न बिल्डिंगमधल्या तिच्यापेक्षा वयाने मोठ्या पुरुषाबरोबर ते लावायला निघतात आणि झेन बिथरतो. या बहिणीशी त्याचं खास नातं आहे. पण एवढ्याशा मुलाचं मोठ्या माणसांसमोर काय चालणार? रागावलेला, संतापलेला, हमसाहमशी रडणारा झेन थेट घर सोडून निघून जातो. आणि मग सुरू होतो आणखी एक वेगळा प्रवास.

या प्रवासात झेनला इथिओपिआहून पैसे कमावण्यासाठी बैरुतला आलेली राहील भेटते. बेकायदेशीररीत्या राहणारी. फसवली गेलेली. पण कोणत्याही परिस्थितीत कायदेशीर कागदपत्रं मिळवण्याची जिद्द बाळगणारी. स्वत:साठी आणि तिच्या एक वर्षाच्या मुलासाठी, योनाससाठी.

ही राहीलसारख्या असंख्य स्थलांतरितांचीही गोष्ट आहे. पैशासाठी जिवावर उदार होऊन दुसऱ्या देशात हलाखीच्या स्थितीत राहणाऱ्या स्थलांतरितांची.

दोन तासाच्या या सिनेमात घशात आवंढा आणणारी अनेक दृष्य आहेत. चेहऱ्यावर हसू आणणारी दृष्य आहेत. आणि सरसरून काटा आणणारीही दृश्यं आहेत.

एक दिवस रस्त्यावर ज्युस विकता विकता झेनच्या लक्षात येतं की, सहारचा फ्रॉक मागून खराब झालाय. तिची मासिक पाळी सुरू झालीये. या सगळ्याविषयी काहीच माहिती नसलेल्या सहारसाठी झेन एका दुकानातून सॅनिटरी नॅपकीन्स चोरतो. ते कसे वापरायचे हे तिला दाखवतो. आणि गुपचूप कुणाला कळू नये म्हणून तिचे कपडे सिंकमध्ये धुवून टाकतो. आपली बहीण मोठी झालीये हे कळताक्षणी आई-बाप तिचं लग्न लावून टाकतील हे माहीत असलेल्या झेनची बहिणीचं रक्षण करण्याची ती केविलवाणी धडपड पाहून गलबलून येतं.

घरातून पळून गेलेला झेन एका भल्यामोठ्या अम्युझमेंट पार्कमध्ये येतो. रात्र झालेली असते. माणसांची गर्दी ओसरलेली असते. एका सेक्सी बाईच्या भव्य पुतळ्यावर झेन चढतो आणि वेळ घालवलायला त्या बाईला घातलेला शर्ट खेचून काढू लागतो. हळूहळू त्या बाईचे स्तन आपल्याला दिसतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जाएन्ट व्हीलच्या समोर एक उघडी बाई आपल्याला दिसते. भुकेला झेन तिथेच तिच्या पायाखाली झोपलेला असतो. त्या परिस्थितीतही आपल्या चेहऱ्यावर हसू येतंच.

किंवा मग, बाजारात भेटलेल्या त्याच्याएवढ्याच लहान मुलीकडून सिरियन रेफ्युजीजसाठी एक कॅम्प आयोजित केलाय आणि तिथे खायला देतात असं झेनला कळतं. योनासला घेऊन तो तिकडे जातो. पण त्या आधी मोडक्यातोडक्या भाषेत सिरियन बोलायची प्रॅक्टिस करतो. हा तुझा भाऊ कृष्णवर्णीय कसा असं विचारल्यावर, तो पोटात असताना माझी आई खूप कॉफी पीत होत होती, हे उत्तर तयार ठेवतो.

पण या अशा प्रसंगांमधूनही दिग्दर्शक झेन किंवा त्याच्यासारख्या मुलांच्या भीषण वास्तवापासून एक क्षणभरही आपल्याला विचलित होऊ देत नाही. झेनच्या डोळ्यातली दु:खाची झाक सतत आपल्या मनाचा वेध घेत राहते. आणि म्हणूनच अगदी शेवटच्या दृश्यात मनापासून हसणारा झेन आपल्यालाही दिलासा देतो. सिनेमाचा आशावादी शेवट आपल्यातलं माणूसपण टिकवायला हवं याची नव्याने जाणीव करून देतो.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.booksnama.com/

..................................................................................................................................................................

नदीन लबाकी यांनी थेट कोणतंही राजकीय भाष्य न करता लहान मुलांच्या माध्यमातून खूप काही सांगितलंय. बैरुतमध्ये सिरियन रेफ्युजीज मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत. तिथलं लहान मुलांचं जग पाहून यावर आपण काहीतरी करायला हवं असं तिच्या मनात होतंच, त्यानुसार तिचं थोडंफार कामही सुरू झालं होतं. पण आयलानच्या त्या फोटोने तिचा निश्चय अधिक दृढ झाला. पुढची काही वर्षं बैरुतमधल्या रेफ्युजी म्हणून आलेल्या मुलांशी बोलण्यात, ज्युवेनाईल जेल्सना भेट देण्यात, न्यायालयांमध्ये जाण्यात घालवली. ती म्हणते, ‘याच लहान मुलांच्या जगाविषयी मी सांगू पहात होते. जसजसा मी अभ्यास करू लागले, लोकांना भेटू लागले, लहान मुलांशी बोलू लागले तसतशी मला या भयंकर समस्येची व्याप्ती जाणवू लागली. मला भेटलेल्या बहुतेक मुलांनी ‘मी मेलो असतो/ असते तर बरं झालं असतं’ किंवा ‘जन्माला आल्याचा मला अजिबात आनंद नाहीये’ अशी उत्तरं दिलेली आहेत.’

नदीन लबाकीने आपल्या सिनेमाचं स्क्रिप्ट तयार केलं आणि तिच्या नेहमीच्या पद्धतीने ती कामाला लागली. कोणत्याही प्रस्थापित अ‍ॅक्टर्सना घेऊन ती काम करत नाही. ती ऑडीशन्स घेत नाही. आपल्या व्यक्तिरेखा तिच्या मनात रेखाटलेल्या असतात. त्यांचं वर्णन ती आपल्या सहकाऱ्यांना करते. त्यांचे स्वभाव, त्यांचं दिसणं, त्यांचं वागणं ती त्यांना समजावून सांगते. त्यांचं वर्णन करते. आणि मग हे सहकारी आपला कॅमेरा घेऊन शहरभर फिरतात. वेगवेगळ्या लोकांचं चित्रीकरण करतात, त्यांच्याशी बोलतात, त्यांच्याबरोबर वेळ घालवतात. अशा असंख्य लोकांना पाहून लबाकी त्यातून आपले कलावंत निवडते. ती म्हणते, ‘पहिलं इन्सटिक्न्ट माझ्यासाठी महत्त्वाचं असतं. मी त्यांचं बोलणं ऐकते, पुन्हा पुन्हा ऐकते आणि मग माझ्या व्यक्तिरेखा त्यांच्यातून जिवंत होतील का या प्रश्नाचं उत्तर शोधते.’

