१००व्या नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने : पावणे दोनशेहून अधिक वर्षांच्या मराठी रंगभूमीचा एक धावता आढावा...
कला-संस्कृती - नाटकबिटक
नितीन देशपांडे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 16 January 2024
  • कला-संस्कृती नाटकबिटक १००वे नाट्य संमेलन 100th Natya Sammelan

५,६,७ जानेवारी २०२४ दरम्यान पिंपरी-चिंचवड येथे १००वे अ. भा. मराठी नाट्य संमेलन ज्येष्ठ नाट्य-सिने- दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. राजकारण्यांनी झाकोळले गेले असले तरी, या संमेलनाचे महत्त्व नाकारता येणार नाही. या नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने हा लेख...

.................................................................................................................................................................

१८४३ ते २०१९ या उण्यापुऱ्या १७५ वर्षांच्या मराठी रंगभूमीवरील मराठी भाषेचा प्रवास, पुढील ७५ मिनिटे मी तपासण्याचा प्रयत्न करणार आहे.

हा प्रवास प्रथितयश नाटककारांच्या, दिग्दर्शकांच्या, कलावंतांच्या रंगभूमीय अनुभवांचा आलेख असणार आहे. भारतीय संस्कृतीचा एक समर्थ गाभा म्हणून मराठी आणि बंगाली रंगभूमीकडे बघितले जाते. मात्र २०१८ साली कोलकत्याच्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत महेश एलकुंचवार म्हणतात, “बंगालमध्ये सध्या मराठी रंगभूमीच्या तुलनेत नवे नाटककार / प्रयोग कमी आढळतात.” थोडक्यात, मराठी नाटकांचे आजही असलेले महत्त्व त्यांनी अधोरेखित केलेले आहे.

भारतातील परंपरागत कला प्रकारांमध्ये मराठी रंगभूमी सतत सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ मानण्यात येते. लोककला आणि तमाशा यांच्यापासून स्फूर्ती घेतलेली रंगभूमी गेली १५० वर्षे अव्याहत वाहत आहे.

कर्नाटकातील यक्षगानच्या धर्तीवर ५ नोव्हेंबर १८४३ रोजी (मराठी रंगभूमी दिन) विष्णूदास भाव्यांनी, सांगलीचे राजे पटवर्धन यांच्या आग्रहानुसार ‘सीता स्वयंवर’ मंचित केले. सुरुवात अपरिहार्यपणे पौराणिक कथानकांच्या उत्थानातून झाली असली, तरी भूतकाळाचा भव्य दिव्य अभिमान, जोडीला स्वातंत्र्य लढयाची ऊर्जा यातून पुढे ऐतिहासिक आणि राजकीय नाटकेही लिहिली गेली.

सतीश आळेकरांच्या मते मात्र जोतीराव फुल्यांचे ‘तृतीय रत्न’ हे नाटक मराठीतील पहिले नाटक आहे आणि दत्ता भगतही त्याला ठामपणे अनुमोदन देतात. “वरच्या जातीच्या आणि वर्तुळातील लोकांनी मराठी नाटकांवर कायम अधिराज्य गाजवले, पण त्यांचे अनुभवविश्व मर्यादित असल्याने मराठी नाटकही सुरुवातीला संकुचित आणि रिंगणात घोटाळणारे होते”, असेही मत दत्ता भगत मांडतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

गावकुसाबाहेरचं फारसं खूप काळ आमच्या रंगभूमीवर आलंच नाही. १८७०नंतर मात्र बालविवाह, विधवांचे केशवपन, स्त्रीशिक्षण यासारखे विषय दिसू लागले. तरीही भाषा सौष्ठवाच्या आणि समाजाच्या चौकटीमध्ये बद्ध असलेले मराठी नाटक स्वतःची ठाम आणि वेगळी ओळख ठसवण्यात फारसे यशस्वी झाले नाही.

त्याच सुमारास मुंबईत मिल्स आल्या. स्थलांतरित गिरणी कामगारांचे लोंढे, वर्गविद्वेष, बदलते आर्थिक परिप्रेक्ष्य, स्वातंत्र्य संग्राम आणि नंतरची संयुक्त महाराष्ट्र चळवळ या साऱ्यांचा प्रभाव नाटकांतील मराठी भाषेवर टप्प्याटप्प्याने पडला.

