‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
विकास पालवे
  • ‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वलर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Mon , 22 April 2024
  • ग्रंथनामा दखलपात्र कुणाल पुरोहित H-Pop : The Secretive World of Hindutva Pop Stars हिंदुत्व Hindutva भाजप ‌BJP

नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात त्यांनी जाहीर केलेल्या बहुतांश प्रकल्पांचा पुरता बोजवारा वाजलेला असला, तरी एक गोष्ट या देशात मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. आणि ती गोष्ट म्हणजे अल्पसंख्याकांबद्दल, थोर इतिहासपुरुषांबद्दल द्वेष पसरवण्याचे आणि त्यासाठी कोणत्याही थराला जाऊन असत्य पसरवण्याचे निर्माण झालेले कारखाने.

देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून कधी प्रछन्नपणे, तर कधी उघडपणे उच्चवर्णीयांचं वर्चस्व असलेल्या आणि अल्पसंख्याकांना कोणतंही स्थान नसलेल्या ‘हिंदुराष्ट्रा’ची कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी हरतऱ्हेचे मार्ग अवलंबले जात होते. पण या विचारधारेला समाजाच्या मुख्य विचारप्रवाहात कधीही मोक्याची जागा निर्माण करता आली नव्हती. त्यासाठी आवश्यक असलेलं सत्तेचं पाठबळही स्वातंत्र्यानंतर नव्हतं. ती संधी २०१४ साली लाभली.

आणि मग ज्यांना समाजात काहीही वैचारिक वा व्यावसायिक पत नव्हती, अशा लोकांनी त्यांच्या पसंतीच्या आणि त्यांना थोडीफार गती असलेल्या क्षेत्रात अल्पसंख्याक, विशेषतः मुस्लीम द्वेष पसरवायला सुरुवात केली. लोकांच्या मनात ‘हिंदुराष्ट्रा’चं स्वप्न रुजवण्यासाठी धडपड करायला सुरुवात केली. यांतले काही लोक आपल्या कामाला आधुनिक माध्यमांची जोड देऊन अधिकाधिक विषारी प्रचार करणं, हेच ‘जीवित ध्येय’ असल्याच्या कल्पनेनं झपाटून गेले.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

काहींनी या कामातून अमाप प्रसिद्धी मिळवली आणि आर्थिक लाभही करून घेतला. यांपैकी गायन (कवी सिंह), कविता (कमल आग्नेय) आणि डिजिटल पत्रकारिता-लेखन-प्रकाशन या क्षेत्रांतील संदीप देव, या तीन व्यक्तींच्या कार्याचा प्रारंभ, कार्यविस्तार व प्राप्त होणाऱ्या अर्थलाभाचे तपशील, राजकीय पक्षाकडून, संघटनांकडून मिळणारा पाठिंबा, यांचा तपशीलवार धांडोळा पत्रकार कुणाल पुरोहित यांनी ‘H-Pop : The Secretive World of Hindutva Pop Stars’ या पुस्तकात घेतला आहे.

पुरोहित यांनी या तिन्ही व्यक्तींच्या व्यक्तिगत जीवनाविषयी, त्यांनी व्यक्त केलेल्या राजकीय मतांविषयी, तसेच इतर काही अनुषंगिक येणाऱ्या सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटना, व्यक्ती यांविषयी जी काही विधानं केली आहेत, त्याच्या पुष्ट्यर्थ संदर्भ दिले आहेत.

कोणत्याही विचारसरणीच्या राजकीय नेत्याच्या पंचवीस-तीस मिनिटांच्या भाषणांपेक्षा, त्यातील आशय संप्रेषित करणारं चार-पाच मिनिटांचं गाणं अधिक प्रभावशाली आणि जनतेच्या मनावर थेट परिणाम करणारं ठरतं. पुरोगामी चळवळीत जनतेत चैतन्य निर्माण करण्यासाठी मुख्य नेत्याच्या भाषणाआधी जोशपूर्ण गाणी, पोवाडे आदी गाण्याची आणि ती वैशिष्ट्यपूर्ण रितीनं सादर करण्याची परंपरा राहिलेली आहे.

