खोट्या माहितीवर उभ्या असलेल्या सत्तेच्या डोलाऱ्याला सुरुंग लावायचा असेल, तर ‘Love Jihad and Other Fictions’ हे पुस्तक मोठ्या प्रमाणात प्रसारित झालं पाहिजे!
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
विकास पालवे
  • ‘Love Jihad and Other Fictions’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Thu , 11 April 2024
  • ग्रंथनामा दखलपात्र लव्ह जिहाद अँड अदर फिक्शन्स Love Jihad and Other Fictions

भारतीय राजकारणासाठी आणि देशाच्या भविष्यातील वाटचालीच्या दृष्टीने २०१४ हे निर्णायक वर्ष होतं, हे आता दहा वर्षांनंतर सर्वमान्य झालं आहे. या वर्षाचं निर्णायक असणं, हे प्रतिगामी हिंदुत्ववादी शक्तींसाठी त्यांचं विभाजनकारी धोरण पुढे रेटण्यासाठी उपलब्ध झालेला अवकाश या अर्थी होतं, तर पुरोगामी ताकदींसाठी त्यांना उपलब्ध असणारा विचारभिन्नत्व मांडण्याचा अवकाश संकुचित होत जाण्याच्या अर्थी होतं.

या दहा वर्षांत बहुसंख्य आणि अल्पसंख्य यांच्यातील ध्रुवीकरण वाढण्याची जी काही कारणं असतील, त्यांत अल्पसंख्याकांची बदनामी करणारा, अनैतिहासिक माहितींनी भरलेला, वास्तवाधारित आकडेवारी आणि तथ्यं यांची मोडतोड करणारा असत्य प्रचार, हे एक प्रमुख कारण आहे. सत्ताधारी पक्षातील नेते, पदाधिकारी आणि त्यांच्या विचारांना प्रमाण मानणारे ‘तथाकथित-विचारवंत’ हे या असत्य प्रचाराचा मुख्य स्रोत राहिलेले आहेत.

श्रीनिवासन जैन, मरियम अलावी आणि सुप्रिया शर्मा या तीन लेखक-पत्रकारांनी ‘Love Jihad and Other Fictions : Simple Facts to Counter Viral Falsehoods’ या पुस्तकात हा खोटा प्रचार किती नावांनी कधी मुखवट्यांआड, तर कधी थेट केला जातो आणि त्याचे पडसाद सामाजिक-राजकीय वर्तुळात कसे उमटतात, हे अभ्यासपूर्वक, पुराव्यांनिशी दाखवून दिलं आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

‘लव्ह जिहाद’, ‘पॉप्युलेशन जिहाद’, ‘बळजबरीची धर्मांतरं’ आणि ‘मुस्लीम तुष्टीकरण’ अशा चार भागांत विभागलेल्या या पुस्तकात शीर्षकांतून ध्वनित होणाऱ्या प्रश्नांवर पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्यांचा पडताळा घेण्यात आला आहे. लेखक त्रयीने अनेक विषयांवर ‘माहितीचा अधिकार’ कायद्यांतर्गत माहिती मिळवली, अनेक शासकीय कागदपत्रं तपासली, त्या त्या घटनेशी संबंधित पीडित व्यक्ती, त्यांच्या आसपासच्या व्यक्ती आणि संघ-भाजपचे नेते-कार्यकर्ते अशा सगळ्यांशी संवाद साधला. त्यातून समोर आलेली माहिती दावा, त्याचं खंडनमंडन आणि शेवटी निष्कर्ष अशा पद्धतीने सादर केलेली आहे.

