जर ‘त्या’ तीन पारशी बावांनी, किंवा त्यांच्यापैकी एकाने आपल्या व्यावसायिक नीतिमत्तेवरील निष्ठा पातळ केली असती तर…
दिवाळी २०२० - जर...तर
रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ
  • बॅ. जिना
  • Sat , 21 November 2020
  • दिवाळी २०२० जर...तर भारताची फाळणी Partition of India पाकिस्तान Pakistan भारत India बॅ. जिना Jinnah मुम्मद अली जिना Muhammad Ali Jinnah

भारताची फाळणी झाली नसती तर काय घडलं असतं, असा प्रश्न सर्व विचारधारांच्या लोकांना व जनसामान्यांना अधूनमधून पडत असतो. तसं घडलं असतं तर लाखोंचा नरसंहार टाळला असता. देशाच्या काळजात कायम ठसठसणारी जखम निर्माणच झाली नसती. तीन युद्धं, व त्यानंतरच्या दोन्ही देशात चालणाऱ्या कुरबुरी थांबल्या असत्या. ‘त्यां’नी काश्मीरचा प्रश्न धगधगता ठेवला नसता आणि आपणही बलुचिस्तान व सिंधमधल्या फुटीरतावादी घटकांना साह्य केलं नसतं. संरक्षणावरील प्रचंड खर्च वाचला असता आणि तो पैसा विकासाच्या कामी लागून गेल्या ७० वर्षांत भारत हा आशियातील एक महत्त्वाची शक्ती म्हणून उदयाला आला असता. २०२० साली या भारतीय उपखंडात सुमारे ६२ टक्के हिंदू व ३४ टक्के मुसलमान राहतात. हे एक राष्ट्र असतं तर कोणत्याही धर्मातील कट्टरपंथी लोकांना त्यावर राज्य करता आलं नसतं. सामाजिक जीवनात सर्वधर्मसमभावाची व राजकीय जीवनात निधर्मीपणाची कास धरूनच या अखंड देशाची वाटचाल झाली असती. ही झाली तार्किक मांडणी. कधी कधी यासोबत बरंच स्वप्नरंजनही असतं. ते असायला कोणाची हरकत असायचं कारण नाही. कारण स्वप्नंच माणसांच्या, समूहांच्या आकांक्षा जाग्या ठेवतात, चेतवतात.

व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठातील विद्वान सोडले तर इतरांना आता हे समजून चुकलं आहे की, फाळणीसाठी अमुक एक व्यक्ती किंवा घटना जबाबदार होती, असे मानणे चूक आहे; अनेक ऐतिहासिक घटना, प्रक्रिया, प्रेरणा, त्याचसोबत व्यक्तींच्या भूमिका, प्रेरणा, प्रयत्न, शह-काटशह या सर्वांचा तो एकत्रित परिपाक होता. १८५७च्या बंडापासून धडा घेऊन ब्रिटिश सरकारने हिंदू-मुस्लीम एकतेत मारलेली पाचर, त्याने दोन्ही धर्मांतील कट्टरपंथी व कधी काळी राज्यकर्ते राहिलेल्या समूहांमध्ये पेटवलेली महत्त्वाकांक्षा व परस्परांविषयीचा संशय, हिंदूराष्ट्रवादी व मुस्लीम लीग या दोघांचं परस्परपूरक राजकारण, भारताचं भौगोलिक-राजकीय महत्त्व लक्षात घेऊन स्वतंत्र भारत एक शक्ती बनू नये, यासाठी जागतिक महासत्तांनी केलेले प्रयत्न अशा अनेक उभ्या-आडव्या धाग्यांतून फाळणीचं वस्त्र विणलं गेलं. अर्थात हा निर्णय तो जाणीवपूर्वक घेणाऱ्या किंवा त्याला निरुपाय म्हणून मान्यता देणाऱ्या, अशा कोणालाही त्यातून हिंसेचा एवढा प्रचंड आगडोंब उसळेल, याची अजिबात कल्पना नव्हती, हेही तेवढंच खरं!

