ह्या दुनियेची रीतच उफराटी आहे. खरं तर देव माणसातच लपलेला आहे, असे अध्यात्म ओरडून ओरडून सांगते आहे. तरीही माणूस दगडाच्या मूर्तीत ‘देव’ शोधायला जातो
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
श्रीनिवास जोशी
  • रॉय किणीकर आणि त्यांच्या ‘उत्तररात्र’ या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Mon , 08 April 2024
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो रॉय किणीकर Roy Kinikar उत्तररात्र Uttarratra रुबाया Rubaiya उमर खय्याम Omar Khayyam

९१)

‘संपेल कधी ही शोधायची हाव

फोडिले दगड दशलक्ष दिसेना देव

पसरतो शेवटी हात तुझ्या दारात

अश्रूत भिजावी विझताना ही ज्योत।।

प्रत्येकाने कधी ना कधी ह्या विश्वाच्या उगमाचा शोध घेतलेला असतो. देव आहे की नाही, ह्याचा विचार केलेला असतो. काही लोक जन्मभर ह्या शोधात राहतात. इतरांसारखा हा शोध हे लोक सोडून देत नाहीत. ‘त्याला’ शोधायची इच्छा काही संपत नाही. कितीही त्रास झाला, तरी हे लोक हा शोध सोडत नाहीत. त्यांना वाटत राहते -

‘संपेल कधी ही शोधायची हाव’

देव शोधण्यासाठी अनेक प्रकारची तत्त्वज्ञाने हे लोक पालथी घालतात. तरीसुद्धा ‘तो’ सापडत नाही.

‘फोडिले दगड दशलक्ष दिसेना देव’

चर्चा होतात, ध्यान केले जाते, अनेक ठिकाणे पालथी घातली जातात. तो काही भेटत नाही. एक हरलेली मनःस्थिती येते. त्यानेच आता कृपा करून सामोरे यावे. कितीही शोधले तरी तो सापडणार नाही, असे वाटू लागते. त्याच्यासमोर हात पसरण्यावाचून गत्यंतर राहात नाही.

‘पसरतो शेवटी हात तुझ्या दारात’

काय म्हणून हात पसरला जातो शेवटी?

‘अश्रूत भिजावी विझताना ही ज्योत’

ही शोधाची ज्योत शेवटी माझ्या अश्रूत विझावी. तू सामोरा आल्याने माझ्या डोळ्यात जे कृतार्थतेचे अश्रू येतील, त्यात ह्या शोधाच्या ज्योतीचा शेवट व्हावा. माझे विझणे आणि ह्या ज्योतीचे विझणे एक असावे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

९२)

‘देवळात नाही देव, देह देऊळ 

का दगड घडविशी, तुला लागले खूळ

ये पहा इथे, आहे तूला पाहायाचे

गर्भातच उमलले दगडफूल प्राणाचे।

देवळात देव नाही, देव तुझ्या देहात आहे. तुझा देह हेच त्याचे मंदिर आहे. देवाला शोधायचे असेल, तर तुझ्यातच शोध. उगाच दगड घडवायचा आणि मग त्या मूर्तीत देव पाहायचा हा काय प्रकार आहे? काखेत कळसा आणि गावाला वळसा असा प्रकार कशाला करायचा? मूर्तीवर प्रेम करून काय होणार आहे? श्रीकृष्ण ‘गीते’च्या ९व्या अध्यायात सांगतात - 

‘समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रिय:।

ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम् ।।२९।।

(मी सर्वांमध्ये राहतो. मी सर्व गोष्टींमध्ये स्थित आहे. मला कोणी प्रिय नाही, मला कोणी अप्रिय नाही. तरीही, जे सतत माझा विचार करतात, माझ्याविषयी प्रीतभाव ठेवतात, माझ्या भक्तीमध्ये राहतात; ते माझ्यामध्ये असतात आणि मी त्यांच्यामध्ये असतो.)

असे सर्व असताना दगडाच्या मूर्ती का घडवायच्या, आपण स्वतःच देऊळ असून परक्या ठिकाणी देव का शोधायचा?

