साहेब, दिवसेंदिवस वाढत चाललेलं धार्मिक उन्मादाचं वातावरण बदलता येतं का, ते पहा...
कला-संस्कृती - नाटकबिटक
महेंद्र तेरेदेसाई
  • १००व्या अ. भा. मराठी नाट्य संमेलनात मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत झाली. त्याचे एक छायाचित्र
  • Tue , 16 January 2024
  • कला-संस्कृती नाटकबिटक १००वे नाट्य संमेलन 100th Natya Sammelan राज ठाकरे Raj Thackeray

५,६,७ जानेवारी २०२४ दरम्यान पिंपरी-चिंचवड येथे १००वे अ. भा. मराठी नाट्य संमेलन ज्येष्ठ नाट्य-सिने- दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. राजकारण्यांनी झाकोळले गेले असले तरी, या संमेलनाचे महत्त्व नाकारता येणार नाही. या नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने हा लेख...

.................................................................................................................................................................

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकत्याच पार पडलेल्या १००व्या अ.भा. मराठी नाट्यसंमेलनात मराठी कलावंतांना सल्ला दिला - ‘‘जाहीरपणे एकमेकांना आदराने वागवा.  सर, जी, साहेब म्हणून संबोधा. हे शिव्या... ‘बंड्या’, ‘नाना’ असं एकमेकांना हाका नका मारू... नाक्यावर उभे राहू नका.  अशानेच तुमचं सुपरस्टारपद तुमच्यापासून दूर जातं.”

इतकं सोप्प असतं सुपरस्टारपद मिळवणं?

लांब नको, आजच्या मराठी नाटकातल्या सुपरस्टारला, प्रशांत दामलेंना विचारा, त्यांना ते पद कसं मिळालं? वर्षांनुवर्षांची मेहनत, सातत्य, ध्येयनिष्ठा, आपल्यातल्या शक्ती व उणिवा ओळखणं, त्याचा योग्य वापर करणं, व्यवहारी राहून सगळ्यांशी अत्यंत आपुलकीनं वागणं, नियमित रोजनिशी लिहून आपले दिवस व वेळेचा उत्पादनशील वापर करणं... बरं, हे सगळं करूनही तुम्हाला ते सुपरस्टारपद मिळेलच, याची शास्वती नाही. तरीही ते करत राहणं. दामलेंना ‘जी जी’ अन् ‘सरजी’ करून ते पद नाही मिळालेलं.

बरं शिव्या... बंड्या.. सुब्या या आपुलकीत आदर नसतो, हे तुम्हाला कोणी सांगितलं?

तेव्हा साहेब सुपरस्टारपदाचं राहूद्या, त्याचा बराचसा भाग नंतर अंधभक्तीतूनच कायम राहतो.  प्रदीपकुमार, राजेंद्रकुमार, मनोजकुमार, अगदी राजेश खन्नासारखे स्टार त्यातूनच निर्माण झालेत. या सुपरस्टार्सनी एकदा ते पद मिळवलं की, त्यांनी काही केलं, तरी त्यांच्या फॅन्सना ते चालतं. अगदी तेच तेच केलं, तरी ते पुन्हा पुन्हा त्याला डोक्यावर घेतात. पण पुढे आपली ‘इमेज’ राखणं, याकडेच त्या स्टारचं जास्त लक्ष राहतं. आपला फॅन रुसणार नाही ना, याची त्यांना सतत काळजी आणि भीती वाटत राहते. मग त्यांच्यातली कलाही ते दाबून ठेवतात, पण बलराज सहानी, मोतीलालपासून नसीरुद्दीन, ओम पुरी, पंकज कपूर ते आजच्या इरफान, के.के. मेनन, पंकज त्रिपाठी, विकी कौशल सारख्यांना मिळालेलं स्थान हे सतत त्यांच्या कामाची मीमांसा करून मिळत आलेलं आहे आणि तसंच ते कायम मिळतं. (ज्याला आपण अभिनयसम्राट समजतो, त्या दिलीपकुमारलाही मोतीलालचं किती वावडं होतं, याच्या कहाण्या सर्वश्रुत आहेत.)  

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

साहेब, कसं वागावं याचा सल्ला एका कलावंताने असाच एकदा तुम्हाला दिला होता, तेव्हा तुम्ही भर सभेत त्याची खिल्ली उडवत, नक्कल करत तो धुडकावला होतात. आठवतंय? 

