जर किशोरीताई आमोणकर ‘जशा’ होत्या, ‘तशा’ नसत्या तर...
दिवाळी २०२० - जर...तर
केशव परांजपे
  • किशोरीताई आमोणकर
  • Sat , 21 November 2020
  • दिवाळी २०२० जर...तर सतार ते रॉक किशोरी आमोणकर Kishori Amonkar हृदयनाथ मंगेशकर Hridaynath Mangeshkar पु. ल. देशपांडे P. L. Deshpande पं. जितेंद्र अभिषेकी Jitendra Abhisheki व्ही. शांताराम V. Shantaram सुगमसंगीत LIGHT MUSIC रागदारी संगीत Classical music

किशोरीताई आमोणकर नेहमी म्हणायच्या – “किशोरी ‘आज’ आहे, ‘उद्या’ नाही…” मी प्रकटही म्हणत असे – “हे खरं आहे, पण तो ‘उद्या’ अजून बराच दूर आहे. निदान दहा-बारा वर्षं.” पण तो ‘उद्या’ आला… अनपेक्षित आला… खूप लवकर आला. ८५ वर्षं वय कमी नक्कीच नाही, तरीही वाटत राहिलं, फार लवकर आला तो वाईट दिवस. ताईंकडून कितीतरी गोष्टी समजून घ्यायच्या होत्या, त्यांना कितीतरी काय काय विचारायचं होतं… का वेंधळ्यासारखा काळ जाऊ दिला? का तो ‘उद्या’ एवढ्या लवकर येणारच नाही, असं गृहित धरलं?

विभ्रम हे किशोरीताईंचं जणू जन्मनक्षत्र होतं. या विभ्रमाने त्यांच्या गायनात उदगारचिन्हे बरसली, तर व्यक्तिमत्त्वात प्रश्नचिन्हे! त्यांच्या स्वभावाविषयी खूप कुजबूज होती… गदारोळ वाटावा एवढी कुजबूज. आणि हे ओझे सावरत एखाद्याने त्यांना सामोरे जावं, तर त्यांच्या सरळपणाने त्याला चक्कर यावी. किशोरीताईंना समजून घेणं ही गोष्ट अतिशय अवघड, आव्हानात्मक – आणि तरीही केवढं आवाहन! वर वर सुसंगत वाटावं, त्यात थोडे डोकावून पाहिलं की, विसंगतीची विवरं जाणवावीत आणि विसंगीतच्या विस्कटलेपणाने विमनस्क व्हावं, तर अंतर्यामी सुसंगतीचा प्रवाह साद घालताना जाणवावा… किशोरीताईंच्या बाबतीत हा अनुभव नेहमीच येत गेला. ‘किशोरीताई… जर…तर’मधून एक प्रयत्न आहे. काही उत्तरं मिळवण्याचा, निदान काही प्रश्न मांडता येतात का, हे पाहण्याचा.

‘जाईन विचारित रानफुला’ आणि ‘हे श्यामसुदंर राजसा’ ही हृदयनाथ उर्फ बाळासाहेब मंगेशकरांच्या संगीतात किशोरीताईंनी गायलेली दोन(च) गाणी. पण या गाण्यांची गुणवत्ता आणि लोकप्रियता एवढी आहे की, या गाण्यांच्या वळणावर थबकल्याशिवाय मराठी भावगीतांची आनंदयात्रा पूर्ण होऊ शकत नाही. पण मग ही दोनच गाणी करून हे कलाकार का थांबले? अशी निदान १०-१२ गाणी या दोघांनी केली असती तर? ताईंना हे विचारायचं राहून गेलं. विचारलं असतं तरी, मी ज्या काळात त्यांना विचारलं असतं त्या काळात त्यांनी असं उत्तर दिलं असतं की – “शब्दप्रधान गाणं कसं असतं ते मला गाऊन बघायचं होतं, ते पाहिलं. त्यात मला आणखी गुंतायचं नव्हतं.” या उत्तरावर प्रश्नांचं मोहळ मनात धरून गप्प बसावं लागलं असतं.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.facebook.com/aksharnama/photos

..................................................................................................................................................................