ही क्लृप्ती कमी-अधिक प्रमाणात सगळेच राजकीय पक्ष वापरतात, पण बदलत्या काळानुसार आधुनिक माध्यमांचा आणि व्यासपीठांचा उपयोग करून गाण्यांच्या साहाय्यानं राजकीय विचारधारेला आवश्यक असणारा डिजिटल क्षेत्रातील अवकाश मात्र कोणताच पक्ष निर्माण करताना दिसत नाही. याला अपवाद आहे, तो ‘भाजप’.

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.

कवी सिंह ही तरुणी अशाच प्रकारची गाणी बनवण्यासाठी यु-ट्युबवर प्रसिद्ध आहे. तिचे वडील रामकेश हे गायक आहेत. कवी सिंह २०१९पर्यंत मेकअपचं काम करून चांगली कमाई करत होती. तिला गाणी गुणगुण्याची सवय होती. २०१९ साली पुलवामात भारतीय जवानांवर दहशतवादी हल्ला झाला होता. रामकेश यांना त्यांच्या एका मित्रानं या विषयावर एक गाणं व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलं होतं. त्यांना कवीचं गुणगुणणं आवडायचं. त्यामुळे तिने गाणं गाऊन बघायला काय हरकत आहे, असा विचार करून त्यांनी तिला मित्रानं पाठवलेलं गाणं गायला लावलं. तिचं गायन त्यांना पसंत पडलं. ते तिला एका स्टुडिओत घेऊन गेले. गाणं रेकॉर्ड केलं आणि काही मित्रांना अभिप्रायासाठी पाठवलं. त्याची ऑडिओ क्लिप खूप मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली आणि कवी सिंहला भरपूर प्रसिद्धी मिळाली.

कवी सिंहच्या दृष्टीने देशातील सगळ्यात प्रमुख समस्या आहेत - मुसलमानांची वाढती लोकसंख्या, लव्ह जिहाद, मिश्र विवाह इत्यादी! त्यामुळे या ‘प्रश्नां’ना केंद्रस्थानी ठेवून ती गाण्याचे व्हिडिओ बनवते. त्यासाठी तिला तिचे वडिलही मदत करतात. या गाण्यांचा वापर राजकीय, धार्मिक मिरवणुकांत केला जातो. राजकीय प्रश्न, त्यांतील ऐतिहासिक गुंतागुंत उलगडून न सांगता सोप्या भाषेत थेट काही तरी उत्तरं देणारी गाणी लोकांना आवडतात. या गाण्यांनाच इतिहास समजला जाण्याचा धोका आहे, असं पुरोहित यांनी म्हटलं आहे. एखाद्या समूहाविषयी तिरस्कार निर्माण करणाऱ्या गाण्यांचा जागतिक पातळीवरील इतिहासदेखील त्यांनी थोडक्यात उलगडून दाखवला आहे.              

जे या गाण्यांचे नेहमीचे ‘ग्राहक’ नाहीत, असे सर्वसाधारण लोक एखाददुसरं गाणं असेल असं समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. पण कवी सिंहच्या प्रकरणामुळे आपल्या लक्षात येतं की, हा संघटित प्रचाराचाच एक भाग आहे आणि अशी शेकडो गाणी विविध युट्युब वाहिन्यांवर प्रसारित होत आहेत.