तुमच्या त्याच भाषेत सांगायचं, तर कशाला कलावंतांना सल्ले देताय? तुमच्या बिरादरीत आज काय चाललं आहे, ते बघा. भर सभेत कोल्ह्या-लांडग्यांसारखे एकमेकांच्या अब्रूचे जाहीरपणे लचके तोडले जाताहेत. विरोधकाला शत्रू मानण्यापर्यंत त्यांची मजल केव्हाच गेली आहे. आणि अनेकदा हे सगळं, ज्यांनी तुम्हाला त्यांचे नेते मानलं, त्यांच्या समोर चालतं. आम्ही जनता पण मूर्ख. आम्ही आमच्या नेत्याचे विचार ऐकायला आलोत की, मिमिक्री बघायला, हे न कळून टाळ्या वाजवत राहतो. इथेही कलावंतांच्या मेळाव्यात तुमच्या या अनाहूत सल्ल्याला टाळ्या पडलेल्या ऐकल्या.

तेव्हा कलावंतांना काही द्यायचंच असेल, तर त्यांना त्यांची कला सादर करायचं स्वातंत्र्य मिळेल असं बघा. त्यांनी सादर केलेल्या कलेत तुमच्या ठिसूळ झालेल्या भावना व अस्मिता शोधू नका. त्याचं ‘राजकारण’ करू नका, त्यांना जे वाटतं ते त्यांना त्यांच्या कलेत मांडू द्या. बेगडी संस्कृतीच्या बुरख्याआड त्यांच्यावर बंदी आणू नका.

‘संस्कृती’ म्हणजे नेमकं काय, हे ज्यांना माहीत नसतं, ते मग उगाचच पेटून उठतात. आपल्या संस्कृतीत विरोधी मतालाही स्थान आहे, हे त्यांना माहीत नसतं. मग ते उठतात. लाठ्याकाठ्या आणि दगड हातात घेतात. त्यांच्या हातात दगड देऊ नका. कलाकृतीचा न्यायनिवाडा रसिक प्रेक्षकांना करू द्या.

तुमच्या बिरादरीच्या नादी लागून पूर्वी ‘लव स्टोरी’ करणारे दिग्दर्शक आज ‘हेट स्टोरीज’ करू लागले आहेत. अर्थात सुरुवातीला त्यांना भुललेला रसिक प्रेक्षक नंतर बॉक्स ऑफिसवर त्यांना त्यांची जागा दाखवतोच. मग ‘काश्मीर फाइल्स’ व ‘केरला स्टोरी’ यांसारख्या प्रोपगंडा चित्रपटांना मिळालेलं यश नंतर तशाच चित्रपटांना नाही मिळत.

ज्या दक्षिण सिनेसृष्टीची तुम्ही तारीफ केलीत, त्यांचा ‘अन्नपूर्णि’ हा चित्रपट नुकताच केवळ शाकाहारी-मांसाहारी या राजकीय वादामुळे ओटीटीवरून काढला गेला. त्याचं काय करायचं, याचा विचार करा. यातूनच राम शाकाहारी की मांसाहारी, असले निरर्थक वाद उकरून काढले जात आहेत. जात-पात आणि धर्माबरोबर आता शाकाहारी आणि मांसाहारी ही आणखी एक दुफळी निर्माण झाली आहे. ती कोणी केली, हे आम्हा मूर्ख जनतेला कळत नाही असं नाही, पण आमच्या निष्ठा (?) आम्हाला गप्प बसायला भाग पाडतात.

आज राजकीय नेत्यांमुळे देशाचं वातावरण विषारी झालंय. कुठलाही कलावंत सत्तेविरोधात काही बोलू शकत नाही, मग कला सादर करणं तर दूरच राहिलं. त्याने तसं करायचं ठरवलं, तर त्याच्याच जवळच्याकडून त्याला घाबरवलं जातं. तरीही त्याने केलंच, तर त्याला ‘शूर’ किंवा ‘मूर्ख’ असं या वा त्या टोकाचं ठरवलं जातं. सोशल मीडियावर ‘ट्रोल’ केलं जातं. त्याच्यावर राजकीय यंत्रणांचा दबाव आणला जातो.

आपण एखाद्याला ‘सदीचा महानायक’ करून टाकतो, पण पूर्वी पेट्रोल पन्नास पैशाने महाग झाल्यावर उपरोधाने त्याच पेट्रोलने स्वत:ची पॉश गाडी जाळायला निघालेला तो महानायक, आज पेट्रोल दुप्पटीने वाढल्यावरही ‘बिच्चारा’ होत गप्प राहतो.

