‘एस्केप दी सोबिबोर’ : ज्यूंच्या मृत्युछावणीची अंगावर काटा आणणारी कहाणी!
कला-संस्कृती - चलत्-चित्र
कॉ. भीमराव बनसोड
  • ‘एस्केप दी सोबिबोर’चे एक पोस्टर
  • Tue , 16 April 2019
  • कला-संस्कृती चलत्-चित्र एस्केप दी सोबिबोर Escape from Sobibor

सध्या जगात आणि आपल्याही देशात उजव्या धर्मांध शक्तींचा जोर वाढतो आहे. आज युरोपातील इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स यांसारख्या देशांतून ज्यूविरोधी शक्ती पुन्हा नव्याने वाढत आहेत असे दिसते. फ्रान्सचे राष्ट्रपती इमानुएल मॅक्रॉन यांनी नुकतेच ज्यूविरोधी शक्तींचा कडक मुकाबला करण्यात येईल असे जाहीर केले. फ्रान्समधील एका ज्यूंच्या स्मशानभूमीत तोडफोड करून तेथे स्वस्तिकचे चिन्ह लावण्यात आले होते. तेव्हा त्याच स्मशानभूमीच्या चौथऱ्यावर उभे राहून ज्यूविरोधकांना मॅक्रॉन यांनी वरील इशारा दिला. या वेळी माजी राष्ट्रपती फ्रांसवा ओलांद, निकोलस सारकोजी आणि पॅरिसचे महापौर हिडाल्गोसह अनेक मान्यवर उपस्थित होते. लंडनमध्येही कार्ल मार्क्सच्या कबरीची तोडफोड करण्यात आली. नंतर त्या कबरीवर ‘जगात द्वेश पसरवणारी व्यक्ती’ या अर्थाचे वाक्य लिहून तेथेही स्वस्तिकचे चिन्ह काढण्यात आले. हे सर्व मार्क्स जन्माने ज्यू असल्यामुळे करण्यात आले.

मागील वर्षी जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी इस्त्राएलच्या एका टीव्ही वाहिनीला मुलाखत देताना जर्मनीमध्येही ज्यूविरोधी भावना वाढत असल्याचे सांगितले. जर्मन संसदेच्या एका विशेष सत्रात जनसंहाराच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी २७ जानेवारीला त्या संबंधीचा एक कार्यक्रम  घेतला जातो. २७ जानेवारी १९४५ रोजी सोविएत सैन्याने पोलंडमधील आउसविझ्ट येथील यातनावजा हत्याकेंद्राला नाझी जर्मनीच्या सैन्यापासून मुक्त केले होते. तेव्हापासून हा दिवस पाळला जातो. हिटलरच्या फॅसिस्ट राजवटीदरम्यान या कॅम्पमध्ये तीन लाख ज्यूंना यमसदनास पाठवणाऱ्या ऑस्कर ग्रोएनिंग याने केलेला दयेचा अर्ज नुकताच जर्मन सरकारने फेटाळला आहे. ते सध्या ९६ वर्षांचे आहेत.

ज्यूंचा संहार करण्यासाठी जर्मनी आणि हिटलरने जिंकलेल्या पोलंडमध्ये अशी अनेक यातनावजा हत्याकेंद्रे हिटलरच्या विचारसरणीनुसार आणि हिमलरच्या मार्गदर्शनानुसार तयार करण्यात आली होती. अशा सर्व केंद्रांची जबाबदारी खास त्यासाठीच स्थापन करण्यात आलेल्या एस.एस. या अर्ध पोलीस दलाकडे होती. त्याचा प्रमुख हाईख हिमलर होता. नंतर हिमलरनेही हिटलरप्रमाणेच आत्महत्या केली.