‘कॅपरनॉम’ही त्याला अपवाद नव्हता. मात्र, आपल्याला हवा तसा झेन मिळेल की नाही याविषयी तिच्या मनात शंका होती. एका मुलाखतीमध्ये ती सांगते, ‘‘या भूमिकेसाठी मला बारा तेरा वर्षांचा मुलगा हवा होता. पण त्याची शरीरयष्टी बारीक असणं आवश्यक होतं. खायला प्यायला नीट न मिळाल्यामुळे तो वयापेक्षा लहान दिसायला हवा होता. सुंदर पण उदास डोळे. रस्त्यावर वाढल्यामुळे बोलताना सतत शिवराळ भाषा. माझ्या क्रूला हे सगळं सांगत असताना माझ्या मनात विचार येत होता, मी एका चमत्काराची अपेक्षा करतेय. असा मुलगा मला कुठून मिळणार आहे. एक वर्षाचा योनास मला कसा सापडणार? त्याच्याकडून मी कसं काम करून घेणार? मला या मुलांनी जे करायला हवंय ते मी त्यांच्याकडून कसं करवून घेणार?’’

पण चमत्कार घडतात. लबाकीला तिच्या मनातला झेन मिळाला आणि योनासही सापडला.

कलाकार मिळाले म्हणून पुढचं काम सोपं नव्हतं. किंबहुना आता खरी परीक्षा सुरू होणार होती. हा प्रोजेक्ट मोठा होणार आहे याची कल्पना आली आणि निर्माता मिळणं कठीण आहे हेही लबाकीच्या लक्षात आलं. मग काम रखडायला नको म्हणून तिने आणि तिच्या नवर्‍याने, खालेद मौझानार यांन यावर एक उपाय शोधला. खालेद स्वत:च निर्माता बनला.

या अनुभवाविषयी खालेद सांगतो, ‘‘निर्माता म्हणून हा माझा पहिला अनुभव होता. मुळात मी म्युझिक कंपोझर आहे. पण अशा प्रकारचा सिनेमा करायला कुणी तयार होणार नाही याची आम्हाला कल्पना होती. आम्ही सहा महिने शूटिंग करत होतो. त्यानंतर दोन वर्षं पोस्ट प्रॉडक्शन आणि एडिटिंग झालं. आम्ही ६०० तासांचं चित्रीकरण केलेलं होतं. सिनेमाचं पहिलं व्हर्जन १४ तासांचं होतं. हे करायचं स्वातंत्र्य आम्हाला दुसरं कोण देणार होतं? या सिनेमाला वेळ लागणार याची आम्हाला आधीपासून कल्पना होती. कारण आम्ही लहान मुलांबरोबर काम करत होतो. यातल्या बहुतेक जणांनी कधीही अभिनय केलेला नव्हता. कॅमेऱ्यासमोर उभं राहण्याचा अनुभव त्यांना असण्याचा संबंधही नव्हता. ही सगळी मुलं खरोखरच रस्त्यावर रहात होती. आम्ही घर गहाण ठेवलं आणि सिनेमा बनवला.’’

खालेदने सिनेमाला संगीतही दिलंय. या दोन्ही गोष्टी सांभाळणं खूप कठीण होतं. एका बाजूला आर्थिक अडचण आणि दुसर्‍या बाजूला क्रिएटिव्ह काम. खालेदच्या मते, ‘‘संगीत हा सिनेमातला एक अभिनेता आहे. आणि एका अभिनेत्याला बिगर अभिनेत्यांमध्ये कसं मिसळवायचं हे माझ्यासमोरचं आव्हान होतं. मला वेगळ्या प्रकारे विचार करणं भाग होतं. मी सहसा स्क्रिप्टवर माझं म्युझिक लिहितो. तसं मी इथेही लिहिलं होतं. पण मी झेनला भेटलो, ज्या जागांवर शूटिंग होतंय त्या पाहिल्या आणि ते सगळं मी फेकून दिलं. नव्याने सगळं लिहिलं. कारण त्यांच्या प्रामाणिकपणामध्ये मला माझ्या कोणत्याही गोष्टीची भर घालायची नव्हती. सिनेमात काही जागा आहेत ज्या डॉक्युमेंटरीसारख्या आहेत. आणि काही अशा आहेत जिथे कविता आहे. आम्ही ठरवलं की संगीतही आपण या दोन भागांमध्ये विभागायचं. सिनेमातलं वास्तव मला कुठेही भ्रष्ट करायचं नव्हतं.’’

..................................................................................................................................................................

झेनचं तर आयुष्यचं ‘कॅपरनॉम’मुळे बदलून गेलं. सिनेमातला झेन लेबनीजच आहे, प्रत्यक्षातला झेन सिरियन रेफ्युजी होता. सिनेमातल्या झेनचे आईवडील त्रासलेले, हरलेले आहेत. प्रत्यक्षातल्या झेनचे पालक अतिशय प्रेमळ आहेत. पण सिनेमातल्या झेनच्या आणि खऱ्या झेनच्या आयुष्यात बाकी फार फरक नव्हता. तोही रस्त्यावर रहात होता. शाळेत जात नव्हता. खूप लहान मुलांना मार खाताना, मुलींची लग्न लावून देताना त्याने पाहिलेली होती. काही वेळा तो लबाकीशी याबाबत बोलायचा. आपण फेमस होणार म्हणून तो खुश होता, सेटवर त्याचे लाड व्हायचे म्हणून आनंदी होता. पण शूटिंग संपल्यानंतर पुन्हा त्याला त्या नरकात जगू देणं लबाकीला मंजूर नव्हतं.

..................................................................................................................................................................

हा झाला केवळ संगीताचा भाग. दुसऱ्या बाजूला निवडलेल्या बिगर अभिनेत्यांकडून काम करवून घेणं हेही एक आव्हान होतं. विशेषत: लहान मुलांकडून. एखादं दृष्य एका दिवसात जमलं नाही तर पेशन्स गमावून चालणार नव्हतं. लबाकीच्याच शब्दात सांगायचं तर, ‘‘आम्हाला जेव्हा हवं तेव्हा आणि जे हवं आणि जसं हवं तसं त्या मुलांनी काम करावं अशी अपेक्षा बाळगणं चुकीचंच होतं. त्यामुळे आपल्याला जास्त चित्रिकरण करावं लागेल, ऑब्झर्व्हन्ट असावं लागेल, स्वत:ला या मुलांवर लादता येणार नाही, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी, त्यांच्या तालाशी जुळवून घ्यायला हवं हे आमच्या मनात पक्कं होतं. आणि आम्ही तेच केलं.’’