हृदयनाथांना हा प्रश्न विचारला तरी ते त्याचं आजच्या काळात, आजच्या परिस्थितीत सुसंगत वाटेल असंच उत्तर देतील. त्या वेळी प्रत्यक्ष काय घडलं, या प्रश्नाचा छडा लावण्यासाठी शोध-पत्रकारिताच हवी. या महान कलाकारांच्या संदर्भात ती करण्याची मानसिकता कोणाजवळ असणार?

अशी आणखी गाणी निर्माण झाली असती तर आपला श्रवणानंद खूप वाढला असता हे नक्की. पण यापेक्षाही महत्त्वाचं काही घडलं असतं का? हृदयनाथांच्या चालींमध्ये आणि ताईंच्या गायनामध्ये अधिक समृद्धतता आली असती का? ताई सुमगसंगीताकडे अधिक झुकल्या असत्या का? हृदयनाथ आणि किशोरीताई यांचं जुळलेलं आणि संपलेलं मैत्र हा विषय काही केवळ दोन व्यक्तींमधला, दोन प्रतिभावंतांमधल्या मैत्रापुरता मर्यादित असू शकत नाही, दोन प्रतिभांमधल्या परस्परपूरकतेपर्यंत तो जातो.

किशोराताईंनी पु. ल. देशपांडे यांच्या संगीत-दिग्दर्शनात गायन केलं आहे. मंगेश पाडगावकर लिखित ‘बिल्हण’ या संगीतिकेत ताई शास्त्रीय आणि शब्दप्रधान या दोन्ही विधा गायल्या आहेत. याच संगीतिकेसाठी पं. जितेंद्र अभिषेकीही गायले. त्यातल्या दोन गीतांच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या – ‘माझे जीवनगाणे’ आणि ‘शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले’. त्या संगीतिकेतील ताईंनी गायलेल्या गीतांच्या ध्वनिमुद्रिका मात्र निघाल्या नाहीत. का बरं? ताईंना ओळखणारी मंडळी या प्रश्नाची दोन-तीन संभाव्या उत्तरं देतील – एक, ताईंनी अवाजवी मानधन मागितलं असेल किंवा मागतील असं निर्मात्यांना वाटलं असेल. दोन, ताईंकडून मुद्रिकेसाठी ध्वनिमुद्रण करून घेणं संबंधितांना फार जिकिरीचं वाटलं असेल. तीन, ताई निर्मात्यांच्या निमंत्रणाची आणि निर्माते ताईंच्या प्रस्तावाची वाट पाहत राहिले असतील.

ही गाणी ध्वनिमुद्रिकांच्या स्वरूपात प्रकाशित झाली असती तर?

ताई पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या संगीतात आकाशवाणीसाठी कवी बा. भ. बोरकर यांची काही गीतं गायल्या आहेत. ही गीतंही ध्वनिमुद्रिकेच्या स्वरूपात प्रकाशित झाली नाहीत.

..................................................................................................................................................................

‘गीत गाया पत्थरोंने’च्या यशानंतर ताई सांगत त्यानुसार माईंनी म्हणजे किशोरीताईंच्या आई आणि गुरू गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांनी किशोरीताईंना सांगितलं – “तुला फिल्मी गायचं असेल तर खुशाल गा, पण मग उद्यापासून माझ्या तंबोऱ्याला हात लावायचा नाही.” या निर्वाणीच्या इशाऱ्यामुळे (?) ताईंना निर्णय घ्यावा लागला आणि त्यांनी तो घेतला. तो निर्णय रागदारी संगीताचे चाहते आणि परंपरेचे पुजारी (चांगल्या अर्थाने) यांच्यासाठी फार मोठा शुभशकून ठरला. माईंनी तसा निर्वाणीचा इशारा दिला नसता तर?

..................................................................................................................................................................

ताई सुप्रसिद्ध संगीतकार आणि व्हायोलिनवादक पं. हुस्नलाल यांच्याकडे काही काळ शिकत होत्या. हुस्नलालजी त्या काळातही हिंदी चित्रपट संगीताच्या क्षेत्रातून बाहेर फेकल्यासारखे झाले होते. त्यांच्याकडच्या शागिर्दीच्या काळात किशोरीताईंचं एकही हिंदी चित्रपटगीत आलं नाही.