ही यातनावजा हत्याकेंद्रे नेमकी कशी कार्यरत होती? तेथे कशा प्रकारे यातना देऊन हत्या केली जात असे? याची प्रत्येक जण आपापल्या कल्पनाशक्तीप्रमाणे कल्पना करत असतो. पण आपल्या कल्पनेपेक्षाही ही केंद्रे कितीतरी भयानक होती, याचे जिवंत चित्रण रशियाच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या ‘एस्केप दी सोबिबोर’ (१९८७) या सिनेमातून होते. सत्य कथानकावर आधारित हा सिनेमा यूट्यूबवर उपलब्ध आहे. तो हिंदीत डब केला असल्याने इंग्रजी न जाणणाऱ्या सामान्यांनाही समजू शकतो.

दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला जर्मनीने जिंकलेल्या पोलंडच्या पूर्व भागातील सोबिबोरचे रेल्वे स्टेशन त्याच्या सभोवती असलेल्या दाट जंगलाने वेढलेले आहे. अशा या स्टेशनात पोलंड, झेकोस्लाव्हाकिया, फ्रान्स, हॉलंड, जर्मनी आणि सोविएत युनियनमधील ज्यूंना रेल्वेने आणले जाते. रेल्वे अत्यंत गच्च भरलेली असते. त्यात यहुदी असलेली, पण सर्व आर्थिक थरातील तरुण-तरुणी, लहान मुले, म्हातारे स्त्री-पुरुष असतात. कोठे जायचे आहे हे त्यांना माहीत नसल्यामुळे व महत्त्वाचे सामानसुमान असेल ते सोबत घेण्याचे फर्मान असल्यामुळे त्यांनी आपल्या घरातील सर्व मौल्यवान वस्तु, दागदागिने सोबत आणलेले असते. प्रवासात त्यांचे खाण्यापिण्याचे हाल झाले असावेत, हे ते या स्टेशनवर उतरताच लक्षात येते. तेथे त्यांचे सर्व सामान एकत्र केले जाते. नंतर त्यांच्या या सामानाचे, दागदागिन्यांचे, कलात्मक वस्तूंचे जसे वर्गीकरण केले जाते, तसेच आलेल्या जमावांचेही केले जाते. स्त्री-पुरुष, म्हातारे व लहान अपत्ये असलेल्या स्त्रियांना वेगळे केले जाते. त्यामुळे आई-वडील, नवरा-बायको हे सर्व आपोआप विभक्त होतात. त्याचप्रमाणे त्यांच्यातील लोहार, सुतार, चांभार, सोनार, शिंपी अशी विविध कामे करणाऱ्यांचेही वर्गीकरण केले जाते. स्टेशनच्या बाजूलाच असलेल्या यातनावजा हत्याकेंद्राच्या वेगवेगळे विभाग असलेल्या बराकीत त्यांची रवानगी केली जाते.

चित्रपटाची सुरुवातच तेथील यातनामय हालअपेष्टांनी त्रस्त झालेल्या कैद्यांनी पळून जाण्यासाठी केलेल्या अयशस्वी प्रयत्नांचा परिणाम त्यांच्या हत्येत कसा होतो या दृश्याने होते. वरीलप्रमाणे वर्गीकरण झाल्यानंतर हातगाडीवर झाकून आणलेली प्रेते सर्वांसमोर उघडली जातात आणि ‘तुम्ही कोणीही पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास, त्याची शिक्षा हीच असेल’ अशी ताकीद एस.एस. कमांडरकडून सर्वांना दिली जाते. तरी ही यातनावजा हत्याकेंद्रेच असल्याने तेथील मरणप्राय जीवनाला कंटाळून असे प्रयत्न सतत चालूच असतात. पळून जाण्याचा दुसरा प्रयत्नही फारच विदारक असतो. या कॅम्पमधील कैद्यांना जंगलातील लाकडे तोडण्याच्या कामावर नेले जाते. मध्यंतराच्या सुटीत दोघांना पाणी आणण्यासाठी थोडे दूरच्या अंतरावर पाठवण्यात येते. या संधीचा फायदा घेऊन ते दोघे पळून जाण्याचा प्रयत्न करतात. त्या प्रयत्नात एक-दोन एस.एस. सैनिकांनाही जीवानिशी मारावे लागते. कारण ते यांचा पाठलाग करतात. हीच संधी आहे असे समजून इतर ११ कैदीही पळून जाण्याचा प्रयत्न करतात. त्यात ते कसे अपयशी ठरतात, हे मोठे विदारक दृश्य आहे. नंतर त्यांना झालेली शिक्षा तर त्यापेक्षाही जास्त विदारक आहे.

