टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • रशीद लतिफ, सरफराज अहमद, पाकिस्तान क्रिकेट संघ, बाबा रामदेव, अमित शहा, कैलाश विजयवर्गीय, रामनाथ कोविंद आणि रामविलास पासवान
  • Tue , 20 June 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या रशीद लतिफ Rashid Latif सरफराज अहमद Sarfraz Ahmed पाकिस्तान क्रिकेट संघ बाबा रामदेव Baba Ramdev अमित शहा Amit Shah कैलाश विजयवर्गीय Kailash Vijayvargiya रामनाथ कोविंद Ram Nath Kovind रामविलास पासवान Ram Vilas Paswan

१. पाकिस्तानने भारतावर दणदणीत विजय मिळवत चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. यानंतर पाकिस्तानचे माजी यष्टिरक्षक रशीद लतिफ यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून पाकिस्तानच्या विजयावर भाष्य केले. भारताच्या खेळाडूंवर, विशेषत: वीरेंद्र सेहवागच्या ‘बाप आणि बेटा’ या प्रतिक्रियांवर लतिफ यांनी भाष्य केले आहे. ‘पाकिस्तानच्या या विजयाला कोणतेही उत्तर असू शकत नाही. पाकिस्तानी संघाने आपल्या कामगिरीतूनच सर्व टीकाकारांना उत्तर दिले आहे. भारत आणि पाकिस्तानने एकमेकांबरोबर खेळलं पाहिजे. आशिया ही क्रिकेटची मोठी बाजारपेठ आहे. अॅशेससारख्या मालिकादेखील भारत-पाकिस्तानपेक्षा मोठ्या नाहीत आणि आयसीसीलादेखील माहित आहे. आशियामध्ये श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तानसारखे संघ आहेत. हे संघ क्रिकेट जगतावर वर्चस्व गाजवतात. त्यामुळे या देशांमध्ये मालिका व्हायला हव्यात. आयपीएलमध्येदेखील पाकिस्तानी खेळाडूंना संधी मिळायला हवी. यासोबतच भारतीय क्रिकेटपटूदेखील पीएसएलचे भाग व्हायला हवेत,’ असे लतिफ यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

रशीदभाऊ, भारत आणि पाकिस्तान ही क्रिकेटची मोठी बाजारपेठ आहेच. पण, त्याहून मोठी बाजारपेठ ती धर्मवेडाची आणि परस्परद्वेषाची आहे. दोन्हीकडचे राजकारणी गणंग आणि पाकिस्तानातले लष्करशहा या आगीवरच तर इकडे पोळी आणि तिकडे तंदूरी भाजून घेत असतात... दोन्ही देशांमध्ये मैत्रीचं वातावरण निर्माण झालं तर या सगळ्या बेरोजगारांना कुठे धाडणार?

……………………………………………………………………………………………

२. चॅम्पियन्स करंडकात पाकिस्तानने अंतिम फेरीत भारतावर मात करत विजेतेपदावर आपलं नाव कोरल्यामुळे पाकिस्तानमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. चॅम्पियन्स करंडकविजेत्या संघाचं मंगळवारी पाकिस्तानात आगमन झालं. यावेळी कर्णधार सरफराज अहमदच्या स्वागतासाठी त्याच्या घराबाहेर हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती.

हा खेळ, तो खेळणारे हे दोन देश, या देशांमधले क्रिकेटचे चाहते आणि त्यांचे रागलोभ हे सगळंच किती अजब आहे... हा सामना पाकिस्तान हरला असता, तरी त्याच्या ‘स्वागता’ला हजारो चाहते (बहुधा आता आले तेच) गोळा झालेच असते- फक्त माहौल वेगळा असता आणि सरफराजसह अन्य सगळ्या क्रिकेटपटूंच्या घरांभोवती कडेकोट पहारा बसवावा लागला असता... ‘चाहत्यां’च्या ‘प्रेमा’पासून त्यांचं संरक्षण करायला.

……………………………………………………………………………………………

३. गुजरातमधील अहमदाबादमध्येही आयोजित योग शिबिरात योगगुरू बाबा रामदेव यांनी वजन कमी करण्यासाठी योग कसं उपयुक्त आहे, याची अनेक उदाहरणं दिली. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी योगासनं करून २० किलो वजन कमी केलं, असं त्यांनी सांगितलं.

अमित शहा यांचं वजन कमी झालं, असं बातमीचं शीर्षक ऐकून भाजपच्या नागपूर गोटात हर्षाची लाट उसळली होती म्हणे. स्वत:च्या वजनाची चिंता न करता लोकांनी संत्राबर्फी वाटली आणि स्वत:ही चाखली. पण, हे शारीरिक वजन घटलं आणि त्याने शहा यांची ‘कार्य’क्षमता आणखी वाढलीच आहे, हे कळल्यावर संत्र्याची साल दाताखाली आल्यासारखी तोंडं कडू झाली त्यांची.
……………………………………………………………………………………………

४. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर त्यांच्या दलितत्वाचे भांडवल करणाऱ्या भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या वर्तनावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. दलित मतांसाठी भाजपने चालवलेल्या राजकारणावर आणि कोविंद यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पार्श्वभूमीवरही टीका होते आहे. भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यावर म्हणाले, ‘कोविंद राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत, यात गैर काय? संघाचे लोक पाकिस्तानी आहेत का?’

विजयवर्गीय यांच्या या वक्तव्यातून त्यांच्या नकळत मिळणारी माहिती मौलिक आहे. यांना पाकिस्तान-सिंड्रोम झालेला आहे. कोणत्याच अर्थाने भारताच्या बरोबरीचा नसलेला एक देश असल्या पाकिस्तानद्वेष्ट्यांच्या सततच्या भयव्याकूळ उल्लेखामुळे भारतीयांना दखलपात्र आणि तुल्यबळ वाटू लागला आहे. पाकिस्तानी लोक असले तर काय होतं कैलाशकाका? घाबरायला होतं? कसला राग येतो? की घाबरल्यामुळेच रागाचा देखावा करता?

……………………………………………………………………………………………

५. बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद हे एनडीएचे राष्ट्रपतीपदासाठीचे उमेदवार घोषित झाल्यानंतर देशभरात संमिश्र प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली. कोविंद हे उत्तर प्रदेशमधील दलित समाजातील आहेत. रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारीला पाठिंबा न देणारे दलितविरोधी समजले जातील, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामविलास पास्वान त्यांनी दिली.

श्रोतेहो, आकाशवाणीच्या सत्तासुख कार्यक्रमात आता ऐकूयात, ताटाखालचे मांजर या चित्रपटातील एक शास्त्रीय गीत... गीताचे शब्द, स्वर आणि संगीत आहे सुरलाचार रामविलास पास्वान यांचं... बोल आहेत ‘कुणी कोविंद घ्या, कुणी कोविंद घ्या, सगळे कोविंद घ्या, फक्त कोविंद घ्या’... श्रोतेहो, हे गाणं ‘जो सरकारविरोधी तो देशविरोधी’ या लोकप्रिय गीतावर बेतलेलं आहे, हे आपल्या लगेच लक्षात येईल.

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......