सुरुवातीला हे सगळे कलाकार घाबरलेले होते. एकदाही पहिल्याच टेकमध्ये शॉट ओके झालाय असं घडायचं नाही. पण लबाकी आणि तिचे सगळे सहकारी सतत या सगळ्यांशी गप्पा मारत. लहान मुलांशी आणि मोठ्यांशीही. आपण ही गोष्ट का सांगत आहोत आणि ती का महत्त्वाची आहे याविषयी बोलत. त्यांच्या कहाण्या ऐकून घेत. हळूहळू या सगळ्यांमध्ये एक नातं तयार झालं. या गोष्टीतल्या लोकांचा आपण आवाज आहोत असं या कलाकारांना वाटू लागलं. ते सगळे जणू आता एका मिशनचा भाग बनले होते. आजवर आपलं म्हणणं ऐकून घेणारं कुणी नव्हतं. आपल्या अडचणी, आपलं झगडणं मांडणारं कुणी नव्हतं पण आता इथे आपल्याला ती संधी मिळतेय असं त्यांच्या मनाने घेतलं आणि मग त्यांच्यासाठी तो अभिनय राहिलाच नाही. ते सगळे जणू त्या त्या दृष्याचा भाग बनून गेले. पुढे पुढे तर, ‘‘आपण हा सीन पुन्हा करूया का? मला वाटतं मी अधिक चांगल्या प्रकारे रिअ‍ॅक्ट होऊ शकेन,’’ असंही ते लबाकीला सांगत.

या सगळ्याचा परिणाम असा झाला की, लबाकी आणि त्यांचे सहकारीही आंतरबाह्य बदलू लागले. आपण केवळ सिनेमा बनवत नाहीयोत तर खऱ्याखुऱ्या आयुष्यातल्या खऱ्याखुऱ्या समस्यांविषयी बोलतो आहोत याची त्यांना जाणीव झाली. दिवसभराचं आपलं काम संपवून आपण आपल्या घरी जाणार आहोत, आपल्या सुरक्षित चार भिंतींमध्ये झोपणार आहोत. पण मागे राहिलेली ही मुलं मात्र त्याच अस्वच्छ, गटाराच्या जवळ असलेल्या त्यांच्या घरांमध्ये राहणार आहेत या विचाराने अपराधी वाटू लागलं. उद्या पुन्हा आपण त्यांच्या घरांमध्ये जाणार, त्यांच्या आयुष्यात डोकावणार. लबाकी म्हणते, ‘‘बातम्यांमध्ये आपण ज्या अडचणींविषयी ऐकतो त्यांना मानवी चेहरा देणं हे सिनेमाचं एक मोठं मिशन आहे. बातम्यांमध्ये आपल्याला आकडे दिसतात. चेहरा नसलेले आकडे. पण त्या आकड्यांना चेहरा मिळाला की त्यांचा झगडा आपल्याला अधिक भावतो. तो जास्त परिणामकारक ठरतो.’’

त्यामुळे सिनेमा संपल्यावर आता आपलं काम झालं म्हणून लबाकीने अंग झटकून दिलं नाही. यातल्या सगळ्या मुलांसाठी सगळं काही करणं अशक्य होतं. पण तिने वेगवेगळ्या एनजीओजशी संपर्क साधला. सरकारी पातळीवर सिनेमा दाखवून काय करता येईल त्याविषयीची बोलणी सुरू केली.

झेनचं तर आयुष्यचं ‘कॅपरनॉम’मुळे बदलून गेलं. सिनेमातला झेन लेबनीजच आहे, प्रत्यक्षातला झेन सिरियन रेफ्युजी होता. सिनेमातल्या झेनचे आईवडील त्रासलेले, हरलेले आहेत. प्रत्यक्षातल्या झेनचे पालक अतिशय प्रेमळ आहेत. पण सिनेमातल्या झेनच्या आणि खऱ्या झेनच्या आयुष्यात बाकी फार फरक नव्हता. तोही रस्त्यावर रहात होता. शाळेत जात नव्हता. खूप लहान मुलांना मार खाताना, मुलींची लग्न लावून देताना त्याने पाहिलेली होती. काही वेळा तो लबाकीशी याबाबत बोलायचा. आपण फेमस होणार म्हणून तो खुश होता, सेटवर त्याचे लाड व्हायचे म्हणून आनंदी होता. पण शूटिंग संपल्यानंतर पुन्हा त्याला त्या नरकात जगू देणं लबाकीला मंजूर नव्हतं.

झेन आता नॉर्वेला राहतोय. त्याचं सगळं कुटुंब, त्याची भावंडं तिथे शिफ्ट झालंय. घरापुढे बाग आहे. आता त्याला रस्त्यावर खेळावं लागत नाही. तो शाळेत जातोय, नवीन भाषा शिकतोय. त्याचं आयुष्यच बदलून गेलंय. त्याचे पालकही शाळेत जाताहेत कारण त्यांनाही नवीन भाषा, नवीन संस्कृतीशी ओळख करून घ्यायची आहे.

योनासची भूमिका करणारी ट्रेजर तर शूटिंग होत असताना वर्षाची होती. तिचे खरे आईवडीलही लेबनॉनचे बेकायदेशीर नागरिक होते. सिनेमात तिच्या आईचं काम करणारी राहीलसुद्धा अशीच. आणि मग एक दिवस राहीलला खरोखरच अटक झाली. ट्रेजरचे आई-वडीलही तिच्या सोबत होते त्यामुळे तेही पकडले गेले. सिनेमात आईची वाट पाहणारा योनास आणि प्रत्यक्षात आईविना एकटी पडलेली ट्रेजर. सिनेमा आणि वास्तव जणू एकमेकांशी स्पर्धा करत होतं.

..................................................................................................................................................................

लहानपणी स्वभावाने किंचित बुजरी असलेल्या लबाकीला अभिनयामधून वेगवेगळी आयुष्य जगता येतात याचं आकर्षण वाटत असे. तिच्या प्रत्येक सिनेमात तर तिने अभिनय केलेला आहेच, पण इतर दिग्दर्शकांसाठीही ती काम करते ते त्यामुळेच. एव्हाना तिने दिग्दर्शित केलेल्या म्युझिक व्हिडिओजची चांगलीच चर्चा होऊ लागली होती. आधुनिक लेबनीज स्त्री ही आपल्या शरिराचं ओझं घेऊन जगत नाही असं सांगणाऱ्या तिच्या व्हिडिओजनी अनेकदा वादही निर्माण केले. त्यात नग्नता असते, लैंगिक हालचाली असतात, असा आरोप तिच्यावर झाला. पण तिने या आरोपांना दाद दिली नाही.