चाळींमध्ये फावल्या वेळी करमणुकीसाठी कीर्तन, प्रवचन, पोवाडे, गोंधळ गणेशोत्सवातील व्याख्याने असे सांस्कृतिक उपक्रम चढत्या भाजणीने साजरे होऊ लागले. पठ्ठे बापूराव आणि अण्णाभाऊ साठेंनी सौष्ठवपूर्ण लावण्या लिहून मराठी भाषा शृंगारिक केली. १८८०मध्ये अण्णासाहेब किर्लोस्करांनी (मराठी संगीत नाटकांचे जनक) ‘शाकुंतल’ आणले. जुनी संस्कृत आणि इंग्रजी नाटके संदर्भासाठी घेऊन मराठीत प्रयोग बांधले जाऊ लागले. ‘थोरले माधवराव पेशवे’ हे विनायक जनार्दन कीर्तने लिखित पहिलं स्वतंत्र आणि ऐतिहासिक नाटक मानलं जातं.

१८८५ ते १९२० दरम्यान सामाजिक नाटकांची लाट आली. नाट्याचार्य देवलांचे ‘दुर्गा’ (१८८६), ‘मृच्छकटीक’ (१८८९), ‘झुंझारराव’ (१८९०) ही त्यांपैकी काही सुपरिचित नावे! ‘संगीत शारदा’ने एक सामाजिक आणि पुरोगामी क्रांती घडवली. अण्णासाहेबांचा वारसा देवलांनी पुढे नेला.

थरारक आणि काल्पनिक वर्णनांनी नटलेली नाटके श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी लोकप्रिय केली. त्यांच्या नाटकांची कथानके विलक्षण जिवंत आणि सर्जक असायची. विनोद, टिंगल टवाळी आणि त्याला कारुण्याची झालर, अशी हमखास लोकप्रिय ठरणारी युक्ती त्यांनीच प्रथम आणली. मालकंस रागात रचना करून संगीत नाटकांमध्ये नवीन प्रवाह आणले. फारसी आणि उर्दू रचनांचा प्रभाव असलेले काव्य त्यांनीच सर्वप्रथम मराठी रंगभूमीवर आणले. ‘प्रेमशोधन’, ‘सहचारिणी’सारखी त्यांची नाटके तात्काळ प्रेक्षकांनी उचलून धरली.

त्याच वेळी समकालीन नाटककारांपैकी कृ. प्र. खाडिलकर (१८९७ - ‘कांचनगढची मोहना’) यांनी ‘प्रतापराव’ हे पात्र उघडपणे स्वातंत्र्याचा उद्घोष करतांना दाखवले. आणखी एक समकालीन नाव म्हणजे रा. ग. गडकरी (ते स्वतःला कोल्हटकरांचे शिष्य मानत.)

किर्लोस्कर नाट्यमंडळी, गडकरी मास्तर आणि बालगंधर्व या तिघांचे त्या वेळी अलौकिक मिश्रण झाले अन् रंगभूमीला शुभशकून झाला. भाषाशैली आणि अफाट कल्पनाविश्वाच्या बळावर गडकरी अवघ्या आठ वर्षांच्या नाट्यलेखन कारकीर्दीतही आपली अमिट छाप सोडून गेले.

‘उःशाप’, ‘संन्यस्तखङ्ग’ या नाटकांमधील, ओजस्वी भाषेने आणि बंडखोर विचारांनी स्वा. सावरकरांनी रंगदेवता प्रसन्न केली.

१९१४ ते तब्बल १९६० हा प्रदीर्घ कालखंड मामा वरेरकरांचा! ‘सत्तेचे गुलाम’, ‘भूमीकन्या सीता’ यांसारख्या रचनांमधून त्यांनी सामाजिक जाणीवा धगधगत्या ठेवल्या. स्त्री-पुरुष संबंध, स्त्रीशक्तीचे भान त्यांनी उघडपणे विशद केले.

१९२५नंतर रेडिओ आणि चित्रपटांमुळे काही काळ रंगभूमी झाकोळली गेली, पण त्याचा एक अनपेक्षित लाभही झाला. यानिमित्ताने जागतिक रंगभूमीचा परिचय झाला. काळे, वर्तक यासारख्यांनी एकत्र येऊन नाट्यमन्वंतरची स्थापना केली. १९३९ साली वर्तकांचे ‘आंधळ्यांची शाळा’ रंगभूमीवरील पहिल्या-वहिल्या स्त्रीपात्राला घेऊन अवतरले. नैसर्गिक सेट्स, अभिनय, पार्श्वसंगीत, प्रकाशयोजना या संकल्पनांना त्यानिमित्ताने सुरुवात झाली.