पण शेवटी घटना घडतात, प्रक्रिया आकार घेतात, इतिहास घडतो, तेव्हा या सर्व अमूर्त गोष्टी जिवंत माणसांच्या माध्यमातूनच साकार होतात. कधी कधी त्या माणसांच्या आयुष्यात असं काही घडतं, ज्याला पाहून आपल्याला वाटतं - ‘अरे, इथं असं घडलं असतं तर त्या माणसाच्या माध्यमातून पुढे झालेले बरे-वाईट काम कायमचे थांबले असते’. एखादी साधीशी गोष्ट, कोणा  व्यक्तीच्या स्वभावातील छोटासा बरा-वाईट कंगोरा, टाळता येण्याजोगा एखादा योगायोग आपल्याला दिसतो आणि मग आपल्याला वाटतं की, अरे, एवढी मोठी गोष्ट घडू/ बिघडू/टळू शकली असती, फक्त एवढं झालं असतं तर?

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.facebook.com/aksharnama/photos

..................................................................................................................................................................

आज मी तुम्हाला तिघा सामान्य माणसांची गोष्ट सांगणार आहे. त्यांनी जर थोडा वेगळा विचार केला असता, तर फाळणीसारखी भारतीय उपखंडाचा इतिहास आणि भूगोल बदलणारी, पुढच्या अनेक पिढ्यांचं भवितव्य बदलणारी बाब टाळता येणं शक्य झालं असतं! त्यांनी आपली कृती अतिशय जाणीवपूर्वक, कर्तव्यपूर्तीच्या भावनेतून केली. त्यांना तिचे गांभीर्य काहीसं माहीत होतं. पण आपल्या कृतीचे किंवा ती न करण्याचे परिणाम किती व्यापक होतील, याची त्यांना पूर्णपणे कल्पना नव्हती. ती असती तरी ते काही वेगळे वागले नसते, कारण त्यांनी आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून ती कृती केली होती. त्यांनी एखादी गोष्ट ठरवली तर तिच्यापासून त्यांना परावृत्त करणं कोणालाही शक्य नव्हतं. ते तिघेही पारशी बावाजी होते, हे सांगितलं म्हणजे पुरे…

आपल्या कथेच्या नायकाचं नाव आहे डॉ. जाल रतनजी पटेल. जन्म २१ ऑक्टोबर १९१०. पुढे ते ग्रँट मेडिकल कॉलेजचे डीन झाले. १९६२मध्ये भारत सरकारने त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीचा ‘पद्मभूषण’ देऊन गौरव केला. पण त्या गोष्टीचा आपल्या गोष्टीशी काही संबंध नाही. ही घटना घडली १९४७च्या मार्च-एप्रिल महिन्यात. म्हणजे स्वातंत्र्याच्या वाटाघाटी जोरात होत्या आणि भारत व पाकिस्तान ही दोन राष्ट्रं अस्तित्वात येण्याची प्रक्रिया सुरू झाली होती,  तेव्हाची ही गोष्ट.

जीनांची तब्येत बरीच बिघडली होती. त्यांच्या आयुष्याचं इप्सित - पाकिस्तानची निर्मिती - आता त्यांच्या नजरेच्या टप्प्यात आली होती. त्यासाठी मधल्या काळात त्यांनी प्रकृतीची तमा न बाळगता दिवस-रात्र काम केलं होतं. आता मात्र त्रास असह्य झाल्यामुळे त्यांनी कोणा नामांकित डॉक्टरला तब्येत दाखवण्याचं ठरवलं. खरं तर त्यापूर्वी बरीच वर्षं त्यांनी आपल्या प्रकृतीची हेळसांडच केली होती. जवळजवळ ३० वर्षं ते रोज पन्नासेक सिगारेट्स (जोडीला खास क्युबन सिगार) ओढत असत. त्यामागे त्यांचा ‘मी करेन ती पूर्व’ हा स्वभाव होता, तसंच अनेकविध कारणांनी आलेलं एकाकीपणही होतं. समृद्धी व लौकिकाच्या शिखरावर असताना त्यांनी आपल्याहून वयानं अतिशय लहान पारशी मुलीशी प्रेमविवाह केला होता. त्यासाठी दोन्ही धर्मांतील लोकांचा रागही सहन केला होता. पण एका मुलीला जन्म देऊन अकरा वर्षांच्या सहजीवनानंतर रत्तीचा – त्यांची  प्रिय पत्नी रतनबाई हिचा - मृत्यु  झाला आणि ते पार एकाकी झाले. त्यानंतर वयात आलेल्या त्यांच्या मुलीने (आपल्या आईप्रमाणे मनाचा कौल मानून) एका पारशी माणसाशी वडिलांच्या मनाविरुद्ध लग्न केल्यामुळे त्यांच्या एकाकीपणात भरच पडली.