९३)

‘आभाळ झिरपते भरलेल्या माठात

अन् निळा माठ बघ भरला आभाळात

आभाळ पलिकडे माठ फुटे हा इकडे

हा वेडा जमवी आभाळाचे तुकडे।।

ही रुबाई ह्या आधीच्या रुबाईशी निगडित आहे. देवाचे सगळ्यात असणे आणि सगळ्याचे देवात असणे, हा विषय आहे. घटाची उपमा माणसाला दिलेली आपण आधी पाहिली आहे. माठाच्या आत अवकाश असते आणि बाहेरही अवकाश असते. माणसाच्या आतही चैतन्य असते आणि त्याच्या आजूबाजूच्या विश्वातही चैतन्य भरून राहिलेले असते. म्हणून किणीकर म्हणतात -

‘आभाळ झिरपते भरलेल्या माठात’

श्रीकृष्णाचे निळे रूप आपण तयार केले आहे, तोसुद्धा एक निळा माठच आहे. हा निळा माठ  आभाळसुद्धा भरून राहिला आहे.

‘अन् निळा माठ बघ भरला आभाळात’

श्रीकृष्ण आभाळाच्याही पलीकडचा आहे. ह्या पृथ्वीवर आपण पाहिलेल्या त्याच्या निळ्या रूपाचा माठ फुटून जातो, पण मागे राहिलेले त्या निळ्या रूपाचे तुकडे आपण आपल्या समाधानासाठी गोळा करत राहतो. कधी निळ्या मूर्तीच्या रूपात तर कधी महाकाव्यातून आणि पुराणातून आलेल्या त्या निळ्या रूपाच्या वर्णनांच्या रूपात! ‘ज्ञानेश्वरी’मध्ये ११ अध्यायात वर्णन केलेले आहे

‘कैसें नीलोत्पले रांवित। आकाशाही रंगु लावित।

तेजाची वीज दावित। इंद्रनीळा।। ६००।।

श्रीकृष्णाच्या रूपाचे निळेपण निळ्या कमळापेक्षा सरस आहे. साक्षात आकाशाला ह्याचा निळा रंग लावावा, असे हे घननीळ रूप आहे. इंद्रनील मण्याला अजून जास्त तेजस्वी करणारे असे हे निळे रूप आहे. पुराणात श्रीकृष्णाचे वर्णन ‘निलोत्पल-दल’ असे केले गेले आहे. ‘निलोत्पल-दल’ म्हणजे निळ्या कमळाच्या पाकळ्या! ब्रह्मसंहितेत श्रीकृष्णाचे वर्णन - निळ्या रंगाचा मेघ - असे केले गेले आहे.

निळ्या रंगाचा मेघ आणि निलोत्पल दल, अशी वर्णने कितीही सुंदर असली, तरी ती श्रीकृष्णाचे पूर्णत्व कसे धारण करतील? आपण गोळा केलेले तुकडेच ते!

‘आभाळ पलिकडे माठ फुटे हा इकडे

हा वेडा जमवी आभाळाचे तुकडे।।

९४)

‘आरशात पाहती कोण कुणाचे रूप

देहात दिसे का तुजला तुझे स्वरूप

बघ गेला पारा फुटला आरसा जाड

दिसले रे दिसले, 'अरुप’ आरशाआड।।’

माणूस स्वतःला आरशात बघतो. तेव्हा कोण कुणाला बघत असते? आरशात देह दिसतो, पण देह देहाला बघत असतो का? का बघणारा देहापासून वेगळा कुणीतरी असतो? देहात आपल्याला आपले रूप दिसते, पण ते रूप म्हणजे आपण असतो का? का आत्मरूप अजून वेगळे असते. आध्यात्मात आत्मरूपाला 'स्वरूप' असे म्हटले गेले आहे. ह्या अर्थाने किणीकर विचारत आहेत -

‘देहात दिसे का तुजला तुझे स्वरूप’

किणीकर पुढची ओळ लिहितात -

‘बघ गेला पारा फुटला आरसा जाड’

पारा नसेल तर आरसा ‘आरसा’ नसतो. ती फक्त एक काच असते. पारा उडून गेला की, काच मागे उरते. आत्मा निघून गेला की, मागे निष्प्राण देह उरतो. फक्त माती उरते. आत्म्याला स्वरूप म्हटले गेले आहे खरे, पण आत्मतत्त्व निराकार असते. म्हणून किणीकर उपहासाने म्हणत आहेत की, आरसा फुटल्यावर, आत्मतत्त्व निघून गेल्यावर अरूप ‘दिसले’. ‘गीते’त नवव्या अध्यायात श्रीकृष्ण म्हणत आहेत -

‘मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना | मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थित:।।९:४।।’

(हे सर्व व्यक्त जग मी अव्यक्त रूपाने व्यापलेले आहे. (खरं तर) सर्व व्यक्त जग माझ्यात राहते, मी जगात राहात नाही.)