नोव्हेंबर १९६४मध्ये व्ही. शांताराम यांच्या ‘गीत गाया पत्थरोंने’ रिलीज झाला. या चित्रपटाचं शीर्षकगीत ताई (फारच तयारीने) गायल्या. हे गाणं बरंच गाजलं. उत्तर प्रदेश शासनाचा (?) पुरस्कारही या गीताला मिळाला. पण म्हणे रातोरात या गीताच्या ध्वनिमुद्रिका गायब झाल्या! या ध्वनिमुद्रिका गायब न होता रसिकांना सहज उपलब्ध झाल्या असत्या तर?

‘गीत गाया पत्थरोंने’च्या यशानंतर ताई सांगत त्यानुसार माईंनी म्हणजे किशोरीताईंच्या आई आणि गुरू गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांनी किशोरीताईंना सांगितलं – “तुला फिल्मी गायचं असेल तर खुशाल गा, पण मग उद्यापासून माझ्या तंबोऱ्याला हात लावायचा नाही.” या निर्वाणीच्या इशाऱ्यामुळे (?) ताईंना निर्णय घ्यावा लागला आणि त्यांनी तो घेतला. तो निर्णय रागदारी संगीताचे चाहते आणि परंपरेचे पुजारी (चांगल्या अर्थाने) यांच्यासाठी फार मोठा शुभशकून ठरला. माईंनी तसा निर्वाणीचा इशारा दिला नसता तर?

‘गीत गाया पत्थरोंने’च्या शीर्षकगीताने किशोरीताईंना खरंच एका उंबरठ्यावर आणून सोडलं होतं का? ताईसुद्धा नेहमी म्हणत – “मी फिल्मसंगीत गायलं आहे – किंवा गाऊन पाहिलं आहे.” पण ताईंनी गायलेलं ‘गीत गाया पत्थरोंने’ हे चित्रपटासाठी गायलेलं असलं तरी प्रातिनिधिक चित्रपटगीत – फिल्म साँग – नाही, ते विशेष गीत आहे. एका शास्त्रीय गायिकेकडून शास्त्रीय संगीताच्या धाटणीने गाऊन घेतलेलं ते गीत आहे. या गीताने चित्रपटसंगीताच्या मुख्य प्रवाहात ताईंचा प्रवेश झाला असता असं मानणं कठीण आहे. या गीताच्या ध्वनिमुद्रिका खरोखरच रातोरात गायब झाल्या असल्या तर, चित्रपट पार्श्वगायन व्यवसायाच्या दिंडी दरवाजाबाहेरच ताईंना या व्यवसायातील दाहक हवामानाची झळ लागली म्हणायची! होतं ते भल्यासाठी!

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.booksnama.com/

..................................................................................................................................................................

माईंच्या निर्वाणीच्या इशाऱ्याचा ताईंवर किती आणि कसा असर झाला असेल? माई करारी होत्या, पण ताईही भलत्याच आज्ञाधारक होत्या, अशातला भाग नव्हता. फिल्मीसंगीतातील करिअरच्या मागे लागणं म्हणजे शास्त्रीय संगीताची कारकीर्द सोडून देणं हे वास्तव आहे, असाच या इशाऱ्याचा अर्थ होता. ताईंच्या मनात कदाचित त्या वेळी ‘हे’ की ‘ते’ असं द्वंद्व असेल. त्यातून त्यांना बाहेर काढण्याचं काम माईंच्या इशाऱ्यानं केलं असावं.

लाईट म्युझिक – सुगम किंवा चित्रपट संगीत या संदर्भात ताईंच्या किशोरवयातले दोन किस्से सर्वश्रुत आहेत. ताईही हे किस्से नेहमी सांगत. एक म्हणजे ताई फ्लोअरला कान लावून खालच्या मजल्यावरच्या घरातला रेडिओ ऐकत. म्हणून माईंनी घरात रेडिओ घेतला. आणि दुसरा, माईंनी ताईंना लाईट म्युझिक शिकवण्यासाठी एका मास्तरांना नेमलं. ‘ही रात सवत बाई’ या गाण्याची शिकवणी सुरू झाली आणि मास्तरांनी ‘तुझ्या मुलीचा आवाज दगड आहे’ असा शेरा मारून शिकवणी सोडल्याचं माईंना सांगितलं. या दोन किश्श्यांचा कालानुक्रम ताईंना विचारून नक्की समजून घ्यायचा राहिला. असो.