त्यांच्या खाजगी आयुष्यातील सर्व महत्त्वाचे निर्णय त्यांची बहीण फातिमा घेत होती. त्यानुसार जिनांची प्रकृती बिघडल्यावर तिने इतरांशी सल्लामसलत करून डॉ. मुंबईच्या जाल पटेल यांचं नाव निश्चित केलं. वयाच्या तिशीतच डॉ. पटेलांची कीर्ती सर्वत्र पसरली होती. औषधक्रियाशास्त्र व उपचार (फार्माकॉलॉजी अँड थेरॅप्युटिक्स) हा त्यांचा विषय. दिल्लीहून जिनांना मुंबईत विमानानं आणण्याची व्यवस्था जमशेटजी (जेआरडी) टाटांनी केली. टाटा उद्योगसमूहाची सूत्रं नुकतीच त्यांच्याकडे आली होती. जिनांची पत्नी रत्ती हिची सख्खी मामी व जेआरडींची आई या सख्ख्या बहिणी. म्हणजे जिना हे जेआरडींचे मेव्हणे लागतात. त्यामुळे त्यांनी तेवढं करणं यात नवल नव्हतं. तसाही एके काळी, म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या दिवसांपासून, मुंबईतील नामवंत वकील मोहम्मद अली जिना यांचा घरोबा मुसलमानांपेक्षा आंग्लशिक्षित खानदानी पारशी कुटुंबांशी जास्त होता. डॉ. पटेलांची अपॉइंटमेंट घेण्याचं काम मुंबई मुस्लीम लीगचे अध्यक्ष सर हुसेन अली करीमभॉय यांनी केलं.    

..................................................................................................................................................................

पाकिस्तानच्या निर्मितीचं स्वप्न साकार झाल्यावर मात्र जिना फारसं काही करू शकले नाहीत. खरं तर पाकिस्तानच्या निर्मितीनातर लगेच त्यांच्या स्वप्नभंगाचा, भ्रमनिरासाचा कालखंड सुरू झाला. त्यांना पाकिस्तानची निर्मिती आधुनिक पायावर करायची होती. पुराणमतवादी मुल्ला-मौलवींच्या ताब्यातून सामान्य मुसलमान मानस मुक्त करायचं होतं. थोडक्यात म्हणजे त्यांना ‘पाकिस्तानचे नेहरू’ बनायचं होतं. पण पाकिस्तानच्या निर्मितीनंतर त्यांची तब्येत अधिकाधिक ढासळत गेली. त्यांना चांगल्या हवामानासाठी जियारात या थंड हवेच्या ठिकाणी व नंतर क्वेट्टा इथं नेण्यात आलं. राजकारणातील रोजच्या घडामोडींशी त्यांचा संबंध राहिला नाही. नवनिर्मित देशाची पायाभरणी करणाऱ्या संविधाननिर्मितीसारख्या मूलभूत गोष्टीतही त्यांचा सहभाग नव्हता.

..................................................................................................................................................................

डॉ. पटेल जिनांना घेऊन धोबी तलावला आले. तिथं त्यांचे सहकारी डॉ. जाल डेबू, रेडिऑलॉजिस्ट यांचं क्लिनिक होतं. त्यांच्यासोबत डॉ. डेबूंची तरुण मुलगी होमी, जी त्यांची सहकारी म्हणून काम करायची. डॉ. पटेलांच्या सल्ल्यानुसार जिनांच्या छातीचा एक्स-रे काढण्यात आला. त्याची फिल्म हातात घेताच दोन्ही डॉक्टरांना धक्का बसला. जिनांची दोन्ही फुप्फुसं पार निकामी झाली होती. क्षय अंतिम टप्प्यात पोहचला होता. त्या काळात क्षयावर कोणतीही प्रभावी उपाययोजना नव्हती. जी होती, तिचा जिनांना फारसा उपयोग नव्हता. ते फार तर एक-दोन वर्षं जगू शकतील, या निष्कर्षाला दोघं डॉक्टर आले आणि त्यांनी आपला हा निर्णय जिना व फातिमा दोघांना सांगितला. जिनांच्या एक्स-रेची फिल्म एका बिननावाच्या पाकिटात घालून खूप आत दडवून ठेवण्यात आली.