व्यक्त आणि अव्यक्ताचे असे हे नाते गीतेने सांगितलेले आहे. रूपाचे आणि अरूपाचे असे हे नाते आहे. किणीकरांसारख्या अवलियाला हे सर्व माहीत होते. त्यांनी ते किती लीलया कवितेत मांडले आहे, ही चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे.

९५)

‘या इथेच होती स्वप्ने मधुरात्रीची

या इथेच होती स्वप्ने उमलायाची

काळोख नेसुनी आला वादळवारा

ठेवुनि आठवण विरुनी गेल्या गारा।।

अप्रतिम शब्दचित्र! एका विनाशाचे शब्दचित्र! मधुरात्रीची स्वप्ने उराशी बाळगलेली होती, उमलण्याची स्वप्ने उराशी बाळगलेली होती. आणि अचानक वादळ आले. कसे आले तर काळोख नेसून! विनाश, अंधःकार आणि भीती नेसून वादळ आले. परिस्थितीने असा भडिमार केला की, सगळी स्वप्ने तुटून पडली. सगळ्या आशांवर पाणी फेरले गेले. त्या वादळातील विनाशकारी गारा त्यांचे काम करून गेल्या. जबरदस्त मार देऊन गेल्या. त्यांनी घातलेले घाव भरून आले. मागे फक्त त्या माराच्या आठवणी राहिल्या आहेत.

‘काळोख नेसुनी आला वादळवारा

ठेवुनि आठवण विरुनी गेल्या गारा।।

९६)

‘दाटल्या गोठल्या विस्मरणाच्या नाड्या

धावती रुळावर त्याच त्याच त्या गाड्या

ती शिटी, तो दिवा, सिग्नल पडतो तोच

जखम तीच, त्यावर माशा बसल्या त्याच।।’

आयुष्यात तोचतोचपणा येतो आणि आयुष्य बेचव बनून जाते. स्मरणात राहावे, असे काही घडत नाही. आयुष्यात इतकी उदासी येते की, स्मरणातच काय विस्मरणातही रस राहत नाही. सगळे मन दाटून येते. सगळे मन गोठून जाते. त्याच त्या भावना मनात येत राहतात. त्याच त्या पद्धतीने त्या आल्या तशा निघून जातात.

‘धावती रुळावर त्याच त्याच त्या गाड्या

ती शिटी, तो दिवा, सिग्नल पडतो तोच’

त्याच त्या जखमा मनात उघडतात, त्याच त्या दुःखाच्या आणि इतर भावना त्या जखमांच्या उघडण्यामुळे मनात येतात.

‘जखम तीच, त्यावर माशा बसल्या त्याच।।’

निरसतेची ही भावना आधुनिक कवितेत फार प्रकर्षाने मांडली गेली आहे. पारंपरिक कवितेत ही भावना फारशी दिसून येत नाही. उमर खय्याममध्ये तर नाहीच नाही. नाही म्हणायला शेक्सपिअरमध्ये ‘बोअरडम’वर लिहिले गेलेले आहे-

‘Life is as tedious as a twice-told tale

Vexing the dull ear of a drowsy man;’  (किंग जॉन - अंक ३, प्रवेश ४).

(आयुष्य एक कहाणी कंटाळवाणी, परत परत उगाळली जाणारी,

झोपाळलेल्या माणसाच्या मंदावलेल्या कानांमध्ये परत परत तोंड घालून बडबडणारी.)

आयुष्याच्या तोचतोचपणातून येणारा त्रासलेपणा शेक्सपिअरने मंदावलेल्या कानांभोवती गुणगुण करणाऱ्या नीरस गोष्टीच्या प्रतिमेत पकडला आहे. किणीकरांनी तो नीरस आयुष्याचा त्रास जखमेवर बसणाऱ्या त्याच त्या माशांच्या प्रतिमेत पकडला आहे. बोअरडम टी. एस. एलियट, मर्ढेकर आणि विंदा करंदीकर ह्यांनी फार संवेनशीलतेने पकडला आहे. प्रतिमांच्या आयोजनात किणीकर ह्यातील कुणापुढेही कमी पडत नाहीत.