..................................................................................................................................................................

ट्रेजरला मग सिनेमाची कास्टिंग डिरेक्टर आपल्या घरी घेऊन गेली. सगळा क्रू तीन आठवड्यांसाठी तिचं कुटुंबं बनला. ख्रिसमसच्या रात्री त्यांना बाहेर काढण्यात लबाकी आणि खालेद यशस्वी झाले. ट्रेझर आता तिच्या आई-वडिलांबरोबर केनियामध्ये राहतेय आणि शाळेत जातेय. 

२.

‘कॅपरनॉम’पर्यंतचा नदीन लबाकीचा प्रवास इंटरेस्टिंग आहे. लबाकीचा जन्म १९७४ सालचा. लेबनॉनसाठी तो काळ अशांततेचा होता. हे नागरी युद्ध १९९१पर्यंत चाललं. या देशाची एक सीमा सिरियाला जोडलेली आहे, दक्षिणेला इस्त्रायल आहे आणि मेडिटरेनियन समुद्राच्या पलीकडे सायप्रस आहे. त्यामुळे लेबनॉनच्या संस्कृतीवर विविध धर्मांचे प्रभाव पडलेले आहेत. सुरुवातीला रोमन साम्राज्याने त्यांच्यावर चाल केली, त्यानंतर हजारो वर्षांनी अरब मुसलमानांनी आक्रमण केलं. मात्र तेव्हाही लेबनॉनमधल्या मॅरोनाईट ख्रिश्चन्सनी आपला धर्म संपू दिला नाही. पण तिथल्या अनेक छोट्यामोठ्या गटांचे विविध धर्म फोफावत गेले. ऑटोमन साम्राज्यानेही लेबनॉनवर स्वारी केलेली आहे. आजच्या आधुनिक लेबनॉनवर ऑटोमनचा प्रभाव प्रामुख्याने जाणवतो. पहिल्या महायुद्धानंतर आधुनिक लेबनॉनमधल्या पाच संस्थानांवर फ्रेंचांचं राज्य होतं. १९४३मध्ये लेबनॉनला स्वातंत्र्य मिळालं आणि चार महत्त्वाच्या धर्मांना सरकारमध्ये विशिष्ट राजकीय सत्ता असेल असं ठरलं.

१९७५मध्ये लेबनॉनमध्ये विविध राजकीय आणि पंथांमध्ये खटके उडू लागले आणि त्याची परिणिती नागरी युद्धामध्ये झाली. पुढची पंधरा वर्षं या देशाने भयंकर हिंसा अनुभवली. लाखभराहून अधिक माणसं मृत्युमुखी पडली. दहा लाख लोक देश सोडून निघून गेले. या काळात शाळा नव्हत्या. लहान मुलांना घराबाहेर पाठवायलाही आईवडील घाबरत. नदीन लबाकीही त्याला अपवाद नव्हती.

घरात बसून अर्थातच मुलं कंटाळायची. लबाकीने घरातल्या टीव्हीमध्ये आपला मित्र शोधला. बाहेरच्या जगात काय चाललंय हे कळण्याचा तो एक मार्ग होता. आणि एका काल्पनिक विश्वात रमण्याचाही. आपल्या जगाशी किंवा आपल्या वास्तवाशी संबंध नाही असं काहीतरी निर्माण करायचं असेल तर आपल्याला सिनेमा बनवायला हवा असं तिच्या मनाने घेतलं ते यामुळेच. शिवाय, तिचे काका गोष्टी फार सुंदर सांगत. त्यांच्या कुटुंबाचे ते हाकावती, म्हणजे कथाकथनकार होते. तिच्या आजोबांच्या मालकीचं एक छोटंसं थिएटरही होतं.

‘‘मी सिनेमा बनवणार, एक दिवस हॉलीवूडला जाणार,’’ असं ती तिच्या घरातल्यांना, शेजाऱ्यापाजाऱ्यांना सांगायची. ते अर्थातच हसायचे. कारण लेबनॉनसारख्या देशात काहीच शक्य नव्हतं.

स्थिती थोडी नीट व्हायला लागली आणि लबाकीने म्युझिक व्हिडिओ आणि जाहिरातीच्या क्षेत्रात दिग्दर्शक म्हणून काम मिळवलं. तिने दिग्दर्शित केलेल्या म्युझिक व्हिडिओंमुळे स्टुडिओ एल फान नावाच्या एका लेबनीज टॅलेन्ट शोमध्ये तिला पुरस्कारही मिळाला. प्रत्यक्ष काम करूनच आपल्याला दिग्दर्शनामधले बारकावे शिकता येतील याची जाणीव तिला होती. कारण लेबनॉनमध्ये सिनेमाचं शिक्षण देणारी संस्थाच अस्तित्वात नव्हती. जिथं माणसांचं आयुष्यच स्वस्त झालेलं होतं, तिथं सिनेमा बनणं किंवा पाहणं ही दूरचीच गोष्ट.

परिस्थिती आणखी निवळली आणि लबाकीने बैरुतमधून ऑडिओ व्हिज्युअल स्टडीज या विषयात पदवी मिळवली. ग्रॅज्युएशनसाठी तिने बनवलेल्या ‘11 रु पास्तर’ या शॉर्ट फिल्मला अरब सिनेमाच्या बिएनालेमध्ये सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर तिने पॅरिसमध्ये अभिनयाचं एक वर्कशॉप केलं. लहानपणी स्वभावाने किंचित बुजरी असलेल्या लबाकीला अभिनयामधून वेगवेगळी आयुष्य जगता येतात याचं आकर्षण वाटत असे. तिच्या प्रत्येक सिनेमात तर तिने अभिनय केलेला आहेच, पण इतर दिग्दर्शकांसाठीही ती काम करते ते त्यामुळेच. एव्हाना तिने दिग्दर्शित केलेल्या म्युझिक व्हिडिओजची चांगलीच चर्चा होऊ लागली होती. आधुनिक लेबनीज स्त्री ही आपल्या शरिराचं ओझं घेऊन जगत नाही असं सांगणाऱ्या तिच्या व्हिडिओजनी अनेकदा वादही निर्माण केले. त्यात नग्नता असते, लैंगिक हालचाली असतात, असा आरोप तिच्यावर झाला. पण तिने या आरोपांना दाद दिली नाही.

या सगळ्या अनुभवांमधूनच ‘कॅरमल’ या पहिल्या सिनेमाची गोष्ट तिच्या डोक्यात येऊ लागली.