पळून जाण्यात अयशस्वी ठरलेल्या या तेराही कैद्यांना पकडून बराकीच्या परिसरातील नेहमी जेथे रोल कॉल व कामाचे वाटप होते, त्या मैदानात आणले जाते. आधीच उभे असलेल्या इतर कैद्यांसमोर या तेराही कैद्यांना रांगेने उभे केलेले असते. पळून जाण्याच्या प्रयत्नात कुंपणांच्या तारांनी फाटलेले त्यांचे कपडे, अंगावरील रक्ताळलेले ओरखडे, काळवंडलेल्या चेहऱ्यावरील नैराश्य व साक्षात मृत्यू समोर दिसत असताना, हातात चाबूक घेतलेला एस.एस. कमांडर त्यांच्या मृत्यूची सर्वांसमोर घोषणा करतो.

पण केवळ या तेरा जणांना नाही तर आता सव्वीस जणांना मृत्यूला सामोरे जावे लागेल, असे तो जाहीर करतो. पळून जाण्यात अपयशी झालेल्या या तेरा जणांना तर मारले जाणार हे ठरलेलेच असते. पण दुसरे तेरा कोण? याची निवड करण्याची संधी तो या पकडलेल्या तेरा कैद्यांना देतो. समोरच्या रांगेतील तेरा कैदी पळून जाणाऱ्या एकेकाने निवडायचे असतात. पन्नास म्हणेपर्यंत हे काम सर्वांनी उरकायचे असते. तो गिनती सुरू करतो. सर्वजण स्तब्ध असतात. वातावरणात सन्नाटा पसरलेला असतो. अशात रांगेतील पहिला कैदी दुसऱ्या कोणाचीही निवड करण्यास ठाम नकार देतो. कमांडर सर्वांकडे नजर फिरवून त्यापेक्षाही जास्त भयानक दुसऱ्या पर्यायाची घोषणा करतो.

जर तुम्ही हे तेरा निवडून २६ केले नाहीत तर मी ५० जणांना मारेन. तेव्हा आता २६ जणांना मृत्यू पाहिजे की, ५० जणांना, याची निर्णय तुमच्याकडे आहे, असे तो सांगतो. पुन्हा निरव शांतता पसरते. कैदी एकमेकाकडे पाहतात. पहिल्या तेरांना दुसरे तेरा निवडण्यापलीकडे गत्यंतर नसते. मग एकेक जण दुसऱ्याच्या खांद्याला हात लावूनन निवड करतात व आपल्या रांगेत घेऊन येतात. पहिल्या व दुसऱ्या तेरांचा यास नाईलाज असतो. ते सर्व जण एकमेकांना समजून घेतात.

एस.एस.कमांडरची गिनती थांबते. मशिनगन व ती चालवणारे एस.एस. तयार आहात का म्हणून तो विचारतो. होकार येतो. पुन्हा उरलेल्यांना एस.एस. कमांडर ताकीद देतो की, समोर गोळीबार चालू असताना कोणीही आपले डोळे बंद करायचे नाहीत, मान इकडेतिकडे वा खाली वाकवायची नाही अथवा कोणीही रडायचे तर सोडाच, पण हुंदकाही द्यायचा नाही. अन्यथा त्यालाही मारले जाईल. अशी ताकीद दिल्यानंतर गोळीबाराचा आदेश देतो. क्षणार्धात समोरची रांग गारद केली जाते. त्यात वाचलेल्यांचे नातेवाईक, दोस्तमित्र असतात. एवढे झाल्यांनतर कमांडर इतकेच म्हणतो, ‘चला आता, खूप उशीर झालाय, आपापल्या कामाला लागा.’ जणू काही घडलेच नाही. सर्व जण आपापल्या कामाला निघून जातात.