पुढे अत्रे, आळतेकरांनी आणि बेडेकरांनी रंगमंचाला पुढील इयत्तेत नेले. १९३३-४३ हे ‘अत्रे युग होते. ‘साष्टांग नमस्कार’च्या निमित्ताने व्यक्तीचित्रणातील काटेकोर छटा, प्रभावी संवाद, भक्कम पार्श्वभूमी या डोलाऱ्यांवर उभारलेल्या विनोदी कथानकाला त्यांनी आदराचे आणि सन्मानाचे गोंदण मिळवून दिले.

‘नाट्यनिकेतन’तर्फे रांगणेकरांनी त्या वेळी ‘कुलवधू’ आणले. प्रेक्षकांच्या बदलत्या अभिरुचीला प्रतिसाद म्हणून त्यांनी नाटकांमध्ये गाणी आणली. स्वातंत्र्योत्तर काळात ‘वैजयंती’, ‘कांतेय’, ‘वीज म्हणाली धरतीला’ यांसारख्या नाटकांमुळे कुसुमाग्रज प्रकाशात आले. खाडिलकरांचा प्रभाव त्यांच्या नाट्यशैलीवर जाणवेल इतपत मोठा असला, तरी त्यांच्या सर्वच नाट्यकृतींवर त्यांच्यातील कवी हावी झाला असल्याचे स्पष्ट जाणवते. मराठी रंगमंचाला जुन्या-नव्या स्तरावरील बेमालूम बांधणीत कुसुमाग्रज यशस्वी झाले. ‘नटसम्राट’ आणि त्यातील स्वगते अजरामर झाली.

संस्कृतींमधील मिश्रण पात्रांमध्ये उतरवणारे आणि भाषेचा लहेजा काकाजींच्या रूपाने पुलंनी १९५७मध्ये ‘तुझे आहे तुझपाशी’मध्ये सादर केला. पूर्ण मराठी असे त्यांचे हे पहिलेच नाटक. ‘ती फुलराणी’, ‘अंमलदार’, ‘तीन पैशांचा तमाशा’, ‘सुंदर मी होणार’ यांसारख्या मातब्बर रचनांमधून पुलंमधील हातखंडा खेळिया पात्रा-पात्रांच्या मुखातून भाष्य करणारा बनला.

बबन प्रभुंच्या फार्सने रंगभूमीवर अक्षरशः धुमाकूळ घातला. हालचाली, कायिक/वाचिक अभिनयांच्या पार्श्वभूमीवर रंगभूमी सैलावली. कौटुंबिक नाटकांमुळे बाळ कोल्हटकर, मधुसूदन कालेलकर यांनी स्वतःचा सुभा निर्माण करून तो बराच काळ राखला. ‘दुर्वांची जुडी’ला' कल्पनातीत यश मिळालं.

गो.नि. दांडेकर, व्यंकटेश माडगूळकर, श्री.ना. पेंडसे यांनी स्वतःच्या कादंबऱ्या नाट्यरूपात परिवर्तित केल्या. (‘पवनाकाठचा धोंडी’, ‘गारंबीचा बापू’ इत्यादी)

विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर, जयवंत दळवी, रत्नाकर मतकरी, चि. त्र्यं. खानोलकर यांनी रंगभूमीला झळाळत वैभव प्राप्त करून देत असंख्य आयाम दिले. दिवाणखान्यातून नाटकाला बाहेर काढले आणि काही काळ सुन्न करणारे, अननुभूत असे काहीतरी दाखवले. ‘एक शून्य बाजीराव’ (खानोलकर - १९६६), ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ (तेंडुलकर- १९६७) यांनी अनेक वादळे निर्माण करून परंपरागत नाट्यसंकल्पनांना उधळून लावले.

‘नपुंसक’ शब्दाऐवजी ‘पावणे आठ’सारखा धारिष्ट्यवान आणि चपखल शब्दप्रयोग ‘सखाराम बाइंडर’मध्ये तेंडुलकरांनी केला. स्त्री जोपर्यंत लज्जा, संकोच अन् त्यागाची सहनशील वस्त्रे उतरवून ठेवत नाही, तोवर तिचं भोगणं, तिचं दुःख हे दुर्लक्षित किंवा गृहीत धरलं जातं, हे जहाल सत्य ‘बाइंडर’मधील दोन ध्रुवावरच्या पण दोन सच्च्या स्त्रियांच्या रूपाने तेंडुलकरांनी अधोरेखित केलं, तेव्हा नाट्यगृहातील प्रेक्षक स्तब्ध झाला. ‘शांतता’मधील ‘बेणारे’ बाईंच्या स्वगताने एक विलक्षण उंची गाठली.