कॅरमल तयार होतं ते साखर, लिंबू आणि पाणी उकळल्यावर. त्या साखरेचे धागे निघतात. ते मिश्रण कस्टर्डचा बेस म्हणून वापरलं जातं. आणि ती पेस्ट शरिरावरचे नको असलेले केस काढण्याकरता वॅक्सिंगसाठीही वापरतात. लबाकीने एक रूपक म्हणून ते वापरलंय. चवीला छान, त्वचेवर गरम गरम लावलं की भाजणारं आणि खेचलं की नको असलेलं काहीतरी काढून टाकणारं कॅरमल. लबाकीच्याच भाषेत सांगायचं तर, ‘इटर्नल क्वेस्ट ऑफ ब्युटी दॅट मेक्स यु सफर.’

एका ब्युटी सॅलोनमध्ये ही गोष्ट घडते. बायकांना माहीत असेल, इथे खूप छान वाटतं. आपण चेहर्‍याला मसाज करून घ्यायला, केस कापायला, रंगवून घ्यायला, काढून टाकायला जातो, हातापायांची सफाई करायला जातो आणि तिथे काम करणाऱ्या मुली आपले खूप लाड करतात. आजुबाजूला फक्त बायकाच असतात त्यामुळे वातावरणात एक प्रकारचा मोकळेपणा असतो. इथे काम करणारी मुलगी तुमचे दोष दूर करणारी असते. अनेकदा एरवी न भेटणाऱ्या या मुलींशी गप्पा होतात आणि प्रसंगी मन मोकळंही केलं जातं. अशाच एका पार्लरमध्ये हा सिनेमा घडतो.

पाच बायका तिथे आहेत. सॅलोनची मालकीण ख्रिश्चन आहे. (लबाकीनेच ती भूमिका केलीये). ती अतिशय यशस्वी व्यावसायिक आहे. पण व्यक्तिगत आयुष्यात सैरभैर झालीये. एका लग्न झालेल्या पुरुषाबरोबर तिचं अफेअर आहे आणि या नात्याचं भविष्य काय याची अनिश्चितता तिला सतत भेडसावतेय. एका बाजूला प्रियकराबरोबरचा आनंद आहे आणि दुसऱ्या बाजूला पंरपरा.

तिच्या पार्लरमध्ये काम करणारी नसरीन आहे. ही मुसलमान. तिचं लग्न ठरलंय म्हणून सगळ्या जणी तिची चेष्टामस्करी करताहेत. पण ती खुश दिसत नाही. कारण लग्नाच्या पहिल्या रात्री आपण व्हर्जिन नाही हे आपल्या नवऱ्याला कळणार या भीतीने तिला ग्रासलंय.

अरिमाही पार्लरमध्येच काम करतेय. पण नसरीनच्या तुलनेत ती शांत आणि मितभाषी आहे. तिचा झगडा स्वत:शीच चाललाय. आपल्याला पुरुष आवडतात की बायका हे तिला समजत नाहीये. पार्लरमध्ये आलेल्या एका मुलीविषयी आपल्याला खूप ओढ वाटतेय याची जाणीव तिला झालीये आणि त्याचं काय करायचं हे तिला समजत नाहीये.

या तरुण मुलींमध्ये ६५ वर्षांची रोझही आहे. गंमत म्हणजे ती चक्क प्रेमात पडलीये. या वयात आपल्या मनात अशा भावना कशा निर्माण झाल्या म्हणून तीही गोंधळलेली आहे. तारुण्याचा हव्यास धरून आहे. आपल्या वयापेक्षा आपण लहान आहोत हे दाखवण्याची तिची धडपड काही वेळा केविलवाणीही वाटतेय.

या बायका लेबनीज आहेत. आपलं शरीर, सेक्स, व्हर्जिनिटी या सगळ्याचा शोध घेताहेत. समाजात ज्यावर मोकळेपणाने बोलता येत नाही त्या अडचणींमधून मार्ग काढू पाहताहेत.

..................................................................................................................................................................

२०१०मध्ये नदीन लबाकीचा दुसरा सिनेमा आला. तांत्रिकदृष्ट्या पहिल्या सिनेमापेक्षा यात निश्चितच सफाई होती. विषयही अधिक व्यापक होता. आणि भूमिकाही. ‘व्हेअर डु वुई गो नाऊ’ या लबाकीच्या सिनेमाने थेट परदेशी भाषेतल्या सिनेमासाठीचं ऑस्करचं नामांकन मिळवलं आणि अरब देशांमधली असं नामांकन मिळवणारी लबाकी ही पहिली महिला दिग्दर्शक ठरली. व्यावसायिकदृष्ट्याही हा सिनेमा ‘कॅरमल’पेक्षा जास्त यशस्वी ठरला. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही. यातला संघर्ष अधिक वैश्विक होता. आणि पुन्हा एकदा लबाकीने तो हलक्या फुलक्या पद्धतीने दाखवला होता.

..................................................................................................................................................................

लबाकीचा हा पहिला सिनेमा तिच्याबरोबर आणखी दोन पुरुष लेखकांनी लिहिलाय हेही महत्त्वाचं आहे. म्हटलं तर ही गोष्ट खास लेबनॉनमधल्या किंवा अरब जगातल्या बायकांची आहे असं म्हणता येईल. पण तरीही जगभरातल्या साठेक देशांमध्ये हा सिनेमा दाखवला गेला, विविध महोत्सवांमधून त्याचे शो झाले आणि जवळपास सगळ्या बायकांना तो कुठेतरी भिडला. प्रश्न वेगवेगळे असले तरी अनेक पातळ्यांवर तो बायकांचं म्हणणं मांडतोय असं वाटत होतं. २००६मध्ये भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवामध्ये गोव्याला हा सिनेमा मी पाहिला आणि तेव्हाही एका वेगळ्या जगातला आपला सिनेमा असं काहीसं मला वाटलं होतं.

या सिनेमामध्ये राजकीय भाष्य नसलं तरी इथेही पार्श्वभूमीला राजकारण आहे. इथे दिसणाऱ्या बायका आधुनिक आहेत. त्यांना बंधनात जगावं लागतंय असं वरवर जाणवत नाही पण तरीही त्या स्वतंत्र नाहीत. पाश्चात्य संस्कृतीशी त्यांची ओळख झालीये, त्या जगाचं आणि तिथल्या बायकांच्या पेहरावाचं, जगण्याचं आकर्षण वाटतंय. पण दुसऱ्या बाजूला धर्म आणि परंपरा यांचं ओझंही आहे. यात त्या स्वत:ची आयडेंटिटी शोधायचा प्रयत्न करताहेत. सिनेमा म्हणून यात दोष आहेतही, पण दिग्दर्शकाचा प्रामाणिकपणा त्या दोषांवर मात करतो.