मास्तरांचा शेरा ताईंच्या अभिमानी मनाला लागला, आणि ते फार बरं झालं. ताईंनी लाइट म्युझिक – चित्रपटसंगीत एवढ्या बारकाईने ऐकलं, ते अशी प्रतिज्ञा करूनच की, अशी एकही गानक्रिया उरता नये जी माझ्या गळ्यातून निघत नाही. या प्रतिज्ञापूर्तीची अतिशय रोमांचकारी साक्ष रसिकांनी ताईंच्या गायनात उदंड अनुभवली आहे. ताईंनीच मुलाखतीत सांगितलं आहे – ‘जली जो शाखे चमन… (तराना, १९५१) हे गाणं ऐकलं आणि म्हटलं, गाणं असंही असतं का?’ त्या वेळपर्यंत ताईंना झालेलं शास्त्रीय संगीताचं दर्शन आणि हे भावसंगीत… संगीताच्याच या दोन रूपांतलं हे अंतर संगीताचा समग्र विचार करण्यास प्रवृत्त करणारं ठरलं.

शब्दप्रधान म्हणा, सुगम म्हणा किंवा भाव म्हणा – संगीताच्या या रूपाकडे ताईंसारखी रोमँटिक (कल्पनारममाण) वृत्तीची कलावती आकृष्ट न होती तरच नवल! भावसंपन्न उत्कट मनोवृत्ती, तीव्र बुद्धिमत्ता, अलौकिक प्रतिभा, प्रचंड मानसिक ऊर्जा, सांगीतिक गुणवत्तेची उदार परमेश्वरी देणगी आणि त्याचबरोबर ईर्ष्या, जिद्द, अहंकार असे स्वभावाचे कंगोरे – हे सर्व घेऊन उभ्या असलेल्या किशोरी आमोणकर यांचं सुगम संगीत प्रांतात उमेदीच्या काळात व्हावं तसं स्वागत झालं का? झालं नसावं. त्या क्षेत्रात ‘एकला चलो रे’ हा बाणा फार कामाचा नाही. त्या व्यवसायात ‘मूड’ नामक विकाराला अर्जित रजा (earned leave) नाही. अशा सर्व परिस्थितीतून रागसंगीत हेच आपलं कार्यक्षेत्र असा निर्णय व्यवहाराच्या पातळीवरही ताईंकडून झाला असावा. आणि एकदा हा निर्णय झाल्यावर या क्षेत्रातील शिखरं त्यांनी काहीज केली असं वर्णन पुरेसं होणार नाही, असा पराक्रम ताईंनी केला. त्यांनी नव्या उंचीची शिखरं आपल्या कलाकर्तृत्वानं निर्माण केली.

ताई सुगमसंगीतात राहत्या तर एक शैलीदार गायिका एवढी(च) समृद्धी त्या क्षेत्राला लाभली असती, पण ताई रागदारी संगीतात आपल्या संपूर्ण गुणसमुच्चयासह अवगाहन करत्या झाल्या, यामुळे रागसंगीताचं आणि एकूणच संगीताचं क्षेत्र खूपच अधिक समृद्ध झालं. रागसंगीत हे खरं भावसंगीत आहे, शब्द आणि स्वरोच्चारातील वाचिक अभिनय या आधारांशिवाय निखळ सांगीतिक सामग्रीतून भावाभिव्यक्ती करणारं रागसंगीत अधिक सूक्ष्मपणे आणि म्हणून अधिक परिणामकारकपणे भावसंगीत आहे, असं प्रमेय ताई मांडू शकल्या आणि आपल्या गायनातून त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं.

..................................................................................................................................................................

ताईंचा स्वभाव ‘असा’ नसता तर? प्रत्येकाच्याच मनात हा प्रश्न असणार. माझ्या मनात मात्र प्रश्न उमटतो की, त्या व्यवहारी, सौजन्यमूर्ती वगैरे वगैरे असत्या तर त्यांचं गाणं तेच असतं का? कलेच्या विश्वातलं आपलं रूप, आपला स्वभाव आणि लौकिकातला आपला अवतार, हे जाणीवपूर्वक वेगळे ठेवणं खरंच शक्य असतं का? तेही अशा कलाकाराला- जो कलेशी एकजीव झाला आहे? लौकिकातला समंजसपणा, तोही उपजत नसून अंगी बाणवलेला, कुठेतरी कलेच्या शोधातल्या उत्कटपणाला कोमट करून टाकत नसेल का? कलेचं अगाध, विराट दर्शन घडून जेव्हा कालाकाराला आपण कोणीच नाही, असं वाटू लागतं, तेव्हा त्याचा तोल राखण्याच्या नैसर्गिक प्रयत्नात कलाकार लौकिकात अहंमन्य, अहंकारी बनतो की, काय?