संघ-भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केला जाणारा प्रचार हा प्रामुख्याने फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप या समाजमाध्यमांवर पोस्टर्सच्या रूपात केला जातो. लेखक त्रयीने या संदेशांची छायाचित्रं दिली आहेत. यांतले बरेचसे संदेश हे हास्यास्पद आहेत. त्यांतून एक गोष्ट अधोरेखित होते. ती म्हणजे कोणत्याही घटनेत ओढूनताणून अल्पसंख्याकांना, त्यांच्या धर्मांना लक्ष्य करता येईल, अशी बाजू शोधायची. अशा प्रकारचे संदेश पूर्वीही येत असत, पण आता या गोष्टी समाजाच्या दर्शनी भागात आलेल्या आहेत. सर्वसामान्य माणसं यात आघाडीवर आहेत.

अशी खोटी माहिती प्रसृत करण्यात देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री सगळ्यात अग्रभागी आहेत, हे वास्तवही या पुस्तकातून समोर येतं.    

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने २०२०मध्ये संसदेत सांगितलं होतं की, ‘लव्ह-जिहाद’ याची निश्चित अशी काही व्याख्या सरकारकडे नाहीय. तरीही सरकारपुरस्कृत संघटनांकडून हिंदू-मुस्लीम विवाहाला (मुलगी हिंदू आणि मुलगा मुस्लीम असेल तर) जाणीवपूर्वक ‘लव्ह-जिहाद’चा रंग दिला जातो. अशी अनेक प्रकरणं गेल्या काही वर्षांत चर्चेत राहिली.

उत्तर प्रदेशमधील मीरत येथे २०१४मध्ये घडलेली अशा प्रकारच्या विवाहाची एक घटना देऊन लेखक त्रयीने त्यात गुंतलेल्या लोकांच्या मुलाखती घेऊन दाखवून दिलंय की, हिंदू तरुणी आणि मुस्लीम तरुण यांनी स्वखुशीने, परस्परसंमतीने लग्न केलेलं होतं. पण त्या मुलीवर दबाव आणून मुस्लीम मुलानं फसवलं, अपहरण केलं, बलात्कार केला, अशी खोटी तक्रार द्यायला तिला भाग पाडलं. इतकंच नाही, तर या मुलीनं पोलिसांना सांगितलं की, स्थानिक भाजपनेत्याने तिच्या कुटुंबाला पंचवीस हजार रुपये दिले आणि खोट्या तक्रारीवर ठाम राहिलात, तर आणखीही रक्कम देऊ, असं सांगितलं होतं. लेखक त्रयीने आपल्या विवेचनाच्या पुष्ट्यर्थ अनेक पुरावे टिपांच्या स्वरूपात पुस्तकात दिले आहेत.

केरळमध्ये २००८मध्ये हिंदू मुलींना फशी पाडून इस्लाम धर्मात धर्मांतरित करून घेण्याच्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी, पोलिसांचा तपास या सगळ्याची कागदपत्रं तपासून खुद्द न्यायालयानेच कशा पद्धतीने ‘लव्ह-जिहाद’ वगैरे भंपक कल्पना निकालाद्वारे मोडीत काढल्या होत्या आणि आधी आरडाओरडा करणारी माध्यमं न्यायालयाच्या निकालावर मात्र चिडीचूप होती, हे साधार दाखवून दिलं आहे.

लेखक त्रयी प्रथम दावा काय आहे ते देतात, मग त्याच्याशी संबंधित प्रकरणं सूत्रबद्ध पद्धतीनं उलगडत नेतात. केरळ, काश्मीर या राज्यांत झालेल्या मिश्र विवाहांची प्रकरणं, तसेच आफताब पुनावाला या तरुणाने श्रद्धा वालकर या आपल्या ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या सोबतीणीचा खून केल्याचं प्रकरण असो; सगळ्या प्रकरणांत अधिकचा तपास केला असता, त्यात कुठेही बळजबरीने विवाह आणि धर्मांतर करायला लावण्याचा कणभरही पुरावा तपास यंत्रणांना सापडला नव्हता.