कवी सिंहची अशी ठाम धारणा आहे की, मुस्लिमांची लोकसंख्या वाढून हिंदूंची मालमत्ता, संपत्ती या सगळ्यावर ते कब्जा करतील. हे तिने पुरोहित यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. पण वास्तव याच्या उलट आहे, हे पुरोहित अनेक मान्यवर संस्था, ख्यातनाम अभ्यासक यांच्या अभ्यासपूर्ण निष्कर्षांतून, आकडेवारीतून सप्रमाण मांडतात. पण कवी सिंह आणि तिच्यासारखे युट्युबर मात्र हा ‘लोकसंख्या वाढी’चा आशय घेऊन व्हिडिओ बनवतात, त्यातून पैसे कमवतात आणि प्रसिद्धीही मिळवतात. मात्र या प्रकारातून सामान्य माणसांच्या मनात मात्र अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण केला जातो.

काही मानसशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्राचे अभ्यासक यांनी तिरस्कार निर्माण करणारी गीतं आणि हिंसाचार यांचा थेट नाही, पण अप्रत्यक्ष संबंध आहे, हे दाखवून दिलं आहे. या मुद्द्याच्या विवेचनार्थ पुरोहित अनेक उदाहरणं देतात. त्यांपैकी रवांडातील उदाहरण महत्त्वाचं आहे. रवांडातील १९९४च्या नरसंहाराच्या आधीची परिस्थिती आणि त्यातली गीतकार, संगीतकार (तिरस्कार निर्माण करणारी गाणी बनवणारे) यांची भूमिका काय होती, हे पुरोहित यांनी पुराव्यानिशी दाखवून दिलं आहे.

दुर्दैवानं आपल्या देशातली विद्यमान स्थिती आणि रवांडातील तत्कालीन स्थिती यांत खूपच साम्य आहे. नरसंहारानंतर ‘युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिल’ने ‘इंटरनॅशनल क्रिमिनल ट्रायब्युनल’ स्थापित करून या नरसंहाराला जबाबदार असणाऱ्यांची चौकशी सुरू केली. ती २१ वर्षं सुरू होती. त्यात ९३ जण दोषी आढळले. गायक व गीतलेखक सायमन बिकिंडी हा त्यापैकी एक. नरसंहाराच्या आधीच्या काळात त्याची तीन राजकीय गीतं रेडिओवरून वारंवार प्रसारित केली जायची. त्यात तुत्सी अल्पसंख्याकांना ‘राक्षसी’ रूपात चितारलं होतं. त्याला यासाठी दोषी ठरवण्यात आलं होतं.

कवी सिंहच्या कलम ३७०, राममंदिर, शाहीन बाग आंदोलन या विषयांवरच्या गाण्यांच्या ज्या काही ओळी पुरोहित या पुस्तकात दिल्या आहेत, त्या नुसत्याच आक्षेपार्ह आहेत असं नाही, तर त्या मुस्लीम समुदायाविषयी अविश्वास, संशय व चीड निर्माण करणाऱ्या आहेत, हे तत्काळ लक्षात येतं. त्यावर त्वरित कारवाई व्हायला हवी, पण कारवाई तर दूरच अशा गायकांना मोदी सरकारकडून प्रोत्साहित आणि पुरस्कृत केलं जात आहे.

हरयाणाचे भाजपचे मुख्यमंत्री खट्टर यांनी कवी सिंहला दोन वेळा त्यांच्या राजकीय कार्यक्रमांत गाण्यासाठी बोलावलं होतं. कवी सिंहची राममंदिर आणि कलम ३७० या विषयांवरील चिथावणीखोर गाणी आपल्याला आवडली होती, असं खुद्द त्यांनीच तिला प्रत्यक्ष भेटीत सांगितलं होतं.           

कवी सिंह गाण्यांतून जे काम करते, तेच काम कमल आग्नेय हा तरुण कविता लिहून करतो. कमलने एका काव्यसंमेलनात गांधीद्वेषाने भरलेल्या काव्यपंक्ती सादर केल्या आणि त्याला एकाएकी प्रसिद्धी मिळाली. भाजपने २०१७ सालच्या उत्तर प्रदेश निवडणुकांच्या प्रचारात कमलची मदत मागितली आणि त्यानेही उत्साहाने त्यांची मागणी पूर्व केली. त्या निवडणुकीत योगी आदित्यनाथ विजयी झाले, कमलची पतही वाढली. संघ, भाजपच्या मोठमोठ्या नेत्यांसोबत त्याच्या गाठीभेटी होत असत.