ही आम्हा कलावंतांची दशा आजच्या राजकीय नेत्यांनी करून ठेवली आहे.

‘हे आजच नाही, तर घाशीराम आणि सखारामपासून होतं आहे’ असले युक्तिवाद करू नका. यात आपण केलेल्या चुकांची पुनरुक्ती करतो आहोत, हे लक्षात घ्या. आम्ही जनता याला ‘मूर्खपणा’ समजतो, तुमचा तो ‘कावेबाजपणा’ असू शकतो. सुपरस्टार जसे आपले फॉर्म्युले परत परत वापरतात, तसेच तुम्हीही हे पूर्वी यशस्वी झालेले फॉर्म्युले पुन्हा पुन्हा वापरत असता.

असलेच भंपक युक्तिवाद आजचे तथाकथित अर्थशास्त्रज्ञ करताना दिसत आहेत. म्हणे मंदिर बांधण्याने अर्थव्यवस्थेला मदत होते. अहो, हे मध्ययुगीन उपाय झाले. तेव्हाचे राजे-महाराजे प्रजेला रोजगार मिळावा म्हणून, आपल्या हातून धार्मिक कार्य घडत आहे, याचा मुलामा देत, मंदिरं उभारत. पण त्यातही मंदिरातलं कोरीव काम करण्यासाठी, त्यात माहीर असलेल्या, इतर धर्मियांना पाचारण करण्याइतके ‘धर्मनिरपेक्ष’ असत.

आज हे सगळं बदललेलं आहे. आजच्या युगात अर्थव्यवस्था वाढवायला अनेक प्रकल्प उभे करता येतात. मोठमोठी धरणं व उद्योग उभारून त्यांनाच ‘आजच्या युगा’ची मंदिरं म्हणणाऱ्या पूर्वीच्या नेत्यांची आज खिल्ली उडवली जाते आहे. जनतेच्या हे लक्षात येत नाही की, आज मंदिरं, मशिदी वा गिरिजाघरं बांधून अर्थव्यवस्थेला मदत तर होतच नाही, उलट त्याने धार्मिक उन्माद वाढवला जातो आहे. आता तर ‘राजकीय हिंदू’ आणि ‘धार्मिक हिंदू’ असेही तट पाहायला मिळत आहेत.    

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

................................................................................................................................................................

तेव्हा कलावंतांना सल्ले देण्यापेक्षा हे वातावरण बदलता येतं का ते पहा. ‘टाळीबाज वाक्यं लेखक कलावंतांसाठी सोडा’ असं कोणी नाही म्हणणार. गर्दी जमवायला तुम्हीही त्याचा वापर करा. पण एकदा गर्दी जमली की, सभ्यपणे, विरोधकांचा मान राखून तुमची मतं, तुमचे विचार तुमचा विरोध मांडा. तुमच्यातला सभ्यपणा तुमच्या अनुयायांत झिरपेल असं बघा. त्यांना उन्मादी होण्यापासून रोखा.

खळ्ळखट्याकने प्रश्न सुटतीलही, पण ते तात्पुरते. साठ वर्षं एक संघटना मराठी माणसाला पेटवत होती, तिचं आज काय झालं ते पहा. तोच मराठी माणूस आज कोणाच्या वळचणीला जाऊन परप्रांतीयांची तळी उचलण्यात धन्यता मानतो आहे, ते पहा. तेव्हा राजकीय नेत्यांनी संस्कृती, सभ्यता आणि शक्ती नेमकी कशात आहे, ते ओळखावं. आपल्या अनुयायांना त्याची ओळख करून द्यावी.  

पेटवणं फार सोप्प असतं, ते संसर्गजन्यही असतं, पण एखाद्याला शांत करणं कठीण. गेल्या शतकात एका महात्म्याने ते करून दाखवलं होतं. अर्थात हुकूमशाहीच्या पुजाऱ्यांनी तेव्हाही त्याची खिल्ली उडवली होती. नंतर त्याला संपवण्यापर्यंत त्यांची मजल गेली. आणि आज तर त्याचा अपमान करायची एकही संधी ते सोडत नाहीयेत, पण जगात मात्र त्याच्याच पुतळ्यासमोर त्यांना नतमस्तक व्हावं लागतंय...

.................................................................................................................................................................

लेखक महेंद्र तेरेदेसाई चित्रपट व नाट्यदिग्दर्शक आणि लेखक आहेत.

mahendrateredesai@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......