९७)

‘डबक्यात मनाच्या स्वप्नांचे शेवाळे

काठावर डोळे मिटुनि बसले बगळे

धालून शवासन बेडूक योगी आला

संभोग मागतो इवल्या मासोळीला।।

मन कितीही तल्लख वाटले तरी, नीट बघितल्यावर मनात त्याच त्याच प्रकारचे तरंग अगणितपणे उमटत असतात. मन तेच तेच हेतू उराशी बाळगून बसलेले असते, मनात त्याच त्याच इच्छा आणि त्याच त्याच वासना घर करून बसलेल्या असतात. मनात तीच तीच स्वप्ने घुटमळत राहिलेली असतात. म्हणून किणीकर म्हणतात -

‘डबक्यात मनाच्या स्वप्नांचे शेवाळे

काठावर डोळे मिटुनि बसले बगळे

त्याच त्याच इच्छांमुळे, तीच तीच स्वप्ने पडतात. त्याच त्याच हेतुंचे बगळे मनाच्या डबक्याच्या काठांवर दबा धरून बसलेले असतात. मनात एक आदर्श विचारांचा आणि आदर्श भावनांचाही एक भाग असतो. किणीकर त्याला ‘बेडुक-योगी’ म्हणतात. हा स्वतःला एखाद्या योग्याएवढा आदर्श आणि मोठा समजत असला, तरीसुद्धा तो बेडकाएवढाच क्षुद्र असतो.

लैंगिक इच्छा हाच ह्या आदर्श विचारांचा पाया असतो. किणीकरांच्या काळात सिग्मंड फ्रॉइडने मांडलेल्या मनाच्या संकल्पनेचा फार बोलबाला होता. लैंगिक इच्छा हाच मनाचा पाया आहे, अशा विचारावर आधारित फ्रॉइडने आपल्या मानसशास्राची बांधणी केली होती. थोडक्यात आपल्या मनातील बेडुक-योग्याचा डोळा लैंगिक इच्छापूर्तीकडेच असतो.

शवासन हे योगासनातील शेवटचे आसन. पूर्ततेला गेलेल्या साधकालाच हे जमते. शवासन घालून मनाच्या डबक्यात तरंगत राहिलेला हा बेडुक-योगी मनाच्या डबक्यात राहायला आलेल्या स्त्री-रूपांच्या मासोळ्यांना संभोग मागतो आहे. बेडकाने मासोळीला संभोग मागणे, ह्यातील व्यभिचाराची थीम वाचकांच्या लक्षात आली असेलच. मनाची बांधणी नैतिकतेच्या पायावर झालेली नसून ती अनिर्बंध आणि नैतिकतेच्या पार असलेल्या वासनांच्या पायावर झालेली आहे, हा विचार इथे ह्या रुबाईमध्ये फार कलात्मक पद्धतीने चित्रित झाला आहे.

.................................................................................................................................................................

या लेखमालिकेतले आधीचे लेख

रॉय किणीकर रुबाईची परंपरागत ताकद आणि भारतीय आध्यात्मिक जीवनदृष्टी ह्यांच्या मिलाफातून एक वेगळेच जादूभरले रसायन तयार करतात…

रॉय किणीकर आध्यात्मिक होते की नाही, मानवी बुद्धीच्या पलीकडे ते गेले होते की नाही, हे कळायला मार्ग नाही, पण त्यांना अध्यात्म बुद्धीच्या पातळीवर तरी चांगलेच उमगले होते, ह्यात शंका नाही!

रॉय किणीकर ‘आधुनिक काळा’तील बंडखोर प्रवृत्तीचे कवी होते. म्हणून त्यांनी शारिरिक प्रेमाच्या रुबाया लिहिल्या...

रॉय किणीकर मोठे ठरतात ते त्यांच्या जीवनदृष्टीमुळे. त्यांच्या जाणीवेला एकाच वेळी मानवी जीवनातले आदर्श आणि पाशवीपणासुद्धा दिसतो!

.................................................................................................................................................................

