‘मुल्क’ : कोणत्याही धर्माची बाजू न घेणारा देशाचा नैतिक आवाज
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
विजय तांबे
  • ‘मुल्क’चं एक पोस्टर
  • Mon , 11 February 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie मुल्क Mulk अनुभव सिन्हा Anubhav Sinha तापसी पन्नू Taapsee Pannu ऋषी कपूर Rishi Kapoor

नुकताच ‘मुल्क’ हा सिनेमा पाहिला. त्यावरील परीक्षणं वाचली होती. गोष्ट माहीत होती. म्हणजे सिनेमा बघण्यापूर्वी काय बघणार याची पूर्वकल्पना होती. तरीही या सिनेमानं मला अस्वस्थ केलं. माझंच मला हसायला आलं. एवढं सगळं माहीत असूनही असं का होतंय म्हणून शोधायला सुरुवात केली आणि हळूहळू दिसू लागलं.

हिंदी सिनेमा सहसा वादविवाद, निर्णायक मतापर्यंतची चर्चा न करता योगायोग, कर्मधर्मसंयोग वगैरे घडवून निर्णयावर येण्याआधीच प्रश्न सोडवून मोकळे होतात. या सिनेमात असं काहीच घडत नाही. घटना घडत जातात. दहशतवादी सापडला. त्याचं एनकाउंटर. घराची झडती. केसमधील लूपहोल्स शोधणं. बापाला ताब्यात घेणं. अख्खं घर दहशतवादी ठरवणं. सगळं पोलिसी पद्धतीतील रुटीन भाग म्हणून होत असतं.

मी बघताना घाबरत राहतो. अरे, असं नका करू. किती छळणार? जरा रिलीफ द्या आम्हाला. तो बिचारा साधा बाप. कशाला धरताय त्याला? काहीतरी घडवा सिनेमात म्हणजे तो सुटेल. दिग्दर्शक अनुभव सिन्हा म्हणतो- ‘नाही घडवणार’. अरे, शेवटी मेला तो हृदयविकाराच्या झटक्यानं. कसं वाटलं असेल मरताना त्याला? किती क्रूरपणे वागतोय दिग्दर्शक आपल्या पात्रांशी. असं नका वागू. अनुभव सिन्हा म्हणतो- ‘मी असाच वागणार’.

तिकडं प्रसिद्ध वकील असलेल्या मोठ्या भावालाही आरोपी करून टाकलंय. किमान इथं तरी योगायोगाची एन्ट्री होईल म्हणून वाट बघतो. अख्खं घर वावटळीत सापडलंय. सगळं उदध्वस्त होताना दिसतंय. आता गोष्ट घराची राहत नाही. वावटळ समाजात फिरताना दिसते. प्रश्न समाजाचे होतात. वकील असलेली सून प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला आसरा वाटू लागते. पण तीसुद्धा कोणतीच जादू करत नाही. आपली अस्वस्थता वाढत जाते.

या सिनेमात नाट्यपूर्ण संवाद नाहीत. आपल्या आसपास जसे लोक बोलतात, तसंच दाखवलं आहे. लंबेचवडे ज्ञानामृत पाजणारे संवाद नाहीत. कदाचित सरकारी वकिलाचं बोलणं लाउड वाटू शकतं, पण किमान मराठी माणसाला त्यात नावीन्य वाटण्याची गरज नाही. कोर्टातले न्यायाधीशही नाट्यपूर्ण नाहीत. त्यामुळे नाट्यपूर्ण संवादातून काही तोडगा निघेल, हीसुद्धा आशा मावळते.

आता चित्र स्पष्ट होतंय की, संपूर्ण कुटुंबाला दहशतवादी ठरवण्याची सरकारी वकिलांची योजना फक्त त्याच्यापुरती न राहता, तो एका विचारसरणीचा अजेंडा स्पष्ट दिसू लागतो. सिनेमा बघताना मॉब लींचिंगचा व्हायरल झालेला व्हिडिओ आठवतो. अखलाख आठवतो. अजून खूप काही आठवत असताना वकील सूनबाई कोर्टात विचारते- ‘टेररिझम म्हणजे काय?’ आपण कधी हा विचार केलेला  नसतो. सगळे टेररिस्ट मुसलमान असं गृहीत धरणारे आपण तिच्या प्रश्नानं हबकून जातो. अनुभव सिन्हाला फक्त केसपुरतंच राहायचं नाहीए. अख्खा देश उभा करायचाय त्याला. सिनेमा जसजसा पुढे सरकू लागतो, तशी पात्रं निमित्तमात्र होतात आणि देशाची परिस्थिती उभी राहते. प्रत्येक पात्र कोणाचं तरी प्रतिनिधित्व करतं. देश एकाच सपाट रंगात रंगवण्याचा कट आपल्याला कळू लागतो. आणि स्क्रीनवर देशाचा नैतिक आवाज म्हणून वकील सून बोलू लागते. तिच्या प्रतिवादामधून ती आपल्याला ‘ते आणि आपण’ची  फुटीरतावादी भूमिका सोडायला लावते आणि एका विशाल मानवतावादी भूमिकेवर   आपल्याला आणून ठेवते. न्यायाधीशही अतिशय मोजक्या शब्दांत निकाल देताना संविधानाचा उल्लेख करतात. इतिहास नीट वाचण्याचा सल्ला देतात.

संपूर्ण चित्रपटात अनुभव सिन्हा कोणत्याही धर्माची बाजू घेत नाही. दररोजच्या जगण्याच्या भाषेतून धर्म, समाज, शासन व्यवस्था यातील गंभीर त्रुटी ते दाखवतात. कळत-नकळत आपण सहिष्णूता आणि मानवतेच्या विरोधी आहोत का? खरा धर्म आपल्याला कळलाय का? अनेक भाषा आणि धर्मांच्या विविधतेतून नटलेली संस्कृती आपण उदध्वस्त करायला हातभार लावतोय का? या सगळ्या संस्कृतीचा परिपाक म्हणजे संविधान आहे का? मग खरंच आपण भारतीय नागरिक म्हणजे नक्की काय आहोत? अशा अनेक मूलभूत प्रश्नांवर सिनेमा माध्यमातून गंभीरपणे विचार करायला लावणारी दुर्मिळ कलाकृती घडवण्यात अनुभव सिन्हा यशस्वी झाले  आहे. त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.

.............................................................................................................................................

लेखक विजय तांबे कथाकार आहेत.

vtambe@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Ashok Rajwade

Wed , 13 February 2019

हे वाचताना डॉ. आनंद तेलतुंबडेंंची आठवण झाली. त्यांना शासनाकडून माओवादी ठरवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याबद्दल त्यांनी म्हटलंय : माझा एक भाऊ माओवादी आहे आणि गेल्या कित्येक वर्षांत त्याचा आणि माझा संपर्क नाही. माझा माओवादाशी एवढाच संबंध.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......