..................................................................................................................................................................

ताईंच्या बुद्धिमत्तेला चिकित्सकपणा हा एक महत्त्वाचा पैलू होता. त्या केवळ गात राहिल्या असत्या तर त्यांचं काय कमी होणार होतं? पण त्यांनी आपला बराच वेळ, बरीच शक्ती आणि बुद्धी ही रागसंगीतविषयक प्रमेय मांडण्यासाठी वेचली. त्यांचं प्रमेय त्यांनी जसं मांडलं आहे, तसं सर्वांना मान्य व्हावं, अशी आवश्यकता नाही. पण असं प्रमेय मांडण्यातून संगीतविषयक तत्त्वचिंतनाचा प्रदेश त्यांनी नक्कीच समृद्ध केला.

पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा यांची चाह ताईंना नव्हती असं नाही. पण ती त्यांची उद्दिष्टं नव्हती, असू शकत नव्हती. “मी जे करते आहे, ते सत्त्व आहे, महत्त्व आहे – त्याचा योग्य तो सन्मान पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठेने झाला पाहिजे,” अशी त्यांची भूमिका होती. ‘पैप्रप्र’ मिळवण्यासाठी मी माझा मार्ग बदलणार नाही, असा त्यांचा बाणा होता. ताईंनी आपल्या प्रतिभेचा आत्मसन्मान नेहमी जपला, आक्रमक वाटावा अशा पद्धतीनं जपला.

ताईंकडे व्यावसायिक मानसिकता – प्रोफेशनलिझम – नव्हती. ती असती तर? ताईंनी एक निपुण सचिव (सेक्रेटरी) नेमला असता तर? किती तरी तंटे-बखेडे, गैरसमज, अपप्रचार यांतून ताईंची सुटका झाली असती. देऊ केलेले सन्मान (अ‍ॅवार्ड) त्या स्वीकारणार का, अशी धाकधूक देणाऱ्यांच्या मनात ताई उत्पन्न करत, ही वस्तुस्थिती आहे. पण तरीही चांगल्या सेक्रेटरीमुळे अनेक सन्मान, संधी ताईंना खूप वेळेवर मिळाल्या असत्या. ताई जगाच्या सर्व प्रतिष्ठित ठिकाणी पोचून रागदारी संगीताची प्रतिष्ठा वाढली असती! (हे सगळे लिहिताना मला झोपाळ्यावर बसलेल्या त्यांच्या चेहऱ्यावरील तुच्छतादर्शक हसू जाणवतंय!) मानधनाविषयी स्वत: प्रत्येक लहान-मोठ्या आयोजकाशी बोलणं टळलं असतं…

ताईंच्या कित्येक मैफलींच्या आरंभी ध्वनिवर्धन व्यवस्थेशी होणाऱ्या झटापटीने रसभंग होत गेला. कोणी निपुण व्यावसायिक ध्वनिअभियंता ताईंबरोबर असता तर बहुदा हे प्रसंग टळले असते. ताईंना त्यांचं स्वत:चं गायन कोणत्याही यांत्रिक संस्कारांशिवाय ‘शार्प’ ऐकू येणं आवश्यक वाटत असे, आणि ही गरज पूर्णपणे वाजवी आहे. घुमल्यासारखा आवाज ऐकू आला तर सूक्ष्मतेनं स्वर लावणं अवघड नव्हे, जवळ जवळ अशक्य होऊन जातं. श्रोत्यांसाठी होणारं ध्वनिवर्धन आणि मंचावरील कलाकाराची गरज, या दोन भिन्न गोष्टी आहेत. बऱ्याचदा ताईंना काय हवं आहे, हे ध्वनिसंयोजकांपर्यंत पोचत नसे. ताईंसारखा खूप मोठा कलाकार, भरलेलं प्रेक्षागृह (पुष्कळदा संगीतानुकूल नसलेलं सभागृहच!) कार्यक्रम सुरू व्हायला मुळातच झालेला उशीर, या सर्व गोष्टींचं दडपण ध्वनिसंयोजकांवर असे.