पण हिंदुत्ववादी राजकारणी मात्र तपास पूर्ण होण्याआधीच राजकीय लाभ प्राप्त करण्याच्या मिषाने या प्रकरणांना धार्मिक रंग देतात. त्यासाठी खोट्या माहितीचा प्रसार करणारे ट्विट्स करतात. लोकांची मनं कलुषित होतात. कालांतराने सत्य प्रकाशात येतं तेव्हा त्याचा मात्र मोठ्या प्रमाणात प्रचार केला जात नाही.

लेखक त्रयीने फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या समाजमाध्यमांवर अशा पद्धतीचा प्रचार करणाऱ्या खात्यांची तपासणी केली, त्यावरील मजकुराची तपासणी केली. त्या पोस्ट्स जशाच्या तशा पुस्तकात देऊन त्याला छेद देणारं सत्य-संशोधन आणि अभ्यास करून मांडलेलं आहे.

लेखक त्रयीने विश्व हिंदू परिषदेच्या एका नेत्याशी संपर्क केला आणि त्यालाच ‘लव्ह-जिहाद’ची व्याख्या विचारली, तर त्यालाही ती नीट सांगता आली नाही. मुस्लिमांकडून हिंदूंची लोकसंख्या कमी करण्यासाठीचं हे षडयंत्र आहे आणि त्यासाठी आकडेवारी, पुरावे काही नाहीत, तर संघटनेअंतर्गत तयार केलेली एक यादी आहे, असं त्याने म्हटलं. या यादीचा अभ्यास लेखक त्रयीने केला, तर त्यांना असं आढळून आलं की, कुठलीही प्रकरणं ‘लव्ह-जिहाद’च्या विभागात घुसडून दिली आहेत. त्यांच्या या माहितीचा स्रोत कुठला तर ‘OpIndia’ हे हिंदुत्ववादी विचारांना प्रमाण मानणारं आणि सातत्यानं खोट्या बातम्या पसरवण्यासाठी चर्चेत राहणारं संकेतस्थळ.

मुख्य प्रवाहातल्या माध्यमांत येणाऱ्या बातम्यांची मोडतोड करून, त्यात खोटे रंग भरून त्याला आपल्या माहितीचा स्रोत म्हणून सादर करणं, असे प्रकार या संकेतस्थळावर केल्याचं आढळून आलं. लेखक त्रयीने फसवून विवाह करून धर्मांतर करवलं, असा आरोप असलेल्या काही मुलींना प्रत्यक्ष भेटून सत्य परिस्थिती जाणून घेतली. या मुलींनी या गोष्टीचा इनकार केला आहे.

‘स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट’च्या काही नियम आणि तरतुदी यांमुळे धर्मांतर करून घ्यावं लागतं, असं एका जोडप्यांनी म्हटलंय. त्यासाठी रजिस्ट्रार कार्यालयात ३० दिवस आधी नोटीस द्यावी लागते. ती नोटीस सगळ्यांना पाहण्यासाठी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर उपलब्ध असते. मग या नोटिसा समाजमाध्यमांवर पोस्ट करून संबंधित जोडप्याला धमक्या दिल्या जातात, हा कायदेशीर पेचही लेखक त्रयीने नोंदवला आहे.

लेखक त्रयीने उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या किती घटना ‘लव्ह-जिहाद’च्या होत्या, अशी विचारणा माहिती अधिकार कायद्यांतर्गत केली असता, त्यांना कोणतंही उत्तर दिलं गेलं नाही.

‘पॉप्युलेशन जिहाद’ अशीही एक कल्पित संकल्पना संघ-भाजपकडून प्रसारित केली गेली आहे. नरेंद्र मोदी २००२ साली गुजरात राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी एके ठिकाणी धार्मिक दंगलींमुळे पळून कुठेतरी शिबिरांत राहणाऱ्या मुस्लीम समुदायांच्या वसाहती या ‘मुलं जन्माला घालायची केंद्रं’ आहेत, असं म्हटलं होतं. लेखक त्रयीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘ऑर्गनायझर’ या इंग्रजी मुखपत्रात प्रकाशित झालेल्या लेखांचे दाखले देऊन ‘पॉप्युलेशन जिहाद’ची कशी सर्वसामान्य हिंदू समूहाला भीती दाखवली जाते, हे स्पष्टपणे दाखवून दिलं आहे. त्यासाठी तीच खोट्या माहितीचा प्रचार करण्याची पद्धत अवलंबण्यात आली होती, हे पुराव्यानिशी मांडलं आहे.