हे दोन डॉक्टर व होमी या तीन बावाजींनी तेव्हाच मनाशी खूणगाठ बांधली की, व्यावसायिक नीतीच्या दृष्टीनं पेशंटच्या प्रकृतीविषयीचं हे रहस्य ते कोणापुढेही उघडं करणार नव्हते. त्यांनी हा निर्णय मनाशीच घेतला की, त्याविषयीचं अभिवचन जिना व फातिमा यांना दिलं, हे कोणालाच माहीत नाही.

एप्रिल महिन्यात जिना लॉर्ड माउंटबॅटन यांना पाकिस्तानविषयक निर्णय घेण्यासाठी भेटायला गेले, तेव्हा माउंटबॅटनची नियुक्ती ब्रिटनशासित भारताचे अंतिम व्हाईसरॉय म्हणून नुकतीच झाली होती. त्या पदावर त्यांची निवड व्हावी म्हणून काँग्रेसने बरंच लॉबिंग केलं होतं. कारण अंतिम वाटाघाटींमध्ये भारताविषयी सहानुभूती असणारा व्हाईसरॉय असणं भारताच्या हिताचं होतं. माउंटबॅटन हे भारतधार्जिणे आहेत, असा जिनांचा ग्रह होता, जो एप्रिलमधल्या भेटीत आणखी घट्ट झाला. त्यांच्या स्वभावानुसार जिना हट्टाला पेटले. नेहरू-पटेल-माउंटबॅटन हे आता त्यांचे सामायिक शत्रू होते. त्यांच्या तावडीतून वेगळं पाकिस्तान खेचून घेणं, हे त्यांनी आपल्या आयुष्याचं इतिकर्तव्य मानलं होतं. आपल्या हातात वेळ अतिशय कमी आहे, याची जाणीव झालेल्या जिनांनी ‘आता आम्ही अधिक काळ वाट पाहू शकणार नाही, लवकरात लवकर फाळणी करा’ असा तगादा लावला. तसं न घडल्यास देशात दंगे उसळतील, असं वातावरण निर्माण झालं होतं. घाईघाईने, पुरेशी पूर्वतयारी न करता फाळणीचा निर्णय जाहीर करण्यात आला आणि तो अंमलात आणण्यासाठी घाई करण्यात आली. त्याची फलश्रुती काय झाली, हा इतिहास आहे.

पाकिस्तानच्या निर्मितीचं स्वप्न साकार झाल्यावर मात्र जिना फारसं काही करू शकले नाहीत. खरं तर पाकिस्तानच्या निर्मितीनातर लगेच त्यांच्या स्वप्नभंगाचा, भ्रमनिरासाचा कालखंड सुरू झाला. त्यांना पाकिस्तानची निर्मिती आधुनिक पायावर करायची होती. पुराणमतवादी मुल्ला-मौलवींच्या ताब्यातून सामान्य मुसलमान मानस मुक्त करायचं होतं.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.booksnama.com/

..................................................................................................................................................................

थोडक्यात म्हणजे त्यांना ‘पाकिस्तानचे नेहरू’ बनायचं होतं. पाकिस्तानच्या संविधान समितीच्या पहिल्या बैठकीत ११ ऑगस्ट १९४७ रोजी केलेल्या भाषणात ते म्हणाले, “तुम्ही स्वतंत्र आहात; या पाकिस्तानदेशात तुम्ही तुमच्या देवळात, मशिदीत किंवा कोणत्याही प्रार्थनास्थळात जाण्यास मुक्त आहात. तुम्ही कोणत्याही जाति-धर्म-वंशाचे असाल, त्याने काहीही फरक पडत नाही. कारण या देशाची मूलभूत संकल्पना ही आहे की, आपण सर्व एकाच देशाचे समान नागरिक आहोत... आपण सर्वांनी आपल्यापुढे हाच आदर्श ठेवला  पाहिजे आणि मग तुम्ही पाहाल की, हिंदू हिंदू राहणार नाहीत, मुसलमान मुसलमान राहणार नाहीत; धार्मिक अर्थाने नाही, कारण तो प्रत्येकाच्या श्रद्धेचा प्रश्न आहे, पण राजकीय अर्थाने मी असे म्हणतो आहे की कालांतराने सर्व भेद संपून आपण फक्त पाकिस्तानचे नागरिक बनून राहू.”