या सिनेमातील आणखी एक प्रसंग असा आहे की, त्या एस. एस. मधला आणखी एक अधिकारी त्याच्या वरिष्ठाप्रमाणेच आपल्या चाबकाच्या मुठीला सोन्याचा सिम्बॉल लावण्याचे कलाकुसरीचे काम सोनाराच्या मुलाला देतो. त्यासाठी त्याच्या लहान भावाला दुसऱ्या दिवशी ज्या ठिकाणी त्याचे कार्यालय असते, त्या ठिकाणी नाणे घेण्यासाठी बोलावतो. येताना रस्त्यात जर कोणी तुला अडवले तर माझे नाव सांग. तुला आत सोडले जाईल असे सांगतो. दुसऱ्या दिवशी तो मुलगा ठरल्याप्रमाणे त्या अधिकाऱ्याच्या कार्यालयाकडे जातो. मुलाच्या बराकीपासून त्या अधिकाऱ्याचे कार्यालय बऱ्याच अंतरावर असते. तो जातो त्या मार्गावर त्याच्यापेक्षा दुप्पट उंचीची रस्त्याच्या दुतर्फा दाट झाडी व बाड लावलेले असते. त्यातून पलिकडचे काहीच दिसत नाही. खाली फक्त जमीन आणि वर निरभ्र आकाश दिसते. हे दृश्य दिग्दर्शकाने खूपच छान दाखवले आहे. अर्धा पाऊण तास चालल्यानंतर तो मुलगा जेव्हा गेटवर पोहोचतो, तेव्हा ‘अरे तू इकडे कसा काय?’ असे पहाऱ्यावरील रक्षक त्याला जरबेनेच विचारतो. तेव्हा तो मुलगा संबंधित अधिकाऱ्याचे नाव सांगतो आणि त्यांनीच मला बोलावले असे सांगितल्यावर तो शिपाई त्याला तेथेच गेटवर थांबवतो. आणि त्या अधिकाऱ्याकडे चौकशी करण्यासाठी जातो. तेव्हा तो मुलगा तेथे जे दृश्य पाहतो, ते प्रेक्षकांचे हृदय पिळवटून काढणारे असते. त्या हत्याकेंद्राच्या इमारतीमध्ये मुले, म्हातारे, महिला असे सगळेजण अंगावरचे पूर्ण कपडे काढून एका रांगेत उभे केलेले असतात. त्यांच्या आजूबाजूला एस.एस.चे पोलीस असतात. कोणी का-कु केलीच तर त्यांच्या हातात चाबूक असतो. ती रांग हळूहळू पुढे सरकत असते. आत गेलेल्या लोकांचा आरडाओरडा, किंचाळणे, रडणे इत्यादींसारखा आवाज बाहेर येत असतो. तो मुलगा दुरूनच ते सर्व ऐकतो व पाहतो.

त्या हत्याकेंद्राच्या इमारतीच्या धुराड्यातून धुराडा निघत असलेला दिसतो. ते दृश्य पाहून मुलाला अत्यंत वाईट वाटते. त्याचे आई-वडीलही त्याच रांगेत त्याला दिसतात. मुलगा बेभान होतो, पण काहीच करू शकत नाही. तो जागचा हलूही शकत नाही. त्या रांगेतील त्याच्याच वयाचा एक लहान मुलगा पळून जाण्याचा प्रयत्न करतो. त्या वेळी एस. एस.अधिकाऱ्याबरोबर असलेल्या खुंखार कुत्र्यापैकी एक कुत्रा त्या मुलाच्या मागे लागतो. पुढे काय होते ती कल्पनाच करायची असते.