मधुकर तोरडमल (लेखक/ दिग्दर्शक / कथाकार),  पुरुषोत्तम दारव्हेकर (ले. / दि.), सुरेश खरे (ले. / दि.), शन्ना नवरे यांचा भर वास्तववादी चित्रणावर जास्त होता.

व्यावसायिकता आणि यशाचा अनोखा मिलाप असणारी बहुप्रसवा लेखणी कानेटकरांची! तब्बल ३९ नाटके त्यांनी लिहिली. त्यांच्या नाटकांच्या कथानकांमध्ये आणि त्यात मांडलेल्या विषयांमध्ये एक विस्तृत पट होता. लेखनावरची हुकुमत, सुविचारांसारखी वाक्यरचना ही कानेटकरांच्या यशाची गमके!

खांडेकर आणि गोकाक यांच्याकडून त्यांना सौंदर्यदृष्टी मिळाली. मनोवैज्ञानिक नाटक म्हणून त्यांची पहिलीच कलाकृती ‘वेड्याचं घर उन्हांत’ खूप गाजली. मर्यादित पातळीवर मोजका नाट्यतणाव निर्माण करण्यांत ते रमले. ‘प्रेमा तुझा रंग कसा’ आणि ‘लेकुरे उदंड झाली’मध्ये त्यांनी विनोद आणला. कलेच्या यशस्वितेसाठी समीक्षकांच्या काटेकोर तराजूमधील मोजमाप महत्त्वाचे की, मायबाप प्रेक्षकांची पाठीवर पडणारी थाप महत्त्वाची, हा मूळ मुद्दा कानेटकरांनी ऐरणीवर आणला.

एका भाषणात ते म्हणाले, “I am averse to under emphasis on novelty or catchy technical acropatics or psycho-analytical treatment to impress my audience. I would rather have my audience reaching to the substance. Experiments for the sake of it is the last thing that should happen to the field of art. Drama essentially is and should remain an expression of powerful artistics experience.”

स्वतःच्या मातीत रुजलेले, अंतरीच्या अभिव्यक्तींशी प्रामाणिक असलेले आणि मानव्याचा निरंतर शोध घेणारे नाटक तेंडुलकरांनी लिहिले. अंधभक्तीतून इतर संस्कृतींमधून आयात केलेले प्रयोग प्रेश्रकांना पचनी पडणार नाहीत आणि त्यामुळे प्रेक्षक नाट्यकृतीपासून दूर जाईल, हे त्यांनी जाणले.

सूक्ष्म आणि सूचक लैंगिकतेकडे अंगुलीनिर्देश करणारे दळवी अप्रतिम रचना करून गेले. ‘पुरुष’, ‘संध्याछाया’, ‘सूर्यास्त’, ‘बॅरिस्टर’, ‘महासागर’, ‘सभ्य गृहस्थहो’ इतक्या भिन्न विषयांवर लेखन केलेले दळवी एका मुलाखतीत म्हणाले होते- “एक निःशब्द नाटक माझ्या डोक्यात आहे, पण ते रंगमंचावर आणण्याचे धाडस कोणी करणार नाही.” हा प्रयोग राहूनच गेला अन् देहबोलीतून व्यक्त होऊ शकणारा एक सुजाण नाट्यानुभव हातातून निसटला. काही वर्षांनी कमल हसनने ‘पुष्पक’च्या रूपाने एक असा चित्रपट तयार केला.

‘सखाराम बाइंडर’, ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकांवर बंदी घालण्यात आली. त्याचे एक कारण म्हणजे त्यांच्या रूपाने सत्याचे असह्य झालेले नागडे दर्शन!

मच्छिंद्र कांबळी यांच्या ‘वस्त्रहरण’च्या रूपाने मालवणी, महेश एलकुंचवारांच्या लेखनातून आलेली वैदर्भीय अशी कितीतरी देखणी आणि तितकीच प्रभावी रूपे मराठी भाषेची प्रत्ययाला येतात. ‘तो मी नव्हेच’ने सीमेवरील भाषेचा गोड लहेजा पेश केला.