(त्यांना जर अशाच देशाची निर्मिती करायची होती तर त्यांनी फाळणीचा हट्ट का धरला, हा प्रश्न आता इतर अनेक प्रश्नांप्रमाणे अनुत्तरीतच राहील.) पण पाकिस्तानच्या निर्मितीनंतर त्यांची तब्येत अधिकाधिक ढासळत गेली. त्यांना चांगल्या हवामानासाठी जियारात या थंड हवेच्या ठिकाणी व नंतर क्वेट्टा इथं नेण्यात आलं. राजकारणातील रोजच्या घडामोडींशी त्यांचा संबंध राहिला नाही. नवनिर्मित देशाची पायाभरणी करणाऱ्या संविधाननिर्मितीसारख्या मूलभूत गोष्टीतही त्यांचा सहभाग नव्हता. त्यांच्याशी सल्लामसलत करण्याची तसदीही तेव्हाचे पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान घेत नव्हते. कारण मुस्लीम लीगला स्वतःचं वेगळं राष्ट्र मिळाल्यावर राष्ट्रपित्याची गरज आता उरली नव्हती. उलट त्याचा सुधारणावादी दृष्टीकोन लीगच्या पुनरुज्जीवनवादी राजकारणामध्ये बाधकच ठरला असता.

असं म्हणतात की लियाकत अली जेव्हा त्यांना भेटायला गेले, तेव्हा जिना आपल्या बहिणीला म्हणाले – “हा माणूस माझ्या प्रकृतीची चौकशी करायला आला नसून मी केव्हा मरेन याचा अंदाज घ्यायला आला आहे.” त्यानंतर लौकरच म्हणजे ११ सप्टेंबर १९४८ला जिनांनी शेवटचा श्वास घेतला.     

..................................................................................................................................................................

त्या भेटीबद्दल लॅपायर लिहितात, “आम्ही त्यांना पाकिस्तानचे जनक जिना यांना १९४७मध्ये तपासणाऱ्या भारतीय डॉक्टरशी झालेल्या आमच्या भेटीचा वृत्तांत दाखवला. तो पाहून त्यांना प्रचंड धक्का बसला. ‘माझा यावर विश्वासच बसू शकत नाही,’ ते उद्गारले, ‘अरे देवा’. त्यांनी वर पाहिलं, तेव्हा त्यांचे एरवी शांत भासणारे निळे डोळे उत्कट भावनांनी आकुंचित झाले होते. त्यांनी हातातील कागद अनेकदा हवेत फडकावले आणि ते म्हणाले, “मला जर हे तेव्हा माहीत झालं असतं, तर इतिहासाचा मार्ग बदलला असता. मी स्वातंत्र्य देणं काही महिने पुढे ढकललं असतं. तसं झालं असतं तर पाकिस्तान निर्माणच झालं नसतं. भारत अखंड राहिला असता. नंतरची तीन युद्धंही टळली असती.”

..................................................................................................................................................................

जिनांच्या प्रकृतीचं हे रहस्य जर तेव्हा फुटलं असतं, तर काय झालं असतं, या विषयी फार तर्क लढवण्याची गरज नाही. जिना = पाकिस्तान हे समीकरण तेव्हा अतिशय ठळक होतं. जिनांशिवाय मुस्लीम लीगकडे एकही प्रभावी नेता नव्हता. फाळणीचा निर्णय काही काळ पुढे ढकलणे याचा अर्थ फाळणी टाळणं असाच होत होता. खुद्द माउंटबॅटननी याची कबुली दिली आहे.