एव्हाना संबंधित अधिकारी तेथे आलेला असतो. त्याच्याकडून त्याला सोन्याचे नाणे मिळालेले असते. ते घेऊन तो आपल्या ठिकाणी परत येतो. त्याचा मोठा भाऊ व रूममधला त्याचा एक सहकारी त्याची वाट पाहत असतात. अजून भाऊ कसा आला नाही म्हणून चिंता व्यक्त करतात. दरम्यानच्या काळात तो मुलगा येतो आणि रूममध्ये पडतो. भाऊ आणि त्याचा मित्र काय झालं म्हणून चौकशी करतात. तो धक्क्यातून थोडासा सावरल्यानंतर सगळा प्रकार सांगतो. हे ऐकून त्या सगळ्यांनाच धक्का बसतो. त्यांना असे वाटते की, आपले आई-वडील आणि आलेले सगळेच लहान मुले, बहीण, जे कोणी नातेवाईक असतात ते सगळेच आता मारले गेले आहेत. आलेल्या सगळ्याच ज्यू लोकांना मारण्याचं त्यांचं काम सतत चालू असते.

हे अत्यंत भयानक दृश्य, हावभाव, अभिनय सगळंच प्रत्यक्षात सिनेमात पाहण्यासारखं आहे. शब्दांत त्याचं वर्णन करणं कठीण आहे. तो त्यांचा वैताग, आलेला राग, चीड ते व्यक्त करतात.

बंदीच असलेला दुसरा सिनियर (नायक पेरिरस्की) ज्यू त्याला सगळं समजावून सांगतो- ‘तू असा  सूड घेण्याचा उतावळेपणा करून उपयोग नाही. तुलाही ते मारून टाकतील. तेव्हा आपल्याला येथून सुटका करून घ्यायची आहे. त्या दृष्टीने व्यवस्थितपणाने योजना आखून बाहेर पडायचे आहे. त्यासाठी आम्ही योजना बनवणार आहोत. त्यात तुम्ही सहभागी व्हा,’ असे तो त्या मुलांना आवाहन करतो. या पळून जाण्याच्या योजनेमध्ये या मुलांचा फार महत्त्वाचा वाटा पुढे आपणाला पहायला मिळतो.

एक दिवस एक ट्रेन नाझी जर्मनीने पराभूत केलेल्या ज्यू सैनिकांची येते. हे सैनिक असल्यामुळे साहजिकच त्यांना विविध शस्त्रे चालवण्याचा अनुभव असतो. या सैन्याच्या तुकडीतील वरिष्ठ अधिकारी अलेक्झांडर पेरिरस्की व त्या केंद्रात आधीपासूनच असलेल्या ज्यू कैदी खांबेस्की यांचे तेथून पळून जाण्याबद्दल एकमत होते. त्याप्रमाणे ते योजना बनवतात. त्यांच्या योजनेप्रमाणे आधी त्यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या एकेका एस.एस. अधिकाऱ्यांच्या हत्या करून नंतर रोल कॉलच्या वेळेस सर्वांनी पळून जायचे अशी योजना ठरते. 

याप्रमाणे त्यांची पळून जाण्याची योजना यशस्वी तर होते, परंतु शेवटी पळून जाण्याचे जे दृश्य आहे ते मोठे विदारक आहे. एस.एस. सैनिकांचा गोळीबार, त्यात पळून जाणाऱ्या कैद्यांचा होणारा मृत्यू, एकमेकांना पळून जाण्यासाठी त्यांनी दिलेले प्रोत्साहन, एस.एस. रक्षकांचा केलेला प्रतिकार, एकानंतर एक असलेली तारेची अनेक कुंपणे तोडताना होत असलेली त्यांची दमछाक, बाहेर पडल्यानंतरदेखील मैदानात पेरलेल्या भूसुरूंगांचा होणारा स्फोट, त्यात होणारे त्यांचे मृत्यू इत्यादी सर्व बाबी मन हेलावून टाकणाऱ्या असतात.