‘एकच प्याला’मधील प्रत्येक प्रमुख पात्राच्या तोंडी असलेली तीन-चार पानी स्वगते हा मराठी भाषेचा फुलोरा आहे. ‘दुर्गा’सारख्या नाटकात विवाह/लग्नासारख्या शब्दाला त्या काळात प्रचलित असलेला ‘पाट लावणे’ हा शब्दप्रयोग देवलांनी सहज वापरलाय.

अतुल पेठे, श्याम मनोहर, शफाअत खान, राजीव नाईक, प्रशांत दळवी, वामन केंद्रे, चंद्रकांत कुलकर्णी, अभिराम भडकमकर ही त्यामानाने अलीकडची बिनीची नावे! आजच्या सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या प्रगल्भ जीवनाची गणिते यांना समजली आहेत. तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे जग एकीकडे अस्थिर होत असतानाच नात्यांमधील बंध दुबळे होत असल्याचेही जाणवते. सामाजिक ओळख पुसण्यास जागतिकीकरणाने हातभार लावला आहे.

आजच्या काळाचे तत्त्वज्ञान म्हणता येईल अशी एकही सांस्कृतिक ओळख पटकन सांगता न येण्यासारखी आपली अवस्था झाली आहे. विचारधारांची भीती वाटावी, असे असहिष्णूतेचे वारे सर्वदूर वाहताहेत. अभिव्यक्ती विसरावी की काय, अशी परिस्थिती आसपास आहे.

पूर्वी वादविवाद एकमार्गी असत (कॅपिटॅलिझम्, सोशॅलिझम किंवा कलोनिएल, स्वातंत्र्यलढा) आता मात्र अनेक विध चौकटी निर्माण झाल्या आहेत. खरं तर या घटनांकडे रंगभूमीवर मन्वंतर घडवून आणण्याची संधी म्हणून बघायला हवं. त्याच वेळी जिवंत अभिनय हा रंगभूमीचा आत्मा धुसूर व्हायला नको. मात्र सध्या सर्वदूर आभासी प्रतिमा पसरल्या आहेत. खऱ्या जीवनाचा वास्तवदर्शी अनुभव देण्याची ताकद असलेली रंगभूमी आता नव्या लेखणीच्या शोधात आहे.

सहज विचार मनात येतो काय असेल गारूड या मराठी मायबोलीत? सतत ती लेखकांच्या लेखण्यांना चिरंतन आव्हान देतेय. धीट आणि ज्वलंत विषयांना हात घालण्यापासून तिला कोणी अडवू शकलं नाहीए. ज्ञानरायांच्या ‘अमृताते पैजा जिंकी’ या ओळींना सत्य ठरवत या भाषेने लेखकांच्या, कलावंतांच्या, दिग्दर्शकांच्या कित्येक पिढ्यांना खुणावलंय. समाजाला सतावणाऱ्या नैमित्तिक विषयांना वाचा फोडलीय. राजकारण, पौराणिक, सांस्कृतिक असे काळाचे प्रवाह या भाषेतून सतत वाहताहेत.

इतर भाषांमधून आलेले ‘ती फुलराणी’सारखे नाट्यानुभव अस्सल देशी स्वरूपात पेश केलेले आहेत. भक्ती बर्वेचं ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या अजरामर सादरीकरणातील ‘तुझ ग, तुझ भ, तुझ म’ असं बाराखडीवर सात्त्विक रागावणं या भाषेनं आपल्या मातीतून लखलखीतपणे अधोरेखित केलंय.

पुत्रविहिनतेचे दुःख मोठे की, चांगले पालक बनण्यासाठी पैसा आवश्यक हे एका डोळ्यांत हसू, तर दुसऱ्या डोळ्यात आसू पद्धतीने ‘लेकुरे’ने व्यक्त केलंय. भावनांना हास्यास्पद न बनवताही एक संवेदनशील विषय ‘लेकुरे’ने समर्थपणे मांडलाय. ही मराठीची छटा विलोभनीय आहे.

दिव्यांगांच्या प्रेम प्रवासातील अडचणी ‘ऑल दि बेस्ट’ने खुसखुशीतपणे समोर आणल्या आहेत. ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’मध्ये मराठी भाषा ज्वलंत / रसरशीत निखाऱ्याप्रमाणे व्यक्त होते. गांधीहत्या, गांधीजींचा फाळणी निर्णय आणि त्याचे भारतीय जीवनपटलावर झालेले मानसिक, भावनिक आघात या नाटकाने तंतोतंत शब्दबद्ध केले आहेत.

