‘कडिकाळ’ : ‘दलित साहित्या’च्या बहराच्या काळात हे पुस्तक आलं असतं, तर या लेखकाला डोक्यावर घेतलं गेलं असतं...
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
नितीन साळुंखे
  • ‘कडिकाळ’चे मुखपृष्ठ
  • Sat , 10 August 2024
  • ग्रंथनामा शिफारस कडिकाळ KADIKAL अनिल भालेराव Anil Bhalerao

खानदेशातल्या ग्रामीण भागातला दहावी पास झालेला एक मुलगा... मोलमजुरी करून जगणाऱ्या कुटुंबातला. दलित समाजातला... कल्याणच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या आणि बिस्कीट कंपनीत नोकरीला जाणाऱ्या त्याच्या गाववाल्याकडे आला आहे. एकटाच. कारण त्याला पुढे शिकायचं आहे. त्यासाठी महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा आहे. पण त्याच्याही आधी त्याला समाजकल्याण विभागाकडून वसतिगृहामध्ये प्रवेश मिळवायचा आहे. त्याच्यासारखेच हातावर पोट असलेले त्याचे बरेचसे नातेवाईक उल्हासनगर भागात राहतात. त्यामुळे त्याला कल्याणमध्ये अस्मिता महाविद्यालयामध्ये आणि तिथल्याच वसतिगृहात प्रवेश घ्यायचा आहे.

आत्मकथनाच्या शैलीत ही गोष्ट सुरू होते आणि वाचणारा त्यात गुंतून जातो. दीडशेपेक्षाही कमी पानांच्या ‘कडिकाळ’ या कादंबरीत लेखक अनिल भालेराव यांनी शिक्षण घेऊ पाहणाऱ्या तरुण मुलांची जी परवड होते, त्याचं हृदयस्पर्शी वर्णन केलं आहे. पण कोठेही त्रागा, आक्रस्ताळेपणा, समाजाला किंवा व्यवस्थेला दोष असं काहीही नाही. आनंद शिशुपाल या मुलाच्या माध्यमातून लेखक शांतपणे हे सगळं मांडत पुढे जात राहतो. कारण या मुलाला शिकायचं आहे. आपल्या घराला आहे या अवस्थेतून बाहेर काढायचं असेल, तर आपल्याला शिकल्याशिवाय पर्याय नाही, हे त्याला चांगलंच उमगलेलं आहे.   

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

कादंबरीच्या सुरुवातीच्याच भागात येतं, ते तिथल्या वसतिगृहाचं वर्णन. तिथली राहण्याची व्यवस्था, जेवण, जेवणाची एकूण ‘सिस्टिम’. आणि मग प्रत्यक्ष महाविद्यालयामध्ये गेल्यावर गावाकडून शहरात शिकायला गेलेल्या बहुसंख्य मुलांची जी अवस्था होते, तीच अवस्था आनंद आणि त्याचा मित्र यांची झालेली आहे. कारण तिथले प्रोफेसर इंग्रजीत शिकवताहेत आणि गावाकडे तर इंग्रजीतून शिकवणारे शिक्षक आढळणे महामुश्किल. पण अशा परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या मुलांकडे जे एक उपजत शहाणपण आणि तडजोड करण्याकडे कल असतो, त्याची झलक वसतिगृहाच्या खडूस वाढप्याबद्दल त्या दोघा मित्रांत जे बोलणं होतं, त्यातून दिसते. माणुसकी नसलेल्या त्या माणसाबद्दल हे दोन मित्र एकमेकांचं आणि त्याच वेळी स्वतःचं समाधान करताना आपसात बोलतात की, ‘असू देत. आपल्याला दिवस काढायचे आहेत. पण हे दिवसही जातील. आजपर्यंत इतकं भोगलं. त्यात आता आणखी याची भर, इतकंच.’

इंग्रजी समजत नाही, या समस्येबाबत तिथल्याच एका प्राध्यापकांना विचारल्यावर त्यांनी इंग्रजी शिकण्याचा सल्ला दिला. तो अभ्यास कसा करायचा, हेसुद्धा सांगितलं. आणि त्याचा अवलंब करायला सुरुवात केल्यानंतर मग कुठं खऱ्या अर्थानं त्यांची शिकायला सुरुवात झाली आणि बघता बघता दिवाळीच्या सुट्या जवळ आल्या. वसतिगृहावरही नोटीस लागली, सुटीच्या काळात बंद राहणार असल्याची. पंधरा दिवसांसाठी गावाकडे जायला परवडणार नाही. आणि वसतिगृह बंद असल्यानं या काळात राहायला आणि अर्थातच जेवायला मिळणार नाही. वसतिगृहामध्ये राहण्याच्या आणि जेवण्याच्या कितीही गैरसोयी असल्या तरी मुळात ती सोय, कशी का असेना, तिथं असते. तीच नाही म्हटल्यावर जायचं कुठं? मग कुठं मित्राच्या खोलीवर. कुठं एखाद्या गाववाल्याच्या खोलीवर. अर्थातच झोपडपट्टीत. या झोपडपट्टीत राहावं लागणाऱ्या लोकांचं जगणंसुद्धा आपल्यापुढे उलगडलं जातं… कसर लागलेलं एखादं भिजकं वास मारणारं जुनेर उलगडावं तसं.