२००७च्या कान चित्रपट महोत्सवामध्ये नदीन लबाकीचा ‘कॅरमल’ डिरेक्टर्स फोर्टनाईट या विभागात दाखवला गेला आणि त्याचं खूप कौतुक झालं. खुद्द लेबनॉनमध्ये तो प्रदर्शित झाला आणि तूफान चालला. या सिनेमाने लबाकीला देशात आणि परदेशात नाव मिळालं. एक उदयोन्मुख दिग्दर्शक म्हणून तिच्याकडे बघितलं जाऊ लागलं.

३.

२०१०मध्ये नदीन लबाकीचा दुसरा सिनेमा आला. तांत्रिकदृष्ट्या पहिल्या सिनेमापेक्षा यात निश्चितच सफाई होती. विषयही अधिक व्यापक होता. आणि भूमिकाही.

‘व्हेअर डु वुई गो नाऊ’ या लबाकीच्या सिनेमाने थेट परदेशी भाषेतल्या सिनेमासाठीचं ऑस्करचं नामांकन मिळवलं आणि अरब देशांमधली असं नामांकन मिळवणारी लबाकी ही पहिली महिला दिग्दर्शक ठरली. व्यावसायिकदृष्ट्याही हा सिनेमा ‘कॅरमल’पेक्षा जास्त यशस्वी ठरला. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही. यातला संघर्ष अधिक वैश्विक होता. आणि पुन्हा एकदा लबाकीने तो हलक्या फुलक्या पद्धतीने दाखवला होता.

लबाकीने हा सिनेमा आपल्या मुलासाठी केला. एका मुलाखतीत ती सांगते, ‘लेबनॉनमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनांमुळे मला हा सिनेमा लिहावासा वाटला. आमच्या देशाने नागरी युद्ध बघितलं होतं. पण त्यानंतर दोन दशकं आम्ही शांततेत जगलो. शिया, सुन्नी, ज्यू, ख्रिश्चन्स... असे अठरा वेगवेगळे धर्म असूनही आम्ही ही शांतता साध्य केली होती. पण २००८मध्ये दोन विरोधी राजकीय पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आणि लोकांनी पुन्हा शस्त्रं हातात घेतली. रस्त्यावर पुन्हा हिंसा होऊ लागली. बैरुत काही तासांमध्ये वॉर झोन बनला. मित्र, मैत्रिणी, शेजारी असलेले, एकाच दुकानातून सामान आणणारे, मुलांना एकाच शाळेत पाठवणारे एकमेकांचे शत्रू बनले. आदल्या रात्री एकत्र असलेले, मित्र असलेली माणसं धार्मिक किंवा राजकीय मतभेदांमुळे इतक्या टोकाला कशी जातात? आपल्यावर असा परिणाम कसा होता असा विचार माझ्या मनात येत होता. आपण गरोदर आहोत हे त्यावेळी मला नुकतंच समजलेलं होतं. माझं पहिलं बाळ. ही गोष्ट अशी असते की ज्यामुळे तुमचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. माझा मुलगा जर अठरा- एकोणीस वर्षांचा असेल, त्याने जर हातात शस्त्र घेतलं, तो रस्त्यावर उतरला आणि या संघर्षात पडला, त्याच्याच वयाच्या दुसऱ्या तरुण मुलावर त्याने बंदूक रोखली तर? आई म्हणून मी काय करेन? त्याला थांबवण्यासाठी मी काय करेन? कुठच्या थराला जाईन?’

या प्रश्नांची उत्तरं शोधण्यामधून ‘व्हेअर डु वुई गो नाऊ’ची सुरुवात झाली. मात्र गोष्ट लिहिताना ती एका आईची गोष्ट झाली नाही, ती एका गावाची गोष्ट बनली. ख्रिश्चन आणि मुसलमान लोकांची वस्ती असलेलं गाव. हे गाव नेमकं कुठे आहे हे आपल्याला कळत नाही. गावाच्या भोवती सुरुंग आहेत आणि तिथे यायचं तर केवळ एका पुलाचा रस्ता आहे. देशात उसळलेल्या हिंसेच्या बातम्या गावामध्ये पोचताहेत. अशातच एक दिवस गावातला रौकोझ नावाचा एक मुलगा चर्चवरचे स्पीकर्स नीट करत असताना शिडीवरून पडतो आणि चर्चच्या क्रॉसवर जाऊन आदळतो. क्रॉसचे दोन तुकडे होतात.

दुसऱ्या दिवशी चर्चमध्ये जमलेल्या गावकर्‍यांना फादर, हे काम आपल्या मुसलमान बांधवांपैकी कोणीही केलेलं नाही, असं आवर्जून सांगतात. त्यानंतर मशिदीमध्ये काही बोकड शिरल्याचं इमामाच्या लक्षात येतं. माणसं जमतात. पण यात आपल्या ख्रिश्चन बांधवांचा काहीही दोष नाही असं इमाम आवर्जून सांगतात. आणि तरीही दोन्ही धर्माचे पुरुष एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा दोषारोप होतात, हमरीतुमरी होते आणि पाहता पाहता वातावरण हिंसक बनतं.

गावातल्या ख्रिश्चन आणि मुसलमान बायकांचं मात्र आपापसात छान जमत असतं. आजुबाजूचं वातावरण असं दुषित होतंय, त्यात आपली मुलं, नवरे सगळे ओढले जाताहेत तेव्हा त्यांना थांबवायचं असेल तर आता आपल्यालाच काहीतरी करायला हवं या विचारातून त्या एक प्लॅन करतात. पण तो प्लॅन अंमलात येईपर्यंत गावातल्या एका घराला खूप मोठ्या शोकांतिकेला तोंड द्यावं लागतं.

मध्य पूर्वेतल्या देशांमधल्या सिनेमांमध्ये गंभीर विषयांची हाताळणी गंभीरपणे केलेली असते. त्यात विनोदाचा वापर फार नसतो. लबाकी याला अपवाद आहे. तिच्या सगळ्या सिनेमांमध्ये हलकाफुलका विनोद आहे. ‘व्हेअर डु वुई गो नाऊ’मध्ये छान गाणी आहेत. नाच आहे. यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत तिचे सिनेमे थेट पोचतात.

लबाकी म्हणते, ‘‘काही सिच्युएशन्स अशा असतात की त्यांच्या प्रेमात पडण्यावाचून पर्याय नसतो. तुमच्या चुकांवर तुम्ही हसता तेव्हाच त्या सुधारण्याच्या दिशेने तुमचा प्रवास सुरू होतो. शोकांतिका काही फक्त काळ्या पांढऱ्या रंगात नसते. माझ्या अवतीभोवती मी देशातल्या हिंसाचारात आपली मुलं गमावलेल्या अनेक स्ट्राँग बायकांना बघते, त्यांना हसताना, विनोद करताना पाहते तेव्हा मला नवल वाटतं की यांना हे कसं जमत असेल? इतकं मोठं दु:खं वाट्याला आल्यानंतर सकाळी उठून छान कपडे घालून या तयार कशा होत असतील? काय चालत असेल त्यांच्या मनात?