ताईंचा स्वभाव ‘असा’ नसता तर? प्रत्येकाच्याच मनात हा प्रश्न असणार. माझ्या मनात मात्र प्रश्न उमटतो की, त्या व्यवहारी, सौजन्यमूर्ती वगैरे वगैरे असत्या तर त्यांचं गाणं तेच असतं का? कलेच्या विश्वातलं आपलं रूप, आपला स्वभाव आणि लौकिकातला आपला अवतार, हे जाणीवपूर्वक वेगळे ठेवणं खरंच शक्य असतं का? तेही अशा कलाकाराला- जो कलेशी एकजीव झाला आहे? लौकिकातला समंजसपणा, तोही उपजत नसून अंगी बाणवलेला, कुठेतरी कलेच्या शोधातल्या उत्कटपणाला कोमट करून टाकत नसेल का? कलेचं अगाध, विराट दर्शन घडून जेव्हा कलाकाराला आपण कोणीच नाही, असं वाटू लागतं, तेव्हा त्याचा तोल राखण्याच्या नैसर्गिक प्रयत्नात कलाकार लौकिकात अहंमन्य, अहंकारी बनतो की, काय?

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

प्रत्येक मैफलीच्या आधी ताई अस्वस्थ, चिंतातुर, उत्कंठित असायच्या. काही यशस्वी कलाकारांनी यावर असंही म्हटलं आहे की, आपण एवढी साधना केलेली असते, त्याचा काय उपयोग, एवढाही आत्मविश्वास नसेल तर! ताईंच्या समोर कोणी हे मत मांडलं असतं तर त्यांनी सपशेल माघार घेत म्हटलं असतं – “नाही मला आत्मविश्वास” आणि विषय संपवला असता (आणि मग केव्हा तरी कोणा जवळच्या, प्रेमाच्या शिष्याला म्हटलं असतं – “स्वराला गृहीत धरण्याचा फाजिल आत्मविश्वास नको रे बाळगू!”) ताई जर अशा चिंतातुर होत नसत्या तर प्रत्येक वेळी स्वराच्या सौख्याचा साक्षात्कार त्या घडवू शकल्या असत्या?

‘जर-तर’चे असे कितीही पलटे घेतले तरी ताईंचं चरित्र पुरतं गाउन होईल का? या ‘जर-तर’च्या ताण्याबाण्यांतून ताईंच्या जीवनवस्त्राची वीण उमगेल का? ‘ताई ‘अशा’ नसत्या तर’ अशा हळहळीच्या शीर्षकाखाली कितीजणांनी किती किती गोष्टी नमूद केल्या, तरी ‘- तर…तर, त्या अशा गायल्या असत्या का?’

…हा ‘तर’ मनात आला की ‘जर’ची सगळी उतरंड कोसळून जाते…

..................................................................................................................................................................

लेखक केशव परांजपे अभिनव पदवी महाविद्यालयाचे (भाईंदर, मुंबई) प्राचार्य आहेत.