हे दृश्य मन हेलावणारे आहे. शेवटी एकूण सहाशे बंद्यांपैकी ३०० बंदी पळून जाण्यात यशस्वी होतात. बाकीचे गोळीबारात मरतात. त्या पळून गेलेल्या बंद्यांपैकी पुढे चालून कोण किती वर्षे जगले, कोणाचे कोणाबरोबर लग्न झाले, त्यांना किती अपत्ये झाली, पुढे झालेल्या न्यूरेंबर्ग खटल्यामध्ये कोणाच्या साक्षी झाल्या, इत्यादी बाबी सिनेमाच्या शेवटी प्रेक्षकांना सांगितल्या जातात.

पुढे चालून दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीचा पराभव होण्यास सुरुवात झाली, तेव्हा हे सोबिबोरचे यातनावजा हत्याकेंद्र नाझी जर्मनीकडून भूईसपाट करण्यात आले. आता तेथे त्या केंद्राची स्मृती म्हणून त्या ठिकाणच्या जमिनीत मिळालेल्या बंद्यांच्या हाडांपासून बनवलेला एका ज्यूचा पुतळा उभारण्यात आला आहे.

दुसऱ्या महायुद्धात हिटलर नाझी जर्मनीचा पराभव कॉम्रेड स्टालीनच्या नेतृत्वाखालील सोविएत युनियनच्या सैनिकांनीच केलेला आहे. हा जसा इतिहास आहे, तसाच सोबिबोर, ऑस्ट्रोविझसारख्या हत्याकेंद्रामधून बाहेर पडण्यासाठी सोविएत युनियनच्या ज्यू सैनिकांची मदत झाली, हेही खरे आहे.

हा सिनेमा पाहत असताना मनात कायम काही प्रश्न सलत राहतात. ते हे की, या यातनावजा हत्याकेंद्रातील हे अधिकारी व इतर रक्षक सैनिक एस.एस.चे असले तरी शेवटी माणसेच आहेत ना? त्यांनाही मुले-बाळे, आई-वडील, बहीण-भाऊ असतीलच ना? मग ते इतके क्रूर कसे काय असू शकतात? त्यांच्यात अगदी लहान बालकाबद्दलसुद्धा किंचितही ममत्व का नसते? याबाबत एस.एस.संघटनेचे प्रमुख हाईख हिमलर यांचे छोटेखानी चरित्र वाचले असता असे लक्षात येते की, या संघटनेच्या सदस्यांचे ट्रेंनिग कॅम्प असत. त्यात प्रत्येक सदस्यांच्या मानसिकतेत ज्यूविरोध ठासून भरला जाई. त्या सर्वांनी हिटलरलाच आपल्या निष्ठा वाहिलेल्या असत. तशी शपथ त्यांना घ्यावी लागे. केवळ त्यांनाच ते जबाबदार असत. अशा प्रकारे त्यांची जडणघडण केली जात असे. त्यामुळेच ते एवढे क्रूर होऊ शकले.

रशियाच्या आर्थिक मदतीने तयार झालेल्या या सिनेमाला तेथील चित्रपटगृहांतून प्रचंड प्रतिसाद मिळाला. युरोपच केवळ नव्हे तर संपूर्ण जगाला फॅसिझमपासून वाचवण्यामध्ये सोविएत युनियनने किती महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती, हेही यातून दिसून येते. अलिकडेच हा चित्रपट इस्त्राएलचे पंतप्रधान बेंजामीन नेत्यान्याहू यांनीदेखील पाहिला. या सिनेमाची ९१ व्या आंतरराष्ट्रीय अकादमी पुरस्कारात ‘सर्वश्रेष्ठ विदेशी भाषा फिल्म’साठी निवड करण्यात आली होती.

.............................................................................................................................................

लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत.

bhimraobansod@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................