वाचनाची आवड असणारा आनंद विद्यार्थ्यांवर शासनाकडून केल्या जाणाऱ्या अन्यायाच्या विरोधात ठामपणे उभा राहतो. आणि मग आपसूकच विद्यार्थी चळवळीकडे ओढला जातो. चळवळ आणि मित्रांबरोबर केल्या जाणाऱ्या तारुण्यसुलभ मस्तीमजा या सगळ्यांतही आपल्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होता कामा नये, याबद्दलचं त्याचं भान कायम राहतं. पण या चळवळी करताना त्याला तरुण वयातच सामाजिक भानसुद्धा आलेलं आहे. त्यामुळे सुट्टीला घरी गेल्यावर त्याच्या लहान बहिणीचा १४व्या वर्षी घरच्यांनी लावून दिलेला विवाह त्याला खटकला आहे. या विवाहाच्या निमित्तानं, समाजातले चांगले शिकलेले लोकही समाजाला दिशा देण्याचं काम न करता उलट आणखीच अज्ञानाच्या खाईत नेण्याचं काम करताहेत. अशिक्षित समाजबांधवांना धार्मिकदृष्ट्या कर्मठ बनवताहेत आणि यातून आपल्या स्वतःच्या कुटुंबाचा मात्र उद्धार करून घेत आहेत, हे त्याला दिसतं. त्यांच्याबद्दलची त्याची चीड उफाळून येते.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

आनंद बारावी उत्तीर्ण होतो. मुंबईतल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवतो. पण समाजकल्याणाच्या वसतिगृहात बारावीपर्यंतच्याच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. त्यामुळे राहण्या-जेवण्याचा प्रश्न पुन्हा उभा राहतो. चुलत बहिणीकडे केवळ राहण्या-जेवण्याची तात्पुरती सोय झाल्यावर आनंद पुन्हा अभ्यासाला लागतो. एक मल्याळी मित्र ‘मल्याळम संघा’त व्याख्यान द्यायला बोलावतो. ‘महाराष्ट्रातल्या दलितांवर होणारे अन्याय’ या विषयावर पाऊण तास व्याख्यान दिल्यावर तिथल्या मल्याळी मुलांशी झालेल्या चर्चेतून समोर येतं की, हीच अवस्था केरळ आणि तामिळनाडू येथेही आहे. या जातीय वर्णव्यवस्थेला कंटाळून तिथल्या लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला, असं ती मुलं सांगतात.

दुसऱ्या समाजांकडून झालेल्या पिळवणुकीबद्दल बोलतानाच आनंद नात्यातल्या एका प्राध्यापकाने आपल्या थोरल्या भावाची कशी पिळवणूक केली, तेसुद्धा सांगतो. मानसिक रुग्ण पत्नी, दोन लहान मुलं आणि म्हातारी आई असलेल्या या प्राध्यापकाला पीएच.डी. करायची होती. तुला शिकवतो, असं म्हणून आनंदाच्या थोरल्या भावाला तो स्वतःच्या घरी औरंगाबादला घेऊन गेला आणि त्याला घरातली सगळी कामं करायला लावली. स्वतःची पीएच.डी. पूर्ण झाल्यावर लगेच भांडण काढून त्याला हाकलून दिलं. या सगळ्यात भावाचं पदवीपर्यंत शिक्षण मात्र पूर्ण झालं.

दहावी पूर्ण करून कल्याणाला आल्यापासून एम.ए., बी.एड., नेट-सेट पूर्ण होईपर्यंतचा असा सगळा प्रवास या छोट्याशा पुस्तकात लेखकाने अतिशय रसाळपणे मांडला आहे. त्याच वेळी समाजातल्या घडामोडी आणि त्यावर एक तरुण मुलगा म्हणून त्याचं मत या सगळ्याचाच धावता आढावा घेतला आहे. ग्रामीण भागातलं जातवास्तव मांडत असतानाच ही कादंबरी शहरी भागात अशा विद्यार्थ्यांना उपलब्ध असणाऱ्या अनेकविध संधी आणि त्या मिळवण्यात त्यांना येणारे हरतऱ्हेचे अडथळेही मांडते.

असं वाटतं की, ‘दलित साहित्या’च्या बहराच्या काळात हे पुस्तक आलं असतं, तर या लेखकाला डोक्यावर घेतलं गेलं असतं.  

‘कडिकाळ’ - अनिल भालेराव | चेतक बुक्स, पुणे | मूल्य – ३२४ रुपये.

.................................................................................................................................................................

नितीन साळुंखे

salunkheneetin@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now       

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......