इतिहासातून सोयीस्कर घटना, व्यक्ती निवडून त्यांच्याविषयीची चुकीची माहिती कवितेतून सादर करायची, हा कमलचा मुख्य उद्योग आहे. यानिमित्ताने पुरोहित कवितेचा वापर राजकीय, धार्मिक कार्यक्रमांत कसा होतो, याचा जागतिक पातळीवरचा थोडक्यात आढावा घेतला आहे. धर्म कोणताही असो, त्याच्या अंध-अनुयायांत कट्टरता निर्माण करण्यासाठी, ती टिकून राहावी म्हणून जोश जागृत करण्यासाठी द्वेषपूर्ण काव्यपंक्तींनी भरलेल्या कवितेचा वापर केला जातो, हे वास्तव पुरोहित उदाहरणांसह मांडलं आहे.

जेएनयूला बदनाम करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा प्रभाव कमी करण्यासाठी कमलने खोट्या माहितीने खच्चून भरलेल्या कविता लिहिल्या होत्या. कमल आणि त्याच्यासारख्या हिंदुत्ववादी शक्तींना फायद्याच्या ठरणाऱ्या तरुणांना नेमकं हेरून त्यांना सर्वतोपरी साहाय्य करण्याची व्यवस्था भाजप करतो, हे या पुस्तकात उल्लेख केलेल्या काही घटनांमधून लक्षात येतं.

असं साहाय्य भाजपकडून का केलं जातं? पुरोहित एके ठिकाणी लिहितात, “…they become valuable voices for the party to shape public thought and discourse covertly in ways that it wants, without directly getting involved in it. These influencers, often, lay the ground for the Modi government’s actions by creating consensus on critical issues. ”

यातून हे स्पष्ट होतं की, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सर्वसमावेशकता यांची झूल अंगावर घेतलेल्या भाजपच्या केंद्रातील आणि काही राज्यांतील सत्ताधाऱ्यांना अल्पसंख्याकांविरोधात माथी भडकलेल्या वा भडकवल्या गेलेल्या अविचारी तरुणांमुळे भाजपला आपल्या मातृसंघटनेने (रा.स्व.संघ) दिलेले द्वेष आणि तिरस्कार यांचा प्रचार करण्याचे धडेही गिरवता येतात, आणि त्याच्या परिणामांपासून अलिप्तही राहता येतं.

पुरोहित गीत-संगीत, कविता या क्षेत्रांना जोडून असलेल्या डिजिटल पत्रकारिता, प्रकाशन या क्षेत्रात भाजप-आरएसएसचा अजेंडा घेऊन काम करणाऱ्या संदीप देवबाबतही विस्तारानं लिहिलं आहे. संदीप देवने पत्रकारितेत दहा वर्षं काम केलं. उजव्या विचारसरणीकडे झुकणारी पुस्तकं लिहिली. काही काळाने भाजपमध्ये प्रवेश केला. तो एक युट्युब वाहिनीही चालवतो. त्यात अधूनमधून नेहरू-गांधी यांना शिव्यांची लाखोली वाहिलेली असते. त्याच्या पुस्तकांची विक्री तो अ‍ॅमेझॉनवर करत नाही. कारण त्याच्या दृष्टीनं हे संकेतस्थळ ‘हिंदूविरोधी’ आहे! त्यामुळे त्याने विक्रीसाठी स्वतःचं संकेतस्थळ सुरू केलंय.