kdparanjape@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Uttam Bhagat

Tue , 24 November 2020

किशोरीताईंच्या सांगीतिक आयुष्याचा पट उलगडणारा लेख ! "अक्षरनामा दिवाळी २०२०" अंकाच्या "जर... तर" परिसंवादातील प्राचार्य केशव परांजपे यांचा "जर किशोरीताई अमोणकर "जशा" होत्या "तशा" नसत्या तर..." हा अभ्यासपूर्ण लेख वाचला. "किशोरीताईंना समजून घेणे अतिशय अवघड आणि आव्हानात्मक" असल्याचे सांगतानाच " वरवर सुसंगत वाटावं, त्यात थोडे डोकावून पाहिले की विसंगतीची विवरं जाणवावीत आणि विसंगतीच्या विस्कटलेपणाने विमनस्क व्हावं, तर अंतर्यामी सुसंगतीचा प्रवाह साद घालतांना जाणवावा" असा किशोरीताईंचा नेमका स्वभावगुण लेखकाने टिपला आहे. "जर ...तर" मधून लेखकाने किशोरीताईंच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला धांडोळा वाचकांनाही प्रेरक ठरतो. किशोरीताईंच्या इतक्या जवळ असूनही काही प्रश्न विचारायचे राहून गेले, याची हुरहूर लेखकाला आहे. उदा. १. "जाईन विचारीत रानफुल" आणि " हे शाम सुंदर राजसा " ही हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीतात दोनच गाणी करून त्या का थांबतात ? २. "माझे जीवन गाणे" आणि "शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले" या संगितिकेतील त्यांनी गायलेल्या गीतांच्या ध्वनिमुद्रिका का निघाल्या नाहीत? ३. फिल्मी संगीतातील करीअरच्या मागे लागणं म्हणजे शास्त्रीय संगीताची कारकीर्द सोडून देणं! त्यावेळी त्यांच्या मनातील या द्वंद्वाला त्या सामोऱ्या कशा गेल्या? किशोरीताईंच्या आयुष्यातील "उद्या " अनपेक्षित आल्यामुळे हे प्रश्न अनुत्तरितच राहिले, याची खंत लेखकाला वाटते. लाईट म्युझिक - सुगम किंवा चित्रपट संगीत या संदर्भातील ताईंच्या किशोरवयातील दोन किस्से लेखकाने मोठ्या खुबीने या लेखात चितारले आहेत. ते वाचल्यानंतर एक स्मितहास्य ब्रेक घेऊनच वाचक पुढे सरकतो. केवळ सुगम संगीतात अडकून न राहता रागदारी संगीतात आपल्या संपूर्ण गुणसमुच्चयासह उतरल्यामुळे त्यांनी रागसंगीताबरोबरच एकूणच संगीत क्षेत्र अधिक समृद्ध केले. तद्वतच, त्यांच्या बुद्धीमत्तेलाही चिकित्सकपणाचा पैलू असल्यामुळे त्यांनी आपला बराच वेळ, बरीच शक्ती आणि बुद्धी रागासंगितविषयक प्रमेय मांडण्यासाठी वेचली. त्यातून त्यांनी संगीतविषयक तत्वचिंतनाचा प्रदेश कसा समृद्ध केला, हे लेखकाने किशोरीताईंच्या जीवनातील विविध घटनांचा आढावा घेत पटवून दिले आहे. एका अर्थाने लेखकाने इथे किशोरीताईंच्या "प्रतिभेचा आत्मसन्मान"च अधोरेखित केला आहे. किशोरीताईंबद्दल लेखकाच्या अतिशय उत्स्फूर्त आणि उत्कट भावना या लेखातून प्रतित होतांना दिसतात. त्यांच्या सोबतची सांगीतिक जवळीकता, शास्त्रीय संगीताचा सखोल अभ्यास आणि प्रसंगानुरूप केलेली मांडणी, यामुळे सदर लेख अधिक प्रवाही झाला आहे. किशोरीताईंच्या सांगीतिक आयुष्याचा पट समजून घेण्याच्या दृष्टीने लेखकाचा हा लेखन प्रपंच स्वागतार्हच म्हणावा लागेल. - प्रा. उत्तम भगत, मुंबई मोबा. ९३२२२८२०५६ E Mail- uttambhagat75@gmail.com


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कोविडकाळातही युरोपातल्या सार्वजनिक ग्रंथालयांनी ग्रंथसंस्कृती जपली आणि माणुसकीचंही उदात्त दर्शन घडवलं... त्याची ही गोष्ट...

हा लादलेला विजनवास आज अवघं जगच भोगत आहे. व्हर्च्युअल सहवासात रमत आहे. मात्र एकट्यानं जगणाऱ्या, जगावं लागणाऱ्या, शारीर व्याधी व आजारांचा सामना करत जगणार्‍या कुणाहीसाठी हा सक्तीचा बंदिवास तुलनेनं कितीतरी पीडादायी आहे. इथल्या या व्हल्नरेबल गटाची ही विकलता, हतबलता लक्षात घेऊन त्यांच्यापर्यंत पोचण्याचे, मदतीचे प्रयत्न सुरू झाले, तेव्हा  खचितच आघाडीवर राहिली ती समाजमनाशी आरपार जोडली गेलेली स्थानिक ग्रंथालयंच.......