‘‘एक माणूस म्हणून, आपल्यासमोर अशी अबसर्डिटी येते तेव्हा त्यावर व्यक्त व्हायला हवं असं वाटतं. वाटतं की लोकांना सांगावं, पुरे झालं. आम्हाला आता नॉर्मल आयुष्य जगू द्या. माझी अभिव्यक्ती सिनेमा आहे म्हणून मी त्यावर सिनेमा केला. कदाचित त्यामुळे काही बदलेल असं नाही, पण बदल घडवण्यासाठी सिनेमा हे खूप मोठं अहिंसक शस्त्र आहे असं मला ठामपणे वाटतं. कारण आपल्याला जे वाटतं ते लोकांना सांगत असताना आपण त्यांचं मनोरंजन पण करत असतो.

..................................................................................................................................................................

समाजामध्ये काहीतरी बदल घडवून आणतील असे सिनेमे आपल्याला करायचे आहेत असं लबाकी म्हणते. लेबनॉनसारख्या देशात राहत असल्यामुळे हे एक मिशन आहे असंही तिला वाटतं. लेबनॉनमध्ये सिनेमाची संस्कृती अलीकडच्या काळात रुजायला लागली आहे. कारण देश छोटा आहे. निर्मात्यांना आपण जेवढं भांडवल गुंतवू तेवढं परत मिळेल याची शाश्वती वाटत नाही. लोक थिएटरमध्ये जाण्यापेक्षा टीव्ही पाहणं अधिक पसंत करतात. पण म्हणूनच सिनेमे बनवणं हे लेबनीज दिग्दर्शकांना अधिक आव्हानात्मक वाटतं. लबाकीही त्याला अपवाद नाही. दिग्दर्शक म्हणून तर ती या आव्हानांना तोंड देते आहेच, पण नट म्हणूनही ती काहीतरी सांगू पाहणाऱ्या अर्थपूर्ण सिनेमांमधून हजेरी लावतेय. आणि व्यक्ती म्हणून लेबनॉनमध्ये जे घडतंय त्यावर ती आवर्जून भाष्यही करते.

..................................................................................................................................................................

‘‘आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बहुतांश वेळेला पुरुष हातात शस्त्रं घेतात आणि युद्ध करतात. त्याचे परिणाम मागे राहणार्‍या बायकांना भोगावे लागतात. लेबनॉनमध्ये एकही कुटुंब असं नसेल ज्यांनी हे परिणाम भोगलेले नाहीत. माझ्या दृष्टीने जगात असं कोणतंही कारण नाही ज्यामुळे माझ्या मुलाने हिंसा करावी किंवा हिंसाचारात प्राण गमवावेत आणि त्याचं समर्थन करता यावं. नो कॉज इज गुड इनफ टू लुझ माय चाईल्ड ऑर टेक अ वेपन अँड गो टू वॉर.’’

या सिनेमामध्येही बहुतेक कलावंत व्यावसायिक नट नाहीत. लबाकीने आपल्या पद्धतीनुसार तिच्या सहकार्‍यांना सिनेमातल्या व्यक्तिरेखा समजावून सांगितल्या आणि त्यांनी माणसं शोधली. त्यातले अनेक जण पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर उभे राहिलेले आहेत. त्यामुळे काही वेळा त्यांच्या एखाद्या प्रसंगामधली प्रतिक्रिया लबाकीच्या स्क्रिप्टमधली असायचीच असं नाही. पण तेवढी लवचीकता ती ठेवते. अनपेक्षित क्षणांसाठी दिग्दर्शक म्हणून आपल्यामध्ये मोकळेपणा असतो असं तिचं म्हणणं असतं.

या सिनेमामधली महापौराच्या बायकोच्या व्यक्तिरेखेसाठी लबाकीला जी इव्हान सापडली तीही अशीच. लोकेशन शोधत असताना लबाकी आणि तिचे सहकारी एका गावात गेले होते. तिथे त्यांचं स्वागत करायला एक बाई आली होती. ती अतिशय भरभर बोलत होती. आपण या गावातल्या प्रिस्टची बायको आहोत, तुम्ही इथे शूटिंग करणार याचा आम्हाला खूप आनंद झालाय... आणि अचानक लबाकीने तिला विचारलं, ‘मग या सिनेमात तू काम करशील का?’

आधी तिने नकारच दिला. पण मग लबाकीने तिला पटवलं आणि हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर तिला चक्क लेबनॉनमधल्या टीव्ही मालिकांमधून कामं मिळायला लागली. ख्रिश्चन असूनही एक मुसलमान व्यक्तिरेखा करताना सुरुवातीला ती थोडी बिचकली होती, पण लवकरच ती सरावली.

लबाकीच्या काम करण्याच्या या पद्धतीचा तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्या तिच्या सहकार्‍यांना खूपच त्रास होतो. कलाकारांची उत्स्फूर्तता राखायची म्हणून ती त्यांच्याबरोबर तालीम करत नाही. अपवाद फक्त व्यावसायिक नटांचा. त्यामुळे तिच्या सेटवर गोंधळच असतो.

‘‘ही पद्धत बरोबर आहे असं मला नाही म्हणायचं, पण ही माझी पद्धत आहे. मी सिनेमा शिकलेली नाही, मी मोठ्या दिग्दर्शकांना काम करताना पाहिलेलं नाही. त्यामुळे मी माझ्या कामाची पद्धत स्वत:ची स्वत: तयार केलेली आहे. काही वेळा एडिटिंग करताना लक्षात येतं की आपल्या मनात जे होतं तसंच हे नाहीये, पण काही वेळा मनात होतं त्यापेक्षा अधिक काहीतरी जादुई निर्माण झालंय असंही होतं. सिनेमा इज मोअर इनस्टिंक्टीव्ह दॅन टेक्निकल,’’ ती सांगते.

सिनेमात दोन धर्मगुरू आहेत. त्यातली मुसलमान धर्मगुरूची व्यक्तिरेखा करणारा ख्रिश्चन आहे आणि ख्रिश्चन धर्मगुरूचं काम करणारा मुसलमान. आपल्या मनातला सर्वधर्मसमभाव अस्तित्वात आणण्याचा लबाकीचा हा प्रयत्न असावा. लेबनॉनमध्ये या सिनेमामुळे काही धर्ममार्तंडांना राग आला होता. सेन्सॉरनेही काही दृश्यं कापायला सांगितली होती. पण सेन्सॉरच्या सदस्यांबरोबर लबाकीची बैठक झाली आणि त्या चर्चेनंतर त्यांनी एकही दृश्य कापलं नाही.