जर डॉ. पटेल, डॉ. डेबू व होमी डेबू या तीन पारशी बावांनी, किंवा त्यांच्यापैकी एकाने आपल्या व्यावसायिक नीतिमत्तेवरील निष्ठा पातळ केली असती, तर फाळणी नक्कीच टळली असती, ही बाब जगासमोर पहिल्यांदा ‘फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट’ या गाजलेल्या पुस्तकातून आली. लॅरी कॉलिन्स व डॉमिनिक लॅपायर या पत्रकारद्वयाने हे पुस्तक लिहून भारत व पाकिस्तानची निर्मिती व त्यात महत्त्वाची भूमिका वठवणाऱ्या व्यक्ती यांविषयीची अनेक रहस्यं उजेडात आणली.

१९७०च्या दशकात या पुस्तकाविषयीची माहिती जमवत असताना लॅपायरला डॉ. जाल पटेल यांचा जिनांशी काही संबंध आला असल्याची कुणकुण लागली. तो त्यांना भेटल्यावर त्यांनी हे रहस्य उघड केलं. लॅपायरने नंतर होमी डेबूचीही भेट घेतली. डॉ. जाल डेबू तेव्हा जिवंत नव्हते. होमीने त्यांना इतकी वर्षं दडवून ठेवलेली ती एक्स-रे फिल्मदेखील दाखवली. हा सारा मसाला घेऊन कॉलिन्स व लॅपायर माउंटबॅटनना भेटले.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

त्या भेटीबद्दल लॅपायर लिहितात, “आम्ही त्यांना पाकिस्तानचे जनक जिना यांना १९४७मध्ये तपासणाऱ्या भारतीय डॉक्टरशी झालेल्या आमच्या भेटीचा वृत्तांत दाखवला. तो पाहून त्यांना प्रचंड धक्का बसला. ‘माझा यावर विश्वासच बसू शकत नाही,’ ते उद्गारले, ‘अरे देवा’. त्यांनी वर पाहिलं, तेव्हा त्यांचे एरवी शांत भासणारे निळे डोळे उत्कट भावनांनी आकुंचित झाले होते. त्यांनी हातातील कागद अनेकदा हवेत फडकावले आणि ते म्हणाले, “मला जर हे तेव्हा माहीत झालं असतं, तर इतिहासाचा मार्ग बदलला असता. मी स्वातंत्र्य देणं काही महिने पुढे ढकललं असतं. तसं झालं असतं तर पाकिस्तान निर्माणच झालं नसतं. भारत अखंड राहिला असता. नंतरची तीन युद्धंही टळली असती.”

‘फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट’मधील या मजकुराची शहानिशा बऱ्याच भारतीय व पाकिस्तानी पत्रकारांनी केली आहे. त्यातून या घटनेला पुष्टीच मिळते. हा लेख लिहिताना विकिपीडिया, पाकिस्तानमधील ‘द डॉन’, ‘डेली टाईम्स’, ‘बिझनेस रेकॉर्डर’, आणि भारतातील ‘द क्विंट’ या वृत्तपत्रांत प्रकाशित साहित्याचा आधार घेतला आहे. यात व्यक्त झालेली मतं मात्र लेखकाची स्वतःची आहेत.

..................................................................................................................................................................

लेखक रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ ‘आजचा सुधारक’ या मासिकाचे माजी संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.

ravindrarp@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कोविडकाळातही युरोपातल्या सार्वजनिक ग्रंथालयांनी ग्रंथसंस्कृती जपली आणि माणुसकीचंही उदात्त दर्शन घडवलं... त्याची ही गोष्ट...

हा लादलेला विजनवास आज अवघं जगच भोगत आहे. व्हर्च्युअल सहवासात रमत आहे. मात्र एकट्यानं जगणाऱ्या, जगावं लागणाऱ्या, शारीर व्याधी व आजारांचा सामना करत जगणार्‍या कुणाहीसाठी हा सक्तीचा बंदिवास तुलनेनं कितीतरी पीडादायी आहे. इथल्या या व्हल्नरेबल गटाची ही विकलता, हतबलता लक्षात घेऊन त्यांच्यापर्यंत पोचण्याचे, मदतीचे प्रयत्न सुरू झाले, तेव्हा  खचितच आघाडीवर राहिली ती समाजमनाशी आरपार जोडली गेलेली स्थानिक ग्रंथालयंच.......