९८)

‘ही जुनीच माती नवी बाहुली व्याली

हे जुनेच कुंपण नवी मेंढरे व्याली

हे जुनेच ठिपके जुळता रांगोळीचे

उंदीर धावतील बिळात रेघोट्यांचे।।

किणीकरांच्या काळात दोन महत्त्वाचे शोध लागले. एक अणुबॉम्बचा आणि दुसरा म्हणजे डीएनएचा. जेम्स वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक ह्यांनी १९५३ साली डीएनएच्या थ्री डायमेन्शनल डबल हेलिक्स स्ट्रक्चरची संकल्पना मांडली.

फ्रीडरिश मीशनर ह्यांनी डीएनए सिद्धान्तबरहुकूम खरंच डबल हिलिकल स्ट्रक्चर असलेला आहे, हे सिद्ध केले. फीबस लेव्हनी आणि अर्विन शॉर्गफ ह्या दोघांनी डीएनएचे रेणू कसे आहेत आणि त्यांची रचना कशी आहे, हे दाखवून दिले.

मानवी शरीराची सगळी रचना एका ‘ब्लू-प्रिंट’वर झालेली असते आणि मानवाचे व्यक्तिमत्त्वसुद्धा बरेचसे त्या ‘प्रिंट’वरच अवलंबून असते हा फार मोठा शोध होता. एका नकाशावर सगळे मानवी व्यक्तिमत्त्व अवलंबून? त्याच्या आराखड्यानुसार मनवाने वागायचे? बरे, हा डीएनए पुढच्या पिढीत संक्रमित होतो. म्हणजे तो मरत नाही. युगानुयुगे तो ताजातवाना असतो. नव्या नव्या जिवांना जन्म देत राहतो.

‘ही जुनीच माती नवी बाहुली व्याली’

डीएनएने आखलेल्या आराखड्यात मानवाने राहायचे -

‘हे जुनेच कुंपण नवी मेंढरे व्याली’

डीएनएची रचना म्हणजे जणू रांगोळी कढायच्या आधी ठिपके काढले जातात तसे ठिपके आहेत. त्या ठिपक्यांप्रमाणे रेषा जोडत गेले की, रांगोळी तयार होते. डीएनएबरहुकूम हाडामांसाची बांधणी केली की, माणूस तयार होतो-

‘हे जुनेच ठिपके जुळता रांगोळीचे

उंदीर धावतील बिळात रेघोट्यांचे’

जर आराखड्याबरहुकूम माणूस तयार होणार असेल आणि वागणार असेल, तर तो ह्या रांगोळीच्या रेघांवरून पळणारा उंदीरच आहे. ह्या परिस्थितीत मानवाने स्वातंत्र्याच्या आणि कर्तृत्वाच्या आणि पुरुषार्थाच्या गप्पा करणे व्यर्थ आहे.

.................................................................................................................................................................

या लेखमालिकेतले आधीचे लेख

किणीकरांच्या कवितेतील आशयघनता पचवायची असेल, तर खूप विचार करायला लागतो. ह्या अर्थाने ते मर्ढेकरांच्या खूप जवळचे आहेत

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

रॉय किणीकरांना कवी म्हणून जी प्रतिष्ठा मिळायला पाहिजे होती, ती त्यांच्या आयुष्यात आणि नंतरही मिळाली नाही…

या दुनियेत प्रेषित म्हणून आलेले, बुद्ध म्हणून आलेले, अवतार म्हणून आलेले सगळे मृत्यू पावलेले आहेत. प्रेषित असो, बुद्ध असो, अवतार असो, देव असो, कुणालाही मरण चुकत नाही

शब्दांना मानवी मनातील विचार पूर्णत्वाने सापडत नाहीत. मनाच्या पलीकडचे काय सापडावे?

.................................................................................................................................................................

९९)

‘मी मुंगी अन् वारूळ मी, मी वाल्मिकी

रामावर लिहिले नाटक मी एकांकि

रामास भेटला एक गुरू गोसावी

कामिनी पळवितो कांचनमृग मायावी ।।

हे विश्व म्हणजे माया आहे. जे जसे दिसते तसे नसते, ते मायावी असते. तुम्ही स्वतः जसे दिसता तसे नाही आहात. तुम्ही ब्रह्मन् चा अंश आहात. पण तुम्हाला वाटते आहे की, तुम्ही तुम्ही आहात. गवताचे पातेसुद्धा ब्रह्मरूप आहे, पण ते गवत म्हणून आपल्याला दिसते. सगळे जग म्हणजे एक भ्रम आहे.