समाजामध्ये काहीतरी बदल घडवून आणतील असे सिनेमे आपल्याला करायचे आहेत असं लबाकी म्हणते. लेबनॉनसारख्या देशात राहत असल्यामुळे हे एक मिशन आहे असंही तिला वाटतं. लेबनॉनमध्ये सिनेमाची संस्कृती अलीकडच्या काळात रुजायला लागली आहे. कारण देश छोटा आहे. निर्मात्यांना आपण जेवढं भांडवल गुंतवू तेवढं परत मिळेल याची शाश्वती वाटत नाही. लोक थिएटरमध्ये जाण्यापेक्षा टीव्ही पाहणं अधिक पसंत करतात. पण म्हणूनच सिनेमे बनवणं हे लेबनीज दिग्दर्शकांना अधिक आव्हानात्मक वाटतं. लबाकीही त्याला अपवाद नाही. दिग्दर्शक म्हणून तर ती या आव्हानांना तोंड देते आहेच, पण नट म्हणूनही ती काहीतरी सांगू पाहणाऱ्या अर्थपूर्ण सिनेमांमधून हजेरी लावतेय. आणि व्यक्ती म्हणून लेबनॉनमध्ये जे घडतंय त्यावर ती आवर्जून भाष्यही करते.

या वर्षीच्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात अरब सिनेमांच्या स्पर्धेसाठी मी ज्युरी म्हणून काम केलं होतं. यात सिनेमे होते तशाच डॉक्युमेंटरीजही होत्या. खूप वेगळे विषय, खूप निराळी ट्रिटमेंट या सिनेमांमधून बघायला मिळाली. यातच एक सिनेमा होता, ‘1982’. आवलीद मुआनेस या दिग्दर्शकाचा हा पहिलाच सिनेमा. त्यात लबाकीने मुख्य भूमिका केलीये. पूर्व बैरुतच्या सीमेवरच्या डोंगरावर वसलेल्या एका गावात हा सिनेमा घडतो. १९८२मध्ये दक्षिण लेबनॉनमध्ये नागरी युद्ध सुरू झालं, त्याच दिवशी मुआनेसने विद्यार्थी म्हणून या शाळेत प्रवेश घेतला होता. त्या एका दिवसात घडलेल्या घटनांचं प्रतिबिंब त्याच्या या सिनेमात पडलंय. बॉम्बच्या आवाजाने शाळेतले वर्ग हादरताहेत. मुलं भेदरलेली आहेत. त्यांना सुरक्षित ठेवणं हे शिक्षकांचं पहिलं कर्तव्य. पण तेही घाबरलेले आहेत. इतके दिवस ज्या विषयी वाचत होतो, ऐकत होतो ते युद्ध जवळ येतंय याची जाणीव पोटात खड्डा पाडणारीच आहे.

सिनेमातल्या लबाकीने यातल्या एका शिक्षकाची, यास्मिनची भूमिका केलीये. शिवाय सिनेमाच्या केंद्रस्थानी दोन लहान मुलंही आहेत. सिनेमाच्या शेवटी तो मुलगा आणि ती मुलगी त्यांच्या शाळेच्या बसच्या खिडकीतून बाहेर पाहतात, तेव्हा दूरवर बॉम्बहल्ले सुरू झालेले असतात. हे काय घडतंय, ती मुलगी विचारते. मला माहीत नाही, मुलाचं उत्तर येतं. दिग्दर्शकालाही या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाहीये. किंबहुना, त्याच्यासाठी ते महत्त्वाचंच नाही. ज्यांचा कोणताही संबंध नसतो त्या लहान मुलांना हिंसेचे परिणाम भोगावे लागतात, त्यांच्या निरागस मनांवर ही हिंसा कायमचे ओरखडे काढून ठेवते एवढंच त्याला सांगायचंय. २०२०च्या ऑगस्ट महिन्यात बैरुतमध्ये जो मोठा स्फोट घडला, माणसं मृत्युमुखी पडली, लाखोंनी बेघर झाली, त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हा सिनेमा प्रदर्शित होत असल्यामुळे तिथल्या प्रेक्षकांना तो अधिकच परिणामकारक वाटेल यात शंकाच नाही.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

त्या स्फोटांनंतर, लबाकी बैरुतच्या रस्त्यांवरून फिरतेय. समोर दिसणाऱ्या आपल्या शहराचं उदध्वस्त रूप पाहून तीही हादरलीये. पण तरीही तिचा आशावाद संपलेला नाही. ती म्हणते, ‘‘आम्हाला वाटत होतं की, आजच्या पिढीला तर आम्ही हिंसाचारापासून दूर ठेवण्यात यशस्वी होऊ. आमच्या देशाने इतका रक्तपात पाहिला आहे, पण आमच्या तरुण पिढीच्या हाताला ते रक्त लागू नये याची काळजी आम्ही घेऊ. पण एका क्षणात आम्ही त्यांनाही आमचा काळ अनुभवायला भाग पाडलं. तोच अन्याय, तीच संतापाची भावना. विसरता न येण्यासारखी. आणि तरीही हे बदलणार आहे यावर माझा विश्वास आहे. एक नकारात्मक जग संपून त्या जागी नवीन, सुंदर जग अस्तित्त्वात येणार आहे. मी अजूनही निराश झालेले नाही. आशा आहे की मी कधीच निराश होणार नाही. त्यामुळेच तर मी जगू शकतेय. जे करतेय ते करू शकतेय.’’

लबाकीच्या या आशावादाची आजच्या जगाला खरोखरच नितांत गरज आहे. तिच्यातला दिग्दर्शक त्यातून नवीन काहीतरी निर्माण करेल याची खात्री तर आहेच आहे.

..................................................................................................................................................................

लेखिका मीना कर्णिक पत्रकार व चित्रपट समीक्षक आहेत.

meenakarnik@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कोविडकाळातही युरोपातल्या सार्वजनिक ग्रंथालयांनी ग्रंथसंस्कृती जपली आणि माणुसकीचंही उदात्त दर्शन घडवलं... त्याची ही गोष्ट...

हा लादलेला विजनवास आज अवघं जगच भोगत आहे. व्हर्च्युअल सहवासात रमत आहे. मात्र एकट्यानं जगणाऱ्या, जगावं लागणाऱ्या, शारीर व्याधी व आजारांचा सामना करत जगणार्‍या कुणाहीसाठी हा सक्तीचा बंदिवास तुलनेनं कितीतरी पीडादायी आहे. इथल्या या व्हल्नरेबल गटाची ही विकलता, हतबलता लक्षात घेऊन त्यांच्यापर्यंत पोचण्याचे, मदतीचे प्रयत्न सुरू झाले, तेव्हा  खचितच आघाडीवर राहिली ती समाजमनाशी आरपार जोडली गेलेली स्थानिक ग्रंथालयंच.......