एका स्कुटरवर एका मुस्लीम कुटुंबातील सहा जण बसलेले आहेत, असं छायाचित्र देऊन ‘यांना पोसण्यासाठी तुम्ही टॅक्स भरत आहात’, अशी कॅप्शन दिलेली पोस्ट लेखक त्रयीने दिली आहे. पण अधिक तपास केला असता, त्यांना आढळून आलं की, हे छायाचित्र तर बांगलादेशमधील आहे! पण तोवर हे छायाचित्र या कॅप्शनसह सर्वत्र प्रसारित झालेलं होतं.

या भागात लेखक त्रयीने अनेक कोष्टकं, तक्ते देऊन संघ-भाजपच्या विचारधारेकडून करण्यात येणाऱ्या प्रचाराचा प्रतिवाद केला आहे. म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमान शरणार्थी म्हणून आपल्या देशात येतील आणि इथे येऊन मुसलमानांची संख्या वाढवण्याचं काम करतील, असा प्रचारही केला गेला. पण वास्तव हे आहे की, खुद्द मोदी सरकारनेच २०१७ साली ५०० रोहिंग्यांना दीर्घकालीन व्हिसा दिला होता.

एका बाजूने या समूहाबद्दल आक्रस्ताळा प्रचार करायचा आणि दुसऱ्या बाजूने आंतरराष्ट्रीय पटलावर स्वतःची छबी चमकवण्याच्या दडपणाखाली त्यांना व्हिसा द्यायचा, ही दुटप्पी भूमिका झाली. पण मोदींच्या अंधभक्तीत गर्क असलेल्यांना हे सांगूनही पटत नाही. आसाममध्ये घुसखोरी करणाऱ्या मुसलमानांची संख्या खूप वाढलेली आहे वगैरे प्रचाराचीही लेखक त्रयीने अभ्यासपूर्वक लक्तरं काढली आहेत.

बळजबरीने होणाऱ्या धर्मांतरवरही स्वतंत्र प्रकरण आहे. यात मुख्यतः धर्मांतरित ख्रिश्चन लोकांच्या प्रत्यक्ष भेटून घेतलेल्या मुलाखती आहेत. यांतल्या बहुतेकांनी आमच्यावर धर्मांतर करण्यासाठी कोणतीही जबरदस्ती झालेली नाही, हे स्पष्टपणे कबूल केलेलं आहे. पण आमच्यावर ‘घरवापसी’साठी मात्र जबरदस्ती होत असते, असंही म्हटलं आहे.

या समूहाच्या विरोधात काही हिंदू संघटनांकडून चिथावणी देणारी पत्रकं छापली जातात. ती पुस्तकात जशीच्या तशी देण्यात आली आहेत. लेखक त्रयीने काही राज्यांतील धर्मांतरविरोधी कायद्यांचा अभ्यास करून त्यातील त्रुटी, तरतुदींतील उणिवाही नोंदवल्या आहेत. 

मोदींनी मागे एक विधान केलं होतं की, ‘रमझानमध्ये जेवढी वीज वापरायला मिळते, तेवढीच वीज दिवाळीच्या काळातही मिळायला हवी.’ लेखक त्रयीने या विभाजनकारी विधानाची पडताळणी या दोन्ही सणांच्या काळात वीज मंडळाकडून किती वीज पुरवठा होतो, याची माहिती घेऊन केली आहे. समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात (२०१३ ते २०१७) आणि योगी सरकारच्या म्हणजेच भाजपच्या सत्ताकाळात (२०१८ ते २०२२) किती वीज पुरवठा दोन्ही सणांच्या काळात करण्यात आला, याची माहिती तक्ते देऊन सादर करण्यात आली आहे.