‘मी मुंगी अन् वारूळ मी, मी वाल्मिकी’

वाल्मिकी ऋषी, त्यांनी तपश्चर्या करताना त्यांच्या शरीराभोवती उभे राहिलेले वारुळ आणि ते वारुळ ज्या मुंग्यांनी बांधले त्या मुंग्या - हे सर्व ब्रह्म आहे. स्वतः कवीसुद्धा ब्रह्मरूपच आहे. त्यामुळे किणीकर लिहितात-

‘मी मुंगी अन् वारूळ मी, मी वाल्मिकी’

खरं तर रामावर नाटक लिहिले गेले, तेसुद्धा ब्रह्मरूपच आहे.

‘रामावर लिहिले नाटक मी एकांकि’

राम तर अवतार! साक्षात ब्राह्मनचा अंश! राम स्वतः जाणीवपूर्वक ह्या मायेत उतरला आहे. आता खरी मजा सुरू होते. ह्या मायेच्या ईश्वराला एक मायावी गुरू भेटतो. मारीच! खरं तर मारीचसुद्धा मायेचाच भाग आहे, पण तो मायावी रूप धारण करतो. मायेच्या पोटात माया! माया विदिन अ माया!!! गंमत म्हणजे मायेच्या ईश्वर असलेल्या रामाला ही मायेच्या पोटातली माया ओळखू येत नाही. म्हणजे रामाला गुरू भेटला की नाही? रामाची बायको पळवली जाते.

‘कामिनी पळवितो कांचनमृग मायावी ।।’

आता विषय असा येतो की, रामाला माया ओळखू का आली नाही? त्याचे उत्तर ‘गीते’च्या सातव्या आध्यायात सापडते.

‘दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया।

मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते।।७:१४।।

ही आहे माझी दैवी माया. गुणांनी बनलेली. (सत्व, रज आणि तम ह्या त्रिगुणांनी बनलेली). ह्या मायेला (ओळखून) पराभूत करणं फार अवघड आहे. जे मला शरण येतात, ते ही माया तरून पार जातात. किणीकर सुचवत आहेत की, एकदा ह्या मायेत उतरल्यावर साक्षात श्रीरामांनासुद्धा माया खरी वाटू लागली आणि त्यामुळेच मायेच्या पोटातील मायेलासुद्धा ते फसले. आध्यात्मिक संकल्पनांवर किणीकरांची फार जबरदस्त पकड होती.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

१००)

‘रे कुणी दिला या पाषाणाला शाप

जा मंदिरातल्या मूर्तीचा हो बाप

पाषाण म्हणे मूर्तीला, माझ्या पोरा

सर्वज्ञ म्हणति तुज, मीच कसा रे कोरा।।’

ह्या दुनियेची रीतच उफराटी आहे. खरं तर देव माणसातच लपलेला आहे, असे अध्यात्म ओरडून ओरडून सांगते आहे. तरीही माणूस दगडाच्या मूर्तीत ‘देव’ शोधायला जातो.

‘रे कुणी दिला या पाषाणाला शाप

जा मंदिरातल्या मूर्तीचा हो बाप

दगड हा मूर्तीचा बाप असेल तर मूर्ती त्याच्याहून मोठी कशी असेल?

‘पाषाण म्हणे मूर्तीला, माझ्या पोरा

सर्वज्ञ म्हणति तुज, मीच कसा रे कोरा।।’

कोरा पाषाण मूर्तीत रूपांतरित झाला म्हणून देव कसा बनेल? स्वतःतील देव विसरायचा आणि दुसरीकडे शोधायचा, ही उफराटी रीत आहे. खरं तर अध्यात्म सांगते की, दगडामध्येसुद्धा देव आहे, पण माणसाला जसा स्वतःमधील देव प्रतीत होऊ शकतो, तसा दगडाला प्रतीत होऊ शकत नाही. ह्या अर्थाने दगड म्हणतो आहे की, मी कोरा आहे, तशी मूर्तीसुद्धा कोरी आहे.

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......