ओटीटी माध्यमांवर जे काही सिनेमे, सिरीज दाखवल्या जातात, त्यांत केवळ सेक्स, हिंसा, ड्रग्जचा वापर, कौटुंबिक वाद यांवरच भर दिला जातो, यासाठी त्यांना पर्याय म्हणून ‘हिंदू ओटीटी’ हवं, अशी कल्पना त्याने मांडल्याचा उल्लेख पुरोहित यांनी केला आहे.

संदीप देवची ही मतं किंवा त्याची भूमिका इथं देण्याचं कारण असं की, या मंडळींमधील कट्टरता आणि इतर समूहापासून आपण अलग असल्याची भावना किती पराकोटीची इयत्ता गाठू शकते, हे लक्षात यावं. या मंडळींना असलेली लाखोंची ‘फॅन फॉलोविंग’ ही भयभीय करणारी बाब आहे. कारण हे अंध-अनुयायी नव्या तंत्रज्ञानातून अवतरलेल्या ‘आदर्श व्यक्तीं’च्या विश्लेषणावर, कथनावर डोळे झाकून विश्वास ठेवतात.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

उदाहरणार्थ, काही वर्षांपूर्वी जेव्हा चीनने जेव्हा आपल्या सीमेवर हल्ला केला, तेव्हा संदीप देवने एक व्हिडिओ बनवला. त्यात त्याने राहुल गांधी यांना चीनचे ‘नंबर एक’चे ‘एजंट’ असं संबोधलं आहे. या व्हिडिओच्या कमेंट्स विभागात अनेकांनी राहुल गांधी यांना ‘देशद्रोही’, ‘गद्दार’ म्हटलं, त्यांना शिव्या घातल्या, पण काही जण त्याही पुढे जाऊन गांधी यांना फाशी दिली जावी, असंही म्हटलं. त्यामुळे या व्हिडिओंचा प्रभाव जनमानसावर कसा पडतो, हे पाहायचं असल्यास त्याखालील कमेंट्स वाचायला हव्यात.

पुरोहित यांनी या तिन्ही व्यक्तींच्या खाजगी आयुष्यातील त्यांच्या व्यक्तित्वावर प्रभाव टाकणाऱ्या घटनाही नोंदवल्या आहेत. त्यांच्या साहाय्यानं या तिघांच्याही मानसिक घडणीचा काहीएक अंदाज येतो. त्यामुळे या तिघांकडे आपण वाचक म्हणून ‘खलनायका’च्या नजरेनं पाहत नाही. पण भाजपचे अशा व्यक्तींना प्रोत्साहित करण्यामागचे, त्यांना आर्थिक आधार देण्यामागचे मनसुबे मात्र तत्काळ लक्षात येतील, अशी मांडणी लेखकानं केली आहे.

या तिघांच्या कार्यातून आणखी एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते. ती अशी की, हा भाजपचा ‘सांस्कृतिक हस्तक्षेप’ आहे आणि त्याला राष्ट्रवाद व धर्मप्रेम ही अंगडी-टोपडी चढवलेली आहेत. हा सांस्कृतिक हस्तक्षेप आधुनिक माध्यमं आणि सहज सोपी भाषा या उपकरणांच्या साहाय्यानं होत आहे. याचा प्रतिवाद करण्यासाठी याच उपकरणांचा वापर करत एक मोठी आघाडी पुरोगामी चळवळीला उघडावी लागणार आहे. अन्यथा पुरोहित पुस्तकाच्या शेवटी म्हणतात, ते खरं व्हायची शक्यता नाकारता येणार नाही. तो म्हणतो – ‘येणारा काळ हा वाईट दिवसांनी भरलेला असणार आहे’.     

‘H-Pop : The Secretive World of Hindutva Pop Stars’ -  Kunal Purohit

Publisher : HarperCollins India

Price : 499/-

..................................................................................................................................................................

लेखक विकास पालवे प्रकाशन व्यवसायात कार्यरत आहेत.

vikas_palve@rediffmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......