त्यातून वेगळंच वास्तव समोर येतं. समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात ईदच्या काळात कमी वीज पुरवठा झाला आहे, तर दिवाळीच्या काळात जास्त झाला आहे आणि भाजपच्या काळात उलटं घडलंय.

याचं कारण असं आहे की, समाजवादी पक्षाची सत्ता होती तेव्हा ईद जुलै-ऑगस्ट महिन्यात येत होती, जेव्हा वातावरण थंड असतं, पण भाजपच्या काळात ती मे-जूनमध्ये येऊ लागली, जेव्हा उन्हाळा असतो. त्यामुळे साहजिकच विजेची मागणी जास्त होती. पण हा सारासार विचार पंतप्रधानपदावर बसलेल्या व्यक्तीनेही करू नये आणि मतांसाठी तद्दन खोटी विधानं करावीत, याचं आश्चर्य वाटतं.

हज यात्रेसाठी दिलं जाणारं अनुदान, शैक्षणिक संस्थांना दिलं जाणारं अनुदान, मदरशांना दिलं जाणारं अनुदान, ‘समान नागरी कायद्या’ला होणारा विरोध, गोहत्या अशा सगळ्या प्रश्नांचं वास्तव लेखक त्रयीने पडताळून पाहिलं आहे. या प्रश्नांवर काँग्रेसच्या काळात झालेल्या चुकांचाही उल्लेख लेखकांनी केलेला आहे.   

लेखक त्रयीने २००९ ते २०१४ या युपीएच्या काळात गायीवरून होणाऱ्या हिंसाचाराची एकच घटना घडली होती, पण २०१४ ते २०२३ पर्यंत १३६ घटना घडल्या, तसेच २००९ ते २०१४ या काळात द्वेषपूर्ण भाषणं देण्याच्या २५ घटना घडल्या, तर २०१४ ते २०२३ या काळात ४६० घटना घडल्या, हे वास्तव अधोरेखित केलं आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

२०१४नंतर अशा घटनांकडे पाहण्याचा माध्यमांचा दृष्टीकोनही बदललाय, सगळ्याच घटना तिथे नोंदवल्या जात नाहीत, हेही ठळकपणे मांडलं आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा यांनी अनुक्रमे ‘लँड जिहाद’, ‘फर्टिलायझर जिहाद’ असे शब्दप्रयोग जाहीर भाषणांत केले होते. म्हणजे सरकारकडूनच या संकल्पना जन्माला घातल्या जातात. खोट्या माहितीची जोड देऊन त्या प्रसारित केल्या जातात. आणि त्यातून समाजात दुभंग निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.

खोट्या माहितीवर उभ्या असलेल्या सत्तेच्या डोलाऱ्याला सुरुंग लावायचा असेल, तर ‘Love Jihad and Other Fictions: Simple Facts to Counter Viral Falsehoods’ हे पुस्तक मोठ्या प्रमाणात प्रसारित झालं पाहिजे आणि त्याचा तातडीने सगळ्या भारतीय भाषांत अनुवादही व्हायला हवा.

या पुस्तकातील माहितीचा आधार घेऊन अनेक पोस्टर्स, पत्रकं छापता येऊ शकतात. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर या समाजमाध्यमांवर पोस्ट्स करता येऊ शकतात. संघ-भाजपच्या खोट्या प्रचाराला उत्तरं देण्यासाठी हे पुस्तक अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे.      

‘LOVE JIHAD AND OTHER FICTIONS : SIMPLE FACTS TO COUNTER VIRAL FALSEHOODS’ – SREENIVASAN JAIN, MARIYAM ALAVI, SUPRIYA SHARMA

Aleph Book Company, New Delhi

Price : 599/-

..................................................................................................................................................................

लेखक विकास पालवे प्रकाशन व्यवसायात कार्यरत आहेत.

vikas_palve@rediffmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now                 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......