१९५५च्या सुमारास रंगभूमीवर आलेला कोर्टरूम ड्रामा ‘तो मी नव्हेच’ अत्र्यांच्या लेखणीने मांडला, तेंडुलकरही ‘शांतता’मध्ये त्या फॉर्मने व्यक्त झाले. शास्त्रीय संगीतातील दोन घराण्यांमध्ये असलेलं गान-युद्ध ‘कट्यार’ने सिद्ध केलं आणि संगीत रंगभूमी अजरामर झाली.

सुधा करमरकर, अरविंद आणि सुलभा देशपांडेंनी बालरंगभूमी साकार केली. विवाहसंस्थेलाच नव्हे, तर तिच्याशी संबंधित भंपक नैतिक परिमाणांना ‘सखाराम’ने इतकं भयानक आव्हान दिलं की, ते नाटक शेवटी बंद ठेवण्यात आलं. समकालीन समाजातील उणीवांवर अचूक बोट ठेवणारे नाडीतज्ज्ञ तेंडुलकर ‘कमला’मध्ये मानवी तस्करी सारख्या परिघावरील विषयाला वाचा फोडतात. स्त्रियांचे सार्वकालिक शोषण, समाजाच्या पुरुषी मानसिकतेला धक्का देत अंगावर आणतात.

डॉ. लागूंपासून आजच्या मोहन जोशींपर्यंत सर्वांचा कस बघणारी कलाकृती म्हणजे ‘नटसम्राट’! त्यातली ‘मराठी’ भाषा ही फक्त अनुभवण्याची चीज आहे. ‘हे स्वर्गस्थ शक्तींनो’पासून ‘असं नाटक असतं राजा’ हा शेवटचा टप्पा व्हाया ‘कुणी घर देता का घर?’ अशा दारुण मार्गाने तात्यासाहेब आपल्याला मराठी भाषेच्या ताकदीने अचंबित करायला लावतात.

नाटकातला संवाद हा कवितेच्या ओळींसारखा असावा लागतो. कवितेतल्या ओळीतले शब्द जसे बदलता येत नाहीत तसे चांगल्या संवादातले यावर ठाम विश्वास असणारे पुलं नाट्यलेखनात काटेकोर असायचे. त्यांनी एका भाषणात इब्सेनचं वाक्य उदधृत केलं होतं- ‘माझ्या संवादातला एक शब्द जरी तुम्ही इकडचा तिकडे केलात, तर माझ्या वाक्यांना रक्त फुटेल.”

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

................................................................................................................................................................

हिंदी, कानडी, गुजराथी या भाषांमध्ये मराठी नाटक अनुवादित झालं, ते मराठीच्या अंगीभूत शक्तीने. २७ फेब्रुवारीला ‘मराठी भाषा दिन’ साजरा करून हे ऋण फेडता येण्यासारखं नाही.

अचंबित करणाऱ्या या नाट्यप्रवासाला क्षणोक्षणी ऊर्जा बहाल करणारे लेखक-कलावंत हेच मराठी भाषेचे आधारस्तंभ आहेत. तीन घंटांचे नाद आजही प्रेक्षकांना नाट्यगृहाकडे खेचताहेत, कारण नाटक हे मराठी माणसाचं आणखी एक रक्त आहे.

या भाषणासाठी विविध संहितांबरोबरच मकरंद साठेंचं ‘Marathi Theatre A staying of History’, शांता गोखलेंच ‘प्ले राईट अॅट व सेंटर - मराठी ड्रामा’ ही पुस्तके मला खूप मदत करून गेली.

एवढा मोठा परिघ माझ्या कुवतीनुसार आपणासमोर मांडतांना अनवधनाने काही अभिजात प्रयत्न माझ्याकडून नोंदवले गेले नसतीलही, पण त्याबद्दल क्षमस्व! ‘पूर्व दिव्य ज्यांचे, त्यांना रम्य भावी काल’ या उक्तीवर विश्वास ठेवून, या छोट्याशा खिडकीतून दाखवलेला आकाशाचा अथांग तुकडा ‘मायबाप’ श्रोते गोड मानून घेतील, यावर विश्वास ठेवूनच मी आज इथवर आलो. धन्यवाद!

(२०१९मध्ये रायपूर येथील महाराष्ट्र मंडळात केलेल्या भाषणाचा संपादित अंश)

.................................................................................................................................................................

लेखक डॉ. नितीन देशपांडे शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक आहेत! त्यांची आजवर चौदा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

deshpandenh@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......